भटकंती

राजधानीची सफर

Primary tabs

गेल्या आठवड्यात मात्र अचानक दिल्लीला जायचं ठरलं, तेही अगदी एकाच दिवसात. आता इतक्या ऐनवेळी राजधानी, दुरोंतोशिवाय अन्य गाड्यांची आरक्षणं मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणून मिळताहेत, तोवर लगेच मुंबईहून राजधानीचं आरक्षण करून टाकलं. मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज (ट) (CSMT) वरून सुटणारी आणि मुंबई सेंट्रलवरून सुटणारी ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी यांची आरक्षणं शिल्लक होती.

22221 राजधानी ही भारतामधली सर्वात नवी म्हणजे सर्वात अलीकडे सुरू झालेली राजधानी एक्सप्रेस आहे. त्याचबरोबर “ढकल-ओढ” म्हणजेच Push-Pull तंत्रज्ञानावर चालणारी ही एकमेव राजधानी एक्सप्रेस आहे. दुपारी तीन वाजता गाडी फलाटावर लावली गेली. पुढच्या आणि मागच्या इंजिनांची गाडीशी ही मुख्य जोडणी केल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या केबल्सही दोन्ही इंजिनं आणि गाडीशी इतर कर्मचाऱ्यांनी जोडल्या. त्याचवेळी तिकडे Hot Buffet Car मधल्या कर्मचाऱ्यांनी गाडीत खानपानाच्या सगळ्या वस्तू चढवण्यास सुरुवात केली होती. या गाडीच्या प्रवाशांचीही आपली जागा पकडण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. मला एक कळालेलं नाही, आपल्याकडे आरक्षण असतं, गाडीला सुटायला अजून बराच वेळ असतो, तरी मग इतकी धावपळ कशाला करायची? तर अशी धावपळ करणाऱ्यांची जरा जास्तच भंबेरी उडत होती, ती केव्हा, तर जेव्हा दुसऱ्याच कोणत्या तरी गाडीचा भोंगा ऐकू आला की.

अखेर संध्याकाळी ठीक 4 वाजता आमच्या ‘राजधानी’नं दिल्लीच्या दिशेनं कूच केलं. गाडी सुटताच पँट्रीच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाचे सीट नंबर आणि रात्रीचं जेवण शाकाहारी की मांसाहारी, सकाळी नाश्ता काय हवा - शाकाहारी की मांसाहारी, शाकाहारी नाश्ता हवा असेल, तर त्यात काय हवं – कटलेट, पोहे, उपमा, हे सगळं त्यानं नोंदवून घेतलं. त्याचवेळी प्रत्येकाला पाण्याची बाटलीही तो देत गेला. आमच्या इथे तो ऑर्डर लिहून घ्यायला आला, तेव्हा आमच्या शेजारी असलेल्या कुटुंबातील प्रवाशांची चर्चा रंगली होती, जेवण-नाश्त्यात काय-काय मागवायचं याची. इकडे हे सगळं डब्यात सुरू असताना ‘राजधानी’नं अगदी जोरात दादर ओलांडलं. मस्त वाटलं ते दृश्य बघून! दरम्यान, खिडकीतून बाहेर मुंबईचे दृश्य दिसत होतंच. आमच्या ‘राजधानी’च्या दोन्ही बाजूंकडून जलद आणि धीम्या लोकल्स पळत होत्याच, अधूनमधून एखादी मेल-एक्सप्रेसही जात होती. ठाण्यानंतर ‘राजधानी’ चौथ्या मार्गावरून जाऊ लागली आणि बोगदे ओलांडून दिव्याला आली. पण दिवा तिनं जरा हळुहळूच ओलांडलं. त्यानंतर थोडावेळ पनवेलकडून आलेली पनवेल-गोरखपूर एक्सप्रेसही आमच्याबरोबर समांतर दौडत होती. चहा झाल्यावर आमच्या शेजारच्यांनी घरून आणलेले मांसाहारी जेवणाचे डबे बाहेर काढले आणि ते खाण्यास सुरुवात केली.

थोड्याच वेळात कल्याणला गाडी पोहचली, अधिकृत वेळेच्या 2 मिनिटं उशिरा. गाडी सुटताच कल्याणला चढलेल्यांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप सुरू झाले. आता इथून पुढे मनमाडपर्यंत माझ्यासाठी नवा मार्ग होता. त्या मार्गावरून याआधी मी एकदाच गेलो होतो. त्यालाही आता 17 वर्षे झालीत. कसारा घाटाकडे जात असताना आता मुंबईच्या लोकल्सची गर्दी कमी झालेली होती; कसाऱ्याकडून येणाऱ्या लोकल्स अधूनमधून क्रॉस होत होत्या. आज नागपूरकडून येणाऱ्या गाड्या बऱ्याच उशिराने धावत होत्या. त्यामुळे बऱ्याच गाड्या काही मिनिटांच्या अंतराने आम्हाला क्रॉस होत होत्या. त्यापैकीच एक गोरखपूरहून मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस होती. ती जाणार असल्यामुळे सेक्शन कंट्रोलरच्या सुचनेप्रमाणे एक कंटेनर घेऊन कल्याणच्या दिशेने निघालेली, WDG-4 इंजिन जोडलेली गाडी खडावलीला बाजूला उभी करून ठेवण्यात आली होती. गोरखपूरहून येणाऱ्या गाडीला मार्ग मोकळा करून देण्यासाठी. आम्ही पुढे गेलो आणि मुंबईकडे निघालेली आणखी एक एक्सप्रेस आम्हाला क्रॉस झाली.

‘राजधानी’ 18:23 ला लहावीत ओलांडत असताना तिथे WAP-4 इंजिन सारथ्य करत असलेली 12139 सेवाग्राम एक्सप्रेस बाजूला काढून आम्हाला मार्ग मोकळा करून दिलेला होता. आता घड्याळात 18:34 झालेले होते आणि आमची ‘राजधानी’ नाशिक रोडला दाखल झाली होती. आज इथं ती 16 मिनिटं उशिरा पोहचली होती. कल्याणपेक्षा नाशिक रोडला बरीच गर्दी गाडीत चढली. प्रत्येक जण माझी सीट कुठली हे शोधण्यात गुंतलेला होता. दोनच मिनिटांनी आपला दुसरा थांबा आटपून ‘राजधानी’ पुढच्या प्रवासाला निघाली. आता पुन्हा नव्या प्रवाशांचे स्वागत पाण्याच्या बाटल्या देऊन करण्यात आले आणि पुन्हा जेवण आणि नाश्ता याबाबतची प्रश्नोत्तरे सुरू झाली. आमच्या मागच्या कंपार्टमेंटमध्ये असलेली लहान मुलं आपापल्यात मस्ती करण्यात आणि त्यांच्याबरोबर असलेले मोठे आपापसांत गप्पा मारण्यात मग्न होते. पुढे चारच मिनिटांनी दक्षिण गंगा अशी ओळख असलेली गोदावरी नदी ओलांडली.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/1.html

भाग-2 ची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/2.html

कंजूस

जेवणासह? का पर्याय आहे न घेण्याचा?शेजारच्यांनी घरून आणलेले ..जेवणाचे डबे बाहेर काढले
चार वाजता गाडी सुटली म्हणजे संध्याकाळचा नाश्ता देत नाहीत का?

पराग१२२६३

संध्याकाळचा नाश्ता देतात, तरीही त्या प्रवाशांना घरचेही पदार्थ खायचे होते. डबे भरून सोबत आणले होते त्यांनी.

चौथा कोनाडा

छानच ! मस्त !

मला एक कळालेलं नाही, आपल्याकडे आरक्षण असतं, गाडीला सुटायला अजून बराच वेळ असतो, तरी मग इतकी धावपळ कशाला करायची?

विनाकारण गर्दी करणे, धावपळ करणे, चेंगरून घेणे हे लोकांच्या रक्तात मुरले आहे.
देवाच्या पालखीचे दर्शन घेताना तर काही विचारूच नका, गर्दीत करून, गर्दीत घुसून पदुकांना हात लावला नाही लावला तर जीवच जाईल आपला असा अविर्भाव असतो

तुमच्या बरोबरच प्रवास करत आहे असे वाटले.
रेल्वे ट्रॅव्हलॉगचा हा प्रकार मस्त आहे !
प्रचि इथे डकवता आली तर सोन्याहून पिवळे !

आगगाडीत पहिला प्रवास पेशवे पार्क मधल्या फुलराणीतला.
नंतर असेतुहिमाचल मीटरगेज,ब्राडगेज, लोकल, इ एम यू, पॅसेंजर, एक्स्प्रेस, शताब्दी, राजधानी,दुरांतो,गरीबरथ सारे अनुभव घेतले.
सर्वात जास्त आवडलेला म्हणजे...
पावसाळ्यात पुणे मुंबई डेक्कन क्वीन

मीटरगेज
गोहाट्टी -धर्मनगर व्हाया हाफलाॅगं,लामडिगं,बदरपूर - कचहार एक्स्प्रेस आणी बराक व्हॅली एक्स्प्रेस.
आगरतला गेलो होतो.

लग्नानंतर पहिल्यांदाच मुंबई लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस ने गेलो होतो. आरक्षण प्रणाली मानविय, जेव्हा आरक्षण तक्ता बघितला तर आस्मादिकाना प्रथम श्रेणीत कुपे मीळाला होता. सहाजिकच प्रवास अविस्मरणीय झाला.