जे न देखे रवी...
वैशाखाची ऊन्हं ..
Primary tabs
वैशाखाची ऊन्हं जेव्हा नको नको झाली,
वळीवाची आठवण उमलून आली.
बहाव्याने केली रिती फुलांची पखाल,
पंगा-याच्या अंगावर खुळावली लाली..
सावरीच्या म्हातारीला पंख पंख फुटे,
वयासंगे उडुनिया गेले तिचे काटे.
चाफ्याचा बहर जणू बैराग्याची झोळी,
धरू धरू म्हणताना काहीतरी सुटे.
सुकलेले पात्र, मधे खोल खोल डोह,
सुटता सुटेना कसा जीवनाचा मोह.
काठावर कुणी वेडा सूर तोलणारा,
कंठी त्याच्या मल्हाराचा ओला अवरोह.
ऐकुनिया बकुळी ती लाजली जराशी,
चित्त तिचे उडुनिया गेले कुणापाशी?
नादावले मन तिचे उतू उतू जाई
पायापाशी म्हणूनच नव्हाळीची राशी.
वैशाखाची उन्हं मग गंधमय झाली
वळीवाची आठवण दूरदूर गेली...
खूपच आवडली रचना. वाखूसा.
(पंगारा = पांगरा?)
सं - दी - प
धन्यवाद.
हो तोच लाल फुलं असणारा.
सुंदर! पुन्हा पुन्हा वाचावी अशी!
गारव्याचा शिडकावा!
आवडली रचना. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
चित्रात तरंगावे तल्लीन काव्य बिंदू
तैसी कवियत्री प्राची अश्विनींच्या
अभिजात काव्याची प्रचिती खास
वैशाखाचे उन्ह देखील सुखावणारे आहे हे समजावून देणारी कवीता!
नितांतसुंदर आणि चित्रदर्शी, फार आवडली कविता....
होरपळून टाकणर्या वैशाख वणव्यामधे अचानक वळीव आल्यावर जो अनुभव येतो तोच अनुभव ही कविता वाचताना आला.
उन्हाळ्यावरची सुखद कविता बर्याच दिवसांनी वाचायला मिळाली.
मिपावरच्या सर्वोत्तम कवितांची यादी बनवायची झाली तर त्या यादित ही कविता नक्की आली पाहिजे.
पैजारबुवा,
सुरेल शब्दांचे रसमय कारंजे . थंडगार तुषार अंगावर शिडकावा करणारे !
वैशाखातली उन्हं
कैरीची पन्हं
याच नातं लई जुनं
बेलाच फळ
वैशाखातली झळ
लई जुना मेंळ
कवीता आवडली.
पन्ह -हायलं खरं. बेलफळ कधी खाल्लं नाहीये.
उत्तर भारतात उन्हाळ्यात उन बाधू नये म्हणून पिकलेल्या बेलफळाचे सरबत पितात.जागोजागी सरबताच्या हातगाड्या उभ्या दिसतात.
अति सुंदर!
आणि समयोचित ....
पु ले शु
धन्यवाद सगळ्यांना.
खूप छान!
कवयित्रीने केली रिती शब्दांची पखाल!!
धन्यवाद श्रीगणेशा!