जे न देखे रवी...

कुण्या देशिचा असेल वारा??

Primary tabs

दूरदेशिचा दरवळ घेऊन, झुळझुळणारा येतो वारा,
धडधडणारे काळिज आणिक फडफडणा-या नयनी तारा.
विशाल गो-या कपोलावरी घर्मबिंदु का सरसर जमती?
वरवर सारे शांत तरीही खळखळणा-या मनात धारा..

सळसळणा-या उत्तरियाचा पोत रेशमी नकोनकोसा,
थरथरणा-या कायी स्मरतो स्पर्श कोणता हवाहवासा?
किणकिणणा-या कंकणास का कुणकुण कोणा अगंतुकाची?
रुणझुण रुणझुण नाचति नुपुरे, पावलांस मग कुठला थारा?

घेऊन घागर, घाबरघाबर, घरून निघते पाणवठ्यावर;
कुणी यौवना झरझर भरभर, तमाचीच वर ओढुन चादर.
कुंडल, कंकण, बिंदी, पैंजण.. जडजड होती सारे जेवर,
परंतु मखमल वाटे कंकर, तलम मलमली मार्गच सारा.

अशा अवेळी वेळुबनातुन कोण छेडितो अगम्य तारा?
झिळमिळ कौमुदि अवतीभवती तरी तनूचा चढतो पारा?
जरी रिकामी तरीहि भरली अशी कशी ती भासे घागर?
यमुनेकाठी कुठून अवचित द्वारकेतला सुगंध खारा?

कणकण वाळू कुंतलातली हळूच थोडी सोबत घेऊन,
परिमळ लेवून, गुणगुणणारा दूरदेशी मग निघतो वारा...

श्वेता२४

मस्त. अनुप्रास अलंकाराचे उदाहरण वाटतेय ही कविता. अर्थही खूप छान. वाचताना मजा आली.