जे न देखे रवी...

लिही रे कधीतरी...

Primary tabs

लिही रे कधीतरी.
काहीही, अगदी काहीssही चालेल.
पत्र, कविता, दोनोळीची चिठ्ठी पण पळेल.
पण कागदावरच्या शाईला हुंगता आलं पाहिजे.
शब्दांवर बोट अस्संss फिरवता आलं पाहिजे.
मग कान्याच्या मागे खांब खांब खेळेन,
वेलांटीच्या तळ्यात डुबकी मारेन.
अनुस्वाराच्या डोक्यावर हलकी थाप..
मात्रेवर चढताना लागेल धाप..
खोडलेलं अक्षर पाहून विचारात पडेन,
काय बरं लिहाताना अडखळलं पेन?
पण "माझ्यासाठी" लिहिलंस! हे खासंखास
जणू प्रत्यक्ष भेटीचाच होईल भास.
....म्हणूनच म्हटलं, लिही की रे कधीतरी....

कविता आवडली.

एकतरी ओळ अशी लिहावी शहाणी' हे उगीचच आठवले.

सं - दी - प

खरंच!! सध्याच्या ऑनलाईन जमान्यात माणसाचा माणसाशी संबंधच संपत चालला आहे की काय असे वाटते.
पुर्वी कसे, पत्र आले की माणुसच भेटल्याचा आनंद व्हायचा. त्यामुळे कविता भावली मनाला.

Bhakti

क्या बात!सुपर्ब!

स्मिताके

खूप सुंदर.

>>खोडलेलं अक्षर पाहून विचारात पडेन,
काय बरं लिहाताना अडखळलं पेन?

हे फार आवडलं.

चित्रगुप्त

अत्यंत आवडले. हाताने लिहीण्याची बातच न्यारी. आता दुर्मिळ होत चालेली ही गोष्ट पुन्हा नव्याने सुरु करायला हवी.
कुणास ठाऊक, पुढे भविष्यात कधीतरी निव्वळ ते हस्तलिखित आहेत, एवढ्याच कारणाने सुद्धा फाटक्या तुटक्या कोणत्याही कागदाच्या तुकड्यांचे लिलाव 'सॉदबीज' वगैरे करतील आणि मोठमोठ्या संग्रहालयांमधे जतन करून ठेवले गेलेले ते तुकडे तेंव्हाचे लोक अश्चर्याने बघतील.
"उदाहरणार्थ त्या काळी लोक हाताने 'शाई' नामक पदार्थ वापरून लिहीत वगैरे असत ... आता कुणी विचारेल की 'शाई' म्हणजे काय, तर सध्या यावर संशोधन सुरु आहे... 'कोसला'

लिही की रे कधीतरी....

लिहिणाऱ्या ने लिहीत जावे
वाचकाने प्रतिसादत जावे
लिहीणे वाचणे अदान प्रदान
भावनांच्या कुस्तीचे जणू मैदान

आवडली.

आंद्रे वडापाव

कधीतरी...

सस्नेह

हात आणि पेनने लिहिणारी मला वाटतं ही आपलीच पिढी अखेरची. पत्रं लिहिण्यातली मजा इथून पुढच्या लोकांना माहितीच नाही होणार :(

खरंय.
मागे Netflix वर Her नावाचा पिक्चर पाहिला होता. त्यातल्या भविष्यकाळातल्या नायकाचा पत्र लिहायचा job असतो. आजोबांना, प्रेयसीला इ. Orderप्रमाणे पत्र लिहायची.
ते आठवलं.

श्रीगुरुजी

कविता छान आहे. कोणीतरी लिहिलेले पत्र घरी येऊन ७-८ वर्षे तरी झाली असावी.

बाजीगर

प्राचीताई तुमच्या कवितेत इंदिरा संत यांच्यासारखी नजाकत आणि हळूवारपणा आहे.

कृपया लिहीत रहा.
कधीतरी नाही ....नेहमीच.

श्रीगणेशा

मग कान्याच्या मागे खांब खांब खेळेन,
वेलांटीच्या तळ्यात डुबकी मारेन.
अनुस्वाराच्या डोक्यावर हलकी थाप..
मात्रेवर चढताना लागेल धाप..

अवघड आहे असं सुचणं! _/\_