जे न देखे रवी...
साक्षी
Primary tabs
झुंजूमुंजूचे नभोनाट्य
क्षितिजावर रंगत जावे
सूर्यबिंब दवबिंदूंमधले
अलगद खुडून घ्यावे
त्या बिंदूंची रेष केशरी
लवलवती बनवावी
मावळतीची चांदणनक्षी
तिने हळू डहुळावी
स्पर्शाने अलवार विस्कटून
अवघी चांदणनक्षी-
-विरघळेल, त्या विरघळण्याला
एक विदेही साक्षी
विझणार्या सूर्यास्तबिंदूना
पश्चिम क्षितिजी टिपण्या
रिक्त ओंजळीत भरून घ्याव्या
मावळत्या चांदण्या
गतप्रभ नक्षत्रे अन् त्यातील
अगणित ह्या चांदण्या
तेज शिंपडित क्षितिजाखाली
जातील गात विराण्या
स्पर्शाने अलवार विस्कटूनअवघी चांदणनक्षी-
-विरघळेल, त्या विरघळण्याला
एक विदेही साक्षी
मस्त!
प्रारंभीच क्षितिजावर रंगत जाणारा नभोनाट्याचा विस्तृत पट क्षणार्धात दवबिंदूतल्या इवल्याश्या सूर्यबिंबात परिवर्तित होतो.. पुढे त्या बिंदूची 'लवलवती रेष केशरी' बनून 'चांदणनक्षी- विदेह साक्षी- पश्चिम क्षितिजी विझणारे सूर्यास्तबिंदू ... अशी वळणे घेत शेवटी क्षितिजाखाली विराण्या गात जाणार्या चांदण्याच्या रूपात ही अद्भुत कविता हुरहुर लावत संपते. अप्रतिम.
खणखणीत.. ब्रशचे कधी कणखर तर कधी कौशल्याने नाजूक स्ट्रोक अचूक जागी मारून अतिशय परफेक्ट पेंटिंग बनावे आणि ते आपण पहावे तसा भास झाला.
कवी म्हणून कल्पकता उत्कृष्ट आहेच पण शब्द देखील अतिशय चपखल. भाषेवर प्रभुत्व, रचनेत ताल कशात काही चूक काढायला जागाच नाही. :-)
मस्त रचना. एका साध्या दिवस-रात्र प्रवासाला सुरेख, अलवार शब्दांनी अलंकारिक करून अजून सुंदर बनवून केलेले प्रस्तुतीकरण आवडले. :)
सं - दी - प
मस्त कविता. आवडली.
सर्व कवितारसिकांना धन्यवाद
सुंदर प्रतिमासृष्टी. कविता आवडली