वैवाहिक सहजीवन
Primary tabs
पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल. स्त्रीमुक्तीचा विचार जसा सशक्त होत गेला तसा विवाह संस्थेचे भवितव्य अशक्त होत गेले.पुढील काही शतकात विवाह संस्था नामशेष होत जाईल असे आमचे भाकित आहे.आपला देश किमान तीन शतकात एकाच वेळी वावरतो. त्यामुळे कैक पिढ्या जातील. विवाह संस्थेला पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशन वाढत जाईल. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. सहजीवन व व्यक्तिस्वातंत्र्य एकाच वेळी जपता आले पाहिजे हा विचार लिव्ह इन मधे करार स्वरुपात केला जातो. अजून हा प्रकार प्रायोगिक अवस्थेत आहे. पण भविष्यात याला चांगले दिवस आहेत असेही भाकित या निमित्त वर्तवतो.
पुरोगामी विचारांच्या जेष्ठ लोकांच्या सहजीवनात अजून एक बाब येते. जेष्ठत्वाच्याच नव्हे तर एकूण सहजीवनातील प्रवासात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास ही स्वतंत्रपणॆ होत असतो. तो या टप्पात परस्पर पूरक राहिला असतोच असे नाही. दोन्ही व्यक्तिमत्वे विचारांनी, आर्थिक दृष्ट्याही स्वतंत्र असतात. तसेही सहजीवन ही तडजोडच असते. पुरोगामी विचारांमधे व्यक्ति स्वातंत्र्याला, विचार स्वातंत्र्याला अधिक महत्व आहे. सहजीवनाच्या एका टप्प्यावर जेव्हा व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक राहत नाहीत त्या टप्प्यात तडजोडी करत सहजीवन जगणे जाचाचे बनत जाते. चिडचिड वाढते. आतापर्यंत सहन केले आता नाही असा विचार बळावू लागतो. शिवाय तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असता. मग आता तडजोडी करत का जगायचे? आता पर्यंत केल्याच ना! तुमचे उर्वरित ऎक्टिव्ह आयुष्य थोडे असते. ते आपल्या मनाप्रमाणे जगावे असे वाटत राह्ते. त्यात सहजीवनाचे ओझे व्हायला लागते. त्यामुळे उतारवयातही घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. हे निरिक्षण तसे धक्कादायक वाटते. ज्या काळात एकमेकांना एकमेकांची गरज आहे त्याच काळात हे प्रमाण कसे वाढत चालले असा प्रश्न उपस्थित होतो. तसेही जेष्ठ ही काही एकजिनसी संकल्पना नाही. पण मुले व आईवडील अशा चौकटीत सोयीसाठी ती एकजिनसी ग्राह्य धरली जाते. व्यक्तिस्वांतंत्र्याचा अतिरेक असे जरी म्हटले जात असले तरी कुठल्या बिंदूपासून तो अतिरेक व कुठपर्यंत तो विवेकी असे काही ठोस उत्तर नसते. ते सापेक्ष आहे.अनेकदा असे होते की आयुष्याच्या उत्तरार्धात पतिपत्नी एकमेकांना कंटाळलेले असतात. मग एकमेकांची डोकी खात बसतात. तडजोडींची संख्या वाढायला लागक्ली की "सहजीवन" हे "सहनजीवन" होते. मग मागचे हिशोब निघतात. कधी जुने हिशोब चुकते केले जातात. असे स्कोअर सेटलिंग चालू असते. या वयात घटस्फोट घेणे ही एकमेकांना परवडणारे नसते मग नाईलाजाने संसार रेटत राहतात. तुम्ही एकटे राहिलात तरी ही समाजाशी तडजोड ही करावीच लागते. मग अपरिचतांशी तडजोड करत बसण्यापेक्षा परिचितांशी तडजोड केलेली बरी असा समन्वय साधला जातो.
करोना काळात एक निरिक्षण आहे. हे निरिक्षण जेष्ठांच्या सहजीवनालाही लागू आहे. एकमेकांच्या "स्पेस" वर या सामायिक काळात अतिक्रमण झाले. एकमेकांच्या सहवासात जास्त काळ गेल्याने एकमेकांचे गुणदोष समोरासमोर प्रकर्षाने दिसू लागले. परिणिती एकमेकांना सहन करण्याची वेळ आली. कुटुंबासाठी वेळ दया, घरासाठी वेळ द्या हे जे पुर्वी सांगाव लागायच तेच इथे प्रश्नांकित झाले. घटस्फोट ही बाब असफल वैवाहिक जीवन, विवाहाचे अपयश अशी मानली जाते. त्यामुळे वाढलेल्या घटस्फोटांची संख्या ही विवाहसंस्थेला उतरती कळा किंवा विवाहसंस्थेची गरज कमी कमी होत चालल्याचे लक्षण म्हणता येईल. आता त्याला पर्यायी व्यवस्था म्हणुन लिव्ह इन रिलेशनशिप उदयास आली आहे. त्याचे प्रमाण ही एका वर्गात लक्षणीय वाढते आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली अशा तत्वावरचे हे एक प्रकारचे ट्रायल मॅरेज आहे. तो सामंजस्याने सहजीवन जगण्याचा एक प्रकारचा करार आहे. तो लिखित वा मौखिक/ अलिखित असू शकतो. त्याला कायद्याची मान्यताही आहे. स्त्री व पुरुष दोघेही कमावते असल्याने एकमेकांच्या प्रॉपर्टीवर, आर्थिक कमाईवर हक्क न सांगता परस्परांची लैंगिक, वैचारिक, सांस्कृतिक भूक परस्पर संमतीने भागवून सहजीवन जगणे हा हेतु. या सहजीवनाच्या प्रवासात होणार व्यक्तिमत्वातील बदल जर परस्परांना घातक ठरु लागले तर सहजीवनातून बाहेर पडण्याचे प्रत्येकाचे हक्क सुरक्षित ठेवुन हा मार्ग अवलंबला जातो. अजून तरी हा प्रायोगिक अवस्थेत आहे. एकमेकांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा अवकाश जपत सहजीवन जगणे ही तशी कसरतच आहे. त्यासाठी विवेकी प्रगल्भता लागते. ती आपोआप येत नाही. तो व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. आपली शारिरिक व मानसिक प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी वेळोवेळी डॉक्टर्स, सायकियाट्रिस्ट,सायकॉलॉजिस्ट, कौन्सिलर्स अशा तज्ञांची मदत घ्यावी लागते. काही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. शरीराच्या फिटनेसाठी जशा जिम्स आहेत तशा मनाच्या फिटनेसाठी माईंड जिम्स ही आहेत.
मला वाटते 2021 मधे जेष्ठांचे लिव्ह इन हे सरिता आव्हाड यांचे लोकसत्तेतील पंधरा दिवसांनी चालणारे सदर सर्वांनीच वाचले असेल. अत्यंत अभ्यासपूर्ण अशी निरिक्षणे व उदाहरणॆ त्यात दिली आहेत.
लग्नाच्या वेळीच घटस्फोटाच्या तारखा (वर्ष) नक्की करावीत. तीन/सहा/नऊ/बारा/पंधरा वगैरे. तेव्हा लग्न जीवनाचे परीक्षण करून घटस्फोट करावा. ज्योतिषाच्या भाषेत बोलायचं तर अठ्ठावीस महिन्यांनी शनी ग्रह रास बदलतो आणि अचानक विवाहित तरुणांत बेबनाव सुरू होतो. "लग्न करून बघतो, नाही जमल्यास अमुक वर्षांनी फेरविचार करणार" हे अगोदरच सांगावे. तसेच लीव इन वगैरे भानगडींपासून मुक्तता होईल. समुपदेशन वगैरे पैसे बरबाद करणाऱ्या गोष्टी हव्यातच कशाला.
तयारी म्हणून बँक खाते, पैसे व्यवहार, इमेल किंवा सोशल मिडिया पासवर्ड देणे टाळावे. घर खरेदी वगैरे कर्जाबाबत स्वच्छ समजूती ठेवाव्यात.
शेवटी काय तर काही कागदोपत्री स्पष्टपणा ठेवणे हेच बरे. त्याची तरतूद करावी.
या गोश्टी आता फार लांब नाहीत. आताची मुले मूळात लग्नच का करायचे? असा प्रश्न विचारतात. फक्त लैगिक भुकेची सोय म्हणून करायचे का? ते तर तसेही उपलब्ध होते. सहजीवनाची आस ही आता कमी होत चालली आहे. उतार वयातील घटस्फोटांची संख्या आता वाढत चालली आहे
तुमच्या प्रतिक्रियेवरुन एक आठवले .वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान ज्योतिष विषयी चर्चेच्या हेतुने गेलो होतो. वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय वि म दांडेकरांच्या संशोधनाचा विषय होता . मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले). आजच्या काळात घटस्फोटाचा योग ही काही दुर्मिळ गोष्ट नव्हे जी कुंडलीत शोधावी. वि.म.दांडेकर आज असते तर त्यांनी हा उद्योग केला नसता.
प्रत्येक वाक्य विचारपूर्वक लिहीले आहे.
लेखामधे दोन पिढ्यांचा विचार मांडलाय. परंतू सहजीवनातून पुढे येणाऱ्या तिसऱ्या पिढीचाही विचार मागील दोन पिढ्यांनी करावयास हवा. असे मला वाटते. एक विचार असाही रूजत चाललाय, की संतान नको. अर्थात मी कशालाही चुक अथवा बरोबर म्हणत नाही.
जेष्ठांच्या सहजीवनात दिसणारी अस्वस्थता ही सेल्फ इनफ्लीकटेड आहे व जेष्ठांनीच त्यावर मार्ग काढायला हवा.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतीहास या त्यांच्या पुस्तकात सुरूवातीलाच स्पष्ट केले आहे की,
"उत्क्रमिष्णु जगतात सर्वच वस्तूंना जंगमत्य असल्यामुळे, नीती ही वस्तुदेखील उत्क्रमिष्णु आहे स्वयंभू, स्वाणु किंवा स्थिर नाही त्या त्या काळी ती ती चाल नीतिमतेची समजली जाते व वाटल्ये इतकेच तो काळ पालटला च समाजात अंतर्धर्षणाने किंवा बाह्य प्रेरणेने बदल झाले म्हणजे ती जुनी व वहिवाटेतून गेलेली किंया जात असलेली चाल तौतिबाह्य व चम्तकारिक भासून तिची गणना गर्दा वस्तूंत होते. गर्दा म्हणजे समाजाला अमान्य एवढाच अर्थ मुळात असती हे विसरता कामा नये".
तद्वतच, सद्यपरिस्थितीत असलेली विवाहसंस्था मोडकळीस अथवा अमुलाग्र बदलली तर त्यात नवल ते काय?
लग्न न करता स्त्री पुरूष एकत्र राहायचे म्हटले तर स्वतःच्या घरात राहू शकतात. पण अशा युगुलांना भाड्याचे घर जसे परदेशांत मिळू शकते तसेच भारतात नाही मिळणार.
लग्नसंस्था मोडकळीस आली असे म्हटले तरी एक वेगळे पर्याय निर्माण होण्यात अडचणी येतील त्यातली ही एक वरील बाजू.
लेखाच्या विषयाकडे वळून - आणि वरच्या घाटपांडे सरांच्या प्रतिसादावर काही जोडपी केवळ कागदोपत्री आणि रूढ अर्थाने नवरा बायको उरली आहेत हे मान्य. विभक्त होण्याने अडचणी सुटत नाहीत आणि तेवढा उत्साहही राहिलेला नसतो. समाज काही उत्तर सादर करत नाही आणि त्यांचे तेही उकल काढू शकत नाहीत. आदिवासी जमातींत पंच बसतात आणि निर्णय करतात. जे काही करतात ते झटपट तरी होते. पण तसं काही इतरांचे होत नाही. वाढते वय ही एक मोठी अडचण.
बदलत्या काळात हा ही बदल स्वीकारला जाईल याची खात्री वाटते ... अश्या युगुलांना भाड्याने घर देणे मुंबईत अल्पप्रमाणात सुरु झाले (अर्थात उच्चभ्रू वर्गात) असे ऐकण्यात येते हे लोण खालच्या स्तरात पसरून समाजमान्य होईल पण यांस किती दशके लागतील हे आताच सांगता येणार नाही !
चोचले. बाकी काही नाही.
कानाला धरुन वधु-वराला बोहल्यावर उभे करावेत.
लिव्ह-इन्,घटस्फोट हे अमेरिकन चाळे भारतातही येणार हे इंटरनेट उदयास आले त्यावेळेसच कल्पना आली होती.जुळवून घ्यायची तयारी नसणे,व्यक्ती-स्वातंत्र्याबाबतचे मोठे गैरसमज्,त्याला खतपाणी घालणारी मीडिया,चित्रपट्,लायकीपेक्षा अधिक पैसा हातात असणे..ह्यामुळे ही वेळ आली आहे.
वकील्,मानसोपचार तज्ञांना मात्र बरे दिवस आले आहेत हे मान्य करावे लागेल.
वा वा! क्या बात है। माई साहेब हे
मनोनाट्य वाचलत का? नसेल वाचलत तर वाचा!
वकील्,मानसोपचार तज्ञांना मात्र बरे दिवस आले आहेत हे मान्य करावे लागेल.+१
लिव्ह इन हि गाजराची पुंगी फार दिवस वाजतच नाही. आणि सडून गेल्यावर ती मोडून खाणे शक्यही होत नाही.
कोणत्याही नात्यात स्त्रियांची भावनिक गुंतवणूक कितीतरी जास्त असते यामुळे हे नाते ज्यावेळेस तुटते तेंव्हा जास्त नुकसान त्या स्त्रीचे होते. अर्थात ज्या स्त्रिया या नात्यातून "फायदा" कसा होईल या एकमेव विचाराने आलेल्या असतात त्यांची गोष्ट वेगळी. हा फायदा एका पुरुषाकडून रक्षण, लैंगिक सुख आणि आर्थिक लाभ असे तिहेरी असू शकते.
बहुसंख्य पुरुष फारशी भावनिक गुंतवणूक नसल्यामुळे "रात गयी बात गयी" म्हणून पुढे वाटचाल करताना आढळतात तितके सहज स्त्रीचे होत नाही.
समुपदेशकांशी मोडकळीस आलेल्या लिव्ह इन नात्याबद्दल चौकशी केल्या हि बाब सहज लक्षात येईल.
बहुतांश स्रिया केवळ आणि केवळ एवढाच विचार करतात. लिव्ह इन काय हल्ली लग्न हिच स्त्रियांसाठी गाजराची पुंगी आहे. पटकन श्रीमंत होण्याचा राजमार्ग.
प्रकाश घाटपांडे,
लेख पटला. फक्त तुमच्या या विधानाशी पार असहमत आहे :
लिव्हिन रीलेशनशिप ही पर्यायी व्यवस्था नाही व होऊही शकंत नाही. ज्या अर्थाने विवाह ही संज्ञा भारतीय संदर्भाने आकळली जाते त्या अर्थाने पाहू जाता विवाहास पर्याय नाही. लिव्हिन हे ग्राहक व वेश्येने एकमेकांशी एकनिष्ठ राहणे आहे. इथे वेश्या म्हणजे हलक्या दर्जाची स्वैरिणी वा सर्वगमनी स्त्री असे समजता कामा नये. ती एक व्यवसाय करणारी प्रतिष्ठित व्यावसायिका धरण्यात यावी. किंबहुना लिव्हिन मुळे वेश्या या संज्ञेस नेहमीपेक्षा वेगळा अर्थ प्राप्त होऊ शकतो.
-नाठाळ नठ्या
लिव्ह ईन रिलेशनशीप म्हणजे पुरातन काळातील बार्टर सिस्टीमची सुधारीत आवृत्ती म्हणता येईल का?
विवाह संस्कार न रहाता एक इव्हेंट झालायं का?
विवाह एक contract,conditions, aggriment म्हणून breach of contract असे असेल तर कायद्यानुसार घेतलेला घटस्फोट सामाज सहजा सहजी स्विकारत का नाही?
अर्थशास्त्रा मधील लाॅ ऑफ सॅटीऐटी चा काही प्रमाणात
सहभाग आहे का?
विवाहामधे ब्रेक इव्हन पाॅईंट असू शकतो का?
माझे मराठी चांगले नाही म्हणून मधे मधे आंग्ल भाषेतील शब्द वापरले आहेत.
माझ्यामते विवाहसंस्था मधे ही जी आंदोलने चालली आहेत ती समाज बदलाची नांदी आहे. आताशी सुरवात आहे. त्यामुळेच कोण बरोबर कोण चुक हे ठरवणे अवघड वाटते. पण विवाह किवां लिव्ह ईन ची परिणीती जर संतान्नोप्ती मधे झाली तर मात्र पुढील पिढीचा विचार व्हायला हवा.
होईल... यावर सुद्धा ती जोडपी आणि समाज उत्तर शोधेल. फक्त फॉरमॅट वेगळा असेल, संततीची आस ही स्त्री आणि पुरूष अस्सणे ही नैसर्गिक उर्मी आहे.
ठराविक अपवाद सोडले तर चित्र आशादायक असेल !
विवाहांतर्गात सहजीवनाला पर्यायी सहजीवन या अर्थाने लिव्ह इन रिलेशनशीप हा मुद्दा.
तुमचा दुसरा मुद्दा लैंगिक भुकेची गरज या संदर्भातील आहे. पुढे तो मुद्दा लैंगिक वैविध्याची गरज वा उर्मी या विषयाकडे ही जातो. तो ही महत्वाचा आहे. कारण विवाहाकडे सुद्धा केवळ लैंगिक भुकेची सोय या अर्थाने पहाता कामा नये.
मी काही तरुण मुलांशी 'लिव्ह इन रिलेशनशिप' बद्दल बोललो. बहुतेक मुलांना व काही अंशी मुलींना ते मान्य आहे असे दिसते. मात्र भारतीय पुरुष हा थोडासा वेगळा विचार करतो असे मला आढळले.
मी मुलांना एक प्रश्न विचारला - एखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल व पुढे काही कारणांनी त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले, तर अश्या मुलींशी तुम्ही विवाह कराल का ? शंभर टक्के मुलांनी स्पष्ट "नाही" म्हणून उत्तर दिले. मुलींचे अशावेळी काय मत असेल हे अजून तपासले नाही.
लिव्ह इन हे जर अमेरिकेतील किंवा पाश्चात्य देशातील खूळ आहे असे मानले तर निदान अमेरिकेत तरी त्याकडे वेगळ्याच नजरेने पहिले जाते. अर्थात हे मी आपल्या भारतीय वंशाच्या मुलांविषयी बोलत नाही, तर अमेरिकन मुलांविषयी बोलतोय.
येथे एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली तर ती आधी किती मुलांबरोबर राहिली वगैरेच्या फंदात न पडता त्यांची मैत्री सुरु होते, ते एकत्र राहतात, वाटलं तर पुन्हा वेगळे होतात. समजा जर अशा संबंधातून त्यांना मुले झाली, तर कायद्याने त्या पुरुषाला ते मूल सज्ञान होईपर्यंत, मुलाच्या संवर्धनासाठी, त्या मुलाच्या आईला प्रत्येक पे चेकला बऱ्यापैकी पैसे द्यावे लागतात.
आपली भारतीय वंशाची मुले इतका मुक्त विचार नाही करू शकत असे माझे निरीक्षण आहे.
मध्यंतरी मटा गोल्ड वर प्रत्यक्ष लिव्ह इन राहणार्या तरुण तरुणींच्या मुलाखती आल्या होत्या. तिथे सामंजस्य फार लागते. कुणा एकाला ते लिव्ह इन जाचक वाटू लागले तरी बाहेर पडण्याचा मार्ग सहज उपलब्ध असल्याने दुसरयावर दबाव असतो
वय गेले की लिवइनजत्रा संपते. तंबू गुंडाळतात.
लग्न झालेल्या जोडप्यांचं बिथरले की काय टोकाचं वर्तन होतं मुलांच्या बाबतीत हे माहीत आहे. आताचं नवीन उदाहरण म्हणजे बंगलोरच्या महिलेने घटस्फोट आणि मुलाचा ताबा यावरून बिनसलं आणि त्या मुलाचा खून केला गोव्यात.