जनातलं, मनातलं

साहित्य, ललिता आणि पुरचुंडीभर राख !

Primary tabs

साहित्य असाच एका रविवारी फेसबुकवर चाळवाचाळव करत असताना त्याला त्या ३.५ बीएचके फ्लॅटची जाहिरात दिसली. एका बंगल्याच्या पुनर्विकासानंतर सहकारनगर सारख्या सभ्य आणि सुसंस्कृत भागात असलेला फ्लॅट "निदान बघून तरी येऊ" असे म्हणून तो, ललिता आणि लेखना तो फ्लॅट बघायला गेले.
चकाचक इमारत,
२ कार पार्किंग्स.. आणि तेही अगदी लांब लचक कार सहज आत बाहेर येऊ जाऊ शकेल अशा..
प्रशस्त हॉल ... सॉरी सॉरी - लिविंग रूम... मोठाल्या बेडरूमस ....
वॉशिंग मशीन आणि डिश वॉशर सहज बसेल आणि तरीही जागा उरेल असे स्वयंपाकघर ... सॉरी सॉरी - मॉड्युलर किचन ...
प्रत्येक बेडरूमला मध्यम बाल्कनी ..
लिविंग ला मोठ्ठी गॅलरी ... उन्हाळ्यात पापड कुरडया वाळवत घालायला मस्त ... सॉरी सॉरी ... संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर काचेच्या गोल टेबलाभोवती चेयर्स टाकून बियर चे घोट मारत बसायला मस्त !
समोरच तळजाईचा पावसाळ्यात हिरवी चादर नेसलेला डोंगर ...
त्यातली एक बेडरूम लेखनाने मनात ठरवून टाकली ... आणि साहित्य ला म्हणाली "बाबा ही बेडरूम माझी ... बाकी तुम्ही तुमच्या निवडा ". साहित्य ललिता आणि तो बिल्डरचा माणूस हसू लागले.
तिघांच्या स्वप्नातला फ्लॅट ...
जागा दाखवणाऱ्या बिल्डरच्या माणसाला साहित्य आणि ललिता "किंमत किती" ते सारखे विचारात होते ... पण तो पठ्ठा काही किंमत सांगायला तयार नव्हता ... "साहेब आधी तुम्ही फ्लॅट बघुन घ्या हो पैशाचे काय नंतर खाली ऑफिसात बोलू".
तो स्वप्नातील फ्लॅट पाहून ते तिघे बिल्डरच्या ऑफिसात आले. मस्त कॉफी त्या माणसाने आणून दिली. [फ्लॅट बुक करेंपर्यंत अशीच कॉफी त्यांना मिळत राहते आणि एकदा फ्लॅटची अमाऊंट भरली की .... .... असो ]. त्या बिल्डरच्या माणसाने कॉफी झाल्यावर मग विषयाला हात घातला. आणि किंमत सांगितली. सहकारनगर सारख्या भागात असा फ्लॅट कितीला असेल याची दोघांना कल्पना होतीच. त्यामुळे फारसा धक्का त्यांना बसला नाही. आणि ते तर फक्त गंमत म्हणून फ्लॅट बघायला आलेले होते, घेणार थोडीच होते ?
बोलणी पूर्ण झाल्यावर ते तिघे घरी निघाले. घराकडे परतताना त्यांच्या हातात त्या स्कीमचे रंगेबिरंगी ब्रॉचर होते आणि मनात तो फ्लॅट. साहित्य आणि ललिता आता बऱ्यापैकी व्यवसायात स्टेबल होते. गेल्या १५ वर्षात केलेल्या गुंतवणुकीचा परतावा आता इन्ड मनी app मध्ये दिसत होता. लेखना चे मोठे खर्च अजून ३-४ वर्षे पुढे होते.
घरी आल्यावर साहित्यने विषय काढला. app मधून पोर्ट फोलिओ रिपोर्ट डाउनलोड केला. फार नाही तरी दीड एक कोट रुपये कमी पडत होते. दोघांच्या आई बाबांकडून २० -३० लाख रुपये मिळाले असते, दागिने विकून २५एक लाख आले असते आणि बाकीचे कर्ज काढता आले असते.
साहित्य सगळी गणिते ललिताला समजावून सांगत होता, ती ऐकत होती. तो फ्लॅट घेणे तसं जमण्यासारखे होते. मात्र आजवर जमवलेली सगळी पुंजी एकदम अशी खर्चायची का नाही हे काही ठरत नव्हते.
साहित्यने त्याच्या फायनांशियल प्लॅनर गोडबोलेला लगेच फोन केला, आणि असा फ्लॅट घ्यायचा विचार सुरु आहे असे सांगीतले. गोडबोलेने सगळा डेटा मागवून घेतला आणि उद्या कळवतो असे सांगितले.
त्या रात्री ..
साहित्य त्या फ्लॅट मध्ये छोटा बार कुठे बसेल याचा विचार करत होता.... आपल्या मित्रांना जेव्हा आपण हा फ्लॅट दाखवू तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आलेले भाव कसे असतील याचा तो विचार करत होता ... विशेषतः त्याच्यावर जेलस असणाऱ्या मित्रांना तो खास बोलावणारच होता त्या फ्लॅट वर [विशेषतः त्या कौस्तुभ पोंक्षे ला].
ललिता तिचे किचन मॉड्युलर किचन कसे असेल याची स्वप्ने रंगवत होती. तिची दिवाळीतील भिशी पार्टी सॉरी सॉरी ... किटी पार्टी कशी करायची याची स्वप्ने रंगवत होती. तिने तिच्या एका इंटेरियर करणाऱ्या मैत्रिणीला साडेतीन bhk साथीचे इंटेरियर ला किती खर्च येईल हेही विचारून घेतले होते.
लेखना मनातल्या मनात तिची बेडरूम सजवत होती. .. या भिंतीवर त्या BTS कोरियन बँड च्या अमक्याचा फोटो ,... त्या भिंतीवर तमक्याचा फोटो ...
दुसऱ्या दिवशी त्या गोडबोलेंचा फोन आला. त्याने साहित्यला पुढचे लेखनाचे खर्च, त्या फ्लॅटचा होणारा देखभाल खर्च, प्रॉपर्टी टॅक्स ही सगळी गणिते सांगितली. सर्वस्व विकून तुम्हाला फ्लॅट घेता येईल, नाही असे नाही, पण तुम्ही हे करू नये असे स्पष्ट सांगोतले. [ही पोंक्षे , गोडबोले मंडळी दुसऱ्याच्या मनाला काय वाटेल याचा विचार न करता इतकी रोकठोक कशी बोलू शकतात याचे त्याला नेहमी आश्चर्य वाटे.. ] . गोडबोले यांचे मत ऐकून साहित्य खट्टू झाला.
संध्याकाळी त्याने ललिताला आणि लेखनाला गोडबोले यांचे मत सांगीतले. साहजिकच दोघेही खट्टू झाले. साहित्य मात्र तो फ्लॅट आता घ्यायचाच या इरेस पडला होता. ललिता काहीच बोलत नव्हती. तिने आपण यावर उद्या बोलू असे सांगून तो विषय थांबवला. रात्री चुपचाप तिने तिच्या बाबांशी आणि साहित्यच्या बाबांशी फोन करून त्यांचे मत विचारले. दोघानींनी इतकी मोठी उडी नको असेच मत व्यक्त केले. पण तुमच्या दोघांचा हट्टच असेल तर आम्ही शक्यतेवढी मदत करूच असेही कळवले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच साहित्यने परत फ्लॅटचा विषय काढला. ललिताने आपण तो फ्लॅट घ्यायला नको असे मत सांगितले. मग त्यावर त्यांच्यात थोडी कडकड झाली. निर्णय काही झाला नाही. दोघंही तणतणत आपल्या कामाला निघून गेले.
दुपारी साहित्यला त्या बिल्डरच्या माणसाचा फोन आला की साहेब काय ठरलं तुमचे ? साहित्यने त्याला "आठ दिवसात कळवतो" म्हणून सांगितले. दरम्यान त्याने त्याच्या होम लोन देणाऱ्या मित्राला फोन करून काय डॉक्युमेंट्स लागतील ती विचारली आणि त्याच्या सॉफ्ट कॉपीज पाठवून पण दिल्या.
दरम्यान या फ्लॅट वरून दोघांत धुसपूस सुरूच होती. ललिता ठाम पणे हे करायला नको असे सांगत होती. लेखना आपण त्या फ्लॅट मध्ये कधी राहायला जायचे विचारू लागली.
शुक्रवार उजाडला. दुपारी ललिताचा फोन वाजला. वेदश्रीचा फोन होता. ललिता आणि वेदश्री खूप जुन्या मैत्रिणी. वेदश्री सध्या दुबईत जाऊन येऊन करत असे. म्हणजे बराच वेळ दुबई आणि कधीतरी एखाद आठवड्यासाठी पुण्यात.
"हाय डिअर" वगैरे नंतर वेदश्रीने फोन करण्याचे कारण सांगोतले. तिच्या एक दूरच्या काकू सिंहगड रस्त्यावर असलेल्या एका वृद्धाश्रमात होत्या. म्हणजे त्यांना तिथे बरेच महिने ठेवले होते. त्यांचे बहुदा जवळचे कोणीही नसावे. वेदश्रीच त्यांचे वृद्धाश्रमाचे पैसे पाठवणं, त्यांची औषधे पोहोचवणे , त्यांना काही खाऊ देणे असे करत होती, का ते माहित नाही.
या काकूंची औषधे संपली होती. आणि एकंदर तब्येत पण खालावली होती. तर वेदश्रीने ललिताला त्यांना प्लिज औषधे नेऊन देशील का असे विचारण्यासाठी फोन केला होता.
ललिताने विचार केला, उद्या शनिवारच आहे. तेव्हा ती आणि साहित्य त्या आश्रमात जाऊन त्यांना औषधे देऊ शकतात आणि तसेच पुढे खडकवासल्यापर्यंत जाऊन थोडे फ्रेश होऊन घरी येऊ शकतात. आणि सोमवार पासून सुरु असलेली धुसफूस पण तिला आता नको होती. साहित्याशी मोकळेपणाने बोलून रुसवा घालवू, असा विचार करून तिने वेदश्री ला होकार दिला. वेदश्रीने तिला त्या काकूंच्या औषधाची यादी पाठवली. आणि ललिता नको नको म्हणत असताना पेमेंट पण ऍडव्हान्स पाठवले. त्या काकूंना केळी आवडत असत, म्हणून जाताना जरा पिकलेली केळी डझनभर प्लिज ने असेही सांगितले.
संध्याकाळी ललिताने वेदश्री चा आलेला फोन आणि सांगितलेलं काम साहित्यच्या कानावर टाकले.
ही वेदश्री जरा साहित्यला आवडायचीच ... थोडं क्रश का काही असते ना ते .. तिचे काम म्हंटल्यावर तो लगेच तयार झाला. खडकवासल्याच्या चौपाटीवर पावसात कणीस खाताना ललिताला त्या फ्लॅट साठी आपण सहज कन्व्हिन्स करू शकू अशी एक संधीही त्याला दिसली. आणि वेळ पडली तर वेदश्री कडून ललिताला तो फ्लॅट घ्याबाबत पटवून देऊ अशी एक आयडिया सुचली.
त्याचा त्वरित आलेला होकार पाहून ललिता खुद्कन हसली. तो लगेच तयार होणार हे ललिताला माहित होते... कितीही असलं तरी ते वेदश्रीचे काम होते ... साहित्य नाही म्हणूच शकत नव्हता..
दुसऱ्या दिवशी दोघे कार ने न जाता ऍक्टिवावर निघाले. पाऊस आला तर भिजायला झालं तरी काय झाले ... दोघंही भिजलेले तेही एकाच स्कुटरवर... (हा अनुभव त्यांनी बरेच वर्षात घेतलाच नव्हता.)
वाटेत दांडेकर पुलापाशी त्यांनी डझन भर पिकलेली केळी घेतली. वेदश्रीने कोणत्या मेडिकल मधून औषधें घ्यायची हे सांगितले होतेच. ते मेडिकल त्या काकू जिथे होत्या त्या वृद्धाश्रमाच्या जवळच होते. बीटाडीन मोठी बाटली, १०० एक गाउस , भरपूर हॅन्डग्लोव्स, कॅन्डीड पावडर, डायपर अशी मोठी लिस्ट होती. एकंदरीत त्या औषधांवरून त्या काकूंना बेडसोर्स झाले असणार हे ललिताला मनात कळले. ते औषधांचे मोठे पार्सल ऍक्टिव्हाच्या पायाशी ठेवून ते आश्रमापाशी आले.
प्रत्येक वृद्धाश्रमाचा एक तीव्र वास असतो ... तिथल्या रुग्ण लोकांचे पॉटी , युरीन, डेटॉल, बेडसोर्स मध्ये झालेला पस, फिनेल, सॅनिटायझर्स या सगळ्यांचा मिळून एक सामुदायिक वास ... त्या वृद्धाश्रमाच्या इमारतीत शिरल्या शिरल्या तो वास दोघांच्या नाकात गेला ... लवकरात लवकर त्या काकूंना औषधे आणि केळी देऊन कधी इथून बाहेर पडतोय असे त्यांना झाले.
इथे काम करणारे दादा, मावशी, कर्मचारी याना या वासात रोज , काम करावे लागत असणार, इथे जे वृद्ध राहतात त्यांना २४ तास हा वास सहन करावा लागत असणार... दोघ्यांच्या मनात हेच विचार सुरु होते.
ते ऑफिस मध्ये बसून कोणी येईल म्हणून थांबले होते. त्या ऑफिसमध्येच बाजूला एक दादा एका आजींचे मशीनने केस कापत होता. बघता बघता त्या आजींचा लहान शेपटा होता तो अगदी बारीक केसात रूपांतरित झाला. मशीन बंद झाल्यावर तो केस कापणारा दादा आजींना म्हणाला "आजी चला वर, आणि नाही होणार उवा डोक्यात". आजींच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते, त्या निमूट पणे उठल्या आणि त्या दादाला धरून जिना चढून वर गेल्या.
बाजूला पडलेल्या त्यांच्या कापलेल्या शेपट्याकडे ललिताची नजर गेली. नकळत तिचा हात तिच्या केसांवरून फिरला. (मागल्या आठवड्यातच तिने ३००० रु खर्चून केसांचे स्ट्रेटननिंग केले होते.)
काही मिनिटात एक मामा [त्या व्यक्तीचे तिथले टोपण नाव] आले. ललिताने त्यांना आम्ही अमुक काकूंसाठी आलोय असे सांगतिले. त्यांची औषधे त्या मामांकडे दिली. मामानी त्या आजींना सिव्हियर बेड सोर्स झालेत असे सांगितले. "आम्ही रोज तीनदा ड्रेसिंग करतो. आजी उठत नाहीत म्हणून बेडसोर्स वाढतच आहेत. चला तुम्हाला दाखवतो. वेदश्री मॅडमला कालच कल्पना दिलीये" असे मामा म्हणाले. "आजीना अर्ध्यातासापूर्वीच दूध पोळी कुस्करून खाऊ घातलीय."
औपचारिकता म्हणून त्या काकूंना भेटणे भाग होते. सोबत आणलेली केळी घेऊन मामांच्या मागे ते दोघे गेले. दुसऱ्या मजल्यावर एका खोलीत ते तिघे शिरले. तो वास अधिक तीव्र झालेला होता. ललिताने "मला ते बेड सोर्स बघायचे नाहीयेत , मला ते सहन होणार नाही" सांगितले. मग मामानी त्या काकूंना जागे केले आणि ते दुसऱ्या कामाला निघून गेले.
त्या काकू म्हणजे आजीच होत्या. ७५ ते ८० वय असेल. त्यांना उठता येत नव्हते. कण्हत त्या म्हणाल्या "वेदश्री का ?"
ललिता उत्तरली " नाही आजी मी तिची मैत्रीण, ललिता". वेदश्री दुबईत आहे, म्हणून मी आले औषधें घेऊन."
काकूंनी विचारले " केळी आणलीत का ? मी वेदश्रीला सांगितले होते"
ललिताने सोबत आणलेले एक केळे थोडे सोलून एक घास काकूंच्या तोंडात दिला. तो तोडून काकू चावू लागल्या.
दरम्यान साहित्य आणि ललिता त्या खोलीतील इतर आजींकडे पाहू लागले. साधारण २०० स्के फूट चा हॉल होता आणि त्यात या आजींबरोबर ३-४ पेशंट होते.
एक आजी पोथी वाचत होत्या ..
एक जप करत होत्या ..
त्यापलीकडे दोन आज्या भांडत होत्या. एकीला उकडत होते म्हणून फॅन हवा होता, तर दुसरीला थंडी वाजत होती म्हणून फॅन नको होता. एक आजी उठून फॅन लावी , की लगेच दुसरी उठून तो बंद करी. तीन चार वेळा हा प्रकार झाल्यावर फॅन नको असलेल्या आजी मोठ्याने रडायला लागल्या ... "काय करू ? ही सटवी ऐकतच नाही ... मला थंडी वाजतेय ... डोक्याला फॅन नाही सहन होत.. डोक्यावरून पांघरून घेतले की श्वास कोंडतो... आहो मामा , ओ मामा हिला जरा सांगा ना ... " असं म्हणून त्या रडत होत्या ...
प्रत्येकाला एक खाट, त्या शेजारी एक स्टूल, त्यावर त्या पेशंटची औषधे ... इतकच त्या प्रत्येकाचे जग ... लगेचच साहित्य च्या डोळयासमोर तो सहकारनगरचा फ्लॅट तरळला ..
मनात विचार आले "आपण एक bhk , दोन bhk असं करत आज ४ bhk पर्यंत आलो ... पण या प्रवासात आपण कधीच सुखी का नव्हतो ? ज्याचा एक bhk आहे त्याला दोन हवाय ... ज्याचा दोन आहे त्याला तीन हवाय आणि ज्याच्या तीन आहे त्याला बंगला हवाय .... कोणीच सुखी नाही ..."
आणि या सगळ्या प्रवासाचा शेवट काय ? एक खाट , शेजारचे स्टूल आणि त्यावरील औषधें ??"
ललिताला जाणीव झाली ... आपण त्या काकूंना केळे भरवत होतो ... दुसरा घास द्यायाला तिने त्यांच्या कडे पहिले ...
पहिला घास काकूंच्या तोंडांतून बाहेर पडला होता... डोळे पांढरे झाले होते ... हात ताठ झाले होते.. ललिताच्या तोंडातून अस्फुट किंकाळी आली ...
साहित्यने मामाना आणले. इतक्या वर्षांच्या अनुभवावरून मामा काय ते समजले. "सुटल्या बिचाऱ्या " दोघांकडे बघून ते म्हणाले.
त्यांनी त्या आश्रमाच्या डॉक्टरना बोलावून घेतले ...
साहित्यने ललिताला खाली ऑफिसात आणले. ती सावरली होती. तिने वेदश्रीला फोन व्हॅट्सप करून दुःखद बातमी दिली. वेदश्रीने गुगल मीट वरून ललिताला फोन केला. वेदश्रीला हे अपेक्षित असावे .. तिला फार धक्का बसलेला दिसला नाही ... (कदाचित तिलाही आपण सुटलो असेच वाटले असेल का?)
आता खरा प्रॉब्लेम होता पुढचे कोण करणार त्याचा? काकूंचे दुसरे कोणीच नव्हते. वेदश्री म्हणाली मला यायला उद्या सकाळ तरी होईल .. तोवर काकूंना जवळच्या mortuary मध्ये ठेवायची व्यव्यस्था करशील का प्लिज ?
ललिता समोर काही पर्याय नव्हता .. ती हो म्हणाली .
डॉक्टर आले आणि त्यांनी डेथ सर्टिफिकेट लिहून दिले. पण mortuary ठेवू नका, लवकर आटपा म्हणाले. मग पुन्हा वेदश्री बरोबर फोनाफोनी झाली, आणि पुढचे सगळे साहित्य आणि ललिता यांनाच करावे लागणार होते हे ठरले. ऍम्ब्युलन्स आली. खालच्या चादरीसहित [मृत] काकूंना ऍम्ब्युलन्स मध्ये ठेवले. ललिता ऍम्ब्युलन्स मधून थेट वैकुंठ स्मशानात जाणार होती. साहित्य पाठोपाठ ऍक्टिवावर.

रुम मधून बाहेर पडण्याआधी साहित्यने त्या खाटेकडे एकदा पहिले .. आता ती रिकामी होती ..

काही वेळाने मामा तेथे येतील .. वरची गादी सॅनिटाईझ करतील ... कदाचित जाळूनही टाकतील... स्टूलावरची काकुंची औषधे आता डस्टबिन मध्ये जातील .. स्टूल पण रिकामे होईल ...

पुन्हा अशाच कोणत्यातरी आजी किंवा काकूंना शेवटची साथ देण्यासाठी ...
साहित्यच्या मनात ऍक्टिव्हा वरून वैकुंठाकडे जाताना विचार सुरु होते ....
"तुम्ही कितीही कमवा , कितीही मोठा फ्लॅट , बंगला घ्या .. शेवट हाच ... एक खाट आणि शेजारचे स्टूल... ... आणि त्यानंतर देह जळाल्यावर उरणारी पुरचुंडी भर राख "
कौस्तुभ पोंक्षे
८००७६०५०८२

शेखरमोघे

"शेवट हाच" हे कटु सत्य प्रभावी पद्धतीने मान्डले आहे. पटले आणि आवडले.

गवि

फार उत्तम लिहीत आहात.

कंजूस

शारिरीक/आर्थिक स्वतंत्र असले म्हणजे सगळे झाले असं नसतं.

याच तत्वावर सर्व आयुष्य घालवले. विसाव्याच्या क्षणी मागे वळून पहाताना आश्चर्य वाटते की कसे आयुष्य गेले.

"छडा लंX गिरधारी ना लोटा ना थाली".

का कुणास ठाऊक, एक विश्वास होता. परमेश्वराने द्रौपदीची थाळी घेऊन जन्माला घातले आहे. सर्वच सांगत बसत नाही.

सन दोनहजार सात मधे पुण्यात बदलून आलो. ललिता म्हणाली रिटायर व्हायची वेळ आली,काहीतरी हातपाय हलवा. वाटले एक घर घेऊन टाकावे. या गोष्टीचा कधीच विचार न केल्याने, सतत नातेवाईक म्हणत असताना सुद्धा दुर्लक्ष केले. आता रिटायर व्हायची वेळ आली.

"काळ देहासी आला खाऊ", म्हणत नामदेव महाराज नाचले. रिटायरमेंट जवळ आली व घर नाही म्हणता मात्र आमचे पाय फुलले.
सरकारी नोकरास रिटायरमेंट मृत्यूसमानच ना....

एक संध्याकाळ, सहकारनगर मधे बरीच नवी बांधकाम चालू होती. एरीयात चांगला वगैरे वगैरे... बिल्डरच्या ऑफिसात एक जोडपे बसले होते. मिठाई, फुललेले चेहरे,बिल्डर चावी देत म्हणाला चला वास्तूशांतीची तयारी करा. आम्हांला आमचे भविष्य दिसले. नंतर बिल्डर आमच्या कडे वळाले ,काॅफी, गुणगान वगैरे झाले . किंमत ऐकून पायाखालची नसलेली वाळू सरकली. परत येतो कागदपत्र घेऊन.....

पण ,सर्व काही पूर्वनियोजित असल्याप्रमाणे , कर्ज न काढता आहे त्या पैशातून वन बि ऐच के घेतला. भाड्याने दिला. पुढे तोच मुलीच्या उच्च शिक्षणाच्या कामी आला. पुढे दोन ही झाला आता तीनही झाला.

सांगायचा उद्देश प्रवाहाबरोबर चालायचे. दुसर्‍यांच्याकडे पहायचे नाही. जेव्हां होणार तेव्हाच पहाट होईल. "मामेकं शरणं व्रज", का काय म्हणतात त्या प्रमाणे.....बाकी चिंता नको.

नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी |
अंती जाशील एकाला प्राण्या, माझे माझे म्हणोनी ॥

एकनाथ महाराजांचे भारूड....
पोटा पुरता पसा असला की बाकी,
इदंम न मम म्हणायचे की चित्त शांत रहाते.

युयुत्सु

तुम्ही चांगले विषय हाताळता. पण लिखाणात परिच्छेदांचा मुबलक वापर करावा, ही नम्र विनंती. ब्रिदींग स्पेस मिळाल्याने वाचनीयता वाढेल.

अमर विश्वास

एकेकाळी हे असे बोधप्रद साहित्य आवडत असे ..

कधीतरी मरायचे म्हणून आज जगायचे थांबवावे काय ?

साहिरचे शब्द आठवतात

मरना तो सबको है जी के भी देख ले
चाहत का एक जाम पी के भी देख ले

गवि

कधीतरी मरायचे म्हणून आज जगायचे थांबवावे काय ?

मुद्दा अगदी रास्त आणि रोचक आहे. म्हणूनच चार शब्द लिहायचा मोह होतोय.

त्या मोठ्या आलिशान मध्यवर्ती फ्लॅटसाठी जी शर्यत पळावी लागेल त्यालाच कदाचित "जगायचे थांबणे" असे म्हणता येईल. त्या घरात जे जे काही करण्याची स्वप्ने (भविष्यातील जगणे) ते कुटुंब बघत आहे, ते जगण्याची फुरसत आणि मुख्य म्हणजे "सुकून" त्यांच्याकडे उरेल का? हा प्रश्नच आहे.

अर्थात हे सर्व सापेक्ष आहे. अमर्याद धावणे यातच एखाद्याला जगणे सापडत असू शकेल .

आपापला चॉईस. लेखकाने एक बाजू चांगल्या फॉरमॅटमधे मांडली आहे. आपल्या स्वतःसाठी जगणे म्हणजे नेमके काय हे क्षणभर थांबून, दीर्घ श्वास घेऊन स्वतःशी ठरवावेसे वाटेल इतपत ध्येय लेखकाने साध्य केले आहे असे वैयक्तिक मत.

प्रत्येक क्षणाचा उत्सव करा.

अशा गोष्टीना बोधप्रद का म्हणतात माहीत नाही पण जगण्याची खरी प्रेरणा यातूनच मिळते.

कसे जगायचे हे ज्याने त्याने ठरवायचंय. बरेच लोक पाडगावकरांची कवीतेचा संदर्भ देतात. आत्मपरीक्षण करा कसे जगायचे कळते.

कंजूस

१. धाडस करून पाहायचे.
२. परिस्थिती पुढची पायरी दाखवेल तर पाय पुढे टाकायचा.
३. सर्वांच्याच दारावर नशीब ठोठावत नाही.
४. काहीच झाले नाही तर आम्ही तुकाराम.

माझ्याही मनात असेच काहीसे विचार घोळत आहेत. जवळचाच एक २बी एच के विकायला निघालाय. ५०% कर्ज आणि बाकी पैसे स्वतःचे असा विचार चालु आहे. पण....
१. सेकंड होम साठी निवृत्तीचे प्लॅनिंग आणि थोडेफार मुलांच्या शिक्षणाचे पैसे खर्चावेत का?
२.ऐनवेळी मोठा खर्च आल्यास रोख तरलता कशी येणार?
३.खाजगी नोकरीची अशाश्वता, मध्येच मनात घोळणारे लवकर निवृतीचे विचार
४. भोवतालची अस्थिर परीस्थिती व वाढत जाणारी महागाई

यामुळे पाय पुढेमागे होताहेत. तेव्हा पोंक्षेसाहेब आणि मिपाकरांचा सल्ला काय असेल?

kvponkshe

तुम्ही मल ८००७६०५०८२ ला फोन करा. चर्चा करु. तुमचा आनन्द हिच माझी फी.

३० पर्यंत - १ BHK / ४० पर्यंत - २ BHK /५० - ५५ पर्यंत - ३-४ BHK आणि ६० नंतर - १ RK ( शौचकूप नि उदवाहिकेची सोयीसकट )

असे चक्र पांढरपेशा वर्गात पाहिले आहे.

१. सेकंड होम - लोन काढून घेऊ नये . ती गुंतवणूक नाही हौस आहे ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने मिरवायला चांगले मोडीत काढायला कोणी धजावत नाही. आता सोने उच्चवर होते कोणी घरचे सोने मोडीत काढून मार्केट मध्ये गुंतवले असल्यास त्याला माझा सलाम
२. टर्म प्लॅन / health इन्शुरन्स - टर्म प्लॅन चे कव्हर वाढवावे पगाराच्या हिशेबाने / असिसिडेंटल/ डिसॅबिलिटी अँड क्रिटिकल इलनेस रायडर घ्यावे . जितके लवकर घ्याल तितके चांगले. Annuity बिलकुल नको
३. आजकाल नोकरीतील तणावामुळे असे विचार साहजिक आहे अशावेळेस घर कर्ज असल्यास लवकर फेडावे उद्या वेळ आली तरी कर्जाचा भार नसेल. माझ्याच केसमध्ये मी EMI वाढवून कर्जकाळ कमी केला कारण सध्या व्याजदर सोयीचे आहेत, कमी व्याजात जादा पैसे फेडा
४. आता चा काळ बघता सरकारच जुनी कर व्यवस्था मोडीत काढणार आहे त्यामुळे घर कर्ज नि व्याजावर असणारी वजावट पुढे पूर्णतः नाहीशी होईल त्यामुळे करबचतीसाठी घर बिलकुल घेऊ नये. मार्केटची भीती असेल तर सरळ RBI बॉण्ड मध्ये पैसे गुंतवा
५. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च - माझ्या केसमध्ये मी माझ्या मुलास फी न बघता ( याची फी फार वाजवी आहे , आजकाल महाग म्हणजे उत्तम असा परिपाठ आहे ) एका उत्तम दर्जाच्या शाळेत घातले. शिक्षणासाठी सोय करतोय पण पौंगडावस्थेत गेल्याशिवाय पोरातील विद्वत्ता कळत नाही , त्यामुळे आता लोड घ्यायचे नाही , आणि शैक्षणिक कर्ज हा पर्याय असतोच कि. त्यामुळे उगाच प्राथमिक शिक्षणासाठी वर्षाला १-१.५ लाख खर्च न करता तेच पैसे पुढे उपयोगाला येतील, त्यामुळे १० वीपर्यंत शिक्षणासाठी वाचलेले पैसे पुढे कामास येतील आणि नाहीच काही झाले तर पुढे त्याच्या उद्योगधंदयासाठी सीड कॅपिटल होईल
६ फायर / योलो असल्या अनेक संकल्पना आहेत . घरी बसून आपल्या घरच्यांना त्रास देण्यापेक्षा कार्यालयात जाणे कधीही चांगले :)
७ आजकाल मेंटॉरशिप / कोचिंग / इंडिपेन्डन्ट डायरेक्टर असे बरेच पर्याय ४५ + लोकांसाठी उपलब्ध आहेत . मी पण या पर्यायांची चाचपणी करतोय कारण शेती वा समाजसेवा हे पर्याय माझ्यासारख्या शहरी नि व्यवहारी माणसाला पचतील असे वाटत नाही. त्यामुळे अभ्यास चालू आहे कारण आजकाल कंपनी ४५+ लोकांना ओझे समजतात त्यामुळे तयारी करणे केव्हाही चांगले.

कबीरदास म्हणतात,

फकिरा फकिरी दूर है
जितनी लंबी खजूर
चढे तो चाखे प्रेमरस
गिरे तो चकनाचूर

धाडस करताना या गोष्टीवर जरूर विचार करायला हवा.

स्मशान वैराग्य क्षणात संपते. कुठलेही अर्थिक निर्णय घेताना स्वताची अर्थिक क्षमता, इतर जबाबदाऱ्या पण लक्षात घेणे व खरोखरच एव्हढ्या मोठ्या घराची ,SUV ची गरज आहे का ?,केवळ आवडले किंवा माझे स्वप्न म्हणून सर्वस्व पणाला लावणे चुकीचे आहे. असे मला वाटते.

साईं इतना दीजिए, जामे कुटुंब समाए |
मैं भी भूखा न रहूं, साधु न भूखा जाए||

सुबोध खरे

luxury becomes necessity when neighbour buys it

चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते?

आपल्या शेजाऱ्याने विकत घेतली कि.

शेजारणीने हिऱ्याचा हार घेतला कि मला घ्यायलाच पाहिजे. कारण माझ्या नवऱ्याला शेजाऱ्यापेक्षा पगार थोडा जास्तच आहे.

आणि शेजाऱ्याने मुलाला आयफोन घेतला कि माझ्या मुलाला पण हवाच कि.

हव्यास किती वाढत जातो याला अंत नसतो.

सेकंड होमची स्थिती बहुतांशी हीच असते.

केवळ मित्रांकडे आहे म्हणू आपण हि घ्यावे हि भावना बळावत जाते.

मुंबईतील माझ्या माहितीच्या कित्येक लोकांचे/ नातेवाईकांचे तळेगाव येथील "सेकंड होम" हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरलेला मी पाहिला आहे.

उरापोटावर कर्ज घेऊन तर सेकंड होम कधीही करू नये.

कारण त्या पैशाच्या व्याजात तुम्ही त्याच ठिकाणी पंचतारांकित हॉटेलात राहू शकता असे अनेक ठिकाणी दिसून येते.

What Is Lifestyle Creep?
Lifestyle creep is when your standard of living rises alongside your discretionary income—and soon enough, former luxuries become new necessities. It happens little by little, without you really realizing it: it sneaks ("creeps") up on you.

https://www.investopedia.com/terms/l/lifestyle-creep.asp#:~:text=By-,Wh…)%20up%20on%20you.

हे हि जरूर वाचून घ्या

बाकी "बस आज कि रात है जिंदगी" असे म्हणू जगणारे किती तरी लोक आनंदात हि जगलेले आहेत असेही दिसते.

तेंव्हा सगळ्यांना हि गोष्ट झेपणार नाही असे माझे म्हणणे अजिबात नाही.

ज्याने त्याने हा मुद्दा तारतम्य बाळगून करावा इतके च म्हणणे आहे.

अमर विश्वास

वेगवेगळे दृष्टिकोन वाचून बरे वाटले

आजचा दिवस आनंदात जगणे बेजबाबदारपणा नाही ... भविष्याची पूर्ण काळजी घेऊनही आजचा दिवस आनंदात जगता येत नाही का?

आणि चैनीचे म्हणाल तर पुरेसा disposable income असेल (भाविषयाची तरतूद केल्यावर ) तर चैन का करू नये ? (भविष्याची तरतूद / investment ये विषयावर मी पुरेसे लिहिलेले आहे )

ते शाळेत हट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती असे जे काही शिकवलंय ना .. तिथेच सगळी गडबड आहे

कंजूस

आपण घेतलेल्या वस्तुंबद्दल पुढच्या पिढीला आवड/रस नसला तर सगळा कचराच. पुस्तके असोत वा फर्निचर वा घर.

मारवा

सहज विचारतोय नांवसाधर्म्य आढळले म्हणून.

kvponkshe

नाही , तो मी नव्हेच !

मारवा

मुकेश अंबानी यांचे उजवे हात मानले जाणारे प्रकाश शहा ज्यांची सॅलरी 75 करोड होती त्यांनी नुकताच सर्वसंग परित्याग करून
जैन मुनी बनले अशी बातमी नुकतीच वाचली. जैन मुनी यांचे जीवन इतर धर्मातील संन्यस्त पेक्षा कमालीचे खडतर असे असते. केशलोचंन ,वगैरे masochistic प्रकार बरेच असतात.
तर मुद्दा असा की दोन प्रकारची माणसे एक लौकिक जीवनात अत्युच्च शिखर गाठणारी तसेच पारलौकिक जगातही अत्युच्च प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी.
दोन्हीकडे झोकून दिली जिन्दगी.
सर्वकाही स्टेक वर लावून दिलं
आता यात अजून एक spiritual paradox आहे तो बाजूला ठेवू.
मग दुसरा प्रकार आपला साहित्य वरणभात भाजीपोळी
मधला मी असा.कसा मधला वाला
तिसरे बिचारे survival च्या मारामारीत ते जाऊ द्या.
असो
मग

श्वेता२४

शब्दन शब्द खरा. तुमची ही लेखमाला मला अतीशय आवडते... असेच अजून लेख येत राहोत. बाकी या लेखाबद्दल म्हणाल तर कोणतीही वस्तू घेताना मला याची खरंच गरज आहे काय़ याचा विचार करुन पैसा खर्च करणे योग्य. घर/गाडी या दोन्ही गोष्टी समाजात उगाचच व्यक्तीच्या कर्तृत्वाशी/स्टेटस शी जोडल्या गेल्या आहेत. पूर्वीच्या काळी एका घरात दोन-तीन पिढ्या राहायच्या पण आताच्या काळात एकच पिढी ते घर वपरते व पुढची पिढी दुसरीकडे. शिवाय त्या पिढीला आधीच्या घराची किंमत नसते. लोक काय वास्तुशांतीला किंवा लेखाप्रमाणे "बसण्याचे" कार्यक्रमावेळी (खोटे़-खोटे)कोतुक करतीलही, पण किती वेळा? आजकालच्या जीवनात कुणाला कुणाकडे जायला वेळ नसतो. राहायला येणे तर खूप लांबची गोष्ट... प्रत्येकावे वर्षभरात आपल्या घरी किती माणसे किती वेळा आली व राहिली याचे मोजमाप करायला घेतले तर सहज गणना करु शकु एवढा आकडा कमी असेल. अशावेळी केवळ स्वताचा भरपूर वापर होणार असेल तर आणि तरच अशा मोठ्या गोष्टी खरेेदी करणे योग्य आहे. केवळ काही फालतू लोकांशी स्पर्धा करुन किंवा मोठेपणा म्हणूल असा पांढरा हत्ती पोसावा का याचा प्रत्येकाने विचार करावा असे माझे वैयक्तीक मत.

स्वधर्म

विचार करायला लावणारा लेख आहे. खरे तर हे विषय प्रत्येकजणच मित्रपरिवारांत बोलत असतो. अतिशय रोचक प्रकारे कथेच्या रूपात पण रोकडं सत्य सांगितलंत तुंम्ही.

लेख आवडला असे तरी कसे म्हणणार ??? मृत्यू हे अंतिम सत्य आहे . आपल्या आप्तेष्टांचे १-२ मृत्यू पाहिल्यावर हि भावना जरूर उचंबळून येते.

Bhakti

हो ना जसं जसा काळ जातो,तसं तसे आपलं म्हातारपणात कसं होणार असं वाटतं,नकोच ते ६०-६५ मृत्यू आला तर बरं होईल.बाकी काही कितीही उपाययोजना केल्या तरी काही इन सिक्युरिटीज दूर केल्या की दुसऱ्या तोपर्यंत मनात आलेल्या असतात,हे चक्रच आहे.तेव्हा शांतपणे,सर्व बाजूंनी विचारांती योग्य निर्णयापर्यंत पोहचत राहणे हाच उत्तम मार्ग!

सुबोध खरे

तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असतं

म्हातारपणी तेच एक रुक्ष गद्य होऊन जातं

तेंव्हा तरुण माणसं जेंव्हा मृत्यू याबद्दल भाष्य करतात तेंव्हा आश्चर्य वाटत नाही.

परंतु मृत्यू आपल्या हातात नाही.

तेंव्हा म्हातारपणी आपण आपल्या जोडीदारावर आणि मुलाबाळांवर ओझं बनून राहायला नको( निदान आर्थिक भार तरी नको) इतपत तरी स्वतःची आर्थिक तरतूद नक्की असावी.

वय वाढलयं पण म्हातारा झालोय का सांगता येणार नाही.

तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असतं म्हातारपणी तेच एक रुक्ष गद्य होऊन जातं

दु:ख,कष्ट तरूणपणी असतात पण अंगात रग असते. म्हातारपणातली दु:ख, कष्ट वेगळे,मी म्हातारा झालोय, वय वाढलयं ही भावना जर त्या दु:ख किंवा कष्टाबरोबर जुडली तर ते असहनिय होतात. जोवर हातीपायी धडधाकट आहे तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायचा.

बाकी ,खाटेवर आडवे पडल्यावर मात्र नैराश्य येणे स्वाभाविक आहे.

इश्वरेच्छा बलियसी म्हणत उर्वरित दिवस काढायचे. त्याला इलाज नाही.

साहित्य-ललिता मालिकेतील सर्वच लेख आवडले, विचारप्रवर्तक आहेत.
सध्या आपल्याकडे जे आहे ते कोणालाच पुरे वाटत नसते, फक्त कुठे थांबायचं हे पण कळलं पाहिजे.