जनातलं, मनातलं

आकाशात तार्‍याचा स्फोट- ल्युपस तारकासमूहामध्ये सुपरनोव्हा

Primary tabs

स्फोटामुळे 50 लाख पट तेजस्वी झालेला तारा डोळ्यांनी दिसू शकेल

सुपरनोव्हा (अति नवतारा) म्हणजे तार्‍याचा स्फोट होण्याची स्थिती. तार्‍यांच्या जीवनक्रमामध्ये शेवट होण्याची एक शक्यता असा स्फोट ही असते. तार्‍यांचं युगुल (पेअर) असेल व एक तारा खुजा (ड्वार्फ) असेल किंवा तार्‍याचं वस्तुमान जास्त असेल तर असा स्फोट होतो. स्फोट झालेला तारा दक्षिणेकडच्या वृक म्हणजे ल्युपस (Lupus) तारकासमूहातला +22.3 प्रतीचा तारा होता. त्याचा स्फोट झाल्याचं 12 जूनला लक्षात आलं. आकाशाचा इलेक्ट्रॉनिक सर्व्हे करणा-या यंत्रणेने +22 म्हणजे अति अंधुक असलेला हा तारा 8.7 इतक्या प्रतीचा म्हणजे तेजस्वी झाल्याचं सांगितलं. आणि 19 जून रोजी त्याची तेजस्वीता वाढून 5.7 इतकी झाली म्हणजेच तो नुसत्या डोळ्यांनी दिसण्याच्या मर्यादेइतका तेजस्वी झाला आहे.

V462 Lupi नाव दिलेल्या ह्या तार्‍याचा स्फोट शेकडो वर्षांपूर्वी झाला. पण त्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहचला तेव्हा स्फोटाची माहिती आपल्याला मिळाली. दक्षिण गोलार्धातील ठळक तारकासमूह नरतुरंगच्या (Centaurus) मदतीने ह्याची‌ दिशा शोधता येईल. 5.8 इतका तेजस्वी असल्यामुळे खूप निरभ्र व प्रकाश विरहित आकाशात नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल व बायनॅक्युलरने सहज दिसू शकेल. नरतुरंग तारकासमूहातील कॅप्पा तारा (Kappa Centauri) पासून हा तारा जवळच आहे. त्याची स्थिती इथे बघता येईल.


.

हा अति नवतारा दक्षिण आकाशात 40 अंश डेक्लिनेशनवर असल्यामुळे तो उत्तर गोलार्धातून साधारण 35 अंश उत्तरेच्या पलीकडे दिसणार नाही. भारतामधून तो सध्या रात्री 9.30 ते 11.30 ह्या वेळेमध्ये नरतुरंग तारकासमूहातील ठळक अशा कॅप्पा ता-याच्या मदतीने शोधता येऊ शकतो. अजून काही दिवस तरी तो तेजस्वी राहील. सध्या ढग असले तरी अगदी 15 मिनिटांसाठी त्या भागातलं आकाश स्वच्छ झालं तरी तो बायनॅक्युलरने बघता येऊ शकेल इतका सोपा आहे.

सुपरनोव्हा म्हणजे अति नवतारे! आकाशातील आणखी एक चमत्कार! सन 1054 मध्ये वृषभ राशीमध्ये असाच एक अति नवतारा दिसला होता. त्यावेळी त्याची तेजस्वीता इतकी जास्त होती की, तो -7 म्हणजे शुक्राहूनही तेजस्वी झाला होता आणि काही आठवडे दिवसाही दिसू शकत होता. तत्कालीन निरीक्षकांनी त्याचं निरीक्षण केलं व काही गुहाचित्रांमध्येही त्याची प्रतिमा आढळते. मृग नक्षत्रातला प्रसिद्ध काक्षेय (Betelgeuse) तारासुद्धा स्फोट होण्याच्या मार्गावर आहे असं मानलं जातं. त्याचा स्फोट कधीही होऊ शकतो (म्हणजे झालेला असू शकतो). स्फोटानंतर त्याचा प्रकाश आपल्याकडे येईल तेव्हा आपल्याला आत्ता तो आहे त्याहून खूप जास्त प्रखर होईल. शुक्राहूनही तेजस्वी होईल आणि वर्षभर दिवसा दिसू शकेल! आणि जेव्हा त्याचे किरण पूर्ण फेकले जातील, तेव्हा मात्र "मृग नक्षत्रातली एक ओळखीची जागा" मात्र अदृश्य झालेली असेल!

(वाचल्याबद्दल धन्यवाद. लेख जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावा. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. लेख लिहीण्याचा दिनांक: 24 जून 2025)

वा! असामान्य घटना. जवळजवळ ९७१ वर्षांनंतर अशा घटनेची नोंद होते आहे. हा तारकासमूह सुमारे ४६०प्रकाशवर्षें दूर आहे हे ध्यानात घेतले तर सुमारे १५६५ साली घडलेले आतां दिसते आहे असे म्हणता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता नवनवीन माहिती उजेडात येईल. उदा. लोह या धातूपेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये कां व कशी तयार होतात हे कळले तर जाणून घ्यायला मजा येईल. ध्यानीमनी नसलेली आणखी काही माहितीही उजेडात येईल.

बहुमोल माहितीबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

मार्गी

@ सुधीर कांदळकर सर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण पंधराव्या शतकातही शर्मिष्ठा तारकासमूहात ठळक सुपरनोव्हा बघितला गेला होता. आणि नंतरही छोटे- मोठे दिसतातच. आणि तारकासमूहाचं अंतर जरी ४६० प्रकाशवर्षं असलं तरी "त्या तार्‍याचं" अंतर तेच असेल असंही नाही. संशोधनाच्या संदर्भात असं म्हणतात की, जे जड मूलद्रव्य आहेत, ते तारकास्फोटातून बाहेर येतात.

कंजूस

तुम्ही तारे कुठून पाहता?
भारतात लडाख वगैरे ठिकाणी राहणाऱ्यांना दिसेल.

मार्गी

पुण्यातून आणि कधी कधी बाहेरच्या प्रकाश प्रदूषण नसलेल्या लांबच्या गावांमधून.

जिथे निरभ्र आकाश असेल तिथे बायनॅक्युलरने हा सुपरनोव्हा दिसू शकेल. आणि खूपच जास्त अंधारं आकाश असेल, तिथे अगदी रेअर स्थितीमध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल.

Nitin Palkar

खूपच छान माहिती. खूप सोप्या भाषेत.

_/\_