काथ्याकूट

आर्थिक खिचडी

Primary tabs

अमेरिकेच्या स्थानिक रोजगार धोरणामुळे किंवा दक्षिण आशियाई कामगारांची संख्या कमी करण्याच्या धोरणामुळे मी लवकरच नोकरीवरून बाहेर पडणार आहे. वय ४८. २ मुले, बायको खाजगी शालेत शिक्षिका, पगार जास्त नाही. मोठा मुलगा PICT मध्ये Open Category मध्ये CS ला दुसर्या Year ला.

जबाबदाऱ्या (Liabilities)
1. होम लोन १ (कोविड नंतर भावनेतून बांधलेलं मनासारखे घर नासिक मध्ये. मी नासिक चा आणि गेले २ तप बाहेर राहिलो आहे.)
2. होम लोन २ (हैदराबाद आऊटस्कर्ट्समधील premium एरिआ मध्ये ३बीएचके फ्लॅट – जिथे मुलं वाढली, प्रगती झाली)

→ एकूण उर्वरित लोन = ₹१.५० कोटी
• मालमत्ता (Assets – एकूण ५)
o हैदराबाद आऊटस्कर्ट्समधील ३बीएचके फ्लॅट → किंमत ~₹१.२५ कोटी
म्हणजेच हा फ्लॅट विकलात तरी सर्व लोन पूर्ण होणार नाही.
आता याव्यतिरिक्त माझ्याकडे १.४ लाख म्युच्युअल फंड्स, शेअर्स, पीएफमध्ये आणि एफडीमध्ये आहेत. बाकी काही राहिले तर आइ वडिल, भाऊ मदत करतीलच.
पर्याय १:
हैदराबादचा फ्लॅट आणि थोडे शेअर्स विकून कर्जमुक्त व्हावं आणि उपलब्ध निधी अशा पद्धतीने लावावा की ज्यातून मासिक उत्पन्न मिळेल. त्यात पत्नीच्या नोकरीतून मिळणाऱ्या पगाराची जोड झाली तर माझ्या वार्षिक गरजा – मुलांच्या शिक्षणासह, विमा पॉलिसी, दैनंदिन खर्च – सहज भागतील.
पर्याय २:
सर्व म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि एफडी मधलं पैसे काढून कर्जमुक्त व्हावं आणि हैदराबादच्या प्रॉपर्टीतून भाडे मिळवावं. यामुळे कुटुंबातील सदस्यांना – विशेषतः पत्नी आणि आईवडिलांना – भावनिक आधार मिळतो, कारण त्यांना इतर गुंतवणुकींची जास्त माहीती नाही.

तुम्हाला काय वाटते, तुमचा काय सल्ला असेल

चिखलू

आता याव्यतिरिक्त माझ्याकडे १.४ लाख म्युच्युअल फंड्स, शेअर्स, पीएफमध्ये आणि एफडीमध्ये आहेत

आता याव्यतिरिक्त माझ्याकडे १.४ कोटी म्युच्युअल फंड्स, शेअर्स, पीएफमध्ये आणि एफडीमध्ये आहेत

अभ्या..

एवढ सगळ करताना विचारायला आला का कधी?
आता एवढ केले आहे स्वतच्या बुद्धीने तर निस्तारा पण स्वतच्या बुद्धीने.
.
आता खरे खरे.
सोशल मीडियावर असे नसते ओ सगळे उघडून बसायचे.
बघा बाबा तुम्हीच. मला वाटले ते बोललो.

अभ्या जी अनुभवी लोकांकडून सल्ला मिळत असेल तर काय प्रॉब्लेम? तसेही निस्तरायचे त्यांनाच आहे. पण इथे कुणी ह्या situation मधून गेले असेल तर उत्तम मार्गदर्शन करू शकेल!

सोत्रि

अभ्याशी सहमत!

खाली अबा म्हणतोय तसे जर निस्तरायचे त्यांनाच आहे तर सोशल मिडीयावरच्या अनुभवी लोकांच्या सल्ल्यापेक्षा प्रोफेशनल आर्थिक सल्लागाराचा सल्ला योग्य असेल.

- (स्वतच्या बुद्धीने निस्तरणारा) सोकाजी

पण त्याना अनुभवी लोकांचा सल्ला हवा असेल तर? त्यांनी आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घ्यावा की संकेतस्थळावर (सोशल मीडिया नाही) असा प्रश्न विचारलेला नाही. त्याना संकेतस्थळावरून सल्ला हवा आहे, नी आपण त्याना मान देऊन सल्ला असेल तर द्यायला हवा. नमनालाच असे टोकणे बरोबर नाही असे मला वाटते. मी स्वत दोन धागे काढले, घर घेताना काय पहावे नि भाड्याचे घर की स्वतचे घर? आणी त्या खालच्या प्रतिक्रिया पहा, माहितीने अक्षरशः डबडबलेल्या आहेत. अशी माहिती कुठलाही प्रोफेशनल आर्थिक सल्लागार पैसे घेऊनही देणार नाही. लोकांचे अनुभव हा खुप महत्वाचा विषय असतो, चैट जीपीटी सुधा रेड्डीत वरील चर्चेतून सर्वात जास्त माहिती मिळवते ना की गुगलवरच्या बाडातून, सो श्री चिखलू ह्यांनी हा धागा काढून योग्य केले आहे, त्याना चांगला सल्ला मिळेलच, पण सुरुवातीलाच सल्ला न देता टोकणे मला तरी बरोबर वाटले नाही असो. मला तरी वयक्तिक मिपावरील अनुभवी लोकांच्या सल्ल्यांचा फायदा होतो असे दिसले आहे, आगदी कौस्तुभ पोंक्षे, राजेंद्र मेहेंदळे, प्रसाद भागवत, गणेशा नी अनेक लोक ह्यांचे धागे नी त्या खालील चर्चा पहा, माहिती माहिती नी माहिती, तीही अनुभवी लोकांकडून!

चिखलू

Sir,
जरा विस्तारून सांगतो.
आर्थिक सल्लागार जेव्हा गुंतवणूक करायची असते तेव्हा MF आणि shares मध्ये invest करायला सांगतात. कारण काय तर ताबडतोब पैसे हातात. म्हणजे 1 ते 5 दिवस जास्तीत जास्त.
Property मध्ये गुंतवणूक कशी चूक आहे आणि बाकी MF ETC कसे चांगले आहे ह्यावर खूप जोर देतात.

पण अशी वेळ आली की ज्या गोष्टी मधून आपल्याला लगेच काही रक्कम मिळणार असेल तीच काढू नका सांगतात. आणि स्थावर मालमत्ता काढून टाका असे सांगतात ज्याला कमीत कमी 1 ते 6 महिने लागतात.

Mazya case मध्ये दोन्ही ऑप्शन आहेत अणि त्यांचा लागणारा टॅक्स सुद्धा असणार आहे जो की पुढच्या वर्षी भरावा लागेल.

थांबतो आता.

चिखलू

माणूस कधी काय करेल आणि कधी सल्ला मागेन हे परिस्थिती वर अवलंबून असते. मनातल्या मनात त्याचे किंवा तिचे निर्णय थोडेफार झालेले असतात. चार लोकांना विचारून सध्य परिस्तिथी वर अजून काही ऑप्शन विचार करता येईल का हीच माफक अपेक्षा असते

सहमत आहे! नी बऱ्याच वेळा आपण निर्णय बदलूही शकतो. मागे मी बिल्डरला दिलेला १ लाखाचा चेक परत आणला, एक मिपाकराने वेळीच योग्य सल्ला दिला म्हणून वाचलो, कारण त्या भागाचे मला ज्ञान शून्य होते नी त्या मीपाकराची हयात पुण्यात गेलेली होती , त्या मिपाकराने मला आर्थिक गणित मांडून दिले नी इथे अमुक रकमेच्या वर भाडे मिळणार नाही, व का घेऊ नये हे व्यवस्थित मार्गदर्शन केले नि नंतर तपास केल्यावर त्यातला शब्द नी शब्द खरा निघाला, एक मोठ्या आर्थिक संकटातून मी वाचलो कारण मला वेळीच बुद्धी सुचली की सल्ला घ्यावा! त्यामुळे कुणी काहीही म्हणो असे मोठे निर्णय घेताना सल्ला मागून पहावा!
एक आयडीया तुमचे आयुष्य बदलेल, असे छोटे बच्चन साहेब अनेक वर्षाधीच सांगून गेलेत!

सर्व काही पत्नी मुलांच्या नावावर करून, स्वतःला डिफॉल्टर घोषित करून टाका! बँक त्रास द्यायला लागल्यास नोकरी गेल्यामुळे माझी मानसिक स्थिती बरोबर नाही असे सांगा. श्रीमंत लोक नाही का असेच करत? :)
(हलके घ्या हा) :)

सोत्रि

सर्व काही पत्नी मुलांच्या नावावर करून, स्वतःला डिफॉल्टर घोषित करून टाका! बँक त्रास द्यायला लागल्यास नोकरी गेल्यामुळे माझी मानसिक स्थिती बरोबर नाही असे सांगा. श्रीमंत लोक नाही का असेच करत? :)
(हलके घ्या हा) :)

नेमकं ह्यामुळेच अभ्याचा प्रतिसाद चपखल आहे!

- (आर्थिक बाबींबाबत स्वावलंबी) सोकाजी

चिखलू

काही प्रतिक्रिया मजेशीर तुलना.

डॉक्टर कडे जायचे आणि सांगायचे की मला सर्दी खोकला झाला आहे, मागच्या वीकेंड la लोणावळ्याला गेलेलो, भिजलो, त्यामुळे असावा कदाचित.

डॉक्टर

जातांना मला विचारुन गेलेला का? आता निस्तरा तुम्हीच. हसणारी स्मायली yet नाही yet नाहीये इथे

गणेशा

वयाच्या ४८ व्या वर्षी कर्जाच्या बोज्याने, stress ने आयुष्य का वाकवून घ्यायचं?
सर्व कर्ज मुक्त होऊन आनंदी stress विरहित जिवन जगले पाहिजे..

आपण ज्याला संपत्ती म्हणता आहात, मला ती कर्ज असे पर्यंत तरी लायबॅलिटी वाटतात..

युयुत्सु

सर्व कर्ज मुक्त होऊन आनंदी stress विरहित जिवन जगले पाहिजे..

सहमत आहे!

चिखलू

फक्त उपलब्ध असलेल्या पर्यायांमधुन कोणता वापरावा त्यासाठी ही चर्चा.

गणेशा

मी पर्याय १ वापरला असता.

येथे direct उत्तर लिहिले नव्हते..
कारण
- तुमची मुले जेथे मोठी झाली प्रगती झाली, तिथेच स्थाईक होणार आहेत काय हे तुम्ही सांगितले नाही..
- तुम्ही कुठे राहणार आहात नंतर हे पण मला कळाले नाही.

असो. पर्याय १ बरोबर आहे, हैद्राबाद घर विकणे.,
long term ला shares(fundamentaly strong), mf वगैरे जास्त परतावा देतील real estate पेक्षा.

आयुष्य कर्जात घालवलं. टेन्शन घेतल नाही. कांचनसंध्येला कर्जमुक्त झालो. आवरा आवर करून बसलोय. आजही कोलेस्ट्रॉल, शुगर आज्ञाधारक सुने सारखी मर्यादा सांभाळून आहे.

कर्ज लायबीलीटी नसते. ती एक सोय असते.

मी मारूती चार चाकी घेतली. ऑफिस मधले सर्व म्हणाले काय जरूर होती कर्ज काढायची. साचवले असतेस पैसे मग घ्यायची. मी म्हणालो, पैसे साचवता साचवता जावई यायची वेळ होईल. तो म्हणेल बाबा या वयात गाडी चालवत जावू नका जेव्हां पाहिजे तेंव्हा मला बोलवा.तुमच्या प्रकृतीची चिंता आहे. मुलगी दुजोरा देईल,गाडी घेऊन जाईल. मी आणी म्हातारी पुन्हा हमारा बजाज हे गाणे म्हणत,नी कण्हत जगू. मी तरूण आहे मला गाडी चालवायचा आनंद घ्यायचा आहे. एका महिन्यात विस गाड्या ऑफिसात उभ्या राहायला लागल्या. सहकाऱ्यांच्या बायका पोरांनी आशिर्वाद दिले.

बायको,गाडी,घर,मुलींची उच्च व परदेशी शिक्षण सर्व बॅकांनीच केलं मी फक्त हप्ता देत राहीलो. बॅकां नसत्या तर कदाचित ब्रह्मचारीच राहिलो असतो.

दृष्टीकोन यावर सर्व अवलंबून आहे. Hypothicate your tension and enjoy life.

मी एवढाच सल्ला देऊ शकतो बाकी निर्णय तुमचा.

गणेशा

कर्नल साहेब
त्यांच वय ४८ आहे. २८ किंवा ३८ नाहीये

बाकी हे व्यक्ती सापेक्ष आहे.. प्रचंड कर्जातून आता संपूर्ण कर्जमुक्त (३ वर्ष राहिलेत.) होण्याकडे मी तरी वाटचाल केली आहे..
आणि मला त्यात खुप्पच आनंदी वाटत आहे..
वयक्तिक जास्त काही बोलत बसत नाही, त्यामुळे पुढच्या व्यक्तीला तसा काही फायदा होणार नाही.

(अवांतर: तुम्ही जे म्हणाला आहात, same विचार मी मिपा वरच काही वर्षांपूर्वी अंदाजे २०१५ ला मांडले होते. सापडल्यास लिंक देतो.. परंतु काळाच्या कसोटीवरती ते मला आता पूर्ण चुकीचे वाटतात)

अंशतः सहमत.

अर्थीक निर्णय हे व्यक्तिसापेक्ष असतात आणी असायला हवेत. इथे ज्याचे जळते त्यालाच कळते आशा परिस्थितीत सल्ला देणे घेणे मर्यादित असायला हवे.

मी साठाव्या वर्षी एज्युकेशन लोन काढले .म्हणून दुसर्‍याने पण काढावे हा सल्ला मी देणार नाही. आज मी सत्तरी पार केली आहे,कर्ज मुक्त आहे पण टेन्शन फ्रि नाही.

मी फक्त एवढेच म्हणेन की कर्जाचे टेन्शन नको म्हणून आहे ती गुंतवणूक लिक्वीडेट करून मुक्त व्हायचे किंवा गुंतवणूक व कर्ज यात ताळमेळ ठेवून पुढे चालायचे हे ज्याने त्याने ठरवावे.

म्हणून कर्ज मुक्त झालो म्हणजे टेन्शन फ्री होईन असे म्हणणे असेल तर मला तरी चुकीचे वाटते. सुरेश भट म्हणतात,

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

पर्याय एक किवां पर्याय दोन याचा निर्णय सारासार विचार करून घ्यावा लागेल.आणी तो स्वतःच कुटुंबाला विचारपूस करून घ्यावा हे उचित.

कर्ज घेऊन जमवलेली संपत्ती कधिही विक्री करून कर्ज चुकवता येते. पण जर गुंतवणूक बुडाली तर हाती धुपाटणंही लागत नाही.

तेव्हा जोपर्यंत हप्ते भरण्याची ऐपत आहे तोवर संपत्तीचा फायदा घ्या व शक्यतो गंगाजळी निर्माण करा.

गुंतवणूक व कर्ज नवरा बायको सारखे एकमेकाला पुरक हवेत.

अस्मानी सुलतानी संकटात घराची विक्री शक्य होत नाही किवा अपेक्षित भाव मिळत नाही. शिवाय पडझड झाली तर आणखीच तोटा. त्यापेक्षा जमीन किवा सोने असेल तर कधीही चांगले.

गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय वापरले तर धुपाटणे हाती लागणार नाही. आता जास्त व्याजाच्या मोहापोटी बिल्डरकडे पैसे ठेवले असतील किवा साग लागवड वा तत्सम योजनेत किवा पतपेढीत ठेवले असतील तर गोष्ट वेगळी.

गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय वापरले तर धुपाटणे हाती लागणार नाही
गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय कोणते कोणते आहेत? शेअर्स, mf हे सुरक्षित पर्यायात येतात का?
सोन्यात दागिने सोडून कशी गुंतवणूक करावी? म्हणजे फिजिकल गोल्ड नको, गोल्ड बाँड बंद झाले असे मागे कळले होते. (बहुतेक सरकारी)

त्यापेक्षा जमीन किवा सोने असेल तर कधीही चांगले.अजून काय पर्याय असतात गुंतवणुकीचे? जमीन वगैरे ठीक आहव पण जिथे आपण राहत नाही, लक्ष नाही अश्या ठिकाणी कसे लक्ष देणार? भाऊबंदांच्या भरोश्यावर गावाकडे घेऊ नेव आव वाटते, शिवाय कुणी अतिक्रमण करेल वगैरे डोकेदुखी आहेच.

पतपेढीत ठेवले असतील तर गोष्ट वेगळी. मागे जळगावला गेलो होतो, भावाच्या सासऱ्यांचे रायसोनी पतपेढीत एखाद लाख अडकले आहेत, त्याचा तपास करायला, तिथे ऑफिसात फॉर्म भरायला लावत होते मी तो फॉर्म भरून जमा केला, तिथे एक आजोबा आलेले होते २०१३ साली त्यांनी १३ लाख जमा केले होते ते अडकले, २०२४ मध्ये त्यातला एक छदामही त्याना काढता येत नव्हता, व्याज वगैरेतर सोडाच. २०१३ चे १३ लाख नाही म्हटले तरी आज २० लाख पार करून गेले असते. वाईट वाटले त्यांच्याकडे पाहून fd च्या एखाद टक्का जास्तीच्या मोहापायी मोठी रक्कम अडकली.

गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय वापरले तर धुपाटणे हाती लागणार नाही.

कृपया आणखी पर्याय असतील तर मार्गदर्शन करा!

१. एफ डी
२. शेअर्स
३. म्यु. फंडस
४. पी पी एफ
५. पी एफ/ई पी एफ
६ एन पी एस
७.पोस्टाच्या योजना
८. एल आय सी
९. सोने/चांदी
१०. परकीय चलन (याबद्दल फार माहित नाही, म्हणजे किती पर्यंत साठवता येते, किती मुदतीनंतर विकता येते)
११. क्रिप्टो करन्सी(हाय रिस्क, हाय रिवॉर्ड)

अस्मानी सुलतानी पुढे कोणाचाच टिकाव लागत नाही. फांदी तुटण्याची शक्यता म्हणून घरटे बांधूच नये का? अनेक प्रकार आहेत अस्मानी सुलतानीच्या व्यतिरिक्त अचानकनुकसानहोण्याचे. मोठी मोठी उदाहरणे आहेत.

इतर गुंतवणूक पुर्णपणे सुरक्षित आहे का?

घर घेताना गुंतवणूक करताना विचार करूनच केली असणार. काही ठोकताळे बांधले असतील, काही पर्यायी ऊपाय लक्षात घेतले असतील. इथे अभ्याशेठ म्हणतात तसेच मलाही वाटते.

अनुभवी लोक्स काय तो सल्ला देतीलच. पण माहिती जरा त्रोटक आहे.
१.यापुढे कुठे राहणार आहात? नाशिक, हैद्राबाद कि पुणे? त्यावर कुठले घर विकायचे ते ठरवता येईल. शिवाय चढते भाव कुठे आहेत? म्हणजे पहीले काय विकायचे ते ठरवता येईल. यात मी लाईफस्टाईल्,प्रेस्टीज वगैरे विचारात घेतले नाहीये. म्हणजे मला लोकांनी श्रीमंत म्हणावे म्हणुन मला ३ बीएच्के पाहिजे असे असेल तर जाऊ द्या. पण नाशकात राहुन हैद्राबादच्या कटकटी निस्तरणे कठिण जाईल म्हणुन विचारले.
२.स्पष्ट बोलतो म्हणुन माफ करा पण आई वडील भाउ मदतीला येतील हे मनातुन काढुन टाका. जास्त बोलत नाही. पैशाने वाद निर्माण होतात.
३. जिथे राहणार नसाल ती प्रॉपर्टी काढुन टाका. याचे फायदे म्हणजे मुद्दा क्र.१ प्रमाणे नंतरचे हेलपाटे वाचतील. कर्जमुक्त झाल्याने टेन्शन जाईल. स्थावर मालमत्ता लगेच विकली जात नाही, त्याउलट एफ डी, एम एफ, पी एफ मध्ये तरलता असते.
४. आगाउ सल्ला-- पत्नी नोकरदार असल्याने २ वेळ जेवायची सोय आहे असे धरुन चला. दुसरी नोकरी बघायचे प्रयत्न चालु ठेवाच पण स्वतःची स्टार्टप सुरु करण्याबद्दल विचार करा.

न पटल्यास वरील सगळे सल्ले फाट्यावर मारा.

२.स्पष्ट बोलतो म्हणुन माफ करा पण आई वडील भाउ मदतीला येतील हे मनातुन काढुन टाका. जास्त बोलत नाही. पैशाने वाद निर्माण होतात.
ह्या बाबतीत १००० टक्के सहमत! मी स्वत एक मोठे लचांड मागे लावून घेतले ह्या पायी! कधी कधी वाटते घरातील गोष्टी बाहेर सांगू नये. पण आपल्या अनुभवामुळे इतर लोकांचे नुकसान टाळावे असा शुद्ध हेतूही असतो! गावाकडे बांधलेल्या घराला १६ हजार भाडे येते ज्याचा १०७८० चा हफ्ता मी गेले ४ वर्षे न चुकता भरतो आहे, पण भाड्याच्या पैशांचा एक छदामही मला मिळत नाही. :(

चिखलू

१.यापुढे कुठे राहणार आहात? नाशिक, हैद्राबाद कि पुणे? त्यावर कुठले घर विकायचे ते ठरवता येईल. शिवाय चढते भाव कुठे आहेत? म्हणजे पहीले काय विकायचे ते ठरवता येईल. यात मी लाईफस्टाईल्,प्रेस्टीज वगैरे विचारात घेतले नाहीये. म्हणजे मला लोकांनी श्रीमंत म्हणावे म्हणुन मला ३ बीएच्के पाहिजे असे असेल तर जाऊ द्या. पण नाशकात राहुन हैद्राबादच्या कटकटी निस्तरणे कठिण जाईल म्हणुन विचारले.

नाशिक इथेच राहणार. चढते भाव हैद्राबाद ला. राह्ते घर विकायचा प्रश्न नाही, तिथेच काही क्लासेस वगैरे चालू करता येतील का याचा विचार चालू आहे.

२.स्पष्ट बोलतो म्हणुन माफ करा पण आई वडील भाउ मदतीला येतील हे मनातुन काढुन टाका. जास्त बोलत नाही. पैशाने वाद निर्माण होतात.
४८ वय आहे आणि आजुबाजुला बरीच उदाहरणे बघितली आहेत. पण हा पर्याय आहे ह्या मागची कारणे आहेत. नन्तर कधीतरी लिहिनच की कुटुंबाचा प्रवास इथपर्यंत कसा झाल

३. जिथे राहणार नसाल ती प्रॉपर्टी काढुन टाका. याचे फायदे म्हणजे मुद्दा क्र.१ प्रमाणे नंतरचे हेलपाटे वाचतील. कर्जमुक्त झाल्याने टेन्शन जाईल. स्थावर मालमत्ता लगेच विकली जात नाही, त्याउलट एफ डी, एम एफ, पी एफ मध्ये तरलता असते.
हाच विचार चालू आहे
४. आगाउ सल्ला-- पत्नी नोकरदार असल्याने २ वेळ जेवायची सोय आहे असे धरुन चला. दुसरी नोकरी बघायचे प्रयत्न चालु ठेवाच पण स्वतःची स्टार्टप सुरु करण्याबद्दल विचार करा.
हो वर लिहिल्याप्रमाणे मूलभूत गरजा भागतील एव्हढी सोय आहे

माझे स्वतचे

न पटल्यास वरील सगळे सल्ले फाट्यावर मारा.

सल्ला मागितला आहे त्यामुळे Open Mind ठेवुनच आहे. फाट्यावर मारण्याचा प्रश्नच नाही

अमर विश्वास

पहिला पर्याय योग्य वाटतो ..

कोणतीही प्रॉपर्टी ही पहिल्या ४-५ वर्षात appriciate होते ... नंतर बऱ्यापैकी saturatin असते ,..
तसेच ३ bHK फ्लॅट म्हणजे साधारण ४०००० महिना भाडे ... म्हणजे वर्षाला ४.८ लाख उत्पन्न ... त्यानून प्रॉपर्टी टॅक्स & सोसायटी मेंटेनन्स वंशज केला तर ३.८ लाख उत्पन्न ...

तेच साध्य डेट फंडात ८% बे पैसे ठेवले तर १० लाख उत्पन्न मिळेल ... देत फंडाचे उत्पन्न हे शॉर्ट टर्म गेन धरतात म्हणजे इनकम टॅक्स स्लॅब प्रमाणेच टॅक्स पडेल .. जो घरभाड्याच्या उत्पन्नालाहि लागू आहे ..

अर्थात ही स्पेसिफिक केस आहे .. तुमचे वय ४८ .. म्हणजे किमान पुढची ३५ वर्षे लाईफ स्पॅन धरून त्यानुसार नियोजन करावे

रिटायरमेंट प्लॅनिंग हे वेगळा विषय आहे .. येथे excel file देता त्यात नाही ... पण ओंलीने रिटायरमेंट प्लॅनर्स आहेत .. ते वापरा (विथ पिंच ऑफ सॉल्ट)

ऑल द बेस्ट

शाम भागवत

शॉर्ट टर्म गेन २० टक्के आयकर. स्लॅबप्रमाणे नाही.

कंजूस

सध्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या कमी होत आहेत. त्यातून आणखी प्रापर्टीजची मागणी कमी होईल.

अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहे.इतर गुंतवणुकीची माहिती बायकोला जरूर द्या.

चिखलू

इतर गुंतवणुकीची माहिती जरूर आहे. सगळी गुंतवणुक बायकोच्याच account वर आहे. कदाचित मी शब्द योग्य वापरला नाही. Exposure, Importance किंवा त्यांनी स्वत: केले नसल्याने जास्त knowledge नाहीये.

चिखलू

एखाद्या प्रतिसादाला उत्तर दिले तरी तो पुर्ण चर्चेच्या खाली नविन प्रतिसाद म्हणून येतो आहे. मोबाईल मुळे येतो आहे असे वाट्ल्याने Laptop वरुन type केला तरी तसेच होते आहे.

चिखलू

एखाद्या प्रतिसादाला उत्तर दिले तरी तो पुर्ण चर्चेच्या खाली नविन प्रतिसाद म्हणून येतो आहे. मोबाईल मुळे येतो आहे असे वाट्ल्याने Laptop वरुन type केला तरी तसेच होते आहे.

स्वधर्म

१ मूळ लेखन/ प्रतिसाद
| १.१ त्याला तुमच्या आधी कोणीतरी दिलेला प्रतिसाद
| | १.१.१ हा १.१ ला दिलेला प्रतिसाद (तुमच्या आधी किंवा नंतर दिलेला असला तरी तुमच्या वरतीच दिसणार कारण तो १.१ ला दिलेला आहे.)
| |१.१.२ हाही १.१ ला दिलेला प्रतिसाद (तुमच्या आधी किंवा नंतर दिलेला असला तरी तुमच्या वरतीच दिसणार कारण तो १.१ ला दिलेला आहे. परंतु १.१.१ च्या खाली दिसणार) हे कितीही लांबू शकते.
| १.२ हा तुमचा प्रतिसाद. हा १ या मूळ लेखनाशी जोडणे जरा अवघड जाते.

अशा प्रकारे प्रतिसादांना प्रतिसाद येत असतील. म्हणून बहुधा तुमचे प्रतिसाद खाली खाली जात असावेत.

जर मूळ लेखनापासून उभ्या रेघा दाखवता आल्या मी वरती प्रयत्न केला आहे तसे, तर हे थोडे समजायला सोपे जाईल असे वाटते.

अमेरिकेच्या स्थानिक रोजगार धोरणामुळे किंवा दक्षिण आशियाई कामगारांची संख्या कमी करण्याच्या धोरणामुळे मी लवकरच नोकरीवरून बाहेर पडणार आहे.

यावरून असे कळते की,आपण सध्या अमेरिकेत काम करत आहात. नोकरी सोडताना व देश सोडताना मिळणारे डाॅलर भारतीय चलनात चांगले ॲप्रिसियेट होतील. कदाचित ते तुमचे तारणहार ठरतील. घर आणी गुंतवणुकीला हात न लावता कर्ज मुक्त व्हाल.

चिखलू

मी नासिक मधुन Work From Home Job करतो आहे.

शाम भागवत

हे वाचल्यावर मला खूप छान वाटलं. मला माझंच टेन्शन कमी झाल्यासारखं वाटलं

चिखलू

त्याच आशेवर काम चालू आहे पण कर्जमुक्ती झाली तर जरा तणाव कमी होउन ही नौकरी किंवा दुसर्या पर्यायावर जरा लक्ष केन्द्रित करता येइन.

शाम भागवत

जपान व रशियात चान्सेस आहेत. त्या भाषा येत असतील तर चांगलं पॅकेज मिळेल का? याबाबत तज्ञांच्या सल्ला मिळाला पाहिजे. बऱ्याच देशांना सिलिकॉन व्हॅली उभारायची स्वप्ने पडताहेत म्हणे

स्वधर्म

गुंतवणूकींवर मिळणारे इतर उत्पन्न व पत्नीचा पगार जर घरखर्च व तुमचा इएमआय द्यायला पुरेसे असेल तर काहीच विकण्याची गरज नाही. इएमआय किती ते आपण सांगितले नाही बहुधा. आपल्याला दुसरी नोकरी नक्की मिळेल. ती मिळेपर्यंत कॅश्फ्लो चालवता आला तरी काहीच समस्या येणार नाही.

आजकाल कार्पोरेट मध्ये कधीही नोकरी जाऊ शकते व परत मिळालेली तेवढ्याच किंवा कमी पगाराचीही असू शकते. त्याची तयारी असेल तर सध्यापुरती कळ काढा. तसंही तुमचं डबल इंजिन आहे.

शानबा५१२

फ्लट हैदरबाद चे घर, मोठे आहे, पीजी ठेउन दर महीना जास्त भाडे काढता येईल का ह्याचा ही विचार करा भविष्यासाठी...........

१. आजकाल नोकरी गेली कि ३ महिने EMI माफी मिळते घासाघीस केल्यावर . ३ महिने दुसरी नोकरी च्या प्रयत्नासाठी पुरेसे आहेत
२. लोन चा कालावधी स्पेसिफाय केलेला नाही तरी वय वर्षे ४८ पकडून १२ वर्षांचा कालावधी आहे . लोन कालावधी वाढवून emi अमाऊंट कमी करून थोड्या कालावधीकरिता ओझे कमी करू शकता.
३. सोन्याचा भाव सध्या चांगला आहे सोने तारण वा partly विकण्याचा विचार करा जर सोन्याला इन्व्हेस्टमेंट क्लास मानत असाल तर
४. MF वा शेअर विकण्यापेक्षा घर विकून कर्ज उतरवणे केव्हाही चांगले , पण तुम्हाला त्या घराने भरभराटी दाखवली आहे त्यामुळे विकण्याचा निर्णय कठीण होऊ शकतो म्हणून वरील ३ पर्याय सुचवले आहेत .
५. दोन्ही मुले हाताशी येण्याच्या वयाची आहेत त्यामुळे आर्थिक परिस्थितीची त्यांना जाणीव करून द्या त्यामुळे परिवाराची पण मदत मिळेल

चिखलू

सगळ्यांनी दिलेले सल्ले प्रतिसाद या बद्दल आभारी आहे. 1-2 महिन्यात काय होते ते बघतो, आणि इथे नंतर update करेनच.

निनाद

पर्याय २: म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि एफडी मधलं पैसे काढून कर्जमुक्त व्हावं आणि हैदराबादच्या प्रॉपर्टीतून भाडे मिळवावं. नाशिक पेक्षा हैदराबाद फ्लॅटचा भाव जास्त वेगाने वाढत राहणार असल्यास हा पर्याय चांगला आहे. (नाशिकचा फ्लॅट चा भाव वेगाने वाढेल असे वाटत नाही, पण परिस्थिती तुम्हाला माहीत.)

वैचारिक पर्याय आता तुम्ही ५३ चे आहात आणि पाच वर्षांनी मागे वळून पाहिले असता हैदराबाद फ्लॅट ठेवला असता तर आज काय किंमत असती किंवा किती भाडे मिळाले असते - असा विचार करत असाल तर? पाच वर्षांनी मागे वळून मुले काय म्हणतील पत्नी काय म्हणेल असा विचार करून पहा. पाच वर्षांपुर्वी किती किंमत होती, किती भाडे होते ते पहा साधारण त्या प्रमाणात पुढील पाच वर्षांचा अंदाज लावता येईल पाच वर्षात वाढलेली किंमत तुम्हाला पुढील आर्थिक स्थीरता देऊ शकेल. आणि महत्त्वाचे म्हणजे हा एव्हिडन्स बेस्ड निर्णय असेल त्यामुळे भावना विरहीत निर्णय घ्यायला मदत होईल.

कर्जमुक्त व्हावं ही कल्पना आकर्षक वाटते पण ती तशी तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगली असेलच असे नाही. कर्जमुक्त पेक्षा काही काळ परिस्थिती आहे तशी ठेवता येते का ते पहावे. तुमच्या फ्लॅटस ची किंमत वाढतच राहणार आहे आणि कर्ज आणि कर्जाची किंमत (म्हणजे रुपयाची व्हॅल्यु म्हणून) कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे दोन्ही फ्लॅट राखता आल्यास उत्तम राहील - यात अजून पाच वर्षांनी चांगला फायदाच होईल असे वाटते.

पर्याय: कर्जाचे हफ्ते अंगावर आल्यास सगळे शेयर्स एकदम न विकता तुकड्या-तुकड्यात विकत रहायचे. आणि हफ्ते भरत रहायचे. कदाचित तोवर नवी नोकरी मिळून जाईल.

पर्याय: आहे त्याच फ्लॅट चे री-व्हॅल्युएशन करून एक वर्ष हफ्ते भरण्या एव्हढे पैसे त्यात कर्जाची वाढ करून अजून कर्जाऊ घेता येतील. त्यातून एक वर्षाचा अवधी हाताशी मिळू शकेल. म्हणजे ही विकण्याची वेळ टळेल. तोवर विचार बदलतील, परिस्थिती बदलेल.

कधी कधी अनेपेक्षित घडामोडी होऊन या पेक्षा निराळा पर्यायही हाती लागू शकतो.

फ्लॅट विकून टाकणे सोपे आहे पण परत घ्यायला गेल्यास प्रॉपर्टी चटकन मिळत नाही - सहज घेणे होत नाही - एका वया नंतर बँक लोन देत नाही - हा मुद्दा पण ध्यानी असावा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक खिचडी नाहीयेच! तुम्ही आर्थिकदृष्ट्या चांगल्या ठिकाणी आहात असे माझे मत आहे. नोकरीच्या घटनेमुळे ताण वाटत असेल पण घटना बदलू शकते. कदाचित यापेक्षा चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.

कोणताही मोठा निर्णय घेण्या आधी किंवा ऐवजी निर्णय पुढे ढकलणे हा पर्याय पण चांगला असतो. निर्णय घेण्यास किमान एक दिवस उशीर तर जरूर करा! अनेकदा रात्रीतून विचार बदलतात...

प्रत्येक नवा दिवस नवी आशा आणि संधी घेऊन येत असतो... आजची संकटे उद्या संकटे म्हणून रहात नाहीत!

चिखलू

माझ्या डोक्यातले विचार तुम्ही जवळ जवळ सारखेच मांडले आहेत.

माझा घरच्यांबरोबर झालेल्या चर्चेचा सारांश.

गुंतवणुक १ -
Shares, MF, FD etc.त्यातले Shares, MF यांनी बर्यापैकी परतावा दिलेला असेल तर त्या आर्थिक गुंतवणुकीन अजुन भावनिक गुंतवणुक करण्यापेक्क्षा त्यातुन कर्जाचे ओझे कमी करावे. यातली माझी भावनिक गुंतवणुक म्हणजे खूप कमी किंमतीत घेतलेले Shares आज खूप वाढले हे बघत राहणे वगैरे.

गुंतवणुक २ -

ना॑शिकचे घर राहण्यासाठी स्वत: वेळ आणी लक्ष देउन बांधले असल्याने त्याची किंमत करता येणार नाही. आमच्या दोघांच्या नंतर मुलेच ठरवतील काय करायचे ते.

हैद्रबादचा फ्लॅट, तो जर कर्जमुक्त असेन तर तो एक मोठा दिलासा असेन. पुढे मागे अगदिच गरज पडली तर Reverse Mortgage करता येइन का याची सध्या फक्त चौकशी करुन ठेवणार आहे. तो पर्याय आपल्याकडे जास्त ऐकण्यात नाही पण SBI देते एक Co owner जर Sr. Citizen असेल तर, असे ऐकले आहे.
आणि ते घर असेल तर आई वडिल, बायको आणि मुले सगळे खुश असणार आहेन. त्या बद्ल्यात पहिजे ती काटकसर त्यांच्याकडुन करुण घेता येण्याची शक्यता आहे.

वर निनाद यांनी लिहिल्याप्रमाणे "फ्लॅट विकून टाकणे सोपे आहे पण परत घ्यायला गेल्यास प्रॉपर्टी चटकन मिळत नाही - सहज घेणे होत नाही - एका वया नंतर बँक लोन देत नाही", घरच्यांनीही हेच मत दिले.

कारण प्रोपर्टी साठी एक रकमी पैसा अवघड होतो, ह्या उलट Shares, MF घर बसल्या थोडे थोडे करुन पुन्हा जमवता येतात.

काही बाबतीत,

आज करेसो कल कर, कल करेसो परसो...

फायदेशीर असते.

चिखलू

असा मेसेज येउन फक्त विषय प्रकाशित होतो आहे

चिखलू

त्यामुळे होत असावी असे वाटुन ती काढल्यावर व्यवस्थीत प्रकाशित झाले.

चित्रगुप्त

उद्भोदक धागा आणि चर्चा.
माझ्या आयुष्यात बरेच चढ-उतार येऊन गेलेत, पण त्या काळची एकंदरित परिस्थिती हल्लीपेक्षा पुष्कळ वेगळी होती, त्यामुळे माझे अनुभव आता उपयोगी ठरण्यासारखे नसावेत असे वाटून प्रतिसाद देणार नव्हतो.
-- तरीही असे म्हणावेसे वाटते की 'हेही दिवस बदलतील' हे लक्षात घेऊन टेन्शनमुक्त रहावे. "मनुष्य व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनि जाते"

सुबोध खरे

पहिली गोष्ट म्हणजे distress sell केल्यास भांडवली तोटा खूप जास्त होतो. यास्तव घर विकण्या अगोदर थोडी कळ काढा.

हे ट्रम्पचं नाटक संपलं कि बाजार वर जाईल तशी घराची किंमत पण वर जाईल.

तुमचा घर कर्जाचा हप्ता १.५ लाख आहे हे गृहीत धरतो. म्हणजे पुढच्या सहा महिन्यात तुम्हाला ९.० लाख रुपये भरायचे आहेत.

नोकरी गेल्यावर severance package म्हणू थोडे फार पैसे मिळतील, शिवाय आपल्याला न घेतलेल्या सुटीचे संतोष फंडाचे (gratuity) , भविष्य निर्वाह निधीचे

पैसे मिळतील. या पैशातून असलेली बचत/ गुंतवणूक मोडीत काढण्यापासून काही काळ थांबू शकाल.

जर आपलयाला १. कोटी गृहकर्ज मिळू शकते याचा अर्थ आपली नोकरी टिनपाट नक्कीच नाही आणि आपले कौशल्य निम्न स्तराचे नक्कीच नाही.

तेंव्हा सहा महिने कळ काढा. सहा महिन्यात आपल्याला दुसरी नोकरी/ उत्पन्नाचा स्रोत नक्कीच मिळेल.

एकदा घेतलेले घर नुकसानीत विकले तर मिळालेल्या संधीचे सोने ( opportunity कॉस्ट) करण्याचाही आपली शक्यता शून्यावर येते.

आणि जसे वय वाढते तसे भविष्यात मोठे कर्ज मिळण्याची शक्यता कमी होत जाते. तांबडतोबी साठी पैसे लागले तर ते आपल्या मुदत ठेवीतून काढा कारण त्यावर ३० % कर जाऊन हि बचत ६ % च्या वर परतावा देत नाही आणि मुदत ठेव हि "अशाच प्रसंगासाठी" असते.

हे पैसे संपले कि असे शेअर्स विका जे मधल्या काळात जोरदार वाढलेले आहेत आणि आता थकले आहेत.

एक उदाहरण देतो . फायझर या कंपनीचे समभाग मी साधारण २०११-१२ च्या आसपास ८०० रुपयाला घेतले होते ते चढत गेले तसे २०२१-२२ मध्ये थोडे थोडे करत ४८००-५५०० या भावाला मी विकून टाकले. आज गेली चार वर्षे हा थकलेला शेअर ४१०० ते ६१०० या टप्प्यात फिरतो आहे.

आपल्याकडे असे अनेक उत्तम/ ब्लु चिप समभाग असतील जे असे टप्प्यात( range bound) फिरत असतील. ते आपण स्वतः अभ्यास करून त्याबद्दल मोह न बाळगता काढून टाका. याने आपल्याला अधिक काही महिन्याची मुदत मिळेल.

असे काही दिवस गेले कि आपोआप आपला प्रश्न सुटलेला असेल याची मला खात्री आहे.

घर ताबडतोबीने अजिबात विकू नका.

कारण तुम्हाला गरज आहे म्हटल्यावर भाव पाडूनच मागितला जातो. तुमची कठीण परिस्थिती हि इतरांची संधी असते.

थोडे थोडे करूनन विकलेले शेअर आपल्याला पुढच्या काही वर्षात थोडे थोडे करून परत घेता येतील

पण एकदा विकलेले घर परत घेणे तितके दुरापास्त होते शिवाय त्यावर लागणारे मुद्रांक शुल्क आणि इतर कर हे अक्षरशः पाण्यात जातात.

आपण जो काही निर्णय घ्याल तो पूर्ण विचाराअंती आणि शांत डोक्याने घ्या. नोकरी जायची पाळी आली कि माणसान्च्या मनात भीती ठाण मांडून बसते आणि त्यामुळे तारतम्य गमावण्याची शक्यता असते. पण जसे काही दिवस जातात तशी या स्थितीची सुद्धा माणसांना सवय होते आणि मग माणसे सारासार विचार जास्त चांगला करू शकतात. म्हंणून कोणताही निर्णय घाईने अजिबात घेऊ नका.

मी दिलेला सल्लाच सर्वोत्तम आहे असे कोणीही म्हणू नये. कारण तुमच्या समस्येचे पूर्ण आकलन मला झालेले असेलच असे नाही ( जरी मला तसे वाटले तरी ).

यासाठी अगदी गुंतवणूक सल्लागाराची सल्ला घेतला तरी तो एकांगी असण्याची शक्यता असतेच.

हे दिवस नक्की जातील आणि काही दिवसात तुम्हाला उत्पन्नाचा दुसरा स्रोत नक्की मिळेल याची मला खात्री आहे.

आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

चिखलू

अशी परिस्थिती आली की panic न होता थोडा cooling period जाऊ दिला की मग योग्य निर्णय घेता येतात. आणि ईथे तुम्हा सगळ्या अनुभवी लोकांच्या प्रतिसादांमुळे जरा अजुन विचार करुन पाउले टाकता येतात.