काथ्याकूट

"Honey, it's not about money"

Primary tabs

मागच्या आठवड्यात सलग ३ वेळा ३ वेगवेगळ्या लोकांकडुन तोच जुना डायलॉग ऐकला म्हणजे मला नाही ऐकवला कोणी. इन जनरल बोलण्याच्या ओघात मारला.
"पैशासाठी वेडी झालेली आहेत लोक हल्ली,
"पैशासाठी काहीही करतात , काय वाट्टेल ते,"
"पैसा जणु देवच झालाय आता, "
थोड्याफार फरकाने उन्नीस बीस इधर उधर पैशा संदर्भात तेच ते तेच ते
मनात विचारचक्र सुरु होण्यास इतकं trigger पुरे होतं.
खरचं ? लोक "पैशामागे" वेडी होतात ? पैशाने वेडी होतात ?
या सर्व मांडणीमध्ये काहीतरी गल्लत गफलत झालेली आहे असे मला वाटतेय. म्हणजे आपण सर्व मानवी समाज पैशाने संचालित होतोय असे म्हणणे थोडे चुकीचे खरे म्हणजे वरवरचे विधान आहे. माझा रोख आपल्या वर्तणुकीला संचालित पैसा करतोय का ?
मला असे वाटते की पैसा हे केवळ आणि केवळ साधन आहे. आपण सर्वांना हे मान्य करण्यास हरकत नसावी.
आपण मुलतः पैशाने नाही " भावनांनी" संचालित होत असतो.
एखाद्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा प्रियजनांनी अपमानित केलेले असेल तर तो त्याचा सुड उगवण्यासाठी त्यांच्याहुन जास्त पैसा मिळवुन तुमच्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ झालो आहे बघा या प्रेरणेतुन पैशाच्या मागे लागलेला असतो.
इथे वस्तुनिष्ठपणे बघितल्यास " पैसा " हा कुठे प्रेरणा देतोय ? त्यामागे असलेली असुया द्वेष ही भावना त्या माणसाला प्रेरीत संचालित करत आहे.
तसेच एखादा माणुस मुलतः भविष्यात संभाव्य कामधंदा गमावण्याच्या भितीने ग्रस्त असेल जी भिती अजुन खोल अशा उपासमारीने मरण्याची असेल त्याहुन मागे गेल्यास जगण्याची तीव्र इच्छा जी प्रत्येक सजीवात नैसर्गिक असते त्या प्रेरणेने असेल तर असा
मुलतः जगण्याच्या तीव्र लालसेने , मृत्युच्या तीव्र भितीच्या प्रेरणेने संचालित होत नाही का ? म्हणजे पैसा हे त्याचे जिवंत सुरक्षित उपासमार टाळण्याचे साधन आहे.
मुल प्रेरणा पैसा नसुन या सर्व वरील भावनाच आहेत नाही का ?
एक तुलना करुन बघण्याचा प्रयत्न करतो. समजा एक जगापासुन तुटलेला आयसोलेटेड आदिवासी टाइप समाज आहे एका बेटावर. जिथे आता पैसा हे विनिमयाचे साधन नाही मोरपीस हे साधन आहे किंवा मीठ किंवा शंख शिपले किंवा बकरी हे त्या समाजाने स्विकारलेले साधन आहे. आणि ज्याकडे हे जितके जास्त अधिक मोरपीस अधिक बकर्या इत्यादी ( हे सर्व वास्तवात करन्सी म्हणुन वापरले जात असत salary हा शब्द salt या currency वरुन आलेला आहे. ) तर असा झुलु बेटावरील मांडोरा नावाचा मुलगा मुखियाच्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी वेडापिसा झालाय आणि म्हूणुन पिसं गोळा करतोय यात मोर पीस हे motivating factor नसुन मांडोरा चे पिझी वरील प्रेम हे खरे motivating factorआहे.
काही लोक बघा नुकतेच एक मुकेश अंबानी यांचे सहकारी प्रकाश शहा ज्यांचा वार्षिक पगार ७५ करोड होता त्यांनी सर्व काही सोडुन त्याग करुन संन्यासाचा मार्ग स्वीकारला. तर त्यांची प्रेरणा जी अगोदर बाह्य जगातील यशासाठी पैसा हे साधन वापरणारी होती ती आता आंतरजगतातील उर्मी साठी पैसा त्यागण्याची झाली.
म्हणजे आजपर्यंत वेगवेगळ्या करन्सीज वेगवेगळ्या समाजानी वापरल्या. म्हणजे वेगवेगळी साधने वापरली. पण साधन इटसेल्फ स्वतः हा मुव्हींग फॅक्टर असु शकत नाही.
कधीच नसतो. म्हणजे एखादा जीवनात इतर काही कारणाने निराश झालेला व्यक्ती किवा रागावलेला व्यक्ती उदा. आपल्या मुलावर रागावलेला सर्व पैसा कुठल्यातरी संस्थेला दान करुन देतो असे आपण बघतो.
तर मुद्दा साधा आहे माझा की money by itself हा मुव्हींग फॅक्टर नसतो किंवा मानवी इतिहासात कुठलीच करन्सी कधीही motivating factor नसते. तर मानवी मुलभुत भावना याच सर्व कृतींना संचालित करत असतात.
उदा. The Dark Knight मधला जोकर त्याच्या हिस्शाचे पैसे जाळायला घेतो तो सीन बघा जोकर म्हणतो.
"All you care about is money. This town, it deserves a better class of criminal, and I'm going to give it to them". The famous closing line from the scene is, "It's not about money, it's about sending a message. Everything burns".
काही मंडळी उदा. एखादा शेटजी पैसा जमवण्याच्या छंदात नादात वेडापिसा होतो. म्हणजे त्यात ही motivating factor ही त्याची greedकिंवा लालसा असते. इथे ही fear and greed या सारक्या मुलभुत मानवी भावनाच सर्व काही संचालित करत असतात.
समजा या सर्व भावनांची पुर्ती ते साधन अंमलात नसेल इतर असेल व त्याने होणार असेल तर ते त्या त्या साधनांचा वापर आपल्या भावनांचा पाठलाग करण्यासाठी करतील
मला असे काहीसे वाटते
तुम्हाला काय वाटते ? money by itself हे एक motivating factor आहे.
की मुलभुत मानवी भावना या खर्‍या या सनातन खेळामागे आहेत.
दुसर्‍या शब्दात विचारायचं तर ये सब पैसो का खेल है या भावनाओ का खेल है ?

युयुत्सु

अर्थानामर्जने दु:खमर्जितानां च रक्षणे|
आये दु;खं व्यये दु:खं धिगर्था: कष्टसंश्रया:||

- पंचतंत्र

अर्थ - पैसा मिळवणे दु:खदायक आहे, मिळवलेल्या पैशाचे रक्षण पण दु;खदायकच आहे. (पैसा) आला तरी दु:ख आणि गेला तरी दु:ख. अशा या कष्टदायक पैशाचा धिक्कार असो...

गवि

भावनांओंको समझो.

"पैशासाठी काहीही करतात , काय वाट्टेल ते," किंवा तत्सम बोलताना देखील पैसा हा प्लेसहोल्डरच असतो. "आपल्या वाढत्या शारीरिक आणि मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी काहीही करतात लोक", किंवा "मनात येईल ते विकत घेता यावे यासाठीची ताकद कमावण्यासाठी वेडे होतात हल्ली लोक" असे म्हणण्याऐवजी ही एक बोलण्याची पद्धत.

पापी पेट का सवाल है, म्हणजे फक्त पोटच नसते. हृदय, मेंदू, प्लीहा, यकृत यांनाही पोषणाची गरज असतेच.

मुद्दा बरोबर आहेच. पण तो अर्थ ऑबवियस आहे इतकेच..

मारवा

माझ्या ओळखीतली काही उदाहरणे देतो

एक जण एका गुरुंचा आणि त्यांच्या विशाल आश्रमाचा सर्मपित असा शिष्य आहे. तो कमालीच्या प्रामाणीकतेने आणि श्रद्धेने आश्रमासाठी देणग्या गोळा करत असतो. म्हणजे एकदम १०० टक्के समर्पित ( माझ्याकडुन दरवर्षी एक ठराविक महीन्यात एक तरी पावती फाडुन नेतो ) त्याचे वर्षभर हेच आश्रमासाठी फंड गोळा करणे त्याचे अकाउंटींग करणे, नंतर त्याचे इतर विभागांना व्यवस्थित वितरण करणे हे काम तो माझ्या समोर तरी किमान १० वर्षापासुन करतोय. यात तो व्यकिगत इतका म्हणजे इतका निरीच्छ माणुस आहे की एक रुपया सुद्धा त्याने कधी स्वतःवर खर्च केला असेल तर शप्पथ.

दुसरा एक जण कमालीच्या गरीब परीस्थितीतुन वर आलेला आहे. बालपणात अनेक दिवस भुकेने व्याकुळ होऊन काढलेले आहेत. नंतर कष्ट करुन फारसे शिक्षण जरी घेऊ शकला नाही तरी त्याच्या व्यवसायात उत्तम जम बसविलेला आहे आणि प्रचंड पैसा कमावतोय आणि साठवलेला आहे. त्याला कुठलीही सुटी आली किंवा कामात ब्रेक आला तर तो प्रचंड अस्वस्थ होतो त्याची anxiety ट्रीगर होते. तो म्हणतो मी ज्या दिवशी काम केले नाही पैसा कमावला नाही किंवा त्या कामात लागलो नाही तर मला आपण उमासमारीने मरु पुन्हा गरीब होउ या पातळी पर्यंत भितीची भावना नकळत निर्माण होते.

तिसरा एक जन्मजात पिढिजात श्रीमंत आहे म्हणजे " सात पिढ्या बसुन खातील " कॅटेगरीतला पण त्याला एक झिंग एक नशा पैसा कमवण्याचीच आहे. तो स्वतः कधी हतबल होतो आपण फरफटत जातोय आणि आयुष्य एन्जॉय करु शकत नाही हे सर्व त्याला कळतं तसे बोलुनही दाखवतो पण त्याला त्या साधनाचीच जबरदस्त नशा झालेली आहे. आणि त्याचे म्हणणे त्याने एक हवीहवीशी वाटणारी किक वगैरे सुद्धा मिळते.

आता वरील तिघेही तसे पैशाच्याच मागे लागलेले आहेत. पण असे म्हणणे हे तितकेसे अचुक नाही. प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या आहेत. गंमत म्हणजे हे जितकं साहजिक आहे असे तुम्ही म्हणता तितके अनेकांना ते सहजतेने कळत नाही.
कैक भाबड्यांना तर पैसा हेच सर्व दुखाचे मुळ आहे असे प्रामाणीकपणे वाटते उद्या तो हटवला तर जणु स्वर्गच अवतरेल. किवा बार्टर एक्स्चेंज सात्विक होता तो पुन्हा आला तर बरे होइल. इत्यादी.
पैशाच्या मास्क मागील पैशाच्या पडद्यामागील मानवी भावनेचे तांडव बर्च्याचदा ऑबव्हीयस असुनही दिसत नाही जाणवत नाही.

गवि

कैक भाबड्यांना तर पैसा हेच सर्व दुखाचे मुळ आहे असे प्रामाणीकपणे वाटते उद्या तो हटवला तर जणु स्वर्गच अवतरेल. किवा बार्टर एक्स्चेंज सात्विक होता तो पुन्हा आला तर बरे होइल. इत्यादी.

हा हा... खरंय अगदी.. :-))

कंजूस

इंदोरीकर महाराज कीर्तन एका.

सर्व उत्तरे मिळतील.

युयुत्सु

money by itself हे एक motivating factor आहे.
की मुलभुत मानवी भावना या खर्‍या या सनातन खेळामागे आहेत.

असमाधानी व्यक्तीना पैसा motivating factor असू शकतो. मूलभूत मानवी भावना "तृष्णा" (डीझायर) आहे. ती भागविण्यासाठी पैसा कामी येऊ शकतो. काही लोक कधीच समाधान मिळवू शकत नाहीत. त्यांना थांबता येत नाही. त्यामुळे तुम्ही उल्लेख केलेले उद्गार ऐकू येतात.

भाबड्यांना तर पैसा हेच सर्व दुखाचे मुळ आहे असे प्रामाणीकपणे वाटते उद्या तो हटवला तर जणु स्वर्गच अवतरेल.

यामध्ये १ला वाक्यांश (पैसा हेच सर्व दुखाचे मुळ आहे) पूर्ण सत्य आहे - कारण व्यक्तीची उत्पादकता आणि तृष्णा यांच्यात ताळमेळ असतोच असा नाही. तृष्णा भागली नाही की दू:ख निर्माण होते.

"उद्या तो हटवला तर जणु स्वर्गच अवतरेल" - याच्याशी मात्र मी सहमत नाही. कारण पृथ्वीवर स्वर्ग कधीही नव्हता आणि कधी येईल असे वाटत नाही.

मारवा

समाधान ही फार complex भावना वाटते मला सर्वाधिक complex.
म्हणजे बघा मला आनंदी रहायचे असेल तर मी समाधान बाळगले तर मी कदाचित होईल. किंवा चला मला guarantee दिली की समाधान बाळग तू झालास आनंदी.
आता पहिला प्रश्न येतो मी हे जे काय स मा धा न आहे ही जी काय भावना आहे ती cultivate करू शकतो का ? म्हणजे एखाद्या bodybuilder ने muscles build करावे तसे मी हळू हळू समाधान build करू शकतो का ?
असे कुणालाही ही जबरदस्तीने समाधानी बनवता येते का ?
म्हणजे ज्या क्षणी मी "समाधानी" बनण्याचा किंवा योग्य शब्द "मानण्याचा" प्रयत्न करतो
हा प्रयत्नच by itself मला असमाधानी करत नाही का ?
म्हणजे एक तर नक्की आहे समाधान प्यार के जैसा है
समाधान किया नाही जाता हो जाता है
प्रेम.आणि समाधान हे उचंबळून आतून येतं किंवा येत नाही.
It can not be forced upon yourself.

अर्धवटराव

मनात जसे गरजा ठरवणारे इन्जीन असते तसेच गरजा इव्हॅलुएट करणांरे इन्जीन देखील असते. (याला आपण विवेक /शहाणपण म्हणूया.) दोन्हि इन्जीने आपापल्या परिने सतत फीडबॅक देत असतात. या इव्हॅलुएट फीडबॅक वर जर पुरेसं लक्ष्य केंद्रीत केलं तर गरजांची इंटेंसिटी कमी व्हायला लागते आणी त्या प्रमाणात समाधान बाणायला हातभार लागतो.

हे अगदी प्राथमीक स्तरावरचं विवेचन झालं.

मारवा

समाधान माना असे म्हणण्यातचं तुम्ही "माना" अशीच condition आहे. आणि यातच अ समाधानाच बीज पडून गेलेलं असतं.
मानणारा हा असमाधानीच असतो आपल्याकडे एक शब्द आहे मारून मुटकून किंवा मन मारून
मन मारून हे अशाच मारून मुटकून समाधानाच रुदन आहे.
यापेक्षा स्वाभिमानी बाणा मला आवडतो ज्यात नायक म्हणतो
या दिल की सुनो दुनियावालों
या मुझको अभी चुप रहने दो
मैं ग़म को खुशी कैसे कह दूँ
जो कहते हैं उनको कहने दो

ये फूल चमन मे कैसा खिला
माली की नज़र मे प्यार नहीं
हँसते हुए क्या क्या देख लिया
अब बहते हैं आँसू बहने दो
या दिल की सुनो ...

एक ख्वाब खुशी का देखा नहीं
देखा जो कभी तो भूल गये
माना हम तुम्हें कुछ दे ना सके
जो तुमने दिया वो सहने दो
या दिल की सुनो ...

क्या दर्द किसी का लेगा कोई
इतना तो किसी में दर्द नहीं
बहते हुए आँसू और बहें
अब ऐसी तसल्ली रहने दो
या दिल की सुनो ...

आमचा एक ड्रायव्हर आहे त्याच्या मोबाईल dp वर तो लिहितो
तुझ्यासारखी नाही तूच पाहिजेस

थोडी उथळ वाटतील उदाहरणे कदाचित its not about girl
कृपया तळमळ समजून घ्या.

गवि

दुःखाला सुख मानण्यात किंवा तुलना करून आहे त्यात आनंद मानणे म्हणजे समाधान नसून दुःख हे दुःख म्हणून मान्य करणे, सुख हे सुख म्हणून मान्य करणे. दुःखात असताना आपण सुखी नाही हे स्वीकारणे, सुखात असताना दुःखी नाही हे स्वीकारणे. सुख दुःख यांचे फेरे येत जात असतात हे स्वीकारणे, म्हणजे समाधान. अशी माझी व्याख्या.

मारवा

तुमची स्वतःची customised केलेली व्याख्या त्यातील ईमानदारी साठी आवडली.
मात्र क्लासिक समाधान म्हणजे हे मानले जात नाही.
माझ्या मते समाधान हा end result आहे.
समाधान ही आतून येतं एखाद्या फुलासारखं सहज उमलत किंवा त्याची कळी खुलतच नाही.
आणि ते आपलं आपलं शोधावं लागतं.
जमान्याची cinditioning मोडून धुडकावून आपल्या आतला गाभा धुंडाळावा लागतो.
जे काय आतून हवे त्याला pursue करता करता कधीतरी
नकळतपणे ते आपल्या आत उगवतं.

चित्रगुप्त

हे माझं अतिशय आवडतं गीत इथे बघून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. गायन आणि संगीत, दोन्ही हेमंतकुमार यांनी उत्कृष्ट दिलेलं आहे.
-- मात्र "माना हम तुम्हें कुछ दे ना सके" हे - "मांगा हुआ तुम कुछ दे ना सके" असं आहे (वाटतं).
-- लेख झकासच आहे आणि प्रतिसाद पण मननीय. खरेतर हा माझ्या आवडीचा विषय असून एकदोन मित्रांबरोबर बरीच चर्चा, वाचन, मनन झालेला असा आहे. मात्र सध्यातरी विस्तृत प्रतिसाद लिहीण्याचा उत्साह आणि ऊर्जा नाहीये. त्यामुळे इथेच थांबतो.
उत्तम लेखाबद्दल अनेक आभार.

सोत्रि

मुलभुत मानवी भावना या खर्‍या या सनातन खेळामागे आहेत.

नक्कीच, मुलभुत मानवी भावना (तृष्णा) ह्या मोटिवेटिंग फॅक्टर आहेत आणि त्यांच्या परिपूर्ततेसाठी पैसा हे साधन आहे.

पण दुर्दैवाने सांप्रतकाळात, पैसा साधन न राहता साध्य झाले आहे आणि त्यामुळे 'भावनाओ का खेल' न राहता 'सब पैसो का खेल' झाला आहे.
ह्याला कारणीभूत आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, 'कोणीही समाधानी असता कामा नये' हे ह्या अर्थव्यवस्थेचं ब्रीदवाक्य आहे.

सतत, काहीतरी कमी आहे आणि ते मिळवायचे आहे ही भावना आणि मिळवण्यासाठी लागतो पैसा असा चक्रव्यूह ह्या अर्थव्यवस्थेत तयार झाला आहे आणि तो भेदणं अशक्यप्राय होऊन बसला आहे.

- (मनीमाइंडेड) सोकाजी

मारवा

भांडवलशाही ने तृष्णा निर्माण केली नाही फार तर ती तृष्णेच्या इंधनावर चालते म्हणून तृष्णेला प्रोत्साहित करत सतत ज्वलनशील ठेवण्याचा प्रयत्न नक्की करते.
भांडवलशाहीपूर्व काळात सुद्धा तृष्णा होतीच आणि तेव्हा सुद्धा इतर घटक तिला प्रोत्साहित करत होतेच की.
तुम्ही पूर्ण तृष्णा त्याग केलेल्या साधूंच्या संघात सामील झाले तरी तेथे
महंत बनण्याची तृष्णा इतर साध्या संसारी चिल्लर तृष्णा पैकी कैक पट तीव्रतम बनून जाते.
तृष्णा बाह्य जगातील दिशा बदलून अंतर जगात फक्त वळते. तृष्णा अनंत अमर आहे. बाह्य एकवेळ सोडता येते पण अंतरजगता तील तृष्णा उदा. ideologies ची तृष्णा इ सुटणे अजून अशक्य.
तृष्णा संपवण्याची दमन करण्याची तृष्णा सर्वात शेवटची प्रबळ तृष्णा च नाही का ?
कवी ग्रेस म्हणतात तसे मला आवडते मी कडकडीत हाडाचा द्वैती मला माणसाचे उसळणे कोसळणे आवडते.

सोत्रि

भांडवलशाही ने तृष्णा निर्माण केली नाही

माझ्या प्रतिसादावर उपप्रतिसाद आहे असे गृहीत धरून उत्तर देतोय.

भांडवलशाही ने तृष्णा निर्माण केली असं माझ्या प्रतिसाद मी असं म्हटलं नाही. मुलभुत मानवी भावना (तृष्णा) ह्या मोटिवेटिंग फॅक्टर आहेत ह्यालाच सहमती दिली आहे.

'सब पैसो का खेल' झाला आहे ह्यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्था कारणीभूत आहे असं म्हटलं होत. पण त्याने भांडवलशाही ने तृष्णा निर्माण केली असं वाटत असेल तर ती माझी लेखनमर्यादा!

तृष्णा संपवण्याची दमन करण्याची तृष्णा सर्वात शेवटची प्रबळ तृष्णा च नाही का ?

त्यासाठी बुद्धाने मध्यममार्ग शिकवला आहे त्याच्या शिकवणूकीतून. त्याच्या चार आर्यसत्यांचा पायाच ही तृष्णा आहे.

- (तृषार्त ) सोकाजी

युयुत्सु

सतत, काहीतरी कमी आहे आणि ते मिळवायचे आहे ही भावना आणि मिळवण्यासाठी लागतो पैसा असा चक्रव्यूह ह्या अर्थव्यवस्थेत तयार झाला आहे

सहमत+++++

आयुष्य सुखमय होऊ शकते. असे माझे वैयक्तिक मत आहे.

तृष्णा ही प्रेरणा आहे तर मृगतृष्णा एक सापळा.

हिंदीतले प्रसिद्ध कवी गिरीराज काय म्हणतात बघा.(हिंदी बद्दल क्षमस्व)

यश है या न वैभव है, मान है न सरमाया;
जितना ही दौड़ा तू उतना ही भरमाया।

प्रभुता का शरण-बिंब केवल मृगतृष्णा है,
हर चंद्रिका में छिपी एक रात कृष्णा है

जो है यथार्थ कठिन उसका तू कर पूजन—
छाया मत छूना।

मन, होगा दु:ख दूना।

चित्रगुप्त

ही चर्चा आता (मानवाच्या / प्रत्येक व्यक्तीच्या) मोकाट सुटलेल्या भावना / चित्तवृत्ती समजून घेऊन त्यांवर ताबा मिळवण्यासाठी करण्याचे उपाय / प्रयत्न या दिशेने जाऊ शकते का ?

ये सब पैसो का खेल है या भावनाओ का खेल है
दोन्हीचं मिश्रण आहे, तुम्हाला एका नोकरीमध्ये महिना पाच लाख पगार दिला आणि सतत हॅरॅसमेंट असेल आणि दुसरीकडे चार लाख आणि चांगलं वातावरण असेल तर तुम्ही कोणतं निवडाल?
हेच व्यवसायाबाबतीत, आरोग्याच्या कारणास्तव जबाबदारी कमी केलेले लोक पाहिले आहेत.
पण म्हणून मी नोकरी करणारच नाही, किंवा व्यवसाय बंदच करेन असं करून चालणार नाही. दोन्हीचा समतोल महत्वाचा आहे, आणि हा समतोल प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. दोन्हीपैकी एकाचाच कोणाचा तरी 'खेल है' असं नाही होऊ शकत.

सुबोध खरे

तुम्हाला एका नोकरीमध्ये महिना पाच लाख पगार दिला आणि सतत हॅरॅसमेंट असेल आणि दुसरीकडे चार लाख आणि चांगलं वातावरण असेल तर तुम्ही कोणतं निवडाल?

येथे सज्जड पगारात थोडा पगार कमी झाला तर त्या माणसाला तेवढा फरक पडणार नाही

पण जर १ लाख रुपये पगार असेल आणि ३५ हजार इ एम आय जात असेल. तर त्या माणसाला ७५ हजाराच्या नोकरीवर खाली येणे परवडणार नाही.

शेवटी या गोष्टी फार सापेक्ष आहेत.

आम्ही लष्करात असताना एक विनोदी वाक्प्रचार प्रचलित होता.

तुमचा बॉस कटकट्या असेल तर तुमचे एक दीड वर्ष कठीण जातं ( तुमचे पोस्टिंग ३ वर्षात होते आणि बॉस चे २-३ वर्षात म्हणजे सरासरी वर्ष ते दीड वर्ष)

पण तुमची बायको कटकटी असेल तर आयुष्यच खडतर जातं.

शेवटी या गोष्टी फार सापेक्ष आहेत.
हम्म ते पण आहेच. पण शक्य असेल तर आणि तरच माणूस कटकटीच्या वर थोडे कमी पैसे निवडेल असं वाटतं.

विवेकपटाईत

ज्याच्यात पुरुषार्थ करण्याची क्षमता असते. हजारो लोकांचे पालन जो करू शकतो त्याच पुरषोत्तमाच्या घरी लक्ष्मी पाणी भरते.

अर्धवटराव

पैसा हा प्रोब्लेम नसुन कुठल्याह्री कारणाने का असेना, पण पैशाची गरज जाणवत रहाणे हा प्रोब्लेम आहे.
तसं बघितलं तर हा देखील काहि प्रोब्लेम नाहि म्हणता येत. गरज जाणवणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे.

पैसा म्हणजे संसाधनं आणी सेवेची हमी. आपल्याला हि हमी अमर्याद हवी कारण आपला मेंदु/मन जेंव्हा भविष्याचा विचार करतं तेंव्हा त्याला अनंत शक्यता दिसतात/डेफिनेट शक्यता दिसत नाहि. मुळात जीवनाचं स्वरुपच जर डेफिनेट नसेल तर मनाचा तरी काय दोष म्हणा.