जनातलं, मनातलं
छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.
Primary tabs
छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.
तो-आई,तांदळाची खीर कर ना!
"हात मेल्या दळभद्री कुठला!"
वडील दुसर्या गावी नोकरीवर होते.सुट्टीवर येताना रातराणीचा अपघात झाला.
मोठा मुलगा म्हणून जे काही सांगितलं ते करत गेला.
"बाई,आज आमच्या घरी चौदावा आहे,मी शाळेत येवू शकणार नाही".
न सांगता घरी राहीला असता तरी कुणी काही म्हणले नसते.
तांदळाची खीर वाढताना आईचा बांध फुटला. भर पंक्तीत त्याला बदडला.
लहान होता तरी मोठे व्हावे लागले.
उद्ध्वस्त घडी बसवायला अर्धे आयुष्य गेले.
अचानक,म्हातारी आई गेली.
तेरावा झाला,कोपर्यात बसून होता.
बाजुलाच खेळत असलेला त्याचा छोटा मुलगा आपल्या बहिणीला म्हणाला उद्या आई तांदळाची खीर करणार आहे.
ते त्याने ऐकले,तिरीमिरीत उठला,पोराला बदड बदड बदडले...
छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.....
खूपच खतरनाक लिहिला आहे कर्नल साहेब.
श्राद्धाचा स्वयंपाक ही एक स्वतंत्र पाककलेतील कला आहे. पण दुर्दैवाने या सर्व पदार्थांना श्राद्धाचे लेबल चिकटल्यामुळे अन्यवेळीस कधीच केल्या जात नाही त्या गोष्टी. मला स्वतःला तांदळाची खीर, डाळीचे वडे हे दोन्हीही फार आवडते पण शेवटचे कधी खाल्लेले ते आठवतही नाही आता.
कथा छान आहे. मात्र पालकांनी मुलाला मारल हे वाचून वाटले. मृत्यू अंत्येष्टी श्राद्ध इत्यादी सर्व धार्मिक संकल्पनातून तत्वज्ञान पूर्णपणे विस्मरणात गेले असल्यामुळे लोकांना ह्यातील गमक कळतच नाही असो.
विषयांतर नको. लिहित रहा
उत्तर भारतात तांदूळाची खीर केंव्हाही करतात. आम्ही श्राद्ध पक्षात आणि तिथी असेल त्या दिवशी ही म्हणजे वर्षातून चार पाच वेळा तरी खीर होतेच.
कथा छान आहे.
टोचणारी कथा.
कथेचं वर्तुळ चांगलं पूर्ण झालंय, पण जे आईने केलं तेच मुलाने तरी नव्हतं करायला पाहिजे, पण राग आणि दुःखाच्या भरात कशीही वागतात माणसे.
धाड धाड वाचत शेवटपर्यंत आलो आणि शेवटच्या वाक्याला घशात आवंढा दाटला.
बरेचदा बाहेरचा किवा दुसरा कुठला राग घरात मुलांवर निघतो पण पुढे काही वर्षांनी ते आठवले तरी नकोसे होते. असो. कथा आवडली.
छान तरी कशी म्हणायची कथा?
अप्रतिम लेखन
तोच आता मोठा झालायं. आजही मला भेटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न चिन्ह आजही मला दिसते. त्याची आई लहानपणीच न कळत्या वयात गेली. कशी गेली,केव्हां गेली या बद्दल कुणीच काही सांगत नाही. त्याला जाणून घ्यायची खुप इच्छा आहे.
लहानपणी मनावर विपरित परिणाम होईल म्हणून सांगीतले नाही,आता त्याच्याच मनाने आईची निर्माण केलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून कुणी सांगत नाही.
प्रश्नाची पुनरावृत्ती एवढाच कथेचा गाभा आहे. सत्य अनुभव,मलाही बरेच दिवस सतावत होता. आज बाहेर पडला.
सर्व वाचक ,प्रतिसादकांचे मनापासून आभार.
....
प्रतिसादात लिहिलंय. दुर्दैवाने त्या गोष्टीचा साक्षीदार असल्याने तो माझ्या कडे आशेने बघतो पण न तो स्पष्ट विचारू शकतो न मी बोलू शकतो.
निशब्द.
जबरदस्त लिखाण
हळवी करणारी कथा.मी जेमतेम ८ वर्षाची होते. मलाही तांदळाची खीर व उडदाचे वडे खूप आवडतात. लहानपणी भर पंक्तीत मीहि मस्त झालेत ग आजी म्हणताच आई, आजी व मोठी बहीण खाउ की गिळु नजरेनं पाहत होत्या. मला काहीच कळेना. आजोबा शांतपणे म्हणाले...श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं. दु:खाचे जेवण असतं ते. माझी आई व तुझी पणजी देवाघरी गेली होती आज. मग काय झाले ते कळलं. ....असो. तुमचे लेखन वाचून वाटले...मी नशीबवान निघीले.. कुणी बदडलं नाही...काळ आला होता पण...
खरे आहे. काही चांगल्या जुन्या परंपरा माणूस विसरत चाललाय. दुखवटा काढणे एक पद्धत आहे. चौदाव्याला ज्याने अंतिम संस्कार केला त्याला नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची.
लहान मुलांना कळत नसते. निरागस अबोध असतात. काहीही विचारतात. कालच माझी छोटी नात विचारत होती सावत्र म्हणजे काय?
हे सर्व, आणि भोजन बेत वगैरे या सर्वांचा उद्देश "आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत" याहीपेक्षा "आता नेहमीचे आयुष्य सुरू करा. कायम दुखवटा पाळत राहण्यात अर्थ नाही.." असा अधिक आहे.
दुःखात सहभागी आहोत हे तर आहेच. पण पुढचे अधिक महत्वाचे.
कथा छान आहे, मला श्राद्ध वगैरेच्या ठिकाणी जेवायला आवडत नाही. दुखी वातावरन असते त्यात जेवायचे? पण लोक तिथेही आग्रह करतात, पळूनही जाता येत नाही आणी नकारही देता येत नाही. :(
इतर कुठल्याही वेळी गेला नाहीत तरी चालेल पण मरणदारी आणी तोरणदारी जरूर जावे.या पाठिमागे मोठा उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी मानसिक, शारिरीक, भावनिक मदतीची गरज असते व समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीचे कर्तव्य समजले जायचे.
आता आशी वेळ आली आहे की स्वताचे कलेवर स्वताच खांद्यावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावे लागेल की काय वाटते...... इतका माणूस एकटा होत चाललाय.
पटलं तर बघा.
नऊशे लोकांच्या सोसायटीत जवळचे नातेवाईक सोडून नऊ लोक सुद्धा जमा होत नाहीत.
किमान शब्दात कमाल आशय.
एकदम भावनात्मक मांडणी.
मनापासून धन्यवाद.
या जेवणाला दु:खाचे वातावरण असू नये असे आमच्या गुरूजींनी एकदा मला व्यवस्थित पणे समजावून दिले. त्या नंतर माझे गैरसमज दूर झाले. श्राद्धाच्या वेळी पितरे येतात आणि जेवणार्यांच्या रुपाने (अन्न) ग्रहण करतात आणि वासनेतून सुटतात यावेळी पितरे आपल्याला आशिर्वाद देतात. जसे देव महत्त्वाचे तशी पितरे पण महत्त्वाची आहेत. कोणत्याही वडिलांना आणि आजोबांना आपल्या मुला नातवाचे वाईट व्हावे असे वाटत नाही. आपल्या वंशाचा विस्तार व्हावा प्रगती व्हावी हीच भावना असते.
त्यामुळे श्राद्धाच्या जेवणास नि:संकोचपणे आणि अगत्याने जावे. पितरां विषयी सुयोग्य भाव मनात आणावा त्यांना योग्य ती गति मिळावी यासाठी प्रार्थना करावी. त्यांचे आशिर्वाद मागावेत. आणि मनापासून जेवण करावे. त्यातच आपले आणि पितरांचे कल्याण आहे. आपल्या रुपाने कोण जेऊन जाईल हे आपल्याला माहित नसते. आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या फलानुसार ते घडते.
असे नसते ते तर आपल्या पुर्वाजांनी या परंपरा, विधी आणलेच नसते.
निनाद,
तुमच्या या संदेशाशी शंभर टक्के सहमत आहे. माणूस मेला तरी तो पुढल्या लोकात जिवंतच असतो. पोराबाळांना बडवायचा फुकट राडा केला की पितर दु:खी होतात.
पितर तृप्त होणारेत यांतच आनंद मानून श्राद्धाचे जेवण आनंदानेच करावे.
आ.न.,
-गा.पै.
अतिशय संतुलित आणी व्यवहार्य प्रतिसाद.
संस्कार,श्राद्ध इत्यादी समाज व्यवस्था होती काही प्रमाणात आजही आहे.
संगणकाचे उद्योग, प्रशिक्षण वर्ग काढताना सुद्धा पुजा पाठ करूनच सुरुवात करतात.
अनेक संतानी ,माउली,तुकोबाराय, एकनाथ, कबीरदास इत्यादींनी कर्मकांडावर ताशेरे ओढले असले तरी ते या पाठमागची मुळ भावनेचा आदरच करताना दिसले आहेत. उदाहरणार्थ,
बाईल सवासिण आई ।
आपण पितरांचे ठायीं ॥१॥
थोर वेच जाला नष्टा ।
अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥
विषयांचे चरवणीं ।
केली आयुष्याची गाळणी ॥२॥
तुका म्हणे लंडा ।
नाहीं दया देव धोंडा ॥३॥
जित्या माय बापा न घालिती अन्न |
मेल्या प्रेतावर करिती पिंडदान ||
पहा पहा संसाराचा कैसा आचारु |
जिता अबोला मा मेल्या उच्चारू ||
जित्या मायबापा न करिती नमन |
मेल्या मागे करिती मस्तक वपन ||
जित्या मायबापा धड गोड नाही |
श्राद्धी तळण-मळण परवडी पाही ||
जिंदा बाप ना पुजे,मरे बाद पुजवाय
मुठ्ठीभर चावल दे के कौवे को बाप बनवाय
वरील संत वचने आजच्या समाज व्यवहारावर टिका केली आहे .
काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला.
असो,कालाय तस्मै नमा:
कर्नलतपस्वी,
सहमत आहे. यांतला काही म्हणजे कम्युनिस्ट. त्यांना श्राद्धविधी बंद पाडायचे आहेत.
देवांच्या मूर्तींवरील मर्यादांचा उफराटा अर्थ सिख विकी वर आढळून येतो. संत नामदेव विठ्ठलाच्या मूर्तीस भावपूर्ण आळवायचे. त्यांच्या तोंडी बघा मूर्तीनिषिद्ध संवाद टाकलेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.sikhiwiki.org/index.php/Bhagat_Namdev_and_Idol_Worship
लगेच खाली गुरु ग्रंथसाहिब मधील अवतरण दिलं आहे. त्यात मूर्तीपूजेचा धिक्कार आजीबात केलेला दिसंत नाही. दैवी वचनांचा विपरीत अर्थ काढणे हा घोर अधर्म आहे.
आ.न.,
-गा.पै.
श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला प्रेम होतं त्या व्यक्तीची श्रद्धेने आठवण काढणे.
हा समारंभ दुःखाचा का समजतात हे समजले नाही.
उलट दहाव्याला किंवा तेराव्याला गोडाचे जेवण केले जाते याचा मूळ हेतू आता दुःख बाजूला ठेवून व्यवहाराला सुरवात करा आयुष्य हा एक सण आहे आणि आता तोंड गोड करून हा सण साजरा करा असे धर्मशास्त्र सांगते.
मृत्यू हे अटळ सत्य आहे. दोन दिवसापूर्वी माझा मामा (वय वर्षे ८७) निवर्तला. पण गेले वर्षभर तो अन्थरुणावर बेशुद्धावस्थेत खिळून होता. आता केवळ अस्तित्व संपले म्हणून तुम्हाला दुःख होणे हे साहजिक आहे परंतु हे दुःख किती कुरवाळत बसायचे ? तो गेला म्हणजे त्याचा प्राण मुक्त झाला म्हणून आनंद का करू नये?
बहुसंख्य वेळेस लोक काय म्हणतील याचा विचार करून दुःखाचा बाजार मांडला जातो.
पंजाबात "चौथ"करतात म्हणजे चौथ्या दिवशी सर्व जण गोडाचे जेवण करून व्यवहाराला लागतात. त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.
माझे वडील ८६ व्या वर्षी मेंदूत रक्तस्त्रावाने गेले. उत्तम स्थितीत असलेला मेंदू एक तासात निकामी झाला नि सहा दिवसात सर्व उपचार करूनही सर्व संपले.
लोकांच्या दृष्टीने ८६ वय होते म्हणजे गेले ते ठीक आहे.
आपण आमच्या दृष्टीने आयुष्यभराचा आधार गेला पोरके झाल्याची भावना आली. हे लोकांना कसे आणि काय समजणार?
अकाली निधन झाले तर अत्यंत जवळच्या माणसांना होणारे दुःख सुद्धा त्यांचे स्वतःचे असते. जरा लांबची माणसे सुद्धा हळहळ व्यक्त करून काम सुरु करतात मग दुःख कुरवाळत बसून राहणे हे कशासाठी?
पण अश्या दुःखद ठिकाणी लोक आग्रहाने जेवायला का घालतात हे कळत नाही.
आबा, अंतिम संस्कार हा प्रत्येक धर्मात प्रतिपादन केलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या धर्मशास्त्रानुसार हे कार्य करतात.
हिन्दू धर्मशास्त्रानुसार गरूड पुराण व इतर धर्मग्रंथात याचे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे.
कर्मकांडावर शास्त्रीय आधार कदाचित नसेल पण भावनिक नक्कीच आहे.
मी अनेकांचे मृत्यू बघितलेले आहेत. त्यापैकी अगदी सगळ्यात दोन-तीन दिवसातच बायको/नवरा/ मुले/ नातेवाईक/ मित्र वगैरे अगदी 'नॉर्मल' झालेले आहेत. कुणी भेटायला आले की तेवढ्यापुरता उमाळा येतो. आतल्या खोलीत गेल्यावर तो लगेच ओसरतो, आणि हे सगळे अगदी नैसर्गिक आणि आवश्यकच आहे. वर्षश्राद्ध वगैरे तर खूप काळानंतर होत असते. हिंदु संस्कृतीत प्रत्येक घटनेला 'उत्सव' म्हणून साजरा करण्याची परंपरा खूपच चांगली आहे.
प्रसंग कोणताही असो, 'आग्रहाने' जेवायला घालणे, यात जो जिव्हाळा असतो, तो बुफे मधे गर्दीत घुसून आपले आपणच डिशमधे घ्यायचे, गर्दीत कुठेतरी उभ्या उभ्या जेवायचे आणि निघून जायचे, यात मला तरी अजिबात अनुभवाला येत नाही.
वेळ आणी विस्मरण हे बहुतेक दुखांवरचे रामबाण उपाय आहे.
मृत्यूनंतर आयुष्य पूर्वपदावर येणे ही जगरहाटी. परंतू असामायीक मृत्यू हा सर्वात जास्त दु:खद व बराच काळ स्मरणात रहाते.
विशाल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मृत्यू हे विशी पंचविशीत एक सुदंर काव्य असतं
चाळिशीनंतर ते एक रुक्ष गद्य बनून रहातं
रामकृष्ण ही आले गेले त्याविना जग काय ओसची पडले? कुणी सदोदीत सूतक धरीले ? मग काय अटकले मज शिवाय?
जन पळभर म्हणतील हायहाय मी जाता राहील कार्य काय?
कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त भावना व्यक्त केल्यात!
माझ्याही नकळत काहीशा साश्रूनयनांनी हा प्रतिसाद लिहितोय....