दिवाळी अंक

दिवाळी अंक २०२५ - तो जिंकला : अ ट्रान्स्प्लांट स्टोरी - कथा

Primary tabs

तो जिंकला : अ ट्रान्स्प्लांट स्टोरी

दि. २४ जुलै : बुधवार

"सो, योर क्रिअ‍ॅटिनीन (creatinine) रीच्ड टू १४.२! मी कल्पना दिली होती की.. वाढायला लागलं की पटापट वाढतं. जोपर्यंत काही त्रास नाही, तोपर्यंत काही अडचण नाही. पण आता तुम्हाला माइल्ड लक्षणं दिसू लागली आहेत. आता अ‍ॅक्शन घ्यायला लागेल." डॉ. तरण रहेजा लॅब रिपोर्ट पाहता पाहता सांगत होते. "जीएफआर (GFR सुद्धा ०.६४७ इतका झालाय. म्हणजे फिल्टरेशन जवळजवळ बंद झालंय. म्हणजे टोटल किडनी फेल्युअरच." निलूकडे पाहत डॉ. तरण रहेजा उद्गारले.

त्यांच्यासमोर निलू, निलूचा नवरा भावेश, निलू-भावेशचा मुलगा गौरव आणि निलूचा भाऊ प्रतुल असे चौघे जण चिंतायुक्त मुद्रेने बसले होते.

डॉ. तरण रहेजा लॅब रिपोर्ट पाहता पाहता सांगत होते, त्याचबरोबर पेशंटच्या हिस्ट्रीची संगणकावर नोंद करता करत होते. प्रतुलकडे पाहत म्हणाले, "हाउ इज योर फ्रेंड? सुमुख .. राईट? दोन महिन्यांपूर्वी दाखवून गेला होता. “

" येस. ही इज ऑलराइट अँड डुइंग वेल” प्रतुल म्हणाला. सुमुख.. प्रतुलचा कंपनीतला जवळचा सहकारी आणि घनिष्ठ मित्र. त्याचे किडनी ट्रान्स्प्लांट डॉ. तरण मेहतांच्या टीमनं केलं होतं. त्याचं फॉलो-अप डॉ. तरण यांच्याकडे सुरू होतं.

डॉ. तरण रहेजा हे शहरातील विख्यात नेफ्रॉलॉजिस्ट, किडनी ट्रान्स्प्लांट तज्ज्ञ होते, शहरातील सर्वोत्तम नेफ्रॉलॉजिस्ट अशी त्यांची ख्याती होती. स्कॉलर, गोल्ड मेडलिस्ट, महत्त्वाच्या अनेक वैद्यकीय जर्नल्समध्ये पेपर प्रकाशित, कित्येक नामांकित हॉस्पिटल्समध्ये आणि संस्थांत पदाधिकारी. युथफूल, उत्साही टवटवीत .. रुग्णांशी मनमोकळा संवाद हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यामुळे फक्त रुग्णांशीच नाहीत, तर रुग्णांच्या नातेवाइकांशी, समाजातील अनेक घटकांशी जोडले गेले होते.

KTS001
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

डॉ. तरण यांनी निलू-भावेशला त्यांच्या सेक्रेटरी मारिया फर्नांडिस यांना भेटायला सांगितलं. मध्यमवयीन फर्नांडिस मॅ'मना भेटायला थोडा वेळ लागला. डॉ. तरण यांच्याकडे सीकेडी (क्रॉनिक किडनी डिसीज) रुग्णांची प्रचंड गर्दी असायची. डॉ. तरण यांच्या आधी फर्नांडिस मॅ'म पेशंट्सना हाताळायच्या. त्यांच्या बारीकसारीक शंकानिरसन करायच्या. अपॉइंटमेंट घेतली नसतानासुद्धा डॉ.ना भेटायचं असलं, तर दोन पेशंट्सच्या गॅपमध्ये अ‍ॅड्जस्ट करून द्यायच्या. मध्यमवयीन फर्नांडिस मॅ'म गेली १५-२० वर्षं डॉ. तरण यांच्या सेक्रेटरी म्हणून काम पाहत होत्या. छान मराठी बोलायच्या. त्या बहुधा गोवा-सिंधुदुर्ग भागातील असाव्यात. प्रचंड कार्यक्षमतेने काम करणाऱ्या फर्नांडिस मॅ'मशी निलू-भावेशची कायमच भेट व्हायची आणि खूप मदतही व्हायची. निलूची त्यांची खेळीमेळीची मैत्री झाली.

—---

भावेशला त्याचा जीवनप्रवास आठवला.

चार भाऊ आणि बहीण असं मोठं कुटुंब. भावेश लहान असतानाच - म्हणजे ६-७ वर्षांचा असताना वडिलांचं आकस्मिक निधन झालं. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जीवनाच्या जोडीदाराने अचानक एक्झिट घेतली, म्हणून आई शोकमग्न झाली. आता संसार करायचा कसा? हाती नवऱ्याच्या नोकरीतली किरकोळ बचत. लग्नानंतर तिला स्वतःला नोकरी करायची खूप इच्छा होती, संधीही मिळाली होती, पण वडिलांच्या आग्रहाखातर तिने गृहिणी बनून घर सांभाळलं. तिची नोकरी असती, तर त्या पैशात निभलं असतं. पण आता ? तिच्या सासरच्यांनी - म्हणजे भावेशच्या काकांनी यांना संभाळण्यात किंवा काही आर्थिक मदत करण्यात काही रस दाखवला नाही. आईचं डोकं काम करेनासे झालं.

मदतीला तिची आई धावून आली. तिला आणि मुलांना गावी घेऊन आली. स्वतःच्या घासातला घास तिने यांना दिला. मामांनीसुद्धा खूप सहकार्य केलं, आधार दिला. आईने प्राथमिक शाळेत नोकरी पकडली. तुटपुंज्या का होईना, पगाराची साथ संसार सावरायला धावून आली. शिकवण्या सुरू केल्या. बॅंकेची पिग्मी एजन्सी घेतली. रोज सकाळ-संध्याकाळ घरोघर, दुकानोदुकानी जाऊन पैसे गोळा केले. कमिशन वाढावं म्हणून लांबलांबच्या खातेदारांकडे पायपीट सुरू केली. तहान-भूक याचा विचार न करता पैशाला पैसा जोडला आणि पाचही पोरांना शिक्षण दिलं. पोरांना शिकण्यासाठी नातेवाईक, गावातले लोक, शाळा आदींनी सर्व प्रकारची मदत करत कुटुंबाच्या पाठीशी उभं राहून शिक्षणाला मदत केली.

kts0021
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

त्याचे दोन्ही मोठे भाऊ आणि बहीण शहरात जाऊन नोकरी करू लागले. धाकटा भाऊ श्रीरंग शिकतच होता. भावेश डिप्लोमा झाला आणि शहरात आला आणि एका मोठ्या कंपनीत जॉबला लागला. त्याचे भाऊ, बहीण याच शहरात नोकरीला लागले आणि आसपासच त्यांनी संसार थाटले. सगळं व्यवस्थित झालं. भावेशाचीही नोकरीत चांगली प्रगती सुरू झाली.

*****************************

घरात भावेशाच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. एका कौटुंबिक सोहळ्यात त्याने तिला पाहिलं. तिला पाहताक्षणी तो घायाळ झाला. लक्ष वेधून घेणारे मोठे निळसर घारे डोळे, सरळ लांब नाक, कंबरेपर्यंत येणारी वेणी, गोरा वर्ण, हसतमुख, व्यक्तिमत्त्वात सात्त्विकता झळकणारी. त्याने बहिणीला तिचं नाव विचारलं. "नीलांबरी.." काय परफेक्ट नाव आहे.. त्याने स्वतःच्या मनाशी संवाद केला. नीलांबर. निळं आकाश. शिवशंकराचं एक नाव. या निलंबराने आशीर्वादित केलेली ती नीलांबरी. तिला मागणी घातली तर करेल लग्न आपल्याशी? ती गोरीप्पान आणि आपण असे काळपट सावळे, आपण फक्त डिप्लोमा, तर ती द्विपदवीधर, आपण हे असे, आपल्या घरचे हे असे.. पण हो-ना हो-ना करत तिकडून होकार आला.

KTS003
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

तिच्या माहेरच्या नातेवाइकांमध्ये, भावंडांमध्ये ती सर्वांची लाडकी निलू होतीच, आता लग्नानंतर सासरी आल्यावरसुद्धा 'नीलांबरी'ने आता त्याच्या जीवनात निलू म्हणून प्रवेश केला. दोघांच्या सहजीवनात सुखाचा प्रवाह झुळूझुळू वाहू लागला. तिचा बँकेचा जॉब सुरूच होता. इथून बँकांची शाखा थोडी दूर पडायची, पण निलू वेळा मॅनेज करत सगळं व्यवस्थित सांभाळायची. सासूचा कडकपणा सहन करत, आज्ञाधारकपणे "होय, बरं" निभावून वाद टाळायची. दीड-दोन वर्षांत गौरवचा जन्म झाला. अतीव कष्टामुळे भावेशच्या आईचा स्वभाव कडक आणि हट्टी झाला होता. अशा सासूशी जुळवत, कठीण प्रसंग मोठ्या सहनशक्तीने पेलत निलू यशस्वी संसार करत होती. दीर, भावजया, नणंद यांच्याशी प्रेमाने वागत तिने सर्वांना आपलंसं करून घेतलं. गौरवच्या जन्मानंतर त्याच्या आजीच्या - म्हणजे भावेशच्या आईच्या स्वभावात फरक पडला. स्वभावातला कडकपणा नरमला. आजी नातवाशी खेळण्यात रमून जायची. पण ती अधूनमधून नेहमीच आजारी पडे. गौरवचं लालनपालन आणि आजीकडे लक्ष देणं यासाठी घरातल्या सर्वांशी चर्चा करून जॉब सोडायचं ठरवलं. ती ५-६ वर्षं सर्वांसाठीच सुखाची होती. सगळं छान चाललं होतं.

KTs004
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

मग सुरू झालं आईचं मोठं आजारपण. डॉक्टर, ऑपरेशन, हॉस्पिटल अशा फेऱ्या सुरू झाल्या. निलू सेवाशुश्रुषेची बाजू समर्थपणे सांभाळत होती. भावेशचे भाऊ, बहीण, वहिन्या वेळ पडली की मदत करत होतेच. चारेक वर्षांनंतर आईचं निधन झालं. कुटुंब सावरण्यासाठी कष्ट उपासणारं पर्व संपलं होतं.

आजी गेली, तेव्हा गौरव ९ वर्षांचा होता. तो शाळा, क्लासेस, खेळ यात रमत चालला होता. भावेश-निलूला थोडी मोकळीक मिळण्यास सुरुवात झाली. भावेशला वाचन, अभिनय, चित्रं काढणं अशा गोष्टीत रस होता, तर निलूला आध्यात्मिक क्षेत्रात रस होता. प्रवचनं ऐकणं, पठण करणं, भजनं करणं अशा गोष्टीत ती रमून जायची. तिला भावेशच्या आवडीत रस निर्माण झाला. दोघांनी मिळून एकांकिका, नाटक, अभिवाचन यात भाग घ्यायला सुरुवात केली. निलूला सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यामध्येही गती होती. संधी मिळेल तशी ती सूत्रसंचालन करू लागली. एकंदरीत दोघांची चांगलीच जोडी जमली. गुणी जोडपं म्हणून सर्वांना दोघांचं कौतुक होतं.

बारावी झाल्यावर गौरवने इंजीनियरिंगला अ‍ॅडमिशन घेतली. त्याचं शिक्षण चालू असताना दीड-दोन वर्षं झाली आणि भावेशवर अचानक संकट कोसळलं. त्याच्या कंपनीत नोकर कपात सुरू झाली आणि या लाटेत दुर्दैवाने भावेशनेही नोकरी गमावली. या कंपनीत नोकरी करून तीस वर्षं झाली होती, आता या ऑड वयात कुठे नोकरी शोधत बसायची? कोण नोकरी देईल आपल्याला? अचानक बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याने भावेशच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. घरच्यांनी चांगला मानसिक आधार दिला.

त्याला अचानक संधी चालून आली. त्याचे जुने सहकारी भावेसरांचा फोन आला.

त्यांच्या मित्राच्या - दिलीप पडवळ यांच्या फॅक्टरीत संधी होती. आठवड्यातील चार दिवस घरून काम होतं. उरलेल्या दिवशी गरजेनुसार विविध क्लायंटच्या फॅक्टरीत व्हिजिट करून त्यावर काम करायचं होतं. इंटरव्ह्यू वगैरे औपचारिकता संपवून तो कामावर रुजू झाला. दिलीप पडवळ स्वभावाने अतिशय चांगले होते. केली २०-३० वर्षं त्यांना इंडस्ट्रियल अनुभव होता. बोलण्यात नेमकेपणा होता. त्या फॅक्टरीच्या कामात ते खूप एफिशियंट होते. वेगाने टीमकडून डिझाइन करून घेण्यात त्यांचा हातखंड होता आणि डिझाइननुसार ते मॅन्युफॅक्चर करून क्लायंटच्या प्लांटमध्ये इन्स्टॉल करणं ही फॅक्टरीची स्पेशालिटी बनली होती जणू. दिलीप पडवळ यांच्याशी चांगली मैत्री जमली. काम सोडून इतर अनेक गोष्टींवर पडवळसाहेबांशी चर्चा करताना त्याला मजा यायची. एक वेगळाच बौद्धिक आनंद मिळायचा. बोलता बोलता ते छान मार्गदर्शनही करून जायचे. भावेश तिथे रमला.

तीन-चार महिन्यानंतर कोविडची महासाथ आली. औद्योगिक क्षेत्रातील अनेक गणितं बदलली. अर्थात पडवळ यांच्या फॅक्टरीला त्याची फारशी झळ बसली नाही. कामाच्या उपलब्धतेनुसार भावेश घरून काम करायचा. पण हा कॉन्ट्रॅक्टच्युअल जॉब असल्याने काम कमी झालं की पगार कमी असा यायचा. भावेशला आर्थिक कसरत करावी लागे. पण परिस्थिती जाणून घरचे सगळे त्याला सहकार्य करत होते. वाईट काळातही ही आशादायक गोष्ट होती.

kts005
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

दीड-दोन वर्षांत भावेशला प्रमोशन मिळून त्याचं पॅकेजही वाढलं. दरम्यानच्या काळात गौरवचं इंजीनिअरिंग पूर्ण होऊन इंटर्नशिपसुद्धा झाली. कंपनीत कन्फर्म होऊन पगारसुद्धा बऱ्यापैकी मिळायला सुरुवात झाली. दीड-दोन वर्षांत गौरवला प्रमोशन मिळून त्याचं पॅकेजही वाढलं. एखादं वर्ष झालं आणि लगेचच त्याने जाहीर केलं - मी आणि क्षितिजा आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे. क्षितिजा गेली पाच वर्षं त्याची गर्लफ्रेंड होती. अर्थात निलू-भावेशला याची कल्पना आली नव्हती. गौरवच्या अनेक मित्रमैत्रिणींमध्ये क्षितिजाही होती. अध्येमध्ये ती इतर मित्रांबरोबर घरीही यायची. तिच्या घरच्यांनाही जावई म्हणून गौरव पसंत होता. सर्व बोलणी होऊन विवाहसोहळा पार पडला. क्षितिजा आता सून म्हणून वाजतगाजत घरी आली. वैद्यकीय शिक्षणाची पार्श्वभूमी असणारी क्षितिजा लगेचच या घरची होऊन गेली. घराचा चौथा कोन परफेक्ट मिळाला, म्हणून नीलू-भावेश आणि सर्व जण सुखावले.

*********

गौरव-क्षितिजाच्या लग्नापूर्वी ४ वर्षांपूर्वी निलूच्या गुडघ्याला सूज आली आणि पुरळ आली. गुडघ्यासाठी अस्थितज्ज्ञ डॉक्टरना दाखवलं, त्यांनी तपासून औषधं दिली. आठवड्यानंतर गुडघ्यांची सूज आणि दुखणं कमी झालं, पण पुरळ काही कमी झाली नाही. त्यांनी त्वचारोगतज्ज्ञांना दाखवण्यास सांगितलं. त्वचारोगतज्ज्ञांनी औषधं, क्रीम्स लिहून दिली आणि रक्तातील क्रिअ‍ॅटिनीनचं प्रमाणही तपासायला सांगितलं. लॅब टेस्ट करून त्वचारोगतज्ज्ञांना दाखवल्या, त्यावर ते म्हणाले, "तुमचं क्रिअ‍ॅटिनीनचं प्रमाण १.८ म्हणजे जास्तच आहे, हे साधारण ०.६ ते १,३ असायला हवं. घाबरून जायचं कारण नाही. पण तुम्ही तज्ज्ञ नेफ्रॉलॉजिस्टला दाखवा."

नेफ्रॉलॉजिस्ट - किडनीतल्या नेफ्रॉन नावाच्या पेशींचे विशेषज्ञ. (नेफ्रॉन्सला मराठीत वृक्काणू असं म्हणतात.)

KTS006
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

जवळच्याच मोठ्या हॉस्पिटलचे प्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. तुषार खारके यांना दाखवलं. त्यांनी तपासणी करून १-२ गोळ्या लिहून दिल्या आणि तीन महिन्यांनी क्रिअ‍ॅटिनीन रिपोर्ट करून दाखवायला सांगितला. अशी ट्रीटमेंट दोन वर्षं घेतली. यादरम्यान क्रिअ‍ॅटिनीन प्रमाण वाढून १.८चं २.२ झालं. औषं घेऊनसुद्धा प्रमाण वाढत आहे, हे पाहून निलू-भावेश चिंतेत पडले. डॉ. म्हणाले, "काळजी करू नका. तुम्हाला कोणतीही मोठी लक्षणं नाहीत, रुटीन व्यवस्थित सुरू आहे. या एक-दोन गोळ्यांच या विकारावर आहेत. यांनी प्रमाण कमी झालं नाही, तरी खूप वाढलेलं नाही हे लक्षात घ्या. डोण्ट वरी." "मग डॉक्टर, आम्ही आयुर्वेदिक उपचार घेऊ शकतो का?" घेऊ शकता ना ! पण त्याचा मर्यादितच उपयोग होतो, असं आमचं निरीक्षण आहे."

निलूने अनुभवी एम.डी. आयुर्वेदतज्ज्ञांकडे उपचार घ्यायला सुरुवात केली. पथ्याचे आहार, दिनचर्या, आयु औषधं, त्याचबरोबर पंचकर्म असे उपचार घेतले. तब्यतेची कोणतीही तक्रार नव्हती. फ्रेश वाटत होतं. अशी दीड-दोन वर्षं गेली. एका तपासणीत क्रिअ‍ॅटिनीनचं प्रमाण ४.८ असं वाढलं. पुन्हा दोन महिन्यांनी हे प्रमाण ६.४ झालं. निलू पुन्हा चिंताग्रस्त. आयुर्वेदतज्ज्ञांच्या सल्ल्याने पुन्हा नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. तुषार खारके यांच्याकडे उपचार सुरू केले.

KTS007
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

किडनी स्कॅनमध्ये किडनी थोडी थोडी आक्रसलेली आढळली. त्यावर काही औषधं दिली. बाकी काही त्रास नव्हता. पण डॉक्टरांनी सजग केलं. "आगामी काळात तुमची किडनी निकामी होण्याची शक्यता आहे. वेळोवेळी मॉनिटर करा, काही लक्षणं दिसली, तर लगेच दाखवायला या."

पुढील काही महिन्यांत क्रिअ‍ॅटिनीन ८च्या वर आणि पुढे १०च्या वर गेलं. जीएफआर ( Glomerular Filtration Rate (GFR)सुद्धा कमी कमी होत चालला होता. आतासुद्धा काहीही लक्षणं नव्हती. डॉक्टरांनी क्रिअ‍ॅटिनीन वाढीचा ग्राफ काढला आणि म्हणाले, "तुमच्या किडनीज आता जवळजवळ निकामी झाल्यात. कधीही डायलिसिस करून घेण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला एव्ही फिस्टुला करून घ्यावा लागेल. ही एक छोटी सर्जरी असते." डॉक्टर आणखी पुढे म्हणाले, "ओपेक्स हॉस्पिटलचे डॉ. राहुल फटांगडे यांच्याकडे करू शकता. ते अनुभवी आहेत. आमच्यासाठी त्यांनी बरीच फिस्टुला केली आहेत."

डॉ. तुषार खारके यांच्या शिफारशीनुसार डॉ. राहुल फटांगडे यांना दाखवलं. हातावरील मनगटाजवळच्या नसा तपासून ते निलूला म्हणाले, "तुमच्या नसा फारच बारीक आहेत. इथे फिस्टुला होणं जरा कठीण दिसतंय मला. डायलिसिस करायला नसा मोठ्या असणं आवश्यक. इथे नीट झाला नाही, तर छाती किंवा गळ्याजवळ करावा लागेल. गळ्याजवळचा फिस्टुला त्रासदायक असतो. तिथे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या मनगटाजवळच्या नसा बारीक असल्या, तरी तुम्ही करून घ्या असं मी तुम्हाला सुचवेन. साधारण फिस्टुला एक-दीड महिन्यात मॅच्युअर - म्हणजे डायलिसिससाठी तयार होतो. तुमच्या फिस्टुलाला दोन महिन्यांच्या वर लागतील. मनगटाचे व्यायाम मात्र रोज जास्त वेळा करावे लागतील."

डॉ. राहुल फटांगडे यांच्या सुचवणीनुसार ओपेक्स हॉस्पिटलमध्ये डे-केअरला निलूला अ‍ॅडमिट करून सकाळी १० वाजता एव्ही फिस्टुला सर्जरी केली. सर्जरीला जास्तच वेळ लागत आहे, हे भावेश आणि गौरवला जाणवलं. सर्जरी करून ओटीबाहेर आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, "व्हेन्स बारीक असल्यामुळे जास्तच वेळ लागला. साधारणपणे पाऊण तास पुरतो. पण यांना दीड तास लागला. असो, डोन्ट वरी. परवा मला दाखवायला या. तपासून नंतर बॉलचे एक्सरसाइझ करण्याबद्दल सांगेन."

फिस्टुला वेळेत मॅच्युअर होण्यासाठी निलूने दोन दिवसांनंतर बॉलचे (हा बॉल स्पंजचा असतो. हातात धरून दाबायचा आणि सोडायचा, म्हणजे रक्तप्रवाह वेगात वाहून रक्तवाहिन्या रुंद होतात.) एक्सरसाइझ सुरू केले.

***********************************

हे सगळं घडत असताना निलूचा भाऊ प्रतुल, त्याची बायको मनश्री आणि निलूची आई नित्यनेमाने माहिती घेत होते. सर्व प्रकारची मदत करत होते. निलूच्या या आजारपणाचा आता ट्रान्स्प्लांटकडे प्रवास सुरू झालाय, हे प्रतुलच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्याने सुचवलं की नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. तरण रहेजा यांना दाखवून त्यांच्याकडेच उपचार घ्यावेत. दोन-तीन वर्षांपूर्वी प्रतुलचा घनिष्ठ मित्र सुमुखचं किडनी ट्रान्स्प्लांट डॉ. तरण रहेजा यांच्याच टीमने केलं होतं. त्या वेळी डॉ. तरण रहेजा आर्यन पारेख मेमोरियल हॉस्पिटलला होते. बिचारा सुमुख फक्त ३८ वर्षांचा होता. त्याचं किडनी फेल होणं हा त्याच्या पत्नीला आणि घरच्यांना फार मोठा धक्का होता. सुमुखाच्या आईनेच त्याला किडनी दिली होती. प्रतुल हा डायलिसिस ते ट्रान्स्प्लांट या प्रवासाचा साक्षीदार होता. यामुळे यातल्या उपाययोजना आणि टप्पे याची प्रतुलला इत्थंभूत माहिती होती! सुमुखच्या घरच्यांनी त्याला आर्यन पारेख मेमोरियल हॉस्पिटलला अ‍ॅडमिट केलं. तिथे डॉ. तरण मेहता यांच्या उपचाराखाली यशस्वी किडनी ट्रान्स्प्लांट झालं होतं. ट्रान्स्प्लांटनंतर सुमुख तीन महिन्यांनी कामावर जायला लागून आठ-दहा महिन्यांतच प्रोजेक्टसाठी दुसऱ्या राज्यात गेला होता. पहिल्यासारखा कार्यक्षम होऊन नोकरीत मोठी प्रगती केली होती. हे उदाहरण होतंच. त्यामुळे प्रतुल निलूताईला थेट डॉ. तरण रहेजा यांच्याकडेच घेऊन आला. डॉ. तरण रहेजा आता माईंडपर्ल हॉस्पिटलला जॉइन झाले होते.

माईंडपर्ल हे नावाजलेलं हॉस्पिटल. गेल्या ६०-७० वर्षांचा मेडिकल कॉलेज & हॉस्पिटल उद्योगाचा अनुभव गाठीशी असलेली. भारतात प्रमुख शहरात, देश-विदेशात मिळून सुमारे ३५-४० हॉस्पिटल्स असलेलं. वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक यंत्रणा असलेलं आणि 'दि हॉस्पिटल कंपनी' असं बिरुद मिरवत असलेलं!

KTS008
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

माईंडपर्ल हॉस्पिटलची नवी शाखा शहरात दोन-तीन वर्षांपूर्वीच प्रशस्त इमारतीत सुरू झाली होती, हायवेच्या पलीकडे.

भावेशच्या घरापासून साधारण १२-१३ कि.मी. दूर. कार्स, ट्रक, डंपर, टिप्पर अशा वाहनांच्या २४ तास हायवे वर्दळीचा. भावेशचं घर ते हॉस्पिटल ४-४ मोठे चौक. इथे ट्रॅफिक जाम नेहमीचं. हायवेहून जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या, आयटी पार्कची वाहनं जाणाऱ्या, गेल्या काही वर्षांत झालेले अनेक टॉवर्स, त्यातले रहिवासी, नवीन मॉल, हॉटेल, मल्टिप्लेक्स अशी वाहनवर्दळ. भावेशला हॉस्पिटलला पोहोचायला ३० ते ४० मिनिटं लागायची.

दि. २४ जुलै : बुधवार

मागच्याच आठवड्यात हॉस्पिटलला निलूचं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि डॉ. तरण यांची भेट घेतली. त्यांनी पहिले लॅब रिपोर्ट नजरेखालून घातले. डॉ. तुषार खारके यांनी दिलेली काही औषधं आणि आणखी काही नवीन औषधं सुरू केली. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्याने जुवोबीन हे इंजेक्शन सुरू केलं. पुन्हा रक्ताच्या तपासण्या करायला सांगितल्या. या तपासण्या या हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजी लॅबमध्येच करणं अनिवार्य होतं. या लॅबमधील रिपोर्ट डॉक्टरना थेट त्यांच्या संगणकात दिसणार होते आणि त्यानुसार त्वरित औषधयोजना करता येणार होती.

डायलिसिस सुरू करण्याच्या दृष्टीने रेनल पॅनल-१ चाचणीदेखील करण्यास सांगितलं. या चाचणीत शर्करेसह अनेक घटकांची तपासणी होते. यात इ-जीएफआर ( eGFR : किडनी फिल्टरेशन रेट) ज्यात किडनीच्या कार्याक्षमतेविषयी तपशील कळून येतात, जे पुढील उपाययोजनांसाठी महत्त्वाचे असतात.

दि. २५ जुलै : गुरुवार

डॉ. तरण यांनी लॅब रिपोर्ट तपासून आणि निलूची लक्षणं पाहून आगामी आठवड्यापासून डायलिसिस करण्याची गरज नमूद केली. “.. यू नीड डायलिसिस इमिडिएटली. अंगावर काढू नका. आधी एव्ही फिस्टुला करायला लागेल."

त्यासाठी AV Fistula या शस्त्रक्रियेबद्दल सांगायला सुरुवात केली. पण निलूच्या हातावर सर्जन डॉ. राहुल फटांगडे यांची केलेली शस्त्रक्रिया (डॉ. तुषार खारके यांच्या मार्गदर्शनाखाली) झाली, हे सांगितलं आणि हातही दाखवला.

"आधीच केलाय. डॉ. तुषार खारके यांच्या कन्सल्टन्सीने डॉ. फटांगडे यांनी केला होता."

डॉ.नी उजव्या हातावर केलेला फिस्टुला तपासला. इथला रक्तप्रवाह क्षीण होता. "धिस इज नॉट वर्किंग! कधी केलाय फिस्टुला? नाही उपयोग होणार याचा."

त्यांना पुरेसा रक्तप्रवाह जाणवला नाही. आता पर्म-कॅथ शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पर्म-कॅथ शस्त्रक्रिया केल्यानंतर काही तासांनी लगेचच डायलेसिस सुरू करता येतं. त्यासाठी त्यांनी त्यांच्याच टीममधील डॉ. सौरभ गुमास्ते (हेही अनुभवी नेफ्रॉलॉजिस्ट आणि सर्जन होते) यांना भेटायला सांगितलं.

KTS008
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

डॉ. सौरभ गुमास्ते यांनी पर्म-कॅथ शस्त्रक्रियेबद्दल माहिती सांगितली, त्याचे फायदे-तोटे नमूद केले, मनातील शंकानिरसन केलं. पहिला फिस्टुला अयशस्वी ठरल्यामुळे पर्म-कॅथ करणं अत्यावश्यक होतं, हे ठसवलं. डॉ. सौरभ पर्म-कॅथ सर्जरीचं समन्वयन करणार होते.

दि. ०१ ऑगस्ट : गुरुवार

पर्म-कॅथ इन्सर्शन ऑपरेशनसाठी सकाळी ९ वाजता भावेश, गौरव आणि निलू हॉस्पिटलला पोहोचले. अ‍ॅडमिट व्हायच्या औपचारिकता पूर्ण केल्या. जनरल वॉर्डमधली रूम घेतली होती. ऑपरेशनच्या आधीची औषधं देणं इत्यादी झाल्यावर साडेअकराला निलूला ओटीमध्ये नेलं.

दुपारी १ वाजता ऑपरेशन थिएटरमधून परत वॉर्डात आणलं गेलं. काही वेळात भूल उतरली.

तासाभराने हॉस्पिटल वॉर्डचे डॉ. चारुहास भेट देऊन विचारपूस करून गेले. आज संध्याकाळी डायलिसिस बेडची उपलब्धता बघून डॉ. सौरभ गुमास्ते यांनी संध्याकाळी ५ ते ७ असं डायलिसिसचं नियोजन केलं होतं. (पर्म-कॅथ रुग्णाला बसवल्यावर त्याच दिवशी डायलिसिस सुरू करता येतं.)

डायलिसिस प्रक्रियेच्या वेळी निलूचा रक्तदाब खालावला. यामुळे चक्कर यायला लागली. लगेच तिथल्या रेसिडेंट डॉक्टर्सनी मीठ-साखर-पाणी असलेलं ओ.आर.एस. सरबत प्यायला दिलं. मग रक्तदाब स्थिर होऊ दिला आणि त्या दिवसासाठी डायलिसिस बंद केलं. आज एक-दीड तासच डायलिसिस झालं होतं. डॉक्टरांनी सांगितलं, "पहिल्या वेळी असे त्रास होऊ शकतात, नंतर सवय झाल्यावर काही अडचण येत नाही."

बिल पेमेंट, इन्शुरन्स अ‍ॅप्रूव्हल असे सोपस्कार पार पडून घरी पोहोचायला रात्रीचे साडेअकरा वाजून गेले. इन्शुरन्स अ‍ॅप्रूव्हलसाठी गौरवची खूपच धावपळ झाली, फोनाफोनी, पाठपुरावा करावा लागला. दिवस धावपळीचा गेला ! आठवड्यातून तीन दिवस डायलिसिस करण्याचं नियोजन केलं गेलं. आता पुढच्या डायलिसिसला एक दिवसानंतर - म्हणजे शनिवारी रात्री ९ ते १ अशा बॅचला बोलावलं.

दि. ०३ ऑगस्ट : शनिवार

रात्री ९ ते १ ही वेळ बोअर वेळ होती. हॉस्पिटलमध्ये शुकशुकाट. रुग्णाला डायलिसिससाठी दाखल करायचं. जोपर्यंत बेड रिकामा होत नाही, तोपर्यंत वाट बघायची. डायलिसिस स्टाफ वेळा पाळायच्या अतोनात प्रयत्न करायचे, पण वेळेबाबतीत थोडंफार इकडेतिकडे व्हायचंच. गौरव त्याच्या ऑफिस लॅपटॉपसह. त्याच्या काही ऑनलाइन मीटिंग रात्री ११पर्यंत चालायच्या. डायलिसिस हॉलच्या बाहेरच्या बाकड्यावर नातेवाईक बसायचे. तिथेच बसून त्याला काम करता आलं. भावेशही सोबत होताच, त्याच्या पुस्तकासह.. त्याचं वाचन व्हायचं!

दुसऱ्या दिवशी डायलिसिस करताना अर्ध्या तासानंतरच रक्तात गुठळ्या झाल्या. त्यामुळे डायलिसिस बंद करावं लागलं. डॉक्टरांनी हिपॅरिन हे औषध इंजेक्शनमधून दिलं. हिपॅरिन हे रक्तात गुठळ्या होऊ नयेत म्हणून देतात. थोड्या वेळाने स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा डायलिसिस सुरू केलं. या व्यत्ययामुळे आजचं डायलिसिस तीन तासांचंच झालं, आज संध्याकाळपासून इकोस्प्रीन ही रक्त पातळ करणारी गोळी सुरू करायला सांगितली!

५ ऑगस्ट : सोमवार
तिसऱ्या वेळी ४ तासांचं डायलिसिस काहीही त्रास न होता पार पडलं.
नंतर त्रास कमी झाले. कधी खूप थंडी वाजायची, शरीरभर क्रॅम्प यायचे.

KTS009
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

सकाळी १२पर्यंत नीलू दोन पोळ्या, भाजी असं जेवण उरकून घ्यायची. आपलं वैद्यकीय क्षेत्रातलं काम संभाळून क्षितिजा घरी सर्व प्रकारची मदत करत असायची. आहाराची विशेष काळजी घ्यायची. हॉस्पिटलला जाताना सोबत भावेशचा डबा असायचा. पोहोचल्या पोहोचल्या डायलिसिस काउंटरवर आल्याचं रिपोर्टिंग करायचं. बेड मोकळा शिल्लक असेल, तर लगेच नंबर लागायचा. नाहीतर बाहेरच्या खुर्चीत बसून वाट पाहायला लागायची. भावेश तिथे शेजारीच बसायचा. डायलिसिसला आलेल्या अनेक रुग्णांचे नातेवाईक तिथं खुर्चीत बसलेले असायचे. वाचत किंवा मोबाइल बघत. ओळख झाली, तर गप्पाही व्हायच्या.

टेक्निशियनने नीलूला हाक मारली की ती डायलिसिस बेडवर आडवी पडून राहायची. टेक्निशियन पर्म-कॅथला डायलिसिसच्या पाइपची जोडणी करायचे. यंत्रणेवर सेटिंग करायची अन मग डायलेसिस सुरू. आता पुढचे चार तास त्याच अवस्थेत.

पुढील डायलिसिसच्या वेळी अध्येमध्ये कधी खूप थंडी वाजायची, ब्लॅंकेट अंगावर आलं की सुसह्य व्हायचं! तिथल्या अटेंडंट्सना थंडीचं सांगितलं, त्यानी येऊन अंगावर ब्लॅंकेट टाकलं. शरीरभर क्रॅम्प यायचे. क्रॅम्प सहनच करावे लागायचे. नंतर हे क्रॅम्प येणं कमी होऊन महिनाभरात बंदच झाले.

*****************************************

डायलिसिस सुरू करून दोन आठवडे झाले. आतमध्ये निलूचं डायलिसिस सुरू असताना भावेश बाहेर वेटिंगमध्ये बसायचा. तिथे काही पेशंटच्या नातेवाइकांशी त्याची ओळख झाली. एक होता राम दुबे. ३०-३५तला आयटी इंजिनियर. त्याच्या पत्नीचं डायलेसिस सुरू होतं. बहुधा त्यांचे सर्व नातेवाईक यूपीमध्ये होते. अटेंडंट म्हणून कायम राम दुबेच दिसायचा. हॉस्पिटलच्या वायफायवर नेहमी ऑफिस काम करत असायचा. लोड नसलं की भावेशशी आणि इतरांशी गप्पा मारायला यायचा. त्याच्या बायकोचं डायलिसिस गेलं दीड वर्षं सुरू होते. रामची किडनी तिला सूट झाली नव्हती. आता वेटिंगला होती,

आणखी एक गृहस्थ होते सुनील परब. त्यांच्या मुलाचं डायलिसिस सुरू होतं. ती एक ट्रॅजेडीच होती. मुलगा युरोपमधल्या एका मोठ्या कंपनीत कामाला होता. अचानक दोन्ही किडन्या फेल झाल्या. सुनील परब यांनी ताबडतोब त्याला भारतात बोलावून घेतलं. इथेच डायलेसिस सुरू केलं. त्यांच्या पत्नीची म्हणजे मुलाच्या आईने किडनी दिली. ट्रान्स्प्लांटनंतर अवघ्या २४ तासांनंतर ऑपरेशन फेल झालं. पुन्हा डायलेसिस सुरू करावं लागलम. हे ऐकून भावेश सुन्न झाला.

नंतरच्या भेटीत डॉ. तरण रहेजांनी किडनी ट्रान्स्प्लांट (केटी) चा विषय काढला. निलूला विचारलं, "आता तुमचं डायलिसिस तर सेटल होत आहे. पण डायलिसिस करत राहणं हा लॉँगटर्म उपाय असू शकत नाही. तुम्हाला किडनी ट्रान्स्प्लांटचा विचार करणं महत्त्वाचं आहे. घरी कोण कोण आहे? घरचं कोणी किडनी देऊ शकतं का?"

"माझी आई ७७ वर्षांची आहे, तिच्या मेडिकल कंडिशनमुळे ती देऊ शकणार नाही. माझ्या भावाचं म्हणजे प्रतुलचं एक मेजर ऑपरेशन झालंय चार वर्षांपूर्वी. त्यामुळे त्यालाही किडनी देणं शक्य नाही."
"आणि तुमचे मिस्टर?" भावेशकडे पाहत डॉ. तरण यांनी विचारलं.
"मी डायबेटिक आहे." भावेश उत्तरला.
"ओह! इज इट? किती वर्षांपासून?"
"मोअर दॅन ट्वेंटी इयर्स.. टु बी प्रिसाइझ, गेली २४ वर्षं!"
"ओह गॉड! कंट्रोल कसा आहे?"
"ठीक ठीक आहे."
"साधारण किती असते शुगर लेव्हल?"
"फास्टिंग १५० आणि पीपी २००च्या आसपास. यापेक्षा कमीही असते कधीकधी."
डॉ. तरण यांनी याची नोंद घेऊन तशी संगणकात नोंद केली. "काय काय त्रास होतात, काही ऑपरेशन्स झालीत का? हार्ट डिसीज आहे का?" अशी विचारणा करत त्या नोंद करत होते.
हे सगळं झाल्यावर ते उद्गारले, "आय थिंक, यू कॅन डोनेट!"

KTS010
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

भावेश अवाक झाला. " डॉक्टर, डायबेटिक रुग्ण किडनी डोनेट करू शकतो? माझ्या माहितीनुसार नाही करू शकत."
डॉ. तरण - "येस, भावेश. डायबेटिक मनुष्य किडनी डोनेट करू शकतो. हां, त्यात रिस्क असतेच. पण आम्ही अशा काही केसेस सक्सेसफुली हँडल केलेल्या आहेत. येस, यू कॅन डोनेट.. प्रोव्हायडेड यू आर फिट इन फ्यू मेडिकल टेस्ट्स." भावेश निःशब्द झाला. आपण निलूला किडनी देऊ शकतो?.. देऊ शकतो.. पण इतर फिटनेस टेस्ट्सचं काय? नाही फिट झालो, तर? विचारांच्या आवर्तात त्याचं मन गुंतून गेलं. 'आणि फिट झालो, तर? माझ्या निलूसाठी हे करू शकतोय!' या पॉझिटिव्ह विचाराने त्याला दिलासा मिळाला.
डॉ. तरण पुढं म्हणाले "भावेश, एक काम करा - डॉ. विक्रम धारूरकरांना भेटा. पण त्याआधी सांगा, व्हॉट आर योर ब्लड ग्रूप्स?"
" माझा B+ve आणि निलूचा O+ve."
"अर्रर्र.. अगर ये उलटा होता - मतलब तुमचा O+ve असता आणि यांचा B+ve असता, तर चालून गेला असता. पण आता?"
डॉ. तरण यांनी भावेशकडे पाहत सुस्कारा टाकला!

भावेशने याचा विचारच केला नव्हता. एकच ब्लड किंवा आपला O+ve युनिव्हर्सल असा गट असता, तर आपल्याला किडनी डोनेट करता आली असती.
आता पुढे काय? अशी शंका भावेशच्या चेहऱ्यावर दिसताच डॉ. तरण म्हणाले, "डोण्ट वरी. हो जायेगा. प्लाझ्मा एक्सचेंज प्रोसिजरने आपण ब्लड ग्रूप तात्पुरता बदलून घेऊन ट्रान्स्प्लांट करून घेतो. डिटेल तुम्हाला फर्नांडिस मॅम सांगतील."

***************************************************

"या " भारदस्त आवाजात डॉ. विक्रम धारूरकरांनी भावेश-निलूचं केबिनमध्ये स्वागत केलं.

डॉ. विक्रम धारूरकर हे ऑर्गन ट्रान्स्प्लांट या क्षेत्रातलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आणि किडनी ट्रान्स्प्लांटमधील २५ वर्षांचा अनुभव पाठीशी. सुरुवातीला कडक भासणारे डॉ. विक्रम रुग्णांना आपुलकीने हाताळत. आपोआपच त्यांच्याबद्दल आदर वाटायला सुरुवात होई.

“निलूच्या किडनी ट्रान्स्प्लांटसाठी मी किडनी द्यायला तयार आहे" असं सांगत "फिटनेससाठी तुम्हाला भेटायला सांगितलं आहे" अशी भावेशने सुरुवात केली.

सर्व रिपोर्ट पाहत डॉ. विक्रम "अच्छा, तुम्ही डायबेटिक आहात. अन मोअर दॅन ट्वेंटी इयर्स.. अवघड आहे." म्हणाले अन भावेशला चेकिंग टेबलवर घेत "कुठे काम करता, कशा प्रकारचं काम असतं, आधी कसली ऑपरेशन्स झालीत का?" असे अनेक प्रश्न विचारत गुंतवून ठेवलं. शिताफीने ग्लोव्हज घालत त्यांच्या गुदद्वारात बोट गोल फिरवून "प्रोस्टेट ग्लॅण्डस ओक्के आहेत." हे ऐकून गंमत वाटली भावेशला. प्रोस्टेट ग्लॅण्डस आपल्या शरीरात कुठे असते, हे बघायचा प्रश्नच नाही आला कधी. 'ओके आहे तर ओकेच की मग’ भावेश स्वतःशी म्हणाला. “गुड." असा शेरा मारत "उतरा" असा इशारा केला. भावेश समोरच्या खुर्चीत बसला.

"आपण किडनी डोनर म्हणून तुमच्या तपासण्या सुरू करू शकतो. तपासण्या महागड्या आहेत. तुम्ही जर डोनर म्हणून माघार घेतलीत, तर सर्व पैसे वाया जातील." पुढे म्हणाले, "आता महत्त्वाचं बोलू या. तुम्ही आधीच डायबेटिक आहात. २४ वर्षं फेस करता आहात. डायबेटिस जसजसा जुना होत जातो, तसतसे किडनीमधील नेफ्रॉन्स डॅमेज होत जातात. डायबेटिस हे किडनी फेल्युअरचं एक कारण असतं, याची तुम्हाला कल्पना असेलच."

KTS011
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

"आता तुम्ही तुमची एक किडनी पत्नीला दिल्यावर तुमच्या फेल्युअरचा धोका वाढेल. ट्रान्स्प्लांटनंतरसुद्धा समजा तुमच्या पत्नीच्या किडनी काही काळानंतर कमजोर झाल्या, तर एका घरात दोन किडनी पेशंट राहू शकतील, याचा पूर्णपणे विचार करून किडनी डोनेशनचा निर्णय घ्या. घरी मोठं कोणी असलं, तर त्याच्याशी बोलून ठरवा. कोणी डॉक्टर नातेवाईक असेल तर त्यांचाही सल्ला घ्या. यासंबंधीचे होऊ शकणारे अनेक धोके मी तुम्हाला आताच्या चर्चेत सांगितलेत. याचा पूर्णपणे विचार करून मगच निर्णय घ्या. भावनेच्या आहारी जाऊन घाई करू नका."

हे ऐकून भावेश मनातून हादरलाच. डॉ. विक्रम यांनी वर्णन केलेले सर्व धोके आपल्या बाबतीत घडलेले आहेत, याचं दु:स्वप्नच जणू त्याच्या डोळ्यापुढे तराळायला लागलं. आपल्या प्रिय निलूसाठी आपण अवयवदान करायला आपण उत्साहाने निघालो अन आणि आपल्याला हवं तसं घडलं नाहीच, तर.. काय लिहिलं असेल आपल्या नशिबात? असले सगळे प्रश्न त्याच्याभोवती फेर धरून नाचू लागले. निलूसुद्धा या आवर्तात होतीच. सुनील परब यांच्या मुलाची केस आठवली अन अंगावर शहरा आला! ती केस आठवली की त्याच्या मनावर मळभ दाटून यायचं. आपलं सगळं क्षितिज काळवंडून गेलंय, असं वाटायला लागायचं. नकारात्मकता दाटून आलेल्या भवतालात आपल्याही किडनी डोनेशनचं असं झालं, तर काय? असले विचार यायचे. भावेशला रात्रभर झोप आली नाही. हो किंवा नाहीच्या परिघावर त्याचा निर्णय घुटमळत होता. पहाटे कशीबशी झोप लागली.

आज शनिवार. आज उद्या निलूच्या डायलेसिसला सुट्टी. आता थेट सोमवारीच जायचं. गौरव-क्षितिजा एका कार्यक्रमानिमित्त शनि-रविवारी बाहेरगावी गेले होते. शनिवार सकाळची कामं करून झाली, जेवण झालं. मनातील विचारांची वावटळ काहीशी थंडावली होती.

त्याने पुस्तक काढलं. पहिली काही पानं वाचून झाली होती. पुढची पानं वाचायला सुरुवात केली. 'द हिरो ऑफ टायगर हिल' हे परमवीरचक्र विजेते कॅप्टन योगेंद्रसिंह यादव यांनी लिहिलेली ही आत्मकहाणी.

सैन्यात ग्रेनेडियर (बाँब फेकणारा) म्हणून वयाच्या १८व्या वर्षी भरती झालेला तरणाबांड योगेंद्रसिंह यादव याने कारगिल युद्धात महापराक्रम गाजवत टायगर हिल युद्धात विजय मिळवून दिला. कारगिल युद्धादरम्यान टायगर हिल या शिखरावर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला होता. हे शिखर ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या २१ जणांच्या तुकडीतील सर्व जण शत्रूच्या माऱ्याच्या टप्प्यात आल्यामुळे धारातीर्थी पडले. त्यातील यादव हे एकटेच वाचले. एका हाताची हाडं तुटलेली असताना आणि १६-१७ गोळ्या लागलेल्या असताना, पुढचा हल्ला अधिक सुनियोजितपणे करता यावा आणि या हल्ल्याप्रमाणे प्राणहानी होऊ नये, म्हणून शत्रूच्या ठिकाणाची माहिती सांगण्यासाठी ते आपल्या युनिटपर्यंत पोहोचले. या माहितीमुळे पुढचा हल्ला योग्य प्रकारे चढवून टायगर हिल हे मोक्याचं ठिकाण ताब्यात घेण्यास लष्कराला यश मिळालं आणि जीवितहानी टळली. या युद्धात ते जबर जखमी झाले. त्यामुळे त्यांना एक वर्षाहून अधिक काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं होतं.

त्यांना परमवीरचक्र मिळालं, तेव्हा त्यांचं वय होतं फक्त १९ वर्षं. आतापर्यंतचा सर्वात तरुण परमवीरचक्र विजेता.

KTS012
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

योगेंद्रसिंहचा थरारक लढा वाचताना भावेश त्यात हरवून गेला, पूर्णपणे भारावून गेला. एक साधा सैनिक देशासाठी प्राणपणाला लावतो, तर मी माझ्या प्रिय निलूसाठी का नाही जोखीम पत्करायची? प्रतिकूल तेच होणार, हे आताच का गृहीत धरायचं? अनुकूल होत असेल तर ती संधी का दवडायची? भावेशच्या मनात विचारांचं वादळ उठलं.. पण एका निर्णायक क्षणी त्याच्यातील सैनिक ठामपणे परिस्थितीला समोरा जायला उभा ठाकला.

भावेशचा मनोमन निर्णय झाला... किडनीदान करणारच! निलू, गौरव आणि क्षितिजाशी चर्चा करून ठामपणे हा निर्णय घेतला. निलूची आई, प्रतुल, मनश्री यांनाही कल्पना देण्यात आली. निलूच्या माहेरचे तिच्या पाठीशी होतेच. भावेशच्या भावंडांनाही हा निर्णय सांगितला.सर्वांनीच भक्कम आधार दिला.

डॉ. विक्रम यांच्या पुढील अपॉइंटमेंटमध्ये त्याने हा निर्णय त्यांना सांगितला. डॉ. विक्रम यांनी चर्चा करून खातरजमा केली.

"छान. ठामपणे निर्णय घेतला, त्याबद्दल अभिनंदन. चांगलंच होईल हा पॉझिटिव्ह विचार घेऊन तपासण्या करायला घेऊ या. ओके? ऑल दि बेस्ट."

ते डॉ. तरण यांना जाऊन भेटले. त्यांनी डोनर आणि रिसिव्हर दोघांसाठी फिटनेस टेस्ट्सची यादी दिली.

हे होतं प्री-ट्रान्स्प्लांट वर्क अप स्टेप - १.

प्री-ट्रान्स्प्लांट वर्क अप स्टेप - १

पहिली टेस्ट होती रेनल पॅनल-१ ही चाचणी. यात रक्ततपासणी ज्यात कॅल्शियम, शर्करा, सीबीसी, थायरॉइड, लिव्हर फंक्शन टेस्ट, एचआयव्ही, युरीन रुटीन अशा अनेक, एकूण १५-१६ चाचण्या होत्या.

भावेश आणि निलूने हॉस्पिटलच्याच पॅथ लॅबमध्ये सँपल दिलं आणि पुढील आठवड्यात इतर कोणत्या कोणत्या चाचण्या करायच्या यांचं नियोजन केलं, त्यानुसार अपॉइंटमेंट्स घेऊन ठेवल्या. याव्यतिरिक्त दिवसाआड तिचं डायलिसिस ठरवलेलं होतंच.

निलूच्या रेनल पॅनल-१ टेस्टमध्ये क्रिअ‍ॅटिनीन पातळी ६.८७ इतकी आणि GFR रेट ६.३ इतका होता.. अर्थात हे दिवसाआड डायलिसिसमूळे सुधारलं. रिपोर्टमध्ये ज्या काही कमतरता होत्याम त्यासाठी औषधं देण्यात आली.

भावेशच्या रेनल पॅनल-१ टेस्टमध्ये शर्करा पातळी आणि HbA1c या चाचण्या व्यतिरिक सर्व चाचण्या 'नॉर्मल' रेंजमध्ये आल्या. शर्करेसाठी डॉक्टर ट्रान्स्प्लांटच्या आधी आणि नंतर इंजेक्शन्स देऊन नियंत्रित करणार होते.

भावेशला प्रथम डोळ्यांची तपासणी करायची होती. दीर्घ मधुमेहामुळे डोळ्यांवर अनिष्ट परिणाम झाले असतील, तर डोनर म्हणून तो अनफिट झाला असता. नेत्रतज्ज्ञकडे जाऊन रेटिनोपॅथी टेस्ट करून माईल्ड DR (डायबेटिक रेटिनोपॅथी) असल्याचं आढळलं. पण यामुळे किडनी डोनेशनसाठी काहीच अडचण नव्हती. त्यामुळे त्यांनी 'फिट फॉर किडनी डोनेशन' असा रिपोर्ट दिला.

पुढची टेस्ट, डीटीपीए रेनल (DTPA Renal Scan) होती. डॉ. तरण यांनी त्या लॅबच्या नावाने तसं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं होतं.

रेनल स्कॅन ही एक न्यूक्लियर मेडिसिन टेस्ट आहे. यात किरणोत्सारी द्रव (रेडिओऍक्टिव्ह ट्रेसर) हाताच्या रक्तवाहिनीत सोडून आणि ट्रॅकिंग करून मूत्रपिंडाचं कार्य आणि शरीरातील टाकाऊ द्रव्यांचं मूल्यांकन केलं जातं. त्याचबरोबर मूत्रपिंड टाकाऊ द्रव्य किती चांगले गाळत आणि उत्सर्जित करत आहेत, याचं मूल्यांकन हों.

त्याकरिता भावेशला आणखी दूर असलेलं उपनगर गाठावं लागलं. अर्थात गौरवसुद्धा सोबत होताच. हे शहरातील एकमेव केंद्र असल्याने दोन दिवस आधी फोन करून अपॉइंटमेंट घ्यावी लागली. त्याचा नंबर लागायला दीड तास लागला. तत्पूर्वी त्याला भरपूर पाणी प्यायला सांगण्यात आलं. इंजेक्शन देऊन थोड्या वेळाने त्याला मोठ्या यंत्रामध्ये सोडून स्कॅन करण्यात आलं. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी इमेजेस अणि एक्सरे स्वरूपात मिळणार होते.

KTS013
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

किडनीचा आकार आणि कार्य पूर्णपणे व्यवस्थित आहे, कोणताही अडथळा नाही असा निष्कर्ष रिपोर्टमधून आल्याने हाही फिटनेस मिळाला.

पुढची टेस्ट - छातीचा एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड अ‍ॅब्डोमेन & पेल्व्हिस. या दोन्ही चाचण्या नॉर्मल.
नंतरची टेस्ट - इसीजी (अ‍ॅडल्ट) एकोकार्डिओग्राम - या दोन्हीही चाचण्या नॉर्मल.

निलूच्या बाबतीत छातीचा एक्स-रे,अल्ट्रासाउंड अ‍ॅब्डोमेन & पेल्व्हिस, इसीजी (अ‍ॅडल्ट) एकोकार्डिओग्राम या चाचण्यांमध्ये ट्रान्स्प्लांट ऑपरेशनच्या दृष्टीने काहीही अ‍ॅब्नॉर्मल आढळलं नाही. त्यामुळे हे रिझल्ट्स ओके आले.

निलूसाठी पॅप स्मिअर ही चाचणी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं निदान करण्यासाठी सांगितली होती, पण फायब्रॉइड झाल्यामुळे ८-१० वर्षांपूर्वीच तिच्या गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असल्याने वॉल्ट पॅप स्मिअर (सिप्टोपॅथॉलॉजी)मध्ये योनीच्या वरच्या भागातून (योनी व्हॉल्ट) नमुना घेऊन चाचणी केली गेली.
चाचणीत काहीही अ‍ॅब्नॉर्मल आढळलं नाही. त्यामुळे हे रिझल्ट्स ओके.

प्री-ट्रान्स्प्लांट वर्क अप स्टेप - २

या पहिल्या टप्प्यातील सर्व चाचण्यांत फिट झाल्यानंतर चाचण्यांचा पुढचा टप्पा प्री-ट्रान्स्प्लांट वर्क अप स्टेप - २ सुरू झाला. या महागड्या चाचण्या होत्या CMV-IGG आणि VRDL (Quantitative) RPR रक्ताच्या या दोन्ही चाचण्यांसाठी भावेश आणि निलू दोघांच्याही रक्ताचे नमुने दुसऱ्या विशेष लॅबमध्ये पाठवण्यात आले. हे दोन्ही रिपोर्ट नॉर्मल आले. या रिपोर्टमध्ये काय लिहिलंय, हे भावेशला समजलंच नाही.. अर्थात तो डॉक्टरांचा प्रांत होता. "अरे, ये भी रिपोर्ट ओके हैं." असा डॉ. तरण यांचा शेरा ऐकून भावेश निर्धास्त झाला.

पुढची टेस्ट होती सीटी रेनल अँजिओग्राफी. मूत्रपिंडांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या तपशीलवार अभ्यासप्रतिमा तयार करण्यासाठी हा सीटी स्कॅन केला जातो. यात कॉन्ट्रास्ट डाय वापरून मूत्रपिंडाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज, धमन्या अरुंद होणं अशा गोष्टी शोधता येतात.

भावेशच्या रिपोर्टमध्ये एका धमनीला किंचित कॅल्सिफिकेशन झाल्याचं आढळून आलं. याव्यतिरिक्त सर्व काही नॉर्मल होतं.

डॉ. विक्रम यांनी या रिपोर्टचा अभ्यास करून कॅल्सिफिकेशनचे काय परिणाम होऊ शकतात आणि त्यावर काय उपाय असतात हे सविस्तरपणे सांगितलं. या कॅल्सिफिकेशनसह किडनी डोनेशन करू शकतो, हे समजावलं.

डॉ. तरण आणि डॉ. विक्रम यांनी सर्व रिपोर्ट्सचा अभ्यास करून चाचण्यांचा पुढचा टप्पा सुरू करायला हरकत नाही, असं भावेशला सांगितलं.

एकापाठोपाठ सर्व रिपोर्ट्स ओके येत आहेत, हे पाहून भावेश-निलूसह सर्वांचा हुरूप वाढत चालला होता.

आता पुढच्या ज्या चाचण्या करायला लागणाऱ्या होत्या, त्याला कायदेशीर प्रक्रियेनुसार अर्ज करूनच कराव्या लागणार होत्या. त्यासाठी ट्रान्स्प्लांट कोऑर्डिनेशन डिपार्टमेंटच्या लीगल ऑफिसर रश्मी माळवदे यांना भेटण्यास सांगितलं.

ट्रान्स्प्लांटसंबंधीच्या लीगल प्रोसिजर -

पुढेच असलेल्या रश्मी माळवदे यांच्या केबिनमध्ये भावेश, निलू आणि गौरव यांनी प्रवेश केला. लॅपटॉपवर काम करता करता त्यांनी "बसा" असा इशारा केला. भावेशने "किडनी ट्रान्स्प्लांटसंबंधीच्या लीगल प्रोसिजरसाठी तुम्हाला भेटायला सांगितलं आहे" अशी सुरुवात केली. त्यांनी पेशंटच्या - म्हणजे निलूच्या तब्येतीची चौकशी केली. वैद्यकीय बाबी बोलून झाल्यावर डोनर कोण आहे, तुमचं नातम काय अशी चर्चा करत भावेशच्या सर्व कुटुंबाची - म्हणजे भाऊ, बहीण, आई, वडील यांची सर्व माहिती घेऊन एक फॅमिली ट्रीचं चित्र काढलं आणि कोणाकोणाची कुठली कुठली कागदपत्रं द्यायला लागतील, याची यादी लिहून दिली. त्याचबरोबर २० फोटो, ज्यावर फोटो काढल्याचा दिनांक असेल, तेसुद्धा लागणार आहेत असं सांगितलं. हे फोटो वेगवेगळे फॉर्म्स सबमिट करताना त्यावर लावणं आवश्यक असतं, हे सांगितलं. "सर्व व्यवस्थित कळलं आहे ना? " अशी विचारणा केली. "काही शंका असेल तर मला कॉल किंवा मेसेज करा. आणि मुख्य म्हणजे हे सर्व डॉक्युमेंटेशन वेळेत पूर्ण करा" असं सांगत त्यांचा संपर्क क्रमांक दिला.

KTS013
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

उत्साही, तडफदार आणि इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्त्वाच्या रश्मी मॅडम अवयवदान या क्षेत्रातील १५-२० वर्षं अनुभवी होत्या. अनेक यशस्वी अवयवदान केसेसमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. झोनल ऑर्गन ट्रान्स्प्लांटच्या समितीत त्या समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. अनेकदा त्यांचं नाव पेपरमध्ये छापून आलं होतें. जसजसा या ट्रान्स्प्लांटनिमित्त त्यांच्याशी संबंध येत गेला, तसतसं त्यांचं व्यक्तिमत्त्व आणखी उलगडत गेलं. त्यांच्या तोंडून मेंदूमृत व्यक्तींचे अवयवदानाबद्दलचे अनुभव ऐकताना डोळे पाणावून जायचे. त्यांनी आधी अभिनय आणि कलाक्षेत्रातील काम केलं असल्याने हा विषय निघाला की त्यांच्या गप्पा रंगायच्या. भावेश-निलूच्या कलाविषयक अ‍ॅक्टिव्हिटीज ऐकून या जोडीविषयी त्यांना कौतुकच होतं.

रश्मी माळवदे यांच्याकडून पुढील चाचणीसाठी - म्हणजे HLA मॅपिंग टेस्टसाठी हॉस्पिटलने ऑथोराइज केलेले फोटोसह फॉर्म्स घेतले.

HLA मॅपिंग टेस्ट (Human Leukocyte Antigen (HLA) मानवी ल्युकोसाइटअँटीजेन्स (एचएलए) हे पेशींच्या पृष्ठभागावर आढळणारं प्रथिन आहे, जे रोगप्रतिकारक शक्तीला शरीराच्या स्वतःच्या पेशी आणि प्रत्यारोपित अवयवाच्या परक्या पेशी एकमेकांशी कितपत जुळवून घेऊ शकतात, हे शोधण्यासाठी ही चाचणी केली जाते. यासाठी भावेश-निलूच्या रक्ताचे नमुने घेऊन दुसऱ्या शहरातील विशेष लॅबमध्ये पाठवण्यात आले.

निलूसाठी १) CDC-XM (Complememt Dependant Cytotoxicity), २) HLA Mapping test set for KT Recipient आणि ३) SAB (Single Antigen Bead Assay) या टेस्ट्स केल्या. अर्थात या खूप महागड्या टेस्ट्स होत्या आणि त्या ओके आल्या.

याचबरोबर भावेश-निलू पतिपत्नी आहेत हे सिद्ध करण्यासाठी मुलगा गौरव याचीही DNA डीएनए टेस्ट करण्यासाठी त्याच लॅबमध्ये रक्तनमुने पाठवण्यात आले.

वरील दोन्ही चाचण्यांचे निष्कर्ष 'ओके' असे आल्याने केटी मीटिंगसाठी रश्मी माळवदे यांनी नमूद केलेली सर्व कागदपत्रं, प्रतिज्ञापत्रं पूर्ण करण्याच्या मागे भावेश लागला.

प्रतिज्ञापत्र आणि पोलीस पडताळणी

दुसऱ्या दिवशी भावेश पोलीस स्टेशनला पोहोचला. पीसीसी ( Police Clearance Certificate ) अर्थात पोलीस पडताळणी विभाग एका कोपऱ्यात होता. ७-८ वर्षांपूर्वी तो इथेच आला होता, हे त्याला आठवलं. आता या वेळी विभागात कोणीही नव्हतं. शेजारी चौकशी केली असता विकास भराडेसाहेब किंवा त्यांच्या साहाय्यक सीमा खेडकर मॅडम हे काम पाहतात आणि सकाळी रोज साडेदहा ते साडेबारा या सुमारास उपस्थित असतात, असं सांगितलं गेलं. तिथे त्यांचे फोन नंबरसुद्धा लिहिले होते. पण फोन केल्यावर उचलत नाहीत, असा अनुभव त्याला आला. दोन-तीनदा चकरा झाल्यावर एकदाचे भराडेसाहेब भेटले.
भराडे साहेब - "पीसीसी कशासाठी हवंय?"
भावेश - पत्नीचं किडनी ट्रान्स्प्लांट ऑपरेशन आहे. मी डोनर आहे. त्याच्या लीगल प्रोसेससाठी."
भराडेसाहेब - "हॉस्पिटलचं लेटर आणलंय?"
भावेश - "हो. हे पहा."
हॉस्पिटलचं लेटर पाहत, भराडेसाहेब - "यात किडनी ट्रान्स्प्लांट कुथे लिहिलंय?"
भावेश - "हे काय, इथे रेनल (Renal) ट्रान्स्प्लांट लिहिलंय ना."
भराडेसाहेब - "हे नाही चालणार. किडनी ट्रान्स्प्लांट असा स्पष्ट उल्लेख हवा."
भावेश - "साहेब, रेनल म्हणजेच किडनी.."
भराडेसाहेब - "अस्सं?"
भावेश - "हो. किडनी आपल्या नेहमीच्या भाषेत म्हणतात, पण वैद्यकीय परिभाषेत रेनलच म्हणतात. तुम्ही चेक करून बघा."
भराडेसाहेब - "ते ठीकाय. पण आणा की लिहून हॉस्पिटलकडून.. वाटल्यास कंसात नमूद करून.. नायतर मोठे साहेब मंजूर करणार नाहीत."
भावेश - अहो पण.. तिथल्या मॅडम म्हणाल्या होत्या की हुटा (ह्यूमन ऑर्गन ट्रान्स्प्लांट अ‍ॅक्ट)नुसारच हे लेटर दिलंय."
भराडेसाहेब - "ते काही सांगत बसू नका. त्या मॅडमना सांगा, पोलिसांनी असं असं लिहून मागितलंय."
भावेश - "ठीक आहे.. पाहतो विचारून त्यांना."

भावेशचा नाइलाजच झाला.

KTS0014
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

पुढच्या वेळी माईंडपर्लला पोहोचल्यावर त्याने रश्मी मॅडमना गाठलं.

रश्मी मॅडम - "असं लिहून मागितलंच कसं? अहो, आम्ही जी काही लेटर्स देतो, ती कायद्यानुसारच देतो. या सगळ्या प्रोसिजर्स डॉक्युमेंटेड आहेत. यासाठी आमच्या मीटिंग्ज होतात पोलीस खात्याबरोबर. आमची आपली धडपड असते पेशंट्ससाठी अगदी नेमक्या आणि कमीत कमी प्रोसिजर ठेवायच्या.. त्या पोलीस अधिकाऱ्यांनाच सांगा, हॊस्पिटल असलं लेटर देणार नाही म्हणून. काही कटकट केली, तर माझ्याशी फोनवर बोलायला सांगा. मीच त्यांना नीट समजावून सांगते. नाहीतर कमिश्नरकडे तक्रार करावी लागेल. एकेक भेटतात ना असे!"

पुढच्या वेळी भराडेसाहेबांना हे सगळं सांगितलं. काहीसा विचार करत ते म्हणाले, "ठीकाय.. हे चालेल. काही प्रॉब्लेम आला तर बघू. मी सांगतोय ती कागदपत्रं दोघांच्याही ऑनलाइन अर्जाला जोडा अन झालं की अर्ज प्रिंट करून कागदपत्रांच्या दोन दोन प्रिंट आणि ओरिजनल घेऊन या."
भावेश - "कोणत्या प्रकारचा अर्ज करायचा साहेब?"
भराडेसाहेब - "ते तुम्हाला ई-सेवा केंद्रवाले सांगतील. कोणत्याही केंद्रात जावा आणि अर्ज करा."

पडत्या फळाची आज्ञा घेऊन तो निघाला.

रश्मी मॅडमनी सांगितलेलं त्याला आठवलं. "ऑनलाइन प्रोसिजरसुद्धा अपडेट झाल्यात. वैद्यकीय अर्थात ट्रान्स्प्लांटसाठी कोणता अर्ज करायचा, ते नीट चौकशी करून भरा. चुकीचा अर्ज भरला, तर प्रोसेस पुन्हा करून उशीर लागेल." भावेशने दोन-चार ई-सेवा केंद्रात चौकशी केली. त्यांना असा वेगळा कोणता अर्ज आहे याची कल्पना नव्हती. ते आपले नोकरीसाठी पडताळणी हाच फॉरमॅट सांगत होते.

"नाव काय तुमचं?" भावेशने चौकशी केली. "पांडुरंग जगदाळे.. पांडूदादा."

त्यांनी सगळी कागदपत्रं त्या दादांना दिली. ती सगळी अपलोड करून ओटीपी टाकणं वगैरे प्रोसिजर करून तो अर्ज प्रिंट करून भावेशच्या हाती सुपुर्द केला. पोलीस स्टेशनला भावेशच्या पुन्हा एक-दोन चकरा झाल्या. भराडेसाहेब जागेवरच नसायचे. त्यांना एका नवीन सरकारी उपक्रमासाठी तैनात करण्यात आल्याने जागेवर नसायचे. खेडकर मॅडमसुद्धा जागेवर नसायच्या. नंतर त्याला कळलं की मॅडम दीड-दोन महिन्यांसाठी नाशिकला ट्रेनिंगला गेल्या होत्या. शेवटी भेटले एकदाचे भराडेसाहेब. कागद तपासून म्हणाले, "तुमच्या मिसेसचं लग्नानंतर नाव बदललं आहे, नाही का? त्याचं गॅजेट डिक्लेरेशन केलं असेल ना? मग ती पण कागदपत्रं लावा ना अर्जाला."
"साहेब, पण तुम्ही दिलेल्या यादीत हे नव्हतं.."
"ठीक आहे ना, मी विसरलो असेल, पण तुम्हाला तरी सुचायला पाहिजे ना? हे तर लागेलच की. अर्जासोबत आता नेम चेंज गॅजेटसुद्धा अपलोड करून या." भावेश ओशाळला. हे आपल्याला कसं सुचलं नाही? परत झक मारत त्या ई सेवा केंद्रामध्ये त्या दादांकडे गेला. अपलोड करायची विनंती केली. थोडीफार कुरकुर करत त्यांनी अपलोडदेखील केलं. पुन्हा ते अर्ज आणि कागदपत्रं घेऊन भराडेसाहेबांकडे फेरी. यातही चार दिवस गेलेच. भराडेसाहेब प्रचंड बिझी झाले होते. आणखी कुठली कुठली कामं त्यांच्याकडे आली होती. शेवटी भेटल्यावर त्यांचा लॅपटॉप उघडत अर्जासोबतची सगळी कागदपत्रं तपासली आणि 'ठीक आहे' असा शेरा मारत "तुम्हा दोघांचीही अ‍ॅफिडेविट्स याला जोडावी लागतील. मी चौकशी केली आहे." मागच्या वेळेला हा विषय निघाला नव्हता.. "मी स्वेच्छेने माझी किडनी माझ्या पत्नीस दान करत आहे, कुणाचाही दबाव किंवा आर्थिक प्रलोभन नाही' अशा अर्थाचं अ‍ॅफिडेविट करायला लागेल. तुमच्याही पत्नीचं 'श्री. अमुक हे माझे पती असून मला किडनी दान करत आहेत. स्वतःच्या इच्छेने किडनी दान करत आहेत, यात कोणताही दबाव नसून कौटुंबिक आर्थिक व्यवहारदेखील नाही' अशा अर्थाचं प्रतिज्ञापत्र जोडावं लागेल. दोन्ही प्रतिज्ञापत्रं नोटराइज करून घेणं गरजेचं आहे." हे ऐकून भावेशच्या मेंदूला मुंग्या झाल्या आल्या. हे आधी का सगळं सांगत नाहीत? तेवढ्यात रश्मी मॅडमनी सांगितलेलं वाक्य त्याला आठवलं, "फुटा कायद्याअंतर्गत होता तुम्ही प्रतिज्ञापत्र करत आहातच, तेव्हा पोलीस पडताळणीसाठी तुम्हाला प्रतिज्ञापत्र करण्याची गरज भासू नये. तसं सांगा पोलिसांना आणि पाहा काय म्हणतात." भावेशने आधी केलेली हॉस्पिटलच्या लीगल डिपार्टमेंटला सबमिट करण्यासाठी तयार केलेली प्रतिज्ञापत्रं भराडेसाहेबांना दाखवली आणि सांगितलं, "हे आम्ही ऑलरेडी सबमिट केलेला आहे. पुन्हा तुमच्या अर्जाला कशाकरता सबमिट करायची?" भराडेसाहेब - "ठीक आहे. बघू. मी अर्ज सबमिट करून पुढे पाठवतो." त्यांनी अर्ज सबमिट करून पुढे पाठवला, म्हणजे त्यांच्या वरिष्ठ साहेबांकडे. त्यांचे वरिष्ठ साहेब भराड्यांपेक्षा बिझी. सकाळी अकरा ते एक असे एक-दोन तासच ते ऑफिसला असायचे. त्यानंतर जे कामाला बाहेर पडायचे, ते संध्याकाळी क्वचित यायचे. मुख्य कमिशनर ऑफिस अर्जमंजुरीसाठी वरिष्ठ साहेबांची सही अत्यावश्यक होती. एक दिवस खेडकर मॅडम उगवल्या. आता त्यांनी हे सगळ्या पेंडिंग पीसीसी अर्ज पूर्ण करण्यासाठी जोमाने काम सुरू केलं. त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर एक दिवस वरिष्ठ साहेबांना गाठता आलं. त्यांनी भावेशची समोरासमोर जुजबी चौकशी करून अर्जावर लगेच सही करून अर्ज कमिशनर ऑफिसला सबमिट करून टाकला.

कमिशनर ऑफिसला भावेशच्या चकरा सुरू झाल्या. प्रतिज्ञापत्र जोडलेलं नाही, म्हणून अर्ज रिजेक्ट केला. काय चाललंय, हेच भावेशला कळेना. त्याने कमिशनर ऑफिसच्या मॅडमची भेट घेतली आणि सांगितलं, "फुटा कायद्याअंतर्गत सबमिट केलेली आहेत. पुन्हा पोलीस पडताळणीसाठी कशाला हवीत? या सारख्या चकरा मारण्यामुळे मन:स्ताप आणि विलंब होतो." मॅडम - "अहो, आम्हाला प्रोसिजर कम्प्लीट करावी लागते. बघू, कसली प्रतिज्ञापत्रं केलीत तुम्ही?" त्यांनी ती प्रतिज्ञापत्रं डोळ्याखालून घातली आणि म्हणाल्या, "मग वेगळं कशाला करताय? हेच सबमिट करा ना, हे ठीक आहे." हे ऐकून भावेशला दिलासा मिळाला. पुन्हा ई-सेवा सेवा केंद्रात धाव घेऊन त्या दयाळू दादाकडून प्रतिज्ञापत्रं अपलोड करून घेतली. संध्याकाळी लगेच त्यांचा अर्ज कमिशनर ऑफिसमधून रिजेक्ट झाल्याचा मेसेज आला. भावेशला वेड लागायची पाळी आली होती. आता सगळीच कागदपत्रं जोडली आहेत, मग का बरं रिजेक्शन?

दुसऱ्या दिवशी त्यांना कमिशनर ऑफिसमधल्या मॅडमकडे धाव घेतली. त्यांनी थंडपणे सांगितलं, "अर्जदाराच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पडताळणी केल्याचा फोटो जोडले नाहीत, म्हणून रिजेक्ट केलं." भावेशने लगेचच भराडेसाहेबांना फोन केला. म्हटलं, "साहेब, किती फिरवताय मला.. जाऊ दे, आता ट्रान्सप्लांटच कॅन्सल करून टाकतो." भावेशचा वैताग बघून तेही खजील झाले. म्हणाले, "सॉरी सर, तुम्हाला खूपच चकरा मारायला लागल्या. मी कमिशनर ऑफिसमध्ये बोलून तुम्हाला पुढचं सांगतो. यापुढे तुम्हाला फेरी मारावी लागणार नाही. सॉरी." अतिशय वैतागलेल्या स्थितीत भावेश घरी परतला. मागे पासपोर्टच्या वेळी किती सहज पोलीस पडताळणी झाली होती आणि आत्ता? रात्री आठ वाजता भराडेसाहेबांचा फोन वाजला. फोन घेतला. "सर, मी कमिशनर ऑफिसमध्ये येऊन चौकशी केली. आता घरी जाऊन पडताळणी कंपल्सरी केलं. मी उद्या सकाळी सकाळी आठ वाजता तुमच्या घरी येतो आणि तुम्हा पती-पत्नींचा पडताळणीचा फोटो घेऊन स्वतः अपलोड करायला लावतो." भावेश वैतागलेल्याच मन:स्थितीत होता. हि पोलीस पडताळणी नको झाली होती.

सकाळ तरी आठ वाजताच भराडेसाहेबांनी फोन केला की "फोटो काढायला येतोय. प्लीज तयार रहा. मलाच खूप कामं आहेत. मी माझ्या कामाने वैतागून गेलोय. तुम्हाला त्रास तो आम्हालाही त्रास होतो." ठीक साडेआठला भराडेसाहेब दरवाजात उभे राहिले. दोघांनाही बोलावून सेल्फी फोटो काढून घेतले. खजील होत ते म्हणाले, "तुम्हाला खूप त्रास झाला. आता मी सगळं मी करतो पुढचं. तुम्ही काळजी करू नका." एक-दोन दिवस काहीच झालं नाही आणि अचानक कमिशनर ऑफिसचा फोन आला, मेसेज आला की अर्ज मंजूर झालेला आहे. भावेशने ई-सेवा केंद्रात धाव घेतली आणि मंजुरीचे अर्ज डाउनलोड करून प्रिंट काढून घेतल्या. दादांना मनोमन धन्यवाद दिले. भराडेसाहेबांची ही भेट घेऊन त्यांनाही धन्यवाद दिले. असा एकंदरीत पोलीस पडताळणी उर्फ पीसीसीचा अनुभव.

समाजातील प्रतिष्ठित नागरिकाचे प्रमाणपत्र

भराडेसाहेबांनी पोलीस पडताळणीत 'समाजातील प्रतिष्ठित नागरिकाचे प्रमाणपत्र' जोडायला सांगितले होते.
प्रतिष्ठित नागरिक कोण.. तर ठरावीक लोक सोडून इतर कोणीही नाही.
"तुमच्या भागातील आमदारांचे किंवा खासदारांचेच प्रमाणपत्र जोडा. इतर कुणाचेही लावू नका."
अच्छा.. म्हणजे फक्त राजकीय लोकच, इतर कोणीही नाही.
"नगरसेवकांचे चालेल का?" भावेशने विचारणा केली.
"कोणते?"
"भाऊसाहेब कुंजीर."
"अं.. बरं, चालेल. भाऊसाहेबांचं पत्र चालेल."

भाऊसाहेब कुंजीर हे त्याच्या भागातील लोकप्रिय नगरसेवक होते. गेल्या अनेक निवडणुकात ते निवडून आले होते. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचं मोठं कार्य होतं. भावेशची भाऊसाहेबांशी जुजबी ओळख होती. पलीकडच्या कुंजीर कॉलनीतच त्यांच्या वडिलोपार्जित मोठा बंगला होता. दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम त्यांच्या बंगल्यात होत होते.

मग त्या दिवशी संध्याकाळी भावेश भाऊसाहेब कुंजीर यांच्या बंगल्यावर पोहोचला. बंगल्यात शिरताना असल्या कामांना विनाकारण काहीतरी माशी शिंकते आणि विलंब होतो, मनस्ताप होतो' असा त्याचा साधारण अनुभव.. तसंच काहीसं इथे होईल अशी शंका घेऊन प्रवेश केला. ऑफिसमध्ये एक जण टेबलवर बसले होते. ते भाऊसाहेबांचे सेक्रेटरी असावेत. इतर ५-७ जण त्यांच्याशी चर्चा करत बसले होते. भाऊसाहेब कुथे दिसले नाहीत. त्या सेक्रेटरींनी भावेशच्या येण्याची देखल घेत बसायला सांगितलं. "काय हवंय" अशी विचारणा केली. भावेश म्हणाला, "चरित्र प्रमाणपत्र हवंय. माझ्या पत्नीचं किडनी ट्रान्स्प्लांट ऑपरेशन आहे, त्याच्या पोलीस एन्क्वायरीसाठी हवंय." सेक्रेटरींनी सहानभूती व्यक्त करत कुठे राहता, किती वर्षं इथे राहायला आहात अशी जुजबी चौकशी केली.
आधारकार्ड मागितलं. भावेशच्या खिशात होतंच. ते स्कॅन करून त्यांच्या रजिस्टरमध्ये एंट्री करून घेतली. "अनेक लोक आमच्याकडून अशी प्रमाणपत्रं घेऊन जातात. त्याची नोंद ठेवावी लागते.."

भावेशने दाखवलेल्या नमुन्यात थोडा बदल करून त्यांच्या स्टॅंडर्डप्रमाणे टाइप करून प्रिंट काढून ट्रेमध्ये ठेवला.
अर्ध्या तासाने भाऊसाहेब मीटिंग संपल्यावर त्यांच्या केबिनबाहेर आले. सेक्रेटरीने लगेचच काही कागद सहीसाठी भाऊसाहेबांच्या पुढे केले, यात भावेश आणि निलूचे कागद होते. त्यांनी भराभर कागदानांवर सह्या केल्या. ते करताना भावेशकडे ओळखीचं स्मित करत "काय म्हणताय?" अशी जनरल चौकशी केली. भावेशने थोडक्यात ट्रान्स्प्लांटबद्दल सांगितलं. "अर्रर्र.. होईल, होईल.. सगळं काही ठीक होईल" अशा शुभेच्छा देत दुसऱ्या कामासाठी कूच केलं. पत्रावर सही झाली होती. ही एक औपचारिकता वेळेत पार पडली, म्हणून भावेशने निःश्वास टाकला.

*****************************************

फायनल फिटनेस सर्टिफिकेट्स -

प्री-ट्रान्स्प्लांट वर्क अप स्टेप -१ आणि प्री-ट्रान्स्प्लांट वर्क अप स्टेप -२ यशस्वी झाल्यावर आता महत्त्वाचा भाग होता फायनल फिटनेस सर्टिफिकेट्स.

निलू आणि भावेशला पुढील तज्ज्ञांकडून 'फिटनेस' प्रमाणपत्रं घेऊन केटी मीटिंग आयोजनासाठी लीगल डिपार्टमेंटकडे सुपुर्द करायची होती.
१) कार्डिऑलॉजिस्ट
२) डेंटल सर्जन
३) सायकियॅट्रिस्ट
४) गायनॅकॉलॉजिस्ट - महिलेच्या बाबतीत
५) प्री-अ‍ॅनेस्थेशिया
६) ट्रान्स्प्लांट सर्जन

निलूला डेंटल ट्रीटमेंट घ्यावी लागली, कारण ट्रान्स्प्लांटच्या वेळी आणि नंतर एक वर्ष कोणत्याही प्रकारचे डेंटल इन्फेक्शन चालत नाही, कारण इन्फेक्शनवरची औषधं ट्रान्स्प्लांट रुग्णाला बाधक असतात. निलूची ट्रीटमेंट झाल्यावर इन्फेक्शन पूर्णपणे थांबल्यावर डेंटिस्टनी फिटनेस सर्टिफिकेट दिलं.

KTS015
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

तर भावेशची कार्डिअ‍ॅक तपासणी करताना त्याला दीर्घकाळ मधुमेह असल्याने ट्रेडमिल टेस्ट करण्याचा सल्ला दिला. यात त्याचे हार्टबीट्स जास्तच आढळल्याने डे-केअरमध्ये अ‍ॅडमिट करून अँजिओग्राफी केली गेली, पण रिपोर्ट नॉर्मल आल्याने कार्डिऑलॉजिस्टनी फिटनेस सर्टिफिकेट दिले.

बाकी वर लिहिलेली सर्व फिटनेस सर्टिफिकेटस एकापाठोपाठ मिळाली. सर्वात शेवटी ट्रान्स्प्लांट सर्जन डॉ. विक्रम धारूरकर यांचे फिटनेस सर्टिफिकेट घेऊन सर्व कागदपत्रे लीगल डिपार्टमेंटकडे सोपवली.

केटी मीटिंगसाठी कागदपत्रं सबमिट करायला ३ ऑक्टोबर उजाडला होता.

केटी मीटिंगसाठी शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी लागते. लवकर मीटिंग आयोजन करण्यासाठी हे लीगल डिपार्टमेंटची कसोटी लागते.
रश्मी माळवदे मॅम आणि टीमने सतत फॉलो अप घेऊन ही मीटिंग पुढच्याच महिन्यात आयोजित केली होती.

केटी मीटिंग दि. ७ नोव्हेंबर, गुरुवार

ठरल्यानुसार दुपारच्या केटी मीटिंगसाठी भावेश, निलू,अखिल, क्षितिजा, भावेशचा धाकटा भाऊ हे सर्व माईंडपर्लला १ वाजताच पोहोचले. त्यांना तळमजल्यावर मागच्या बाजूला एक मोठा हॉल होता, तिथे जाण्यास सांगण्यात आलं. बरोबर दोन वाजता सर्वांना हॉलमध्ये बोलावलं. एका मोठ्या टेबलाभोवती डॉक्टर्स, सर्जन, ट्रान्स्प्लांटचे समन्वयक आणि लीगल डिपार्टमेंटाची माणसं स्थानापन्न झाली होती. जोडीला फोटोग्राफर & व्हिडिओग्राफरही असल्याचं लक्षात आलं.

मीटिंगच्या सुरुवातीस सर्वांची ओळख करून देण्यात आली. डॉ. सौरभ गुमास्ते यांनी सुरुवात केली, "साधारणपणे या मीटिंगसाठी डॉ. तरण रहेजा असतात, पण त्यांना तातडीचं काम निघाल्यामुळे त्यांच्या जागी मी उपस्थित आहे, कुणालाही कॊणातीही शंका असेल तर मला विचारू शकता" अशी सुरुवात करत ऑर्गन रिसिव्हर निलूचं या आजाराचं ट्रॅक रेकॉर्ड, तिच्यावर करण्यात आलेले उपचार आणि ट्रान्स्प्लांटसाठी रेडीनेस याविषयी माहिती दिली. पुढे डोनर म्हणून भावेशची माहिती सांगितली. डोनर म्हणून मेडिकल फिटनेसच्या काय काय चाचण्या केल्या, याची माहिती सांगितली. या वेळी संबंधित अधिकारी फाइल तपासत पडताळणी करत होते, निलू-भावेशला काही प्रश्न विचारत आणखी माहिती घेत होते. त्यानंतर या ट्रान्स्प्लांटमधील गुंतागुंत, त्यानुसार येणारी जोखीम, त्यावरचे उपचार, ट्रान्स्प्लांटनंतर पेशंटची (ऑर्गन रिसिव्हरची) घ्यायची काटेकोर काळजी, न घेतल्यास होणारी इन्फेक्शन्स याबद्दलची सविस्तर माहिती डॉ. सौरभ गुमास्ते आणि डॉ. विक्रम धारूरकर यांनी दिली.

KTS0118
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

त्यानंतर भावेशची मुलाखत झाली. "मी स्वखुशीने माझी किडनी माझी पत्नी नीलांबरी हिला देत आहे. यासाठी माझ्यावर कोणताही कौटुंबिक अथवा इतर कुठलाही दवाब नाही. या शस्त्रक्रियेचे फायदे-तोटे मला समजावून सांगण्यात आले आहेत, ते मला पूर्ण कळलेले आहेत." असा जबाब दिला. निलूचासुद्धा जबाब झाला. या जबाबाचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करण्यात आलं. पाठोपाठ अखिल, क्षितिजा, भार्गव यांचेही जबाब झाले.

वेगवेगळ्या फॉर्म्सवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. बरोबर तीन वाजता ही प्रक्रिया संपली. मीटिंगच्या शेवटी "आता सर्व कागदपत्रं आणि आजच्या मीटिंगचे रेकॉर्डस् इ. सर्व शासकीय समितीला पाठवल्यावर लवकरच मंजुरी मिळेल आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार ट्रान्स्प्लांटचा दिनांक ठरेल" असं डॉ. गुमास्ते यांनी सांगितलं.

सर्व जण बाहेर आले. केटीसाठी एका चाळीस-पंचेचाळिशीच्या स्त्रीची आणखी एक मीटिंग होती. नंतर त्यांचं नाव स्वाती काळोखे असल्याचं समजलं. त्या शेजारच्या जिल्ह्यातल्या मध्यम शहरात कुठल्याशा सरकारी कार्यालयात जॉब करत होत्या. त्यांच्या यजमानांचं दोन-तीन वर्षांपूर्वी अकस्मात निधन झालं होतं. त्यांच्याही दोन्ही किडनी फेल झाल्यामुळे त्यांनाही ट्रान्स्प्लांटला सामोरं जावं लागणार होतं. त्यांच्या आई, ज्यांचं वय ६८ वर्षं होतं, त्या अवयवदान करणार होत्या. मीटिंगसाठी त्यांची आई, भाऊ आणि त्यांचा २० वर्षांचा मुलगा सोबत आला होता. निलूची आणि त्यांची चांगलीच मैत्री झाली. येताजाता भेट झाली की दोघींच्या गप्पा रंगायच्या.

********************************

त्याच दिवशी डॉ. तरण रहेजा त्यांच्या महत्त्वाच्या मीटिंग संपवून दुपारी साडेचारला केबिनमध्ये परतले. त्यांनी पुन्हा काही गोष्टी तपासून निलूला ट्रान्स्प्लांटपूर्व औषधं सुरू केली.

“नीलू यांची अँटी-बी टायट्रेशन (Anti-B Titre) ही रक्ताची तपासणी करावी लागेल. अँटी-बी टायट्रेशन टेस्टमुळे आधीच्या औषध किंवा लसीकरणामुळे तुमच्या प्रतिकारशक्तीवर काय परिणाम आणि सद्य:स्थिती काय आहे, हे समजून येण्यास मदत होते. त्यानंतर योग्य ती औषधं सुरू करता येतील.” डॉ. तरुण रहेजा माहिती सांगत होते.

“आपण आजपासून टॅक्रोरेन ही गोळी सुरू करू या. या औषधामुळे प्रतिकारशक्ती क्षीण व्हायला सुरुवात होईल. तुमचं शरीर दुसऱ्या दुसऱ्या शरीरातील नवीन ऑर्गन स्वीकारण्यासाठी तयार व्हायला सुरुवात होईल.”

पुढे डॉ. रहेजा म्हणाले, "आता तुम्हाला लिम्फो क्रॉसमॅच ही टेस्ट करावी लागेल."

लिम्फो क्रॉसमॅच टेस्ट -

किडनी डोनर आणि किडनी रेसिपिएंट यांच्यातील ऑर्गन आणि पेशी यांची एकमेकांशी कितपत अनुकूलता आहे आणि ट्रान्स्प्लांटनंतर रेसिपिएंटच्या प्रतिकारशक्तीत नव्या ऑर्गनमुळे काय गुंतागुंत होऊ शकते, यांचा अंदाज बांधण्यासाठी लिम्फो क्रॉसमॅच टेस्ट करण्यात येते. यानुसार आधीच किंवा नंतर योग्य ती औषधयोजना करता येते. ही चाचणी शहरातल्याच फक्त एकाच रुग्णालयात म्हणजे डायमंड हॉल क्लिनिकच्या विशेष लॅबमध्येच होते. तुम्हाला दोघांनाही तिथे ब्लड सॅम्पल द्यावं लागेल. अरोरा मॅडम तपशील सांगतील."

डॉक्टरांच्या केबिनबाहेर येऊन लगेचच अरोरा मॅडमना गाठलं. त्यांनी प्रिस्क्रिप्शन डोळ्यांखालून घातलं आणि म्हणाल्या, "टॅक्रोरेन ही गोळी घेण्याआधी एक तास आणि नंतर एक तास काही खायचं-प्यायचं नाही. आणि दिवसातल्या दोन गोळ्यात १२ तासांचं अंतर हवं. तुम्ही सकाळी ७ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता ही गोळी घेतली, तर सोयीस्कर होईल. पेशंटला हे सोयीचं आहे असा अनुभव आहे."

ही खूपच महत्त्वाची माहिती होती. नीलूने कागदावर लिहून घेतली.

अरोरा मॅडमनी त्या लॅबचा फोन नंबर देऊन अपॉइंटमेंट घ्यायला सांगितली.
“उद्याचीच अपॉइंटमेंट घ्या. यात लेट करू नका, हयगय करू नका, म्हणजे आपल्याला वेळेत ट्रान्स्प्लांट करता येईल. आता 'ऑन दि टोज' तयार राहायचं. काही अडचण असेल तर माझ्या कानावर घाला / मेसेज करा." अरोरामॅडमनी बजावून सांगितलं.

दोघांनी शंका विचारली, "पण उद्या म्हणजे शुक्रवारी तर डायलिसिसचा वार आहे. कसं जमणार?"

"उपाशीपोटी सकाळी ९ वाजता त्या लॅबला पोहोचा. सॅम्पल देऊन इथे दुपारी १२-१२:३०पर्यंत डायलिसिससाठी पोहोचू शकता." अरोरा मॅडम उत्तरल्या.

"मी डॉ. रहेजांचं लेटर देते. ते असल्याशिवाय टेस्ट करत नाहीत. अन हो .. तुमचा दोघांचाही फोटो आयडी म्हणजे आधार कार्ड सोबत न्यायला अजिबात विसरू नका. नाहीतर परत पाठवतील तुम्हाला."

लीगल डिपार्टमेंटच्या ट्रान्स्प्लांट कोऑर्डिनेटर रश्मी माळवदे यांनी आधीच फोटो आणि इतर कागदपत्रं जमा केली होती, त्यामुळे हे लेटर ( विशिष्ट फॉरमॅटमध्ये) लगेचच तयार करून दिले. तो अरोरा मॅडम यांनी रहेजांची सही अन शिक्का घेऊन ते लेटर नीलूकडे सुपुर्द केलं. लेटरवर भावेश अन नीलूचे फोटो डकवले होते. आधार क्रमांकही होते. कायदेशीर वैद्यकीय नियमानुसार हा फॉर्म अत्यंत महत्त्वाचा होता.

त्यांच्या सुचनेनुसार डायमंड हॉल क्लिनिकच्या लॅबला फोन करून वेळ नक्की करून घेतली.

निघण्यापूर्वी तिथल्याच लॅबमध्ये नीलूनं अँटी-बी तपासणीसाठी रक्ताचा नमुना दिला.

दि. ८ नोव्हेंबर, शुक्रवार

भावेश-नीलू सकाळी ८ वाजताच निघून डायमंड हॉल क्लिनिकला पोहोचले. हॉस्पिटल शहरच्या दुसऱ्या टोकाला होत. गाडी पार्क केली अन लॅबबाबत विचारणा केली. शहरातील हे महत्त्वाचं जुनं हॉस्पिटल रुग्ण, नातेवाईक, व्हिजिटर्स यांनी गजबजलं होतं. अनेक इमारती आणि विभाग होते. लॅबच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर जाऊन काउंटरवर प्रिस्क्रिप्शन सुपुर्द केलं. थोड्या वेळाने आतून लॅब टेक्निशियन बाहेर आले अन सांगितलं, "ही विशेष चाचणी आहे. याची लॅब डी बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर आहे, तिकडे जा.”

दोघेही लगेचच तिकडे गेल. काउंटरवर अपॉइंटमेंट बुक केल्याचं सांगितलं. ही महागडी चाचणी होती. काउंटरवर संबंधित ऑफिसरने आधार कार्डे आणि सोबत नेलेला फॉर्म व्यवस्थित तपासून खातरी करून घेतली. पैसे भरून ब्लड सॅम्पल द्यायच्या रांगेत उभं राहायला सांगितलं. तशी बरीच गर्दी होती, पण पाऊणेक तासाने त्यांचा नंबर लागला. दोघांचंही सॅम्पल घेतलं. साडेअकराला जवळच्याच एका छानशा रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करून माईंडपर्ल हॉस्पिटलला पोहोचले.

दुपारी १ ते ५ नेहमीप्रमाणे डायलिसिस करून संध्याकाळी ७ला घरी पोहोचले.
आजचा दिवस धावपळीचा गेला होता.

रिटक्सीमॅब इन्फ्युजन - मंगळवार : १२ नोव्हेंबर

रिटक्सीमॅब हे एक अँटीबॉडी प्रकारातील औषध आहे. किडनी ट्रान्स्प्लांटनंतर होणारी गुंतागुंत थोपवण्यासाठी याचा वापर करतात. यासाठी तुम्हाला एक दिवसभर अ‍ॅडमिट व्हावं लागेल, कारण रिटक्सीमॅब डोस शरीरात सोडल्यानंतर रुग्णाला विशेष निरीक्षणाखाली ठेवावं लागतं. योग्य परिणाम दिसल्यावरच मग घरी सोडलं जातं.

सकाळी दहा वाजता निलूला अ‍ॅडमिट केलं. अ‍ॅडमिशन प्रक्रिया पार पडल्यावर जनरल वॉर्डमध्ये बेड अलॉट केला गेला. बीपी, शुगर, पल्स इत्यादी मोजणी करून रिटक्सीमॅब हे औषध सलाइनमधून द्यायला सुरुवात केली. डॉ. चारुदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरू केलं. हे औषध एका विशेष यंत्राला जोडण्यात आलं होतं. त्यातून हे औषध शरीरात सोडण्याचा वेग मोजता येत होता आणि निरीक्षणानंतर तो वेग कमी-जास्तसुद्धा करता येत होतं. ट्रायल म्हणून सुरुवातीला कमी वेगाने सोडलं. सुरुवातीला सिस्टर दर अर्ध्या तासानंतर भेट देऊन निरीक्षण नोंदवत होत्या. मळमळ होत नाही ना, चक्कर येत नाही ना, अंगावर पुरळ येत नाही ना याची चौकशी करत होत्या. असं दोन तास केल्यावर तिथल्या डॉक्टरांनी भेट देऊन वेग वाढवायला सांगितला.

मधल्या काळात चहा, नास्ता, जेवण देणं सुरू होतं. भावेश तिच्याशेजारी खुर्चीत पुस्तक वाचत बसला. पडल्या पडल्या निलूचं टीव्ही पाहणं, मोबाइल चाळणं, फोन आला तर फोनवर बोलणं हे सुरू होतं. मधून मधून भावेशबरोबर गप्पाही चालू होत्या. एकूण ६ तासानंतर - म्हणजे संध्याकाळी ५ वाजता पूर्ण डोस संपला. दोनेक तास निरीक्षण करून ७ वाजता भावेशने डिस्चार्जची प्रक्रिया सुरू केली. बिल रोखीत द्यायचं ठरवलं असल्याने फार उशीर होणार नव्हता. ८ वाजता डिस्चार्ज फाइल आणि स्लिप मिळाली अन दोघेही घरी जायला निघाले.

—----

दि. १४ नोव्हेंबर, गुरुवार

निलूच्या आईचा नवीन फ्लॅट ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ताब्यात मिळणार होता. १५ नोव्हेंबरपर्यंत जुजबी फर्निचर तयार होणार होतं. त्यामुळे १५ नोव्हेंबरनंतरच ट्रान्स्प्लांट करावं, असं सर्वानी मिळून ठरवलं होतं.

दि. १४ नोव्हेंबर, शुक्रवार

डॉ. तरण रहेजा आणि डॉ. विक्रम धारूरकर यांनी आणि त्यांच्या टीमने अंदाजे दिनांक २७ नोव्हेंबर, दिवस बुधवार जाहीर केले. “ यात एखाददुसरा फरक पडू शकेल” आणि सांगितलं,

“आता आजपासून तुमची प्रतिकारशक्ती क्षीण होण्याची औषधं सुरू करतोय. त्यामुळे आजपासून N95 मास्क कम्पल्सरी वापरायचा. बाहेर जाणं-येणं बंदच. सगळ्या गोळ्या, औषधं अगदी वेळेवर घ्यायची. अगदी अलार्म लावून. आहार पथ्यानुसार वेळेत घ्यायचा. यातलं काहीही चुकवायचं नाही."

बुधवार, २० नोव्हेंबर

प्रतिकारशक्ती कमी करण्यासंबंधित रिपोर्ट व्यवस्थित आले होते. ते पाहून डॉ. म्हणाले, "येत्या शनिवारपासून प्लाझ्मा एक्स्चेंज प्रोसिजर सुरू करू या. पहिल्या एक-दोन प्लाझ्मा एक्स्चेंजनंतर कळून येईल की कितीदा करावं लागणार."

दि. २१ नोव्हेंबर, गुरुवार
आजपासून रेसीपिएंट निलूला ट्रान्स्प्लांट तयारीसाठी औषधं सुरू केली. लगेच पहिल्या प्लाझ्मा एक्स्चेंजसाठी दुपारी १ ते ४ ही वेळ ठरवून दिली. त्यासाठी ब्लड अ‍ॅडमिन सेट (ट्यूब्ज इत्यादी) फार्मसीमधून प्लाझ्मा एक्स्चेंज डिपार्टमेंटकडे सुपुर्द केलं.

ही प्रक्रिया डायलिसिस विभागातच होईल, असं सांगितलं.

ब्लड बँक प्लाझ्मा फ्रीझरमध्ये -४० डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक थंड तापमानात साठवतात. रक्त गोठवणारे घटक जतन करण्यासाठी दान केल्यानंतर २४ तासांच्या आत प्लाझ्मा गोठवला जातो. त्याचं यंत्रसुद्धा साधारण डायलिसिस मशीनसारखं असतं. त्यावर वेगवेगळे मॉनिटर्स असतात उदा., रक्तदाब, हृदयठोक्यांची संख्या (पल्स रेट) इ.

चार प्रमुख रक्तगट आहेत - A, B, AB आणि O. रक्तगट AB असलेले दाते हे विशेष प्लाझ्मा दाते आहेत, कारण त्यांचा प्लाझ्मा इतर कोणत्याही रक्तगटांना दिला जाऊ शकतो. यामुळे, एबी प्लाझ्माला वारंवार मागणी असते. तुम्ही दर २८ दिवसांनी प्लाझ्मा दान करू शकता.

प्लाझ्माच्या एका युनिटची मात्रा २००-२५० मि.ली. आहे. प्रौढांसाठी प्रारंभिक शिफारस केलेला डोस १० मि.ली/कि.ग्रॅ. आहे आणि बालरुग्णांसाठी १०-१५ मि.ली/कि.ग्रॅ. आहे. मोठ्या ऑपरेशन्ससाठी ४५० मि.ली. पिशवीसुद्धा उपलब्ध असते.

प्लाझ्मा एक्स्चेंज म्हणजे रेसीपिएंटचा रक्त प्लाझ्मा काढून टाकतात आणि डोनरच्या ब्लड ग्रूपचा प्लाझ्मा दिला जातो.

डोनर आणि रेसीपिएंट यांचे ब्लड ग्रूप वेगवेगळे असतील, तर ही प्रोसिजर करावीच लागते.. मगच रेसीपिएंटचं शरीर डोनरची किडनी (किंवा इतर अवयव) स्वीकारायला तयार होतं.

दि. २२ नोव्हेंबर, शुक्रवार
दुपारी १ ते ५ डायलिसिस..नेहमीप्रमाणे व्यवस्थित पार पडलं.

दि. २३ नोव्हेंबर, शनिवार

पहिलं प्लाझ्मा एक्स्चेंज सुरू केलं. त्यापूर्वी डॉ. तरण यांना भेटला. त्यांनी RTX हे औषध सुरू केलं.
दीड-दोन तासांनी निलूला प्रचंड त्रास व्हायला सुरुवात झाली.

नंतर त्रास कमी झाले. ओठ जड पडायला सुरुवात झाली, ओठ थरथरायला लागले. या जाणिवा वेगळ्याच होत्या, कधीही न अनुभवलेल्या. कधी खूप थंडी वाजायची, शरीरभर क्रँप यायचे. प्रचंड थंडी भरून आली. शरीरभर शहारे यायला लागले. अंगावर काटा आल्याची जाणीव, मळमळ, नॉशिया हेही जोडीला. कोणाकोणाला उलट्याही व्ह्ययच्या, तेव्हा परिस्थिती दारुण व्ह्ययची. हे बघून निलूला कातर झाल्यासारखं व्हायचं. हे असं काही आपल्याला होत नाही, या जाणिवेने नशीबवान समजायची स्वतःला!

प्लाझ्मा एक्स्चेंज कालावधी तीन-साडेतीन तास.

तीन दिवस तिला रोज ८-८ पिशव्या दिल्या गेल्या. या पिशव्या ४५० मि.ली.च्या होत्या.

प्लाझ्मा एक्स्चेंज संपताना रात्री १०नंतर काही खायचं नाही, हे पुन्हा बजावलं.

ब्लड टेस्टमध्ये TAC लेव्हल खूप समाधानकारक आल्याने डॉ. तरण यांनी सांगितलं, "पाच प्लाझ्मा एक्स्चेंजची गरज नाही. तीन पुरेसे आहेत.”

KTS017
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

सर्वच टेस्ट रिपोर्ट ट्रान्स्प्लांटसाठी अनुकूल असल्याने त्यांनी लगेचच ट्रान्स्प्लांटचा प्रोग्राम विशद केला. ”येत्या बुधवारी, म्हणजे २७ नोव्हेंबरला ट्रान्स्प्लांट करू या. तयार आहात का तुम्ही? दुपारपर्यंत ही तारीख तुम्हाला कन्फर्म करतो."

लगेच त्यांनी ट्रान्स्प्लांट सर्जन डॉ. विक्रम धारूरकर यांच्याशी बोलून त्यांची टीम तयार असल्याची खातरी केली. त्याचबरोबर ऑपरेशन थिएटर, अ‍ॅनेस्थेशिया, ट्रान्स्प्लांट नर्सिंग टीम इ. सर्व टीम्सशी बोलून ही तारीख कन्फर्म केली. त्यानुसार तयार राहायला सांगितलं. “आपण सर्व टीमशी को-ऑर्डिनेशन करून हा दिवस ठरवला आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत चुकवायचा नाही. सर्व प्रकारच्या तयारीने यायचं. मुख्य म्हणजे मेडिकल रिपोर्ट, एक्सरे इ. सोबत ठेवायचे. बाकी तुम्हाला माहीत आहेच, काही शंका असेल तर अरोरा मॅडमना जरूर विचारा. ठीकाय? लागा तयारीला..”

दि. २५ नोव्हेंबर, सोमवार

किडनी ट्रान्स्प्लांटसाठी रेसीपिएंट निलूला अ‍ॅडमिट केलं. कोणालाही भेटू देण्यात येणार नाही, हे पुन्हा बजावलं. डॉक्टरांच्या देखरेखीत दुपारी १ ते ५ याच वेळेत डायलिसिस विभागात नेऊन डायलिसिस केलं गेलं. ट्रान्स्प्लांट होण्यापूर्वीचं निलूचं हे शेवटचं डायलिसिस.

डायलिसिसनंतर पुन्हा ट्रान्स्प्लांट आयसीयूमध्ये परत नेण्यात आलं. विशेष कुठली औषधं अथवा उपचार सुरू केले नव्हते. चहा, नाश्ता, भोजन नेहमीप्रमाणे सुरू होतं, त्यामुळे सलाइन वगैरे लावलं नव्हतं. बाकी तिला लावलेलं बीपी, पल्स, ईसीजी यंत्र सतत मॉनिटर करून त्याची नोंद ठेवली जात होती. तिचं मोबाइल पाहणं, मेसेज करणं, काही नातेवाइकांशी, मैत्रिणींशी फोनवर बोलणं आणि फोनवर सर्वांना अपडेट देणं सुरू होत. दिवस कोणत्याही दडपणाविना मजेत गेला.

दि. २६ नोव्हेंबर, मंगळवार

आदल्या दिवशी सकाळी दहाला भावेश आणि गौरव माईंण्डपर्लला पोहोचले. किडनी ट्रान्स्प्लांटसाठी रेसिपिअंट निलूला अ‍ॅडमिट करण्याआधीच्या आठवडात अ‍ॅडमिशन विभागाकडून ट्रान्स्प्लांटचा अंदाज घेतला होता. बिलिंग डिपार्टमेंटकडून ते एस्टिमेट इन्शुरन्स कंपनीकडून मंजूर करून घेतलं होतं. बिलिंग डिपार्टमेंटमध्ये जाऊन अ‍ॅडव्हान्स डिपॉझिट करून ट्विन शेअरिंग रूममध्ये अ‍ॅडमिशन झाली. भावेशचे घरचे कपडे बदलून हॉस्पिटल गाऊन देण्यात आला. त्या वेळी अंगावरच्या सोन्याच्या वस्तू आणि इतर मौल्यवान घरीच ठेवाव्यात, अशी सूचना दिली गेली. भावेशने ती काळजी आधीच घेतली होती.

आधी कोणती औषधं घेत होता याची नोंद केली गेली. शुगर, बीपी, पल्स इ. मोजणीही वेळापत्रकानुसार केली गेली. बिनसाखरेचा चहा, बिस्कीट, दुपारचं जेवण इ. वेळेनुसार देण्यात आलं.

रात्रीचं भोजन पार पडल्यावर दोन असिस्टंट नर्स आल्या आणि सलाइनसाठी नसा सापडवत डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ जॉइंट तयार करून गेल्या.

थोड्या वेळाने ऑपरेशनच्या जागेचं प्रिपरेशन केलं गेलं. प्रिपरेशन म्हणजे त्या जागेवरची लव, केस काढले जातात, जेणेकरून ऑपरेशनच्या वेळी काही अडचण येणार नाही. भावेशाच्या पोटावर डाव्या बाजूस आणि ओटीपोटाचा काही भागावरची लव, केस काढले गेले.

रात्री ११ वाजता मुख्य नर्स म्हणजे ब्रदर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या गेल्या आहेत ना याची खातरी करण्यासाठी आला. मेडिकल नोंदी, प्रिपरेशन लक्षपूर्वक तपासलं. सलाइन जॉइंटचं निरीक्षण केलं आणि असिस्टंट नर्सला हाक मारून म्हणाला, "हा सलाइन जॉइंट इथे का केला? हाताच्या मनगटाजवळच्या नसा स्पष्ट दिसताहेत. इथे करता आलं असतं की. अन आता जो हाताच्या कोपऱ्यावर केलात, त्याने पेशंटला हॅन्डल करायला त्रास नाही का होणार? चला, तिथला काढा अन इथे बसवा." ओशाळलेल्या नर्सने पहिला काढला आणि हात पालथा करून तिथे नवीन जॉइंट केला.

या सलाइन जॉइंटमुळे भावेशला पुढच्या १० दिवसांत त्या जॉइंटसह वावरायला सोपं पडलं. कोपऱ्यावरच्या जॉइंटने प्रचंड वैताग आला असता. पुढील दिवसात त्या ब्रदरची त्याला नेहमी आठवण यायची

रात्रीच्या जेवणानंतर तासाभराने शरीरावर ट्रान्स्प्लांट करण्याच्या जागेचं प्रिपरेशन - म्हणजे त्या जागेची लव, केस काढले गेले.

रात्री बारा-साडेबारा वाजता एनिमा देऊन पोट साफ केलं गेलं.

दि. २७ नोव्हेंबर, बुधवार. ट्रान्स्प्लांटचा दिवस

भावेश -

सकाळी साडेचारला सिस्टर्स उगवल्या. भावेशला उठवून आवरायला सांगितलं. अंघोळही करून घ्यायला हरकत नाही असं सांगितलं. त्याने दात घासले. हात-पाय, तोंड स्वच्छ धुऊन अंघोळीला फाटा दिला. थोड्या वेळाने सिस्टरने सलाइन सुरू केलं.

सकाळी साडेसहाला सिस्टर्स आणि मदतनीस यांनी दुसऱ्या मजल्यावरील प्री-ऑप. होल्डिंग एरियात आणलं. प्री-ऑप. होल्डिंग एरिया म्हणजे ऑपरेशन थिएटरच्या लगतची जागा, जिथून ऑपरेशन थिएटरच्या आत नेतात. काही विशेष पूर्वतयारी करायची असेल तर ती इथे करून घेतात. बीपी, पल्स, ईसीजी मॉनिटरिंग मशीनला जोडणी केली. बाकी विशेष काही नव्हतंच. ते रूममध्ये आधीच केलं होतं.

१०-१५ मिनिटांत नीलूलाही आणलं गेलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं अन एकदम "गुड मॉर्निंग" केलं. निलूचा चेहरा हसरा, प्रसन्न दिसत होता.

KTS017
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

भावेश म्हणाला, "छान झोप झालेली दिसतेय. चेहरा टवटवीत दिसतोय."
ती हसली अन म्हणाली, "हो, झाली थोडीफार. मला पहाटे खूप लवकर उठवलं" असं सांगत क्रम सांगितला, "पहाटे ३ वाजता सिस्टर आल्या अन मला झोपेतून उठवत म्हणाल्या, चार वाजल्यापासून तुम्हाला सलाइन लावायचं आहे. त्यापूर्वी अंघोळ वगैरे करायची असेल तर करून घ्या,. कारण नंतर दोन-तीन महिने अंघोळ करायला मिळणार नाही.

मी झोपेतून पूर्ण जागी झालेच होते. दात घासून अंघोळ करून मस्त फ्रेश होऊन बसले.
पहाटे चारपासून औषधं सुरू केली. सलाइन आणि इतर औषधं - उदा., अँटीबायोटिक्स इ. देण्यासाठी हातावर सॉकेट लावलं."

भावेशनेही त्याचा क्रम सांगितला. इतर काही किरकोळ गप्पा सुरू राहिल्या. गौरव लवकर येतो म्हणाला होता. त्याला प्री-ऑप. भागात सोडणार नव्हतेच. तो फोन करून बोलणार होता. काउंटरच्या भिंतीवर मोठं घड्याळ लावलं होतं. भावेशचं त्याच्याकडे लक्ष होतंच. ७:३० वाजायला आले. प्री-ऑप. स्टाफची तयारीसाठी लगबग सुरू होती, फोन सुरू होते. त्यांच्यापैकी कोणातरी पोहोचतंच होतं. कुणाला थोडा उशीर होणार होता.

आणि अचानक अक्षय, क्षितिजा तिथे प्रवेशते झाले. भावेश-निलूने चमकून एकमेकांकडे पाहिलं.. सुखद धक्का होता.

अर्थातच नियमानुसार मास्क आणि अ‍ॅप्रन परिधान केलेल्या वेषात. दोघेही त्यांच्या स्ट्रेचर बेडच्या मधोमध उभे राहिले. "काही टेन्शन नाही ना? सगळं ठीक होणार आहे, परफेक्ट होणार आहे, डोन्ट वरी" असा धीर दिला. पाठोपाठ नीरजाचे डॅडीही दिसले.. हा आणखी एक धक्का होता. त्यांनी "सगळं काही व्यवस्थित होईल" असा विश्वास दिला. भावेशचं मन कृतज्ञतेने भरून आलं. किती भरभक्कम आधार आहे आपल्या लोकांचा...

तिकडे काउंटरवर अचानक लगबग सुरू झाली. ५-१० मिनिटांत डॉक्टर्सची टीम पोहोचेल असं बोलणं ऐकू येऊ लागलं. ट्रान्स्प्लान्ट ऑपरेशनची सर्व तयारी पूर्ण झाल्याची खातरी करण्यात येऊ लागली.

"काही वेळात ऑपरेशन सुरू होईल" असं सांगत त्या तिघांना बाहेर जायची सूचना केली.
तिघेही हात हलवत, सदिच्छा देत बाहेर पडले.

आता ८ वाजत आले होते. दोन ब्रदर आले आणि भावेशची बीपी, पल्स, ईसीजी मॉनिटरिंग मशीन काढली आणि त्वरित त्याला ओटीमध्ये नेलं.

आतली डॉक्टर्स आणि त्यांच्या मदतनीसांची टीम तयारच होती. भावेशने तिथे कोण कोण आहे हे बघायचा प्रयत्न केला, पण भर्रकन ऑपरेशनच्या टेबलाजवळ नेलं. कोणाचेच चेहरे नीट लक्षात आले नाहीत .. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर सर्जिकल मास्क आणि सर्जिकल हेड कॅप. मग भावेशचं लक्ष छतावरच्या तेज:पुंज लाइट्स कडे गेलं. मुख्य मोठा लाइट खूप जबरदस्त होता. भव्यदिव्य वाटण्याजोगा. परफेक्ट डिफ्युजड लाइट आणि बाजूचे पूरक लाइट्स. ऑपरेशन करताना कोणतीही सावली पडू नये, ऑपरेशन करण्याचे भाग आणि सर्व साधनं स्पष्ट दिसली पाहिजेत..

मुख्य डॉक्टर समोर उभे ठाकले. "गुड मॉर्निंग. कसे आहात? करायचं सुरू ऑपरेशन?" ते डॉ. विक्रम धारूरकर होते, हे भावेशच्या लक्षात आलं. "आता आम्ही तुम्हाला स्ट्रेचरवरून ऑपरेशन टेबलवर घेणार" असं दुसऱ्या डॉक्टरने सांगत लगेच दोघातिघांनी उचलून टेबलावर हलवलंदेखील. "आता आम्ही एक औषध देणार आहोत, ज्याने तुम्हाला झोप येईल" असं सांगितलं. काही वेळातच त्याचे डोळे मिटू लागले .. पुढे त्याला जाग आली ती भूल उतरल्यावरच!

तिकडे निलूला स्ट्रेचरवरून दोघानी ओटीमध्ये नेलं. ओटीमध्ये काय काय झालं, हे निलूने भावेशला नंतर सांगितलं - "काही वेळानंतर ओटीमधल्या टीमने संकेत दिल्यावर मलाही आत नेलं. ओटीत गेल्यावर मला स्ट्रेचरवरून ऑपरेशन टेबलवर हलवायचं होतं. एका डॉक्टरांनी विचारलं, "तुम्ही इथून उठून ऑपरेशन टेबलवर जाऊन झोपू शकता का?" त्यासरशी मी चटदिशी उठून ऑपरेशन टेबलवर जाऊन झोपले. डॉक्टर हसत म्हणाले, "पेशंट तर आताच उड्या मारायला लागलाय .. म्हणजे आता लवकरच डिस्चार्ज मिळणार." मलाही हसू आलं. मला सांगितलं, "आता सलाइनमधून तुम्हाला भूल देणारय..." हळूहळू भूल चढायला लागली. पुढे मला काहीच कळलं नाही.

ट्रान्स्प्लांट कधी पार पडलं अन केव्हा आयसीयूमध्ये आणलं, मला काहीच कळलं नाही. मला किती वाजता जाग आली तेच कळलं नाही. मला एक आठवतंय की जाग आली, तेव्हा डॉक्टर्सची टीम आली होती आणि डॉ. रहेजा मला हलवत होते आणि त्यांनी विचारलं, "कसे आहात? मी म्हणाले, "ओके". मग त्यांनी मला हात वर करून दाखवा असं सांगितलं. मी तसं केलं. नंतर लगेच मी निद्रावस्थेत गेले, ती रात्रभर झोपेतच होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जाग आली.

ट्रान्स्प्लांट झाल्याच्या रात्री अर्धवट बेशुद्धीत मला जाणवत होतं होतं की मला पाण्याच्या बॉटल्स भराभर लावत होते, कारण भरपूर युरीन बाहेर पडायला पाहिजे. काही इनटेक नाही तर म्हणून सलाइनद्वारे पाणी देत होते. मला आठवतं, सुरुवातीला ८ लीटर युरीन काढली. सलाइनमधून पाणी देणं आणि युरीन बॅग रिकामी करणं असं तीन दिवस त्यांनी केलं. दुसऱ्या दिवशी ६ लीटर, तिसऱ्या दिवशी ४ लीटर असं काहीसं नंतरच्या दिवसात आणखी कमी कमी करत गेले, कारण नवीन किडनीला युरीन पास करायची सवय व्हायला पाहिजे."

दि. २८ नोव्हेंबर, गुरुवारची दुपार

दुपारी साडेचार नंतर भावेशची भूल उतरायला सुरुवात झाली, छत, छतावरचे दिवे याकडे लक्ष गेलं. दोन ब्रदर कामासंबंधी काहीतरी बोलत असल्याचं जाणवलं.. या आयसीयूमध्ये तो एकच पेशंट असल्याची जाणीव त्याला झाली. भावेश शुद्धीत येत असल्याचं पाहून त्यातल्या एक ब्रदरने त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. "कसं वाटतंय ? काही हवंय का?" अशी विचारणा केली. "चांगलं वाटतंय" अशा अर्थी भावेशने मान हलवली. तो निश्चलपणे बेडवर पडून राहिला.

बाजूला पल्स, बीपी आणि हृदयाच्या कार्यालेखाचं मॉनिटर बीप बीप असं वाजत होतं. एका भिंतीवर वेळ दाखवणारं मोठं घड्याळ लावलं होतं. भावेश अर्धग्लानीत गेला.

त्याला भान आलं, जेव्हा त्याला जाणवलं की कुणीतरी आपल्याला हलवत आहे. डोळे उघडून पाहिलं तर डॉ. तरण रहेजा, डॉ. विक्रम धारूरकर "कसं वाटतंय" असं विचारत होते. सोबत डॉ. गुमास्ते आणि एक-दोन साहाय्यक डॉक्टर्स होते. डॉक्टर्हानी "ट्रान्स्प्लांट एकदम व्यवस्थित झालंय. शी इज ऑल्सो ओके" असा निर्वाळा दिला. पेशंट ऑल ओके असल्याची खातरी केली अन ब्रदरला सूचना केली, "उद्या सकाळी यांना नारळपाणी द्या."

डॉ. विक्रम भावेशला म्हणाले, "उठून उभं राहून बघणार का? भावेशने “हो” या अर्थी मान हलवली. ब्रदरच्या मदतीने त्याला आधी बेडवरच बसवलं. थोडं गरगरल्यासारखं होत होतं. दोनेक मिनिटांनी बेडच्या खाली पायरी ठेवून उभं केलं. भावेशच्या डोळ्यापुढे अंधारी पसरली, चक्कर आली. काही वेळाने अंधारी संपली. त्याने डोळे उघडले. डॉ. विक्रम त्याचं निरीक्षण करत म्हणाले, "अंधारी आली ना? तुम्ही अनेक तास झोपून होता, आता उठला, म्हणून अंधारी आणि चक्कर आली. काही प्रॉब्लेम नाही. आज रात्री एक दोन वेळा सवय करा. होऊन जाईल ओके. "

दि. २८ नोव्हेंबर, गुरुवारची रात्र

संध्याकाळी ५ वाजता डॉक्टर्सची फेरी झाली. काही दुखतंय का? खाणं नीट झालं ना? थोडं चालला ना? गॅस पास झाला का? लघवीला झाली का अशा विचारणा केल्या गेल्या. पुन्हा रात्री आठ-साडेआठला दुसऱ्या रेसिडेंट डॉक्टर्सची फेरी झाली. पुन्हा याच विचारण्या झाल्या. भावेश ला दुखत तर थोडंफार होतंच, टाइमटेबल आणि आहार यादीनुसार खाणंही नीट झालं होतं. पण.. पण लघवीला? गॅस पास?

दुपारी बिनसाखरेचा चहा, दोन बिस्कीटं खाऊन झालं होतं. आठ वाजता सूप आणि पातळ खिचडी खाऊन झाली. पोटात अन्न गेल्याने भावेशला हुशारी वाटू लागली होती. नऊ वाजता कृणाल आला. कृणाल भावेशच्या दोन नंबरच्या भावाचा मुलगा, एका वेलनेस इन्स्टिट्यूटमध्ये चीफ अ‍ॅडमिन होता. त्याची ड्युटी ८-८:३०ला संपायची. आज गौरवला रिलीव्ह करायला धडपडत लवकर पोहोचला होता. आज मला रात्रीच्याला सोबत.

रात्रीचे साडेनऊ वाजले अन भावेशला कसंतरी व्हायला सुरुवात झाली. लघवीची भावना होत होती, पण वॉर्डबॉयने युरीन पॅन लावले, तरी लघवी होत नव्हती. जोरच पडत नव्हता. लघवी साठून राहिल्यासारखी वाटत होती. किंचित गॅस साठून राहिल्याची भावना होत होती.

पुढचा तास-दीड तास असाच गेला. टीव्ही पाहायचीसुद्धा इच्छा होत नव्हती, पुस्तक वाचणं तर दूरच. कारण पुस्तकच हातात धरता येत नव्हतं. परत कॉल बेल दाबून वॉर्डबॉयला बोलावणं केलं. शेजारीच दिवसभर ड्युटी करून दमलेला कृणाल झोपी गेला होता. त्याची झोपमोड झाली. काही हवंय का विचारलं. भावेश म्हणाला, बोलावलं आहे वॉर्डबॉयला. वॉर्डबॉय आल्यावर त्याने मध्यातून बेड तिरका करून तिरपं बसवलं. हा बेड मॅन्युअल प्रकारचा होता. हॅन्डल लावून, फिरवून बेड तिरपा, वर-खाली करावा लागे. हे हॅन्डल कॉमन होतं. कुठे ठेवलंय हे शोधायला वेळ जात असे. त्याने तो शोधला, आणला आणि बेड तिरपा केला. ओटीपोटाच्या खाली किंचित दुखत असल्याची जाणीव होत होती. त्यामुळे हळूहळू उठावं लागत होतं. वॉर्डबॉयला पुन्हा गाउन उघडून बेड पॅन लावला. पुन्हा तोच खेळ - लघवी होत नव्हती, जोर पडत नव्हता, लघवी साठून इरिटेशन सुरू झालं होतं. भावेशची अशी अवस्था बघून वॉर्डबॉय म्हणाला " वेळ लागेल. होईल व्यवस्थित. काळजी करू नका."

मजल्यावरची स्टाफची वर्दळ कमी झाली होती. रूममधला आवश्यक दिवा सोडून बाकीचे दिवे मालवले होते. शेजारचा पेशंट झोपून अंधारी रात्र जाणवायला लागली होती. आता मुख्य डॉक्टरची ड्युटी संपल्याने आता ते सकाळीच येणार होते. तुंबलेली लघवी आणि बाहेर न पडणारा गॅस यामुळे कासावीस व्हायला सुरुवात झाली होती.

काय करावं समजत नव्हतं. भावेश या कुशीवरून त्या कुशीवर हळुवारपणे वळत होता. दुखणार नाही अशा बेताने .. वेळ जाता जात नव्हता.

रात्रीचा दीड वाजला. भावेशला प्रचंड अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली. लघवी आणि गॅसपासून कधी एकदा सुटका होतेय असं झालं. बेल दाबून वॉर्डबॉयला कॉल दिला.. वॉर्डबॉय लवकर येईना. नर्सिंग स्टेशनला बीप बीप वाजत राहिलं. वॉर्डबॉय दुसऱ्या कामात अडकला असेल किंवा स्टाफ कमी असेल. त्याची चुळबुळ सुरू झाली. भावेशला थोडं उठून बसावंसं वाटायला लागलं. कृणालला उठवायचं जिवावर आलं. पण नाइलाज होता. हाका मारत उठवलं त्याला. तो उठला अन बेड तिरपा करायला हँडल शोधायला लागला.. सापडलं एकदाचं. त्याला आधार देत तिरपं बसवलं. त्याला अडचण सांगावी कशी, या विचारात तो संकोचला. तेवढ्यात वॉर्डबॉय घाईत आला. लघवीसाठी बेडपॅन दिलं. कितीही जोर दिला तरी काही फरक नाही .. बराच वेळ कुंथुनही पाहिलं, पण लघवी होण्याचं नाव नाही.. पोटातला गॅस त्रास देत होताच.

अशी दारुण अवस्था भावेशने यापूर्वी कधीही अनुभव नव्हती. हे हाल बघून वॉर्डबॉय म्हणाला, "सर, होईल, होईल. मी येतो पंधरा-वीस मिनिटांनी परत" आला तो परत थोड्या वेळाने. भावेश कण्हत म्हणाला, "उभा राहून ट्राय करून बघतो." आधार देत वॉर्डबॉयने बेड पेन धरलं. पुन्हा नन्नाचा पाढा! हताश होऊन गेला! पुढचे दोन तास अतिशय वाईट गेले. झोप तर अजिबात येत नव्हती. मोबाइलवर यूट्यूब उघडून ऑडिओबुक ऐकायला सुरुवात केली. श्री.ना. पेंडसेंची 'रथचक्र'. स्वतःच्या वेदना हळूहळू सुसह्य व्हायला लागल्या .. इतकी संकट, इतकी दुःख, इतके क्लेश.. काय काय सहन केलं त्या नायिकेने. काय लिहितात हे प्रतिभावान लेखक! थोडी गुंगी, थोडं ऐकणं.. पण इकडे वेदना डोकं वर काढतच होत्या. तुंबलेली लघवी अन पोटातला गॅस. काहीच मोकळं होत नव्हतं. कासावीस.. जीव अडकून बसल्याची वेदना.. ऑडिओबुक पुढं सरकतच होतं. नायिकेचं दुःख, दैन्य, वेदना सगळंच वाढत चाललं होतं अन इकडेही भावेशची तशीच अवस्था !

बघता बघता रात्रीचे तीन-साडेतीन वाजले...

ड्रेन बॅगच्या नळीला जोरदार ओढ बसली. प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. ठिबकायला लागलं. बेडशीट रक्ताळलं.. थेंब पांढऱ्या स्वच्छ सापटावरवरदेखील पडले.

वॉर्डबॉयसाठी कॉल बेल वाजवली. कृणालही खडबडून उठला. आज तो सोबतीला होता, किती आधार वाटत होता.. त्याच्याशी बोललं की भावेशला बरं वाटत होतं. वॉर्डबॉय उगवला. लघवी करायची आहे असं सांगितलं. तो पॅन द्यायला लागला. भावेशने म्हटलं, "आधी ट्राय करून झालंय. आता उभा राहून प्रयत्न करतो." तो वॉर्डबॉय अगदी कोवळा, जेमतेम १७-१८ वर्षाचा. त्याच्यासमोर गाउन सोडताना बिचारा भावेश संकोचला.. आधार घेऊन उभा राहिला,. पुन्हा जोर, पुन्हा प्रयत्न.. यश काही येईना. त्याला इतकं आगतिक कधीच वाटलं नव्हतं. कसली कसली व्याधी झालेले लोक असतात, कसं सहन करत असतील? विचारशक्ती क्षीण झाली.. आपण ही वेदना सहन करायलाच हवी.

ऑडिओबुक ऐकायला त्राणच शिल्लक राहिलं नव्हतं. आता फक्त आस होती मुक्तीची.

असेच पाच वाजले. पुन्हा कॉल बेल, पुन्हा वॉर्डबॉय, पुन्हा हेच प्रयत्न अन पुन्हा हेच अपयश.

दि. २९ नोव्हेंबर, शुक्रवार

सकाळी सहाला वर्दळ सुरू झाली. बेडशीट, गाउन बदलायला वॉर्डबॉय आला. आडवं पडून भावेशचं अंग आंबून गेलं होतं. उठायची इच्छा झाली. भावेश वॉर्डबॉयच्या मदतीने आधार घेत उठला. बेडवरून खाली उतरला. किती बरं वाटलं त्याला. दोन पावलं चालून भिंतीचा आधार घेतला. तिथे ८-१० इंचाचा कठडा होता, त्याला धरून चार पावलं चालला.. हुर्रे .. मोठा विजय मिळाल्यासारखा वाटलं. वॉर्डबॉयला त्याला टॉयलेटला घेऊन जायला सांगितलं. त्याने काळजीपूर्वक नेलं. पॉटजवळ जाऊन उभा राहिला. गाउन उघडून हळूहळू जोर द्यायला सुरुवात केली. काय चमत्कार! काही थेंब पडायला सुरुवात झाली. आणखी जोर दिला.. प्रवाह सुरू झाला! युरेका! गेले काही तास तळमळत काढले अन आता प्रकाश आशेचा कवडसा पडला. गॅसही पास झाला. भावेशला ग्रहण सुटल्यासारखं वाटत होतं, मोक्ष मिळाल्यासारखं वाटत होतं.

आपण ज्या गोष्टी सहज करतो, त्यात अचानक अडथळा आला, तर काय होऊ शकतं याचा भावेशने हादरवणारा अनुभव घेतला. स्वतःची इतकी ही अवस्था भावेशने पहिल्यांदाच अनुभवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने अक्षयला सांगितलं, "डॉक्टरांनी सांगितलं खरं पाच दिवस सोडतो, पण काही खरं नाही. मला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये घरी जायचं नाही."

सहजासहजी जे मिळतं, त्याची वेळ आल्यावरच किंमत कळते ..

सकाळ फ्रेश वाटायला लागली. कालच्या लिक्विड डाएटने तरतरी आली होती.

सकाळची चहापाणी झालं, ८ वाजता डॉ. तरण, डॉ. विक्रम धारूरकर यांची राउंड झाली. कसं वाटतंय वगैरे चौकशी करून झाली.. युरीन आणि गॅस पास झाल्याचं सांगित्याल्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलं. डाएटिशियन सोबत होतेच, त्यांना सेमी सॉलिड म्हणजे पातळ डाळ-खिचडी, घट्ट सूप इ. आहार द्यायला सांगितला. दहाच्या सुमारास गौरवआला अन त्याने कृणालला रिलीव्ह केलं. व्हिजिटिंग डॉक्टरांनी सांगितलं, "बेडचा साइड बार धरून एका अंगावर रेलून उठायचा प्रयत्न करा. थोडंफार दुखेल, पण जमायला लागेल हळूहळू." काही वेळाने फिजिओथेरपीच्या मॅडम आल्या. त्यानी प्राथमिक व्यायाम करून घेतला - हात हलवणं, बोटांचे व्यायाम, धरून पाच-दहा पावलं चालणं इत्यादी. नाश्ता झाल्यावर भावेशला चांगलीच तरतरी आली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार एका कुशीवर वळून बेडच्या साइड बारला धरून हळूहळू तिरपं होता येऊ लागलं. दुपारी जेवण झाल्यावर तर त्याने चक्क एकट्याने कठडा धरून रूमच्या दरवाजापर्यंत फेरी मारली... किती भारी वाटलं त्याला.

गौरवला सांगितलं, "हा बेड मॅन्युअल आहे, त्यामुळे उठायला त्रास होतोय. ऑटोमॅटिक बेड मिळतोय का बघ लगेचच!" गौरवच्या खटपटीमुळे तासा-दीड तासात ऑटोमॅटिक बेड मिळाला.

नंतर फिजिओथेरपिस्टची व्हिजिट झाली. त्यांनी रोज सकाळ-संध्याकाळ टप्प्याटप्याने व्यायाम घेणार असं सांगितलं. श्वासांचे व्यायाम आणि बोटांचे व्यायाम करून घेतले.

रात्री कधीतरी त्याची जाणीव आणखी जागृत झाली. ट्रान्स्प्लांटच्या जखमेचं भान आलं.

बाळंतपणात स्त्रीच्या सिझेरियनसाठी पोटाखाली ओटीपोटाच्या इथे आडवा छेद घेतात, तसा छेद होता, त्यावर बँडेज चिटकवलं होतं. डाव्या बाजूने ड्रेन बल्ब काढला होता. त्याची क्लिप गाऊन काळजीपूर्वक अडकवायची आणि या जागी तडस लागत होती. जरा जरी दाब पडला, तरी वेदना होत होत्या, दुर्बीण टाकण्यासाठी पोटावर थोडं वर दोन छिद्रे पाडली होती त्यावर बँडेज चिटकवलं होतं .. तिथं काही त्रास नव्हता.
जिथे टाके घातले होते, तिथे हाताला गाठ लागायची. त्या जागी बधिरपणा आला होता.

तिकडे ट्रान्स्प्लांट आयसीयूत निलूची वेगळीच अवस्था होती.

सरळ झोपलं की पोटाला तडीस लागायचं... आणि पोटाला बधिरपणा आलेला. ट्रान्स्प्लांटनंतर तीन-चार दिवस पोट साफ होत नव्हतं. गॅसेस पास होत नव्हते. आणि अस्वस्थपणा जाणायचा जाणवायचा. सतत कासावीस झाल्यासारखं वाटायचं आणि खाण्याचा नॉशिया आला होता. अन्न समोर आलं, तरी नॉशिया यायचा आणि खायचा प्रयत्न केला की उलटी यायची. त्यामुळे तीन-चार दिवसात काहीही अन्न पोटात गेलं नाही. गॅस्ट्रोच्या डॉक्टरांनी नॉशियाची गोष्ट गोळी चालू केली.

मधल्या काळात एनिमा दोन-तीनदा द्यावा लागला, मग पोट साफ व्हायला लागलं. पाचव्या-सहाव्या दिवसापासून अन्न पोटात जायला लागलं. नॉशिया कमी झाला. अन्न खावंसं वाटायला लागलं. भूक लागायला लागली.
चार दिवसांनंतर भावेशमध्ये खूपच सुधारणा झाली. पॅसेजमध्ये भरपूर फेऱ्या मारणं सुरू झालं. फिजिओथेरपिस्ट स्टाफला त्याच्याकडे लक्ष देण्याची फारशी गरज उरली नाही. शुगर कंट्रोलमध्ये येऊ लागली. इंजेक्शन्स कमी करत गोळ्यांवर आणायला सुरुवात झाली. नातेवाईक, मित्रमंडळी भेटून गेली.

निलूची प्रगती त्या मानाने हळू होती. तिला भेटायला परवानगी नव्हती, त्यामुळे भावेशला भेटणारे नातेवाईक, मित्रमंडळी तिच्याशी फोनवर बोलण्यावरच समाधान मानायचे. व्हिडिओ कॉलही व्हायचे.

किडनी ट्रान्स्प्लांटनंतर दोन तीन दिवसांनी ऑर्गन डोनर आणि रिसिव्हर यांची भेट घडवून आणली जाते. परंतु या दिवसांत निलू अजून स्टेबल झाली नव्हती. त्यामुळे दोघांची भेट झाली नव्हती.

भावेश आता पूर्णपणे स्टेबल झाल्याने डॉक्टर्सनी ८व्या दिवशी डिस्चार्ज देणार असं सांगितलं. भावेश आनंदला. निलूला मात्र आणखी ५-६ दिवसांनी थेट आयसीयूमधून डिस्चार्ज मिळणार होता. भावेशला आदल्या दिवशीपासून डिस्चार्जसाठी एकेका स्पेशालिस्टचे क्लिअरन्स मिळणं सुरू झालं. तिकडे गौरव, क्षितिजा, प्रतुल, मनश्री या चौघांनी निलूच्या आईच्या घरी स्वागताची सर्व तयारी करून ठेवली. भावेशची भावंडं आणि निलूची आईसुद्धा जावई आणि लेकीची आतुरतेने वाट पाहत होते. ट्रान्स्प्लांटनंतर निलूला वेगळ्या खोलीत क्वारंटाइन करावं लागणार होतं, त्यानुसार खोल्यांची स्वछता, व्हॅक्यूमिंग करण्यात आलं. बेड, डेस्क असं फर्निचरही तयार ठेवण्यात आलं. भावेशलाही वेगळी खोली आणि फर्निचर.

डिस्चार्जच्या दिवशी दुपारी तीन वाजता औचारिकता पूर्ण होऊन बिलिंगसाठी प्रोसिजर सुरू झाली. गौरव लवकर प्रोसिजर व्हावी म्हणून इन्शुरन्स कंपनीचा पाठपुरावा करत होता. भावेशची बांधाबांध होऊन बॅग्ज घेऊन तयार होता. काही वेळातच सिस्टर, ब्रदर, अटेंडंट डॉक्टर असा स्टाफ आला, डिस्चार्जनिमित्त केक कापण्याचा सोहळा पार पडला. भावेशच्या डोळ्यांत आलं. गेले आठ-नऊ दिवस तो यांच्या सहवासात होता.

तेव्हढ्यात गौरवच फोन आला. "बिलिंग पेमेंट प्रोसेस पार पडलीय, आता अर्ध्या तासात निघायचंय."

तेव्हढयात दारात अटेंडंट डॉक्टर उभे. "सर, तुम्हाला मिसेसना म्हणजे किडनी रिसिव्हर मॅडमना भेटायचं राहिलंय. चला, जाऊ या आता. मी परवानगी काढलीय." भावेश, अटेंडंट डॉक्टर आणि एक ब्रदर असे तिघे जण दुसऱ्या मजल्यावरील ट्रान्स्प्लांट आयसीयूच्या वेंटिम रूममध्ये पोहोचले. आयसीयूच्या डॉक्टरांना सांगून भावेशला आयसीयूत प्रवेश करताना घालावा लागणारा अ‍ॅप्रन, ग्लोव्हज, मास्क, विशेष बूट परिधान केल्यावर आत सोडले.

७ नंबरच्या आयसीयू रूममध्ये निलू वाट पाहत होतीच. भावेशला तिच्या बेडपासून दूर ठेवलेल्या खुर्चीत जाऊन बसला. निःशब्द झालेली निलू आणि भावेश एकमेकांकडे पाहत राहिले. गेल्या ८-१० महिन्यांत एकमेकांच्या हातात हात घालून सतत तपासण्या, चाचण्या यात सोबत होते. निलूच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला सुरुवात झाली. आपल्या जोडीदाराने आपल्याला जे काही दिलंय, त्याचं ऋण कोणत्या शब्दात मानणार ? तिच्या तोंडातून शब्दच फ़ुटत नव्हते. तिला असं पाहून भावेशच्याही काळजात गलबलून आलं. दोघांचीही अशी अवस्था पाहून तेथील स्टाफदेखील भावनिक झाले.

KTS016
रेखाटन : अस्मिता विश्वजीत दाभोलकर

इतक्यात डॉ. तरण रहेजा आणि डॉ. विक्रम धारूरकर व्हिजिटला आले.
डॉ. विक्रम यांनी दोघांनाही "ऑल द बेस्ट" म्हणत शुभेच्छा दिल्या.
आणि डॉ. तरण रहेजा भावेशकडे पाहत म्हणाले, "यू हॅव डन ग्रेट जॉब. यू वन दि बॅटल!"

आयुष्यातील या वाटचालीत भावेश 'युद्ध जिंकलो' या भावनेने सद्गदित होऊन घरी जायला निघाला !

*********************** समाप्त ******************
या लेखासोबत रेखाटने वापरायला अनुमती दिल्याबद्दल चित्रकार अस्मिता विश्वजीत दाभोलकर यांचे शतश: आभार.
चौथा कोनाडा

कंजूस

वैद्यकीय उपचार कथा चांगली मांडली आहे.

श्वेता२४

अशा प्रकारच्या आजारपणात केवळ शारीरिक नाही तर मानसिक क्षमतेच आहे कस लागतो. ही सर्व प्रक्रिया शारीरिक व मानसिक दृष्ट्या अतिशय थकवणारी व खचवणारी असते. ही कथा वाचत असताना ते मानसिक दडपण जाणवत होतं. यातच आपल्या लिखाणाचं यश आहे. हे सर्व तुम्ही खूप जवळून पाहिलं आहे असं वाटलं.

मी स्वता वैद्यकीय क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत होतो. त्यामुळे कथा प्रवाहाचा तीव्र आवेग समजू शकलो. इथिकल अवयव प्रत्यारोपणा मधे कमिटी कडून परवानगी मिळवताना अक्षरशा जीव मेटाकुटीस येतो. नैराश्य अगदी टोकास पोहचते.

हा आपण बघीतलेला सत्य परिस्थितीतील अनुभव दिसतो. असे अनेक जणांचे प्रवास बघीतले आहेत. वेळोवेळी मदत करताना नियमाच्या चौकटी बाहेर जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. वेळप्रसंगी नोकरी सुद्धा धोक्यात आली होती.

धन्यवाद. रुग्णाला अतीशय सखोल मार्गदर्शन होईल एवढे डिटेल्स लिहीले आहेत.

अस्मिता दाभोळकर यांची रेखाटणे रुग्णाच्या भावना यथार्थ पणे दर्शवतात. त्यांनाही धन्यवाद सांगणे.

पूर्ण सहानुभूती असूनही नकोशा वाटणाऱ्या अनुभवांची अशी ही कथा आहे, पण यू वन दि बॅटल मध्ये आलं सगळं काही!