'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!
Primary tabs
सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.
एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!
काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.
आपल्याकडे अॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.
'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.
असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!
-----
सादरीकरण आणि पात्र परिचय :
'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.
ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...
चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'
३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.
ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.
"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल
ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.
चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'
"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."
रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.
क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.
चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'
नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.
आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!
प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.
ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.
अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.
उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.
चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'
अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.
बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!
आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.
नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.
ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!
पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.
चॅप्टर - ५ : 'द जिन्न'
ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!
खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.
चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.
पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.
असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.
संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.
सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!
_____
एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
बघावाच लागेल आता..........
चित्रपट पाहिला खुप छान वाटला.
अक्षय खन्ना हा कलाकार म्हणून ग्रेट वाटला. आहेच.
राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार.
आता बघावा लागतोय!! अक्षय खन्नाचा खलनायकाच्या रुपात याच वर्षात दुसरा स्ट्रोक (पहीला ---छावा मध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत)
चित्रपट प्रचंड गाजतोय. पण ह्या निमित्ताने मला एक प्रश्न पडलाय.सत्याचा अंश असलेल्या अश्या स्पाय ऑपरेशन वर चित्रपट काढुन आपण भविष्यातील स्पाय ऑपरेशन तर धोक्यात आणत नाही आहोत ना? म्हणजे समजा ह्या चित्रपटात अमुक एक भारताचा स्पाय पाकिस्ताना कसा इनफिल्ट्रेट झाला.तिथल्या कुणाकुणा कडुन कसे कसे साहाय्य मिळाले हे दाखवुन भले काल्पनिक का होईना तो मार्ग तर पुढे कायमचा बंद होऊन जाईल.
काल्पनिक मार्ग दिग्दर्शकाला सुचत असेल तर तो रॉ, आयएसआय ह्यांना आधी सुचला असेल ह्याची शक्यता जास्त.
कानडाऊ योगेशु,
प्रत्यक्षांत हेरगिरी अशी होत नसते. खरीखुरी हेरगिरी हा अत्यंत कंटाळवाणा प्रकार आहे. तो लंबितवाणा ( = लांबलचक ) असून तुकड्यातुकड्याने होतो. असंख्य तुकड्यांचं विश्लेषण करून नेमका निष्कर्ष साधणे हा हेरगिरीचा पाया आहे. तो जर दाखवीत बसलं तर चित्रपट भयंकर रटाळ होईल. पडद्यावर दिसतं ते अनेक असंबद्ध तुकडे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील अशा मसालेदार प्रकारे जुळवून सादर केलेलं नाटक असतं.
आ.न.,
-गा.पै.
टर्मी भौ, तुम्ही शिफारस केलीय म्हणजे सिनेमा पाहावाच लागणार. आज संध्याकाळी बघतो, जमते का ते.
बाकी, लांबलचक लिहिलंय तरी खिळवून ठेवणारं लिहिलंय हेवेसांन.
अक्षय खन्नाचं एन्ट्री गाणं खूप गाजतय, त्यामुळे असा चित्रपट आलाय हे समजलं.यात चक्क रणवीर असूनही मला चित्रपटाविषयी माहिती नव्हते ;)
बहुतेक ओटीटीवर यायची वाट पाहणार!
परिचय लैच भारी, जबरदस्तच झालाय. सिनेमा बघायला उद्युक्त करणारा.
परवाच पाहिला आणि आवडला.
अगदी बेहद्द आवडला असे नाही म्हणणार कारण काही घटना खूपच प्रेडीक्टेबल होत्या पण बघताना मजा आली.
दुसरा भाग पण नक्की बघणार
किल्लेदार । खटपट्या । राजेंद्र मेहेंदळे । कानडाऊ योगेशु । कॉमी । गामा पैलवान । कांदा लिंबू । Bhakti । प्रचेतस । सौंदाळा
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ खटपट्या
+१०००
तुम्हालाही राकेश बेदीचे काम आवडते असे जाणवले. एका मित्राने आग्रही शिफारस केल्याने त्याचा (राकेश बेदीचा) हा पॉडकास्ट पहिला. त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बऱ्याच गोष्टी ह्यातून नव्याने समजल्या, तुम्हालाही कदाचित त्या ऐकायला आवडतील!
@ राजेंद्र मेहेंदळे
येस्स... तुम्ही 'धुरंधर' बघणारच आहात, तेव्हा तुम्हालाही पहिल्यापेक्षा हा दुसरा 'स्ट्रोक' जास्त खणखणीत असल्याचे जाणवेल अशी मला खात्री आहे!
@ कानडाऊ योगेशु
वर गापैंनी लिहिलंय ते बरोबर आहे. ध्येयाप्रती सर्वोच्च पातळीवरची समर्पित वृत्ती, पराकोटीचा संयम आणि समोरच्याचा संपूर्ण विश्वास संपादन करेपर्यंत कुठल्याही थराला जाण्याची तयारी ह्या गोष्टी हेराकडे असतील तर 'अमुक कालावधीत गुंतवणूक डबल' वगैरे सारख्या अमिषाला, आधी अशा बोगस योजनांमुळे फसवणूक झालेल्या लोकांबद्दलच्या बातम्या ऐकून/वाचूनही वारंवार लोकं नव्याने बळी पडतात त्याप्रमाणे ह्या गोष्टीही सतत होतंच असतात/राहणार.
हे कसे होऊ शकते ह्याचे काही प्रमाणात उत्तर या चित्रपटातूनही मिळते.
@ कांदा लिंबू - अवश्य बघा आणि तुम्हाला तो कसा वाटला तेही सांगा.
@ भक्ती
ते गाणं नाहीये, पार्शवसंगीत म्हणता येईल... पण खूपच व्हायरल होतोय तो सीन आणि त्यावरचे किस्से 😀
@ प्रचेतस - अवश्य बघा... तुम्हालाही आवडेल!
@ सौंदाळा
मला आत्तापासूनच खूप वेध लागलेत त्याचे! कारण आता कथानक कसे वळण घेईल, काय काय घटना बघायला मिळतील ह्याविषयी मनात जे खूप अंदाज बांधून ठेवलेत ते खरे ठरतात का हे जाणून घ्यायचे आहे 😀
आपल्याकडे जसे शिरीष कणेकर आणि दिलीप प्रभावळ्कर एकपात्त्री प्रयोग करतात तसे राकेश बेदी हे अडीज तासाचा एकपात्रि प्रयोग करतात.
युट्युब वर मसाज म्हणून टाइप केल्यास मिळेल.
प्रतिसादात Bhakti पाहून वाटलं,टर्मिनेटरपण बदलले.कृत्रिम प्रतिसाद देऊ लागले.पण नंतर @भक्ती पाहून बरं वाटलं, टर्मिनेटर पहिल्यासारखेच आहेत खात्री पटली ;)
धुरंधरचे शीर्षकगीत ऐकलं,ओहो माझा फेवरेट हनुमानकाईंड(Hanumankind)ने रॅप केलंय..जबरी :) :)
सिनेमा प्रचंड हाउसफुल चालू आहे. पावणेदहाच्या शोची कशीबशी दोन तिकिटे मिळाली. सिनेमा पाहून येऊन आता, रात्री दीड वाजता, हे लिहीत आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा अजून एकदा सिनेमा बघायला जाणार आहे.
'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!
'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!
'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!
दोनदा बघावासा वाटला म्हणजे प्रचंड हीट जाणार, गेला आहेच. पण ५०० करोड च्या पण वर जाइल असे वाटत आहे.
बाकी खान कंपनीचे सिनेमे ८०० करोड वगैरे करतात यावर माझा विश्वास नाही.
असो.
चित्रपटाची मांडणी जरा तुटक झाली आहे. संपादनावर अजून लक्ष द्यायला हवे होते. बाकी फोनचे योग्य मॉडेल्स दाखवणे वगैरे सांभाळले आहे. पण तेच लक्ष फ्लॅट स्क्रीन मॉनिटर्स टिव्ही वगैरे मध्ये द्यायला हवे होते. २००० च्या सुमारास त्यांचे प्लाझ्मा टिव्ही असत. ते खूप जड होते, त्याकाळात प्रोजेक्शन टीव्ही असत होते. हमझाची मोटर सायकल पण खूप नवीन मॉडेलची आहे. हे सहज टाळता आले असते. असो.
कथा मस्त आहे. हाताळणी पण चांगली आहे. पाकिस्तानी कारवायांवर इतका परखड भेदक संवाद असलेला चित्रपट पाहिला नव्हता. सगळे काही खुल्लम खुल्ला दाखवले आहे असे वाटले. पहिल्यांदा भारतीय चित्रपटाने पाकिस्तान विषयी असलेली एक ऑकवर्ड पोझिशन सोडून दिली आहे असे वाटले. एकदम रोखठोक!
२६/११ ची दृष्ये परिणामकारक आहेत. शेवट अपूर्ण सोडून दिला आहे. अर्थात ही एक प्रेक्षकांना बांधून ठेवायची खेळी आहे हे नक्की.
पार्श्व संगीतात जुन्या गाण्यांचा वापर खूप मस्त केला आहे. पण नवीन गाणी जरा चांगली द्या हो! आज ची गाणी गुणगुणता येत नसतील अजून वीस वर्षांनी येणार्या सिनेमांनी पार्श्व संगीतात कोणती गाणी वापरायची?
प्लिज नवीन गाणी जरा चांगली द्या असे म्हणावेसे वाटते आहे.
अक्षय खन्नाचा खलनायक जबरदस्त! राकेश बेदी ला वेगळा रोल दिला आहे.
सहमत!
पूर्वीच्या जुन्या किंवा अगदी अलिकडच्या थरार पटांमध्ये शत्रूचे नाव कधीही स्पष्टपणे उच्चारले जात नसे. सरहद के पार ,पडोसी मुल्क अथवा दुश्मन देश से असे शब्दप्रयोग योजले जात होते.
ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार होता तो. पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख पहिल्यांदी बहुदा बॉर्डर चित्रपटात आला आणि त्याचा टाईम्स मध्ये रिव्यु वाचताना त्यात एक ओळ अशी होती कि "फायनली द एनिमि हॅज बीन आयडेंटीफाईड इन हिन्दी सिनेमा"
त्यानंतर अगदी स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख होतो अश्या चित्रपटात. पण तिथे पण उगाच काही ना काही लव अँगल आणुन वगैरे ते न्युट्रलाईज करण्याचे काहींचे किडे असतात. माझ्यामते ह्या चित्रपटापासुन सरळ सरळ ब्लॅक अॅंड व्हाईट मध्ये पाकिस्तान ला दाखवले आहे आणि हे बर्याच जणांना खुपते आहे.
फक्त पाकिस्तानच नाही तर दुबई, कतार, बांगलादेश आणि नेपाळ च ही नाव हवालाच्या संवादात घेतलं आहे.
पाकिस्तानातून जो काही थोडा पैसा मिळतं होता त्यासाठी पाकिस्तानच नाव टाळत असावेत. काही चित्रपटात काहीच कारण नसताना एखाद पाकिस्तानी character पण दाखवलेल आहे.
या चित्रपटाची कॅम प्रींट लगेच बाहेर आली.
या चित्रपटामुळे आपल्या देशात राहणार्या पाकिस्तानी अनौरस औलादींना विशेष त्रास झाला. त्यांना ते लाल सिंग चड्ढा टाईप टुकार चित्रपटांना डोक्यावर घेऊन पाकिस्तानच्या बाजुने लेझिम खेळायची हौस असते ना! :)))
वायआरफच्या भिकार स्पाय साम्राज्याला पेटती काडी लावण्याचे आणि भिकार खानावळी चे उरले सुरलेले जिहादी कपडे फाडण्याचे काम या चित्रपटाने केलेले दिसत आहे.
चित्रपट बहुधा ओटीटी वर आल्यावर पाहिन, मात्र एक गोष्ट मला आवडली, ती म्हणजे या एका चित्रपटाने पाकड्यांचा बुरखा जगात अगदी टराटरा फाडला आहे.
जाता जाता: चित्रपटातील शरारत गाणं बर्यापैकी हिट झाल्याने आता अनेक पक्षी जीव त्यावर रील्स बनवत आहेत. आयेषा खानला देखील बरीच प्रसिद्धी या गाण्याने दिली आहे, बाई उड्या मारुन मारुन नितंब अगदी लईत डोलवुन स्टेज वर नृत्य करताना पाहण्यात आल्या आहेत! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS
अगदी अगदी..
तुम्हाला काय वाटले, इथले (पाकिस्तान समर्थक) डावे आणि पुरोगामी ह्या चित्रपटाविषयी काहीच न बोलता गप्प बसलेत ते काय उगीच का? त्या भाडखाऊंना ना धड चित्रपटाची बाजू घेता येत्ये ना त्याचा विरोध करता येतोय... लैच अवघड जागेचे दुखणे आहे राव, 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' टाईप्स 😂
मला सिनेमा आवडला. ट्रेलर पाहूनच आवडला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी पाहिला.
सिनेमाच राजकारण पटते का नाही हा भाग अलाहिदा. पण जे राजकारण दाखवले आहे त्यात हेतूबाबत काही आक्षेपार्ह वाटले नाही. खेरीज सिनेमा चांगला होता. केरळ फाईल्स वैगेरे सिनेमांचे ट्रेलर पाहून अत्यंत बटबटीत सिनेमे आहेत असे वाटते. धुरंधर तांत्रिक दृष्टीत अतिशय सुपर्ब आहे.
ह्रिथिक रोशन अगदी हेच म्हणाला होता.
एकच नंबर टर्मिभाऊ,
लई मोठी कोंडी सोडवली तुम्ही.
चायला एक टाईम असा गांडू होता की जरा शब्द इकडे तिकडे झाला की प्रतिसाद उडायचा. शिवाय वरून दट्ट्या की भावना कितीही तीव्र असल्या तरी शब्द संयमित ठेवायचे.
आम्ही बिचारे आबे तुबे कडू भाड्या सारख्या विशेषणात वाढलेली प्रजा.
इथले काही बाईलभाडे आणि त्यांचे लिहिणे बघून कुठल्या भाषेत उद्धार करावा हा प्रश्न पडायचा पण तुम्ही भारी काम केले. जशा भावना तशाच उतरवायच्या हा फंडा एक नंबर.
आता मागे सरकणे नाही. एकेकाला उभाट्यानेच.......