तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हुं....( २)
Primary tabs
अर्ध्या तासापूर्वी झालेल्या त्या सगळ्या मरणप्राय प्रसव वेदनांचा विसर पडला तोंडाचे बोळके दाखवणार्या निष्पाप हसण्याने. जणू माझाच जन्म झाला असावा असे वाटले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. अनहद असा एक नाद असतो म्हणे. देवांच्या वाद्यांचा. कशावरही आघात न करता हा नाद होतो. तसा नाद कुठेतरी उमटला. तो तसा अनुभव येत असेल तर काहीही करायला तयार होऊ आपण
क्रमशः
मागील दुवा https://www.misalpav.com/node/53375
स्पर्षाचे गारूड म्हणायचे की की त्या निष्पाप हसण्याचे. ज्याच्या कडून कसलीही अपेक्षा नाही. ज्याला आपल्याकडून काहिही नकोय. लौकीक अर्थाने ते नाते कसले म्हणायचे. देवाचे भक्ताचे नाते असते ते ही भक्ताला काहितरी हवे असते म्हणून. अगदी काही नाही तरी मुक्तीची आस तरी असते. त्या परमार्थातही स्वार्थच असतो. ती निष्पाप नजर आपल्याला एकाच क्षणी कोणीतरी खूप मोठे आणि त्याच वेळेस अगदी क्षुल्लक बनवून जाते. तू माझी माता आहेस पण देणारी तू नाहीस तर मी आहे ही जाणीव देऊन जाते. सगळ्या वेदना सगळ्या यातना सगळे नकारात्मक अनुभव इतकेच काय पण सभोवतालच्या जगालाही विसरायला होते त्या एका नजरेने.
आणि याच एका अनुभवासाठी स्त्री पुन्हा पुन्हा बाळंतपणासारख्या मृत्यूच्या सापळ्यात जायला तयार होत असावी. ....
गोपिकाबाईना या आपल्याच युक्तीवादाचे नवल वाटते. क्षणापूर्वी जीवतीला नावे ठेवणारे आपण स्त्रीच्या बाळाला जन्म देण्याच्या हव्यासाचे समर्थन करायला लागलो.
हा युक्तीवाद एखाद्या व्यासपीठावर मांडला असता तर ..... हलकल्लोळ माजला असता. हे आपले विचार कुठून आले असावेत . गोपीकाबाईंचे वडील जनार्दन नारो पांगारकर. त्यांचे आजोबांकडून गोपाळ कृष्ण शिंङणापुरकरांशी थेट नाते.सुधारक चळवळीचे प्रवर्तक. नारदीय कीर्तन करायचे ते कीर्तन प्रपंच नावाचा एक भला थोरला ग्रंथ त्यांच्या नावावर होता. त्यांचे एक एक कीर्तन ऐकायला ही गर्दी जमायची. त्यांनाच एकदा विचारले होते तेही भर कीर्तनात. मोठ्या धाडसाने. की हनुमान स्वतःचे शरीर हवे तसे लहान मोठे करू शकत होता त्याला एका ढांगेत समुद्र ओलांडणे शक्य होते. मग त्याला भुभु:कार करत उडी कशाला मारायला लागली.
आपले वय ते कितीसे होते असेल सात आठ वर्षांचे. पण मनाला जे वाटले ते विचारले. जनार्दनबुवा काही क्षण थांबले.त्यानी आपल्याकडे पाहिले. अगोदर रागाने आणि नंतर मग कौतूकाने. म्हणाले चिमुरडी आहेस. छान प्रश्न विचारलास. तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी उद्या दिले तर चालेल का?
आपली कोणीतरी परवानगी घेतोय हेच पटत नव्हते. पण आपण अभवीतपणे मान डोलावली.
बाबानी काय उत्तर दिले ते आठवत नाही पण घरी आल्यावर आपले खूप कौतूक केले होते इतके आठवते. माईने रागे भरले. पण बाबाना भारी कौतूक. इतकी लहान मुलगी प्रश्न विचारते हे कौतूक आणि त्यापेक्षाही असा प्रश्न विचारते याचे तर आणखीन कौतूक.
माईचे म्हणणे या उलट... कारटे काय गरज होती चवचाल पणा करायची. आता चारजणात चर्चा होईल आपली. प्रश्न विचारणे यात चवचालपणा काय तेच कळाले नाही. चवचाल म्हणजे काहीतरी वाईट इतकेच समजले. आता मी प्रश्न विचारला यात चर्चा होण्यासारखे काय आहे. ज्याना उत्तर माहीत असेल ते देतील त्तर.
पुढच्याच आठवड्यात चवचाल आणि त्याची चर्चा याचा अर्थ समजला. माई आणि बाबां काहीतरी बोलत होते.लच्छीआत्याच्या कडून कोणीतरी पाहुणे येणार आहेत म्हणून. लच्छीआत्या आली की खूप खाउ आणायची. काजूगर , आमसुले, पोह्याचे पापड , फणसाच्या आठिळ्या. उकडगरे, आंबापोळी फणसपोळी काय काय असायचे तीच्या पिशवीत. पिशवी कसली पेटाराच म्हणायचा. ती आली मी मज्जा यायची. माई पण तीला लक्ष्मीवन्सं म्हणून लक्ष्मीवन्सं करायची. मी तर तीच्या सतत अवतीभवती असायचे.
लच्छी आत्याच्या. माझा गालगुच्चा घ्यायची आणि म्हणायची हुशार आहे गोपिका. चांगल्या घरात पडो. कल्यण होईल. लच्छी आत्या येणार म्हणून कित्ती आनंद झाला मला.
माई म्हणाली ते लोक येणार आहेत. जरा नीट रहा. केसांच्या झिपर्या आवर जरा वेणीफणी कर. मला कळेचना. लच्छी आत्या तर येणार आहे मग वेणीफणी कशाला आणि लच्छी आत्याला माझे केस कित्ती आवडतात. माझे बोलणे पुरे होतेय न होते तोच लाल पात्तळातली दुर्गा आज्जी एकदम ओरडलीच. अगं तुला समजत का नाही ती काय म्हणतेय ते. माईने मला बाजूला केले आणि दुर्गा आज्जीला म्हणाली मी समजावते तीला. काय समजवणार कोण जाणे पण माई दुर्गा आज्जीचे रागे भरणे टाळायला म्हणून म्हणाली असेल बहुतेक. दुर्गा आज्जी तसलीच. स्वयंपाक घराच्या दारासमोर नुसती बसलेली असते. हातात जपमाळ पण तोंडाचा पट्टा चालूच. अगं मोहरी अगोदर जिरे नंतर किंवा ताकाच्या भांड्याला जरा मीठ लाव. पीठ आणलंस ना बाहेरून दळून तुम्हा मुलीना सगळं कसं आयतं पाहिजे. आमच्या वेळेस नव्हते असलं काही. पाठीच्या मणक्याचा भुग्गा व्हायचा रवा करायल्या जात्यावर तेंव्हा कुठे रवा जरा बरा निघायचा. असलं काहीतरी बोलत असायची.ती मला मुली म्हणायची की माईला ते अगोदर कळायचंच नाही. मधूनच, त्या भागिरथीबाईंच्या सुनेला पाचवा लागलेला दिसतोय. नाहीतर तू. ही अशीच रहाशील तर तुला तर्पण द्यायला पिंडदान करायला ही कोणी असणार नाही. नरकात जाशील तू. आणि तुझ्याबरोबर माझा जनार्दनही. मी बघ नऊ जणाना जन्म दिला. आठ मुली निपजल्या असतील पण शेवटी एक दिवा जन्माला घातलाच ना. जनार्दन नावाचा. रामायणात ऋषीमुनींनी लग्नात सीतेला आशिर्वाद देताना अष्टपुत्रा सौभाग्यवती असेच म्हंटले होते. दुर्गाआज्जी रागात असली की बाबांचा उल्लेख जनार्दन असा करायची. एरवी बाब्या, बाबुशेठ असे काहीही म्हणायची.
मी एक दिवस आज्जीला विचारले ही होते की अष्टपुत्रा सौभाग्यवती मग इतर जणी असौभाग्यवती असतात का. माझ्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे ते आज्जीला सुचले नसावे किंवा लहान मुलीशी काय वाद घालायचा म्हणून तीने दुर्लक्ष्य केले असावे. गप्प्प बैस उगाच चहाटाळपणा करू नकोस.
मला प्रश्न पडायचा की आज्जी ज्या पुराणांचा दाखला द्यायची त्यात जरी ऋषीनी अषपुत्रा सौभाग्यवती असा आशिर्वाद दिला असला तरीही सीतेच्या वडिलाना सीता ही एकच मुलगी होती. ती देखील शेतात सापडलेली. सीतेच्या काकाना म्हणजे जनक राजांच्या भावाला कुशध्वज महाराजाना ही तीन मुलीच होत्या. उर्मिला,श्रुतकीर्ति आणि मांडवी नावाच्या मग जनक राजा आणि त्यांचे भाऊ काय नरकात गेले होते? पण हे प्रश्न विचारले असते तर दुर्गाआज्जीने दुर्गास्वरूप धारण केले असते. एवढीशी पोर मला उलट बोलते म्हणत घर डोक्यावर घेतले असते आणि माईला मुलीला उद्धट बोलायला शिकवलेस म्हणून टोमणे मारत बसली असती म्हणून काही विचारले नाही.
मग एका दुपारी लच्छीआत्या आली. तीच्या सोबत आतोबा ही आले. मला नाही आवडत ते. इतक्या दाढीमिशा आहेत त्याना की मी माईला म्हणायचे देखील की ते आले की त्यांच्या अगोदर त्यांची दाढी घरात येते. हे ऐकले की माई हसायची. आतोबांच्या मिशांवर कायम तपकीर सांडलेली असते. आणि त्याच्या पाया पडायला गेले की आशिर्वाद देताना ते इतके जवळ घेतात गुदमरायला होते. माई जरा दूरच ठेवायची मला त्यांच्यापासून. . पण दुर्गाआज्जीच पुढे पाठवायची की मोठ्यांच्या पाया पडायचे असते. आशिर्वाद घ्यायचे असतात. आशिर्वाद देताना त्यांचा हात पाठीवर जरा जास्तच रेंगाळतो त्या हाताचा स्पर्ष काही वेगळाच नकोसा वाटतो. पण काय करणार आज्जीचा हुकूम.
माईला एकदा हे सांगितलेही होते. तीने माझ्याकडे नीट निरखून पाहिले. म्हणाली की तुला तसे वाटते ना... मग नको जात जाऊस त्यांच्या पाया पडायला.
आतोबा आले त्यांच्या सोबत त्यांच्यासारखेच मिशाळ असणारे एक दुसरे कोणीतरी आले. पगडी कोट घालून. बाबानी त्यांचे स्वागत केले. बाबानीही त्या दिवशी कधी नव्हे ते कोट उपरणे आणि डोक्यावर ती काळी टोपी घातली होती. त्या शिवाय कोटाच्या खिशात ते साखळीचे घड्याळही अडकवले होते असे कपडे बाबा काहितरी खास दिवस असल्याशिवाय घालायचे नाहीत.
बाबांच्यात आणि त्या मिशाळ काकांच्यामधे बोलणी चालू झाली. लच्छी आत्या आणि माई माजघरातच थांबल्या. माई असे कोणाचे बोलणे ऐकत नसे पण त्या दिवशी ती ऐकत होती. ते आलेले काका बाबांना म्हणाले की आम्हाला पसंत आहे ही सोयरीक. त्यानी बाबांच्या हातात नारळ आणि एक खणाचा तुकडाही दिला.
माईला काय झाले ते समजले नाही पण ती तशीच तरातरा पुढे झाली. आणि म्हणाली की थांबा. नका घेऊ तो नारळ आणि नको तो खणही. बाबांना काय झाले ते समजलेच नाही. तुम्हाला भले असेल पण आम्हाला मंजूर नाही ही सोयरीक.माईचे हे बोलणे ऐकून लच्छा आत्या थरथर कापायलाच लागली.तुमचे काहिही असो मला वैकुंठरावाना माझी मुलगी द्यायची नाहिय्ये.
बाबा काही बोलायच्या आतच आतोबा म्हणाले की वहिनी हा आमचा अपमान करताय तुम्ही. एकतर स्त्रीयानी माजघरातच रहायचे ते सोडून तुम्ही बाहेर आलात आणि दुसरे म्हणजे सोयरीक मोडून टाकायच्या गोष्टी करताहात. बदनामी होईल अशाने सगळ्या समाजात माझी. समोरून मागणी घालणारे हे स्थळ सोन्यासारखा मुलगा. भलाथोरला चौसोपी वाडा , राज्य करेल संसारात गोपिकाबाई. मी इकडे तुमच्या घराण्याचे भले करतोय तर तुम्हाला हे भलते थेर सुचताहेत.
ते आलेले मिशीवाले काका तसेच उभे होते. माई मात्र कमरेवर हात ठेऊन विचारत होती. " काय शिकले काय आहेत वैकुंठ राव"
वहिनी शिक्षणाचे काय घेऊन बसला आहात.पिढीजात खोत आहेत ते. हंडे भरले असतील त्यांच्या फडताळात मोत्यांचे.
हंडे भरले आहेत ना मोत्यांचे तर स्वतःची मुलगी गोदुताइ द्याना त्यांच्याकडे.
तोच विचार होता अगोदर. आणि तेच केलं असते पण वैकुंठरावाना गोपीकाबाई च आवडल्या . त्यामुळे यावं लागलं इकडे.
क्रमशः
पुढचा दुवा https://www.misalpav.com/node/53386