जनातलं, मनातलं

AI सोबत लेखन : विचार, शब्द आणि जबाबदारी - प्रस्तावना

Primary tabs

२०२५ च्या दिवाळी अंकासाठी AI ही थीम ठेवावी अशी सूचना पुढे आल्यावर 'टीम दिवाळी अंक' च्या सदस्यांपैकी माझ्यासहित अनेकांच्या हृदयात एक बारीकशी कळ आली होती. त्यामागचे कारणही अर्थातच तसे गंभीर होते!

गेल्या दोनेक वर्षांत AI सुविधा पुरवणारे ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok असे कित्येक पर्याय वापरकर्त्यांसाठी सहज उपलब्ध झाले होते आणि त्यांचा वापर करून अनेकांनी लेख, कविता वगैरे 'पाडायला' सुरुवातही करून झाली होती. त्यामुळे ही 'थीम' आहे म्हंटल्यावर दिवाळी अंकासाठी येणाऱ्या लेखनात अशा 'यांत्रिक साहित्याचे' प्रमाण खूप जास्त असेल अशी रास्त भीती त्यामागे होती.

दिवाळी अंकासाठी लेखन पाठवण्याचे आवाहन करणारा धागा नेहमीपेक्षा बराच आधी म्हणजे, १ ऑगस्ट रोजीच आला होता. त्यामुळे लेखकांना लेखन पाठवण्यासाठी बऱ्यापैकी वेळ उपलब्ध होता म्हणून असे 'यांत्रिक लेखन' येण्याचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी नवोदित लेखकांना उपयोगी ठरेल असा विचार करून 'लेख, कथा, कविता आणि चित्रनिर्मिती साठी AI चा वापर कसा करता येईल' ह्या विषयावर एक सोदाहरण लेखमालिका लिहिण्याची कल्पना सुचल्याचे 'प्रशांत' शेठना कळवले.

त्यांना ही कल्पना आवडल्याचे सांगणारा संदेश आल्यावर लगेच उत्साहात ही लेखमालिका लिहायला घेतली आणि तिचे चार भाग लिहूनही झाले. आधीच्या मालिका अर्धवट राहिल्याचा अनुभव गाठीशी असल्याने सदर मालिकेचे सर्व भाग लिहून झाल्याशिवाय ती प्रकाशित करायची नाही अशी खूणगाठ मनाशी बांधून ठेवली होती ते एकप्रकारे बरेच झाले, कारण स्वतःलाच आखून दिलेल्या 'कालमर्यादेत' चारच्या पुढचे भाग नेहमीप्रमाणेच रखडले!

सध्या पुन्हा हा विषय ऐरणीवर आला असल्याने आणि कालमर्यादेचे बंधनही उरले नसल्याने आता ही अर्धवट लिहून तयार असलेली मालिका शक्य तितक्या लवकर पूर्ण करत प्रकाशित करण्याचे ठरवले आहे.

*****

तंत्रज्ञानात झालेल्या जवळपास प्रत्येक क्रांतीनंतर एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला गेला आहे, तो म्हणजे "ह्यामुळे माणूस निरुपयोगी होणार का?"
यांत्रिक छपाईचे तंत्रज्ञान आल्यावर 'आता हस्तलेखनाच्या परंपरेला धोका निर्माण झाला' असे वाटले, कॅमेरा आला तेव्हा चित्रकार अस्वस्थ झाले, संगणक आल्यावर 'आता लेखन, गणित, नोंदवही सगळंच संपेल' अशी भीती निर्माण झाली. परंतु प्रत्येक वेळी तंत्रज्ञानाने माणसाला निरुपयोगी न करता उलट त्याच्या क्षमतेला नवी दिशा दिली, त्याची कार्यक्षमता वाढवली आणि कौशल्यगुणांचा विकास होण्यास हातभार लावला.

आज कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) अशा नावाने आपल्याला परिचित असलेली क्रांती देखील त्याला अपवाद नाही. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे साहित्य / कला विश्वातही AI च्या वापरामुळे बऱ्यापैकी अस्वस्थता दिसून येते. पण इथे प्रश्न केवळ ह्या तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या साधनांचा नसून तो विचारांचा आहे!

लेखन, कथा, कविता, चित्रनिर्मिती, संगीत ही सगळी क्षेत्रे जी खास मानवी सर्जनशीलतेची मानली जात होती, आता तीच क्षेत्रे AI सहजरित्या हाताळताना दिसत आहे. त्यामुळे लेखक / कवी / चित्रकार / संगीतकार अशांच्या मनात “आता माझी गरजच काय?” असा प्रश्न उभा राहणे जितके स्वाभाविक आहे तितकेच वाचक / प्रेक्षक आणि श्रोत्यांना "आता आपल्याला नको नको ते वाचायला / बघायला /ऐकायला मिळेल" अशी धास्ती वाटणेही स्वाभाविक आहे, कारण आज अनेक नवोदित लेखक, विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, कंटेंट क्रिएटर्स AI कडे एका जादुच्या छडीसारखे पाहतात,

'दोन ओळींचा प्रॉम्प्ट दिला की झाला लेख तयार' पण AI ची ही सुलभता जितकी आकर्षक वाटते, तितकीच ती धोकादायकही आहे. कारण लेखन ही केवळ शब्दांची रांग नसून ती अनुभव, संदर्भ आणि संस्कृती ह्यांची गुंफण असते, लेखक आणि वाचकामधला तो एक अबोल पण अत्यंत प्रभावी असा शाब्दीक 'संवाद' असतो.
मराठी भाषेच्या संदर्भात हा संवाद अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण आपल्या भाषेची परंपरा केवळ साहित्यिक नसून ती सांस्कृतिक आहे. AI हे मुख्यतः 'इंग्रजीला प्राधान्य देणारे' साधन असल्याने इंग्रजीत मजकूर निर्माण करण्यासाठी ते जेवढे प्रभावी ठरते, तेवढे ते मराठीत मजकूर निर्मितीसाठी प्रभावी सिद्ध होत नाही. त्यामुळे मराठीत लेखन करण्यासाठी AI चा वापर करताना 'मराठी भाषा, तिची लय, भाव आणि संदर्भ' जपण्याची जबाबदारी ही पूर्णपणे लेखकावर येते.

मला स्वतःला AI ला प्रॉम्प्ट देऊन त्याच्याकडून लिहून घेतलेले आणि त्यावर वापरकर्त्याने मानवी सर्जनशीलतेचे कुठलेही 'संस्कार' न करता जसे च्या तसे प्रकाशित केलेले 'यांत्रिक' लेखन वाचायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे सदर लेख मालिकेचा उद्देश AI चे कौतुकगीत गात त्याला 'नायक' ठरवणे किंवा त्याची निंदानालस्ती करत त्याला 'खलनायक' ठरवणे हा नसून, तंत्रज्ञानापेक्षा विचारप्रक्रियेला प्राधान्य देत नवोदित लेखक लेखक / कवींना आपल्या मनातील कल्पना कागदावर किंवा डिजिटल स्वरूपात उतरवण्यासाठी ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे सदूपयोग होऊ शकतो हे सांगण्याचा आणि 'AI म्हणजे लेखकाचा शत्रू आहे की तो एक सहकारी आहे? AI मुळे लेखन सुलभ होते की साचेबद्ध? AI कल्पना देतो की कल्पनाशक्ती कुंठित करतो? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे AI वापरताना लेखकाने स्वतःला कुठे थांबवायचे?' अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून करत आहे.

AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते. पण आधीच्या मजकुरावरून पुढचा शब्द काय असू शकतो ही संभाव्यता ओळखण्याची विलक्षण क्षमता AI कडे असते. त्यामुळे AI चा वापर आपण लेखनासाठी किती जवाबदारीपूर्वक करतो ह्यावर तो आपल्या वैभवशाली लेखन / वाचन संस्कृतीला समृद्ध करेल की दरिद्री करेल हे अवलंबून असेल.

मालिकेतल्या पुढील भागांमध्ये आपण AI कडे मानवी सर्जनशीलतेला पर्याय म्हणून मिळालेला तांत्रिक/यांत्रिक गुलाम म्हणून पाहणार नसून, लेखनासाठी त्याचा वापर करणाऱ्या लेखकाचा 'मदतनीस' म्हणून पाहणार आहोत. हा मदतनीस कधी आपल्याला वेगाने लिहायला मदत करेल, कधी आपल्याला स्वतःच्या आळशीपणाची जाणीव करून देईल, तर कधी आपल्या विचारातील उणिवा ठळक करून दाखवेल.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

क्रमश:

चित्रगुप्त

पुढील भागांची प्रतिक्षा. या लेखमालेत 'प्रतिमानिर्मिती' बद्दलही येऊ द्यावे.
प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?

युयुत्सु

AI ला अनुभव नसतो.

असहमत. ए०आय्०च्या निर्मितीसाठी वापरला जाणारा डेटा हा अनुभवच असतो.

युयुत्सु

दुसरा मुद्दा - ए०आय० म्हणजे फक्त गप्पा मारणारी यंत्रे नसून त्यात यंत्रप्रज्ञा (रोबोटीक्स) पणे येते आणि ही यंत्रे अनुभवातूनच शिकतात.

संगणक आणि इंटरनेट आले तेव्हा ही लोक अशीच किरकिर करत असत आणि असे लोक त्या लाटेत वाहून गेले.

लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते.

गवि

AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.

असं नाहीये. पण लेखाच्या आशयात रास्त मुद्दे आहेतच.

AI आणि मानवी मन यांची तुलना अयोग्य आहे. अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात. ते ठीकच आहे. तसं असणं शक्यच नाही. आणि मुळात या संज्ञाच धूसर आहेत.

खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून.

युयुत्सु

अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात.

ए०आय्०ची बैठक ही शास्त्रीय मॉडेल्स्वर आधारित आहे. त्यामुळे आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना वापरून ए०आय्०चे मूल्यमापन करणे हा मला मोठा अन्याय वाटतो.

ए०आय्०ची कंटेक्स्ट विण्डो आणि मानवी वर्कींग मेमरी या बर्‍याच मिळत्याजुळत्या कल्पना आहेत.

गवि

हो.

कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते.

विज्ञानावर आधारित कोणत्याही गोष्टीत स्वतःची अशी काही नैतिकता किंवा बरे वाईट, पाप पुण्य नसतेच. ते हाताळणाऱ्यावर अवलंबून आहे.

Responsible AI, Guardrails, Ethical AI, AI Governance ही क्षेत्रे यामुळेच झपाट्याने वाढत आहेत. ISO 42001, EU AI act, RBI free AI, NIST आणि इतर अनेक मानके, फ्रेमवर्क्स, रेकमेंडेशन्स अस्तित्वात येत आहेत. AI रिस्क असेसमेंट, इम्पॅक्ट असेसमेंट या संकल्पना प्रत्यक्षात येत आहेत.

युयुत्सु

त्याचे खरे सत्य स्वरूप कळले

हे वाक्य आणी त्यातली अट मला वादग्रस्त वाटते. खर्‍या स्वरूपाचे ज्ञान प्रत्येकाच्या वकूबानुसार, मूळ ग्रहणक्षमतेनुसार होत असते. कुणाला ए०आय० पिपाणी वाटतो तर कुणाला उलथापालथ घडवून घडवणारे तंत्रज्ञान.

मला ९-१०वीत असताना मराठीच्या पुस्तकातली (बहुधा इंदिरा संतांची ) एक कविता आठवते-

हा बालक बसला कागद टरकावित
कोपुनी तयाची म्हणते माय "खट्याळा"
हा काय चालविलास विनाशक चाळा

लागेल कुणा हा मुत्सद्द्याच्या हाती
ते करार नामी ऐसे करतील ह्याचे वरती
कि पुण्याई धूर्त कुणी मुत्सद्दी
ठरवतील हातोहात मामुली रद्दी
...
कि उडेल त्याच्या मधूनी अचानक भडका
जो ग्रहगोलांसही देईल धडका-धडका इ० इ०


कविता जशी आठवते तशी दिली आहे, आणी ए०आय आणि प्रत्येक लोकोत्तर तंत्रज्ञानाला लागू पडते.

युयुत्सु

आणखी एक-

ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही.

यांत्रिकशेती बोकाळल्यावर लोकांना नैसर्गिक शेतीचे प्रेम उफाळून आले, त्याप्रमाणे डीझायनर-बाळे बोकाळली की नैसर्गिक बाळांबद्द्ल माणसाला प्रेम वाटू लागेल.

कंजूस

फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का?
( याअगोदर काही शाळांमध्ये tablets वापरण्याचा प्रयोग झाला. त्यांचे पुढे काय झाले? फक्त एक आधुनिक पाटी म्हणजे tab न्यायचा असा प्रयोग.)

युयुत्सु

करु शकतो

कांदा लिंबू

लेखमालेची प्रस्तावना आवडली.

लेखन ही केवळ शब्दांची रांग नसून ती अनुभव, संदर्भ आणि संस्कृती ह्यांची गुंफण असते, लेखक आणि वाचकामधला तो एक अबोल पण अत्यंत प्रभावी असा शाब्दीक 'संवाद' असतो.

AI कडे स्वतःचा अनुभव नसला, तरी त्याचा वापर करताना मानवी जाणीव आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे हेच यातून दिसते.

तंत्रज्ञानाला शत्रू न मानता मदतनीस म्हणून पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. AI लेखन सुलभ करतं की साचेबद्ध बनवतं, कल्पना वाढवतं की कुंपणे उभी करतं अश्या वळणाने पुढील चर्चा जाईल असे वाटते. "मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल.

पुभाप्र

युयुत्सु

माझ्या जिलब्यांच्या दुसर्‍या घाण्यामध्ये ए०आय० च्या उत्तरातील १लेच वाक्य हे "अचंबा" या जाणीव्/भावनेच्या जवळ जाणारे आहे

हा एक उत्तम “thought experiment” आहे, कारण तो संविधानाला “पवित्र ग्रंथ” म्हणून न पाहता **समाज-व्यवस्था घडवणारी संस्थात्मक रचना (institutional design)** म्हणून पाहायला भाग पाडतो.

https://misalpav.com/node/53449

गामा पैलवान

अवांतर :

युयुत्सु,

आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना

आत्मा ही संकल्पना अशास्त्रीय कशी काय बुवा? पुनर्जन्माचा पद्धतशीर अभ्यास झालेला आहे.

आ.न.,
-गा.पै.

युयुत्सु

पुनर्जन्माचा पद्धतशीर अभ्यास झालेला आहे.

हा हा हा !

टर्मीनेटर

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार 🙏

@ चित्रगुप्त
होय काका, ह्या मालिकेत लेख, कथा, कविता आणि 'प्रतिमानिर्मिती' विषयी लिहिणार आहे, 'संगीत आणि व्हिडीओ निर्मिती बद्दल पुढे कधीतरी...

"प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?"

मालिकेतल्या 'प्रतिमानिर्मिती' विषयीच्या भागावर अशा 'जनरविलेल्या इमेजांचे' लाल गालिचा पसरून स्वागत केले जाईल 😀
-----

@ युयुत्सु

"लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते."
आणि
"ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही."

प्रस्तावना न वाचताच किंवा पूर्ण न वाचताच आपण काढलेल्या वरील निष्कर्षांबद्दल आपले विशेष अभिनंदन 😀
अवांतर: आपले प्रतिसाद वाचून 'धुरंधर' चित्रपटाचा नुसता ट्रेलर पाहूनच शेपटीवर पायच नाही तर शेपटीला आग लागल्यासारखा थयथयाट करणाऱ्या अनुपमा चोप्रा आणि सुचरिता दास (की घोष) आठवल्या एकदम 😂
-----

@ गवि

"खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून."
आणि
"कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते."

वरील दोन्ही विधानांशी १००% सहमत आहे 👍
-----

@ कंजूस

"फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का?"

शिक्षण खात्याने मनावर घेतल्यास नक्कीच करू शकतो!
-----

@ कांदा लिंबू

मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल.

+१००

युयुत्सु

श्री० टर्मिनेटर

थयाथयाट कुणाचा याचं उत्तर काळ देईलच. फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या. तसेच पुढच्या वेळेला मुद्देसूद प्रतिसाद अपेक्षित आहे.

आपण ए०आय्०ने केलेल्या निर्मितीवर मानवी संस्काराचा घोषा चालू ठेवला आहे.

आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?

टर्मीनेटर

फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या.

दुर्दैवाने 'सतत पिपाणी वाजवुन लोकांना काव आणण्याची' चांगली सवय मला अजुन तरी लागली नसल्याने ही 'काळजी' नेहमीच घेत असतो 😂

आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?

खाली, AI निर्मित मूळ प्रतिमा आणि तिची 'बिंग इमेज क्रिएटर' वरील लिंक.
0
त्यावर फोटोशॉप वापरुन काही ' मानवी संकार' केले आहेत की नाही हे लेखातली प्रतिमा पाहुन तुम्हीच ठरवा!
'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही 😀

युयुत्सु

श्री० टर्मिनेटर,

'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही

तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले.

प्र० What is the difference between the two images?

उ० The content is the same, but the background/border treatment is different:

वरची प्रतिमा: the illustration extends to a beige/tan background with no white border, so it looks more “full-bleed.”
खालची प्रतिमा: has a white outer margin/frame around the illustration (especially visible at the top and bottom).

Everything inside the main illustration (AI head, book, icons, etc.) is essentially identical.

या संस्कारातून नेमके काय साधलं गेलं हे माझ्या बालबुद्धीला कळण्या पलिकडे आहे. पण असो...

युयुत्सु

ता०क०

ए०आय० ने दिलेल्या उत्तरावर तुम्हाला कदाचित मानवी संस्कार अपेक्षित असतील पण मी प्रामाणिक असल्याने जसेच्या तसे दिले आहे.

टर्मीनेटर

"तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले."

ह्याचं कारण म्हणजे तुम्ही खूप 'प्रेडिक्टेबल' झाला आहात!
साध्या डोळ्यांना सहज दिसणारी गोष्टही एखादी 'समस्या' असल्याप्रमाणे तिचे समाधान शोधण्यासाठी तुम्ही AI कडे विचारणा करणार ह्याची खात्री असल्यानेच तो 'संशय' व्यक्त केला होता. एखाद्या सजीव / निर्जीव / दृष्य / अदृष्य गोष्टीवर आत्यंतिक प्रेम, श्रद्धा असणे समजू शकते, पण इतकी 'अंधश्रद्धा' आचंबित करणारी आहे. देवभोळ्या/धर्मवेड्यांची असो की स्वतःला विज्ञाननिष्ठ मानणाऱ्यांची असो परंतु अंधश्रद्धा हि अंधश्रद्धाच असते, तिचा दर्जा आणि पातळी समानच असते!

एकंदरीत गेल्या वर्षभरातले आपले लेखन आणि प्रतिसाद वाचून तुमच्यासाठी मानवी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेपेक्षा 'कृत्रिम बुद्धिमत्ता' सर्वोच्चस्थानी असल्याचे लक्षात आल्याने त्याकडे गांभीर्याने बघणे केव्हाच बंद केले होते, पण आता त्या अंधविश्वासाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने त्यांची दखलही न घेता तिकडे साफ दुर्लक्ष करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. असो...

"AI ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया,
वरना हम भी आदमी थे काम के"

शाम भागवत

मला एक शंका आहे. एखादी छोटीसा स्क्रिप्ट लिहिलेली असेल तर त्याचा व्हिडीओ एआय बनवतो का? म्हणजे 'ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok' यापैकी नक्की कोण बनवतो?

टर्मीनेटर

माझ्या माहितीप्रमाणे फ्री व्हर्जन्स मध्ये नाही पण काही पेड व्हर्जन्समध्ये ही सोय आहे. खालील तक्ता बघावा...
a

ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok व्यतिरिक्त ही सुविधा देणारी काही मॉडेल्स उप्लब्ध आहेत, काही मोफत ऑनलाईन (मर्यादीत) सुविधाही देतात. सर्च करुन बघा!

Bhakti

माझे बाबा रिटायर्ड आहेत.पण वेळ जावा म्हणून ते एका महत्वाच्या क्षेत्रात छोटा चेन बीझनेस करतात.ए आय चा वापर करून ते जाहिराती व्यवसाय प्रमोशन करतात.त्यांनी तयार केलेले ए आय व्हिडीओ पाहून
मी चाट पडते. पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो.

टर्मीनेटर

"पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो."

तुम्हा भावंडांना त्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे! त्यांच्या ह्या छंद/जिलब्यांचा इतरांना मानसिक त्रास होत नसेल तर तिकडे फारसे लक्ष देऊ नका, उद्या त्यांना आपला वेळ घालवण्यासाठी नवीन कुठले खेळणे (पिपाणी 😀) मिळाले आणि त्यात मन रमले की त्यांचे अशा जिलब्या बनवण्याचे प्रमाण आपोआप कमी किंवा शून्यवत होईल. आमच्या बाबांनीही पूर्वी नवीन नवीन Whatsapp वापरायला सुरुवात केली होती तेव्हा आमच्या डोक्याला असाच ताप झाला होता. काही 'केसेस' हाताबाहेर गेलेल्या असतात हे मान्य परंतु सर्वसाधारणपणे फार दिवस नाही टिकत असले चाळे, त्यामुळे निश्चिंत रहा!

स्वधर्म

माझ्या सासर्‍यांना विस्मरणाचा त्रास सुरू झालाय. एकदा ते आपली दुचाकी पार्क कुठे केली तेच विसरले व तिचा नंबरही विसरले. त्यामुळे मोठा घोळ झाला म्हणजे घरच्यांना तिकडे जावे लागले व मग गाडी शोधून द्यावी लागली. तर मग त्यांना न्यूरोलॉजिस्टकडे नेले, एम आर आय काढला व काही औषधेही देण्यात आली. तर न्यूरोलॉजिस्टने त्यांना मोबाईलवर गेम्स खेळायला सांगितले आहे. तसेच शब्दकोडी सोडवा नवीन वाद्य शिका असे सगळे. ते मोबाईलवर व्हॉटसअप फॉरवर्ड भरपूर करतात, पण गेम वगैरे नाही. तर सांगायचा मुद्दा असा की वयस्क लोकांनी डोळ्यांवर फार ताण येणार नाही इतपत मोबाईल वापरून बौध्दिक काम जरूर करावे. अर्थात कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर वाईटच.

गामा पैलवान

अवांतर :

युयुत्सु,

हा हा हा !

हसायला काय झालं? पुनर्जन्म अस्तित्वात असतो इतकंच या क्षणी म्हणता येतं. हे क्षेत्र अभ्यासास मोकळं आहे.

आ.न.,
-गा.पै.