जनातलं, मनातलं

ऑपरेशन अबॉर्शन

Primary tabs

दहा-अकरा वर्षांपूर्वी ऑफिसच्या कामानिमित्त माझी आमच्या मलेशियातील ऑफिसमध्ये इंटर्नल ट्रान्स्फर झाली. त्या वेळी मलेशियाला ट्रान्स्फर घेण्यामागची अनेक कारणं होती; त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मलेशियातलं अफाट फूड वैविध्य. लोकल मलेशियन, चायनीज, थाय, व्हिएटनामी, फिलिपिन्ससारख्या साऊथ-ईस्ट एशियन देशांच्या नानाविध रुचकर डिशेस, शिवाय इतरही अनेक युरोपियन, मिडल-इस्टर्न देशांच्या खाद्यसंस्कृती, कौलालंपुर ह्या मलेशियाच्या राजधानीतल्या प्रत्येक कोपऱ्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये सहज उपलब्ध आहेत.

मलेशियात आलो तेव्हा तब्येतीने मी किंचितसा स्थूल होतो. बीएमआय इंडेक्सच्या ‘यलो झोन (ओव्हरवेट)’ मध्ये होतो, पण बॉर्डरलाइनवर त्यामुळे फारसं घाबरायचं कारण नव्हतं. पण इथल्या खाण्यापिण्याच्या वैविध्यामुळे आणि मी तसाही खवय्या असल्यामुळे सगळे पदार्थ, सगळ्या पद्धतीचं जेवण टेस्ट करण्याची माझी जन्मजात हौस, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे वैविध्यपूर्ण खाण्याचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं. आणि, माझा तो बॉर्डरलाइन बीएमआय इंडेक्स हळूच ‘ओव्हरवेट’ कॅटेगरीकडे झुकू लागला.

माझं वाढतं वजन पाहून माझी फिजिकल ट्रेनर असलेली बायको, “जिममध्ये जा, जिममध्ये जा” असा घोष लावू लागली. स्वतःच्या नवऱ्यालाच तब्येतीत (आणि ताब्यातही) ठेवू शकत नाही ती ट्रेनर इतर विद्यार्थ्यांना कशी काय फिट ठेवणार? असा प्रश्न पडून विद्यार्थी कमी झाले तर काय, ही ही चिंता बहुधा तिला सतावत असावी! ‘जिथे पिकतं तिथे विकत नाही’ या उक्तीप्रमाणे घरातच फिजिकल ट्रेनर असूनही त्याचा काहीच उपयोग होत नव्हता असं नाही, तर मलाच त्याची गरज वाटत नव्हती. कारण जिभेचे चोचले पुरवण्याची पूर्ण जबाबदारी कौलालंपुरमधली हॉटेल्स अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत होती.

ऑफिसातल्या बैठ्या कामाच्या स्वरूपामुळे शारीरिक हालचाली आधीच कमी होत होत्या. त्यात काही कामानिमित्त सिंगापूरच्या ऑफिसमध्ये दीड-दोन महिन्यांच्या प्रोजेक्टसाठी जावं लागलं. ऑफिस चांगी बिझनेस पार्कमध्ये, बुक केलेलं हॉटेलही जवळच होतं, चालण्याच्या अंतरावर. या दीड-दोन महिन्यांत फक्त ऑफिस–हॉटेल–ऑफिस एवढंच आयुष्य उरलं होतं. शनिवार-रविवारही प्रोजेक्टचं काम असायचं. रात्री उशिरा हॉटेलवर परतल्यावर हॉटेलच्याच रेस्टॉरंटमधून, रूम सर्व्हिसने जेवण ऑर्डर केल्याशिवाय पर्याय नसायचा. त्यात खाण्याबरोबरच वाइन आणि बिअरचं प्रमाणही प्रचंड वाढलं. शारीरिक श्रम शून्य, खाण्यापिण्याचा मारा प्रचंड, परिणामी बीएमआय इंडेक्स ‘येलो झोन’ पार करून थेट ओबेसिटीच्या ‘ऑरेंज झोन'मध्ये जाऊन पोहोचला.

प्रोजेक्ट संपून कौलालंपुरला परत आलो, पण वाढलेल्या वजनामुळे लिथार्जी जबरदस्त वाढली होती. काहीही करण्यात उत्साह उरला नव्हता; खाणं मात्र सुरूच होतं. ‘कळतंय पण वळत नाही’ या अवस्थेत बायकोच्या सल्ल्यांकडेही दुर्लक्ष होतच होतं. वजन ९० चा आकडा पार करून शतकाकडे धावू लागलं होतं, तरीही तब्येतीची काळजी घ्यावी असं काही फार तीव्रतेने वाटत नव्हतं. पण पोटाचा अक्षरशः नगारा झाला होता त्यामुळे आत कुठेतरी वजन कमी व्हावं अशी एक सुप्त इच्छा नक्कीच होती. त्या इच्छेला मान देऊन नियतीही काहीतरी प्लॅन करत असावी बहुदा.

एके दिवशी आमच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गाडी पार्क करून लिफ्टमध्ये शिरलो. लिफ्ट सातव्या मजल्यावर थांबली, सातवा मजला कॉमन युटिलिटी फ्लोअर आहे; लहान मुलांचं पार्क, स्विमिंग पूल वगैरे ह्या मजल्यावर आहे. त्या सातव्या मजल्यावर एक छोटी चायनीज मुलगी, साधारण चार–पाच वर्षांची, तिच्या आईसोबत आत आली. मी शिष्टाचार म्हणून तिच्या आईला “हॅलो” म्हटलं.

पण ती मुलगी मात्र माझ्याकडे टक लावून पाहत होती. इतकं रोखून की मलाही थोडंसं कॉन्शस व्हायला झालं. मी तिच्याकडे पाहून हसलो. मी हसल्या हसल्या तिने तिच्या आईला विचारलं, “मॉमी, डज दिस अंकल हॅव अ बेबी इन हिज स्टमक?”

मी एकदम सुन्न झालो. तिची आई कानकोंडी झाली. एकदम खजील होऊन ती अक्षरशः गोरीमोरी झाली आणि घाईघाईने तिने मला “सॉरी” म्हटलं. मीही चेहरा मिश्किल ठेवण्याचा प्रयत्न करून, कसाबसा हसून, “इट्स ओके!” म्हणालो. इट्स ओके म्हणालो खरं…पण घाव वर्मी लागला होता!

त्या दोघी उतरून गेल्यानंतरही ते वाक्य डोक्यात घुमत राहिलं. घरी पोहोचेपर्यंत मी पूर्णपणे विचारांच्या भोवऱ्यात अडकलो होतो. घरी येऊन कपडे बदलले, अंघोळ केली, हॉलमध्ये येऊन बसलो, पण भानावर नव्हतो. बायको कधी जवळ येऊन बसली, कधीपासून काहीतरी बोलत होती, हे लक्षातच आलं नाही. शब्द कानावर पडत होते, पण आत जात नव्हते. शेवटी तिने कोपराने ढोसलं तेव्हा कुठे भानावर आलो. तिने विचारलं, “आज काय झालंय, कसला विचार करतो आहेस एवढा?”

मी गंभीर चेहऱ्याने उत्तर दिलं, “ऑपरेशन अबॉर्शन!”

बायको एकदम प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे बघत, माझ्या कपाळावर हात लावून म्हणाली, “ताप आलाय का? कसलं ऑपरेशन? कोणाचं अबॉर्शन?” मग शांतपणे तिला लिफ्टमध्ये काय झालं ते सगळं सांगितलं. तिनेही प्रचंड प्रयासाने हसू दाबत ते ऐकून घेतलं आणि शहाण्या बायकोसारखं विचारलं, “ऑपरेशन अबॉर्शनसाठी जिम प्लॅन आणि डायट प्लॅन लागेल, बनवून देऊ का?”

लगेचच बायकोकडून जिम प्लॅन आणि डायट प्लॅन तयार करून घेतला. तिला गळ घालून माझ्यासोबत रोज एक तास जिममध्ये यायला लावलं. पुढचे सहा महिने हे ऑपरेशन अबॉर्शन सुरू होतं. दर महिन्याला वजनाचा काटा डावीकडे सरकत होता. सातव्या महिन्यात तो ८० च्या खाली येऊन ७९ वर स्थिरावला. वजन कमी झाल्यावर धावायला सुरुवात केली. हाफ मॅरेथॉनसाठी नाव नोंदवलं आणि ती पूर्ण केली. धावणं अंगवळणी पडलं. मग हायकिंग सुरू केलं. कौलालंपुरच्या आजूबाजूचे जवळपास सगळे डोंगर, टेकड्या काबीज करून झाल्या.

अशा प्रकारे वजन ९५ किलोवरून ७९ किलोवर येत ‘ऑपरेशन अबॉर्शन’ यशस्वीपणे पार पडलं! 😊

कंजूस

अभिनंदन. बाकी मला यातलं काही समजत नाही. वजन कमी करणे वगैरे. कारण मला वजन वाढवायचं आहे. साठवरून पंचाहत्तर व्हायचंय.
तरुणपणी ७४ पर्यंत जाऊन खाली आलो आहे.

सुबोध खरे

@ कंजूस

"मला वजन वाढवायचं आहे. साठवरून पंचाहत्तर व्हायचंय."

एक सोपा उपाय आहे

तळवलकर किंवा तत्सम जिमच्या बाहेर थांबुन तेथून बाहेर पडणाऱ्या विशाल महिलांना त्यांच्या डॉक्टरने काय काय खाऊ नका हे सांगितलंय ते विचारा.

ते सर्व दाबुन खा. उदा फरसाण, वेफर्स, मलई बर्फी, समोसा, बटर चिकन/ बटर पनिर इ इ

काही महिन्यातच आपल्याला पोटाचा नगारा वाजवता येईल.

त्यातून वजन नाहीच वाढलं तर आणखी बरेच दिवस खाऊन पिऊन एन्जॉय करता येईल

हा का ना का

गवि

तळवलकर किंवा तत्सम जिमच्या बाहेर थांबुन तेथून बाहेर पडणाऱ्या विशाल महिलांना त्यांच्या डॉक्टरने काय काय खाऊ नका हे सांगितलंय ते विचारा.

उपाय छान आहे. पण विशाल महिलाच फक्त ? बायस का बुवा डॉक्टर?

युयुत्सु

अभिनंदन... अनुभव आवडला.

गवि

चांगला लेख आहे. यातून एक खूप पूर्वी मीच लिहिलेला लेख आठवला. लठ्ठ पुरुष असो किंवा अन्य काही. त्याला कोणत्याही प्रकारे तू बाईसारखा वाटतो आहेस असं म्हटलं की तो त्याचा तोवरचा सर्वोच्च आणि सर्वात परिणामकारक अपमान असतो.

बांगड्या भर हे खूपच कॉमन झालं. पण पोट बघ, सहावा महिना चालू आहे की काय? किंवा पोटुश्या बाईसारखं दिसतंय, जरा कमी कर.. असं म्हटलं की घाव खोलवर लागतो.

पोटाचा नगारा झालाय बघ.. पोटावर किती टायर चढले आहेत.. फुटबॉल झाला आहे.. हे सर्व चालतं.

यावर फार काही टिपणी करत नाही कारण ते अवांतर होईल.

बाय द वे.. सोकाजी, वेट लॉस बद्दल अभिनंदन..

गवि

अजून एक गोष्ट नोंदवावीशी वाटते. ती कदाचित अपुऱ्या विदाबिंदूवर आधारित असू शकेल.
मीही लंबोदर गटातील ज्येष्ठ सदस्य आहे.
तर थायलंड या पौर्वात्य देशात मला विशेष जाणवेल इतक्या वेळा अनोळखी लोकांनी या गोष्टीवरून टोकल्याचे किंवा कॉमेंट केल्याचे आठवते. एअरपोर्टवरची सिक्युरिटी वाली बाई, हॉटेलात, दुकानात.. अनेकांनी पोट मोठे असल्यावर न मागता टिपण्या केलेल्या आठवतात. आणि पोटात बेबी असणे हे किमान दोन ठिकाणी वापरलेले उदाहरण असल्याचेही आठवते. ते लोक हसत हसत जोक केल्यासारखेच म्हणत होते. कदाचित असा जोक त्यांच्यात आईस ब्रेकर किंवा हलका फुलका मानला जात असेल.

तर तुम्हाला मलेशियात आलेला अनुभव ही कदाचित पौर्वात्य देशात असलेली एखादी जनरल पद्धत आणि तिचा भाग असू शकेल. तुम्ही तिथे कायम राहता त्यामुळे अर्थात तुम्हाला हे अधिक निश्चित माहीत असेल. थायलंडचे कल्चर वेगळे असू शकते.

तिथे मला सर्वच लोक नितळ गोरे सडपातळ दिसले. पोट सुटलेली व्यक्ती पाहिल्याचे आठवतच नाही. त्यामुळेही कदाचित असे टोकले जात असेल.

भारतात मात्र महिना चालू आहे की काय हे अतिशय वाईट रीत्या वापरले जाते. गरोदर असणे आणि मूल जन्माला घालणे हा नैसर्गिक दृष्ट्या स्त्रीचा रोल असला तरी प्रेग्नंसी हा विषय एखाद्या पुरुषाला टोचण्यासाठी ज्या पद्धतीने वापरला जातो त्यात त्या अत्यंत सुंदर आणि कष्टप्रद नैसर्गिक प्रक्रियेला, ज्यातून स्त्रिया जातात, एक तुच्छता दाखवली जाते असं मला वाटत आलं आहे.

स्त्रियान्शी सम्बन्धित कुठलिही गोश्ट लगेच त्यान्च्याबद्दल तुच्छता दाखवण्यासाठी बोलली जात नसते.

गरोदर असलेल्या स्त्रिचे ठिक आहे, पण तुझे का पोट दिसतय एवढे हा प्रश्न आहे, किन्वा टोमणा आहे म्हणा. तो एक सन्दर्भबिन्दू म्हणून वापरला गेला आहे. त्यात (स्त्रियान्चा) अपमान किन्वा तुच्छता नाही.

या लेखातील लहान मुलीच्या डोक्यात पण तोच सन्दर्भ आला ना? गरोदर असल्याचे सहज दिसणारे हे लक्शण आहे आणि ते पुरुषाच्या बाबतीत असू शकत नाही म्हणून तो प्रश्न जास्त परिणामकारक ठरतो.

यात तुच्छता कुठे आली?

गवि

त्या मुलीने निरागसपणे म्हटलं. प्रत्येक वेळी तुच्छता नसते. मी काही विशिष्ट लोक पाहिले आहेत ते हेतुपुरस्सर इतर काही उदाहरण (उदा कणकेचे पोते, बटाटा) न वापरता गरोदर हे उदाहरण वापरतात. त्यातला उद्देश मनाला लागावे किंवा खास इम्पॅक्ट व्हावा हा असतो. ते टोन आणि देहबोली यातून हमखास कळतं. यात जनरलायझेश करायचे नसून एक मनोवृत्ती दाखवायची आहे. बांगड्या भर. बाईसारखा लाजतोय, पोरींसारखा मुळूमुळू रडतोस काय? यातील टोन न समजणे हा टोन डेफनेस म्हणावा लागेल (पुन्हा एकदा. हा कोणावर एकावर आरोप नाही.)
सर्व उदाहरणे केवळ एक साम्य म्हणून असतील तर अनेक वर्षे घरातून आणि बाहेर लठ्ठपणाबद्दल अनेक उपदेश, उपमा आणि टोकणे ऐकत असलेल्या पुरुषाला "गरोदर" शी तुलना केल्यावर मात्र ते खोलवर लागते आणि अतिशय परिणामकारक अपमान ऊर्फ चपराक लागते हे बियाँड डाऊट.

स्पष्टीकरण समाप्त.

सोत्रि

अतिशय परिणामकारक अपमान ऊर्फ चपराक लागते हे बियाँड डाऊट.

१००% सहमत, स्वानुभवावरून!

- (स्वानुभवी) सोकाजी

सोत्रि

सहावा महिना चालू आहे की काय? किंवा पोटुश्या बाईसारखं दिसतंय, जरा कमी कर.. असं म्हटलं की घाव खोलवर लागतो.

नक्कीच, मीही त्या घावामुळेच प्रेरित झालो होतो!

- (गवीची बाडीस असलेला) सोकाजी

गामा पैलवान

सोत्रि,

तुम्ही अर्धी मोरठाण मारणारे आहात हे भारीये. ८० किलो घेऊन २१ किमी धावणे भयंकर अशक्य कोटीतली गोष्ट वाटते.

आ.न.,
-गा.पै.

सोत्रि

८० किलो घेऊन २१ किमी धावणे भयंकर अशक्य कोटीतली गोष्ट वाटते.

मलाही तसंच वाटायचं. पण आता दर महिन्याला एक अशी हाफ मॅरेथॉन धावतोय २०२५ पासून. जानेवारीत मी आणी माझ्या एका मित्राने, सेल्फ प्लॅन्ड हाफ मॅरेथॉन पूर्ण केली, दोघांनीच.

- (नेमाने धावणारा) सोकाजी

अभ्या..

व्व्वा नाना,
बेस्ट.
१६ किलो उतरव्णं म्हण्जे भारीच.
चेहरेपट्टी सेम आहेच आहेच पण बापलेक अगदी सक्खे भाऊ वाटू देऊ नकोस म्हणजे झालं. ;)

सोत्रि

अभ्या.., व्यनी चेक कर... :))

१६ किलो उतरव्णं म्हण्जे भारीच.

भारी नव्हे, वजन उतरावून हलका झालोय! :=))

- (हलका* झालेला) सोकाजी
* नो पन इंटेडेड

वा छान! मी गेल्या वर्षभरात ९९ वरून ८५ वर आलोय. काल मेज़ वजन ८५ किलो होते. bmi प्रमाणे माझे वजन ८४ हवे!

सोत्रि

झक्कास! ८० पर्यंत येण्याचा प्रयत्न करा!

- (आशावादी) सोकाजी

वजन कमी केल्याबद्दल प्रथम अभिनंदन.

आता वहीनीकडून आम्हा काही मिपाकरांसाठी डायट प्लॅन इकडे टाका. सहज जमेल असं असेल तर नक्की करेन.मलाही दहा एक किलो वजन कमी करणे आहे. ९० ला वजन स्थिर आहे.

-दिलीप बिरुटे

सोत्रि

आता वहीनीकडून आम्हा काही मिपाकरांसाठी डायट प्लॅन इकडे टाका

मी नवरा असल्याने तो डायट प्लॅन मला फुकट होता. 😜

- (लकी नवरोबा) सोकाजी

कांदा लिंबू

साकी, आकारात आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

तुम्ही अंमलात आणलेला Diet plan, workout schedule इत्यादी तपशिलाचा फाफटपसारा टाळून थेट लिहिलेला आवडलं.