मिपा कलादालन

मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक

Primary tabs

याना _गोकर्ण _ मुर्डेश्वर सहलीतील तिसरा आणि अंतिम भाग
मागील लेख
१. उत्तर कर्नाटकातील याना शिखरे. | https://www.misalpav.com/node/53526
२. गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक | https://www.misalpav.com/node/53532
कालच्या गोकर्ण भेटीनंतर आजचा तिसरा दिवस हॉटेलमध्ये राहण्याची गरज नव्हती. रुम सकाळी लवकरच सोडून समोरच्या बस स्टँडवर आलो तेव्हा मुर्डेश्वरा _भटकळ _कुंदापुरा करत उडुपीपर्यंत जाणारी बस उभीच होती. नाश्ता तिकडे मुर्डेश्वरातच करायचे ठरलेले त्यामुळे कॉफी घेऊन बसमध्ये बसलो. बस डेपो स्वच्छ आहे. त्यातले कँटिनही स्वच्छच होते. वाटेत होन्नावरा ( होनावर) आणि शरावती नदीचा पूल लागला. याच शरावती नदीवर वरती घाटात प्रसिद्ध जोग धबधबा आहे. खाली जे पाणी जमा होते तिथे गेरसोप्पा जलाशय आहे. गेरसोप्पा आणि होन्नावराच्या (होनावराच्या) रूंद पात्रात बोटिंगची सोय आहे.

फोटो (१)
कुमटा ते मुर्डेश्वरा NH 66 महामार्गाने

फोटो (२)
होन्नावराचा स्वच्छ एसटी डेपो.

फोटो (३)
शरावती नदीच्या पुलावरून जाताना.

मुर्डेश्वरा हे महामार्गापासून दोन किमी आत आहे. ते एक किनाऱ्याशी जोडलेले छोटेसे बेटच आहे. हा सर्व भाग R.N. Shetty या उद्योजकाने विकसित केला आहे.

फोटो (४)

प्रवेशाअगोदर डावीकडे आंघोळीची आणि टॉइलेट्सची सोय आहे. काही जण अगोदर समुद्रावर आंघोळ करून येतात. त्यासाठी उत्तम.
फोटो (५)
प्रवेशद्वारापाशी.

फोटो (६)
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर हे एकवीस मजली गोपूर समोरच येते.गोपुरातल्या सतराव्या आणि अठराव्या मजल्यावर जाण्यासाठी दोन लिफ्टस आहेत.

इथे आपल्या बॅगा ठेवायची सोय आहे. ते एक बरं झालं. मोकळे झालो. प्रथम समुद्रावरील 'नवीन' रेस्टॉरंटमध्ये नाश्ता कॉफी घेतली.‌ राहाण्यासाठी हॉटेलही आहे. ऑनलाईन बुकिंग होते. नंतर प्रत्येकी वीस रुपयांचे तिकिट काढून वरती गेलो. चारी दिशांना खिडक्या आहेत. आता मुंबईतील, नवी मुंबईतील आणि इतर शहरांमध्ये पंचवीस किंवा चाळीस मजल्यांच्या इमारतीत राहाणाऱ्यांना यांचे अप्रूप वाटणार नाही हे मान्य आहे. पण इकडचे दृष्य पाहिल्यावर त्यांना नक्कीच आवडेल.

फोटो (७)
गोपुरावरून दिसणारं दृष्य, उत्तर भाग

फोटो (८)
गोपुरावरून दिसणारं दृष्य, पूर्व भाग

फोटो (९)
गोपुरावरून दिसणारं दृष्य, दक्षिण भाग

फोटो (१०)
गोपुरावरून दिसणारं दृष्य, पश्चिम भाग (१)

मुख्य देऊळ,शंकराचा मोठा पुतळा, त्याच्या उजवीकडे शनि मंदिर, सूर्यरथ हे गोपुरावरून छानच दिसते. नंतर आपण खाली जाऊन पाहणारही आहोत.

फोटो (११)
गोपुरावरून दिसणारं दृष्य, पश्चिम भाग (२)

फोटो (१२)
मुख्य देवळाचा थोडा भाग

फोटो (१३)
नंदी

फोटो (१४)
उत्तर किनाऱ्यावरून दृष्य

चित्रात सर्वात डाविकडे गोपूर, मध्ये शंकराच्या पुतळ्यापढे 'नवीन' उपहारगृह आणि उजवीकडे राहाण्याचे हॉटेल आहे. समुद्रात तरंगता पूल( दुसऱ्या फोटोत आहे), स्पीड बोट, साधी बोट, नेत्राणी आइलंडकडे जाणारी बोट या सोयी आहेत. या बाजूला कोळ्यांची वस्ती नाही. ती दक्षिण भागात आहे. हाइवेकडून देवळापर्यंत येणाऱ्या रस्त्यावर आणखी हॉटेल्स वाढली आहेत परंतू R.N.Shetty resort ची जागा फारच मोक्याची आहे.

या कर्नाटकच्या समुद्रकिनारी प्रदेशात ( आणि वरील सह्याद्रीच्या पश्चिम घाटात) अगणित जागा आहेत. स्वतः:चे वाहन असल्यास त्या पाहाणे सहज शक्य आहे. एक झलक म्हणजे Alemari Ganesha channel वरचा विडिओ गोकर्ण https://youtu.be/eSiKZnRVznk?si=6Oca0zY2p1fttPZL

मुर्डेश्वर पाहून झाल्यावर साधारण एक वाजता भटकळकडे जावं लागलं कारण मुर्डेश्वरहून मत्स्यगंधा गाडीचं तिकीट मिळालं नव्हतं. हाइवेला येऊन भटकळला बसने गेलो. वीस मिनिटे लागली. त्या भटकळ बसस्टँडला आजुबाजूला रेस्टॉरंट्स होती तिथे जेवण करून भटकळ रेल्वे स्टेशनला(३ किलोमिटर )गेलो. गाडी ( 12134)साडेचारला होती पण ती तीन तास उशिरा येणार होती ते अगोदरच कळलं होतं. बॅगा, सामान घेऊन आणखी कुठे भटकळमध्ये फिरण्याची इच्छा नव्हती. स्टेशनवरच वेळ काढला. गाडीने आणखी वेळ काढला आणि शेवटी आठ तास उशिरा ठाण्यात पोहोचलो. हा प्रवास कंटाळवाणा झाला. पण पर्याय नव्हता. सोमवार गुरुवार धावणाऱ्या तिरुवनंतपुरम _कुर्ला गाडीची(22114) तिकिटे काढली असती भटकळ(14:30) तर वेळेत आलो असतो. ही गाडी साधारणपणे वेळेतच येते. लांब पल्ल्याची असल्याने या गाडीला पुढे काढतात.

मुर्डेश्वराजवळचं आणखी एक ठिकाण :- नेत्राणी आइलंड नावाचं बेट मुर्डेश्वरापासून समुद्रात वीस किलोमीटर आत आहे. तिथे स्कुबा डाइविंग करवतात. साधारणपणे पाच हजार रुपये प्रति व्यक्ती खर्च येतो. केरळमध्ये पुवार येथेही ही सोय आहेच. अंदमान, लक्षद्विप येथेही आहे. प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा असेल.

हे थोडक्यात लिहिलेलं प्रवासवर्णन वाचायला आवडेल अशी आशा आहे. सूचना आणि दुरुस्त्यांचं स्वागत.
===========================

प्रचेतस

मस्त भटकंती झाली ही.
गोपुरावरून दिसणारे दृश्य अप्रतिम. मुर्डेश्वरचे मुख्य मंदिर किती जुने आहे? सगळेच उद्योजकानेच बांधलेय की जीर्णोद्धार केला आहे?
भटकळ दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल्समुळे बदनाम झालेले आहे, तिथं फिरताना तसे काही जाणवलं का?
बाकी असेच फिरत राहा आणि लिहीत राहा.

कंजूस

मुर्डेश्वराचं छोटंसं देऊळ असावं कधीतरी पण आता सगळा कायापालट आहे.नेटवरच शोधावं लागेल. ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात ते पर्यटकांच्या फायद्याचे झाले आहे हे निश्चित. तसं पाहिलं तर कुमटा येथे आणि बरेच ठिकाणी अतिशय सुंदर समुद्रकिनारे आहेत कर्नाटकात. बेंगळुरूतल्या युवावर्गास जवळचा समुद्र हाच आहे. ब्रिटिश काळात ते लोक पूर्व किनाऱ्यावरील मछलीपट्टणम येथे घोड्यावरून जात आणि तिथून विलायतेला जहाजातून. थोडी पुस्तकं वाचेन म्हणजे कळेल. कारवारबद्दल माहीत आहे. १८५७ नंतर ब्रिटिशांनी कारवार हे आरमार बंदर म्हणून वाढवले. वसाहत वाढवली. त्या अगोदर कादवाड नावाची स्थानिक वस्ती होती. रविंद्रनाथ टागोरांचा भाऊ तिकडे गवर्नर म्हणून किंवा एक अधिकारी म्हणून आला होता आणि त्याच्याकडे येऊन राहिले होते. तो समुद्र किनारा त्यांना फार आवडला होता. ( कोलकात्याच्या हुगळी नदीच्यामुळे गाळाने भरलेल्या किनाऱ्यांपेक्षा वेगळा). त्यामुळे टागोर बीच नाव पडले कारवार बीचला.

भटकळ बद्दल काही सांगता येत नाही. आता दक्षिणेत कर्नाटक, तमिळनाडू फिरलो तर प्रत्येक शहराचे दोन भाग आहेत हे जाणवते. आपल्या फायद्याचे म्हणजे हिंदी बोलणारे लोक असतात अर्ध्या भागात . ते सर्व धंद्यात आहेत. ट्रान्सपोर्ट, हॉटेलिंग, फ्रूट मर्चंट, बेकरी उद्योग. सामान्य माणसास गरज लागणाऱ्या सर्व वस्तूंचे व्यापार.[ इथे अधिक लिहू शकत नाही.] बॅगा जवळ नसत्या तर भटकळ गावात फिरलो असतो. हा जो बस स्टँड आहे तो मुख्य रस्ता NH 66 वर आहे, भटकळ गाव किनाऱ्याकडे पसरले आहे. ठाण्याजवळच्या मुंब्र्याशी तुलना भटकळची होईल का सांगता येत नाही. सगळं गुप्तपणे चाललेलं असतं. आपल्याला समजत नाही. पण काही राजकीय सामाजिक उलथापालथी झाल्या की पेपरात बातमी येते. मंगळुरुच्या पुढे दक्षिणेला केरळमध्ये तीन जिल्हे हे मोपले चळवळीचे धरले जात असत. तिकडे केरळचे पर्यटक जात नाहीत. हल्ली वायनाडच्या प्रसिद्धीमुळे कोळ्हीकोडला ( जुने कालिकत) पर्यटक जातात.

भाषा - कारवार ते भटकळपर्यंत कारवारी कोकणी बोलली जाते. ती ऐंशी टक्के मराठी आहे. पण पुढे उडुपी पर्यंतची ख्रिश्चन मुसलमानांची लोकांची हीच भाषा आहे. उडुपी मंगळुरुचे हिंदू मात्र तुळु बोलतात. शेट्टी हॉटेलवाले तुळूच. पण ते खरे म्हणजे मदुराई जवळच्या चेट्टीनाड इथले आहेत.
काही आणखी खात्रीची माहिती सापडली तर लिहीनच.

आपल्या फायद्याचे म्हणजे हिंदी बोलणारे लोक असतात अर्ध्या भागात .

येस. चेनै मध्येही मला अस्खलित हिंदी बोलणारे दुकानदार भेटले होते व सर्व मुस्लीम होते. प्रादेशिक अस्मिता,धर्म वगैरे बद्दल कितीही डोकेफोड केली तरी परमुलखात
कमीतकमी आपली समस्या तरी समजणारा कोणी समोर असला तर फार बरे वाटते.

Bhakti

मस्त!!शेवटचा फोटो खूपच कमाल!
अशीच भटकंती करा!!

सुबोध खरे

भटकळ मध्ये ७५ % लोकसंख्या मुस्लिमांची आहे आणि तेथील बरेच तरुण आखाती प्रदेशात नोकरीला असत. यामुळे या लोकांमध्ये थोडी फार सुबत्ता आलेली होती

त्याचबरोबर तस्करी आणि गुन्हेगारी पण आली होती आणि नंतरच्या काळात इस्लामी मूलतत्त्ववाद हि वाढीस लागलेला होता.

मुंबईत फोर्ट भागात जसे तस्करीने आणलेले सामान मिळत असे ( मुंबईत मल्याळी मुसलमान जास्त होते) तसेच भटकळला सुद्धा या सामानाचे मार्केट होते (भटकळ दुबई मार्केट) पण त्या बाजारात तिथल्याच मुसलमानांचा जास्त सहभाग होता. अगदी नुकत्याच आंतराष्ट्रीय बाजारात आलेल्या वस्तू तेथे सहज मिळत असत.

१९९० -९१ च्या आसपास येथे सोने चांदी अमली पदार्थ आणि इलेकट्रोनिक सामानाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असे. माझे अनेक मित्र नौदलात विविध जहाजांवर होते त्यांच्याकडून अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकलेल्या आहेत.

१९९९-२००० या काळात मी तटरक्षक दलात तैनातीवर होतो त्यावेळेस तटरक्षक दल या भागावर "नजर" ठेवून होते.