जनातलं, मनातलं

बीस्ट ऑफ बाकू!

Primary tabs

४ नोवेंबर २०००. पश्चिम लंडनमधल्या हॅमरस्मिथ उपनगरातला रिवरसाईड टेलीविजन स्टुडियो. आत बसलेले काही भाग्यवान लोक श्वास रोखून पडद्याकडे बघत होते. आजच्याच डावात सारं काही संपणार की आणखी शेवटचा एक डाव खेळाला जाणार ह्याबद्दल उत्सुकता शिगेला पोचली होती.
पंधराव्या डावात काळी मोहोरी घेऊन खेळणार्‍या क्रामनिकनं अडतिसाव्या चालीला आपला हत्ती पाचव्या पट्टीत नेला. दोन्ही हात हनुवटीवर टेकवून पटाकडे रोखून बघणार्‍या त्याच्या प्रतिस्पर्ध्यानं एकवार सर्व मोहोर्‍यांकडे बघितलं, निग्रही चेहेर्‍यानं, पराभवाचं दु:ख दिसू न देता तो उभा राहिला आणि क्रामनिकसमोर बरोबरीच्या प्रस्तावासाठी हात पुढे केला. क्षणाचाही विलंब न लावता क्रामनिकनं तो प्रस्ताव स्वीकारला आणि जल्लोषाने दोन्ही हातांनी हवेत पंचेस मारले!
जगज्जेत्या व्लादिमीर क्रामनिकची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक होती कारण त्याने पराभूत केलेला खेळाडू कोणी ऐरागैरा नसून बुद्धीबळाच्या जगावर १९८५ पासून अधिराज्य गाजवणारा महान विश्वविजेता आणि त्याचा गुरु गॅरी कास्पारोव होता!! शिष्याकडून असा पराभव स्वीकारावा लागावा हे सुदैव म्हणावे की दुर्दैव असा प्रश्न गॅरीला पडला असेल!!!

गॅरी किमोविच वेइन्स्टाईन. पूर्वीच्या सोविएत संघराज्यातल्या अझरबैजान प्रांतातल्या बाकू ह्या गावी जन्मलेला गॅरी हा जणू बुद्धीबळ खेळण्यासाठीच जन्माला आला ह्यात शंका नाही! आईवडिलांनी दिलेला बुद्धीबळातला एक कूटप्रश्न सोडवताना त्याला खेळाची आवड निर्माण झाली. अर्मेनियन आई आणि ज्यू वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या गॅरीचे वडील त्याच्या वयाच्या सातव्याच वर्षी रक्ताच्या कर्करोगाने मृत्यूमुखी पडले. गॅरी दु:खी झाला. बाराव्या वर्षी त्याच्या आईचे 'कास्पारयान' हे अर्मेनियन आडनाव त्याने स्वीकारले आणि त्याचे कास्पारोव असे रशियनीकरण केले आणि झाला - गॅरी कास्पारोव!
(जाताजाता - ज्यू समाजाने जगाला विविध क्षेत्रातले किती उत्तमोत्तम लोक दिले आहेत हे बघण्यासारखे आहे. शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू, लेखक, वादक, कवी, शिल्पकार, चित्रकार, अर्थतज्ञ, डॉक्टर्स, इंजीनियर्स, तंत्रज्ञ कितीतरी असंख्य! सामाजिक दृष्टिकोनातून ही गोष्ट प्रकर्षाने नजरेत भरली आणि म्हणून त्याचा उल्लेख मी इथे करतोय.)
तर असा हा गॅरी वयाच्या दहाव्या वर्षी जगप्रसिद्ध मिखाईल बॉटविनिक चेस स्कूलमध्ये दाखल झाला. व्लादिमीर माकोगॉनॉव ह्या प्रशिक्षकाकडे त्याचे प्रशिक्षण सुरु झाले. खेळाच्या पोझीशनल प्रकारात गॅरीची चांगली तयारी व्लादिमीरने करुन घेतली. 'कॅरो-कान बचाव' आणि 'क्वीन्स गँबिट डिक्लाईन्ड' ओपनिंगमधले तार्ताकोर वेरिएशन ह्या दोन प्रकारांची त्याची विशेष तयारी झाली. (पुढे बर्‍याचदा पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळताना कास्पारोवने ह्या प्रकाराची ओपनिंग्ज वापरलेली दिसतात त्याचे मूळ ह्या सुरुवातीत असावे). जात्याच प्रतिभावान असलेल्या गॅरीने वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच सोवियेत ज्यूनिअर अजिंक्यपद पटकावले, इतकेच नव्हे तर लगोलग पुढल्या वर्षी त्याने तोच पराक्रम ८.५/९ गुणांसह पुन्हा केला!

ह्यानंतर त्याच्याकडे रशियन बुद्धीबळ जाणत्यांचे लक्ष गेले नसते तरच नवल. १९७८ साली मिन्स्क येथे झालेल्या सोकोल्स्की स्मृती स्पर्धेत त्याला एक आमंत्रित खेळाडू म्हणून पाचारण केले गेले आणि ती स्पर्धाच त्याने जिंकली! ही स्पर्धा हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल घडवणारी घटना होती ह्याचा कास्पारोवने पुढे वेळोवेळी उल्लेख केलाय. आपल्या अंगातली ह्या खेळाबद्दलची नैसर्गिक गुणवत्ता वेळीच ओळखून हा खेळ हेच आपले जीवनध्येय आहे हे लहान वयात जाणणे ह्यातच त्याच्या जगज्जेतेपणाचे रहस्य दडलेले आहे. (सगळ्या महान खेळाडूंबद्दल थोड्याफार फरकाने आपल्याला असेच म्हणता येते. सचिन तेंडुलकरचेच उदाहरण बघा ना. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी भारतीय संघात निवड आणि त्यानंतर विक्रमांची रास १९ वर्षांनंतर अजूनही चालूच आहे! आयुष्याचे ध्येय ज्यांना लवकर सापडते अशी माणसे निर्विवाद मोठी होतात किंवा खर्‍या अर्थाने मोठ्या असलेल्या बहुतेकांना त्यांचं ध्येय हे आयुष्यात लवकरच सापडलेलं असतं!!)
वयाच्या पंधराव्या वर्षी सोविएत बुद्धीबळ स्पर्धेसाठी पात्र ठरणारा त्या वेळेपर्यंतचा तो सर्वात सर्वात तरुण खेळाडू ठरला आणि त्याने ती स्पर्धा जिंकली देखील!

जागतिक बुद्धीबळ महासंघाने (फिडे FIDE) खेळाडूंची प्रतवारी ठरवलेली असते. जागतिक दर्जाच्या स्पर्धेत सहभागी होऊन ठराविक गुण मिळवून खेळाडू त्यांची गुणवत्ता सिद्ध करतात आणि त्यांना फिडे गुण देते त्याला इलो रेटिंग म्हणतात. (२८०० गुणांचं इलो रेटिंग पार करणारे फक्त चारच खेळाडू आजवर जगात झालेत गॅरी कास्पारोव, व्लादिमीर क्रामनिक, वॅसेलिन टोपालोव आणि विश्वनाथन आनंद! :)) तर ह्या 'फिडे'ने युगोस्लावियात घेतलेल्या ग्रँडमास्टर स्पर्धेत कास्पारोवने भाग घेतला. त्याचे वय बघून रशियन चेस फेडरेशनने ही ज्यूनियर लोकांची स्पर्धा आहे असा सोयिस्कर समज करुन घेऊन त्याला कोणतेही रेटिंग दिले नाही!! आणि अशा सर्वार्थाने अंडरडॉग असलेल्या गॅरीने ही स्पर्धाच जिंकली त्यावेळी फिडेने त्याला २५९५ गुणांचे तात्पुरते रेटिंग दिले (त्यावेळी जगज्जेता कारपोव २७०० रेटिंगवर होता त्यावरुन गॅरीच्या असामान्यत्वाची कल्पना येऊ शकेल!)
ह्या स्पर्धेनंतर कास्पारोव सुसाट सुटलाच त्याला जेरबंद करणारे कोणी नव्हतेच जणू!! लागोपाठ दोनदा रशियन अजिंक्यपद स्पर्धेत विभागून प्रथम क्रमांक मिळवून त्याने कँडिडेट स्पर्धेतलं आपलं स्थान निश्चित केलं (इथेही वयाच्या १९ व्या वर्षी दाखल होणारा सर्वात लहान खेळाडू तो होता, त्याआधी फक्त बॉबी फिशरने असा मान मिळवला होता!) आणि त्याच्या दृष्टिक्षेपात जागतिक अजिंक्यपद दिसू लागलं!!

अलेक्झांडर बेलिआवस्कीला ६-३ असे खडे चारून त्याने पहिली उपउपांत्य फेरी जिंकली. त्यानंतरच्या कोर्चनॉय विरुद्धच्या सामन्यात राजकीय अडचण उभी राहिली! सोविएत रशियाहून अमेरिकेला जाऊन मिळालेला कोर्चनॉय हा पहिलाच रशियन खेळाडू होता आणि उपांत्य फेरी कॅलिफोर्नियात पासाडेना इथे ठरली होती. त्यामुळे अमेरिकेत सामना होऊ द्यायचा नाही ह्याचे सर्व प्रयत्न झाले आणि कास्पारोव त्या सामन्याला मुकला. कोर्चनॉयने स्वतःच त्यावर सुवर्णमध्य काढला की सामना 'इथेही' नको 'तिथेही' नको लंडनमध्येच ठेऊ!! त्याप्रमाणे सरतेशेवटी सामना झाला. प्रबळ कोर्चनॉयने पहिल्या सामन्यात गॅरीला लोळवले पण जिद्दीला पेटलेल्या गॅरीने ७ - ४ असा विजय पटकावलाच! आता एकच अडथळा मधे होता, माजी विश्वविजेता वॅसिली स्मिस्लॉव! हा खरेतर एक बलाढ्य खेळाडू होता पण गॅरीसमोर कोणाची डाळ शिजणेच शक्य नव्हते. ८.५ - ४.५ अशा फरकाने एकही डाव न गमावता गॅरीने त्याला पाणी पाजले आणि तो विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर जाऊन उभा राहिला, वय वर्षे २१!!

सप्टेंबर १९८४. मॉस्को ट्रेड यूनियन मधल्या हॉल ऑफ कॉलम्समधे विश्वविजेतेपदाचा दावेदार कास्पारोव आणि जगज्जेता कारपोव एकमेकांसमोर आले. पहिल्या दहा सामन्यातच कारपोवने ४-० अशी आघाडी घेतली! कास्पारोव समर्थकांच्या तोंडचे पाणी पळाले. पहिल्यांदा ६ गुण मिळवणारा स्पर्धक जगज्जेता होणार होता. कास्पारोव ६-० असा धुतला जाणार अशीच बहुतेकांची अटकळ होती पण इतिहास असा सहजासहजी घडत नसतो! सलग १७ बरोबरीचे डाव सोडवून २७ वा डाव पुन्हा हरला, पुन्हा बरोबरीचे ४ डाव करुन सरतेशेवटी ३२व्या डावात कास्पारोवने पहिला विजय मिळवला, हुश्श!! इथून पुढेच खरी मजा सुरु होते. पुन्हा सलग १५ डावांची बरोबरीची मालिका सुरु राहिली. कोणताच खेळाडू अतिरिक्त धोका पत्करायला तयार नव्हता. (त्यावेळी सामन्यांच्या संख्येवर बंधन नसल्याने कितीही काळ स्पर्धा चालू राही!) ४६ डाव झालेले. (आधीचा विक्रम होजे कापाब्लँका वि. अलेक्झांडर अलेखाईन ह्यांच्यात १९२७ मधे झालेला तो ३४ डावांचा!)
४७ वा आणि ४८ वा डाव जिंकून कास्पारोवने कारपोवची आघाडी ५-३ अशी कमी केलीन. आणि इथे एक वादग्रस्त निर्णय घेतला गेला. फिडेचे त्यावेळचे अध्यक्ष फ्लोरेंशिओ कांपोमॅनेस ह्यांनी कोणाच्याही विरोधाला न जुमानता ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला!! कारण त्यांच्यामते कारपोवची तब्बेत प्रमाणाबाहेर ढासळलेली होती. पाच महिने चाललेल्या ह्या स्पर्धेत कारपोवचे वजन तब्बल १०कि. ने घटले होते आणि कास्पारोव तसा तुलनेने टुणटुणीत होता! आश्चर्य म्हणजे दोन्ही खेळाडूंची खेळ सुरु ठेवायला तक्रार नव्हती तरीही खेळ थांबवला गेला!! (अशा रीतीने कास्पारोवचे संबंध फिडेशी सुरुवातीपासूनच कटुतेचेच राहिले ते १९९३ साली तो पूर्णपणे वेगळी संघटना काढेपर्यंत!) अनिर्णित अवस्थेत थांबवली गेलेली ही एकमेव जगज्जेतेपदाची स्पर्धा ठरली!

ह्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी १९८५ ला पुन्हा स्पर्धा झाली, मॉस्कोतच झाली. ह्यावेळी मात्र जास्तितजास्त २४ सामने होतील, प्रथम १२.५ गुण मिळवणारा जिंकेल आणि १२-१२ अशी गुणसंख्या राहिली तर कारपोवच विश्वविजेता घोषित होईल असे नियम केले गेले. गेल्या वर्षीच्या अनुभवातून फिडे शहाणे झाले होते! ;)
ह्यावेळी मात्र निराशा झाली नाही. अत्यंत तुल्यबळ अशा लढल्या गेलेल्या ह्या लढतीत कास्पारोवने शेवटचा २४ वा डाव काळ्या मोहोर्‍यांनी जिंकून १३-११ अशी विजेतेपदाची माला गळ्यात घातली आणि सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा मान वयाच्या २२ व्या वर्षी पटकावला! (तब्बल २५ वर्षे हा विक्रम अबाधित होता १९६० मधे मिखाईल ताल विश्वविजेता ठरला त्यावेळी तो २३ वर्षांचा होता!)

ह्या स्पर्धेतला १६ वा डाव हा बुद्धीबळातल्या सर्वोत्तम डावांपैकी एक समजला जातो! सिसिलियन बचावातल्या ह्या वेरिएशनचे नावच कास्पारोव वेरिएशन असे रुढ झालेले आहे त्यावरुनच ह्याची महत्ता आपल्या ध्यानात यावी! सिसिलियन बचावातल्या डावातला काळ्या मोहोर्‍यांकडून खेळला गेलेला हा डाव एक मूर्तिमंत सौंदर्य आहे! आक्रमक खेळ कसा असतो ह्याचा वस्तुपाठ गॅरीने ह्या डावात दिलाय. मोकळ्या जागांचा सुरेख वापर करत, वजिराच्या बाजूने चढाई करत ३२ व्या खेळीला केलेले घोड्याचे बलिदान आणि त्यापाठोपाठ दोन हत्ती आणि वजिराच्या रेट्यात चिणून टाकलेला शेवटच्या पट्टीत कोपर्‍यात बसलेला असहाय राजा हे दृश्यच मोठं विदारक आहे! बुद्धीबळाच्या जगात हा डाव 'द ब्रिस्बेन बाँबशेल' ह्या नावानं सुपरिचित आहे.

फिडेचे जागतिक अजिंक्यपदाचे सामने दर तीन वर्षांनी होतात. पण ८४ सालचा सामना थांबवला गेल्यामुळे कारपोवला पुन्हा सामना खेळण्याची परवानगी मिळाली होती.
१९८६ साली पुन्हा सामना झाला. सुरुवातीला कास्पारोवने ३-० अशी आघाडी घेतली! त्यानंतर अचानक कारपोवने ३ डाव जिंकून बरोबरी साधली.
ह्या सामन्यांमधे दोन्ही खेळाडूंच्या तयारीमध्ये मदत करणारे मदतनीस असतात त्यांना सेकंड्स असे म्हणतात, अर्थात तेही उत्तम बुद्धीबळपटू आणि विश्लेषक असतात. कास्पारोवने, त्याच्या तयारीची गुपिते कारपोवच्या संघाला विकल्याच्या संशयावरुन मदतनिसांपैकी एवगेनी व्लादिमिरोव ह्याला हाकलून दिले! त्यानंतर एक सामना जिंकून १२.५ - ११.५ गुणाने कास्पारोवने त्याचा मुकुट राखला.
८४ सालनंतर तीन वर्षांनी १९८७ मधे पुन्हा स्पर्धा झालीच ह्याही वर्षी कँडिडेट स्पर्धेतून कारपोवच आव्हानवीर म्हणून पुढे आला! १२-१२ गुणाने बरोबरी साधत कास्पारोवने ह्याहीवेळी अजिंक्यपद टिकवले.
अशा रीतीने ८४ ते ८७ अशा चार वर्षात ह्या दोन खेळाडूत चार वेळा स्पर्धा झाली ही एक अभूतपूर्व अशी घटना होती!
ह्या दोघातला पाचवा आणि अखेरचा जगज्जेतेपदाचा सामना न्यू यॉर्क आणि फ्रान्समधे लियाँ अशा दोन ठिकाणी प्रत्येकी १२ सामने असा खेळला गेला त्यातही १२.५-११.५ असा कास्पारोवच विजयी ठरला!
बुद्धीबळाच्या इतिहासातली ह्या दोघा विश्वविजेत्यांची ही अनोखी जोडी म्हणावी लागेल जी अतिशय तुल्यबळ होती आणि कर्मधर्मसंयोगाने ७ वर्षात पाच वेळा समोरासमोर आली!

ह्यानंतर बुद्धीबळाच्या जगात वादळ आले ते कास्पारोवच्या फिडेविरुद्धच्या बंडाने! प्रोफेशनल चेस असोसिएशन ह्या नावाने त्याने एक वेगळीच समांतर संघटना उभी केली. त्याला जगभरातून पाठिंबाही मिळाला इंटेलसारख्या कंपनीने त्याला प्रायोजितसुद्धा केले. ह्याने कास्पारोवचा अहंकार सुखावला. नायजेल शॉर्ट ह्या ब्रिटिश ग्रँडमास्टर विरुद्ध पुढचा अजिंक्यपद सामना कास्पारोवने १२.५-७.५ असा सहजपणे खिशात टाकला त्याचवेळी फिडेने यान टिम्मन विरुद्ध कारपोव असा दुसरा जगज्जेतेपदाचा सामना घेतला त्यात कारपोव जिंकला! अशा रीतीने एकाच वेळी कास्पारोव आणि कारपोव दोघेही जगज्जेते होते!!
पुढे तेरा वर्षे हा प्रकार असाच चालू राहिला.
२००७ मध्ये कास्पारोवने कबूल केले की 'फिडेपासून वेगळे होण्यात माझे महत्त्व जरी वाढले तरी एकूण बुद्धिबळ ह्या खेळासाठी ती एक फार मोठी चूक ठरली. मी असे करायला नको होते!'

अत्यंत प्रतिष्ठेची लिनारेस स्पर्धा नवव्यांदा जिंकून २००५ सालच्या मार्चमध्ये 'बीस्ट ऑफ बाकू' ह्या टोपणनावाने ओळखल्या जाणार्‍या ह्या महान खेळाडूने बुद्धीबळाच्या व्यावसायिक जगाला रामराम ठोकला!

खेळण्यावतिरिक्त रशियन राजकाराणात वगैरे त्याने बर्‍याच उलाढाली केल्यात पण त्यात जाण्याचे आपल्याला कारण नाही. निदान व्यक्तिशः मला त्यात काडीचाही रस नाही! कास्पारोवने बुद्धीबळासंदर्भात उत्तम पुस्तके लिहिली आहेत त्यातली 'माय ग्रेट प्रेडेसेसर्स' आणि 'मॉडर्न चेस' ह्या दोन पुस्तकांच्या मालिका वाखाणण्याजोग्या आहेत.
यंत्राविरुद्ध खेळणारा खेळाडू म्हणूनही त्याने बराच लौकिक मिळवला आयबीएम ने तयार केलेल्या डीप ब्लू ह्या संगणकाविरुद्ध १९८९ ते २००३ ह्या चौदा वर्षात तो चार वेळा खेळला त्यात त्याने एकदा यंत्राकडून पराभव स्वीकारला आणि एकदा डीपला हरवले, दोनदा बरोबरी झाली!

आणखी एक अत्यंत अशक्यप्राय गोष्ट ह्या खेळाडूने करून दाखवली आहे. कास्पारोव विरुद्ध जग असा सामना १९९९ मधे आंतरजालाच्या मदतीने खेळला गेला. ७५ देशातले ५०,००० खेळाडू संगनमताने खेळत होते मताधिक्यानुसार खेळ्या ठरवल्या जात होत्या आणि ६२ खेळ्यांनंतर कास्पारोवने जगाविरुद्धचा हा सामना चक्क जिंकला!!

गॅरी कास्पारोव हा असामान्यच नव्हे तर बहुदा बुद्धीबळाच्या इतिहासातला सर्वोत्तम खेळाडू आहे. तो स्वभावतःच अत्यंत आक्रमक, प्रतिस्पर्ध्याला कसा आणि कुठून नेस्तनाबूत करु ह्या ईर्षेने पेटलेला खेळाडू म्हणून ओळखला जातो. प्रसंगी थोडा गर्विष्ठ, क्वचित उद्धट म्हणूनहि त्याचा लौकिक आहे.
त्याच्या खेळावर मिखाईल बॉट्विनिकचा प्रभाव आहे आणि ते सहाजिक आहे कारण त्याची घडणच बॉट्विनिक स्कूलमधे झाली. त्याच्या खेळात अलेखाईनचा भास होतो असं खुद्द बॉट्विनिकनंच म्हटलंय. गतिमान खेळ खेळण्यात जी अचाट एकाग्रता लागते ती गॅरीकडे आहे. नवनवीन चाली आणि त्यातून निघणारी वेरिएशन्स ह्यावर तो सामना चालू असताना सुद्धा काम करत असतो! पोझीशनल प्रकारात सुद्धा सातत्याने वेगवान हल्ले रचणे आणि पट हलता ठेवणे ह्याकडे त्याचा कल असतो. अतिशय धोकादायक चाली घेऊन बेधडक खेळणे आणि त्यातल्या खेळ्या यशस्वी करुन दाखवणे हे त्याचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. काळ्या मोहोर्‍यांनी खेळतानाही अतिबचावात्मक न खेळता प्रतिस्पर्ध्याला आपल्या मागे लागण्यासाठी तो मुद्दाम प्रवृत्त करतो आणि त्याच्या हल्ल्यात चूक झाली रे झाली की मग त्याच्या चिंधड्या ठरलेल्या!

कास्पारोव हा अत्यंत उत्तम फुटबॉलपटू आणि पोहोणारा सुद्धा आहे. बुद्धीबळ हा वरवर फक्त डोक्याचा खेळ वाटला तरी त्यासाठीही शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक अशी बाब आहे हे त्याने ठासून सांगितले आहे. अजून ह्या खेळाडूबद्दल लिहावे तितके थोडेच आहे पण शेवटी कुठेतरी मर्यादा घालायलाच हवी ह्या न्यायाने ह्या महान खेळाडूला मानाचा मुजरा करून मी लेखणी आवरती घेतो.

(छायाचित्र आंतरजालावरुन साभार!)
चतुरंग

घाटावरचे भट

एका महान बुद्धिबळपटूची तितकीच सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद रंगाराव.

अवलिया

हेच म्हणतो...

--अवलिया

सहज

अतिशय सुंदर ओळख.

२० मिनिटात सुडोकू सुटल्यावर आम्ही हवेत पंच मारतो. ह्या माणसाने - ७५ देशातले ५०,००० खेळाडू संगनमताने खेळत होते आणि ६२ खेळ्यांनंतर कास्पारोवने जगाविरुद्धचा हा सामना चक्क जिंकला!!

अफलातून!

टारझन

बेष्टेष्ट !!! रंगा काका , लै भारी लेख , आपल्याला बरंच काही माहित नव्हतं .. धण्यवाद @@
आव अवरते घेऊ नका .. क्रमश: करा

- टॅरी कॅस्पॉरॉव

तुमच्या कास्पारोववरच्या लेखाचीच वाट पाहत होतो बर्‍याच दिवसांपासून...
मस्त लेखाबद्दल धन्यवाद....
आनंद कास्पारोव्ह ९५ पीसीए मॅचबद्दलही वाचायला आवडले असते....( भाग २ करा अशी एक विनंती)

ते ८४ सालच्या स्पर्धेचे नेमके काय ल(फि)डे झाले ते आत्ता या लेखावरून कळाले....

रघुनंदन गोखले यांनी कास्पारोववर लिहिलेल्या महापुरुष / पूर्णपुरुष अशा शीर्षकाच्या लेखाची आठवण झाली...

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग

कास्पारॉव-आनंद पीसीए मॅचबद्दलही दुसरा लेख लिहीन!
(ही गोष्ट फारच वेड लावणारी आहे त्यामुळे मी सावधपणे त्यात शिरतो कारण किती वेळ जातो पत्ता लागत नाही. :()

चतुरंग

दशानन

अतिशय सुंदर व योग्य शब्दात जगजेत्याची माहीती !!

सुंदर.. तुमच्या कडून अश्याच लेखांची अपेक्षा असते :)

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

आनंदयात्री

छान .. चतुरंग रावांची ही मराठी आंतरजालावरची स्वतःच्या पद्धतीची वेगळीच लेखमाला. मला त्यांचा आवडणारा एक लेखनप्रकार. धन्यवाद यावेळेस सुद्धा उत्तम जमलाय लेख.

अवांतरः
मिपावर खरडफळ्यासारखा चेस जोडता येईल कदाचित .. साला ऑनलाईन मिपा बुद्धीबळ करंडक आयोजित करता येईल :)

सुनील

जगजेत्त्याची ओळख करून देणारा एक उत्तम लेख.

एक विनंती - असे विविध खेळाडूंची माहिती देणारे लेख तर लिहीत चलाच पण बुद्धीबळ ह्या खेळावरदेखिल एखादी लेखमाला आली तर उत्तम.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आनंदयात्री

>>एक विनंती - असे विविध खेळाडूंची माहिती देणारे लेख तर लिहीत चलाच पण बुद्धीबळ ह्या खेळावरदेखिल एखादी लेखमाला आली तर उत्तम.

अशीच आमची एक विनंती चतुरंगरावांनी कचर्‍याच्या टोपलीत टाकली होती !!

-
(सगळे हिशेब पुर्ण करणारा)

आंद्या हलकट

चतुरंग

मलाही बुद्धीबळाबद्दल लिहायला आवडेल पण वेळ फार जातो रे!
मी लिहू शकणार असलो तर मला आनंदच होईल! :)

(खुद के साथ बातां : रंगा, टोपली इकडे घे बरं आंद्याचा चिटोरा शोधून काढ तळातला! पाहू काय करता येतंय ;) )

(उंट) चतुरंग

आनंदयात्री

रंगाss रंगाssss !! अरे गुरुबंधुना आपण ?
तु लिहले नाहीस तर भिकार विषयांवरची अन तोचतोच पणा असलेली अन साधे काव्याचा वृत्तादी नियमसुद्धा न पाळणारी विडंबने टाकुन जेरीस आणेल मी अन समस्त विडंबन प्रजातीच्या तोंडाला काळे फासुन घेईन !!

चल दुसरी ऑफर ..

तु जर १० लेखांची उत्तम लेखमाला लिहलीस तर मिपावर चेस खेळता येईल असे मॉड्युल बनवायची जबाबदारी माझी. अर्थात ते वापरणे न वापरणे मालकांच्या हातात. पण त्यांना पटवायचा पण मी प्रयत्न करेन. बघ येड्या किती मजा येईल .. सामनेच सामने .. करंडकच करंडक .. अन मिपाचा कॉस्पोरॉव अर्थात तुच !!

-
(अँटी पॅटर्न वापरणारा)

आंद्या काळतोंड्या

कास्पारॉव्ह वरचा लेख आला. धन्यवाद रंगाशेठ. लेख अगदी 'संपूर्ण' झाला आहे. मजा आली.

एक हट्ट पुरवलात... आता दुसरा हट्ट... सुनील / आनंदयात्रीसाहेबांची सूचना मनावर घ्या. :)

बिपिन कार्यकर्ते

रंगराव, आता लवकरच पुढचाही लेख येऊ देत.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

असेच म्हणतो.
अजुन एका नितांत सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

मुत्सद्दि

चांगला परिचय
कास्पारोव व कार्पोव ह्यांच्यातील लढती नोंदवलेले पुस्तक आहे काय?
असल्यास भारतात कोठे मिळू शकेल?

मुत्सद्दि.

चतुरंग

http://www.amazon.com/Garry-Kasparov-Modern-Chess-Part/dp/1857444337
भारतात ते पुस्तक पाठवतात की नाही ते माहीत नाही. पण भारतातही पुस्तकाच्या एखाद्या उत्तम दुकानात कास्पारोव्-कारपोव लढतीचे पुस्तक मिळायला हरकत नसावी.
(पुण्यात असलात तर कँपमधे मॅनीज बुक स्टॉलला जरूर भेट द्या. बहुदा निराश व्हावे लागणार नाही!)

चतुरंग

रामदास

कास्पारावला सुध्दा हा त्याच्यावर लिहीलेला लेख वाचायला आवडेल.ते कास्पारव -कारपाव्ह -कोर्चनाय-फिशर यांच्या लढतीचे दिवस मंतरलेले होते.त्या वेळी पेपर वाचून त्या मूव्ह्ज परत पटावर मांडून खेळाचा आनंद काही वेगळाच होता.(मिपावरील पाकृ वाचून घरी त्या तशाच रीपीट करण्याचा आनंद जसा घेतो आहे तसाच.) बुध्दीबळातली लढत पटापुरती मर्यादीत न राहता रशियाचा आयरन कर्टन ,अमेरीकेतले मुक्त स्वातंत्र्य याची लढत अनुभवल्याचा आनंद मिळायचा.
एक परीपूर्ण लेख लिहील्याबद्दल आभार आणि अभिनंदन.

विसोबा खेचर

कास्पारावला सुध्दा हा त्याच्यावर लिहीलेला लेख वाचायला आवडेल.
एक परीपूर्ण लेख लिहील्याबद्दल आभार आणि अभिनंदन.

हेच बोल्तो! रामदासभाऊंशी सहमत...

रंगा, धन्य झालो रे! अरे या तात्याला मधुबाला जेवढी प्रिय ना, तेवढाच कास्पारावही!

मला मनस्वी माणसं आवडतात!

आज मिपावर त्याच्यावरचा लेख पाहून धन्य झालो, मिपा धन्य झाले!

आपला,
(कास्पारावचा जबरदस्त फ्यॅन) तात्या.

खालिद

कास्पारोव च्या खेळातील आणखी एक दागिना म्हणजे सिसिलिअन डिफेन्स वरील त्याची मास्टरी. त्याने आणि फिशर ने सिसिलिअन ला जगमान्यता मिळवून दिली असेच म्हणावे लागेल. पांढरी बाजू असताना सिसिलिअन ने सुरुवात करणारे फार थोडे वीर बघितलेत मी. हा त्यापैकीच एक.

(१०० मधील ९० वेळा इ४ ला सी५ ने उत्तर देणारा)
खालिद

चतुरंग

सिसिलियन डिफेन्स्वरचं त्याचं प्रभुत्व निर्विवाद होतंच आणि त्याला कारण म्हणजे त्याच्या खेळातला आक्रमकपणा.
तुमच्या विधानात एकच दुरुस्ती करायची आहे. हा डिफेन्स काळ्या मोहोर्‍यांसाठी आहे आणि 'आक्रमण हाच सर्वोत्तम प्रतिकार' ह्या न्यायाने जाणारा तो आहे.
ई४ ह्या पांढर्‍याच्या प्रथम खेळीला सी५ ही खेळी सिसिलियन मधे घेऊन जाते. त्यामुळे पांढर्‍याने सिसिलियन सुरु केला असे म्हणता येत नाही.

चतुरंग

खालिद


चतुरंगजी,

खरे तर मला त्या प्रतिक्रियेत कॅस्परॉव च्या एका डावाचा दुवा द्यायचा होता. त्यात त्याने पांढरी मोहरी घेउन सुरुवात सी४ ने केली आहे.म्हणून मी म्हटले की असे मी फार थोडे वीर पाहिलेत.

हा त्या डावाच दुवा

http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1070307

पांढरी मोहरी असताना सी४ ने सुरुवात केल्यास आक्रमण करण्यास त्रास होतो असा माझा स्वःत चा अनुभव.

असो,

(अवांतरः -

कॅस्परॉव विरुद्ध टोपालोव १९९९ चा हा डाव निर्विवाद पणे जगातील पहिल्या ३ सर्वोत्क्रूष्ट डावांमध्ये गणला जातो.

http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1011478

हे त्याचे विश्लेषण,

http://www.youtube.com/watch?v=9qW9oKma9YE

आणि हा गॅरीचा बुद्धिबळ विश्वातील गणला गेलेला मास्टरस्ट्रोक

http://www.youtube.com/watch?v=52wL2H7jO-I&feature=related

या एका डावाव्रर एक अख्खा लेख होउ शकेल ........)

चतुरंग

त्याला इंग्लिश ओपनिंग म्हणतात.
सिसिलियन हे निर्विवाद काळ्या मोहोर्‍यांसाठीच आहे. असो अधिक चर्चा खरडीतून श्रेयस्कर राहील.

चतुरंग

सुचेल तसं

चतुरंगराव,

बेष्ट लेख झाला आहे.

Finally I will be so matured that I will react to nothing.

धमाल मुलगा

रंगाशेठ,
काय मस्त माहिती दिलीत. धन्यवाद.

बाकी, आम्हाला ना बुध्दी ना बळ...त्यामुळे ह्या विषयी अक्कल एकुणातच कमी! पण असं असुनही हा लेख समजला. आवडला. ह्यातच माझ्या सगळ्या भावना व्यक्त झाल्या, काय म्हणता? :)

रंगाशेठ, कीप इट अप...लवकरच तुम्ही रेड्याकडूनही बुध्दीबळ खेळवून घेऊ शकाल :D

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म

चतुरंग

...लवकरच तुम्ही रेड्याकडूनही बुध्दीबळ खेळवून घेऊ शकाल

हे बाकी खरं नाही कारण माझ्या आजोबांकडून मी शिकलो त्यावेळी ते गमतीने म्हणायचे की तुला जर खेळायला येतंय तर मग कोणीही खेळू शकेल! ;)

चतुरंग

चतुरंग

पाहून खरंच धन्य झालो!
ह्यातलीच आणखी थोडी लुडबुड पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या प्रतिसादांमुळे हुरुप आलाय.
सर्वांना मनापासून धन्यवाद!! :)

चतुरंग

शितल

चतुरंगजी,
तुमच्या कडुन आम्हाला बुध्दीबळातील अशा महान खेळाडूंची माहिती मिळत असते तुमचे खुप आभार. :)