Skip to main content

बाल'भारती की 'बैल'भारती?

लेखक स्वधर्म यांनी शनिवार, 22/08/2026 22:14 या दिवशी प्रकाशित केले.

नुकतेच बालभारतीने इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल केले आहेत. त्यात खालील माहिती आहे:

- वेदकाळात आपले पूर्वज शाकाहार करत होते.

- वेदकाळात चार वर्ण होते. सर्व लोक आपआपली कामे व्यवस्थित करत होते. समाज गुण्यागोविंदाने रहात होता.

- आपल्याकडे उच्च दर्जाचे गणिताचे ज्ञान होते - वैदिक गणित.

- इतर अनेक पूर्वगौरव असणारा मजकूर आहे.

त्याबाबत मुंबई तक ने घेतलेली संस्कृत व इतिहास तज्ञांची मुलाखत : 

https://youtu.be/v1c-BKohgOE?is=-RjJD0N5fM6CxeEx

तसेच लोकसत्ताचा याच विषयावरील अग्रलेख:

https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-balbharati-class-6-history-textbook-controversy-vedic-diet-caste-system-amy-95-6089682/

सांगलीच्या जगदीश काबरे यांचा या विषयावरील लेख खाली देत आहे. त्यांनी त्यांचे लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी दिली आहे. 

वरील दोन संदर्भ व खालचा लेखात अतिशय योग्य मुद्दे मांडले आहत असे मला वाटते. बाकी शाकाहार चांगला की मांसाहार चांगला अशी चर्चा अपेक्षित नाही . मुले या वयात पाठ्यपस्तक हे संपूर्ण सत्य मानतात.  मिपाकरांना या बदलांबाबत काय वाटते ते समजून घ्यायला आवडेल.

*'बाल'भारती की 'बैल'भारती? –जगदीश काबरे*
सहावीच्या इतिहासात वैदिक काळातील आहार केवळ वनस्पती आधारित होता असे असा उल्लेख करून खरा इतिहास लपवण्यामागचे कारण आजच्या उच्चवर्णीयांचे शाकाहाराचे स्तोम कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे. तसेच या इतिहासाच्या पुस्तकात जातींचाही उल्लेख वगळण्यात आलेला आहे. इतिहास समितीच्या अध्यक्षा त्याच्या समर्थनात म्हणतात की, 'शालेय मुलांना जात व्यवस्था जन्मावर आधारित होती असे सांगितल्याने त्यांच्या विचारांवर अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. मोठे झाल्यावर त्यांना गुंतागुंतीची रचना समजेल.' पण त्या हे जाणून बुजून विसरतात की, बाल मानसशास्त्रानुसार लहानपणी डोक्यात घट्ट बसवले जाते तेच कायमस्वरूपी लक्षात राहते. इतिहास शिकायचा असतो तो केवळ भूतकाळातील राजे, युद्धे आणि सनावळ्या लक्षात ठेवण्यासाठी नव्हे, तर वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्य अधिक शहाणपणाने घडवण्यासाठी. इतिहास म्हणजे समाजाने केलेल्या प्रयोगांचा, चुका-यशांचा आणि त्यांच्या परिणामांचा सामूहिक अनुभव. एखाद्या निर्णयामुळे काय घडले, एखाद्या विचारसरणीचे सामाजिक परिणाम काय झाले, अन्यायाविरुद्ध लोकांनी कसा संघर्ष केला, लोकशाही कशी विकसित झाली, स्वातंत्र्य आणि समानतेच्या कल्पना कशा रुजल्या, हे समजून घेण्यासाठी इतिहास आवश्यक आहे. त्यामुळे इतिहासाचे खरे शिक्षण हे काय घडले? या प्रश्नापेक्षा का घडले? त्याचे परिणाम काय झाले? आणि त्यातून आपण काय शिकू शकतो? या प्रश्नांकडे घेऊन जाणारे असते.

सत्य इतिहास स्वतःहून बालमन बिघडवत नाही; परंतु तो कसा शिकवला जातो याचा परिणाम नक्की होतो. मुलांना समाजातील संघर्ष, हिंसा, जातीय भेदभाव, धार्मिक संघर्ष, अत्याचार किंवा युद्धांची माहिती देताना केवळ निवडक घटना सांगून थांबणे चुकीचे आहे. त्याचबरोबर त्या घटनांची कारणे, त्या काळाची सामाजिक परिस्थिती, त्या अन्यायाला विरोध करणारे लोक, बदलासाठी झालेली चळवळ आणि त्यातून निर्माण झालेली मूल्येही सांगितली पाहिजेत. अशा पद्धतीने शिकवलेला इतिहास मुलाला द्वेष शिकवत नाही; उलट अन्याय ओळखण्याची आणि त्याला विरोध करण्याची नैतिक जाणीव देतो. त्या ऐवजी वैदिक काळात समाजात चार वर्ण व्यवसायानुसार होते. ते एकमेकांशी सहकार्याने आणि सामंजस्याने राहत होते, असे खोटे सांगणे म्हणजे मुलांपासून सत्य लपवणे होय. खरेतर हेच त्यांच्या बालमनासाठी अधिक धोकादायक ठरू शकते. कारण लपवलेला इतिहास नंतर दुसऱ्या टोकाच्या प्रचारातून त्यांच्या समोर येऊ शकतो.

इतिहासाचे शिक्षण मुलाला ‘आपले लोक विरुद्ध परके लोक’ या मानसिकतेत अडकवण्यासाठी नसते. उलट, माणसाच्या अनुभवांची व्यापकता समजण्यासाठी असते. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचा अभिमान बाळगता येतो; पण त्यांनी केलेल्या चुका मान्य करण्याची प्रामाणिकताही असली पाहिजे. आपल्या समाजातील अन्यायाची कबुली दिल्याने समाजाचा अपमान होत नाही. उलट, चूक मान्य करून ती पुन्हा होऊ न देण्याची क्षमता ही प्रगल्भ समाजाची खूण आहे. व्यक्ती, समुदाय आणि त्यांच्या कृती यांच्यातील फरक समजणे हीच इतिहासाच्या चिकित्सक शिक्षणाची सुरुवात आहे.

इतिहास मुलांना भूतकाळाचा कैदी बनवत नाही; वर्तमानाचा जबाबदार नागरिक बनवते. इतिहासातील दुःखद आणि अनिष्ट प्रथा सांगणाऱ्या घटना लपवून मुलांचे बालपण ‘सुरक्षित’ ठेवता येईल, अशी कल्पना चुकीची आहे. मुलांना असत्यापासून नव्हे, तर असत्य, द्वेषपूर्ण प्रचार आणि अर्धसत्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे शिकवणे अधिक महत्त्वाचे आहे. सत्य इतिहास जर पुराव्यांच्या आधारे, संवेदनशीलतेने आणि चिकित्सक दृष्टीने शिकवला, तर तो बालमन खराब करत नाही उलट ते अधिक समंजस, सहिष्णू, प्रश्न विचारणारे आणि जबाबदार बनवतो, हे आजच्या इतिहास अभ्यासक समितीच्या विद्वानांना माहित नाही काय?🤔JK


वाचने 893
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी  हे विषय शालेय अभ्यासक्रमातून आणि समाजशास्त्र, राजकारणशास्त्र, मानववंशशास्त्र हे विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून संपूर्ण काढून टाकून त्याऐवजी संगणक, कला, क्रीडा, कृबु, कौशल्य, एखादी परकय भाषा या विषयांचा समावेश करायला हवा. 


In reply to by श्रीगुरुजी

सध्या जो काही मोडका तोडका इतिहास शिकवला जातो तसा असतानाही बस नाम रहेगा अल्लाका म्हणजे अहं तत्त्वमसि म्हणणारे मोठे मोठे विद्वान प्राध्यापक लोक इथे मिपावर आहेत. त्या अश्लाघ्य प्रकाराचे समर्थन करणारे अनेक प्राडॉ मिळतील. तो पण इतिहास शिकवणे बंद झाले तर काय होईल? बापरे धडकीच भरते.

 

असो.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

चुकीचा इतिहास शिकविण्यापेक्षा काहीही न शिकवलेलं बरं हे बरोबर आहे पण काव्य समजण्यासाठी किंवा बुद्धी आणि समजुतीचा व्यास वाढविण्यासाठी इतिहास, भाषा आणि टीकात्मक बुद्धीची गरज आहे. त्यांची गरज किंवा आवड नसेल तर त्यांनी शाखेवर जावे. 

AI Start
फैझ अहमद फैझ यांच्या ‘हम देखेंगे’ कवितेतील ‘अनल हक’ चा संदर्भ आणि भारतीय तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी थोडा इतिहास तपासणे गरजेचे आहे:

१. ‘अनल हक’ आणि मन्सूर अल-हल्लाज:

ही घोषणा १० व्या शतकातील सुफी विचारवंत मन्सूर अल-हल्लाज यांची होती. मन्सूर यांनी इ.स. ९०५ च्या सुमारास भारताचा (विशेषतः सिंध, गुजरात आणि काश्मीर) विस्तृत प्रवास केला होता. त्यांनी भारतीय साधू-संतांच्या भेटी घेऊन उपनिषदे, अद्वैत वेदांत व भारतीय दर्शन परंपरेचा सखोल अभ्यास केला होता.

२. ‘अहं ब्रह्मास्मि’ आणि ‘अनल हक’ मधील अद्वैत:

उपनिषदांमधील "अहं ब्रह्मास्मि" (मीच परब्रह्म आहे) आणि मन्सूर यांचा "अनल हक" (मीच अंतिम सत्य/ईश्वर आहे) या दोन्ही एकाच अद्वैतवादी विचाराची रूपे आहेत. जीव आणि ब्रह्म वेगळे नसून एकच आहेत, हाच भाव यात आहे.

३. कट्टरपंथीयांकडून हत्या:

बगदादमध्ये परतल्यावर जेव्हा मन्सूर यांनी ‘अनल हक’चा विचार मांडला, तेव्हा तत्कालीन सनातनी कट्टरपंथी मुल्ला-मौलवी आणि अब्बासी राज्यकर्त्यांनी याला ईशनिंदा मानले. या अद्वैतवादी विचारासाठी इ.स. ९२२ मध्ये मन्सूर यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.

४. फैझ यांचा संदर्भ:

फैझ यांनी झिया-उल-हक यांच्या लष्करी हुकूमशाहीविरोधात हेच रूपक वापरले:

"उठ्ठेगा 'अनल हक' का नारा, जो मैं भी हूँ और तुम भी हो"

म्हणजेच हुकूमशहा अंतिम सत्य नसून ईश्वरी अंश आणि खरी सत्ता ही सामान्य लोकांमध्ये (तुम्हा-आम्हामध्ये) आहे.

त्यामुळे या ओळींमागे सनातनी किंवा कट्टरतावादी विचार नसून, भारतीय उपनिषदांशी नातं सांगणारा आणि कट्टरपंथीयांच्या विरोधात हौतात्म्य पत्करलेल्या मन्सूरचाच अद्वैतवादी इतिहास आहे.
AI End
 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

फक्त एक ओळ घेऊन व इतर तात्कालिन संदर्भ विचारात न घेता काढलेला निष्कर्ष वाटतोय. समग्र कविता व त्यावेळची परिस्थिती लक्षात घेतली, तर तुंम्हाला असा संकुचित अर्थ लागणार नाही.


In reply to by श्रीगुरुजी

+१ 

हे विषय का शिकवले जातात हे मला आजपर्यंत कळले नाही. समजा भारताच्या दक्षिणेला श्रीलंका आहे नी उत्तरेला मंगोलिया आहे हे मला माहीत झाले तर त्याचा मला काय रोजगार मिळणार? इतका वेळ, मनुष्यशक्ती हे फालतू विषय शिकवण्यात का घालवले जातात? मला वाटते, त्या ऐवजी मी वेल्डिंग, सुतारकाम किंवा आणखी काही शिक्लोनस्तो तर जास्त समृद्ध असतो. 

 आठवी पासून आम्हाला शाळेनंतर “टेक्निकल विषय होता, आठवड्यातून दोन वेळा संपूर्ण दिवसासाठी म्हणजे सकाळ नेहमीची शाळा + दुपार टेक्निकल शाळा असे जावे लागे. टेक्निकल शाळेतही अतिशय पांचट शिक्षण दिले जायचे म्हणजे काय तर स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग हातोडी म्हणून करू नये प्रकारचे!  


दबावाखाली कामं करतात. लेखन करतात. नोकरीवर परिणाम होतो.

 

परीक्षेत गुण मिळवायचे असतील तर पुस्तकातील धड्यातील वाक्ये लिहून काढा - विद्यार्थ्यांसाठी.


चांगला विषय.  

 

जगदीश कांबरे यांनी योग्य विचार लेखनात मांडले आहे. इतिहासातील गोष्टी वर्तमानात येताना  सत्य घेऊन आले पाहिजे.  नव्या शैक्षणिक धोरण २०२० मधे सद्य सरकार, आपलं धोरण राबवू पाहात आहे, त्यामुळे शिक्षणाचं नव्हे तर नव्या पिढीचं नुकसान होत आहे.  शाळांमधे आणि उच्चशिक्षणामधे 'भारतीय ज्ञान परंपरा' नव्या बदलांसहित मुलांच्या डोक्यात उतरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. खोटी तथ्य, सत्त्य म्हणून मांडणे सुरु आहे.  प्राचीन विज्ञान, गणित, आयुर्वेद, योग, दर्शन आणि कला यांसारख्या समृद्ध वारसा भारताकडे आहे, पण त्याची सोयीने मांडणी  सुरु आहे. या विषयांची आपल्याला ओळख नव्हती का ? तर होती. पण, आताच्या  या प्रक्रियेमुळे आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन, ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि घटनात्मक मूल्ये धोक्यात येण्याची भीती व्यक्त शिक्षण व्यवस्थेत व्यक्त होत असते. 

सरकार आणि त्याची विचारसरणी यांचा शिक्षणाशी खूप जवळचा संबंध असतो. कारण शिक्षण हे समाज आणि येणारी पिढी घडवण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. सरकार बदलले की शिक्षणातील धोरणे कशी बदलतात, सरकार आपल्या विचारसरणीनुसार इतिहासातील काही घटना, व्यक्तींचे, महत्त्व वाढवू शकते किंवा कमी करू शकते बदल करुन मांडू पाहत असते. शाळा, विद्यापीठे, अभ्यास मंडळे आणि  शिक्षण मंडळांच्या प्रमुख पदांवर सरकार आपल्या विचारसरणीशी सुसंगत असलेल्या तज्ज्ञांची नेमणूक करते, आणि मग ते असे वेगवेगळे बदल करु पाहतात. 

नव्या पिढीला केवळ पोपटपंची करणारे शिक्षण नको, तर त्यांच्यात नवा दृष्टिकोन बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण हवे, हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या आधुनिक जगाची गरज पाहता,  शिक्षणात तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, कौशल्यांवर भर, रोजगार देणारे,  देश आणि समाजाविषयीची संवेदनशिलता, त्याची बांधणी शाळेपासून केली पाहिजे.  दुर्दैवाने शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षण नव्या शैक्षणिक धोरणाने संकटात सापडले आहे. 

 

 

-दिलीप बिरुटे


- वेदकाळात आपले पूर्वज शाकाहार करत होते. == चूक 
- वेदकाळात चार वर्ण होते. सर्व लोक आपआपली कामे व्यवस्थित करत होते. समाज गुण्यागोविंदाने रहात होता. == बरोबर 
- आपल्याकडे उच्च दर्जाचे गणिताचे ज्ञान होते - वैदिक गणित. == बरोबर 
- इतर अनेक पूर्वगौरव असणारा मजकूर आहे. == बरोबर

७५% बरोबर आहे, २५% चूक आहे. जे चूक आहे ते सुधारायला हवे; जे बरोबर आहे ते वाढवायला हवे.

 

- (सुधारणावादी) कांदा लिंबू


In reply to by कांदा लिंबू

>> - वेदकाळात चार वर्ण होते. सर्व लोक आपआपली कामे व्यवस्थित करत होते. समाज गुण्यागोविंदाने रहात होता. == बरोबर 

प्राचीन काळी:

- एकलव्याला शिकवायला नकार देणे व त्याचा अंगठा कापणे.

- रामाने शंबुकाचे शीर उडवणे

- कर्णाला द्रौपदीने स्वयंवरात भाग घेण्यापासून रोखणे

गेल्या काही शतकात:

- स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नसणे (सावित्रीबाई फुलेंवर दगड व शेण फेकणे)

- अस्पृशांना गळ्यात मडके व मागे झाडू बांधण्याची सक्ती असणे

- अस्पृश्यांची वस्ती गावाबाहेर असणे.

अशा काही तात्कालिन वस्तुस्थितींचा विचार केला तर समाज गुण्यागोविंदाने रहात होता असे दिसत नाही. 

सध्याच्या जन्मात आपण ज्या समाजगटातून (वर्णातून) येतो, त्यामुळे तर 'समाज गुण्यागोविंदाने रहात होता.' अशी समजूत होत नाही ना, याचा विचार जरूर करावा अशी विनंती करतो. खूप कमी लोक इतरांच्या दृष्टीकोनातून विचार करू शकतात (एम्फथी) त्यामुळे ठीकच.

व्हिडीओमध्ये वैदिक गणित ही कल्पना कशी तयार झाली व त्यास पुरावा कसा मिळत नाही ते सांगितले आहेच.


In reply to by स्वधर्म

अस्पृशांना गळ्यात मडके व मागे झाडू बांधण्याची सक्ती असणे

खुद्द भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे यदुनाथ थात्ते यांनी याबद्दलचा पुरावा मागितला होता आणि बाबासाहेबांनी प्रामाणिक पणे याचा पुरावा नाही असे सांगितले होते.  


In reply to by अप्पा जोगळेकर

मी जे म्हणालो ते बाबासाहेबांनी कधीतरी म्हटले होते या माहितीबद्दल आभार. त्यामुळे ती थाप नसून तिला बाबासाहेबांच्या विधानाचा आधार आहे हे स्पष्ट झाले. बहुधा बाबासाहेबांना '' असे म्हणण्याची तुमच्यात हिंमत नसल्याने मला म्हणत आहात, ते तुंमच्या एकंदर वकूबाला अनुसरूनच आहे. बाकी केळकर व बाबासाहेब यांच्यातील चर्चेचा संदर्भ अवश्य द्या, सगळ्यांच्या ज्ञानात भर पडेल. असो.

================

सोईस्करपणे ज्या गोष्टीबद्दल कदाचित स्पष्ट ऐतिहासिक कागदपत्रांचा पुरावा नाही परंतु समाजात सर्वसाधारण रूढी होती, फक्त तीच गोष्ट उचलून चर्चा भरकटवू नका, ही विनंती. 

आपले मी दिलेल्या 

- स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नसणे (सावित्रीबाई फुलेंवर दगड व शेण फेकणे)

- अस्पृश्यांची वस्ती गावाबाहेर असणे.

व बाकीच्या न दिलेल्या अनेक उदाहरणांतून आपण उच्च वर्णांचे लोक तथाकथित अस्पृश्य समजल्या गेलेल्या लोकांचे शोषण करत नव्हते, चारी वर्णाचे लोक गुण्यागोविंदाने रहात होते हे म्हणू शकता का? समाजात प्रचंड वर्ण जातींची उतरण होती व शोषण होत होते ही गोष्ट बालभारतीने गैरसोईची आहे म्हणून लपवणे आपल्याला पटते का? हे मुद्दे सोईस्करपणे टाळू नका. 

 

 

 


In reply to by स्वधर्म

 इतिहास अभ्यासक य. न. केळकर यांनी ५ जून १९३६ च्या केसरी पत्रात आक्षेप घेत म्हटले की, पेशवेकालीन लक्षावधी दस्तऐवज आणि उपलब्ध पुराव्यांमध्ये अशा प्रकारची कोणतीही क्रूर प्रथा किंवा लिखित आदेश आढळून येत नाहीत.  त्यांनी या दाव्याचे ऐतिहासिक पुरावे मागितले. 

आंबेडकरांचे स्पष्टीकरण

६ जुलै १९३६ रोजी केसरी वृत्तपत्रात आलेल्या उत्तरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले की, या विशिष्ट घटनेबाबत त्यांच्याकडे कोणताही थेट लिखित किंवा दस्तऐवजीय पुरावा उपलब्ध नाही.

हा उल्लेख जुन्या पिढीतील वृद्धांकडून आणि मौखिक परंपरेतून ऐकलेल्या माहितीवर आधारित होता, असे त्यांनी प्रांजळपणे नमूद केले. 


In reply to by अप्पा जोगळेकर

याचा दुवा किंवा संदर्भ फक्त द्या. एवढे तारीखवार सांगत आहात तर हे कुठून शोधले? त्याचा दुवा द्या.

एक तर तुंम्ही सतत फक्त एक गोष्ट उचलून चर्चा करत आहात पण बालभारतीने आपल्या समाजात शोषण होते हे लपवले ते मान्य करण्यापासून पळ काढत आहात.   बाबासाहेबांकडे आधार नसेल तर मान्य करण्याचा मोठेपणा होता पण बाबासाहेब केळकर यांच्या संदर्भ तुंम्हाला मागितला (तुमचे आकलन नव्हे). तशी काही लिंक  तुमच्याकडे आहे का?  


In reply to by स्वधर्म

पुरेसे तपशील दिले आहेत. इच्छा असेल तर तुम्ही स्वतः टिळक स्मारक ट्रस्ट मधे जाऊन केसरीच्या अंकांची छाननी का करत नाही. आणि इच्छा नसेल तर स्वतःच्या समजुती कुरवाळत बसा. 


In reply to by स्वधर्म

धागा करते स्वतःला घटनाकारां पेक्षाही उच्चस्थानी समजतात असे दिसते.  त्यामुळे इतर निरर्थक दावे खोडून काढण्यासाठी संदर्भ देत बसणार नाही 


In reply to by अप्पा जोगळेकर

आंबेडकरांचा उपमर्द ढाल करून वापरता आहात का ? तुमच्यासारख्या थेट बोलणाऱ्या माणसाला शोभले नाही हे. 

 

(आप्पांच्या गप्पा सदर भूतपूर्व वृत्तनिवेदक) खोंडे.


In reply to by अप्पा जोगळेकर

संदर्भ नसेल, आपल्या म्हणण्याला आधार नसेल तर असे व्यक्तीगत बोलून दुसऱ्याला नांवे ठेवणे करावे लागते. तुंम्हाला बालभारतीसारखे वेदकाळात शूद्रांचे शोषण होत नव्हते असे म्हणायचे आहे का? 

मी उदाहरणादाखल केवळ तीन मुद्दे सांगितले, पण बरेच आहेत. एकाच मुद्द्यावर तुमची गाडी अडली आहे आणि संदर्भ देणार नाही म्हणत आहात. तुमच्याकडे बालभारतीचे समर्थन करणारे स्वतंत्र काही मुद्दे आहेत का?


In reply to by स्वधर्म

**बाबासाहेबांच्या विधानाचा आधार**

 

बाबासाहेबानी म्हटले हा आधार असू शकत नाही. एखादी प्रथा खरोखर प्रचालनात होती का नाही हे पाहण्यासाठी तत्कालीन पुरावे, विदेशी लोकांची प्रवासवर्णने, दप्तरातील नोंदी इत्यादी सर्व काही पहिले पाहिजे. त्यानंतर counter examples पाहिली पाहिजेत आणि तात्कालिक इतर समाजांकडे त्याची तुलना केली गेली पाहिजे. त्यानंतर आम्ही त्याला प्रचलनातील प्रथा म्हणू शकतो. 

 

** स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नसणे (सावित्रीबाई फुलेंवर दगड व शेण फेकणे) ** 

 

स्त्रियांना शिकण्याचा "अधिकार" नसणे.

ह्याला सुद्धा आधार नाही. "अधिकार" हा शेवटी कायद्याने दिला जातो. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तर विविध हिंदू आणि मुस्लिम दप्तरांत त्याच्या नोंदी असल्या पाहिजेत. कुणा महिलेने शिक्षण वगैरे घेतले तर तिला किंवा तिच्या शिक्षकाला शिक्षा दिली असल्या नोंदी असल्या पाहिजेत.

भारतीय व्यवस्थेंत लोकांना गोमांस खाण्याचा अधिकार नव्हता असे आम्ही म्हणू शकतो कारण गोहत्या केली म्हणून शिक्षा करण्याची अनेक ऐतिहासिक उदाहरणे नोंदी आढळतात.

काही वेळा अधिकार हे कायेदशीर नसले तर कदाचित धार्मिक स्वरूपाचे असू शकतात. तसे असेल तर धर्मशास्त्रानुसार त्याला आधार काय ? ह्यावर कधी चर्चा झाली होती का, कुणी ह्याला आव्हान दिले होते का इत्यादी पहिले पाहिजे. विविध भारतीय स्त्रियांना वाचता आणि लिहिता येत होते हे सर्वश्रुत आहे. अहिल्याबाई होळकर किंवा राणी लक्ष्मीबाई ह्यांना लिहिता वाचता येत होते. मग धार्मिक दृष्टया बंदी होती तर त्याकाळी त्यांच्यावर कुणी बोट का दाखवले नाही ? उलट गोडसे ह्या ब्राम्हणाने लक्ष्मीबाईची हुशार मुलगी म्हणून स्तुतीच केलेली आढळते.

ह्याशिवाय असंख्य ब्रिटिश, फ्रेंच, डच, अमेरिकन आणि इस्लामिक प्रवासी अधिकारी ह्यांनी विविध कालखंडात भारतीय समाजाचे वर्णन केले आहे. कुठेही त्यांनी "स्त्रियांना अधिकार नव्हता" असे लिहिलेले आढळून येत नाही.

त्याकाळी एकूण जगाचा शिक्षणस्तर फारच कमी होता. स्त्रियांचा आणखीन कमी होता. भारताची सुद्धा तीच अवस्था होती. विविध अधिकारी लिहितात कि भारतीय स्त्रियांची शाळेंत जाण्याची संख्या नगण्य होती पण अनेक स्त्रिया विशेष म्हणजे देवदासी, क्षत्रिय आणि ब्राम्हण स्त्रिया घरीच शिक्षण घेत असत. मद्रास प्रांतांत १५०,००० शालेय विद्यार्थ्यांत ५००० मुली होत्या असे उल्लेख आढळतात. बिहार मध्ये मुलींनी शिक्षण घेतल्यास त्यांना अकाली वैधव्य येईल अशी समजूत लोकांची आहे असे बिहार प्रांतातील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिले आहे. अश्या प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा मुलींनी शिक्षण घेण्यास काही कर्मठ लोकांचा विरोध ह्यावर अनेकांनी भाष्य केले असले तरी भारतीय समाजांत "स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता" असे मात्र कुणीही लिहले नव्हते.

त्याच काळांत ब्रिटिश शाळांत मुलींना प्रवेश द्यायचा नाही असे नियम होते. अश्या प्रकारचे नियम भारतांत कुठेही कुठल्याही संस्थेमध्ये होते असे उल्लेख मला तरी आढळले नाहीत. भारतात तत्कालीन व्यवस्थेतील पाठशाळा किंवा मदरसे हे प्रामुख्याने मुले आणि विशिष्ट व्यावसायिक गरजा (हिशेब, महसूल) लक्षात घेऊन चालवले जात. शाळांत मुली न जाणे हे नियमापेक्षा सार्वजनिक व्यवस्थेचा अभाव आणि सुरक्षा/पडदा पद्धत यांमुळे अधिक होते.

याच काळात युरोप आणि ब्रिटनमध्येही स्त्रियांना ऑक्सफर्ड किंवा केंब्रिजसारख्या विद्यापीठांत पदवी घेण्याचा अधिकार नव्हता. १८ व्या शतकात इंग्लंडमध्ये बहुतांश औपचारिक शाळा केवळ मुलांसाठीच होत्या.

सावित्रीबाईच्या काळांत बहुसंख्य भारतीय महिला, बहुसंख्य पुरुषांप्रमाणे निरक्षर होत्या कारण शिकण्याचे महत्वच लोकांना नव्हते. कुणी आवड म्हणून शिकायचं प्रयत्न केल्यास साधने उपलब्ध नव्हती आणि कर्मठ, अंधविश्वासू लोकांचा विरोध सुद्धा होता असे सुद्धा आपण म्हणून शकतो ह्याचा अर्थ "अधिकार नव्हता" असा होत नाही.

 

 


In reply to by साहना

मूळ मुद्दा असा होता की चारी वर्णाचे लोक गुण्यागोविंदाने रहात होते का? त्यांच्यात शोषण होते की नाही? तथाकथित खालच्या समजल्या गेलेल्या वर्णात जन्मलेल्या व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व शिक्षण घेण्याची संधी होती का? त्याबद्दल तुमचे आकलन आणि बालभारतीने लिहिलेला 'इतिहास' एकच आहे का? ते तुंम्ही सांगणे महत्त्वाचे आहे. बाकी एखाद्या उदाहरणाचा किस काढून काय फायदा आहे?  

मुलींना शाळा काढून शिकवतात म्हणून सावित्रिबाई फुले यांना दगड आणि शेण झेलावे लागले हे शेकडो ठिकाणी नोंदलेले आहे. किती शूद्रांना त्या काळात लिहिता वाचता येत होते कि ते आपल्यावरील अन्याय लिहून ठेवतील? शूद्रांना गळ्यात मडके बांधावे लागते व मागे झाडू बांधावा लागतो याची नोंद/डॉक्युमेंटेशन कोणता तथाकथित शिकलेला उच्चवर्णीय करून ठेवेल? आणि कशाला? शूद्रांना आपली परिस्थिती कागदोपत्री नोंदवून ठेवायला लिहिता तर आले पाहिजे ना. मग नोंद नाही म्हणून तशी परिस्थितीच नव्हती असे म्हणणार? हाच बाबासाहेबांचा मुद्दा होता. 

तुंम्ही कायद्यात स्त्रियांना शिकायला बंदी नव्हती असे सिध्द करून काय फायदा? स्त्रियांना निवडणूक लढवायला बंदी असावी असा कायदा आजही नाही पण किती स्त्रिया निवडून येतात? उलट त्यांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आज १५० वर्षांनी कायदा करायला निघाली आहे संसद! 

एका उदाहरणाचा वकिली पॉइंट म्हणून म्हणणे खोडण्यासाटी वापर करणे ठीक आहे पण वस्तुस्थितीचे निदर्शक म्हणून हास्यास्पद! कायदयाबाबत 'ॲबसेन्स ऑफ इव्हिडन्स इज नॉट ॲन इव्हिडन्स ऑफ ॲबसेन्स' No evidence foundProof that something is false हे ऐकले आहे का?


In reply to by स्वधर्म

**मूळ मुद्दा असा होता की चारी वर्णाचे लोक गुण्यागोविंदाने रहात होते का? त्यांच्यात शोषण होते की नाही?**

अजिबात नाही. कुठल्याही मानवी समाजाप्रमाणे इथे सुद्धा भांडणे, रक्तपात, शोषण इत्यादी होत होते.


> तथाकथित खालच्या समजल्या गेलेल्या वर्णात जन्मलेल्या व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व शिक्षण घेण्याची संधी होती का? त्याबद्दल तुमचे आकलन आणि बालभारतीने लिहिलेला 'इतिहास' एकच आहे का? ते तुंम्ही सांगणे महत्त्वाचे आहे. बाकी एखाद्या उदाहरणाचा किस काढून काय फायदा आहे?  

पण सर्व इतिहास आणि दस्तवेज पाहता भारतीय समाजांत तथाकथित खालच्या वर्णाचे पद्धतशीर पणे केवळ वर्ण ओळखीमुळे शोषण होत होते किंवा त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नव्हता ह्याला काहीच पुरावा नाही उलट पुरावे उलट्या बाजूने सापडतात. त्याशिवाय तथाकथित वर्ण सुद्धा constant नव्हते हेच ऐतिहासिक दस्तऐवज सांगतात.

धर्मपाल ह्यांचे The Beautiful Tree हे पुस्तक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सर्वे वरून खालील आकडेवारी देते :

Dharampal documented that Shudras and castes placed below them formed the majority of pupils in traditional village elementary schools (pathshalas), particularly across southern India. In the Tamil-, Malayalam-, and Kannada-speaking districts of the Madras Presidency, Shudras and "other castes" (including groups later classified as Scheduled Castes/Panchamas) accounted for 70% to over 84% of the total student body (e.g., over 84% in South Arcot, ~70% in Salem and Tirunelveli)

Teaching was not the exclusive preserve of Brahmins. Non-Brahmin and lower-caste teachers—including Shudras, Kayasthas, and artisan communities—ran and taught in a significant proportion of village schools. In Bengal and Bihar, Adam's records listed teachers from a wide variety of intermediary and occupational castes.

Indigenous education was maintained not by state control, but by village revenue allotments and community contributions. Dharampal argued that the dismantling of traditional land-revenue systems and the centralization of education under colonial rule disenfranchised these decentralized village schools, disproportionately depriving lower castes of accessible education.

surveys by William Adam (Bengal/Bihar) and Sir Thomas Munro (Madras) indicated an active village-level network—estimated at approximately one school per village (or roughly 100,000 village schools across Bengal and Bihar alone).

हे सर्वे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्वतः केले होते त्याशिवाय विविध प्रवासी आणि इतर लोकांनी सुद्धा हेच नमूद केले आहे.

त्याशिवाय "शूद्र" लोक बहुसंख्य होते. भारतीय लोकांनी जेंव्हा किल्ले, मंदिरे, तलाव, बांध, महाल, शिल्पे, स्टील इत्यादी निर्माण केले त्यावर शूद्र लोकांनीच काम केले होते. पिढ्यानपिढ्या व्यावसायिक शिक्षण, ते शिक्षण पुढील पिढीला देण्याची यंत्रणा आणि त्यातून निर्माण झालेल्या भव्य गोष्टी ह्या शूद्र वर्णातील लोकांनी नाही निर्माण केल्या तर कुणी केल्या ? एखाद्याचे शोषण करून तुम्ही कदाचित त्याला शेती करायला लावू शकता पण सूर्यमंदिर बांधायचे आहे किंवा उच्च दर्जाची तलवार करायची असेल तर त्यासाठी  आपल्या कामावर गर्व ठेवणारा कारागिरच पाहिजे. तो शूद्र नव्हता तर कोण होता ?

इंग्रज लोकांनी म्हणे भारतीय विणकरांचे हात कापले कारण त्यांचे काम उच्च दर्जाचे होते. हे विणकर कुठल्या जातीतले होते ? त्यांचे शोषण होत होते किंवा त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नव्हता तर मग त्यांनी इतक्या उच्च दर्जाचे काम कसे केले ?

ज्योतिबा फुले ह्यांचेच उदाहरण घ्या. ते माळी समाजातील होते. ते सधन होते. सन्मानाने जगत होते. सन्मान आणि धन आले कुठून ? तर म्हणे त्यांच्या पूर्वजांना पेशव्यानी त्यांचे काम पाहून बक्षीस/पद दिले. खालच्या जातीतील लोकांचे शोषण होत होते तर इथे त्यांचा सन्मान कसा झाला ?

कुठल्याही ग्रुप चे पद्धतशीर शोषण करायचे असेल तर पद्धतशीर पणे त्यांच्यावर आरोप केले पाहिजेत, इतिहासांत त्याच्या सर्वत्र नोंदी असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ काळ्या लोकांनी अमुक तमुक काम करणे गुन्हा अमेरिकेत होता. भारतांत कुठेच कुठल्याच राजवंशाने असे कायदे केले होते असे आढळून येत नाही. आणि हे सर्व सवर्णांनीच लिहिले पाहिजे असेही नाही. मुस्लिम लिहू शकले असते, फ्रेंच ब्रिटिश डच पोर्तुगीज लिहू शकले असते.

पण सर्व शूद्रांचे  "पद्धतशीर शोषण" आणि "सन्मानाने जगण्याचा अधिकार नव्हता" असे म्हणणे म्हणजे एकूण शूद्र वर्णनातून ज्या असंख्य लोकांनी खूप चांगली कामे केली त्यांचा अपमान करणे होय.


** मुलींना शाळा काढून शिकवतात म्हणून सावित्रिबाई फुले यांना दगड आणि शेण झेलावे लागले हे शेकडो ठिकाणी नोंदलेले आहे. किती शूद्रांना त्या काळात लिहिता वाचता येत होते कि ते आपल्यावरील अन्याय लिहून ठेवतील? **

सावित्रीबाईवर कुणी तरी शेण आणि दगड फेकले हा सर्वांचे शोषण होत होते ह्याचा पुरावा नाही. सावित्रीबाईना विरोध झाला ह्याचा तो पुरावा आहे. आणि शेण आणि दगड सामान्य लोकांनी मारले ह्यावरून तर त्यांना कायदेशीर दृष्टया किंवा पद्धतशीर पणे विरोध झाला नाही असे दिसून येते.

विविध प्रकारचे समाजसेवक आपल्या कार्याच्या दरम्यान जो विरोध होतो त्याला थोडे अतिरंजित करतात असा इतिहास आहे. आज सुद्धा कुणी गे विवाह ह्यावरून भारतांत काही करू पाहत असेल तर कदाचित त्या व्यक्तीला सावित्रीबाई प्रमाणेच अवहेलना सहन करावी लागेल पण ह्याचा अर्थ भारतीय समाज गे लोकांचे शोषण करत नाही किंवा त्यांना सन्मानाने राहू देत नाही असा नाही. तो समाजसेवी, त्याची कार्य करण्याची जागा आणि पद्धती हे सुद्धा लक्षांत घ्यावे लागेल आणि इतर समाज आणि मुख्य म्हणजे कायदा कुणाच्या बाजूने राहिले हे पाहिले पाहिजे.

सावित्रीबाई आणि त्यांच्या पतींची एकूण हिंदू धर्म आणि जातीविषयक भूमिका पाहता ती टोकाची आणि अपमानास्पद होती असे दिसून येते. त्यांच्या स्त्री शिक्षणापेक्षा कदाचित त्या इतर गोष्टींना सुद्धा धरून त्यांना विरोध झाला हे आम्ही समजू शकतो.

येथील contemporary उदाहरण म्हणजे अरुंधती रॉय. अनेक सामान्य हिंदू लोकांना कदाचित विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल सहानभूती सुद्धा असेल पण त्याच आंदोलनात अरुंधती रॉय दिसल्यास त्याच व्यक्ती आंदोलनाच्या विरोधांत होतात कारण अरुंधती रॉय ह्यांची इतर मते त्यांना आवडत नाहीत. सावित्रीबाई ह्यांना विरोध झाला ह्याचे कारण फक्त "स्त्री शिक्षण" हे सुद्धा असू शकत नाही कारण त्याच काळांत असंख्य लोकांनी स्त्री शिक्षणासाठी कार्य केले होते. बहुतेकांना विरोध झाला आणि १००% विरोध हा शिव्या देणे, पत्रके प्रसिद्ध करून नाचक्की करणे, विविध आरोप करणे ह्या धाटणीचा होता. कुठेही व्यापक हिंसा, शासनाने केलेली शिक्षा किंवा कुठल्याही महत्वाच्या ब्राम्हण विचारवंताने त्यांच्यावर जाहीर टीका केल्याचे ऐकवत नाही.

अहिल्याबाईनी फुले ह्यांच्या कितीतरी आधी स्त्रीशिक्षणाचा पाठपुरावा केला होता. त्रावणकोर संस्थानाने सुद्धा स्त्रीशिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण उचलला होता. मराठा आणि पेशवा दस्तऐवजांत त्यांच्या स्वतःच्या स्त्रियांना मोडी लिपी आणि हिशोबाचे विशेष शिक्षण देण्यात येत होते असे पुरावे आहेत. पुरुष युद्धावर केले कि इतर गोष्टींची जबाबदारी महिलांनी घ्यावी अशी अपेक्षा होती. पोर्तुगीज प्रवासी पेस विजयनगर साम्राज्यांत फिरला, त्याचा प्रवासवर्णनात विजयनगर साम्राज्यांत अनेक सुशिक्षित स्त्रिया होत्या आणि त्या न्यायाधीश पासून हिशोब ठेवणे पर्यंत अनेक विविध कामांत सरकारी नोकरीवर होत्या असे त्याचे लेखन आहे.

त्यामुळे स्त्री शिक्षणाला पध्दशीर विरोध होता, ठराविक समाज त्याच्या विरोधांत होता किंवा त्या विरोधाचा प्रत्यक्ष प्रभाव होता असे तरी कुठेच दिसून येत नाही.

बहुतांशी स्त्रियांचा विवाह वयांत येण्याच्या वेळीच होत. मासिक पाळी सुरु झाली कि आपोआप बाहेर जाण्यावर बंधने येतात. त्यामुळे शिकण्याचा जो अवधी असतो तो फार थोडा असतो. त्याशिवाय शिकून फायदा काय ? शेवटी चूल आणि मूल हेच करायचे आहे हेच जुन्याकाळी सत्य होते. काळ बदलला आणि त्याप्रमाणे भारतीय समाज सुद्धा योग्य पद्धतीने बदलला. किंबहुना जुने ऐतिहासिक दस्तऐवज पाहून भारतीय समाज त्या काली स्त्री शिक्षण आणि स्त्री हक्क ह्या बाबतीत जास्त पुरोगामी होता असेच दिसून येते.


*** शूद्रांना गळ्यात मडके बांधावे लागते व मागे झाडू बांधावा लागतो याची नोंद/डॉक्युमेंटेशन कोणता तथाकथित शिकलेला उच्चवर्णीय करून ठेवेल? आणि कशाला? शूद्रांना आपली परिस्थिती कागदोपत्री नोंदवून ठेवायला लिहिता तर आले पाहिजे ना. मग नोंद नाही म्हणून तशी परिस्थितीच नव्हती असे म्हणणार? हाच बाबासाहेबांचा मुद्दा होता.  ***

का उच्चवर्णीय करणार नाहीत ? भरतीतील जातीभेद आणि इतर विविध शोषण विरोधांत उच्चवर्णीयांनी काम केले नाही का ? मडके बांधून फिरला नाही म्हणून एका व्यक्तीला शिक्षा केली आणि त्या शिक्षेसाठी अमुक ब्राम्हणाला राजांनी पैसे दिले असे नाही का कुठे आढळणार ? अमुक लोकांनी मडके बांधून फिरावे असे काव्य नाही का कुणी ब्राम्हण करणार ? कुठल्या संस्कृत काव्यांत किंवा नाटकात मडके आणि झाडू बांधून फिरणारा माणूस नाही का मिळणार ?

त्याशिवाय ग्रीक, चिनी, बौद्ध, मुस्लिम आणि असंख्य विदेशी लोक भारतांत येऊन गेले ते नाही का लिहून ठेवणार ?

त्याच्या उलट कितीतरी उदाहरणे मी तुम्हाला देते

- कादंबरी - ह्यांत वैशंपायन ह्या पोपटाला घेऊन  शूद्रकाच्या दरबारांत येते ती चांडाळ कन्या. राजा शूद्रक तिचे स्वागत करून तिला आसन वगैरे देतो. चांडाळ परिवारातील मांस दारू वगैरे पाहून आधी वैशंपायन (जो एक ब्राह्मण आहे) पोपट अत्यंत दुखी होतो. इथे जाती मधील त्यांचा फरक लेखकाने स्पष्ट दाखवला असला तरी कुठेही शोषण किंवा अपमान किंवा सन्मानाचा अभाव नाही. चांडाळ कन्येचे राजा शूद्रक स्वागत करतो. हे सातव्या शतकांतील पुस्तक आहे.

- मनिष्पंचकं - आदीशंकराचार्य एका चांडाळ माणसाला बाजूला हो म्हणतात. इथे चांडाळ मडके किंवा झाडू घेऊन नाही तर आपल्या कुत्र्यासोबत आहे. कोण बाजूला व्हावे ? अन्नमय शरीर कि तो आत्मा जो आम्हा दोघांचा एकच आहे ? चांडाळाच्या त्या एका प्रश्नावर आदिशंकरांचा संपूर्ण गर्व जातो आणि हे आदीशंकराचार्य स्वतः लिहितात.

- वसंतसेना - मृच्छकटीकं मधील हि अत्यंत महत्वाची नायिका. हि गणिका आहे पण अत्यंत सुशिक्षित आहे.

 

>> तुंम्ही कायद्यात स्त्रियांना शिकायला बंदी नव्हती असे सिध्द करून काय फायदा? स्त्रियांना निवडणूक लढवायला बंदी असावी असा कायदा आजही नाही पण किती स्त्रिया निवडून येतात? उलट त्यांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आज १५० वर्षांनी कायदा करायला निघाली आहे संसद!

स्त्रिया निवडणूक जिंकत नाही ह्याचा अर्थ त्यांना बंदी आहे असा होत नाही. हि तुमची तार्किक गफलत आहे आणि तीच मी अधोरेखित करत आहे. हा "वकिली" मुद्दा नाही महत्वाचा मुद्दा आहे.

कुठे outcome equitable नाही ह्याचा अर्थ शोषण किंवा बंदी होत नाही.

>> No evidence found ≠ Proof that something is false हे ऐकले आहे का?

थोडक्यांत तुम्ही पुरावा नाही हे मान्य करता तर तुम्ही जे काही म्हणता ते 'निव्वळ हायपोथेसिस' आहे. तथ्य नाही. आणि त्यातील बहुतेक हायपोथेसिस ला विरुद्ध पुरावे मी आधीच दिले आहेत.

-

टीप : समाजांतील शोषण हि सत्य गोष्ट आहे, पण एका ठराविक ग्रुप चे दुसऱ्या ग्रुप ने शोषण केले आणि प्रत्येक तफावत ह्या शोषणा मुळे आहे हि जुनी मार्क्सवादी थेअरी आहे ती भारतांत लोक जात आणि वर्णाला लावू पाहतात. त्यासाठी ठोस पुरावे नाहीत . किंबहुना त्याच्या विरोधांत जास्त पुरावे आहेत असे किमान ऐतिहासिक दस्तऐवजावरून तरी पाहायला मिळते.

 


In reply to by साहना

>> पण सर्व इतिहास आणि दस्तवेज पाहता भारतीय समाजांत तथाकथित खालच्या वर्णाचे पद्धतशीर पणे केवळ वर्ण ओळखीमुळे शोषण होत होते किंवा त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नव्हता ह्याला काहीच पुरावा नाही उलट पुरावे उलट्या बाजूने सापडतात.

 

आपण इथे एक नाही दोन महान शोध लावलेले आहेत. त्यावरून पुढील तार्किक निष्कर्ष काढता येतात.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांनी समाजातील शूद्र व अस्पृश्य समजलेल्या जातींसाठी जे कार्य केले ते संपूर्णपणे व्यर्थ होते. अस्पृश्यांना पाणी प्यायचा अधिकार मिळावा म्हणून चवदार तळ्याचा सत्याग्रह कदाचित झालाच नाही, ते सर्व खोटे असले पाहिजे. कारण त्या वर्ण व जातींचे शोषणच होत नव्हते व त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार होता. 

- गांधीजींनी हाती घेतलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमाची जरुरीच नव्हती. कारण त्या वर्ण व जातींचे शोषणच होत नव्हते व त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार होता. 

- ब्रिटीशांनी काही जातींना गुन्हेगारी जमाती असे वर्गीकृत केले होते. त्यावरूनच पुढे अनुसूचित जाती हा वर्ग तयार झाला व त्यांना आरक्षण देण्यात आले. बापरे! या शोषित वंचित वर्गाला दिलेल्या विनाकारण आरक्षणामुळे तर देशाची व समाजाची जी प्रचंड हानी(!) झाली आहे, ती वाचली असती. कारण त्या वर्ण व जातींचे शोषणच होत नव्हते व त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार होता. 

 

हे शोध व त्यावरून निघणार निष्कर्ष इतके महान आहेत, की त्यापुढे कोणतेही संदर्भ व पुरावे देऊन ते खोडता येणार नाहीत. भारत देशाच्या दुर्दैवाने हे शोध १०० वर्षे उशीरा लागले नाहीतर गांधीजी, आंबेडकर, फुले यांच्यासारख्यांचे जीवन विनाकारण अस्तित्वातच नसलेल्या समस्या सोडवण्यासाठी व्यर्थ गेले नसते. मग साने गुरूजींना दलितांना मंदीर प्रवेशासाठी आंदोलन करावे लागले नसते, सावरकरांना पतीत पावन मंदीर बांधावे लागले नसते. कारण आपलं ठरलंय.. वर्ण जातीवरून कुणाचेच शोषण होत नव्हते. लोक या लोकांना महापुरूष म्हणून का मान देतात? हे शोध आधी लागले असते तर संतांना 'बरे झाले देवा, कुणबी केलो, नाही तरी दंभे असतोचि मेलो' किंवा 'धाव घेई विठू आता, चालू नको मंद । बडवे मज मारिताती..' असा अभंगही लिहावा लागला नसता. गदिमांना 'झाला महार पंढरीनाथ' या गाण्यात 'फेकितो दुरून जगजेठी' असे खोटे लिहावे लागले नसते.

*** तुंम्ही माहिती दिली आहे पण दुवे नाही, त्यामुळे तुंम्ही जो आधार घेतलाय तो नेमका वाचणे शक्य नाही. पण वाचून तरी माझ्यासारखा सामान्य माणूस काय करणार? तुमचे विचार माझ्या विचार करण्याच्या क्षमतेच्या फार फार पुढे आहेत व केवळ अचंबा करत पाहण्यावाचून आंम्हाला काहीही करता येणार नाही.

*** बरेच दुवे संदर्भ देऊ शकतो पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे थांबतो.


In reply to by स्वधर्म

- एकलव्याला शिकवायला नकार देणे व त्याचा अंगठा कापणे.

एकलव्य हा राजपुत्र होता. (निषाद राजा हिरण्यधनुचा मुलगा) द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी गेला होता. [म्हणजे एकलव्य हा क्षत्रीय, उच्चवर्णिय होता.]

परंतु, द्रोणाचार्य हे केवळ हस्तिनापूरच्या कुरु वंशातील राजकुमारांचे (पांडव आणि कौरव) अधिकृत गुरू होते. आणि त्यांनी राजघराण्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांनी एकलव्याला शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला.

एकुणच हा दोन राजघराण्यातील वाद होता. त्याला रंगवले मात्र वेगळेच गेले असे वाटते!

 


In reply to by निनाद

एकलव्य ज्या निषाद कुळातील होता, ते अनार्य म्हणजेच चार वर्णांच्या बाहेरचे मानले गेले होते. ते स्थानिक ट्रायबल्स (आदिवासी) होते. : संदर्भ: https://en.wikipedia.org/wiki/Nishadas

Identity

In the earliest of the Indo-Aryan texts, the term "Nishada" may have been used as a generic term for all indigenous non-Aryan tribes rather than a single tribe.[5] This is suggested by the fact that according to Yaska's Nirukta, Aupamanyava explains the Rigveda term "pancha-janah" ("five peoples") as the four varnas of the Indo-Aryan society and the Nishadas.[6]

Linguist S. K. Chatterji notes that the Nishadas appear to be different from the Dasas and the Dasyus, which are the other non-Aryan people mentioned in the Vedic texts.


In reply to by निनाद

एकलव्य ज्या निषाद कुळातील होता, ते अनार्य म्हणजेच चार वर्णांच्या बाहेरचे मानले गेले होते. ते स्थानिक ट्रायबल्स (आदिवासी) होते. : संदर्भ: https://en.wikipedia.org/wiki/Nishadas

Identity

In the earliest of the Indo-Aryan texts, the term "Nishada" may have been used as a generic term for all indigenous non-Aryan tribes rather than a single tribe.[5] This is suggested by the fact that according to Yaska's Nirukta, Aupamanyava explains the Rigveda term "pancha-janah" ("five peoples") as the four varnas of the Indo-Aryan society and the Nishadas.[6]

Linguist S. K. Chatterji notes that the Nishadas appear to be different from the Dasas and the Dasyus, which are the other non-Aryan people mentioned in the Vedic texts.


In reply to by स्वधर्म

तरीही ते राजेच होते म्हणजे वाद दोन राजघराण्यांचा आणि नॉलेज/ पेटंट कॉपिराईट्चा होता.


इतिहास शिकायचा असतो तो केवळ भूतकाळातील राजे, युद्धे आणि सनावळ्या लक्षात ठेवण्यासाठी नव्हे, तर वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्य अधिक शहाणपणाने घडवण्यासाठी. इतिहास म्हणजे समाजाने केलेल्या प्रयोगांचा, चुका-यशांचा आणि त्यांच्या परिणामांचा सामूहिक अनुभव.

बरोबर आहे. इस्लामवादी आक्रमकांनी आणि त्यांच्या अनुयायांनी हजारो हिंदूं-ख्रिश्चनांची कत्तल केली, स्त्रियांवर बलात्कार केले, संपत्ती लुटली, देवळे-चर्चेस उद्धस्त केले, स्त्री-पुरुष-बालके यांना गुलाम केले हे सर्व समजून घेऊन वर्तमानात अश्या प्रव्रुत्तींपासून कसे सावध राहावे, त्यांचा वेळीच कसा बीमोड करावा, आणि व्यक्ती व समाज म्हणून आपले भविष्य अधिक शहाणपणे कसे घडवावे याचा बालभारतीच्या इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र  अभ्यासक्रम असायला हवा. त्याकाळी समाजाने, नेत्यांनी केलेल्या चुका कश्या टाळाव्यात म्हणजे अपेक्षित परिणाम कसा दिसून येईल याचे मार्गदशनात्मक विवेचन असायला हवे.

अर्थात हे सर्व त्या-त्या इयत्तांतील विद्यार्थ्यांचे मानस, बौद्धिक क्षमता तसेच शारीरिक मर्यादा लक्षात घेऊनच करायला हवे. नुसतेच बालभारतीला बैलभारती म्हणून समस्या सुटणार नाही, त्यासाठी सर्वांगीण उपायोजना सर्वंकषपणे लागू करायला हव्यात. 

 

- (न-शिक्षणतज्ज्ञ) कांदा लिंबू  


या पार्श्वभूमीवर मी माझे प्राथमिक, माध्यमिक  शिक्षण  बघता आम्हांलाही असाच  काही बाही  इतिहास  शिकवला गेला. 

 

मुघल आणी इंग्रजांचा इतिहास  जास्त  शिकवत असत.  

 

सातवाहन, चाल्युक्य, राष्टकुट इत्यादीबद्दल आमच्या आवांतर वाचनाने ज्ञानात भर पडली होती.

 

इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र व तत्सम  विषय विषय पूर्वग्रहदूषित भावनेने शिकवले गेले पाहिजेत. 

 

जगदीश कुबेर  यांच्याशी सहमत आहे.

ललांबली साधक बाधक चर्चा होताना बघून  बरे वाटले.


विषय विषय पूर्वग्रहदूषित 

 

विषय विना पूर्वग्रहदूषित 

 

असे वाचावे.

 

शिक्षण व भावी पिढीला  राजकिय पचड्यात गुंतवून आपल्वूयआपल्या पोळीवर तूप ओढून  घेऊ नये. मग सरकार  कुणाचे ही असो. 


सर्व देश कालानुरूप शिक्षणासाठी असा बदल करत असतात. त्यात काही वावगे नाही. असे बदल केलेच पाहिजेत. 

ऐतिहासिक चुकांमधून शिकणे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी समाज संघटित करणे ही संकल्पना जगातील अनेक देशांनी स्वीकारली आहे. यामध्ये काही इस्लामिक देशांचाही समावेश आहे, ज्यांनी आपल्या अभ्यासक्रमात भूतकाळातील संघर्ष, परकीय आक्रमणे आणि अंतर्गत चुकांचे विश्लेषण करून नव्या पिढीला तयार करण्याचे धोरण आखले आहे.

गेल्या काही वर्षांत २०२३-२०२४ आणि २०२५-२०२६ चे अभ्यासक्रम सौदीने आपल्या शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. इतिहासातील धार्मिक अतिरेकी आणि कट्टरपंथी विचारसरणीने देशाचे कसे नुकसान केले, हे स्पष्टपणे शिकवले जाते. आधुनिक काळातील धोके ओळखणे आणि अशा विचारसरणीचा वेळीच बीमोड करून राष्ट्रीय सुरक्षा कशी टिकवून ठेवावी, याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. सौदीच्या नव्या माध्यमिक  आणि इस्लामिक स्टडीजच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मुस्लिम ब्रदरहुड , आयसिस, आणि अल-कायदा यांसारख्या कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांचा उल्लेख थेट 'देशाच्या स्थैर्याला आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या प्रवृत्त्या' असा करण्यात आला असून विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविरोधात जागृती निर्माण केली जात आहे. 

इजिप्तच्या अभ्यासक्रमात ही त्यांच्या प्राचीन संस्कृतीवर झालेली पारकीय आक्र मणे आणि आधुनिक काळातील दहशत वादाचा इतिहास शिकवला जातो. समाजात फूट पाडणाऱ्या शक्तींपासून नागरिक म्हणून कसे सावध राहावे आणि देशाची सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून जनतेने कसे एकसंध राहावे, यावर त्यांच्या नागरिकशास्त्र आणि इतिहासाच्या पुस्तकांमध्ये भर दिला आहे.

 

असा कोणताही बदल भारताने मात्र आपापल्या पाठ्यपुस्तकात केलेला नाही हे ही नोंद घेण्याजोगे आहे.


In reply to by निनाद

>> असा कोणताही बदल भारताने मात्र आपापल्या पाठ्यपुस्तकात केलेला नाही हे ही नोंद घेण्याजोगे आहे.

हे बरोबर आहे पण गैरसोईचे सत्य लपवणारा बदल केला आहे आणि त्याबाबतच हा लेख आहे. 


In reply to by स्वधर्म

"All religions...Hindutva is not bad...All religions teach brotherhood. All religions teach tolerance. India is proud to have a civilization...We welcomed all religions. This is the only land which never tries to convert anyone from any religion," Javadekar said.

 

On the question of rewriting history to espouse the ideology of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), Javadekar said, "We have not rewritten a single chapter in the last four years."

 

"सर्व धर्म... हिंदुत्व वाईट नाही... सर्व धर्म बंधुत्वाची शिकवण देतात. सर्व धर्म सहिष्णुतेची शिकवण देतात. भारताला एका समृद्ध संस्कृतीचा अभिमान आहे... आम्ही सर्व धर्मांचे स्वागत केले. ही एकमेव अशी भूमी आहे जी कोणत्याही धर्मातील व्यक्तीचे धर्मांतर करण्याचा कधीही प्रयत्न करत नाही," असे जावडेकर म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी इतिहास नव्याने लिहिला जात असल्याच्या प्रश्नावर जावडेकर म्हणाले, "आम्ही गेल्या चार वर्षांत एकही धडा नव्याने लिहिलेला नाही."

 

[१] https://www.indiatoday.in/india/story/prakash-javadekar-new-education-p…


मूलतः असे रेफरन्स लपवणे म्हणजे पृथ्वी सपाट असून पंख लागलेल्या घोड्यावर बसून सदेह स्वर्गसफर करता येते सारख्या कन्सेप्ट अकॅडमिक क्षेत्रात रेग्युलर करणे होय. आणि हो हा प्रवास म्हणजे गर्तेत जाण्याचा एक निसरडा प्रवास आहेच. 

भारतीय इतिहासात उज्वल आणि तात्विक उदारमतवादी प्रचंड उदाहरणे सापडतील ! आदी शंकराचार्य ह्यांचे अद्वैत तत्वज्ञान, त्यांचे मंडन मिश्रा सोबत असणारे वादविवाद, त्यांना वाराणसीच्या घाटावर चांडाळ समाजाच्या माणसांकडून अद्वैताचे उदाहरण देऊन शंकराचार्यांनी त्याला गुरुस्थानी मांडणे, किंवा चार्वाकवाद सुद्धा एक नास्तिक दृष्टिकोन म्हणून बघण्याचे हिंदू तात्विक बैठकीचे औदार्य हे काही ठळक मासले आठवले मला तरी. 

उजव्या इतिहासकारांत एक कुरकुर कायम असते की जसे डाव्या परिपेक्षातून इतिहास हा राजसत्ता, स्त्रिया, स्थापत्य, कला, व्याकरण, विज्ञान अशा वर्टिकल मधे स्वीकार होते तसे आमचे होत नाही आणि आम्हाला subaltern म्हणून त्याज्य मानले जाते. त्याला कारण म्हणजे इतिहास अभ्यासताना प्रच्छन्न गोष्टींचे उदात्तीकरण करून खरेखुरे उदात्त ऐतिहासिक दाखले दुर्लक्षणे. 

ताजमहाल नव्हे तेजोमहालय हा वाद राजकीय अजेंडा आणि त्यावर पोळ्या शेकायला भारी असतो पण त्यात ज्ञान मूल्य (scholastic value) एस्टॅब्लिश करण्याची वृत्ती नसते. पाठ्यपुस्तकातून वैदिक काळातील साहित्याचा प्रवास, त्यांनी नोंदवलेली ग्राहताऱ्यांच्या भ्रमणाच्या कक्षांची अचूक नोंद. नासदिय सुक्तातील भारत एक खोजच्या टायटल साँग मध्ये असणारी भारदस्त फिलॉसॉफी (सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं आठवा) अभ्यासाची वृत्ती नसते. उलट असे प्रयत्न म्हणजे धार्मिक भावनांना दुखण्याचे खेळ म्हणून बघितले जाते. 

त्यामुळे गाळीव इतिहास पुस्तकात टाकणं ही कृती भारताला ईरान किंवा अफगाणिस्तान करण्याकडे नेण्याचा प्रवास वाटू शकतो. 

ह्यावर उजव्या इतिहासकारांनी शिवधनुष्य पेलून तत्वज्ञान दृष्टिकोनातून हिंदू इतिहास किती समृद्ध आहे, प्राचीन व्यापारउदीम, स्थापत्य किती सुंदर आहे आणि आजही relevant आहे ह्यावर अभ्यासपूर्ण पेपर्स टाकावेत हीच सदिच्छा. पण जे चूक आहे ते चुकच असेल कारण खुद्द मुंडकोपनिषद "सत्यमेव जयते" सांगून गेले आहे. 

 

तूर्तास इतकेच.

 

(अकॅडमिक येडा अण्णा) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

>> गाळीव इतिहास पुस्तकात टाकणं ही कृती भारताला ईरान किंवा अफगाणिस्तान करण्याकडे नेण्याचा प्रवास वाटू शकतो. 

अगदी अगदी! गैरसोईचे सत्य लपवणे व आपल्या आजच्या चांगल्या समजत असलेल्या मूल्यांना जुन्या काळात नेऊन भूतकाळातील आपल्या समाजाचे दोष लपवण्याचा प्रयत्न करणे यामुळे आपला प्रवास वरीलप्रमाणे होऊ शकतो. बालभारतीने लवकरात लवकर खऱ्या इतिहास तज्ञांकरवी पुस्तकात सुधारणा करून घ्यावी हीच अपेक्षा.

मला तर त्यापुढेही जाऊन असे कुतूहल आहे की उजव्या विचारसरणीत असे काय आहे की जे माणसाला पूर्वगौरवात रमवते, सत्यापासून दूर भ्रमाकडे नेते व बुध्दीचा वापर कमी कमी करून अंधविश्वास ठेवायला मजबूर करते. इतरांनी कृपया उजवे म्हणजे काय असे लगेच विचारु नये कारण अनेकांनी ते इतरत्र अनेकदा स्पष्ट केले आहे.


In reply to by वृषभ खोंडे

नासदिय सुक्तातील भारत एक खोजच्या टायटल साँग मध्ये असणारी भारदस्त फिलॉसॉफी (सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं आठवा)

 

कॉस्मिक व्हॉईड किंवा प्री बिग बँग / मोमेंट ऑफ क्रिएशनचे इतके भयानक चपखल आणि वैज्ञानिक हायोथेसिस जगात कुठेच नाही ! उगाच नाही CERN बाहेर नटराज मूर्ती लागत हेच खरे ! किंवा भारतीय कालमापन (कल्प/मन्वंतर/युग) ही मांडणी जगातील सगळ्यात प्राचीन मेटाफोरिक पण अचूक मांडणी आहेच आहे. 

 

जाता जाता गंमत म्हणजे CERN बाहेर नटराज मूर्ती लागल्यावर रेनिसन्स पासून सुधारणा झालेल्या युरोप मधील काही क्रिश्चन उजवे पण इथे ही मूर्ती लावून लावून सॅटनिक ऑक्कल्ट पूजापाठ अन् कर्मकांड चालू आहेत म्हणून रडताना यूट्यूब आणि सोशल मीडिया वर सापडतात

 

(मॅक्सप्लॅंक) खोंडे


माणसाला पूर्वगौरवात रमवते, सत्यापासून दूर भ्रमाकडे नेते ? 

स्टेटस कुओ किंवा भौतिकशास्त्राच्या अनुसार इनर्शिया. ही एक अतिशय घातक चीज असते. उजवे आणि डावे हा पाठभेद अस्तित्वात आला तो फ्रेंच राज्यक्रांतीतून. 

डावे - व्होल्टेयर, रोबेस्पियर, डान्टन, लफायते - भाकरी नाही तर शिरा पुरी खा (ह्यांना बदल हवा होता)

 उजवे - एमिग्रेस मधले सरदार दराकदार, पश्चिम फ्रान्स मधील राजवटप्रेमी गट, पाद्री आणि चर्च आता तुम्ही सांगा, ज्या inertial position ला उजवी मंडळी बसली होती तिथे आणि तिथे फिफ आणि सर्फ संबंधातून त्यांना आयते वार्षिक तनखे लागून होते ते आपली पोझिशन का सोडतील ? आयत्या लक्ष्मीवर कोण पाणी सोडणार ? म्हणून स्टेटस कुओ प्रेमी असतात उजवे, म्हणूनच ते जुन्याकाळच्या आठवणीत रमलेले असतात. आमच्या आजीकडे सुपभरून दागिने होते, पण लोकशाहीत "तसल्या" लोकांना खायला घालायचे म्हणून आयकर आला. 

 

थोडे वेगळे मत - भारतीय परिप्रेक्षात डावा विचार सुद्धा ह्या भिकार स्टेटस कुओ मानसिकतेचा शिकार आहे अन् त्यामुळे irrelavant होत गेला आहे.  त्यात परत ह्यांना पोथीनिष्ठ असण्याचा सोस उजव्यांपेक्षा तिप्पट ! जरा काय झालं नाही का पुस्तके काढून ट्रॉट्स्की काय म्हणाला ? मार्क्सचे मत काय ? जमीन सुधारणांवर लेनिन काय बोलला ? ह्याची पुस्तकी उजळणी आणि पारायणे सुरू. 🤣🤣, रिझल्ट ?

 भारतात कम्युनिस्ट विचार सुद्धा एक धर्म होऊन बसला झाले ! त्यांचे सावतेसुभे उभे झाले. अमुक जातीत काहीही कर्तृत्व नसताना तमुक माणूस जन्माला आला म्हणून तो अभिजन असायलाच हवा ! कारण पुस्तकात दिले आहे की धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्यांच्यात जन्मलेला तो अभिजन मग मार्क्स महाराज अन् महामंडलेश्वर लेनिन चूक कसे असणार ? बंगाल आणि केरळातील कम्युनिस्ट सरकारे लयाला जाण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पुस्तकी संकल्पना पक्षी जमीन सुधारणा, संपत्ती वाटप वगैरे डोळे झाकून भारतीय समाजात लागू केल्या. 

असो जास्त काय बोलणार म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो म्हणतात ते खरे. सगळीकडचे चांगले घेऊन भारतीय समाज वर्धिष्णू होवो, आणि पुरोगामी वाटेवर आपल्या उज्वल प्राचीन सांस्कृतिक परंपरा मिरवत थाटाने पुढे चालो हीच प्रार्थना. 

भारतात जपान सारख्या मेजी पुनर्स्थापनेची मेजर गरज आहे पण दुर्दैवाने आपला बहुसांस्कृतींनी समृद्ध समाज मात्र तितका शिस्तीचा नाही हेच खरे.

 

(देशभक्त दुर्मिळ संतुलित सामुराई) 

तर्कतीर्थ खोंडे शास्त्री 


बालभारतीतले धडे आरक्षण, धर्म, जात लिंग, आता आता राजकीय पक्ष आदीच्या वेटेजेसनुसार तयार करवून घेतले जातात.

पुस्तक तयार करण्याच्या समितीतही अशाच वेटेजेस नुसार सदस्य घेतले जातात.

एनसीईआरटीचीही परिस्थिती काही वेगळी नाही. मागे तिथल्या कोणत्यातरी इयत्तेत शिवाजी महाराज केवळ दिड की दोन पानांत होते असा उल्लेख होता.

 

जाता जाता, आम्हाला फ. मु. शिंदे यांची कविता (की धडा ?) होता. नाव पक्के लक्षात राहिले होते की - फकीरा मुंजाजी शिंदे.

तर काल परवाच सोशल मिडीयात बालभारतीतला यांचाच एक धडा असलेली पोस्ट पाहिली. त्यात लेखक या नावाचा उल्लेख फकीरराव असा होता. जसा शरद चा शरदचंद्रराव होतो तसा. फकीरा या जुन्या नावात काय गैर आढळले या निवड समितीला? 


इतिहासाचे शिक्षण मुलाला ‘आपले लोक विरुद्ध परके लोक’ या मानसिकतेत अडकवण्यासाठी नसते. उलट, माणसाच्या अनुभवांची व्यापकता समजण्यासाठी असते. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचा अभिमान बाळगता येतो; पण त्यांनी केलेल्या चुका मान्य करण्याची प्रामाणिकताही असली पाहिजे. 

खिक्क!!!!

आपल्या समाजातील अन्यायाची कबुली दिल्याने समाजाचा अपमान होत नाही. उलट, चूक मान्य करून ती पुन्हा होऊ न देण्याची क्षमता ही प्रगल्भ समाजाची खूण आहे. व्यक्ती, समुदाय आणि त्यांच्या कृती यांच्यातील फरक समजणे हीच इतिहासाच्या चिकित्सक शिक्षणाची सुरुवात आहे.


खिक्क!!!! 
खिक्क!!!!
खिक्क!!!!
खिक्क!!!!
खिक्क!!!!