कविता
अंधार काठ
अंधारा काठी उगवल्या राती
आकाशी पेटते चंद्रदिव्यांची ज्योती
गडद रंगांनी नभ गुरफटते
सावल्यांच्या रानात रेशमी चांदणं उतरते
पानांच्या गर्दीत ओला कवडसा पाझरतो
झाडांच्या कंठात वारा शीळ घालतो
पावला पावलांत मुकी रानवाट मिटते
काळोखाच्या कुशीत चिमण्यांचे गाव हरवते
काव्यरस
प्रदूषण कविता(2)- जिन्न आणि अल्लादीन
प्रदूषणचा कर खात्मा अल्लादीनने आदेश दिला जिन्नने तत्क्षणी त्याचाच गळा दाबला।
टीप: अल्लादीन म्हणजे मनुष्य जाती. जिन्नने अल्लादिनचा गळा का दाबला?काव्यरस
प्रदूषण- पाऊस (१) - भूत आणि वर्तमान
सर्वांना पाश्चात्य नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
(श्री सुभाष स नाईक यांची प्रेरणा घेऊन)
पाऊस
श्रावणात बरसल्या
अमृत धारा
उजळली कोख
धरती मातेची।
श्रावणात बरसल्या
तेजाबी धारा
वांझ झाली कोख
धरती मातेची।
काव्यरस
इतिहासाचं वर्तमान
वज्रलेप इतिहासावर उभा आश्वासक वर्तमान?
निळ्या-भगव्या दगडांचे भागधेय सेम
भगव्या-निळ्या डोक्यांवर बिनचूक नेम
खळ्ळ खटॅक- खळ्ळ खटॅक : किडुकमिडुक चक्काचूर
भक्क पिवळा आगडोंब : काळा धूर सर्वदूर
१४४ कलमाच्या निगराणीला खाकी बंदूकदस्त्यांचे कुंपण
पांढर्या बगळ्यांच्या अश्रुंचे इथेतिथे मतलबी शिंपण
आलबेल इतिहासखपली कोण आत्ता खरवडतंय?
सांभाळा, खाली आरपार सडकं वर्तमान वाहतंय
काव्यरस
प्रवास
घरी चाललो मी आज
आसावला प्रवास
भर समूद्रात टाकले होडके
किती योजने वाहलो खास
होते काही प्रयोजन अन काही उद्देश
पण तरंगण्याला न लागले सायास
स्वार्थाने जाळे टाकले जीवनी
अनूभवाचे आले मासे त्यात
जेथून आलो तेथेच चाललो
आसावला प्रवास
- पाभे
काव्यरस
अ क्लोथलाईन.
पोटापाशी चोरखिसा असलेली धुवट पांढरी
अर्ध्या बाह्याची बंडी, तपकिरी स्वेटर..
निळ्या रेघांचा नाडीवाला पायजमा..
नीळ घातलेला स्वच्छ कॉलरचा पांढरा शर्ट..
आतली बाजू बाहेर केलेली काळी पॅन्ट,
भोकाभोकाचं बनियन..
टोकाची शिवण उसवून उंची वाढवलेली गणवेशाची गडद्द निळी पॅंट..
कधीकाळी सफेद पण आता धुऊनही मळकट दिसणारा
शाईचे डाग पडलेला छोटा शर्ट..
चौकड्या चोकड्यांचा, काखेत उसवलेला लाल काळा फ्रॉक..
काळा परकर, पोलका, निळ्या पिवळ्या सिंथेटिक साडीची घडी
इथे तिथे फाटलेले चार पाच पंचे,
त्यांच्या पोटात लपवलेले आतले कपडे
दोरीवर वाळत घातलेले कपडे
खूप काही सांगून जातात,
घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल..
काव्यरस
लावणी
लावणी
पदर ढळला खांद्यावरुनी लाजेने झाले मी चूर
नका रोखून पाहू मला धडधडे माझा ऊर ||१ ||
रात्र चढली पुनवेची आजि जवळ कोणी नसे
इश्कामध्ये या तुमच्या दाजी झाले मन वेडेपिसे ||२ ||
पान खाऊन आले दाजीबा ओठाला रंगली लाली
सुगंधी गजरा शृंगार करुनि मी वाट पहाते रंगमहाली ||३ ||
स्पर्श होता तुमचा माझे अंगअंग शहारले
श्वास होती एकरूप आपले दुसरे विश्व न उरले |||४ ||
सहवासामध्ये तुमच्या राया स्वत्व माझे हरवले
शृंगारक्रीडा करता करता तन मन भान हरपले ||५ ||
वर्षू दे तुमची प्रीती मजवरी सचैल आज मी न्हाले
रात्र सरली पहाट झाली आकंठ तृप्त मी झाले ||६ ||
--शब्दांकित (वैभव दातार)
काव्यरस
एका अनावर कैफात
एका अनावर कैफात लिहिली होती
ती कविता
नंतर वाटलं, इतके भाषालंकार कशाला ह्या कवितेत?
मग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा
साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली
तेव्हा
थोडी भुंडी पण
थोडी खरीही वाटली
ती कविता
नंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत?
मग कापलं सपासप -
वायफळ शब्दतण
तेव्हा
जास्त ओकीबोकी पण मघापेक्षा
जास्तच खरी वाटली
ती कविता
नंतर वाटलं – इतक्या ओळी कशाला ह्या कवितेत ?
मग खोडायला गेलो दोन चार ओळी
तेव्हा
ओळीतल्या रिकाम्या जागेतून
सण्णकन फणा काढत
जिव्हारी डसली
ती कविता
काव्यरस
नृसिंह सरस्वती स्वामी आरती
आज श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जयंती आहे. त्यानिनित्ताने मी आरती लिहिली आहे.
मिसळपाव