भटकंती

ड्रॅगनच्या देशात १७ – यांगत्से क्रूझ : व्हाईट एंपरर सिटी, कुतांग गॉर्ज व शेनाँग स्ट्रीम

Primary tabs

===================================================================

ड्रॅगनच्यादेशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

सफरीच्या एकोणीसाव्या दिवशीची सकाळ जरा गडबडीची होती. कारण आज किनारपट्टीवरून फेरफटका मारून करायच्या दोन सहली होत्या. पहिली सहल तर सकाळी ७:३० लाच सुरू होणार होती. म्हणजे त्या अगोदर न्याहारी वगैरे करून तयार होणे भाग होते. सेंचुरी स्कायवाल्यांनी नको नको म्हणाल अशी गच्च इटिनेररी बनवली होती. पण आम्हीही मागे न राहता त्यांचा एकही कार्यक्रम न चुकवण्याचा पण केला होता ! सगळे आटपून ७:२० लाच लॉबीमध्ये हजर झालो. आमचा बहुतेक सगळा इंग्लिश बोलणारा गट जमा झाला होता. उरलेल्यांना आमच्यातल्या उत्साही मंडळींनी फोनाफोनी करून हलवले. तरी दोनएक मंडळी गळलीच. शेवटी फार उशीर नको म्हणून जमलेले सर्व गाइडच्या आधिपत्याखाली सफेद सम्राटाच्या शहरावर (व्हाईट एंपरर सिटी) स्वारी करायला निघालो.

बोट फेंगी नावाच्या गावाला थांबली होती. बोटीवरून तराफ्यांवर उतरलो तर समोर उंच किनार्‍यावर जायला दोन एस्कॅलेटर्स ! एस्कॅलेटर असलेला घाट प्रथमच पाहिला.

घाट चढून गेल्यावर थोडे उजवीकडे चालल्यावर फेंगी गावाचे जुन्या घाटावरचे प्रवेश्द्वार दिसते. नविन एस्कॅलेटरवाला घाट बांधल्यामुळे आता जुन्या घाटाचा उपयोग फक्त प्रवाश्यांनी फोटो काढण्यापुरता आहे. पण याचा आकार व बांधणी बघून फेंगी बंदराच्या गतवैभवाची कल्पना येते.

गोंगशून शू नावाच्या एका सरदाराने पश्चिम हान राजघराण्याच्या (ई.पू. २०६तेई. २४) शेवटच्या काळात बंडाळी करून आपले स्वतंत्र राज्य स्थापले आणि स्वतःला शू जमातीचा राजा म्हणून घोषित केले. त्या सुमारास फेंगीजवळच्या बायदी नावाच्या पर्वताच्या कड्याच्या आधारे वर जाणार्‍या पांढर्‍या धुक्यामध्ये त्याला ड्रॅगनचा आकार दिसला. त्यावरून त्याने स्वतःला पांढरा सम्राट आणि त्या डोंगरावर वसवलेल्या त्याच्या राजधानीचे पांढर्‍या सम्राटाचे शहर (व्हाईट एंपरर सिटी) असे नामकरण केले.

आता या राजधानीच्या ठिकाणी फक्त एक मंदिरांचा समूह उरला आहे... आणि त्यांच्याशी जोडलेल्या लोककहाण्या. मात्र यांगत्सेच्या काठावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेचे सामरिक व राजकीय महत्त्व चिनी इतिहासात फार मोठे होते. यांगत्सेच्या खोर्‍यातील अनेक महत्त्वाच्या लढाया या जागेच्या आसपास झाल्या. पर्वतावरून नदी आणि तिच्या परिसराचे छान विहंगम दृश्य दिसते. पूर्वीचे खूप उंच डोंगर व कडे आता थ्री गॉर्जेस धरणाच्या पाणीसाठ्यामुळे जरासे कमी ऊंचीचे दिसतात. बायदीचा बराचसा परिसर पाण्याखाली गेला आहे. देवळांची जागाही तीन बाजूंनी पाण्याने वेढली गेली आहे.

फेंगीहून व्हाईट एंपरर सिटीच्या प्रवेशद्वारापर्यंत बसने साधारण २५-३० मिनिटात पोचलो.

ह्या प्रवेशद्वारापासून पाण्याने वेढलेल्या मंदिर समुहापर्यंत जायला एक जुन्या पद्धतीचा लाकडी पूल आहे.

शहराच्या आवारात सर्वप्रथम सम्राटाचा नाही तर एक झुगे लिआंग नावाच्या त्याच्या एका जनरलचा पुतळा आपले स्वागत करतो... असे का याचे कारण थोडे पुढे गेल्यावर समजेल.

वाटेत एक चिनी इंग्लिशचा एक नमुना दिसला

याचे सुगम इंग्लीश भाषांतर आहे, "Keep off the grass".

डोंगराच्या चढणीच्या अर्ध्यावर गेल्यावर यांगत्सेचा कुतांग पास हा चिंचोळा प्रवाहमार्ग दिसू लागतो. या खिंडीसारख्या जागेच्या सौंदर्याचे वर्णन चिनी कवितांत फार प्राचीन काळापासून केले गेले आहे. सध्या धरणामुळे पाण्याची पातळी जवळ जवळ १५०+ मीटरने वर आली आहे तरीसुद्धा ९० अंशातल्या कड्यांच्या मधल्या चिंचोळ्या दरीतून वाहणारा यांगत्सेचा ओघ स्तिमित करतो. जेव्हा धरण नव्हते तेव्हा १५० मीटर अधिक उंचीचे ते कडे आणि त्यातून वाहणारा यांगत्सेचा खळाळता ओघ नक्कीच जास्त चमत्कारपूर्ण दिसत असणार. शेकडो वर्षे त्यावर अनेक प्रसिद्ध कविता केल्या गेल्या आहेत.

कुतांग पासच्या चित्राला १० युवानच्या नोटेवर स्थान मिळाले आहे.

नंतर बोट याच मार्गावरून पुढे जाणार होती तेव्हा कुतांग पास आणि त्याच्या पुढचा नयनमनोहारी भाग जवळून बघायची संधी होती.

डोंगरमाथ्यावर गेल्यावर किल्ल्याच्या दरवाज्यासारखे पण कलापूर्ण सजावट केलेले शहराचे प्रवेशव्दार दिसते.

शेजारच्या झाडीतून सम्राटाचा ड्रॅगन "कोण आहे रे तिकडे" अशी डरकाळी फोडताना दिसतो.

ही जागा जुन्या राजधानीची अवशेष यापेक्षा फारच वेगळ्या कारणामुळे सर्वसामान्य चिनी मनात मानाचे स्थान पटकावून बसलेली आहे. शू राजघराण्यातला एक लिऊ बेई नावाचा राजा शेजारच्या वू राज्याबरोबर झालेल्या लढाईत हरला. तशात तो आजारी पडला. राजाची दोन मुलेही लहान होती. तेव्हा याच जागेवर त्याने मरण्यापूर्वी आपला पंतप्रधान झुगे लिआंग याच्या हाती सर्व राज्यकारभार सोपवला अणि असेही सांगितले की जर ह्या मुलांपैकी एकही राजा बनण्यास पात्र ठरू शकला नाही तर झुगेने स्वतः राजसत्ता ग्रहण करावी. झुगेने साम्राज्याची काळजी तर उत्तम प्रकारे वाहिलीच पण राजपुत्रांना राज्यकारभाराचे उत्तम शिक्षण देऊन त्यातल्या मोठ्याचा योग्य वयात येताच राज्याभिषेक केला. त्याच्या अशा अलौकीक स्वामिभक्ती व प्रमाणिकपणामुळे आजही या परिसरातले झुगेचे शिल्प असलेले मंदिर हे सर्वात जास्त पूजनीय समजले जाते. त्या मंदिरातले हे वरील प्रसंगाचे शिल्प... मृत्युशैय्येवर असलेल्या राजाजवळ पंखा घेऊन उभा आहे तो पंतप्रधान जनरल झुगे लिआंग आणि त्यांच्या समोर ते दोन लहान राजपुत्र गुढग्यावर बसून आदर प्रदर्शीत करत झुकलेले आहेत.

आता जरा तिकडे गेलो होतोच तर दोन चिनी जनरल्सच्या आग्रहाखातर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना दोन युक्तीच्या गोष्टी सांगून आलो +D !

देवळांच्या परिसरातले बैलावर आरूढ झालेल्या युवतीचे शिल्प.

परत येताना वाटेत एक चिनी स्पेशियालिटी स्टोअर लागले… अर्थातच फार धाडस न करता पुढे निघालो...

बोटीवर परत येऊन अर्धा तास झाला असेल तेवढ्यात घोषणा झाली की सिचुआन राज्याची प्रसिद्ध पाककृती "हॉट पॉट" चे प्रात्यक्षीक बोटीचा खानसामा पाचव्या डेकवर करणार आहे. गाईडने हॉट पॉट ची बरीच स्तुती केली होती तेव्हा त्याबाबत कुतुहल होतेच. हा केवळ येथील लोकांचा एक आवडता पदार्थच नाही तर पडसे-खोकल्यावरचा रामबाण उपायही समजला जातो. डेकवर पोचलो तर बल्लवाचार्य सगळी सामग्री घेऊन तयार होते.

एका बशीत काही चिकनचे तुकडे आणि काकडी, गाजर, कांदा वगैरे भाज्याचे मोठे तुकडे ठेवलेले होते. तर दुसर्‍या बाजूला लसूण आणि मिठाची भांडी सोडून इतर पाच भांड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर मिरची असलेले मसाले होते. खानसाम्याने ते सर्व मसाले पाचसहा डाव तेलामध्ये चांगले परतून घेतले आणि मग त्यांत सगळ्या भाज्या एकावेळेसच टाकल्या आणि थोडे पाणी टाकून एक उकळी आणली. हा... काय तिखट सूप बनले आहे इतके जनता म्हणते इतक्यात खानसाम्याने ते सर्व एका मोठ्या पातेल्यात ओतले. टेबलाच्या एका बाजूवर मसाल्याच्या १०-१५ पिशव्या ठेवल्या होत्या. एवढ्या सगळ्या पिशव्या नक्कीच जाहिरात करायला असाव्या ठेवलेल्या आहेत असा माझा कयास होता.

... पण खानसामा एक एक पिशवी जशी पातेल्यात रिकामी करायला लागला तसतसे सगळ्यांना ते सूप न पिताच नाकातोंडातून धूर येणे म्हणजे काय याचा प्रत्यय येऊ लागला +D ! हे आहे त्या पाकृ चे अंतिम देयक (final product).

अर्थातच खानसाम्याने "सर जरा घ्या दोन घोट चाखायला" असे म्हणण्याच्या अगोदर तेथून बाहेर पडलो. आणि ते फायद्याचेच झाले, कारण बोट कुतांग गॉर्जच्या नयनमनोहर प्रवेशव्दाराजवळ पोचली होती. जे कडे अगोदर एका पर्वतावर उभे राहून पाहिले होते ते जवळून नदीतून सफर करताना कसे दिसतात हे पाहण्याची उत्कंठा होतीच.

हे आहे कुतांग गॉर्जचे प्रवेशद्वार.

दरीतून वेगाने वाहणार्‍या यांगत्सेच्या नागमोडी प्रवाहाच्या बाजूला असंख्य वेडेवाकडे पसरलेले ऊंच कडे आहेत. कित्येकदा तर प्रवाह इतका चिंचोळा होतो आणि बहुतेक बोट पुढे जाऊ शकणार नाही किंवा नक्कीच पुढून येणार्‍या बोटीला घासेल असे वाटते.

पण बोटींचे कप्तान एकमेकाला भोंग्यांच्या आवाजाचे इशारे देत मोठ्या कौशल्याने बोटी पुढे काढत होते. डोंगरांच्या रांगातून मध्येच अचानक एखादे निसर्गरम्य परिसरात बसलेले गाव दिसत होते...

तर कधी या सर्व निसर्गात उठून दिसणारे आणि चिनच्या सांपत्तीक स्थितीची आणि विकासाची जाहिरात करणारे शहर दिसत होते.

तास-दीडतासाने बोट बादोंग नावाच्या बंदरात उभी राहिली.

येथून आमची शेनाँग नावाच्या यांगत्सेच्या उपनदीची सफर सुरू होणार होती. या सफरीत अगदी लहान आकाराच्या पाण्याच्या ओधातून पण पहिल्या एवढ्याच ऊंच दर्‍यांमधून प्रवास करायचा होता. प्रथम आमच्या बोटीवरून आम्ही एका मध्यम आकाराच्या बोटीवर गेलो. जसजशी बोट पुढेपुढे जाऊ लागली तसे कडे जवळ येऊ लागले आणि त्यांची टोके बघताना प्रवाश्यांच्या टोप्या खाली पडू लागल्या !

एका कड्यावर असलेल्या घळीकडे इशारा करून गाईडने या भागाचे विशेष असलेल्या "टांगत्या शवपेट्या" (hanging coffins) दाखवल्या. प्राचीन काळात या भागांत राहणार्‍या जमातीतील राजे, जनरल अथवा इतर फार सन्माननीय लोकांच्या शवांना प्रथम इतरांसारखेच पुरत असत. पण दोनतीन वर्षांनंतर त्यांच्या अस्थी ऊकरून काढून त्या एका सुंदर लाकडी शवपेटीत ठेवत असत आणि ती शवपेटी एका शेकडो मीटर ऊंच कड्याच्या घळीत लाकडांच्या मदतीने टांगून ठेवत असत. शेकडो / हजारो वर्षे ही प्रथा पाळली जात होती. अश्या शेकडो शवपेट्या शेनाँग नदीच्या काठावर जमा झाल्या होत्या. अलिकडच्या काळात धरणामुळे नदीची ऊंची वाढल्याने आणि अनेक आधुनिक साधने उपलब्ध झाल्याने या शवपेट्यांच्या चोरीचे प्रमाण वाढले तेव्हा उरलेल्या बहुतेक पेट्या संग्रहालयात हलवल्या आहेत. प्रवाश्यांना मूळ जागी बघता याव्या यासाठी दोनतीन जागी मात्र तेथेच ठेवल्या आहेत. त्यातली ही एक जागा...

थ्री गॉर्जेस धरण बांधण्यापुर्वी या कड्यांची ऊंची आता दिसते त्यापेक्षा साधारण १५० मीटर जास्त होती. ह्या इतक्या जड आणि अनेक शतके शाबूत राहणार्‍या शवपेट्या कशा बनवल्या जात असत आणि इतक्या ऊंचीवर चढवून कश्या टांगल्या जात असत हे गुढ अजुनही उकललेले नाही.

दुर्गम भागांतही चालेली विकासाची कामे मधूनच दिसत होती.

साधारण ४५ मिनीटांनी एक नदीच्या मध्यात बांधलेले बोटींग स्टेशन आले

आम्ही पायउतार होऊन स्टेशनच्या पलिकडे गेलो तेथे वल्ह्यांनी चालवायच्या लहान आकाराच्या होड्या आमची वाट पहात होत्या.

अगदी वीस वर्षे अगोदर पर्यंत या होड्या या परिसरात माणसांची आणि सामानाची वहातूक करण्याचे दळणवळणाचे मुख्य साधन होत्या. येथून पुढे आम्हाला त्या काळाचा अनुभव घ्यायचा होता.

आमची गाईड स्थानिक तुजीया जमातीची होती. तिने आजूबाजूच्या भागांत राहणार्‍या लोकांच्या चालीरीती आणि कहाण्या तिच्या खास विनोदी शैलीत सागून सगळ्यांचे खूप मनोरंजन केले. तिचे मूळ स्थानिक नाव होते "माऊ" म्हणून "मला इंग्लिशमध्ये किट्टी म्हणालात तरी चालेल" असे म्हणाली. तिचे इंग्लिशही उत्तम होते... इतके चांगले की ब्रिटीश प्रवाश्यांनी "इंग्लिश कुठे शिकलीस?" असे विचारले ! तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने कोणताही कोर्स वगैरे न करता गेल्या काही वर्षात प्रवाश्यांबरोबर बोलून भाषा आत्मसात केली होती !

धरण बांधण्यापुर्वी नदीच्या शेवटच्या भागात शेनाँगचा प्रवाह फार उथळ आणि खळखळता होता. इतका की त्यातून होड्या वल्हवणे शक्य नव्हते. काही जण काठावरून बांबूच्या दोरीने होडी ओढत असत आणि बाकीचेही बोटीतून उतरून बोटीला (आपण बंद पडलेल्या चारचाकीला जसे ढकलतो तसे) ढकलत असत. शेकडो वर्षे ही पद्धत वापरुन व्यापारउदीम व वाहतूक केली गेली. सहाजीकच या पद्धतीवर आधारलेल्या अनेक लोककथा आणि कविता आहेत. सध्या या भागात पाण्याची पातळी १०० मीटरपेक्षा जास्त वर आल्याने त्या संबद्धीचे प्रात्यक्षीक जुन्या काळातील लोकांना सहन करव्या लागणार्‍या कष्टांची नीट कल्पना देत नाही.

हे संग्रहालयातले एक शिल्प वस्तुस्थितीच्या जवळपास आहे. बांबूची दोरी ओढताना कपडे अंगाला घासून कातडीला इजा होत असे म्हणून हे काम सम्पूर्ण नग्न होऊन करत असत !

परत येताना पुर्वीचाच प्रवास उलट दिशेने करत असताना म्याऊने एक लोकगीत तिच्या सुंदर आवाजात गावून दाखवले. जवळजवळ तीन तास चालेल्या या सफरीचा वेळ कसा संपला ते कळलेच नाही. बोटीवर परतताना बादोंग शहराचे झालेले हे दर्शन.

आज बोटीवर परतल्यावर चिनी ड्रॅगन्सनी शीतपेय देऊन जरा जोरातच स्वागत केले कारण आज कॅप्तानाची निरोपाची मेजवानी (captain’s farewell dinner) होती.

आतापर्यंत नेहमी बुफे जेवण होते पण आज अगदी राजेशाही पद्धतीने बसून "सिक्स कोर्स डिनर" होते. खानसाम्यांनी त्याच्या कौशल्याची चुणूक दाखवत मस्त पदार्थ केले होते. एका स्वागतिकेने टेबलावर येऊन तुमच्यासाठी रोस्ट बीफ ऐवजी रोस्ट पेकींग डक किंवा माश्याचा एखादा पदार्थ यातले काय हवे असे विचारले. अर्थातच मी डक पसंत केले... मांसाहारी असलात तर हा चिनी पदार्थ जरून खाऊन पहा. हा मला आवडलेल्या पदार्थांपैकी एक आहे. सेंचुरी स्कायने त्यांच्या व्यावसायीक कौशल्याची अजून एक चुणूक दाखवली... जेवणाच्या सुरुवातीला एक घोषणा करून हॉलमधले सगळे दिवे बंद केले. आम्ही सर्व आता काय होते याची चर्चा करू लागलो तेवढ्यातच ट्रॉलीवरून एक मोठा केक आणला, दोन स्त्री प्रवाश्यांना आमंत्रित केले आणि मोठ्या संगीताच्या तालावर जाहीर केले की आज त्या दोघींचा वाढदिवस आहे तर सर्वांनीच त्यांचे अभिनंदन करावे. मग अर्थातच "हॅपी बर्थ डे टू यू" हे गाणे झाले. सर्व प्रवाश्यांनी उस्फुर्तपणे बोटीच्या स्टाफच्या आवाजात आवाज मिळवून ते गाणे गायले नसते तरच आश्चर्य ! त्यातली एक स्त्री तर रडायलाच लागली, म्हणाली, "आजपर्यंत माझा वाढदिवस कोणीच साजरा केला नव्हता. आता कितीही समृद्धी आली आणि कितीही वाढदिवस साजेरे केले तरी हा सोहळा मी कधिही विसरणे शक्य नाही." या एका प्रसंगाने कप्तानाच्या पार्टीचा रंगच बदलून टाकला.

आज सेंचुरी स्कायने बरीच भागंभाग करवली होती, त्यातच खास मेजवानी... जेवण अगदी अंगावर आले ! खोलीवर येऊन उद्याच्या थ्री गॉर्जेस धरणाच्या भेटीची आणि महानगरी शांघाईची स्वप्ने पाहत झोपी गेलो.

(क्रमशः)

===================================================================

ड्रॅगनच्यादेशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

या प्रवासमालिकेचे एक एक भाग, मिपाच्या मुकुटावरील रत्ने आहेत!!

एक सूचना करावीशी वाटते - शक्य असल्यास चीनच्या नकाशाच्या भारतीय आवृत्तीची प्रत घेऊन त्यावर या सहलीचे मार्गक्रमण आखून त्याचे चित्र येथे डकवावे...

नकाशात रेखाटलेले मार्गक्रमण पाहिले.
एवढी लांबलचक सहल करणारे विरळाच.

रेवती

भारीच चाललीये सफर. ग्रेट मनोरंजन होत आहे. हाताने वल्हवायच्या होडीच्या सफरीच्यावेळी जरा धाकधुक वाटली. टांगत्या शवपेट्या मला तरी दिसल्या नाहीत.

कड्यावरच्या उभ्या चिरेत शवपेट्या आहेत. जरा निरखून बघीतले तर आडव्या लाकडांच्या आधारे त्या चिरेत अर्धवट बाहेर अर्धवट आत अश्या दिसतात. कडा खूप ऊंच असल्याने चित्रात त्या लहान दिसतात.

पतिसादाबद्दल धन्यवाद !

५० फक्त

लई भारी ओ, जाम मजा येते आहे, एक विचारायचं होतं, तुम्ही काढलेले हे फोटो चिनमध्ये कुणा अधिका-याला वगैरे दाखवावे लागले का प्रसिद्ध करण्यापुर्वी का तुम्ही तिथुन पिकासा किंवा प्लिकरवर अपलोड करताना सेन्सॉर होतात, का परदेशी प्रवाशांना ही सुट आहे.

संपुर्ण प्रवासात कोणत्याही प्रकारची सरकारी किंवा इतर कोणाचीही दखल जाणवली नाही. चिनमध्ये काय अनुभव येईल याबद्दल तुमच्या प्रमाणेच माझ्या मनातही बर्‍याच चिंता होत्या. पण प्रत्यक्ष, अगदी पहिल्या दिवसापासून, ज्या सहजतेने इतर कोठल्याही देशात-- अगदी पाश्चिमात्य देशात-- वावरतो तसे फिरलो. भाषेची अडचण सोडली तर इतर कुठलाच त्रास अजिबात झाला नाही... तोही इंग्लिश बोलणार्‍या गाईडमुळे आणि चिनी भाषेत लिहून घेतलेल्या मार्गदर्शक माहितीमुळे अगदी नगण्यच झाला.

मुख्य म्हणजे हेरगिरीवाल्या इंग्लिश सिनेमात जे परदेशी लोकांच्या मागे हेरे वैग्रे लावलेले असतात तो एखादा तरी बघावा अशी इछा होती पण शोधाशोध करून देखील कोठेच सापडला नाही ;) . शिवाय सर्व गाईड ज्या सहजतेने संभाषण करत होते त्यावरून असे हेर आजूबाजूला नसावेत या माझ्या मताला बळकटीच मिळाली. चिनी आणि परदेशी प्रवाश्यांनी फोटो काढणे सर्वथा प्रवाशांवरच अवलंबून होते आणि त्यात इतर कोणाचा कघीच हस्तक्षेप झाला नाही... किंवा त्याची कोणाला फारशी फिकीर आहे असे दिसले नाही.

मात्र तिबेट भेटीवर कडक निर्बंध आणि कायदे आहेत. त्याबद्दल पहिल्या भागात लिहीले आहेच.

सर्वसामान्य चिनी माणसाबद्दलचे अनेक गैरसमज दूर झाले. भारत-चीन राजकारणाची सर्वसामान्य चिनी माणसाला फारशी माहिती किवा फिकीर आहे असे जाणवले नाही.

चेतन माने

कूतोंग पास वरून समोर दिसणारा कडा नागफणी कड्यासारखा दिसतोय.जाम मज्जा येतेय वाचताना, आणि खरच आमचे सुद्धा चीन बद्दलचे बरेच गैरसमज दूर झाले.
पुभाप्र :):):)

स्मिता.

हा भाग सुद्धा सुंदर आहे अगदी.

यांगत्से नदीचे या भागातले आणि आधीच्या भागतले फोटो बघून लक्षात येतंय की तिचे पाणी पूर्ण प्रवाहात गढूळ (चहासारखे ;)) आहे. खरंच तसेच आहे का? त्यामानाने शेनाँग या यांगत्सेच्याच उपनदीचे पाणी बरेच स्वच्छ वाटले. त्या हिरव्याशार नदीचे आणि बाजूच्या कड्यांचे फोटो खूप आवडले.

यांगत्सेचे पाणी अगदी पहिल्या वळणापासून ते शांघाईला समुद्रात मिळेपर्यंत गढूळच होते. त्यामागे कदाचित तिचा प्रचंड आवाका, पावसाळ्याचे दिवस आणि वेगवान ओघ ही कारणे असावीत.

ह्या ६,४०० पेक्षा जास्त लांब, चीनच्या १/५ भागावर पडणारे पाणी जमा करंणार्‍या नदीच्या खोर्‍यात चीनची १/३ लोकसंख्या राहते. यावरून या नदीच्या आवाक्याची कल्पना यावी.

जगातली फारशी न पाहिलेली ठिकाणे पाहण्याचे भाग्य लाभणारे अनेक असतात. मात्र त्या प्रवासांचे इतके प्रत्ययदायी वर्णन करण्याचा वेळ त्यांना क्वचितच असतो. त्यातही लिहिण्याचा हुरूप आणि उत्तम चौकटीत घेतलेल्या चित्रदर्शी प्रकाशचित्रांद्वारे इतरांना सांगण्याचा सोस असणारे तुमच्यासारखे तुम्हीच!

त्यामुळेच ह्या सर्व प्रवासाची लज्जत तुमच्याच डोळ्यांतून आम्हीही अनुभवली आहे. सर्वच ठिकाणी प्रतिसाद दिलेला नसला तरी वाचत अवश्य आहे. खरे तर वाचल्याशिवाय राहवतच नाही असेच हे सर्व लेख आहेत. त्यांना इथे इत्थंभूत प्रकट केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

असेच अद्भूत प्रवास करत राहा आणि त्याची खुमारी आमच्याप्रत पोहोचवत राहा. त्याकरता तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा!

बॅटमॅन

लैच्च भारी!!!! यांगत्से, तो पंतप्रधान आणि अन्य फटू सगळेच एकच नंबर!!!!!!!!!!!!!!!

(लै टंकायचा कंटाळा आला म्हणून उद्गारचिन्हांनी काम भागवणारा) बॅटमॅन.