दावणगिरी लोणी स्पंज डोसा
Primary tabs
आज काल पुण्यात बर्याच ठिकाणी "दावणगिरी लोणी स्पंज डोसा" असे बोर्ड पहायला मिळतात. पण गंमत अशी की हे सर्व टपरी/गाडीवालेच असतात. एखाद्या चांगल्या होटेलमध्ये अजुनही हा प्रकार मेनुमध्ये मला दिसला नाहीये. पण डोसा मात्र असतो अफलातून. आणि टपरी/गाडीवर खाणे मला फारसं आवडत नाही, म्हणून घरी करुन बघायचा ठरला. आंतरजालावरून ३-४ ठिकाणी मिळालेल्या पाककृतींच्या आधारावर घरी करुन बघायचा घाट घातला. आणि आश्चर्य म्हणजे कुठेतरी वाचून केलेला हा प्रकार कधी नव्हे तो खूपच यशस्वी ठरला. इतका की मिपावर शेअर केल्याशिवाय राहवेना..
साहित्य-
१/२ वाटी साबुदाणे
१/२ वाटी उडिद डाळ
१ वाटी जाडे पोहे
४ वाट्या तांदूळ
१५-२० मेथीचे दाणे
हे प्रमाण साधारण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरते.
कृती-
हे सर्व कमित कमी ५ तास भिजत ठेवणे.
नंतर मिक्सरमध्ये एकदम बाsssरीक वाटून घेणे. जराही रवाळ रहाता नये.
त्यात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा व मीठ घालून ढवळून उबदार जागेत रात्रभर ठेवणे.

डोसा करण्यापूर्वी यात थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे.

इतके पातळ की तव्यावर ओतल्यावर २-३mm जाड आपोआत पसरले जाईल. वरुन वाटीने पसरावे लागता नये. नाहीतर टेक्श्चर नीट येत नाही.
डोसा तव्यावर घालताना तवा खूप तापलेला असु नये. अन्यथा डोसा नीट पसरत नाही. डोसा घातल्यावर लगेच गॅस मोठा करावा.

डोसा सुकत आल्यावर वरुन लोणी घालावे. शक्यतो पांढरे लोणी वापरावे.

वरील बाजू पूर्ण सुकल्यावर एकदाच डोसा उलटावा. मागील बाजूला असा रंग व टेक्श्चर दिसेल.

लगेचच डोसा काढुन चटणी/सांबार याबरोबर सर्व्ह करावा.


पाकृबरहुकूम डोसा बनवून पाहिला आणि अप्रतिम झाला! अगदी सप्रे यांनी दिलेल्या फोटोतल्यासारखा ;)
नवरेबुवा अगदी फिदा झाले... डोश्यांवर!
बायको न पिडल rao reciepe हीच पाहिजे म्हणून.... उद्या आमच्या कडे आहेत... कोण येणार का खराडी ला?
करुन पाहिले. अप्रतिम झाले! चांगला फोटो येईपर्यंत धीर धरवेना म्हणून सध्या तरी एवढीच पोच!
चला, उद्या आमच्याकडे हे दोसे असणारेत. आत्ताच धान्ये भिजत घातली.
सप्रेंनी फोटो टाकून सगळ्यांना कामाला लावलंय जणू...
हा धागा वर आला की दरवेळी आम्ही कामाला लागतोच! ;)
कालच मासुंदा तलावासमोर या नावाची गाडी पाहीली. आता डोसा करुन पहाणे आले.
डोसा स्पाँजी व्हायसाठीची एक ट्रीक सांगतो. पीठामधे थोडं लोणी घालायचं. तव्यावर तेल पसरुन झाल्यावर वाटीनी जवळुन पीठ ओतायच्या ऐवजी दोन एक फुटावरुन ओतायचं आणि लगेचं पसरायचं. साध्या पद्धतीपेक्षा बरीचं जास्तं जाळी पडते डोश्यामधे.
(हौशी शेफ) अनिरुद्ध दातार
या डोशासाठी पसरायचं नाही, फोटोत दाखवल्यासारखा स्पॉन्जी होत नाही तो.ओततानाच पीठ गोलाकार पसरत जाईल असं ओतायचं, वाटी पेल्याने पसरवलास हा डोसा की संपलं!!
हा धागा वर आला म्हणजे दुसर्या दिवशी हा डोसा झालाच पाहिजे. आताच साहित्य भिजत घालते.