देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?
देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?
(सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.)
आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण ते मुलं ज्या वातावरणाचा भाग असतं, त्या वातावरणाचे प्रतिबींब त्याला मातृभाषेत, तीच्या शब्दांत दिसत असतं. ते मुल त्याचा अनुभव घेऊ शकतं, त्यातील साम्य किंवा विरोधाभास त्याला जाणवत राहातो व त्यातूनच पुढे ते मुल 'असं का?' हा विचार करायला लागतं. हे इंग्रजी भाषेतील शिक्षणात अभावानेच होताना आढळतं. ‘A’ म्हणजे Apple हे ते मुल शिकते ते घोकंपट्टीने पण ते ‘अॅपल’ त्याला आपल्या वातावरणात पुस्तक आणि ते विकणारा भय्या यांच्या व्यतिरीक्त कुठेच आढळत नाही. या उलट आंबा ते झाडावर पाहू शकतं. मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते.
या पार्श्नभूमीवर नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या मराठी चित्रपटातील एक प्रसंग विचार करण्यास लावणारा आहे. चित्रपटात डॉ. आमटेंचे सहकारी आदीवासी मुलांना शिकवायचा प्रयत्न करतात असे दृष्य आहे. मुल त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार एकमेकांत मजा करण्यात गुंतली आहेत. शिक्षक काय शिकवतायत आणि ते काय बोलतायत याकडे मुलांच अजिबात लक्ष नाहीय कारण त्यांच्या दृष्टीने काहीतरी अगम्य असे शिक्षक बोलत आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते त्यांनी कधीच पाहिलेलं वा अनुभवलेलं नाहीय. शेवटी कंटाळून ती मुल शाळेतून सुंबाल्या करण्याची सुरुवात करतात तेंव्हा डॉ. आमटे शिक्षकांना सांगतात की अरे त्या मुलांना त्यांच्या शब्दांत, त्यांना समजेल अशा भाषेत शिकव. या प्रसंगाला थिएटर मध्ये मोठा हशा (लाफ्टर) मिळतो व हा प्रसंग विनोदी प्रसंग म्हणून जमा होतो. उद्या हा प्रसंग एखाद्या पुरस्कारासाठी 'सर्वात चांगले विनोदी दृष्य' म्हणून नॉमिनेट झाले तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही कारण आपण आता या विनोदी प्रसंगाचे अविभाज्य भाग झालो आहोत.
इंग्रजी वा इतर कोणतीही भाषा व्यक्तीनत्व विकासासाठी हातभार लावते यात कोणतीही शंका नाही. पण ती श्रेष्ठ आणि आपली भाषा मागासलेली हा विचार मात्र कोतेपणाचा आहे. इंग्रजी भाषेत महान ग्रंथसंपदा निर्माण झाली, निरनिराळे शोध लागले, औद्यागीक क्रांती झाली याचं श्रेय नि:संशय त्या भाषेचंच आहे. पण हे सर्व लेखक, कवी वा शास्त्रज्ञ यांची 'मातृभाषा' इंग्रजी किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे आपण लक्षात घेत नाही. परकीय भाषेत संपूर्ण शिक्षण घेऊन एखाद्याने एखादा मोठा शोध लावला व तत्वज्ञान मांडले असे माझ्या अद्याप वाचनात व ऐकण्यात आलेले नाही. त्याच्याही अगोदर आपल्या देशात शुन्याचा क्रांतिकारी शोध लागला,
ग्रह-तारे यांच्याविषयी माहिती आपल्याला व अरबांना पाश्चात्यांच्या खूप पुर्वीपासून होती, आयुर्वेदासारखं शास्त्र आपल्या देशात फारच पुर्वी विकसीत झालेले होते. कालीदासाचे मेघदूत, रामायण, महाभारत ही महाकाव्ये ही जगभर मान्यता पावलेली होती आणि ही सर्व त्याकाळी प्रचलीत असलेल्या संस्कृत या समृद्ध 'देशी' भाषेतच आहेत. भाग्वाद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झाली व भगवद्गीता तत्वाज्ञानावरचा जगातला एक जुना व अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे तो संस्कृत भाषेतच आहे. आपले सहीत्य, कलाकृती, शास्त्र इंग्रजी भाषेतल्यापेक्षा पुर्वीचे व काकणभर सरसच आहेत. इथे भाषांची तुलना करण्याचा प्रयत्न मी करत नाही तर प्रतयेक भाषा ही परिपूर्ण असतेच तर मला एवढेच म्हणायचे आहे कि ज्ञान्साधानेसाठी मातृभाषा हि इतर कोणत्याही भाषेसाठी अधिक योग्यच नव्हे तर एकमेव असते.
आपल्या देशात प्रथम मोंगल व नंतर इंग्रजांच्या राजवटीत आपल्या देशातील भारतीय भाषांची पीछेहाट झपाट्याने होऊ लागली. इंग्रजांना तर त्यांचे साम्राज्य शाबूत ठेवण्यासाठी बंदूकीपेक्षा भाषेने आधार दिला. इंग्लीश शिक्षणतज्ञ मेकॅले याच्या सुपीक डोक्यातून जन्मलेली शिक्षण पद्धती इंग्रज सरकारने देशात लागु केली. ही शिक्षण पद्धती आपली म्हणजे स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढु नये, किंबहूना त्यांनी विचारच करू नये अशा पद्धतीने आखलेली होती. इंग्रजांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा 'रोबो' नोकरवर्ग हवा होता तो त्यांचा हेतू त्यांनी भाषेच्या माध्यमातून साध्य केला. इंग्रजी भाषेनुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणं सोप्पं झालं असं म्हणताना इंग्रजी ही ‘त्यांची’ मातृभाषा होती हे आपण लक्षातच घेत नाही. इंग्रजांनी इथ इंग्रजी शिक्षण देण्यास सुरूवात केली ती त्यांची भाषा समजणारा नोकरवर्ग त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून! कारण त्यांना त्यांच्या भाषेत कारभार करायचा होता. इंग्रज अर्ध्यापेक्षा अधिक जगावर राज्य करू शकले यात त्यांच्या
दरा-यापेक्षा त्यांच्या भाषेचा वाटा मोठा होता. त्यांनी कोणत्याही देशावर राज्य करताना ‘त्यांच्या’ मातृभाषेचाच आधार घेतला हे विसरून चालणार नाही. जेत्यांनी जीतांवर आपली भाषा व संस्कृती लादण्याचा प्रघात पहिल्यापासूनच आहे मात्र जे जे देश परकीय सत्तेपासून स्वतंत्र झाले त्यांनी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या भाषेची संस्कृतीची पुनर्स्थापना केली. सोव्हिएत रशियातील संघराज्य अनेक वर्ष एकसंघ राहून महाशक्ती बनू शकला यात दडपशाही एवढाच त्यांच्या देशभर लागु केलेल्या 'रशीयन भाषेचा' जुलमी आग्रहही कारणीभूत होता. भाषा हा समाजाला ताब्यात ठेवण्याचं वा एकसंघ ठेवण्याचं प्रभावी माध्यम आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे
स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६७ वर्ष उलटून गेलियावरही आपण मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत फार बदल केलेला नाही. आजही आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रेत्साहन देऊन 'फाड फाड इंग्लीश' बोलणारा मात्र विचारशक्ती पुरेश्या प्रमाणात विकसीत न झालेला असा उच्चशिक्षीत नोकरवर्गच तयार करीत आहोत असं म्हणण्यास जागा आहे.
इंग्रजी ही जागतीक संपर्काची भाषा आहे हे खरंच ! परंतू संपर्काची भाषा असणे व ज्ञान भाषा असणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. केवळ उत्तम(?) इंग्रजी बोलता येणे यात अभ्यासापेक्षाही सवयीचा भाग जास्त आहे. माझे एक परिचित केवळ १० वी पास. तेही गावाकडच्या शाळेत शिकलेले. परंतू इंग्रजी संभाषण चांगल्यापैकी करायचे कारण एका इंग्लीश कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात अनेक वर्ष शिपाई म्हणून काम केलेलं..! कोणतीही भाषा संपर्काचे माध्यम म्हणून वापरणे वा बोलता येणे हा शिक्षणापेक्षा त्या भाषेच्या सहवासात राहाणे याचा भाग आहे असे मला वाटते. मुंबई सारख्या शहरात अनेकजण गुजराती वा मारवाडी भाषा उत्तम रित्या बोलु शकतात वा वाचु शकतात यात विशेष असे काहीच नाही कारण ते त्या समाजाच्या सहवासात राहत असतात. परंतू अशी माणसे काही गंभीर विचार करताना वा सुख-दु:खाच्या भावना व्यक्त करताना मातृभाषेचाच विचार करतात हे खरं आहे.
जगातील मुख्य विकसित देशांचे उदाहरण घेतले तरी हेच दिसून येते कि त्यांच्या देशात त्यांच्याच भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्वाच्या देशात शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे आपण नजरेआड करून चालणार नाही. या देशांमध्ये इंग्रजी व इतर परकीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते ते केवळ संपर्काचे साधन असावे म्हणून, मात्र मुख्य शिक्षण त्या त्या देशांच्या मातृभाषेतूनच दिले जाते.
नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात या अर्थाचे विधान केले. खरतर बंदी घालून काहीही साध्य होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याउलट देशी भाषांच्या शाळांना प्रोत्साहन, देशी भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य, कलाकृती कशा निर्माण होतील याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षणाचं मुख्य मध्यम मातृभाषाच असावी. ती सोप्पी, मुलांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. मुलांना आपल्या भाषेची रुची उत्पन्न होईल अशी तिची मांडणी व्हायला हवी. ज्यावेळी व्यवहारात देशी भाषांचे महत्व वाढेल, देशी भाषांना प्राधान्य दिले जाईल तेंव्हाच इंग्रजी भाषेचं महत्व कमी होत जाईल. प्रशासनाची भाषा, न्यायदानाची भाषा देशीच असावी असा आग्रहच नव्हे तर हट्ट असावा. त्यासाठी आंदोलने देखील करण्याची तयारी ठेवावी लागेल तरच देशी भाषांचं महत्व वाढेल. मी कित्येकदा उच्च न्यायालयात कामानिमित्त जात असतो. तेथे कोर्टासमोर फर्ड्या इंग्रजीत वादविवाद चालू असतात. त्या उच्चशिक्षित वकिलांचा अशील जो माझ्यासारखा असतो किंवा ब-याचदा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतो त्याचा एखादा खटला चाललेला असते. हे सर्व पहाताना एक गमतीचा विचार मनात येतो की ज्याच्या भवितव्यासाठी वा ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे विद्वान वकील न्यायाधीशांसमोर वादविवाद करीत आहेत त्या अशिलाला त्यांचे काय चालले आहे हे काहीच कळत नसते. तो भांबावल्या सारखा एकदा या वकिलाकडे तर एकदा त्या वकिलाकडे पाहत असतो. माझीही बऱ्याचदा अशी परिस्थिती होते हा माझा अनुभव आहे.
सरकारी मराठी भाषा तर एखाद्या मराठीचा बऱ्यापैकी जाणकार माणसाला देखील कळणे अवघड जाते तर एखादा ग्रामीण भागातील मनुष्य ती काय समजणार? त्यातील मराठी(?) शब्दप्रयोग तर अनेकदा अनाकलनीय असतात. त्या शब्दांना मराठी का म्हणावे असा प्रश्न पडतो. केवळ याच कारणांमुळे शासनाच्या अनेक चांगल्या योजना सामन्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हा अनुभव आहे. सरकारी खात्यांचा पत्रानुभव तर हसावं की रडावं या प्रश्नाच्याही पलिकडचा आहे व असतो. मी बॅंकेत नोकरी करत असताना रिझर्व बॅंकेकडून आम्हाला कामकाजाच्या निमित्ताने पत्र यायची. पत्रं अगदी उच्चस्तरीय अस्खलित इंग्रजी भाषेत लिहीलेली असायची पण शेवटी मात्र जाड ठशांत छपाई केलेलं एक वाक्य असायचं ' हम हिन्दी मे पत्र व्यवहार का स्वागत करते है'. म्हणजे काय? मग तुम्ही का नाही हिन्दीत पत्र पाठवले? भाषेच्या या अशा माकडचेष्टा आपल्या देशांत सुरू आहेत आणि महाराष्ट्र त्यातही 'नं. १' वर आहे.
मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा असली तरी ती डोक्यावर राजमुकुट घालून फाटक्या कपड्यात मंत्रालायासमोरच्या फुटपाथवर उभी आहे असे काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी सांगितले होते..आता इतक्या वर्षानंतर तिची अवस्था आणखीनच दयनीय झालेली दिसत आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद व्हाव्यात या दृष्टीने सर्व बाजून पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. यातला सर्वात मोठा वाट आपल्या मराठी लोकांचाच आहे हे त्यात आणखी दुर्दैव आहे. सुशिक्षीत असोत वा अशिक्षित आई बाप मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात धन्यता मनात आहेत. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालणे म्हणजे काहीतरी मोठा अपराध आहे अशी आपली मानसिक धारणा झालेली आहे. मुलगा वा मुलगी convent मध्ये शिकतो हे सांगणे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले आहे. मराठी बोलणे आज मागासलेपणाचे लक्षण मानले जात आहे. मराठी आई-बाप आपल्या पाल्याने इंग्रजीच बोलावे असा दुराग्रह करत आहेत. यात त्या मुलाचे काय हाल होतात या कडे कोणीही लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही. समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरचे आई-बाप देखील माहागड्या फिया भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी काय वाटेल ते करत आहेत. अस का करता, हे बहुतेकांना विचारलं असता उत्तर एकच मिळतं, इंग्लीश छान बोलता येतं म्हणून. पुन्हा इंग्लीश छान बोलता येण्यानं काय होणार असं विचारता, चांगली नोकरी मिळते हे उत्तर मिळतं. म्हणजे आयुष्याचा पाया असलेली वय वर्ष पाच ते पंधरा अशी महत्वाची १० वर्ष केवळ इंग्रजी बोलता येण्यासाठी आणि तीही नोकरी मिळावी म्हणून खर्च करायची हे असं काहीतरी विचित्र चाललंय..!!मुल दिवसभर स्कूल मध्ये काढून घरी येतो तो मम्मी त्याला ‘स्नॅकस’ आणि ‘मिल्क’ देते. तीच मम्मी मिल्क ला दुध म्हणताना तो ऐकतो व दुध म्हणतो त्याला मम्मी हरकत घेते व म्हणते, ‘नो बेटा डोन्ट से दुध, से मिल्क..’. आता पोर गोंधळात, की मग ही का दुध म्हणते..मग ती सांगते कि दुधवाला अशिक्षित आहे आणि त्याला इंग्लिश कळत नाही म्हणून त्याला मराठीत सांगितले. यावर ते पोरग आपल्याशी समीकरण बांधते की मराठी ही अशिक्षित लोकांची भाषा आहे हळूहळू त्याच्या मनात आपली भाषा मागासलेली आहे असा समज पक्का व्हायला लागतो. ते पोरग ज्या समाजात वावरते तेथील शब्द संपदा व तो जे शिकतो त्या पुस्तकातील शब्दसंपदा यात त्याला काहीच साम्य दिसत नाही. वर उल्लेख केलेला ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातील प्रसंग या पार्श्वभूमीवर आठवून पहावा.
भाषा म्हणजे केवळ शब्द आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी नसते तर त्या त्या भाषेतून, त्या भाषेच्या शब्द संपत्तीतून त्या त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे आपोआप पोचवला जात असतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे एखाद मुल सुसंस्कृत होण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. शिक्षणाची भाषा मातृभाषाच असावी हे जगभरातील तज्ञ ओरडून सांगत आहेत. मातृभाषेत शिक्षण व जोडीला किमान एकतरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञान कशा रुंदावतात. मनुष्य जेवढ्या भाषा शिकतो तेवढा तो जगाविषयी सजग होतो पण या सर्वांचा पाया मात्र नि: संशय मातृभाषा असावी.
थोडेसे भाषेच्या शुद्धतेविषयी..
आज जगातील कोणतीही भाषा तिच्या मूळ स्वरुपात नाही हे सत्य आहे. ज्या भाषा जिवंत आहेत त्या भाषांमध्ये शब्दांची देव-घेव सतत चालू असते किंबहुना ती तशी चालू असेल तर आणि तरच ती भासह जिवंत आहे असे समजण्यास काहीच अह्रकत नाही. आज आपण जी शुद्ध (?) मराठी बोलतो वा वापरतो ती तिच्या मूळ स्वरूपापासून खूप वेगळी आहे तरी ती आपली वाटते यात दुमत नसावे. आजच्या आपल्या प्रमाण मराठी भाषेत फारसी, अरबी वा दक्षिण भारतीय भाषांतील अनेक शब्द बेमालून मिसळून गेले आहेत. आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे ‘फडणवीस’ हे आडनाव चक्क फारसी ‘फर्द्नवीस’चा अपभ्रंश आहे हे वाचून आपल्यालाही आश्चर्य वाटेल एवढे ते आपले होऊन गेले आहे. मस्करी, मस्ती, महिरप, मातब्बर, शंकरपाळं ह्या शब्दांचं मुळ अरबी/फारसी आहे हे कोण सांगायला गेले तर आपण त्याला वेड्यात काढू पण ते खर आहे. पटाईत, निरोप, मुलगा या अस्सल मराठी वाटणाऱ्या शब्दांचं मूळ कानडी आहे. टेबल, स्टेशन, सीम-कार्ड, इंजिनीअर असे इंग्रजी शब्द आता ग्रामीण माणसालाही सहज समजतात व ते तसेच लिहिण्यास व बोलण्यास काहीच हरकत नाही. उलट त्यास मराठी/भारतीय भाषेतील मेज, स्थानक, अभियंता असे प्रतिशब्द दिल्याने त्याचा काहीच बोध होत नाही हि वस्तुस्थिती आहे. भाषा शुद्धीचा अतिरेकी आग्रह शेवटी त्या भाषेच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. इंग्रजी भाषेतील देखील काही शब्द अपभ्रंशीत होऊन समाविष्ट झाले आहेत. अवतार, जंगल, बंगला, गुरु, लुट, महाराज, मंत्र, रोटी असे कितीतरी भारतीय शब्द इंग्रजी भाषेत मोठ्या सन्मानाने विराजमान झालेले आहेत. प्रतिष्ठित इंग्लिश ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ७०० हून अधिक भारतीय शब्द स्वीकारले गेले आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल-नसेल पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या दोन किंवा अधिक भाषा कोणत्याही कारणाने एकमेकींच्या संपर्कात येतात तेंव्हा त्यात शब्दांची अदलाबदली होणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे भाषा अशुद्ध झाली किंवा बाटली म्हणण्याचे काहीच कारण नाही. उलट अशा आदान-प्रदानामुळे भाषा समृद्धच होत असतात. हे दोन नद्यांच्या संगमासारखे आहे. नद्यांच्या संगमाला तीर्थक्षेत्राचा मान देणारी आपली संस्कृती या भाषा रुपी नद्यांच्या संगमाला नक्कीच सन्मान देईल परंतु त्याची सुरुवात वा त्यतील मोठेपणा आपल्या जनतेला कोणीतरी समजावून देणे गरजेचे आहे.
- गणेश साळुंखे
९३२१८ ११०९१
धागा गिरेजा इन वंडरलँड
गिरीजा ऐवजी गुरुजी असावे असे प्राची अश्विनी - Fri, 24/04/2015 - 10:44 गिरीजा ऐवजी गुरुजी असावे असे वाटते.:) उत्तर द्या चला नाद खुळा - Fri, 24/04/2015 - 16:17 दोस्तहो या विषयावर बोलू काही. "काय लिहिलय यापेक्षा कुणी लिहिलयं यालाच जास्त महत्व दिलं की असं होणारच" चांगल्याला चांगले म्हणण्याची अति वैट्ट खोड असलेला. जुनाट ना़खु.