एक वर्षानंतर . . .
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________
💬 प्रतिसाद
(1265)
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 10/12/2015 - 17:36
नवीन
नेहरूंसारखा दूरदर्शी नेता नसता तर आय.आय.टी.,आय आय एम. डी आर डी. ओ सारख्या संस्था उदयाला आल्या असत्या का ?बससेवा सुरु करणे म्हणजे मुत्सद्दीपणा नव्हे. परिवहन मंडळाचे अधिकारी ते करत असतातच.
श
श्रीगुरुजी
Mon, 10/12/2015 - 18:51
नवीन
देवेगौडा नसते तर भारतात आंतरजाल सुरू झाले असते का किंवा गुजराल नसते तर भारतात भ्रमणभाष सेवा सुरू झाली असती का या प्रश्नाचे जे उत्तर आहे तेच इथे लागू आहे.
ग
गामा पैलवान
Mon, 10/12/2015 - 19:41
नवीन
श्रीगुरुजी,
तुमचा प्रतिसाद वाचल्यावर माईसाहेबांच्या प्रश्नातच दडलेलं उत्तर सापडलं. संस्था सुरू करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टी बाळगणे नव्हे. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ आधीपासून कार्यरत होतेच.
आ.न.,
-गा.पै.
D
dadadarekar
Mon, 10/12/2015 - 19:37
नवीन
क्यु रुला रही है ?
बस बोलते बोलते अब एरोप्लेन ( और उसमेंसे छोडे उग्रवादी ) की याद आकर श्रीगुर्जी रो पडेंगे !
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 10/13/2015 - 06:09
नवीन
आंतरजाल, मोबाइल व संस्था सुरू करणे ह्या गोष्टी भिन्न आहेत.वाजपेयी पंतप्रधान नसते तरी पोखरण-२,आय.टी.अॅक्ट-२००० ह्या गोष्टी झाल्याच असत्या असेच समजायचे ना?
श
श्रीगुरुजी
Tue, 10/13/2015 - 10:29
नवीन
नरसिंहराव यांनी १९९५ मध्येच पोखरणची तयारी केली होती, परंतु अमेरिकेला त्याचा वास लागल्यावर त्यांच्यावर दडपण आणून अमेरिकेने ती चाचणी होऊन दिली नाही. हे लक्षात घेऊन वाजपेयींनी अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकून ती चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. वाजपेयी पंतप्रधान नसते तरी पोखरण-२, आय टी अॅक्ट - २००० इ. गोष्टी नक्कीच झाल्या असत्या.
प
प्यारे१
Tue, 10/13/2015 - 10:31
नवीन
कुठल्या प्रकारची धूळ होती म्हणे?
काय दराने घेतली?
किति कोटेशन मागवले होते?
वगैरे वगैरे....
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 10/13/2015 - 10:39
नवीन
यथेच्छ टर आणि टिंगळटवाळी उडवून झाली असली आणि खरोखरच काय झाले होते हे जाणून घ्यायची इच्छा असली तर एक गोष्ट नक्कीच शोधून बघा.१९९८ च्या अणुचाचण्या भारताने अमेरिकेला अंधारात ठेऊन केल्या होत्या आणि त्याला अमेरिकेने intelligence failure of the decade असे म्हटले होते. बघा जरा शोधाशोध करून. नक्कीच काहीतरी मिळेल.
प
प्यारे१
Tue, 10/13/2015 - 10:49
नवीन
श्रीगुरुजींनी ज्यापद्धतीनं भाजप सरकारची पाठराखण चालवली आहे त्यामुळे थोडी खेचावीशी वाटली. ;)
मुळात काँग्रेस सरकार असतं तर असं झालं नसतं का असा प्रश्न आहे. कारण देशाचं परराष्ट्र आणि संरक्षण धोरण हे शक्यतो सरकार निरपेक्ष असतं ऐकलं आहे.
आज निर्णय घेतला आणि उद्या अणुचाचण्या झाल्या असं होणं शक्य नाही. १९९५ साली नरसिंहराव सरकार वर चाचण्या न करण्यासाठी दबाव आणला होता म्हणजे तेव्हा सगळी यंत्रणा सज्ज होती. १९९८ साली अणुचाचण्या झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया नकारार्थी होती का?
श
श्रीगुरुजी
Tue, 10/13/2015 - 10:57
नवीन
पाहिजे तेवढी खेचा हो. मी एंजॉय करतो.
मी आधीच्याच प्रतिसादात लिहिले आहे. काँग्रेस सरकार असते तरी पोखरण-२ झालेच असते.
पोखरण-२ झाल्यावर कम्युनिस्टांनी तर जाहीर विरोधच केला होता. पाकिस्तानवादी पुरोगामी विचारवंतांनी (उदा. कुलदीप नय्यर) देखील विरोध केला होता. कॉन्ग्रेसचा विरोध वेगळ्या प्रकारचा होता. शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना भाजपने ही चाचणी याचवेळी का घेतली असे अनेक काँग्रेस नेत्यांनी जाहीररित्या विचारले होते आणि त्याचे उत्तर देखील दिले होते. सरकारला जयललिता त्रस्त करीत होती व त्यामुळे सरकारची प्रतिमा खालावत होती. आपली प्रतिमा जनमानसात उंचावण्यासाठी पोखरण-२ केले गेले अशी टीका काँग्रेसवाले करीत होते.
क
कपिलमुनी
Tue, 10/13/2015 - 12:43
नवीन
पोखरण -१ च्या वेळी काय झाला होता ??
श
श्रीगुरुजी
Tue, 10/13/2015 - 16:46
नवीन
त्यावेळी काय झाले होते ते आठवत नाही/माहिती नाही.
म
मालोजीराव
Fri, 10/16/2015 - 11:29
नवीन
नेहरूंच्या इतका International प्रेसेंस असणारा नेता त्यांच्यानंतर झाला नाही, मोदी आंतराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा निर्माण करण्याचा चांगला प्रयत्न करत आहेत हे मान्य करावे लागेल पण त्यांचाकडे तो क्लास आणि चार्म नाही
क
कपिलमुनी
Fri, 10/16/2015 - 11:34
नवीन
आता दंगा होणार
मालोजीराव , एक तर नेहरू मोदी तुलना ! आणि डायरेक्ट निकाल लावून टाकलात !
पळा!!!
म
मृत्युन्जय
Fri, 10/16/2015 - 12:43
नवीन
पण त्यांचाकडे तो क्लास आणि चार्म नाही
निर्विवाद सत्य
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 10/13/2015 - 13:55
नवीन
"मोदी सरकारने 1 वर्षात काय केले, काय केले नाही हे कसे काय ठरवणार."
सोप्पंय! ५५ वर्षात काँग्रेसने काहीही केले नाही हे ज्या निकषांवर ठरवले त्याच निकषांवर वरील प्रश्नाचेही उत्तर निघेलच की. काय म्हणता?
बाकी मोदी आल्यावर २-३ महिन्यातच मंगळयान पोचलं मंगळावर, ते ही पहिल्याच प्रयत्नात. किंवा आज जे काही पब्लिक अमेरिकेत आहे आणि ज्यांना भुलवायचा प्रयत्न मोदी करत आहेत, त्यातले बहुसंख्य हे काँग्रेसच्याच काळात उदयास आलेल्या आयायट्या आणि आयायेम (आणि तत्सम) वगैरे ठिकाणाहून शिकून बाहेर पडले आहेत. This is just FYI बरं का.
अजून एक म्हणजे, 'त्यांनी ५५ वर्षे नालायकपणा केला, मग आता आम्हाला संधी द्या' अशा मुख्य युक्तिवादामुळे सत्ता मिळाल्यावर, एका वर्षात काही तरी दिशा दिसण्याची (फळं मागतच नाहीये, दिशा तरी दिसू द्या किमान) अपेक्षा आहे. त्याऐवजी जे काही दिसते आहे त्यावरून फारसे वेगळे काही होईल असे वाटत तरी नाहीये. अजून ४ वर्षे वाट बघूच. आणि झालेच यशस्वी मोदी तर देशाचेच भले होईल, मोदींबद्दल आकस नाहीच. कोणाच्या तरी काठीने साप मरू दे, बास!
D
dadadarekar
Mon, 10/12/2015 - 19:38
नवीन
चौथे सोनेरी पान सुरु झाले!
ग
गामा पैलवान
Mon, 10/12/2015 - 19:50
नवीन
दादोबा, तीनपत्ती खेळताय वाटतं? चौथं पान लावलंत ते!
आ.न.,
-गा.पै.
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 10/13/2015 - 05:44
नवीन
गुरूजी तुमची विचारसरणी आत्यंतिक उजवी दिसते, अम्हांस काहीच आत्यंतिक पचत नाही देवानु, मग तो दादु असो का गुरूजी, त्यातल्यात्यात तुम्ही ज़रा आकड़े वगैरे देता (कल्याण लकी ड्रॉ नाही स्टैटिस्टिक्स म्हणतो मी) म्हणुन थोड़े बरे पड़ते, पण आत्यंतिक विचारांनी काहीही साध्य होऊ शकत नाही हे उगाच्च तुमच्याजवळ नोंदवावे वाटले बघा, तुम्ही कितीही द्वेष करा ह्या देशाच्या प्रगति मधे नेहरुंचा एक हिस्सा अन कंट्रीब्यूशन आहेच आहे! अर्थात ह्याच्यासाठी आता माझ्यावर ही टिका करणार असाल तर कठीण आहे
न
नाव आडनाव
Tue, 10/13/2015 - 06:08
नवीन
लै वेळा +
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 10/13/2015 - 06:27
नवीन
संघ मंडळींचा सुरुवतीपासून हाच प्रोब्लेम आहे असे ह्यांचे मत.नेहेरूंनीच बोस ह्यांचा अपघात घडवला, नेहेरूंना पटेल नको होते,नेहरू मराठी द्वेषक होते..असल्या पुड्या पूर्वीपासून सोडल्या जायच्या ह्या लोकांकडून.नेहरूंच्या राजकारणाला विरोध करता येईल पण देशोदेशीच्या लोकांन भेटून्,शेकडो कोटींची मदत घेउन ह्या संस्था उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला हे वास्तव आहे.
गाय खावी की खाउ नये,शाकाहार की मांसाहार,वंदे मातरम म्हणावे की म्हणू नये हा वाद नेहरू घालत बसले नाहीत.
D
dadadarekar
Tue, 10/13/2015 - 06:48
नवीन
चाय पे चर्चा
गाय पे चर्चा
माय पे चर्चा
म
मृत्युन्जय
Tue, 10/13/2015 - 07:19
नवीन
गाय खावी की खाउ नये,
घटनेच्या ४८ व्या कलमाप्रमाणे गायींचे शिरकाण रोखणे हे सरकारचे काम आहे. ही घटना तीच जी बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या घटना समितीने लिहिली आणि श्री जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना लागू झाली. ही घटना आपल्या सर्वांच्या वरची आहे. त्यामुळे नेहरुंनी गाय खावी की खाऊ नये यावर वाद घातला नाही हे वक्तव्य अंशतः मान्य कारण त्यांनी वाद नाही घातला तर सरळ हा सर्वोच्च कायदा करुन मोकळे झाले. तर अश्या या गाईंना मारणे हे घटनाबाह्य कृत्य असल्याचे आपल्या निदर्शनास आणुन देतो.
कलम ४८ खाली देत आहे:
Organisation of agriculture and animal husbandry The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle
D
dadadarekar
Tue, 10/13/2015 - 07:35
नवीन
गाय , म्हैस व शेळी यांचा समावेश होतो.
हिंदू लोक शेळी खायचे कधी बंद करणार ?
म
मृत्युन्जय
Tue, 10/13/2015 - 08:14
नवीन
- मी गाय म्हैस शेळी बोकड काहिही खात नाही.
- वरती उद्धृत केलेले वाक्य घटनेतले आहे. जी सगळ्यांना समान लागू पडते. फक्त हिंदुंना नाही. त्यामुळे हे प्राणी सर्वधर्मीयांनी खाणे बंद करावे अथवा घटना बदलुन घ्यावी.
- वरती उद्धृत केलेले वाक्य घटनेतले आहे. ते माझे मत असेलच असे नाही पण घटनेला सर्वोच्च प्राधान्य असते असे कायद्याचा अभ्यास करताना वाचले होते. खरे खोटे नेहरु जाणे.
- नेहरुंनी असले वाद घातले नाहित असे इनोदी वक्तव्य माईंनी केले (माई, नाना, हितेश, सचीन, जिनीयस, फिलोसॉफर वगैरे सगळे तुम्हीच असे काही म्हणतात. जे इथे विचारात घेतले गेलेले नाही त्यामुळे माईंचा सेपरेट उल्लेख केला) म्हणुन केवळ पुरावा दिला. स्वतः नेहरुंनी देखील असल्या गंमती केल्या आहेत.
D
dadadarekar
Tue, 10/13/2015 - 08:31
नवीन
वरील कलम पूर्वीपासूनच आहे तर गोहत्याबंदीच्या कायद्याचे सेप्रेट नाटक कशासाठी ?
हिंदुंचा उल्लेख मी अशासाठी केला की या व अशा कायद्याचे हत्यार वापरुन हिंदू बीफ न खाण्याबाबत मुस्लिमाना टार्गेट करतात.
कायदा असाच असेल तर गोहत्येप्रमाणेच सर्वप्राणीहत्येसाठी केसेस घालाव्यात व सर्वानाच शिक्षा द्यावी.
आणि हिंदू हा कायदा बिनधास्तपणे मोडून जर शेळी खातात तर मुसलमानानी किंवा इतर कुणीही तितक्याच बिनधास्तपणे बीफ का खाउ नये ?
... कोंबड्याना संरक्षण न दिल्याबद्दल अखिल भारतीय कुकुचकू संघाकडून जाहिर निषेध.
ब
बॅटमॅन
Tue, 10/13/2015 - 08:36
नवीन
पॉइंट आहे. या तो घोडा बोलो या तो चतुर.
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 10/13/2015 - 08:45
नवीन
ओ दादा. हे घटनेतील मार्गदर्शक तत्वांमधले कलम आहे. मार्गदर्शक तत्वे आणि घटनेतील इतर बंधनकारक तरतुदी यातला फरक समजतो ना? याच मार्गदर्शक तत्वांपैकी कलम ४४ आहे: "—The State shall endeavour to
secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India" म्हणजे समान नागरी कायदा असावा. सध्या तो आहे का?
एक गोष्ट समजत नाही. राज्यघटनेतल्या एका मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करायचा प्रयत्न झाल्यावर हे सगळे बुध्दीवादी, विज्ञानवादी आणि आदर्श लिबरल लोक इतका गोंधळ घालत आहेत. मग कलम ४४ ची अंमलबजावणी करायचा प्रयत्न केल्यास किती गदारोळ घालतील असली मंडळी काय माहित!!
D
dadadarekar
Tue, 10/13/2015 - 09:36
नवीन
हायला , गाय मारणार्याचं बखोट पकडायचं व त्याला घटना दाखवायची .
शेळी खाणार्याला हेच करा असं आम्ही म्हटलं की युक्तिवाद करायचा की ते केवळ मार्गदर्शक तत्व आहे , बंधनकारक नाही !
भाजपाचे रामराज्य ते हेच की काय ?
म
मृत्युन्जय
Tue, 10/13/2015 - 10:20
नवीन
तुम्ही स्वतःचा विचार करा आधी. तुम्ही दोन्ही खाता ना? पण डुक्कर खाण्यावर बंदी नाही. ट्राय करुन बघा
म
मृत्युन्जय
Tue, 10/13/2015 - 11:49
नवीन
दादा तुम्ही मूळ मुद्दा बघितला का? अश्या गंमतीजमती नेहरुंनी केल्या नाहित हा देखील अपप्रचारच म्हणायचा ना मग? घटनेच्या चौकटीत राहुन, घटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जर सरकारने एखादा कायदा केला असेल तर त्यासाठी केवळ सद्य सरकारला जबाबदार धरण्यात काहिच हशील नाही.
शिवाय नेहरु नेहरु म्हणुन छाती बडवुन घेणार्या लोकांनी हा विरोधाभासही लक्षात घ्यावा आणि गोहत्याबंदीचे जनक डॉ. आंबेडकर आणि चाचा नेहरु आहेत हे मुळात जाणुन घ्यावे.
तिसरी गोष्ट म्हणजे शेळ्या मेंढ्या हिंदुही खातात आणि मुसलमानही. मात्र बीफ केवळ मुसलमानच खातात हिंदु खात नाहित (असा आपला लोकांचा समज आहे. प्रत्यक्षात बीफ खाणारे हिंदुही बरेच सापडतील). मुसलमानांनी बीफ खावे किंवा खाऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे पण असे करताना ते कायदा मोडत नाहित हे त्यांनी स्वतःच तपासावे. ज्या देशाच्या घटनेने त्यांना चार लग्ने करण्याची आणि घटस्फोटित बायकांना पोटगी न देण्याचा अधिकार दिला त्याच देशाच्या कायद्याने बीफ वर बंदी देखील आणली आहे. त्यामुळे एका कायद्याचे फायदे घ्यायचे आणी दुसर्याच्या नावाने गळे काढायचे हा प्रकार करण्याचा नैतिक अधिकार मुसलमानांना आहे की नाही हाच एक चर्चेचा विषय होउ शकतो.
चौथा आणी गंमतीचा मुद्दा की गाय खाणे अधिकार असल्याचे ठासुन सांगणार्या बर्याच जणांना मोर, बेबी क्रोकोडाइल, कुत्र असले प्राणी खाण्याचा विषय निघाला की भूतदयेचा उमाळा येतो. एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असतानाही जर कुणाला गाय खायचीच असेल तर इतर प्राण्यांना मारुन खाण्यावर किंवा त्यांचा इतर "उपयोग" करण्यावर प्राणिमित्रांना आक्षेप कसा असु शकतो हे कळत नाही. असो. हा मुद्दा इथे अस्थायी असल्याने चर्चिला जाऊ शकत नाही.
अजुन छिद्रान्वेषी विचार करायचा झाल्यास माणसांच्या जगात माणसाने इतर प्राण्यांना नेहमीच दुय्यम स्थान तर दिलेच आहे शिवाय प्राण्यांविषयीच्या त्याच्या वर्तनात दुटप्पीपणा देखील आहे. गरजेप्रमाणे प्राणिमात्रांविषयी कळवळा दाखवणारा माणूस अनेक प्राण्यांच्या जगण्याचा हक्क त्याच्या स्वतःच्या जिव्हालोलुपासाठी हिरावुन घेतो मात्र हेच जर एका माणसाने दुसर्या माणसाबाबत केले तर तो गुन्हा ठरतो. म्हणजेच थोडक्यात प्राणिप्रेमाचे उमाळे येणारा माणूस हा पुरेपूर दुटप्पी आहे. असो. हाही मुद्दा इथे अस्थायी असल्याने चर्चिला जाऊ शकत नाही.
इथे हे ही नमूद करणे मला योग्य वाटते की कुणीही कुठलाही प्राणी खाण्याबद्दल माझा कुठलाही आक्षेप नाही. किंबहुना प्राण्यांचा मानवी जीवनाच्या विविध गरजा अथवा सुखे भागवण्यासाठी वापर करण्यावरही माझा काही आक्षेप नाही. एकदा खाण्यसाठी प्राणी कापणे योग्य आहे हे सिद्ध झाले की मग इतर गोष्टींसाठी कापण्यातही काही आक्षेपार्ह आहे असे मला वाटत नाही.
तस्मात गोमांस बंदी घटनेने बंधनकारक केली नसती तर मी त्याला आक्षेप घेतलाही नसता कदाचित. पण आता घटनेनेच बंधनकारक केली असल्याने डॉ. आंबेडकर आणि चिच्चा नेहरुंच्या समर्थकांनी तसे का आहे याचा खुलासा केल्यास मला आनंद होइल
क
कपिलमुनी
Tue, 10/13/2015 - 12:43
नवीन
बंधनकारक नाही आहे .
म
मृत्युन्जय
Tue, 10/13/2015 - 12:53
नवीन
छिद्रान्वेषी मुद्दा आहे. घटना म्हणते की सरकारने यासाठी योग्य ती पावले उचलावीत. म्हणजे असा माझा तरी कलम ४८ वाचुन ग्रह झाला आहे. तुमचे मत वेगळे का आहे हे कळेल का?
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 10/13/2015 - 13:22
नवीन
पण डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ स्टेट पॉलिसी उर्फ़ डीपीएसपी कोर्ट ऑफ़ लॉ मधे non-justiciable and legally non enforcable आहेत, अर्थात ह्या मुद्द्यावरही आयव्हर जेनिंग्स अन ग्रेनविल ऑस्टिन वाद प्रतिवाद आहेतच.
क
कपिलमुनी
Tue, 10/13/2015 - 16:44
नवीन
(खालील प्रतिसाद माझ्या समजुतीनुसार , कायदेतज्ञ नसल्याने चुभुद्याघ्या)
कायदा आणि मार्गदर्शक तत्वे यांमधे असा फरक आहे की ,
"योग्य ती पावले उचलावीत" पावले उचलावीतच असे बंधन नाही.
जसे भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावे असे मार्गदर्शक तत्व आहे पण कायदा नाही त्यासाठी कायदा करावा लागेल.
तसेच हे आहे असे मला वाटते.
बहुधा यामुळेच भारतामध्ये वेगवेग्ळ्या राज्यांमध्ये बीफबद्दल वेग वेगळे कायदे आहेत.
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 10/13/2015 - 07:40
नवीन
endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds
This article of the constitution in itself is largely confusing, एकीकडे तुम्ही म्हणता आहात ते ग्राह्य धरले तरी ह्या कलमातला ठळक केलेला भाग साध्य कसा करणार सरकार? कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पशुसंवर्धन हे शास्त्र म्हणुन पाहिल्यास त्यात फ़क्त दुग्ध व्यवसाय नाही तर मीट प्रोडक्शन सुद्धा येतेच असे वाटते
म
मृत्युन्जय
Tue, 10/13/2015 - 08:56
नवीन
The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines
इथे "endeavour" हा शब्द देखील फार महत्वाचा आहे. थोडक्यात प्रयत्न करावा असे लिहिले आहे. करावेच असे नाही. शिवाय कायद्यामध्ये कलमांचा अर्थ लावण्याचे जे काही नियम आहेत त्या नुसार दोन कलमे जर एकमेकांच्या विरोधी वक्तव्य करत असतील सर्वांचा समन्वय साधणे महत्वाचे आहे. प्रार्थमिक नियम असा आहे की " कायदा एकत्रित वाचावा" असे करताना तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. "The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines" पण
"in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle"
इथे प्रायोरिटी स्पष्ट आहे आणि दोन्ही गोष्टी एकत्रित वाचल्यास हे स्पष्ट होइल की पहिले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा पण दुसरे "खासकरुन" साध्य करावेच.
याशिवाय "animal husbandry" म्हणजे काय हे देखील एकदा बघा:
Animal husbandry is the management and care of farm animals by humans for profit, in which genetic qualities and behavior, considered to be advantageous to humans, are further developed. The term can refer to the practice of selectively breeding and raising livestock to promote desirable traits in animals for utility, sport, pleasure, or research
इथे फक्त दुग्ध व्यवसाय अपेक्षित आहे असे वाटत नाही. इतरही गोष्टी आहेत पण "प्राणी मारुन खाणे" ही गोष्ट ठळकपणे उद्धृत केलेली दिसत नाही. इथे "utility" किंवा "pleasure" या शब्दांमध्ये प्राणी मारुन खाणे अपेक्षित आहे असा प्रतिवाद काही जण करु इच्छितील पण यात २ प्रॉब्लेम्स आहेत ते असे:
१. जर "प्राणी" एक खाद्य म्हणुन अपेक्षित असेल तर तसा स्पष्ट उल्लेख कायद्यात येतो
२. जर प्राणी एक खाद्य म्हणुन अपेक्षित असल्याचे स्पष्टपणे लिहिले नसेल तर "utility" किंवा "pleasure" या शब्दांमध्ये प्राणी मारुन खाणे अपेक्षित आहे असा प्रतिवाद कदाचित करताही आला असता पण "prohibiting the slaughter, of cows and calves" असा स्प्ष्ट उल्लेख आल्याने "utility" किंवा "pleasure" या शब्दांमध्ये प्राणी मारुन खाणे अपेक्षित नाही हे सिद्ध होते.
द
दत्ता जोशी
Tue, 10/13/2015 - 09:44
नवीन
"This article of the constitution in itself is largely confusing, एकीकडे तुम्ही म्हणता आहात ते ग्राह्य धरले तरी ह्या कलमातला ठळक केलेला भाग साध्य कसा करणार सरकार? कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पशुसंवर्धन हे शास्त्र म्हणुन पाहिल्यास त्यात फ़क्त दुग्ध व्यवसाय नाही तर मीट प्रोडक्शन सुद्धा येतेच असे वाटते"
आधुनिक संशोधनानुसार बीफ उत्पादन हे वातावरणासाठी सर्वात घातक आहे.
प्रती किलो बीफ उत्पादनासाठी ( बीफ आणि रेड मीट) १ चिकन उत्पादनाच्या तुलनेत
१. सुमारे २८ पट जास्ती जमीन .
२. सुमारे ११ पण जास्ती पाणी.
३. ५ पट हरित गृह वायू निर्मिती ( green house gas )
हेच प्रमाण भात आणि भाजीपाला उत्पादनाच्या तुलनेत अति प्रचंड आहे.
UN Food and Agriculture Association ने २००६ साली प्रसिद्ध केलेल्या संशोधनावर (live stock 's long shadow ) आधारित.
बीफ, रेड मीट खाण्याने शरीरावर होणारे गंभीर परिणाम विचारात नाही घेतले तरी संपूर्ण जगाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने हि फारच गंभीर गोष्ट आहे. गोवंश हत्या विरोधात रान उठवणारे विज्ञानवादी, पर्यावरणवादी आणि पुरोगामी हि गोष्ट कधी विचारात घेतील?
देशी गायीचे दुध, तूप इ. उत्पादनांना सध्या व्यावसायिक उत्पादनांच्या बाजारभावापेक्षा जास्ती मागणी आणि भाव आहे. गोमुत्र आणि गोमायासाठी सेंद्रिय शेती साठी प्रचंड मागणी आहे. सेंद्रिय उत्पादनांना जगभर मागणी आणि चांगला भाव आहे.
बाकी चालुद्या.
The heavy impact on the environment of meat production was known but the research shows a new scale and scope of damage, particularly for beef. The popular red meat requires 28 times more land to produce than pork or chicken, 11 times more water and results in five times more climate-warming emissions. When compared to staples like potatoes, wheat, and rice, the impact of beef per calorie is even more extreme, requiring 160 times more land and producing 11 times more greenhouse gases.
D
dadadarekar
Tue, 10/13/2015 - 10:06
नवीन
गायीऐवजी कोणत्याही प्राण्याचे मांस घेतलेत तरी हे समीकरण खरे ठरते.
त्यामुळे सर्व हत्या बंद कराव्यात.
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 10/13/2015 - 10:07
नवीन
तुमच्या भावना समजू शकतो पण तुमचा मुद्दा मी बोललो आहे त्याला पुर्ण tangent आहे, मी कुठे ही मीट पक्षी बीफ प्रोडक्शन वाढवा असे बोललेलो नाही तर आधुनिक पशुपालन व्यवसायात मांस उद्योग हा सुद्धा अंतर्भूत असतो असे म्हणले आहे, शिवाय मृत्युंजय साहेब (कायदा तज्ञ आहेत ते अन सीएस सुद्धा) ह्यांनी जे कलम दिले आहे त्याचे इंटरप्रिटेशन कसे होईल अश्या शंकेतून एक प्रश्न चिन्ह (? असे दिसते प्रश्नचिन्ह) देऊन प्रश्न विचारला आहे, (त्याचे त्यांनी आतिशय सुलभ लीगल भाषेत उत्तर ही दिले आहे) , मांस उद्योगाने पर्यावरण ह्रास हा एक पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे! म्हणायला तर ऑटोमोबाइल इंडस्ट्री सुद्धा कार्बन उत्सर्जन करतेच हो! पण म्हणुन तो धंदा व्यावसायिक दृष्ट्या फायद्याचा नाही असे नाही कोणी म्हणत, मांस व्यवसायात फायदा आहे म्हणून लोक तो करत असावेत नाही का?
अर्थात ह्याचा अर्थ आता दिसला बैल का कापा असा लावु नका म्हणजे मिळवली
बाकी काय? चालूच द्या तुम्ही पण
द
दत्ता जोशी
Tue, 10/13/2015 - 11:39
नवीन
पण तरीही माझा मुद्दा भावनिक नाहीये. जगभरच्या एकूण कार्बन उत्सर्जनात बीफ आणि रेड मीट उत्पादनाचा सुमारे ७.५% वाटा आहे. च्या तुलनेत चिकन अथवा पोर्क सुमारे १.५-२ %च उत्सर्जन करतं. १ किलो मांस निर्मिती साठी. या शिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी आणि जमीन या मुलभूत स्त्रोतांवर येणारा ताण पण बीफ आणि रेड मीट उत्पादनामुळे कित्येक पटींनी जास्ती आहे. आता लोकांनी जर बीफ खाणे बंद केला तर ( खाणार्यांसाठी चिकन,मासे, पोर्क खाण्याचा पर्याय आहेच कि) तर आपोआप उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल शिवाय जमीन आणि पाणी हे महत्वाचे स्त्रोत अन्नधान्य उत्पादनासाठी जास्ती उपलब्ध होतील. या व्ह्यू पोइण्टने गोवंश हत्या बंदी खरतर स्वागतार्ह आहे असा माझा मुद्दा होता.
बाकी मी कोणत्याही राजकीय पक्षाचा हाडाचा पंखा वगैरे काही नाही. म्हणून म्हटले इतर चर्चा चालुद्या.
D
dadadarekar
Tue, 10/13/2015 - 14:04
नवीन
कार्बन उत्सर्जनात ... समजा..
बीफचा वाटा ७ % आहे . व इतर मांसाचा २ % आहे. एकूण ९ %
बीफ बंद केले तर हे लोक शेपूची भाजी किंवा मेतकूट भात खाणार नाहीत.
ते इतर मांस खातील. व कार्बनचे एकून उत्सर्जन ९ % इतकेच राहील.
S
sagarpdy
Tue, 10/13/2015 - 16:50
नवीन
गणित काहीतरी झोल वाटतंय.
टक्केवारी प्रती किलो होती ना ?
म्हणजे एकूण ४% झाले असं समजलो.
संदर्भ : http://www.balbharati.in/downloadbooks/2nd-Maths-Marathi.pdf
असो, चालू द्या!
द
दत्ता जोशी
Wed, 10/14/2015 - 15:04
नवीन
करेक्ट! :-).
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 10/13/2015 - 08:39
नवीन
याविषयीच काल लिहिले होते---
गेल्या काही दिवसांपासून अनेक आदर्श लिबरल लोक छाती पिटून म्हणत आहेत की प्राचीन भारतात ऋषीमुनी गोमांस खात असत आणि वेदांमध्ये तसे उल्लेख आहेत. खरोखर असे उल्लेख आहेत का याची तपासणी मी करायला गेलेलो नाही आणि तसे तपासण्यात काडीमात्र इंटरेस्टही मला नाही. पण इतक्या आदर्श लिबरलांनी इतक्या छातीठोकपणे तसा दावा केला आहे त्यापैकी एखादा तरी नक्की कुठच्या वेदामध्ये कुठल्या ऋचेमध्ये असा उल्लेख आहे यावर प्रकाश टाकेल असे वाटले होते.पण कुठचे काय. एकानेही आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ असा कसलाही पुरावा सादर केला नाही. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांनी वेद तपासून तसे असल्याची खात्री करायची का?वेदकालात विमाने होती असा काहींचा दावा असतो त्याला प्रश्न विचारणाऱ्यांना "तुम्ही जाऊन तपासा" असे उलटे म्हटले जाते त्याचीच ही उदारमतवादी आवृत्ती म्हणायची का?
दुसरे म्हणजे हिंदू परंपरेत कसलाहीही उल्लेख असला तरी त्यावर हिरवेपिवळे होऊन तुटून पडणारे आदर्श लिबरल लोक आता मात्र या गोमांस खायच्या परंपरेचे (जर का अशी परंपरा असलीच तर) मात्र अगदी हिरीरीने समर्थन करताना दिसत आहेत हे कशाचे लक्षण म्हणायचे?
तिसरे म्हणजे अन्यथा हे आदर्श लिबरल लोक नेहमी राज्यघटनेचे पालन करा हे अगदी बेंबीच्या देठापासून ओरडत असतात.पण आपल्याच राज्यघटनेत directive principles of state policy मध्ये कलम ४८ प्रमाणे: "The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle" असे स्पष्टपणे म्हटलेले आहे ( http://lawmin.nic.in/olwing/coi/coi-english/Const.Pock%202Pg.Rom8Fsss(7).pdf वर पान २१). ही directive principles of state policy म्हणजे देशाची वाटचाल नक्की कुठच्या मार्गावरून व्हावी यासाठीची मार्गदर्शक तत्वे आहेत.अपेक्षा अशी की भविष्यकाळात एक दिवस असा यावा की या सगळ्या तत्वांचे पालन सरकारकडून व्हावे. त्या तत्वांपैकी एका तत्वाचे पालन केले जात असेल तर या आदर्श लिबरल लोकांच्या पोटात नक्की का दुखते? म्हणजे इतर वेळी राज्यघटनेचे पालन करा असे म्हणणारेच लोक त्याच राज्यघटनेचे पालन सरकार करत असेल तरी वेदांमध्ये अमुक म्हटले आहे (जर का तसे म्हटले असेल तर) म्हणून त्याचे पालन करा असे म्हणत घडाळ्याचे काटे उलटे का फिरवतात?हे पुरोगामी ना? मग यांना राज्यघटनेपेक्षा ५ की १० हजार वर्षांपूर्वी लिहिलेले वेद अधिक प्रिय कसे काय?
D
dadadarekar
Tue, 10/13/2015 - 08:43
नवीन
तुमच्या गोमातेला नेमकं कोण कापतय हे तरी पहा.
http://muslimmirror.com/eng/out-of-six-largest-meat-suppliers-in-india-four-are-hindus/
म
मृत्युन्जय
Tue, 10/13/2015 - 08:58
नवीन
कोणीही कापत असेल तरी ते घटनाबाह्य आहे हे नमूद करु इच्छितो.
य
याॅर्कर
Tue, 10/13/2015 - 09:30
नवीन
-ऋग्वेद(10.86.14)
-ऋग्वेद(10.91.14)
-महाभारत वन पर्व(अ 208,199)
-मनुस्मृती 5/18
-आपस्तंभ धर्मसूत्र(श्लोक 14,15,17)
-गृहसूत्र(1.9.122)
पण आता यांचे अर्थ हे आपल्या सोयीनुसार काहीजण काढत आहेत(संस्कृत कठीण आहे ना!).त्यामुळे 100% खात्री देता येत नाही.
पण पशुवध व्हायचे हे मात्र नक्की.
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 10/13/2015 - 10:30
नवीन
पशुवध व्हायचे हे कोणीच नाकारत नाही. प्रश्न इतकाच की गोमांसभक्षण व्हायचे की नाही.
बाकी तुम्ही दिलेले संदर्भ मी स्वतः तपासायला गेलेलो नाही.कारण एकतर दहावीनंतर संस्कृत एकदाही वापरलेले नाही त्यामुळे त्या संदर्भांचा योग्य तो अर्थ काढता येईल इतके संस्कृत मला येत नाही. पण जितके कितके संस्कृत मी बघितलेले आहे त्यावरून एक गोष्ट नक्कीच सांगतो की संस्कृत भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात. आपण 'गो' म्हणजे गाय या अर्थी वापरतो त्याच शब्दाचे संस्कृतमध्ये अनेक वेगवेगळे अर्थ होतात-- त्या अर्थांमध्ये गायीबरोबरच बैल, चंद्र, सूर्य, सरस्वती (देवी) असे अनेकविध अर्थ होतात हे http://www.spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=%E0%A4%97%E0%A5%8B&trans=Translate&direction=AU या संस्कृत डिक्शनरीवरून समजले. एकाच शब्दाचे इतके वेगवेगळे अर्थ होत असतील तर नक्की कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये तो शब्द वापरला आहे हे समजून घेतले नाही तर नक्कीच जो अर्थ अभिप्रेत आहे त्यापेक्षा नक्कीच वेगळा अर्थ काढला जाईल. हे सगळे कॉन्टेक्स्ट समजून जो अर्थ अभिप्रेत आहे तो काढण्याइतके संस्कृत मला नक्कीच येत नाही तेव्हा यावर अधिक भाष्य टाळतो. पण हे सगळे आदर्श लिबरल लोक छतांवरून बोंबलत आहेत की वेदांमध्ये असे उल्लेख आहेत तेव्हा ते अभ्यास करून बोलतात की या खाचाखोचा लक्षात न घेता काहीतरी लिहिलेले वाचून (बहुतांश इंग्लिश पुस्तके) काहीतरी पोपटपंची करत असतात? म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांचे असते का?
आणि दुसरे म्हणजे क्षणभर मान्य केले की त्यावेळी गायी कापून खात होते. सो व्हॉट? कोणत्याही पुस्तकात काहीही लिहिले असेल तर त्यावर स्वतःचा विचार न करता ते जसेच्या तसे अंमलात आणणे यापेक्षा मोठा मूर्खपणा नसेल. कदाचित त्यावेळी परिस्थिती वेगळी असल्यामुळे गरजा वेगळ्या असतील. एक उदाहरण द्यायचे झाले तर शाळेत असताना मला नेहमी वाटायचे की चिनी लोक झुरळे खातात-- म्हणजे घरी एखादे झुरळ आले की त्याला पकडून ते तोंडात टाकतात. असाच समज माझा बनविण्यात आला होता. १९४० च्या दशकात दुसरे महायुध्द आणि दुष्काळ या कठिण काळात काही ठिकाणी लोकांवर ही वेळ आलीही होती.पण म्हणजे चिनी लोक सरसकट झुरळे खातात असा अर्थ थोडीच होतो? हेच आदर्श लिबरल लोक हिंदू परंपरेतल्या एखाद्या गोष्टीचा उल्लेख जरी आला तरी त्यांची प्रतिक्रिया रस्त्यावरून जात असताना चुकून शेणात पाय गेल्यानंतर जसे तोंड होईल त्यापेक्षा वाईट असते. आणि हेच लोक कुठल्याकुठल्या वेदांमध्ये गोमांसभक्षणाचे उल्लेख आहेत म्हणून आताही तसे करावे हे म्हणतात याचेच आश्चर्य वाटते.
समजा वेदांमध्ये अगदी म्हटले असले की माणूस कापून खावा तर ते माणूसही कापावा असे मानणार का?तेव्हा माझ्या मते वेदांमध्ये काय लिहिले आहे हे अगदी गौण आहे. आपल्या राज्यघटनेत जर ते एक मार्गदर्शक तत्व म्हणून असेल तर त्याची अंमलबजावणी केली जात असेल तर त्यात चुकीचे काही नाही. आणि जर का हे मार्गदर्शक तत्व बहुसंख्य लोकांना मान्य नसेल तर राज्यघटनेतून ते कलम वगळून टाकावे.
आपल्या (किंवा कुठल्याही) परंपरांमध्ये जे काही सध्याच्या काळाला उपयोगी आहे ते घ्यावे आणि बाकीचे टाकून पुढे व्हावे हे भान हिंदू परंपरा आणि संस्कृती इत्यादी इत्यादींचा जाज्वल्य अभिमान बाळवणार्यांना तर नसतेच. आणि आदर्श लिबरल लोक मात्र केवळ टिका करण्यापुरते आपल्या सोयीप्रमाणे या सगळ्या गोष्टींचा वापर करतात.
मला वाटते की ते जाज्वल्य अभिमानवाले तर नकोतच आणि आदर्श लिबरल तर त्याहून नकोत. या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य आपल्याला काढता येतच नाही का?
य
याॅर्कर
Tue, 10/13/2015 - 10:54
नवीन
"ते जाज्वल्य अभिमानवाले तर नकोतच आणि आदर्श लिबरल तर त्याहून नकोत. या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य आपल्याला काढता येतच नाही का?"
----→ जाज्वल्य अभिमानवाल्यांची मेजाॅरिटी आहे ना आता, मग कसा काय सुवर्णमध्य काढणार?
बाकि उत्तम विवेचन
- «
- ‹
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- ›
- »