Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक वर्षानंतर . . .

श
श्रीगुरुजी
Mon, 05/25/2015 - 09:01
🗣 1265 प्रतिसाद
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

प्रतिक्रिया द्या
309978 वाचन

💬 प्रतिसाद (1265)
ब
बॅटमॅन Tue, 10/13/2015 - 11:19 नवीन
गोमांसभक्षणही झाल्याचे उल्लेख आहेत. उत्तररामचरितम् नामक नाटकात (चौथ्या अंकात) एक प्रसंग आहे, जनक राजाकडे वसिष्ठ ऋषी येतात तेव्हा त्यांच्यासाठी गाय कापल्याचा त्यात उल्लेख आहे. जनकाकडील एक सेवक सौधातकी/सौधीतकी वसिष्ठांना शिव्या घालतो (पीठ पीछे) की माझी आवडती गाय का कापली म्हणून इ.इ. याज्ञवल्क्य ऋषींनीही सांगितलेय की "मी गोमांस खाईन, पण पुरेसे लुसलुशीत असेल तरच." आता सकृद्दर्शनी पाहता हे विधान सनसनाटी आहे, त्यामुळे पुरावा देणे अवश्य आहे. शतपथ ब्राह्मण नामक ग्रंथाच्या तिसर्‍या कांडातील पहिल्या अध्यायाच्या दुसर्‍या ब्राह्मणातील एकविसावे कडवे पहा. अगोदर इंग्लिश अर्थ देतो. http://sacred-texts.com/hin/sbr/sbe26/sbe2604.htm 3:1:2:21 He (the Adhvaryu) then makes him enter the hall. Let him not eat (the flesh) of either the cow or the ox; for the cow and the ox doubtless support everything here on earth. The gods spake, 'Verily, the cow and the ox support everything here: come, let us bestow on the cow and the ox whatever vigour belongs to other species 1!' Accordingly they bestowed on the cow and the ox whatever vigour belonged to other species (of animals); and therefore the cow and the ox eat most. Hence, were one to eat (the flesh) of an ox or a cow, there would be, as it were, an eating of everything, or, as it were, a going on to the end (or, to destruction). Such a one indeed would be likely to be born (again) as a strange being, (as one of whom there is) evil report, such as 'he has expelled an embryo from a woman,' 'he has committed a sin 2;' let him therefore not eat (the flesh) of the cow and the ox. Nevertheless Yâgñavalkya said, 'I, for one, eat it, provided that it is tender.' आता मूळ संस्कृत पाठ पाहू. तो इथून हुडकलेला आहे. http://titus.uni-frankfurt.de/texte/etcs/ind/aind/ved/yvw/sbm/sbm.htm Verse: 21 Sentence: a átʰainaṃ śā́lām prápādayati Sentence: b sá dʰenvaí cānaḍúhaśca nā̀śnīyāddʰenvanaḍuhau vā́ idaṃ sárvam bibʰr̥tasté devā́ abruvandʰenvanaḍuhau vā́ idaṃ sárvam bibʰr̥to hánta yádanyéṣāṃ váyasāṃ vīryáṃ táddʰenvanaḍuháyordádʰāméti sa yádanyéṣāṃ váyasāṃ vīryámā́sīttáddʰenvanaḍuháyoradadʰustásmāddʰenúścaivā̀naḍvā́ṃśca bʰū́yiṣṭʰam bʰuṅktastáddʰaitátsarvā́śyamiva yó dʰenvanaḍuháyoraśnīyādántagatiriva taṃ hā́dbʰutamabʰíjanitorjāyā́yai garbʰaṃ nírabadʰīdíti papámakadíti pāpī́ kīrtistásmāddʰenvanaḍuháyornāśnī̀yāttádu hovāca yā́jñavalkyo 'śnā́myevā̀hámaṃsalaṃ cedbʰávatī́ti म्हणजेच देवनागरीत वाक्य अ: अथैनम् शालाम् प्रपादयति | वाक्य बः स धेन्वै चानडूहश्च नाश्नीयाद्धेन्वनडुहौ वा इदं सर्वं बिभृतस्ते देवा अब्रुवन्धेन्वनडुहौ वा इदं सर्वं बिभृतो हन्त यदन्येषाम् वयसं वीर्यं तद्धेन्वनडुहयोर्दधामेति स यदन्येषां वयसं वीर्यमासीत्तद्धेन्वनडुहयोर्दधुस्तस्माद्धेनुश्चैवानड्वांश्च भूयिष्ठम् भुङ्क्तस्तद्धैतत्सर्वाश्यमिव यो धेन्वनडुहयोरश्नीयादन्तगतिरिव तं हाद्भुतमभिजनितोर्जायायै गर्भं निरबधीदिति पपमकदिति पापी कीर्तिस्तस्माद्धेन्वनडुहयोर्नाश्नीयात्तदु होवाच याज्ञवल्क्योऽश्नाम्येवाहमंसलं चेद्भवतीति| याज्ञवल्क्यो होवाच- "अंसलं चेत् भवति इति अश्नामि एव अहम् |" अंसलम् = लस्टी, स्ट्राँग. खालील लिंक पहा. http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+aMsalaM&trans=Translate&direction=AU तेव्हा याज्ञवल्क्यांनी इफ-एल्स कंडिशन टाकून त्या त्या केसमध्ये आपण बीफ खाऊ असे म्हटल्याचे इथे स्पष्ट दिसते आहे. शिवाय त्या कंडिशन म्हणजे आपद्धर्मही दिसत नाहीत. हे एक उदाहरण सांगितलेय फक्त. अशा थाटाची अजून कैक उदाहरणे सांगता येतील. तेव्हा फक्त डाव्यांच्या कल्पनाशक्तीचा हा नतीजा नाही इतके कळाले तरी बास आहे. आता दुसरा मुद्दा- जुन्या ग्रंथांत लिहिलेय म्हणून आत्ताही तसेच करावे हे का? त्याचे उत्तर साधे आहे. तुम्ही खात नसाल तर नका खाऊ, तसेच इतरांना अटकावही करू नका. घटनेची मार्गदर्शक तत्त्वे वगैरे जी आहेत त्यांना बायपास करणार्‍यांतही हिंदूच आघाडीवर आहेत. केरळात पारंपरिकरीत्या हिंदूही बीफ खातात. अनेक आघाडीचे मीट सप्लायर्स हिंदू आहेत जे बीफही सप्लाय करतात. तेव्हा निव्वळ डाव्यांना शिव्या घालताना इकडेही दुर्लक्ष होते आहे हे पहावे असे वाटते. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा: बीफ या लेबलमध्ये गाय, बैल, म्हैस आणि रेडा या सर्वांचेच मांस अपेक्षित आहे. त्यामुळे बीफ म्हटले की ते निव्वळ गोमांसच आहे हाही निव्वळ खोटारडा अपप्रचार आहे.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
य
याॅर्कर Tue, 10/13/2015 - 11:29 नवीन
हो,मी सगळं हेच शोधत होतो तुम्ही माझं काम हलकं केलं. त्याबद्दल धन्यवाद!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 10/13/2015 - 11:43 नवीन
बॅटमॅन बना बैट्समन!! एक्सक्टली हेच टाइप करायला आलतो फ़क्त याज्ञवल्क्य ऋषींचा संदर्भ मुखोद्गत नव्हता, अश्वमेध सुद्धा असाच नाही का गोथम नरेश!?
↩ प्रतिसाद: याॅर्कर
ब
बॅटमॅन Tue, 10/13/2015 - 11:54 नवीन
येस्सार, अश्वमेधातही घोड्याच्या मांसाचे उल्लेख आहेत.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मृत्युन्जय Tue, 10/13/2015 - 11:55 नवीन
अश्वमेधात अजुनही बरेच उल्लेख आहेत. कुणी पुर्ण वर्णन वाचले असेल तर किती बिभत्स वर्णन आहे हे लक्षात येइल. असो. असोच.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 10/13/2015 - 12:06 नवीन
अर्थात आहेच. मुद्दा इतकाच आहे की हे सारे ग्रंथांत लिहिले आहे हे तरी स्वीकारणार की नाही लोक्स? हे स्वीकारले म्हणजे आटोम्याटिक बीफसंमती झाली असे नाहीच अर्थात.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
द
दुर्गविहारी Fri, 10/16/2015 - 13:36 नवीन
एकीकडे रामायण काल्पनिक आहे असे म्हणायचे आणि दुसर्या धाग्यात त्याच रामायणाचे सन्दर्भ द्यायचे ?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
त
तर्राट जोकर Tue, 10/13/2015 - 11:47 नवीन
हा प्रतिसाद ट्रुमन यांच्या प्रतिसादाखाली असला तरी व्यक्तिशः त्यांना नाही. घटनेची कलमं आणि वेदाचे दाखले यावर जे चर्चा करत आहेत त्यांच्यासाठी आहे. जर गायीला पुज्य मानण्याचा हिंदूंचा हक्क त्यांचे सनातन धर्मावरिल प्रेम व मान्यता लक्षात घेऊन मान्य केला तर त्याच हिंदूंना त्याच सनातन वेदाचे दाखले दिले तर कुठे चुकले? यात आ.पु.लि. चे प्रतिवाद हे धर्माभिमान्यांनी दिलेल्या वेदांच्या-धर्माच्या दाखल्यातुनच प्रसवले आहेत. जर आधीच हिंदू-धर्माभिमान्यांनी असले काही केले नसते प्रश्नच आला नसता. काही अतिधर्माभिमानी 'उद्या माणुस मारून खातील तरी ते चालेल का?' इतकं ताणतात. इतकंच ताणायचं तर कोंबड्या, बकरे, मासे हे तरी का ह्या भूतदयेमधून सुटतात याचे उत्तर एकही धर्माभिमानी देऊ शकलेला नाही. या आदर्श धर्माभिमानी गोपुजक समाजाचा दांभिकपणा सर्रास नजरेआड करून घटनेतली कलमे सोयिस्करपणे अर्थ लावून तोंडावर फेकली की बरं वाटत असेल नाही? गंमत म्हणजे जेव्हा मासे खाण्यावर बंदी करा असे म्हटलं की मी मी म्हणणारे गोमाताभक्त शेपुट घालून पळतांना पाहिले आहेत. कारण तिथे त्यांचा तर्क काहीच चालत नाही कारण..... त्यांच्यासाठी मासे हे अन्न आहे, प्राणी-भक्षण नव्हे. आपण एक सजीवप्राणी मारून खातो हे त्यांच्या सबस्कॉन्शस मधे नोट नाही. पण कुणी गाय खातंय म्हटल्यावर यांना किळसवाणं वाटतं, तेही 'जीला आम्ही गोमाता म्हणून पुजतो तिलाच खातात.. शिव शिव शिव.' असल्या प्रतिक्रिया देतात. मला कित्येकदा काही कोकण-स्थित बंधू-भगिनींच्या 'जवला...' करत ओरडत, आयुष्याचे उपाशी असल्यागत टीफिन डब्यावर झडप घालतांना बघून, तो भयंकर उग्र वास घेऊन उलटीची उबळ येते. मला किळसवाणं वाटतं कारण ते माझं अन्न नाही, माझ्या पिढ्यांनी ते कधी खाल्लं नाही. माझ्या संस्काराच्या बाहेर आहे ते. पण मग मी स्वतः कोंबडीची तंगडी, बोकडाचं हाड चघळत असतांना कोकणस्थ बंधू-भगिनिंना त्यांच्या मासली-प्रेमाबद्दल दूषणे द्यायचा काय अधिकार..? हफ्त्यातून तीन दिस बोकड खाणारा मी, पाठ्यपुस्तकात कुणातरी प्रतिष्ठित (बहुतेक ब्राहमणच) लेखिकेच्या घरी मासे कसे खाल्ले जातात याचे वर्णन वाचून त्यावेळी मला फार किळस वाटली होती. आमच्यासारखे गरिब, अशिक्षित, झोपडपट्टीवाल्यांचं ठिकेय, पण एवढी प्रतिष्ठित, उच्च्भ्रू, सुशिक्षित, सुसंस्कारित लोक असलं घाणेरडं (?) खातात ह्याच्यवर विश्वास नव्हता बसत. कारण तेव्हा रोजच्या भेटण्यातले तसलेच प्र.उ.सु.सु.लोक आम्हाला असं बकरे-कोंबडे खाण्यावरून, दारू पिण्यावरून हिणवत असत. आज दारू पिणे प्रतिष्ठेचे झाले आहे, ते एक असो. इथे केवळ गाय-बैल हिंदूंना पूज्य व मुस्लिमांचे ते प्रमुख अन्न, यात धर्माचा बादरायण संबंध लावून धार्मिक तेढ वाढवण्याऐवजी काय घडतंय? जणू मुस्लिम हे हिंदूंवर सूड उगवण्यासाठीच गाय-बैल खातात असा सूर का असतो धर्माभिमान्यांचा? त्यांना मांसच खायचं तर डुक्कर खा असं सरळ सरळ हिणवलं का जातंय? त्यांना काय खायचं, नाही हा त्यांचा प्रश्न आहे हे एवढे सरळ पुरोगामी विचार हजम होत नाहीत. मग ते मुस्लिम देशांचे पोर्कबंदीचे-दारुबंदीचे खोटे-नाटे दाखले देतात, तेव्हा कोण तपासायला जातं का? समस्त विदेशी लोक रोज गायी-बैल-डुकरं खातात त्यांना गोहत्येसाठी दोषी ठरवण्याचं आपण सोयिस्कर विसरतो. इथून मांस कित्येक दशकं निर्यात होतंय. ते आजवर का दिसले नाही गोमाता भक्तांना? त्याच गोमाताभक्तांना प्लास्टीक खाऊन मरणार्‍या गायी दिसत नाहीत, उकिरड्यावर सोडून दिलेल्या गायी दिसत नाहीत, आपल्याच हिंदूंचे कत्तलखाने असून तेच हजारो गायी मारून विदेशात पाठवतात ते दिसत नाही. दिसते फक्त एका गरिबाच्या घरच्या फ्रीजमधलं तथाकथि गोमांस. मोबाइलवरून पसरवलेल्या अफवा. घटनेची कलमं सोयिस्कररित्या प्रवचून चर्चा प्रभावी केली जाऊ शकते, पण खरे प्रश्न सुटत नाहीत. कायद्यात पशुसंवर्धन हे धार्मिक रुढी-मान्यतांसाठी नसून भौगोलिक, जैविक विविधता जोपासणे, त्यातून रीसोर्सेस तयार करणे, ज्यातून देशातल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था होऊ शकेल असे व्यवसाय निर्माण करणे, निर्यातयोग्य मांस निर्माण करणे हेही हे उद्दिष्टे आहेत. घटनेची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे घटना नाही. उपलब्ध परिस्थितीत घ्यावयाचे निर्णय मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून असावे असा त्याचा अर्थ असावा. गोहत्याबंदी हा शब्द घटनेत यायला तसा इतिहासही आहे. चर्चा करणारे हवेत तीर मारतात, सोयिस्कर तेवढंच उचलतात असे निरिक्षण आहे. भारतीय घटना भूतदयावादी-प्राणिपक्षी प्रेमी अशी काही नाहीये. राज्यघटनेचा अर्थ प्रथम, कायदेशीर नागरिकांना जगण्यास योग्य वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे. पक्षीप्राण्यांना नव्हे. तो प्राधान्यक्रम नव्हे. असे असते तर फिशरी डीपार्टमेंट आधी बंद करायला हवे. तमाम मच्छिमारांना घरी बसवायला हवे. धर्माभिमान्यांचा 'आज गाय खातात उद्या माणसंही खाल्ली तर चालेल का?' हाच प्रश्न 'आज मासे मारून खातात, उद्या माणसंही खातील' असा करून आ.पु.लि. विचारतील तेव्हा काय उत्तर असेल?
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बॅटमॅन Tue, 10/13/2015 - 11:55 नवीन
समस्त विदेशी लोक रोज गायी-बैल-डुकरं खातात त्यांना गोहत्येसाठी दोषी ठरवण्याचं आपण सोयिस्कर विसरतो. इथून मांस कित्येक दशकं निर्यात होतंय. ते आजवर का दिसले नाही गोमाता भक्तांना? त्याच गोमाताभक्तांना प्लास्टीक खाऊन मरणार्‍या गायी दिसत नाहीत, उकिरड्यावर सोडून दिलेल्या गायी दिसत नाहीत, आपल्याच हिंदूंचे कत्तलखाने असून तेच हजारो गायी मारून विदेशात पाठवतात ते दिसत नाही. दिसते फक्त एका गरिबाच्या घरच्या फ्रीजमधलं तथाकथि गोमांस.
जोकराशी पूर्ण सहमत. (बॅटमॅन असून)
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 10/13/2015 - 12:01 नवीन
Don't make it a habit.....! after all.... why so serious?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 10/13/2015 - 12:14 नवीन
कायद्यात पशुसंवर्धन हे धार्मिक रुढी-मान्यतांसाठी नसून भौगोलिक, जैविक विविधता जोपासणे, त्यातून रीसोर्सेस तयार करणे, ज्यातून देशातल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था होऊ शकेल असे व्यवसाय निर्माण करणे, निर्यातयोग्य मांस निर्माण करणे हेही हे उद्दिष्टे आहेत.
आई शपथ एक एक शब्दाशी सहमत! मला असेच काहीसे म्हणायचे होते. मुजरा घ्या ह्या तर्काला!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अस्वस्थामा Tue, 10/13/2015 - 13:49 नवीन
अतिशय सहमत रे जोकरा.. बरेच मुद्दे 'हेच म्हणायचं होतं' असे आहेत. खासकरुन,
त्यांना काय खायचं, नाही हा त्यांचा प्रश्न आहे हे एवढे सरळ
इथून मांस कित्येक दशकं निर्यात होतंय. ते आजवर का दिसले नाही गोमाता भक्तांना? त्याच गोमाताभक्तांना प्लास्टीक खाऊन मरणार्‍या गायी दिसत नाहीत, उकिरड्यावर सोडून दिलेल्या गायी दिसत नाहीत, आपल्याच हिंदूंचे कत्तलखाने असून तेच हजारो गायी मारून विदेशात पाठवतात ते दिसत नाही.
कायद्यात पशुसंवर्धन हे धार्मिक रुढी-मान्यतांसाठी नसून भौगोलिक, जैविक विविधता जोपासणे, त्यातून रीसोर्सेस तयार करणे, ज्यातून देशातल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था होऊ शकेल असे व्यवसाय निर्माण करणे, निर्यातयोग्य मांस निर्माण करणे हेही हे उद्दिष्टे आहेत. घटनेची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे घटना नाही. उपलब्ध परिस्थितीत घ्यावयाचे निर्णय मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून असावे असा त्याचा अर्थ असावा. गोहत्याबंदी हा शब्द घटनेत यायला तसा इतिहासही आहे. चर्चा करणारे हवेत तीर मारतात, सोयिस्कर तेवढंच उचलतात असे निरिक्षण आहे. भारतीय घटना भूतदयावादी-प्राणिपक्षी प्रेमी अशी काही नाहीये. राज्यघटनेचा अर्थ प्रथम, कायदेशीर नागरिकांना जगण्यास योग्य वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
dadadarekar Tue, 10/13/2015 - 07:38 नवीन
By education I am an Englishman, by views an internationalist, by culture a Muslim, and I am a Hindu only by accident of birth.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बॅटमॅन Tue, 10/13/2015 - 08:39 नवीन
सिक्युलरांचे आदर्श असेच असणार हे उघड आहे.
↩ प्रतिसाद: dadadarekar
च
चिनार Tue, 10/13/2015 - 12:22 नवीन
लाडक्या नेहरु मामांचे आणखी एक वाक्य चीनचे युद्ध हरल्यावर …. “Not a blade of grass grows in Aksai Chin; loss of Indian Territory to China is a loss too little.” त्यावर महावीर त्यागींचे उत्तर नेहरुमामांच्या डोक्याकडे बोट दाखवून …. “Nothing grows there. Should it be cut off or given away to someone else too?"
↩ प्रतिसाद: dadadarekar
प
प्यारे१ Tue, 10/13/2015 - 12:24 नवीन
चिनार सेठ, पूरि दुनिया के 'चाचा' को आप 'मामा' कहे कह रहे हो???? जवळचे नातेवाईक का काय? ;)
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Tue, 10/13/2015 - 12:28 नवीन
नाय हो…. म्हनल थोडी व्हेरायटी द्यावी…
↩ प्रतिसाद: प्यारे१
D
dadadarekar Tue, 10/13/2015 - 13:32 नवीन
भारतरत्न पं. मदन मोहन मालवीय यांचे आहे , असे वाटते
↩ प्रतिसाद: चिनार
ब
बॅटमॅन Tue, 10/13/2015 - 14:04 नवीन
मालवीयांचे असणे शक्य नै कारण ते १९४६ सालीच वारले. मी हे वाक्य पिलू मोदी यांच्या नावे वाचले होते.
↩ प्रतिसाद: dadadarekar
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/13/2015 - 14:08 नवीन
पिलू मोदीच.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
च
चिनार Wed, 10/14/2015 - 06:10 नवीन
तसं नै कै ब्याट्या...नेहरुमामांना प्रत्युत्तर द्यायला प. मदन मोहन मालवीय सारखा तज्ञ माणूसच लागतो..येरागबाळाचे काम नव्हे ते असा अभिमान वाटतोय दादांना..म्हणजे कसय की, मला झापड मारली ह्यापेक्षा मला मोठ्या साहेबांनी झापड मारली असे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो बऱ्याच लोकांना..
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 10/14/2015 - 08:29 नवीन
खी खी खी. अगदी सहमत हो चिनारशेठ.
↩ प्रतिसाद: चिनार
श
श्रीगुरुजी Tue, 10/13/2015 - 10:35 नवीन
संघ मंडळींचा सुरुवतीपासून हाच प्रोब्लेम आहे असे ह्यांचे मत.नेहेरूंनीच बोस ह्यांचा अपघात घडवला, नेहेरूंना पटेल नको होते,नेहरू मराठी द्वेषक होते..असल्या पुड्या पूर्वीपासून सोडल्या जायच्या ह्या लोकांकडून.नेहरूंच्या राजकारणाला विरोध करता येईल पण देशोदेशीच्या लोकांन भेटून्,शेकडो कोटींची मदत घेउन ह्या संस्था उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला हे वास्तव आहे. गाय खावी की खाउ नये,शाकाहार की मांसाहार,वंदे मातरम म्हणावे की म्हणू नये हा वाद नेहरू घालत बसले नाहीत.
बोस यांच्या कुटुंबियांवर ते बेपत्ता झाल्यावर पुढील २० वर्षे का पाळत ठेवली जात होती? त्यांच्या कुटुंबियांची पत्रे का फोडून वाचली जात होती? नेहरू सातत्याने संयुक्त महाराष्ट्राच्या का विरोधात होते? या प्रश्नांची उत्तरे सापडली की या पुड्या होत्या का वस्तुस्थिती होती ते तुमच्या 'ह्यां'ना समजेल. गाय खावी का नाही याविषयी घटनेतच उल्लेख आहे. वंदेमातरमचे म्हणाल तर 'तुम्हाला वंदेमातरम म्हणायचं नसेल तर तुमच्या भावना दुखावू नयेत म्हणून आपण सगळ्यांनीच ते म्हणायला नको' असा निर्णय घेऊन नेहरू मोकळे झाले होते.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 10/13/2015 - 19:47 नवीन
पण आता बहुमत आहे ना? मग मोदी,राजनाथ येऊ देत टी.व्ही.वर चर्चेला. त्यांना तर सगळे माहित असेलच ना? दाखवा फाईली आणी सिद्ध करा की नेहरूंच्या आदेशानुसार हे होत होते म्हणून.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीरंग_जोशी Tue, 10/13/2015 - 06:12 नवीन
सोन्याबापूंचे विचार वाचून माझा या धाग्यावरचा जुना प्रतिसाद आठवला.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 10/13/2015 - 07:05 नवीन
तुमचा सहृद प्रतिसाद अन त्यावर गुरुजींचा प्रतिसाद पाहून चित्र आश्वासक नक्कीच वाटत नाहीये
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ग
गामा पैलवान Tue, 10/13/2015 - 09:05 नवीन
श्रीरंग_जोशी, तुमच्याशी सहमत आहे. शासनाच्या धोरणांतले कच्चे दुवे आणि अंमलबजावणीतल्या चुका दाखवून देणे श्रीगुरुजींना अवघड जाऊ नये. यासाठी शासनाला धोरण आणि अंमलबजावणीची इच्छा असणे अत्यावश्यक आहे. एक उदाहरण देतो. गेल्या सव्वाएक वर्षात मोदींनी/पररीकरांनी श्रीलंकेच्या नेतेपदी सिरीसेना नामे भारतमित्रांना आणण्यापासून न्यूयॉर्कमध्ये बलुची आणि मोहजिरांची निदर्शने घडवण्यापर्यंत बरीच कामगिरी केली. ही कामगिरी काँग्रेसी सरकारला सहज जमण्यासारखी होती. मात्र काँग्रेसी सरकारकडे इच्छाशक्ती होती का? प्रमुख मुद्दा राजकीय इच्छाशक्तीचा (वा अभावाचा) आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असल्या तरी अन्नाची निकड सर्वात महत्त्वाची. नंतर वस्त्र आणि शेवटी निवारा असा काहीतरी प्राधान्यक्रम ठेवावाच लागतो. मोदींना राजकीय इच्छाशक्ती असल्याने मोदी शासनाचं मूल्यमापन काँग्रेसी सरकारपेक्षा वेगळ्या तऱ्हेने करायला पाहिजे. आणि नेमकं तिथेच घोडं अडतं. सुस्पष्ट धोरण असणे ही इतकी दुर्मिळ चीज होती की मोदींची पहिली काही वर्षे जनतेच्या अपेक्षांची निश्चिती (पूर्ती नव्हे) करण्यातच जातील. एकदा का अपेक्षांची निश्चिती झाली की मगच मूल्यमापन करता येईल. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
D
dadadarekar Tue, 10/13/2015 - 09:31 नवीन
सिरिसेना लंकेत गादीवर बसले तर श्रेय मोदीना ! हिरण्यकश्यपूला हरवून प्रल्हादाला गादीवर बसवायचे कर्तृत्वही मोदींचेच , आता हेही जाहीर करा.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 10/13/2015 - 09:36 नवीन
दादु तुम्ही किंवा हे गुर्जी एकाच माळेचे मणि!! कट्टरपणा ची माळ!
↩ प्रतिसाद: dadadarekar
प
प्रदीप Tue, 10/13/2015 - 15:32 नवीन
आपण (म्हणजे भारताने) श्रीलंकेच्या निवडणूकीच्या दरम्यान नक्की काय केले असेल हे ठाऊक नाही.पण इथे काही दुवे आपणासाठी देत आहे, ते पहावेतः दुवा १ दुवा २ दुवा ३ दुवा ४ दुवा ५
↩ प्रतिसाद: dadadarekar
त
तर्राट जोकर Tue, 10/13/2015 - 10:01 नवीन
मोदींना राजकीय इच्छाशक्ती असल्याने मोदी शासनाचं मूल्यमापन काँग्रेसी सरकारपेक्षा वेगळ्या तऱ्हेने करायला पाहिजे. आणि नेमकं तिथेच घोडं अडतं. सुस्पष्ट धोरण असणे ही इतकी दुर्मिळ चीज होती की मोदींची पहिली काही वर्षे जनतेच्या अपेक्षांची निश्चिती (पूर्ती नव्हे) करण्यातच जातील. एकदा का अपेक्षांची निश्चिती झाली की मगच मूल्यमापन करता येईल.
एवढा हास्यास्पद प्रतिसाद आजवर कुणा भक्ताने लिहिला नसेल....? तुम्ही काय लिहिताय हे तुम्हाला तरी कळत असेल अशी अपेक्षा आहे. माझ्या ह्या अपेक्षेची निश्चिती करण्यातच तुमचा किती वेळ जाइल कुणास ठाउक...
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/15/2015 - 20:24 नवीन
श्रीरंग_जोशी, तुमच्याशी सहमत आहे. शासनाच्या धोरणांतले कच्चे दुवे आणि अंमलबजावणीतल्या चुका दाखवून देणे श्रीगुरुजींना अवघड जाऊ नये. यासाठी शासनाला धोरण आणि अंमलबजावणीची इच्छा असणे अत्यावश्यक आहे.
मोदी राजवटीतील चुका, चुकीचे निर्णय इ. वर लेख लिहायचा विचार आहे. केव्हा लिहावा हाच प्रश्न आहे. २ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाट पाहिली तर अजून किमान ७ महिने थांबावे लागेल. त्याऐवजी बिहार निवडणुक निकालानंतर (८ नोव्हेंबर नंतर) लिहिणे योग्य ठरेल. तसेही पुढील महिन्यात मोदी सरकारला दीड वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे पुढील महिन्यातच लिहायचा प्रयत्न करीन.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अर्धवटराव Tue, 10/13/2015 - 07:22 नवीन
केवळ एक हिस्सा नाहि तर आणि प्रगतीशील आणि मजबूत पायाभरणीच्या स्वरुपातलं ते कॉण्ट्रीब्युशन आहे.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गामा पैलवान Tue, 10/13/2015 - 08:51 नवीन
सोन्याबापू, >> तुम्ही कितीही द्वेष करा ह्या देशाच्या प्रगति मधे नेहरुंचा एक हिस्सा अन कंट्रीब्यूशन आहेच आहे! नेहरूंचा द्वेष कोणी नाहीये हो करत! आता ज्या योगदानाबद्दल तुम्ही म्हणताय तर तो मुद्दा मान्य आहे. हे योगदान फक्त प्रशासकीय पातळीपुरतं मर्यादित आहे. पण काँग्रेसकडून चित्रं असं रंगवलं जातंय की नेहरू सर्वेसर्वा होते. केवळ त्यांच्यामुळे भारतात आज तंत्रज्ञानाची क्रांतीबिंती दिसून येते, वगैरे, वगैरे. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 10/13/2015 - 09:13 नवीन
गापै Agreed to some extent
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Tue, 10/13/2015 - 10:50 नवीन
आता ज्या योगदानाबद्दल तुम्ही म्हणताय तर तो मुद्दा मान्य आहे. हे योगदान फक्त प्रशासकीय पातळीपुरतं मर्यादित आहे. पण काँग्रेसकडून चित्रं असं रंगवलं जातंय की नेहरू सर्वेसर्वा होते. केवळ त्यांच्यामुळे भारतात आज तंत्रज्ञानाची क्रांतीबिंती दिसून येते, वगैरे, वगैरे.
प्रशासनाचा मुद्दा सुद्धा मला मान्य नाही. लाल फितीचा कारभार, अवाढव्य आणि नुकसानीतले सरकारी उद्योग, डावीकडे झुकलेले भोंगळ समाजवादी आर्थिक धोरण, संरक्षणव्यवस्था दुर्बल ठेवणे इ. गोष्टी नेहरूंच्याच काळात झाल्या. नेहरू लोकशाहीवादी होते असे सांगितले जाते. पण लोकशाही मार्गाने निवडून आलेले केरळमधील साम्यवादी सरकार १९५७ मध्ये बरखास्त करताना लोकशाहीची कोणती मूल्ये पाळली गेली होती? बाकी संयुक्त राष्ट्रसंघात नेलेला काश्मिर प्रश्न, कलम ३७०, चीनने केलेला दारूण पराभव, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याची शक्यता असताना आपल्याऐवजी चीनचे नाव पुढे करणे इ. चुका काढल्या तर इथे तुंबळ युद्ध पेटेल.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Tue, 10/13/2015 - 10:26 नवीन
तुम्हाला माझा आधीचा प्रतिसाद नीट समजलेला दिसत नाही. वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतो. २००७ मध्ये भारताने क्रिकेटची ट-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली, त्यावेळी जाणता राजा शरद पवार साहेब बीसीसीआयचे अध्यक्ष होते. नंतर २०११ मध्ये भारताने क्रिकेटची एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा जिंकली, त्यावेळी जाणता राजा शरद पवार साहेब आयसीसीचे अध्यक्ष होते. पवार साहेब या स्थानांवर नसते तर भारत विजयी झाला असता का या प्रश्नाचे जे उत्तर आहे, तेच मूळ प्रश्नाचे उत्तर आहे.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
श्रीगुरुजी Tue, 10/13/2015 - 16:37 नवीन
गुरूजी तुमची विचारसरणी आत्यंतिक उजवी दिसते, अम्हांस काहीच आत्यंतिक पचत नाही देवानु, मग तो दादु असो का गुरूजी
मी तथाकथित उजव्या विचारांचा आहे, पण आत्यंतिक विचारसरणी वगैरे अजिबात नाही.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
भ
भटकंती अनलिमिटेड Tue, 10/13/2015 - 07:46 नवीन
दारिद्र्य निर्मूलन, पायाभूत सुविधा विकास, आरोग्य, रस्तेबांधणी, ग्रामविकास, दुष्काळनिवारण या क्षेत्रांत अजूनही म्हणावे तसे काम झालेले दिसत नाही. टोलचा झोल आहे तो वेगळाच. गडकरींनी मोठ्या गर्जना केल्या होत्या टोलचे भूत मी उभे केले होते, मीच संपवणार. पण गेल्या दोन आठवड्यांपूर्वी स्वतः मान्य केले की टोल पूर्णपणे बंद होणे शक्य नाही. डिजिटल इंडिया साठी स्पेक्ट्रम विकले पण ४जी अजूनही सुरु झालेले नाही. टेलिकॉम कंपन्यांच्या मानगुटीवर बसून ते करवून घेणे गरजेचे आहे. आरोग्य मंत्रालयात हर्षवर्धन आणि आता नड्डा कंपनीचे काय चालले आहे ते कुणालाच समजत नाही. रेल्वेत प्रभूंना अजून विशेष चमत्कार दाखवता आला नाही म्हणून कॅप्टन मोदी नाराज असल्याची चर्चा आहे. सरकारची बरीच एनर्जी नुसत्या मिडिया आणि विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देत बसणे आणि आपल्याच संघटनांची खरकटी काढणे यात खर्च होताना दिसत आहे. प्रत्येकाने काय खावे, व्हॉट्सअप कसे वापरावे, फेसबुक किती वापरावे याच्या पॉलिसी बनवण्यात उरली सुरली हवा निघून चालली आहे. रेल्वे (प्रभू), आरोग्य (नड्डा), मानवी संसाधन (इराणी), Surface Transport (गडकरी), अवजड उद्योग (गिते), महिला सक्षमीकरण (मनेका गांधी) या मंत्रालयांनी परिणामकारक कार्य करण्याची (किंवा केले असेल ते प्रोजेक्ट करण्याची) निकड आहे. त्या मानाने बेस्ट परफॉर्मिंग अशा परराष्ट्रमंत्रालय (स्वराज) आणि रक्षा मंत्रालयास (पर्रीकर) पाचपैकी साडेचार गुण.
य
याॅर्कर Tue, 10/13/2015 - 08:34 नवीन
तुम्हा लोकांसारखे असेच सरकारची उणी धुणी काढणारे व असमाधानी असणार्यांनी दिल्लीत 'आम आदमी' पक्ष काढला आणि निवडूनही आले. काही विधायक कामे केलीही.पण परत तेच एरंडाचं गुर्हाळ सुरू झालंच. मुद्दा इतकाच आहे "फाटक्या विचारांच्या जनतेने फाटक्या सरकारकडून अपेक्षा ठेवू नयेत" "जसा राजा तशी प्रजा" नाही नाही..... "जशी प्रजा तसाच राजा" मग त्यात मीही आलोच.
त
तर्राट जोकर Tue, 10/13/2015 - 11:58 नवीन
अन्नसुरक्षा योजना मागे पडून गेलीये, लाखो लोक उपाशिपोटी झोपत असतांना, कित्येकांना अन्नावाचून उपास घडतांना, हजारो मुले कुपोषणाने मरत असतांना 'कुणी काय खायला हवं' यावर मेगाबायटी चर्चा करणारांना माझा साष्टांग दंडवत. सगळा भारत धनधान्याने भरभरून वाहत आहे, सगळ्या समस्या संपल्या आहेत. 'मुस्लिम गाय खातात' हाच एकमेव राष्ट्रप्रगतीतला अडथळा उरला आहे. तेव्हा मुस्लिम मारुन गाय वाचवणे हेच राष्ट्रकार्य कट्टर देशभक्तांनी आरंभले आहे यात दुमत असायचे कारणच काय? भारतमातेचे अश्रू आनंदाचेच तर आहेत, तुम्हाला काय वाटलं नाहीतर...?
D
dadadarekar Tue, 10/13/2015 - 14:22 नवीन
वाढती असहिष्णुता, दादरी सारख्या घटना आणि विचारवंतांच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर साहित्यविश्वातून तीव्र निषेधाचा सूर निघत असताना, अन्य राज्यातील साहित्यिकांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रातील साहित्यिकांनीही आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. प्रसिद्ध कवियित्री-लेखिका प्रज्ञा दया पवार, लेखक हरिश्चंद्र थोरात, अनुवादक गणेश विसपूते, लेखक संजय भास्कर जोशी यांनी आपण पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे
य
याॅर्कर Tue, 10/13/2015 - 18:45 नवीन
म्हणजे काॅग्रेसने जशी याआधी इतरांच्या नावाने हिंदुत्वाची केली तशी? गुदमरत असेल नै त्यांना गळचेपी केल्यावर? शिवाय लंग्स,थ्रोट इनफेक्शन हे प्राॅब्लेमही आलेच.
↩ प्रतिसाद: dadadarekar
प
प्यारे१ Tue, 10/13/2015 - 18:49 नवीन
भिवंडी मध्ये मारलेल्या पोलिसांचं काय झालं ओ पुढे???? या वरच्या कार्यकर्त्यांपैकी कुणीकुणी काय काय 'परत' केलं म्हणे? शबाना आझमी, भट वगैरे मंडळी आली असतीलच नै निषेधाला? बाकी कुठल्याही हिंसात्मक घटनेचा निषेधच असला तरी वि शिष्ट प्रसंगीच गळे काढणार्‍या लोकांना डुकराचं लोणचं देण्याची इच्छा दाबत आहे. कशाला बिचार्‍याचा जीव घ्या?
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Tue, 10/13/2015 - 20:09 नवीन
जाळपोळ व दंगल केली होती. त्यात एक पोलिस चौकीही जाळली होती. त्याचे काय झाले हो ?
↩ प्रतिसाद: प्यारे१
श
श्रीगुरुजी Tue, 10/13/2015 - 20:14 नवीन
केरळमध्ये २-३ वर्षांपूर्वी तिथल्या मुस्लिम मूलतत्ववाद्यांनी प्रश्नपत्रिकेत इस्लामवर प्रश्न विचारल्याने एका प्राध्यापकाचे दोन्ही हात कोपरापासून कापून टाकले होते, तेव्हा अकादमी पारितोषिक विजेत्या एकाही साहित्यिकाने तोंडातून निषेधाचा चकार शब्द काढल्याचे ऐकिवातनाही. केरळमध्ये तर अशा अनेक बुद्धिवतांच्या हत्या झाल्या आहेत. परंतु यांच्याकडून कधी निषेध झाल्याचे ऐकलेले नाही. बाबासाहेब पुरंदरेंवर शाई फेकल्यानंतरसुद्धा हे गप्प होते.
↩ प्रतिसाद: प्यारे१
D
dadadarekar Wed, 10/14/2015 - 06:13 नवीन
पुलं देशपांडेनाही ठोकशाहीचा अनुभव आला होता म्हणे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Wed, 10/14/2015 - 08:24 नवीन
डुकराचा तरी कशाला जीव घ्यावा? मला दुसराच पदार्थ सुचतोय! :-D -गा.पै.
↩ प्रतिसाद: प्यारे१
D
dadadarekar Wed, 10/14/2015 - 08:27 नवीन
तुझं मायबोलिचं लंगोट उडालं ना ? दुसरं घेतलं का ?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/15/2015 - 09:06 नवीन
परम आदरणीय दादासाहेब दरेकर यांस अत्यादरपूर्वक प्रणाम. पत्र लिहिण्यास कारण की आपण माझ्या लंगोटाची आस्थेने चौकशी केलीत. त्यामुळे माझा ऊर भरून आला आहे. तुमच्याकडे बनावट अवतारांची खाण आहे तर बापड्या माझ्याकडे एकही बनावट अवतार नाही. या बाबतीत तुम्ही गर्भश्रीमंत आहात. तेव्हा माझ्यासारख्या गरीब माणसाकडे फारसं लक्ष न देता तुमची संपत्ती वाढवायच्या योजनांत चित्त गुंतवावे. हे जमत नसल्यास धाग्याच्या विषयास धरून बोलावे. हेही जमत नसल्यास इथून कलटी मारावी. हेही जमत नसल्यास अस्मादिकांच्या दर्शनास या आणि कृतकृत्य व्हा. मी कुठल्या अवस्थेत आहे ते तुम्हाला माहिती आहेच. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: dadadarekar
  • «
  • ‹
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा