एक वर्षानंतर . . .
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________
💬 प्रतिसाद
(1265)
ग
गामा पैलवान
गुरुवार, 11/12/2015 - 08:35
नवीन
श्रीगुरुजी,
एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर परदेशी पैसा खरंच पाहिजे का? जर तो येत असेल तर १००% परदेशी गुंतवणूक कशाला पाहिजे? ४९% पर्यंत सीमित ठेवायला काय अडचण आहे? भारतातही हल्ली लोकांच्या खिशात पैसे खुळखुळू लागलेत. थेट परकीय गुंतवणून मेक इन इंडिया मध्ये कुठे बसते?
आ.न.,
-गा.पै.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/12/2015 - 10:12
नवीन
भारताला परदेशी पैशाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था गतीमान होऊ शकते, रोजगार व निर्यात वाढू शकते. संरक्षण क्षेत्रासाठी परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९% टक्केच आहे. परंतु एफएम रेडिओ, डीटीएच इ. करमणुकीच्या क्षेत्रातच १००% टक्के गुंतवणुकीला परवानगी आहे. त्यात सुद्धा ४९% नंतर अधिक गुंतवणुकीसाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे.
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 11/12/2015 - 08:01
नवीन
परदेशी थेट गुंतवणुकीचे युपीए सरकारचेच धोरण सुरू ठेवले त्यात विशेष काय केले? ह्यासाठी बिहारच्या निवडणुकीतील पराभवाचा मुहुर्त कशाला हवा होता?
स
संदीप डांगे
गुरुवार, 11/12/2015 - 08:07
नवीन
विशेष म्हणजे काँग्रेस काळात याच एफडीआय ला भाजपेईंचा विरोध होता म्हणे.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/12/2015 - 10:14
नवीन
याला बिहारच्या निकालाचा मुहूर्त नसून मोदींच्या ब्रिटन दौर्याचा मुहूर्त आहे.
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 11/12/2015 - 08:17
नवीन
मल्टी ब्रँड रिटेलमध्ये ५१% FDI गुंतवणुकीला तेव्हा ह्यांचा विरोध होता.
क
कपिलमुनी
गुरुवार, 11/12/2015 - 09:07
नवीन
याचेही उत्तर मिळेल
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/12/2015 - 10:23
नवीन
कालच्या निर्णयामुळे मल्टी ब्रँड रिटेलमध्ये नसून सिंगल ब्रॅंड रिटेलमध्ये एफडीआय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे.
स
संदीप डांगे
गुरुवार, 11/12/2015 - 11:01
नवीन
हास्यास्पद उत्तर...
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/12/2015 - 11:11
नवीन
अभ्यास वाढवा
स
संदीप डांगे
गुरुवार, 11/12/2015 - 11:12
नवीन
तुम्ही करताय ना.... तेव्हढा पुरे आहे....
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/12/2015 - 15:46
नवीन
धन्यवाद!
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 11/12/2015 - 12:45
नवीन
मल्टी ब्रँड रिटेलमधील ५१% FDI गुंतवणुकीसंबंधी सध्याच्या सरकारचे काय धोरण आहे?
आणि
परदेशी थेट गुंतवणुकीचे युपीए सरकारचेच धोरण सुरू ठेवले त्यात विशेष काय केले? ह्याचेही उत्तर द्या.
च
चैतन्य ईन्या
गुरुवार, 11/12/2015 - 12:56
नवीन
उत्तर काहीही नाहीये. फक्त खान्ग्रेसला करू न देता आपण केले. पण ह्यात आता ह्यांचीच गोची होवून बसली आहे. आधी फुकट जिथे तिथे आडकाठी केली आता तेच प्रयोग ह्यांच्या बोकांडी बसले आहेत. त्यापेक्षा २००४-२००९ मधला पराभव मान्य करून चांगला योग्य ठिकाणी विरोध केला असता तर बरे झाले असते. पण आडवाणी आणि बाकीचे पिसाटल्या सारखे वागले. आता मोदी आणि शाह तोच कित्त गिरवत आहेत. फुकट आपले सेस लावता आहेत. मुळात लोकांना बेसिक गोष्टीत जास्त रस असतो. तिथेच गाडे अडले आहे. कितीही आवडले नाही तरी परसेप्शन असा प्रकार आहे कि कोणालाच सतत सुखी ठेवता येत नाही. त्यापेक्षा आधी पाया बळकट करणे जास्त चांगले तेच जमत नाहीये. जेटलीला पहिला हाकला आणि दुसरा शाहला. पण ते होणार नाही.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/12/2015 - 16:09
नवीन
५१% गुंतवणुकीचा निर्णय २०१२ मध्ये झाला होता. सरकारने त्यात काहीही बदल केला नाही. आता तो रद्द करणे म्हणजे घड्याळाचे काटे उलटे फिरविण्यासारखे आहे. आर्थिक धोरणात कोणतेही सरकार एकदम १८० अंशात वळण घेऊ शकत नाही. अन्यथा परदेशी गुंतवणुकदारांमध्ये अत्यंत चुकीचा संदेश जाऊन गुंतवणुकीवर वाईट परीणाम होऊ शकतो. उद्या साम्यवादी/समाजवादी सत्तेवर आले तरी ते आर्थिक धोरणात आमूलाग्र बदल करू शकणार नाहीत.
परदेशी थेट गुंतवणुकीचे धोरण युपीए सरकारचे नसून ते त्यापूर्वीच्या सरकारचे होते. तेच धोरण युपीए सरकारने पुढे सुरू केले त्यात विशेष ते काय?
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 11/12/2015 - 19:36
नवीन
आमचे सरकार आले तर आम्ही युपीए सरकारने घेतलेला हा निर्णय मागे घेऊ असा तेव्हा बीजेपी प्रचार का करत होती? तुम्हाला जे कळते ते बीजेपीला तेव्हा माहीत नव्हते का? ह्याला अ़़ज्ञान म्हणावे की खोटारडेपणा म्हणावा?
श
श्रीगुरुजी
Fri, 11/13/2015 - 10:51
नवीन
युपीए चा निर्णय जैसे थे का ठेवला याची जरा माहिती मिळवितो आणि नंतर उत्तर देतो.
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 11/12/2015 - 16:52
नवीन
अजून आधार कार्डाबद्दल प्रश्न पडले नाहीत का कोणाला. मोदी निवडणुकांआधी बराच विरोध करत होते आधारला. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात वगैरे म्हणून. आता काय बदललं हे सांगायला पाहिजे त्यांनी.
टीपः मला आधीही आधार योग्य वाटत होतं. मोदींना त्याचा व्यापक वापर करणं चांगलं आहे. बट ही ओव्ज पीपल सम एक्स्प्लनेशन.
न
नाव आडनाव
गुरुवार, 11/12/2015 - 17:16
नवीन
+१
च
चैतन्य ईन्या
गुरुवार, 11/12/2015 - 17:19
नवीन
हाच तर प्रोब्लेम झालाय. आधी ज्याला जीव तोडून विरोध केला त्याचा पोलिसी पुढे चालवल्या जात आहे. शिवाय प्रचंड प्रमाणात आयएस वगैरे तत्सम नोकरशाहीला जास्त अधिकार दिलेत. आधी व्होडाफोन बद्दल सरळ सरळ भूमिका घेवून लगेच जेटली करावी केस रद्दबादल केली असती तर ह्यांची विश्वासार्हता वाढली असती. त्याआईवाजी वकिली थाटात उत्तरे दिली. मग चिदंबरम काय वेगळे करत होते. थोडक्यात लोकांना फरकच दिसत नाहीये. थोडासा फार अजित दोव्हल, पर्रीकर आणि गडकरी सोडले तर सगळा आनंदच आहे. नुसते रेल्वे स्टेशन स्वच्छ करून काय फायदा? तिथे वायफाय देवून गरीब लोकांना काय फरक पडणार आहे? माझ्यामते ह्यांच्या प्रायोरीटीज चुकल्या आहेत. कितीहि म्हटले तरी भारत हा अजूनही गरीब लोकांचा देश आहे. बेसिक गोष्टीत सुधारणा होत नाहीयेत. हीच बोंब आहे.
श
श्रीगुरुजी
Fri, 11/13/2015 - 10:50
नवीन
3 days, 27 deals:
http://indianexpress.com/article/india/india-news-india/3-days-27-deals-india-most-open-says-modi-in-uk/
स
संदीप डांगे
Fri, 11/13/2015 - 17:19
नवीन
व
विवेक ठाकूर
Fri, 11/13/2015 - 17:56
नवीन
पोकळ भावनिक आव्हाने करणे आणि भाषणे ठोकणे या व्यतिरिक्त त्यांना काहीही घंटा जमत नाही हे एव्हाना सगळ्या भारतीयांच्या लक्षात आलं आहे.
त्यात बिजेपीचा छुपा अजेंडा `विकास नसून मंदीर आहे' हे इथल्याच एका सदस्यानं निवडणूकीपूर्वी सांगितलं होतं आणि मोदी निवडून आले तर देशात कमालीचं जातीय अस्थैर्य माजून देशाची शांतताच धोक्यात येईल असं ही म्हटलं होतं.
आता राष्ट्रपतींपासून ते पार रिजर्व बँकेच्या गवर्नरपर्यंत सगळे तेच सांगतायंत.
आधीच आरक्षणामुळे देशाच्या बौद्धिक प्रगतीची वाट सरळ परदेशांकडे वळली आहे आणि आता ती घोडचूक बापाजन्मात दुरुस्त होणं शक्य नाही.
खरं तर मोहन भागवतांचा आरक्षणाचा मुद्दा (ते जातीनिहाय नसावं) योग्य आहे. पण इथले एक विद्वान राजकीय निरिक्षक भागवतांच्या वक्तव्याला `गाढवपणा ' म्हणालेत !
आता मंदीर झालं तर देशात आरक्षणानंतरची, देशाची संपूर्ण प्रगती आणि एकसंधतेचा बाजा वावणारी, आणि निस्तरायला असंभव अशी दुसरी घोडचूक होईल.
अ
अर्धवटराव
Sat, 11/14/2015 - 00:54
नवीन
करेक्ट !! तुफ्फान !! चाबुक !!!
आणि म्हणुनच बिहारपासुन बदलाची सुरुवात झाली आहे. तसं पहिले केजरीवाल आलेच होते निवडुन. आता लालु पण आले आहेत रिंगणात मोदिंची जागा घ्यायला.
ह्म्म्म. 'जुन्या' सदस्याचा 'कमालीचा' रेफरन्स देताय होय... मग या प्रतिसादाचं काहि आश्चर्य वाटलं नाहि :)
हि लेखनशैली बघुन डोळे पाणवले, आठवणींचं काहुर माजलं... आणि बरच काहि झालं.
आमच्यासारख्या अडाण्यांचे डोळे खाडकन उघडण्यासाठी अनेकानेक धन्यवाद.
व
विवेक ठाकूर
Sat, 11/14/2015 - 06:03
नवीन
केजरीवाल दिल्लीत निवडणूक लढले त्यावेळी `मैं अपनी जानपे खेल रहा हूं ' म्हणाले होते ! यातच आपल्या वंदनीय मोदी-शहा जोडीची काय कर्तबगारी आहे ते कळून येतं.
असो, आपल्याला फार पुढचं समजेल असं दिसत नाही तरी, किमान मंदिर व्ह्यायच्या वेळी आकडेवारी आणि नाहक तर्क-वितर्कात गुंतण्यापेक्षा, डोळे उघडे ठेवून विरोध केला तरी पुरेसं होईल.
अ
अर्धवटराव
Sat, 11/14/2015 - 07:35
नवीन
आता तर खात्री पटायला लागली आहे. बरं, पराभूत मानसीकता वगैरे नाहि दिसली का एव्हाना?
बरं ते राहु दे. मंदीर विरोध करायचा कि कसं ते पुढे बघुच. सध्यातरी केजरीसाहेबांकरता आमचे डोळे केवळ उघडलेच नाहित तर अगदी वटारुन बाहेर आले आहेत... कौतुकाने हो. कसं आहे ना.. दादरी कांड झाल्याबरोब्बर हे साहेब त्या पिडीत कुटुंबाच्या भेटीला अगदी जातीने गेले. राज्यसरकारची जबाबदारी वगैरे किरकोळ मुद्द्यांना साहेबांनी हात घातलाच नाहि..सरळ मोदिंवर गेम टाकला. आणि लालुंच्या राजकीय पुनरज्जीवनासाठी एक तासभर उपोषण सुद्धा केलं म्हणे साहेबांनी. पण साहेबांचं कौतुकच नाहि कोणाला.
जरा भारताला बरे दिवस यायचे चान्सेस आले कि भारतीय मानसीकता झोपा का काढते हे कोडं उलगडलेल तो सोन्याचा दिवस. इथे काय काय होतय देशात... आणि पब्लीक मंदीर मुद्द्याकडे डोळे लावुन बसले आहेत. कठीण आहे.
श
श्रीगुरुजी
Sat, 11/14/2015 - 10:27
नवीन
त्याचा अर्थ असा होता की आधीच्या निवडणुकीत ते स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे शो मॅनेज करीत होते, पण मतदार त्या नाटकाला फसले नव्हते. त्यामुळे यावेळी जास्त भयंकर म्हणजे स्वतःवर जीवघेणा हल्ला करून घ्यायचे शो मॅनेज करायला लागणार असा त्या 'जानपे खेलाचा' अर्थ होता.
व
विवेक ठाकूर
Sat, 11/14/2015 - 15:46
नवीन
काय बाळबोध युक्तीवाद करतायं. निदान पुरते हारल्यावर तरी आपण काय लिहीतो याची समज यायला हवी .
एकट्या केजरीवालनी दिल्लीत; पंतप्रधान मोदी, त्यांचे दिव्य उजवे हात शहा , आक्खा भाजप पक्ष आणि केंद्र सरकारची राबवलेली यंत्रणा धूळधाण करून टाकली. थोबाडीत कुणाच्या बसली ते सुद्धा लक्षात येत नसेल तर कमाल आहे.
श
श्रीगुरुजी
Sat, 11/14/2015 - 16:15
नवीन
अजिबात बाळबोध नाही. केजरीवालांनी २०१३ व २०१४ च्या निवडणुकीत स्वतःच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायचे किमान प्रयोग केले होते. प्रत्येक वेळी थोबाडीत खाल्ल्यावर ते भाजपवर आरोप करायचे आणि दुसर्या दिवशी माध्यमे शोधून काढायची की थोबाडीत मारणारा आआपचाच कार्यकर्ता होता. हे उघड झाल्यावर खजिल होण्याऐवजी हे महाभाग माध्यमांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन थोबाडीत मारणार्याच्या घरी जायचे व त्याला माफ केल्याचे नाटक करायचे.
थोबाडीत मारून घेण्यासारखी इतर नाटके देखील त्यांनी केली होती. उदाहरणार्थ स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून स्वत:च्या सदर्यावर शाई शिंपडून घेणे, गाडीवर अंडे टाकायला लावणे, इ. आणि प्रत्येक वेळी ते भाजपवर खोटे आरोप करायचे. वाराणशीत असताना एकदा फक्त टॉवेल गुंडाळून उघडेबंब अवस्थेत गंगा नदीवर डुबक्या मारायला गेले होते आणि बरोबर माध्यमांचे कॅमेरे होतेच. एकदा सलून मध्ये जाऊन केस कापत होते आणि बरोबर कॅमेरे होतेच. मफलर गुंडाळून खोकण्याची नाटके देखील झाली. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा खोकला अचानक गेला आहे. अशी असंख्य नाटके त्यांनी केली.
फुकट वीज, पाणी, वायफाय, १५ लाख सीसीटीव्ही अशी फुकटेगिरीची आश्वासने देऊन आणि काँग्रेसकडून वॉकओव्हर मिळवून काँग्रेसच्या मदतीने त्यांनी सत्ता मिळविली.
असो. 'मैं अपनी जानपे खेल रहा हूं' या वाक्याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ मान्य नसेल तर नक्की काय अर्थ आहे ते सांगाल का?
श
श्रीगुरुजी
Sat, 11/14/2015 - 16:16
नवीन
किमान ३ प्रयोग केले होते.
व
विवेक ठाकूर
Sun, 11/15/2015 - 09:30
नवीन
दिल्लीत तुमच्या मोदी, शहा, भाजपची संपूर्ण यंत्रणा, आणखी कोणकोण दिग्गज, सगळ्यांना एकट्या केजरीवालनी पार लोळवलंय.
शहा सुपारीचे व्यापारी आहेत आणि सध्या तुमच्या जोडगोळीनं निर्माण केलेली पक्षांतर्गत दहशत, आता तुमच्याच पक्षाच्या श्रेष्टींकडून मोडायचे प्रयत्न चाललेत. उगीच वेड घेऊन झेड गावला कशाला जातायं.
उगीच फालतूचा डेटा इकडून तिकडे डकवून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा वास्तविकात काय घडलंय ते पाहा.
श
श्रीगुरुजी
Sun, 11/15/2015 - 13:03
नवीन
तेच सांगतोय. वास्तविकात काय घडलं ते पहा.
बादवे, 'जानपे खेल' म्हणजे नक्की काय याचं अजून उत्तर नाही मिळालं, ते जरा देता का?
एप्रिल २०१४ मध्ये दिल्लीतल्या एका सभेत गजेंद्र सिंह नावाच्या एका राजस्थानी शेतकर्याला तुमच्या केजरीवालांनी बोलाविले होते व त्याला झाडावर चढून गळ्यात फास लटकावण्याचं नाटक करायला सांगितलं होतं. त्याने ठरलेल्या नाटकानुसार इमानइतबारे गळ्यात फास घालून घेतला आणि हा 'जानपे खेल' आहे हे विसरून त्याला खरोखरच फास बसून त्यात तो गेला. त्याचे प्रेत झाडावर लटकत होते आणि त्याच्या लटकत्या प्रेतापासून ५० फुटांवर तुमचे केजरीवाल ७५ मिनिटे पुढची राणा भीमदेवी थाटात भाषणे ठोकत मोदींना शिव्या घालत होते. म्हणजे 'जान' त्याची गेली आणि 'खेल' यांचा झाला. हाच का तो केजरीवाल म्हणतात तो 'जानपे खेल'?
अर्थात तो गेल्यावर केजरीवाल आणि त्यांच्या टोळीने त्याच्या प्रेताच्या टाळूवरील लोणी ओरपण्यात अजिबात कसर ठेवली नाही. त्यांचा बॉडीगार्ड संजय सिंह स्व्तःबरोबर बाउन्सर्सची गँग घेऊन त्याच्या घरी गेला व घरच्यांना धमकावूनही आला. आशुतोषने डोळ्यात पाण्याचा थेंब येऊन ने देता भोकाड पसरून रडण्याचा बेमालूम अभिनय केला. केजरीवालांनी सगळी जबाबदारी पोलिसांवर ढकलून स्वतः नामानिराळे राहिले. एकंदरीत गजेंद्रच्या 'जान'चा जो 'खेल' झाला त्याची चांगलीच मजा केजरीवालांनी लुटली.
व
विवेक ठाकूर
Tue, 11/17/2015 - 11:44
नवीन
कुठूनही काहीही भंकस गोळा करून कशीही फेकायची यात तुमचा हात तुम्हीच धरावा!
जर केजरीवाल गजेंद्र सिंहच्या मृत्यूला जवाबदार आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून गजेंद्र फास लावायचा खेळ करत होता तर तुमचं बिजेपी सरकार काय गोट्या खेळतंय का ? का नाही दाखल केला गुन्हा ?
क
कपिलमुनी
Fri, 11/13/2015 - 19:33
नवीन
FDI वर भाजपाचा धोरण दुटप्पी आहे
स
संदीप डांगे
Fri, 11/13/2015 - 19:58
नवीन
भाजपचे हे सरकार युटर्नगामी आहे. यावर एक विशेष लेखच लिहायला लागेल. कारण इतके युटर्न्स आहेत की इथे ५००० प्रतिसादांचा वेगळा धागा अतिशय आवश्यक आहे. ज्यातले ४००० मास्तरांचेच असतील....
तत्लोक... https://www.quora.com/What-are-the-worst-U-turns-by-BJP-after-forming-the-Government
अ
अर्धवटराव
Sat, 11/14/2015 - 00:57
नवीन
तुम्ही दिलेल्या लिंकसारखाच असेल तो धागा तर मात्र असु द्या :)
श
श्रीगुरुजी
Sat, 11/14/2015 - 10:21
नवीन
मग काढा की धागा. तुमचे महनीय विचार वाचायला आवडतील.
श
श्रीगुरुजी
Sat, 11/14/2015 - 10:21
नवीन
मग काढा की धागा. तुमचे महनीय विचार वाचायला आवडतील.
स
संदीप डांगे
Sun, 11/15/2015 - 14:53
नवीन
सर ब्रॅडमन,
आधीच फक्त एकाच युटर्नच्या उत्तराची वाट बघत आहे. "एफडीआयचं काय झालं...?"
युपीए सरकारने जेव्हा एफडीआयचे निर्णय घेतले तेव्हा भाजपा बोंबाबोंब करत होती, तेच निर्णय गुपचूप स्वत: सत्तेरवर असतांना भाजपा का घेत आहे?
श
श्रीगुरुजी
Sat, 11/14/2015 - 10:22
नवीन
भुजबळ कुटुंबियांना १६० कोटींचा झटका -
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/bhujabal-family-in-new-problem/articleshow/49773458.cms
क
काकासाहेब केंजळे
Sun, 11/15/2015 - 09:42
नवीन
कसला दणका वगैरे काही नाही ओ गुरुजी , तुमचे लाडके मोदी ,जेटली, फडणवीस , खडसे हे पवारांचे मार्गदर्शन घ्यायला दर महिणा बारामतीला येतात .त्या पवारांचेचे शागिर्द भुजबळ साहेब आहेत हे विसरता काय मध्येच
श
श्रीगुरुजी
Sun, 11/15/2015 - 13:51
नवीन
अहो अनेक आजी, माजी आणि भावी डूआयड्यांचे धनी,
जोपर्यंत भ्रष्टाचार्यांवर कारवाई होत आहे तोपर्यंत ही मंडळी बारामतीला गेली किंवा काटेवाडीला गेली तरी शष्प फरक पडत नाही.
क
काकासाहेब केंजळे
Sun, 11/15/2015 - 14:01
नवीन
काय तो आत्मविश्वास....अहो गुरुजी भ्रष्टाचार्यांवर कारवाई कशी करायची याचे मार्गदर्शन बारामतीला मिळते हे विसरलात काय.
काय झाले पुढे सिंचन घोटाळ्याचे? टोल घोटाळ्यावर कारवाई सोडाच पण तुमच्या गडकरी साहेबांनी मुंबैइ गोवा हायवेच्या नवीन टोल प्लाझाचे उद्घाटनही करुन टाकलेय.
भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे,मग शिवसेनेला खिजवण्यासाठी ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले ते राष्ट्रवादीवालेही चालतात त्यांना...
श
श्रीगुरुजी
Sun, 11/15/2015 - 14:38
नवीन
अहो अनेक आजी, माजी आणि भावी डूआयड्यांचे धनी,
बेकायदा लाटलेली जमीन जप्त करावी, बेकायदा जमा केलेल्या मालमत्तेवर धाडी टाकाव्या, भ्रष्टाचार्यांवर खटले दाखल करून तुरूंगात टाकावे इ. प्रकारचे मार्गदर्शन बारामतीला मिळत असेल तर असे मार्गदर्शन कायमच घ्यायला पाहिजे.
श
श्रीगुरुजी
Sun, 11/15/2015 - 14:45
नवीन
मी उद्या १६ नोव्हेंबर २०१५ पासून ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत sabbatical वर असणार आहे. मिसळपाव पासून दीड महिना दूर राहून या संकेतस्थळावर १ जानेवारीनंतर परत येईन. सर्वांना धन्यवाद!
र
राजेश घासकडवी
Sun, 11/15/2015 - 19:26
नवीन
त्या काळात फार कंटाळवाणं, रुक्ष वाटेल हो मिपा. बाहेर भुरुभुरू बर्फ पडतोय, हातात छान कॉफीचा वाफाळता कप आहे, पण हायरे दैवा! वाचायला श्रीगुरुजींचे प्रतिसाद नाहीत. किती वाचक मिपा सोडून जातील कल्पना आहे का तुम्हाला? या काळातही तग धरून राहायला मिपाला आणि मिपाकरांना शुभेच्छा.
त
तुषार काळभोर
Mon, 11/16/2015 - 07:09
नवीन
१ जानेवारीला परत आल्यावर 'दीड वर्षानंतर..' असा नवीन धागा असेल.( किंवा पावणे दोन वर्षानंतर किंवा..)`
स
संदीप डांगे
Mon, 11/16/2015 - 08:03
नवीन
काय काका, शालजोडीतले एकदम...?
असो. मैदानातून पळून गेल्याचे आरोप करू नये म्हणून ढिस्क्लेमर टाकलाय वो...
र
राजेश घासकडवी
Tue, 11/17/2015 - 01:54
नवीन
मला आरोप प्रत्यारोपाची काही पडलेली नाही. करमणूक होते की नाही याच्याशी मतलब आहे. श्रीगुरुजींचे प्रतिसाद वाचणं हा माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंद आहे. त्याला मीच नाही, तर सर्वच मिपाकर मुकणार हे वाचून मला अनावर दुःख झालेलं आहे.
म
मोगा
Mon, 11/16/2015 - 08:15
नवीन
As per the instructions from Govt of India,w.e.f. 15-11-15,0.5% Swachh Bharat Cess will be levied. Service tax will be revised from 14% to 14.50%.Thank you
- «
- ‹
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- ›
- »