Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक वर्षानंतर . . .

श
श्रीगुरुजी
Mon, 05/25/2015 - 09:01
🗣 1265 प्रतिसाद
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

प्रतिक्रिया द्या
309978 वाचन

💬 प्रतिसाद (1265)
म
मोगा Wed, 02/03/2016 - 18:02 नवीन
निवडणुकीत भाजपाने उधळलेले १२० की किती कोटी भाजपा कसे वसुल करणार आहे , गुर्जी ? अभ्यास वाढवा
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/04/2016 - 09:32 नवीन
समीर भुजबळपाठोपाठ राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांना देखील ईडीची नोटिस गेली आहे. दोन दिवसांपूर्वी भुजबळांच्या अनेक कार्यालयावर घातलेल्या छाप्यात प्रचंड रोख रक्कम सापडली आहे व त्याची अजून मोजदाद सुरू आहे अशी बातमी येत आहे (खरे खोटे खुदा जाने). समीरपाठोपाठ छगनसुत पंकज आत जाईल असादेखील वाहिन्यांचा अंदाज आहे. http://www.hindustantimes.com/india/ajit-pawar-among-44-politicos-barred-from-co-op-bank-polls/story-Z27yuSfloIpoFN9inbnEEL.html भ्रष्टाचारामुळे नुकसानीत गेलेल्या सहकारी संस्था, दूध महासंघ इ. सहकारी संस्थावर सध्याच्या संचालकांना १० वर्षे संचालक म्हणून काम करण्यास महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे. या संस्थांवर बहुतेक संचालक राष्ट्रवादी व काँग्रेसचे आहेत. काही प्रमाणात इतर पक्षांचेही संचालक आहेत. या बंदीमुळे अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटिल, दिलीप देशमुख इ. दिग्गजांना संचालकपदाची निवडणूक लढविण्यास बंदी आली आहे. हळूहळू भ्रष्टाचार्‍यांविरूद्ध फास आवळला जात आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
द
दिवाकर देशमुख Wed, 02/03/2016 - 13:52 नवीन
डॉलरचा भाव कुणाच्या वयानुसार झाला आहे.? सुषमा मॅडम मागच्या सरकारवेळेस म्हणाली होती आज रुपये ने किंमत खोई है और प्रधानमंत्रीने गरिमा खोई है आज मोदीची गरिमा कुठे पोहचली? जे डाळ ७० वर असताना आंदोलन करत होते ते आज२०० वर पोहचल्यावर कुठल्या बिळात लपले आहे. पेट्रोलचा भाव कवडीमोलावर असताना सरकार सरचार्ज का वाढवून किंमती वाढवत आहे? कुणाचे खिसे भरत आहे जर सरकार स्वत:चे खिसे भरत असेल तर या आधीच्या सरकारच्या भाववाढी विरुध्द भाजपा शिगमा नाच करत होती.? ही उत्तरे भक्तांनी द्यावी.
स
संदीप डांगे Wed, 02/03/2016 - 14:10 नवीन
त्यांची उत्तरे पचवण्याची आमची शक्ती संपली, तुम्ही ताज्या दमानं या मैदानात. ;-)
↩ प्रतिसाद: दिवाकर देशमुख
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 02/03/2016 - 14:37 नवीन
:D :D :D
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ह
होबासराव Wed, 02/03/2016 - 14:49 नवीन
पेट्रोल च बोलायच काम नाय ! इथे जो कोणि पेट्रोलचा भाव कवडीमोलावर असताना सरकार सरचार्ज का वाढवून किंमती वाढवत आहे? बोलतो त्याला खरडवहितुन धमकिवजा समजावणि आणि ते बि ईंग्लिस मधुन देण्यात येते. संदर्भः- होबासराव ह्यांचि खरडवहि.
↩ प्रतिसाद: दिवाकर देशमुख
न
नाव आडनाव गुरुवार, 02/04/2016 - 05:02 नवीन
आज रुपये ने किंमत खोई है और प्रधानमंत्रीने गरिमा खोई है काय भारी बोलतात सुषमा स्वराज! फॅनंच झालो एकदम. बायदवे, ह्याच लॉजिकने आत्ताच्या पंतप्रधानांच्या "गरिमे" बद्दल त्यांचं काय मत असेल बरं :)
↩ प्रतिसाद: दिवाकर देशमुख
ह
होबासराव Wed, 02/03/2016 - 14:50 नवीन
:)
ह
होबासराव Wed, 02/03/2016 - 14:53 नवीन
i hope this person understands the meaning of "insinuation"
↩ प्रतिसाद: होबासराव
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 02/03/2016 - 15:01 नवीन
एकंदरित तुम्हाले बी झाबु भेटला नाई मंग :D :D
↩ प्रतिसाद: होबासराव
स
संदीप डांगे Wed, 02/03/2016 - 15:15 नवीन
तुम्हालेई भेटला काय..? मां तं नांदी नै लागेल कोनी अजून. तुमी लोकाईनच आळवं केलं काय तिकळल्या तिकळेच..?
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 02/03/2016 - 16:18 नवीन
नाई डांगे ब्वा आमच्या नांदी नाई लागल कोई बी पर अटीसा का कमी दही होयलाय का लेक भेज्याचे
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ह
होबासराव Wed, 02/03/2016 - 15:06 नवीन
बर मि काय म्हन्तो का बॉ आमचि अशि कुटल्याच राजकिय पक्षाशि बांधिलकि नाहि का बॉ जि जि र जि कर्‍याले म्या त्याईच्याकडे काहि नौकरि नाय करत. जे काम पटल तथि चांगल म्हणतो आन जे नाय पटल तथि परश्न विचारतो. आता मले सांगा बापु माल काय चुकल ? त लागे मले सांगण्या आल का "This is in response to your insinuation" आता व माय भेलो ना मि.
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 02/03/2016 - 16:24 नवीन
थुमी एका पक्षाले अक्कल गिरवी ठेवेल नाई! हे सऱ्यात मोठी चुकी वाटते मले थुमची!! पर जाऊ द्या आम्ही हाओ थुमच्या संग काई काई चुका मेंटल स्वास्थ्य जप्याले बर्या रायतेत नाई तर मानुस केळकर कड़े भर्ती करा लागते!! आपुन चुका करू राहलो त्याच ठीक हाय!
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Wed, 02/03/2016 - 15:09 नवीन
आपन प्रतिसाद टाकाव गुर्जि च्या धाग्यावर आन खरडवहित वेगळाच आयडी स्पष्टिकरन देते.
स
संदीप डांगे Wed, 02/03/2016 - 15:12 नवीन
कोनाले सांगजा नका होबासराव, तुमी आपले हा म्हुन सांगतो, थे लेकायची ग्याण्ग आहे पुरी.
↩ प्रतिसाद: होबासराव
श
श्रीगुरुजी Wed, 02/03/2016 - 15:50 नवीन
आताच तुमची खरडवही पाहिली. "प्रदीप" नामक ७ वर्षे २ महिने वय असलेल्या खूप जुन्या सदस्याने तुमच्या खरडवहीत खरड लिहिली आहे. हे प्रदीप कोण आहेत याची मला सुतराम कल्पना नाही. माझा त्यांच्याशी यापूर्वी संवाद झाल्याचे स्मरत नाही. मिपावर माझा श्रीगुरूजी हा एकमेव आयडी असून माझा आयडी सुमारे ३ वर्षे १ महिना जुना आहे या आयडीव्यतिरिक्त माझा कोणताही दुसरा आयडी नाही.
↩ प्रतिसाद: होबासराव
प
प्रदीप Fri, 02/12/2016 - 04:11 नवीन
मग? मी तुम्हाला खरडीतून का लिहीले ह्याचे स्पष्टीकरण तिथेच, तुम्ही विचारल्यावरून लिहीले आहे. जे लिहीले ते खरडीतून लिहीले, व्यनितून नव्हे, ज्यायोगे ते सर्वांना दिसावे. insinuation: an unpleasant hint or suggestion of something bad. "भारतात त्यामानाने किमति कमि नाहि झाल्यात आणि २०१५ H2 मध्ये ह्या पॉलिसि मुळेच अंबानि आणि कंपनिने कसा दुपटिने नफा कमवलाय". ह्या तुमच्या विधानास मी insinuation म्हटले आहे. ह्यात कुठलीही धमकी वगैरे नाही. ते माझे मत आहे. त्याबद्दल थयथयाट कशाला? मी दिलेल्या दुव्यांविषयी तुम्ही काहीच म्हणत नाही. तसेच इथे आता तुमच्याबरोबर टाळ्या- हंशा करणारे कुणीही. धाग्यात थोडीफार मौजमजा असावी हे ठीक. पण इथे निव्वळ तेच चालले आहे! कुणाला 'एक गँग' आहे असा भासही होतोय! चालू दे.
↩ प्रतिसाद: होबासराव
म
मोगा Wed, 02/03/2016 - 17:54 नवीन
संघ मोड ऑन गुर्जींची उत्तरे मान्य नसलेल्यानी पाकिस्तानात जावे. ......
म
मोगा Wed, 02/03/2016 - 17:59 नवीन
इयम आकाशवाणी .. गुर्जीविरोधका: मोदीविरोधकाश्च पाकिस्ताने गच्छतु /
↩ प्रतिसाद: मोगा
अ
अर्धवटराव Wed, 02/03/2016 - 20:04 नवीन
मोदी मंडळी कितीही प्रयत्न करतील तरी किती उंची गाठणार... आमचे बारामतीचे साहेबच पंतप्रधान व्हायला हवे.
S
sagarpdy गुरुवार, 02/04/2016 - 06:22 नवीन
हि फिरंगी बया आली नसती तर झाले पण असते (साहेब __/\__)
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/04/2016 - 06:33 नवीन
काँग्रेसच्या गांधी घराण्याची हुजरेगिरी करण्याच्या नालायकीने देशाने एक सर्वोत्तम पंप्र उमेदवार घालवला.
↩ प्रतिसाद: sagarpdy
म
मोगा गुरुवार, 02/04/2016 - 07:11 नवीन
दिल्लीला जाउन हुजरेगिरी नाही केली की नशिबात फक्त महाराष्ट्राचा सवतासुभाच येतो. पैल्या जाणत्या राजापासून दुसरा जाणता राजा काही शिकला नाही . जै म्हाराष्ट्र !
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/04/2016 - 08:20 नवीन
जै हिंद
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Fri, 02/05/2016 - 15:40 नवीन
औरंग्याच्या विदेशीपणाचा मुद्दा करुन महाराजानी नवीन हिंदवी स्वराज्य पक्ष काढला होता. साहेबानी सोनियाबाईंच्या विदेशीपणाचा मुद्दा करुन रा. वा. काढला. पण कालांतराने त्याच दिल्लीच्या मदतीला अनुक्रमे पेश्वे व साहेब धावले.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
मोगा Fri, 02/05/2016 - 15:41 नवीन
दिल्लीच्या कुतुबमिनारापुढं कळसुबैचं आजही काही चालत नै .
↩ प्रतिसाद: मोगा
अ
अर्धवटराव Sat, 02/06/2016 - 01:46 नवीन
पण कालांतराने त्याच दिल्लीच्या मदतीला अनुक्रमे पेश्वे व साहेब धावले.
सो व्हॉट ??
↩ प्रतिसाद: मोगा
S
sagarpdy Sat, 02/06/2016 - 18:13 नवीन
पेशवे मदतीला धावले कारण दिल्ली ला उत्तरेच्या जनमानसात असलेला आदर. नंतर तर बादशाह नाममात्र करून टाकला. टोपीकर नसते आले तर कदाचित आजवर तख्तावर पण बसले असते. आमच्या साहेबांवर पण आमचा असाच विश्वास आहे. लवकरच घराणेबदल होणार ! साहेब तख्तावर बसणार !
↩ प्रतिसाद: मोगा
श
श्रीगुरुजी Sat, 02/06/2016 - 18:46 नवीन
ROFL काका सध्या बेकार आहेत. त्यांना दिल्लीत, राज्यात किंवा गल्लीत सुद्धा कोठेच काहीही काम नाही व कोणीही हिंग लावून सुद्धा विचारत नाहीत. त्यामुळे ते स्वतःच बोलविलेली इतिहास परीषद, साहित्य संमेलन अशा ठिकाणी हजेरी लावून प्रकाशात राहण्याची धडपड करीत असतात. तिथे जाऊन सुद्धा "इतिहासाचे विद्रूपीकरण होत आहे", "भारताला हिंदूराष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत" अशा काड्या घालत असतात. साहित्य संमेलनात सुद्धा साहित्याशी दुरूनही संबंध नसताना उद्घाटन केलेच व स्वतःच्या मुलाखतीचा कार्यक्रम पण ठेवला. तुमचे भाषण साहित्य परीषदेने छापले नाही अशी सबनिसांकडे काडी लावून देऊन मजा देखील बघितली.
↩ प्रतिसाद: sagarpdy
स
संदीप डांगे Sat, 02/06/2016 - 18:58 नवीन
ROFL तुमचे भाषण साहित्य परीषदेने छापले नाही अशी सबनिसांकडे काडी लावून देऊन मजा देखील बघितली. पुरावा....?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 02/10/2016 - 13:20 नवीन
"साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हाती सुपूर्द केली. पवार यांनी या भाषणाच्या पुस्तिकेचे अखेरचे पृष्ठ पाहिले. हे भाषण साहित्य महामंडळाने प्रकाशित केले नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले. यासंदर्भात विचारणा केली असता अध्यक्षीय भाषण न छापल्याबद्दल मी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो, असे सबनीस यांनी पवार यांना सांगितले, अशी माहिती महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिली. " http://www.loksatta.com/pune-news/sahitya-mahamandal-ignored-sabniss-speech-1191639/
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 02/10/2016 - 13:27 नवीन
ह्यावरुन "पवारांनी काडी लावून मजा बघितली" असे सिद्ध कसे होते? की, 'एखादी गोष्ट खटकल्यावर विचारणा करणे म्हणजे काडी लावणे' हा अर्थ आहे?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 02/10/2016 - 18:29 नवीन
पवारांशी बोलणे झाल्यानंतरच सबनिसांनी "माझे १५० पानांचे पूर्ण भाषण साहित्य महामंडळाने छापावे व मी स्वतःच्या खर्चाने छापलेल्या २००० प्रतींचा खर्च द्यावा. नाहीतर मी पत्नीसह मसापसमोर उपोषण करीन" अशी धमकी दिली होती. हीच तर ती काडी आणि मजा.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 02/10/2016 - 19:32 नवीन
'श्रीगुरुजींचे मत हाच पुरावा' असे आहे तर. पुन्हा एकदा सिद्ध झाले. वरचा प्रतिसाद त्याचा पुरावा आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Wed, 02/10/2016 - 10:07 नवीन
मला तर बॉ मागचा व्हॅलेंटाईन डे आठवला. जेटली सारखे नेते सुद्धा काकांची स्तुती करतात. बाकीच्यांनी पण केली आहे. त्याचे दुवे पण मिळतील. त्यामुळे हिंगाची फोडणी जमली नाही.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 02/10/2016 - 13:13 नवीन
काकांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त (चुकलो. तिसरी पंचविशी संपवून चौथ्या पंचविशीत प्रवेश केल्याबद्दल) त्यांचा दिल्लीत जंगी सत्कार केला गेला. त्या सत्कारसमारंभात यच्चयावत सर्व पक्षांचे नेते हजर होते. अगदी मोदींपासून, सोनिया गांधींपासून सर्व डाव्या, उजव्या, पुरोगामी, प्रतिगामी, धर्मांध, निधर्मांध, समाजवादी, साम्यवादी, भांडवलशाही अशा सर्व पक्षांच्या नेत्यांनी काकांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. हे आठवत असेलच.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 02/10/2016 - 14:04 नवीन
तुमच्या विधानांमधली विसंगती तुमच्या लक्षात येते आहे का ? एका बाजूने काकांना कोणी हिंग लावून विचारत नाही म्हणायच आणि त्यांच्या ७५ ला सर्व पक्षाचे नेत्यांनी हजर राहून स्तुती केली म्हणायच ! कस ओ जमवता? बाकी जेटली , मोदी यांनी केलेली स्तुती पंचाहत्तरीच्या पूर्वीची आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 02/10/2016 - 18:43 नवीन
अहो, ते नुसते सत्कारसमारंभाला जमतात व पवारांवर स्तुतीसुमने उधळतात. याव्यतिरिक्त इतर पक्ष त्यांना व त्यांच्या पक्षाला फारशी किंमत देत नाहीत. पवार १९९८-९९ या काळात लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. पण जेव्हा एप्रिल १९९९ मध्ये वाजपेयी सरकार १ मताने पडले तेव्हा राष्ट्रपतींनी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले. तेव्हा खरे तर पवारांच्या नेतृत्वाखाली सरकार बनविणे योग्य ठरले असते कारण पवार लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. पण काँग्रेसजनांनी पवारांकडे ढुंकुन न बघता सोनिया गांधींनाच नेता म्हणून निवडले व संभाव्य मंत्रीमंडळाच्या यादीत पवारांना १९९१ प्रमाणे संरक्षणमंत्रीपदच ठरविले होते. त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता ते पंतप्रधान असायला हवे होते. किमान गृहमंत्री तरी. पण पवारांच्या वाट्याला महत्त्वाचे मंत्रीपद येणार नव्हते. मुळात पवारांपेक्षा इतर प्रादेशिक पक्ष व त्यांचे नेते कितीतरी जास्त बलवान आहेत. मुलायम, जयललिता, करूणानिधी, नितीश, लालू, नवीन पटनाईक, मायावती, ममता इ. नेत्यांनी आपापल्या राज्यात स्वबळावर बहुमत मिळवून दाखविले आहे. जयललिता, ममता इ. पक्षांचे लोकसभेत ३०+ खासदार आहेत. पवारांना महाराष्ट्रात कधीही स्वबळावर सत्ता आणता आली नाही. त्यांच्या पक्षाला जास्तीतजास्त २८८ पैकी ७१ जागा २००४ मध्ये मिळाल्या होत्या. त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या कधीही दोन अंकी नव्हती. अशा व्यक्तीला देशाच्या राजकारणात फारच किरकोळ महत्त्व आहे. काँग्रेसप्रमाणेच इतर कोणताही पक्ष सत्तावाटपाच्या किंवा निवडणुकांच्या दृष्टीने पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला फारसे महत्त्व देत नाही. बाकी जेटली, मोदी इ. ची स्तुती म्हणाल तर ते बारामतीला म्हणजे पवारांच्या गावात गेले होते व एखाद्याच्या घरी गेल्यावर त्याच्या उपस्थितीत आपण त्या व्यक्तिविषयी ४ शब्द बरे बोलतो, तितकाच जेटली व मोदींनी बारामतीत पवारांच्या उपस्थितीत पवारांच्या केलेल्या स्तुतीला अर्थ आहे. त्यापेक्षा त्यात काहीही जास्त नाही.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Fri, 02/12/2016 - 08:36 नवीन
हा तुमचा वैयक्तीक दृष्टीकोन आहे. माझ्या मते शरद पवार हे पॉवरफुल राजकारणी आहेत.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अर्धवटराव Fri, 02/12/2016 - 19:36 नवीन
तसं बघितलं तर अडवाणी साहेब सुद्धा अडगळीत पडले आहेत. पण म्हणुन त्यांचं एक राजकारणी म्हणुन असलेलं मुल्य कमि होत नाहि ( मोदि ते वापरायला तयार नाहित हा भाग वेगळा ).
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मोगा Fri, 02/05/2016 - 11:09 नवीन
BHEL, ONGC, IOC, HPCL, यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांची मोठ्या प्रमाणात निर्गुंतवणूक करण्याचा रोडमॅप सरकारने तयार केला आहे. भरपूर फायद्यात असणाऱ्या सरकारी कंपन्या पब्लिक सेलच्या माध्यमातून भांडवली बाजारात लिस्ट करण्याचा सरकारचा विचार आहे
ह
होबासराव Fri, 02/05/2016 - 11:16 नवीन
BHEL, ONGC, IOC, HPCL, यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांची मोठ्या प्रमाणात निर्गुंतवणूक करण्याचा रोडमॅप सरकारने तयार केला आहे. भरपूर फायद्यात असणाऱ्या सरकारी कंपन्या पब्लिक सेलच्या माध्यमातून भांडवली बाजारात लिस्ट करण्याचा सरकारचा विचार आहे देशपांडे मामा ह्याचा विचार भारत सरकार गेलि कित्येक वर्ष करतेय, it is a part and parcel of ओपन ईकॉनोमि जि आपण १९९१ ला खुलि केलिय. नरसिंहराव :- आज ज्यांच्यामुळे माझ्यासारखे कित्येक लाख लोक MNC मध्ये जॉब करतायत.
म
मोगा Fri, 02/05/2016 - 15:29 नवीन
काय कळलं नै बुवा ! शेअर मार्केटात शेअरचे लिस्टिंग होणे याचा अर्थ सरकार त्यांच्या हिश्श्यातले काही शेअर्स इतराना विकणार व ते शेअर शेअर बाजारात येणार. यात सरकारला फायदा होइल. कारण सरकारला शेअर फेस व्याल्युने दिलेला असतो. पण विकताना तो बाजारभावाने विकुन सरकार पैसे कमवील. नेहरुनी त्या काळात २ रुला घेतलेले सागवानी टेबल मोदीनी आजच्या बाजारभावाने विकुन पन्नास हजार मिळवणे , असा प्रकार आहे हा !
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Fri, 02/05/2016 - 11:24 नवीन
तुमच्या ह्या वाक्यातच त्याचे उत्तर आहे, जेव्हा आपण एक Welfare State किंवा समाजवादाने भारताचे राज्य शकट हाकत होतो त्यावेळेस "भरपूर फायद्यात असणाऱ्या सरकारी कंपन्या " हे वाक्य कधिच खरे ठरले नसते.
द
दिवाकर देशमुख Fri, 02/05/2016 - 13:51 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/how-business-partners-of-gujarat-cm-anandibens-daughter-anar-patel-landed-a-good-deal/articleshow/50866626.cms मोदी गुजरातमधून गेल्यानंतर एक एक प्रताप बाहेर पडू लागले आहे. ही जमीन खुद्द मोदी मुख्यमंत्री असताना दिली आहे. ते ही "जनकल्याण" म्हणून रिसोर्ट बांधण्याकरीता दिली आहे. रिसोर्ट सुध्दा झाले नाही. त्यांचा जावई तर यांची लेक. आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे. निवडणुकित "जावईवर पुस्तक" भाजपाने काढले होते मग यांच्यावर १२वर्षमधल्या प्रतापांवर विरोधकांना कादंबरी लिहावी लागणार असे दिसत आहे भक्तांनी अवश्य अज्ञान प्रकट करावे. जय राधामाधव
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2016 - 16:42 नवीन
समीर भुजबळपाठोपाठ आता अशोक चव्हाणांचा क्रमांक आला आहे. काँग्रेसने इतके दिवस अशोक चव्हाणांना संरक्षण दिले होते. परंतु आता त्यांना राज्यपालांच्या पडद्याआड लपता येणार नाही.
अ
अर्धवटराव Sat, 02/06/2016 - 01:48 नवीन
तेच ठरवणार कोण कुठे कसा 'जाणार' ते.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Sat, 02/06/2016 - 05:41 नवीन
हा हा हा. आक्षी बरूबर पकडलायसा... गुर्जींना वाटतंय माझ्यामुळं हर्भरा टरारून वर. इथे साहेब हलवतायत सगळ्या प्यादांना. कठपुतली केलंय सरकारला. असं असतं तर भुजबळ सोडून तटकरे, ट्ग्याभाऊ आधी आत जायला हवे. शासनातल्या थेट भ्रष्टाचार्‍यांवर कार्यवाही न करता अप्रत्यक्ष भ्रष्टाचारावर कार्यवाही करुन भाजपा पाठ थोपटून घेतेय. भक्त भी खुश, पुतण्याभी खुश, भुजबळको मिली सपने देखने की सजा, एका दगडात किती पक्षी माराल काका? व्वा! शब्बास पट्ठे. लगे रहो.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
श
श्रीगुरुजी Sat, 02/06/2016 - 10:26 नवीन
म्हणजे भुजबळांवरील कारवाईप्रमाणे राष्ट्रवादीचे रमेश कदम, कोल्हापूरची तृप्ती माळवे इ. आणि अशोक चव्हाण, सोनिया गांधी, राहुल गांधी, हिमाचल प्रदेशचे वीरभद्रसिंग अशा दुसर्‍या पक्षांमधील नेत्यांमागील कारवाईमागे साहेबच आहेत की काय? तसं असेल तर इतका पॉवरफुल माणूस केव्हाच पंतप्रधान व्हायला हवा होता. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या पलिकडे त्यांचे अस्तित्व दिसत नाही.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
  • «
  • ‹
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा