Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पॉर्नची गरज आहे का?

स
सुबोध खरे
Mon, 01/25/2016 - 09:55
🗣 292 प्रतिसाद
पॉर्नची गरज आहे का? या धाग्याचे मुळ अर्थात अदिती ताइंच्या धाग्यात आहे. पॉर्न म्हणजे अश्लील साहित्य असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. यात साहित्य म्हणजेच पुस्तके, चित्रे , चित्रफिती आणी चित्रपट असे सर्व साहित्य अध्याहृत आहे. संस्कृती रक्षक लोकांच्या दृष्टीने "हा" अब्रम्हण्यम असा शब्द आहे. याची गरजच काय पासून यावर संपूर्ण बंदी असावी असे मानणारे लोक आहेत आणी पॉर्न हे सर्व वय, भाषा आणी धर्मियांना सदा सर्वकाळ खुले आणी फुकट असावे असे मानणारा गट हि आहे. काहींच्या मते हे अब्रम्हण्यम नसले तरीही निरर्थक आहे आणी याची गरज नाही. सत्य कदाचित या सर्वांच्या मध्ये आहे. बासनात गुंडाळून माळ्यावर ठेवण्याच्या विषयाचा वैद्यकीय दृष्टीने आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. अश्लील साहित्याची गरज पडते(च) का? आणि पडत असल्यास का पडते? पहिली गोष्ट म्हणजे सेक्स हा विषय मध्य युगापासून गुपचूप अंधारात करण्याचा (किंवा उरकण्याचा) झाला आहे. यामुळे पौगंडावस्थेत आपल्या लैंगिकतेचा खरा शोध तरुण किंवा तरुणींना कसा आणि कुठे घ्यायचा हे समजेनासे होते. याची सुरुवात चावट विनोदातून होते. त्यातून बायकांची परिस्थिती "कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली" अशी असते. करावेसे/ पाहावेसे/ ऐकावेसे तर वाटते पण चार चौघात बोलायला लाज वाटते आणि ते पाहताना पकडले गेलो तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील अशी भीती. थोड्या फार प्रमाणात हीच स्थिती पुरुषांची असते. अश्लील साहित्य म्हणजे काय? हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे. म्हणजे जी गोष्ट आज बोलली जाऊ शकते तीच एके काळी अशक्य होती. म्हणजे एके काळी एखाद्या मुलीचा हात सुद्धा हातात घेणे "अब्रम्हण्यम' आणि अश्लील होते. त्यानंतर जोडप्याने मिठी मारणे किंवा चुंबन घेणे हे अब्रम्हण्यम होते. तेंव्हा कमी कपडे घालणे हे फक्त खलनायिका किंवा नायकीण करत असे. आता सिनेमात नायिका जे तोकडे कपडे घालतात ते काही काळापूर्वी सिनेमात वेश्यासुद्धा घालणे अशक्य होते. थोडक्यात काल जे अश्लील होते ते आज राजरोस/ समाजमान्य असू शकते. मग या अश्लील साहित्याची गरज आताच जास्त का वाटते किंवा आताच जास्त का दिसू शकते? (हा संदर्भ मुख्यत्वेकरून भारताबद्दल आहे.) काही दशकांपूर्वी मुलगे आणि मुलींची वयात होण्यापूर्वीच आणि स्त्रीपुरुष संबंध काय हे समजण्यापूर्वीच लग्ने होत. त्यामुळे या "विषया"विषयी नाविन्य राहत नसे. शिवाय तेवढे साहित्य सहजपणे उपलब्ध नव्हते आणि असले तरी ते समाजमान्य नव्हते. समाजात दांभिकपणा पण बराच होता.आज नाही असे म्हणवत नाही. अश्लील साहित्य सहज उपलब्ध नव्हते पण बहु भार्या अंगवस्त्र, देवदासी सारख्या प्रथा असल्याने श्रीमंत लोकांना हे सर्व उपलब्ध होते. मात्र स्त्रियांची कुचंबणाच होती. आता बदलत्या काळानुसार लग्ने उशिरा होत आहेत. मुलगे कमवायला लागेपर्यंत आणि मुली वयात येउन काही वर्षे जाईपर्यंत लग्न होत नाही. परंतु आजही विवाहपूर्व संबंध हे भारतीय समाजाला अमान्य आहेत. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण तर जबरदस्त असते. या लैंगिकतेला वाट देण्याचे काम अश्लील साहित्य करते.पण एक तर हि गोष्ट चोरून करावी लागते किंवा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागते. या साहित्याचा अविवाहित स्त्री किंवा पुरुषांना आपल्या भावना मोकळ्या करण्याच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो. पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत असे ठाकूर साहेब त्या धाग्यात म्हणतात पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते. दोघांच्या तारा जुळून येण्यास फार कष्ट लागतात. लग्न झाल्यावर चार गुलाबी दिवस संपले कि व्यवहार सुरु होतो. अर्धवट रावांना आवडाबाईचे आणि आवडाबाईना रावांचे "गुण" दिसायला लागतात. मग घरातील कामातून वेळ काढून प्रणय फुलवायचा तर दोघांच्या तर एकत्र जुळल्या पाहिजेत. अभियांत्रिकी भाषेत सांगायचे झाले तर पुरुष पेट्रोल इंजिन सारखे असतात चावी दिली कि चालू. तर स्त्रिया म्हणजे टर्बो चार्जड डीझेल इंजीनासारख्या असतात. पहिल्यांदा ग्लो प्लग लावून इंजिन गरम करायला लागते आणि मग इंजिन सुरु झाले तरीही टर्बो चार्जर १८०० आर पी एम येईपर्यंत चालू होत नाही. पण एकदा टर्बो चार्जर चालू झाला कि मग इंजिन पूर्ण ताकदीने वेग घेते.म्हणजेच स्त्रियांचा आणि पुरुषांचा उद्दीपित होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. वंध्यत्व या विषयात काम करीत असल्याने बर्याच वेळेस या प्रश्नाशी संबंध येतच असतो. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते. तेंव्हा रुग्ण पुरुष बर्याच वेळेस अशी तक्रार करताना आढळतात कि डॉक्टर मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत नाही.( लिंग उत्थान होत नाही ERECTILE DYSFUNCTION--ED). काही लोकांनी हे पण सांगितले कि "सर बायकोच्या जवळ गेलो तर ती थंड गोळ्यासारखी पडलेली असते. तिच्या घामट गार अंगाला हात पण लावावासा वाटत नाही". हे जरी आपल्याला विचित्र वाटत असेल तरीही जर तो माणूस तुम्हाला त्याच्या भावना सांगत असेल तर ते सत्य मानायलाच लागते.अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात. नवरा बायको मध्ये बर्यापैकी समन्वय असेल तरीही विशाल किंवा विराट महिला असेल तर पुरुषाला आकर्षण कमी होते हि वस्तुस्थिती आहे. बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर). बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे. अशी जर स्त्री एखाद्याला बायको मिळाली( दुर्दैवाने याचे प्रमाण खूप जास्त आहे)तर त्या माणसाने कुठे जायचे? स्त्री थंड पडून असेल तर पुरुष तणावाखाली असतो आणि मग त्यातून शीघ्र पतन( premature ejaculation) होते. अशा स्त्रिया नंतर तक्रार करताना आढळतात कि यांना माझ्यात रसच नाही.किंवा अशा बायका नवर्याला टोचून बोलताना दिसतात कि तुम्ही मर्दच नाही. अशा माणसांनी काय करायचे? बायकोच्या जवळ गेले तर थंड गोळ्याशी शृंगार करणे कठीण. शिवाय मानसिक तणावामुळे शीघ्रपतन होईल हि भीती. अशा दुहेरी तणावात असलेला माणूस जेंव्हा पॉर्न पाहतो तेंव्हा त्याला आपल्याला (ERECTILE DYSFUNCTION--ED) नाही हे तर कळून येते. अर्थात याला PARTNER SPECIFIC ERECTILE DYSFUNCTION म्हणतात. बर्याच वेळेस बरेच दिवस संबंध न ठेवण्याने नवरा बायकोतील संबंध ताणले जातात. त्यात बायको संशयी असली तर तिला सारखे वाटत असते कि पुरुष असून संबंध ठेवायला नाकारतो म्हणजे दुसरीकडे कुठे तरी जाऊन "हलका" होऊन येत असेल. असे होऊ नये म्हणून मग माणसे पॉर्न बघून उत्तेजित होऊन येतात. त्यामुळे संबंध ठेवणे सोपे जाते. उलट एखाद्याची बायको जास्त सुंदर असेल किंवा वय झाले तरी आपला "फॉर्म" टिकवून असेल तर नवर्याला स्वतःला कठीण जात असेल तरी बायको "हातातून जाऊ नये "म्हणून तिला "सुखात" ठेवणे आवश्यक असते. नवरा आणी बायको यांच्या वयात फार जास्त अंतर असेल किंवा नवर्याला मधुमेह असेल तर त्यामुळेहि ERECTILE DYSFUNCTION होते अशा वेळेस पॉर्न पाहून उत्तेजित होता येते. एक उदाहरण म्हणून-- मी मुंबईत मोठ्या रुग्णालयात पुरुष वंध्यत्व वर काम करीत असताना झैरे या आफ्रिकी देशातील एका टोळीचा ६० वर्षाचा प्रमुख ERECTILE DYSFUNCTION च्या इलाजासाठी आला होता. मी त्याला विचारले कि आता ६० वयाला तुम्हाला काय हवे आहे त्यावर त्याचे म्हणणे होते कि माझी चौथी बायको १८ वर्षांची आहे मी जर तिला "सुखात" ठेवू शकलो नाही तर ती मला सोडून जाईल. हे अर्थात टोकाचे उदाहरण आहे. परंतु फार मोठ्या प्रमाणावर पुरुष लिंग उत्थान होत नाही हि तक्रार घेऊन येतात.यात हे कारण मानसिक आहे कि शारीरिक आहे हे जाणण्यासाठी त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो कि अश्लील साहित्य पाहिल्यावर लिंग उत्थान होते का? हे जर होत असेल तर तो प्रश्न बहुतांशी मानसिक असतो. ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका" असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो. प्रत्यक्षात स्त्रिया कल्पना विलासात पुरुषांपेक्षा जास्त रमतात. त्यामुळे त्यांना पॉर्नची संबंध ठेवताना "आवश्यकता" भासत नाही. कारण एक तर प्रत्यक्ष संबंधात त्यांचा सहभाग हा सक्रीय नव्हे तर निष्क्रिय असला तरी चालू शकतो. शिवाय पूर्वग्रह आणी गैर समजुतींमुळे पॉर्न हे स्त्रीने पहायचेच नाही अशा पगड्याखाली असत्तात. परंतु प्रत्यक्ष शृंगार करताना डोळे मिटून आपण ह्रितिक रोषन किंवा जॉन अब्राहम बरोबर शृंगार करीत आहोत या कल्पना विलासात रमू शकतात. पण त्यांना विचारले तर ९० % स्त्रिया GUILT ( दोषित्व)मुळे आम्ही कल्पना विलासात रमतो हे अमान्य करतील. १००% पुरुष पॉर्न बघतात आणी बहुसंख्य( कदाचित १००%)कल्पनाविलासात( FANTASY) रमतात तर बहुसंख्य( कदाचित १००% स्त्रिया कल्पनाविलासात रमतात हि वस्तुस्थिती आहे. परंतु पॉर्नचे DECRIMINALISATION करणे आवश्यक आहे असे मात्र जरूर वाटते. हा विषय फार गहन आहे आणी बरेच मुद्दे यात राहून गेले असतील. पण जशी चर्चा पुढे जाईल तेंव्हा आठवेल तसे मी त्यात भर घालेन.

प्रतिक्रिया द्या
119048 वाचन

💬 प्रतिसाद (292)
प
पिलीयन रायडर Mon, 01/25/2016 - 10:11 नवीन
पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते.
हेच अगदी महत्वाचे आहे. कुण्या एका माणसाच्या कवी कल्पना वाचण्यापेक्षा तुमचे ह्या क्ष्रेत्रात काम करताना आलेले अनुभव जास्त महत्वाचा विदा आहे. लेख आवडला. जमिनीवर काय घडते ह्याची जाणीव ठेवुन लिहीलेला असल्याने भावला.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/28/2016 - 03:47 नवीन
@जमिनीवर काय घडते ह्याची जाणीव ठेवुन लिहीलेला असल्याने भावला >> +++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पैसा Mon, 01/25/2016 - 10:13 नवीन
उत्तम माहितीपूर्ण लेख
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 01/25/2016 - 10:14 नवीन
डॉक्टर साहेब, प्रथमतः वैज्ञानिक दृष्ट्या विषयाला तोंड फोडल्याबद्दल आभार. माझा एक प्रश्न आहे, बरेच आधी एक लेख वाचला होता तो पॉर्न विरोधी होता अर्थातच, त्यात दिले होते की सतत पॉर्न पाहिल्याने अल्टरनेटिव न्यूरल पाथ तयार होतात अन त्यायोगे नॉर्मल सेक्सुअल अरौसलला गरजेचे असणारे न्यूरल पाथ बायपास होऊन पुरुष नैसर्गिक कामक्रियेप्रती 'निरुत्साही' होऊन फ़क्त पॉर्न पाहूनच उत्तेजित होतो असे काहीसे. हे तथ्य वैज्ञानिक आहे का? ह्या बाबतीत काही उद्बोधन केल्यास आभारी राहीन मी आपला
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 01/25/2016 - 15:54 नवीन
तरीही या दाव्यात बरेचसे तथ्य असावे असे मला वाटते. कारण मध्यंतरी मी डेंटीस्टकडे गेलो असताना तिथे बाहेर पडलेली मासिके चाळत होतो त्यातल्या एकात प्लेबॉय या मासिकाचा जनक आणि मालक ह्यूज हेफ्नरबद्दल लेख होता. जगातली अतिसुंदर आणि कमनीय मॉडेल्स ज्याच्याबरोबर काम करतात असा ह्यूज, याने अनेक लग्ने केली आणि त्याव्यतिरिक्त अनेक स्त्रिया उपभोगल्या. त्यातल्या एकीची मुलाखत त्या लेखात होती तिने म्हटले होते "जगातली अतिशय कमनीय मॉडेल्स, ज्यांची केवळ चित्रे बघून आणि चित्रफिती बघून लोक समाधान मानतात अशा ४-५ अर्धनग्न, पूर्णनग्न स्त्रिया एकावेळी सोबत असतानाही ह्यूजला पुरेशी उत्तेजना येत नसे, त्याचे समाधान होत नसे. शेवटी आम्हा सौंदर्यवतींच्या गराड्यात बसून तो पोर्न मूवी लावत असे किंवा आम्हाला लेस्बिअन अ‍ॅक्ट करायला लावी आणि मग हस्तमैथुन करुनच त्याचे समाधान होई!!" त्यावर पुढे एका डॉक्टराने त्याचे मत मांडले होते की "सातत्याने पॉर्न बघून असे होते, मेंदूत कायमस्वरुपी बदल होतात आणि नॉर्मल सेक्सुअल अरौजलला अडथळे येतात". यालाच व्यसन म्हणत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सुबोध खरे Mon, 01/25/2016 - 19:05 नवीन
अल्टरनेटिव न्यूरल पाथ तयार होतात अन त्यायोगे नॉर्मल सेक्सुअल अरौसलला गरजेचे असणारे न्यूरल पाथ बायपास होऊन पुरुष नैसर्गिक कामक्रियेप्रती 'निरुत्साही' होऊन फ़क्त पॉर्न पाहूनच उत्तेजित होतो बापूसाहेब या बद्दल मी वाचलेले नाही तेंव्हा त्याचा अभ्यास करूनच मी उत्तर देऊ शकेन. सध्या तरी क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
स्वाती२ Mon, 01/25/2016 - 20:40 नवीन
माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार. पोर्न अ‍ॅडिक्शनबाबत, ब्रेनच्या रिवार्ड सर्किटरीवर परीणाम होवून अ‍ॅडिक्शन होते असे एका लेखात वाचले होते. दारुचे व्यसन जसे काहीच जणांना लागते तसेच याबाबतही असणार ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
वेल्लाभट Mon, 01/25/2016 - 10:21 नवीन
उघडपणे चर्चिल्या न जाणा-या विषयावर वास्तवदर्शी व माहितीपूर्ण भाष्य केलंत. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे हा विषय गहन आहे. पण जितकी लपवली जाणारी याची कारणं आहेत, तितकेच उघड परिणाम.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 01/25/2016 - 10:28 नवीन
लेखाचे "सोवळे" शीर्षक वाचून हा लेख खोडून काढलाच पाहिजे, असा विचार मनात आला होता. पण वाचत गेलो, तेव्हा लेख फारच भावला. या विषयावर निकोप आणि निर्मळ चर्चेस सुरुवात करून दिल्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 01/25/2016 - 10:41 नवीन
या विषयावर निकोप आणि निर्मळ चर्चेस सुरुवात करून दिल्याबद्दल अभिनंदन.
थेट व्यव्सायाशी संबंधीत माहीती असल्याने "हवेत गोळीबार " नाही म्हणून जास्त भावले. काहींना समस्येच्या मुळाशी जाण्यापेक्षा धर्म-नैतीकता-सदाचार-संस्क्रुती यांचे गुर्‍हाळ लावावे वाटेल त्यांनी आवर्जून दूर राहिले पाहिजे अश्या थेट माहीतीपासून. डॉ. खर्‍यांचा खराखुरा वाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
प
पद्मावति Mon, 01/25/2016 - 10:32 नवीन
उत्तम लेख.
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 01/25/2016 - 10:38 नवीन
माझे दोन पैसे एक साधारण पॉर्न विरोधात मांडला जाणारा मुद्दा म्हणजे पॉर्नची गरज नाही खरा समागम त्या शिवाय शक्य आहे. एका मर्यादीत अर्थाने सत्य आहे. कारण एक उत्स्फुर्तता एक नैसर्गिक उत्स्फुर्तता प्रथेक स्त्री-पुरुषात जन्मजात निसर्गतः असतेच असते. एका विशिष्ट कोवळ्या वयापर्यंत एक उत्फुल उत्स्फुर्त वासना प्रत्येक जणात असते. तेव्हा त्या व्हर्जीन सुंदर काळात मुलगा वा मुलगी अगदी सहज परस्परांच्या स्पर्श तर फार दुर दर्शनाने किंवा साध्या चाहुलीने वा विचारांनी पण तीव्रतम उत्तेजनेचा अनुभव घेतात. त्यांच्या बाबतीत उत्तेजना गोड हुरहुर ओढ पॅशन हे अगदी नैसर्गिक असते. ते करावे/घडवावे लागत नाही सहज साध्य असते. खर म्हणजे किया नही जाता हो जाता है असे असते. तेव्हा त्यांचे ते तरुण शरीर व तरुण मन व्हर्जीन माइंड त्या नैसर्गिक उर्मींना तोलामोलाचा प्रतिसाद देत असते. अगदे स्वतःहुन काहीही न करावे लागता. या आता या फेजपर्यंत जो पर्यंत उत्स्फुर्तता व्हर्जीनीटी वा समागम अजुन ताजा आहे (म्हणजे शिळा न झालेला नव विवाहीतांचा ) तो पर्यंत पॉर्न इ. साधनांची साहजिकच आवश्यकता नसतेच काहीच नसते. म्हणुन इथपर्यंत ते ठीक आहे. या नैसर्गिक उत्स्फुर्तते ला पुढे माणुस का गमावुन बसतो कसा गमावतो हा एक वेगळा खरोखर चिंतन योग्य विषय आहे. पण या नंतर जेव्हा माणुस ती फेज पार करतो व जसजसा मोठा होतो. कोवळेपणा उत्स्फुर्तता अनुभवाचे नाविन्य हरवुन बसतो. थोडक्यात "सराईत" होतो. तेव्हा मात्र जी उत्तेजना उत्स्फुर्तता एकेकाळी सहज होती ती कठीण होऊन बसते. माणुस जसा जसा अनुभवी होतो त्याच्या जीवनाचे वेगवेगळे ताण तणाव जबाबदारी त्यावर मात करतात. रहाटगाडग रुटीन जेव्हा त्या माणसाला पुर्णपणे यांत्रिक बनवत. तेव्हा जीवनात जो एक यांत्रिकपणा रटाळपणा येतो. जी सहज संवेदनेची क्षमता कमी वा गायब होते. तेच ते तेच ते जेव्हा भयावह रीपीटेशन होत. तेव्हा त्याच्या लैंगिक आयुष्यातही कीतीही कोणीही पोहोचलेला असला तरी एक " यांत्रिकता" बोअरडम हमखास येतोच. आता हे कटु वास्तव आहे पटो वा न पटो.त्याला जो तो ज्याच्या त्याच्या वकुबा संस्कारानुसार मार्ग काढुन मात करण्याचा प्रयत्न करतो. या फेज मध्ये "पॉर्न" एक साधन म्हणुन एक निरुपद्रवी ( काही मर्यादेपर्यंत ) साधन होऊ शकते. हे वास्तव आहे. आता जो ज्या सिच्युएशन मध्ये आहे त्याने तसे केले तर त्यात वावग काही वाटु नये. मुळ प्रश्न आपण आपली सहजता उत्स्फुर्तता ( लैंगिकच नाही एकुण सर्वच) का व कशी हरवुन बसतो ती परत कशी मिळवावी हा माझ्यापुरता मला महत्वाचा वाटतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/25/2016 - 16:29 नवीन
काल त्या धाग्यात प्रतिसादात मी हेच म्हणत होतो की वयपरत्वे या गोष्टींची तीव्रता कमी होत जाते. विशिष्ट वयानंतर त्यात तर यांत्रिकता यायला लागते आणि मग चलो आज कुछ तूफानी करते है चा शोध सुरु होतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सुबोध खरे Mon, 01/25/2016 - 19:12 नवीन
सहमत आहे अतिपरिचयात अवज्ञा या नात्याने आपली सुंदर बायको सुद्धा साधारण वाटू लागते. यासाठी थोड्या थोड्या काळाने आपापल्या रुटीन मधून वेगळे काही तरी करावे. यातून काही जोडपी पॉर्न बघतात आणि त्यातील विविधता आपल्या नात्यात आणण्याचा प्रयत्न करतात. अर्थात काही काळाने त्याचा हि कंटाळा येतो. असेही बर्याच जोडप्यांकडून ऐकले आहे. बरेच लोक पर्यटन करतात याचे कारणही हेच आहे कि रोजच्या कटकटीतून मुक्तता मिळाली कि आपणहून संबंधाला एक वेगळा आयाम येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/25/2016 - 10:45 नवीन
रोजच्या जीवनाशी निगडित असलेल्या एका महत्वाच्या पण दुर्लक्षिलेल्या / निषिद्ध मानला गेलेल्या / उघडपणे चर्चा न केला जाणार्‍या विषयावरचा शस्त्रिय माहितीवर आधारलेला (वैयक्तिक कल्पनाविलासावर नाही) आणि म्हणूनच अत्यंत उपयोगी लेख ! हा धागा वेगळा टाकण्याचा उत्तम निर्णय घेतला आहे तुम्ही, डॉक्टरसाहेब. त्यामुळे इथे "वास्तवाचे व आधुनिक शास्त्राचे" भान राखून चर्चा होणे सुलभ होईल.
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 01/25/2016 - 11:09 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 01/25/2016 - 11:01 नवीन
उत्तम विषयाची तितकीच चांगली मांडणी केल्याबद्दल डॉ. चे आभार. आणि मारवाजींचा प्रतिसादपण मस्त. बरेचदा जोडप्यांमधे लग्न झाले म्हणुन मुले झाली आणि मुले झाली म्हणुन संसार झाला अशी परिस्थिती दिसुन येते.किंवा पहिले चांगले चाललेले असते पण बर्‍याच वर्षांच्या सहवासामुळे स्टिरिओटाईपनेस येउ शकतो. किंवा फिरतीच्या नोकरीमुळे/ दगदगीमुळे कामभावनांचे दमन करावे लागते( दोघांना).किंवा मग डॉ. नी म्हटल्याप्रमाणे मधुमेह वगैरे मेडिकल प्रॉब्लेम्स.... अशा वेळी पोर्न आधार होउ शकतो असे वाटते. अर्थात जाणकारांनी जे सांगितले त्यात माझे चार शब्द ईतकेच. शेवटी प्रत्येकाची समस्या आणि त्यावर शोधलेले उपाय वेगवेगळे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 01/25/2016 - 11:03 नवीन
दर्जेदार पॉर्न न बघितल्याने पॉर्न म्हणजे गलिच्छ काहीतरी असा एक मोठा गैरसमज न बघितलेल्यां मध्ये जास्त च असतो. प्रत्येक साहीत्यात कलाकृतीत जसे स्तर असतात तसेच पॉर्न मध्ये ही असतात. बहुसंख्य पॉर्न कचरा असले तरी काही अत्यंत दर्जेदार क्रिएटीव्ह आणि अत्यंत सुंदर उन्न्त करणारे असे असतात. यात साहित्य आणि व्हिज्युअल संदर्भात वरील विधान आहे. लास वेगास मध्ये काही अत्यंत दर्जेदार उत्कट असे सेक्स शो बघितलेले आहेत . जे बनवायला केवळ असामान्य दर्जाची प्रतिभाच हवी पॉर्न म्हणजे घाण काहीतरी कचरा काही तरी असे नाहीच
  • Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे Mon, 01/25/2016 - 12:07 नवीन
खास स्त्रीयांसाठी बनवलेल्या पोर्न क्लिप्स जास्त उत्कट असतात,ज्यात फोर् प्ले, ऑर्गॅझ्म वगैरे संकल्पना नीट हातळालेल्या असतात.त्याच बरोबर लेस्बियन पोर्नमधुनही पार्टनरला आनंद् कसा द्यावा हे लेस्बियन पॉर्न अक्ट्रेसकडून शिकता येते. मेनस्ट्रीम पोर्नमधील गुदमैथुन, मुखमैथुन प्रकार पाहून सेक्स म्हणजे फक्त वासना शमवण्याचा मार्ग असा गैरसमज होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 01/25/2016 - 12:17 नवीन
फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित मांडलेला विषय . पण काही अजून मुद्दे . इथे मुख्यत: विवाहित लोकांचा विषय चर्चिला आहे. तसेच यात सोशिओलोजिकल घटकांचा अंतर्भाव करावा का? मुंबई मध्ये भारतभरातून तरुण वर्ग नोकरी धंद्यासाठी येतो . त्यात अशिक्षित , अविवाहित किंवा ज्यांचे कुटुंब गावी आहे असे तरुण बरेच असतात . त्यांच्या नैसर्गिक लैंगिक भावना पोर्न बघितल्याने क्षमतात का? की दिवसभर कुठल्याही वेळी अत्यंत सहजपणे पोर्न उपलब्ध असल्याने अधिक उद्दीपित होऊन अपुऱ्या राहतात? विशेषत; low income group. त्यामुळे स्त्रियाना छेडछाड, बलात्कार वगैरे गोष्टीं वाढल्यात का? ( यात बलात्कार , छेडछाड फक्त असेच लोक करतात असे म्हणायचे मुळीच नाही .)
  • Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे Mon, 01/25/2016 - 13:16 नवीन
@प्राचि अश्विनी ,तुमचे निरीक्षण अगदी योग्य आहे ,बहुतांशी बलात्कारी हे झोपडपट्टीत राहणारे ,लो इन्कम ग्रुपमधलेच असतात.एक तर व्यसनी अस्तात ,त्यात लहानपणापासून वाईट संगतीत असतात.अशे लोक नैसर्गीकच पशुत्वाकडे झुकणारे असतात अधिक यांच्या बायकाही दिसायला अगदीच ओंगळवाण्या असतात,त्यामुळे सुंदर सालस स्त्रीशी रत होण्याचा एकच मार्ग यांना ठाऊक असतो ,तो म्हणजे छेडछाड किंवा बलात्कार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
स
संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 13:22 नवीन
काकासाहेब, बेछुट गोळीबार करण्याआधी विदा हाताशी ठेवा. एका विशिष्ट सामाजिक गटाबद्दल कसलाही विदा नसतांना बेछूट विधाने करत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
म
मारवा Mon, 01/25/2016 - 14:19 नवीन
एका भारतीय जज ची केस होती मागे त्याने दुसरया महीला जज ला पार्टीत आयटेम डान्स करण्यास फोर्स केला होता. एक नोबेल विजेता कार्यालयातील महीलेशी छेडछाडी करण्याच्या केस मध्ये आहे. एक सुपर कॉप महीला आय ए एस अधिकारीची छेड काढण्यात शिक्षा भोगलेला आहे. सर्व भारतीयच आहेत. यापैकी कोणीही झोपडपट्टीत राहत नव्हते कोणीही सुंदर स्त्रीयांशी अपरीचीत असंबधित राहीले अस नव्हत. तरीही त्यांनी असे सर्व प्रकार केलेत. विकृती विकृती आहे एकदम सरसकटीकरण करु नका असे नमुद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ह
होबासराव Mon, 01/25/2016 - 13:44 नवीन
आपला प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा..तुम्हि अस इतक ठामपणे कस म्हणु शकता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
क
काकासाहेब केंजळे Mon, 01/25/2016 - 14:18 नवीन
@संदीप डांगे,@ होबासराव, आपण मागच्या चार वर्षातले बलात्कार ,सामुहीक बलात्कार यातले आरोपी पाहीलेत तर एक जात सगळे झोपडपटटीत राहणारे आहेत.निर्भया प्रकरण, शक्तीमील गॅंगरेपमधले आरोपी आजुबाजुच्या झोपडपट्टीतलेच होते. स्त्रीयांनी बलात्काराच्या धोक्यापासून लांब राहयचे असल्यास शक्यतो झोपडपट्टीतील वर्ग व ब्लू कॉलर जॉब करणार्या पुरुषांबाबातीत विशेष खबरदारी घ्यावी या मताचा मी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
स
संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 14:27 नवीन
काकासाहेब, जरा विदा काढा. मग बोलू. चार बातम्यांमुळे आपण असा ग्रह करुन घेत असाल तर तो घातक आहे तसाच झोपडपट्टीतल्या वर्गाचा अपमान आहे. वर मारवा यांनी सांगितल्याप्रमाने विकृती विकृती असते तिचा कुठलाही वर्ग नसतो. सभ्य म्हणवल्या जाणार्‍या समाजात किती बलात्कार नोंदवले जातात ह्याचा विदा काढून बघा. दूध का दुध पानी का पानी होऊन जाईल. विशिष्ट वर्गाबद्दल जाणूनबुजून आकस ठेवणे योग्य नाही. त्यात तुम्ही तुमच्या प्रतिसादात लिहलंय ते बघता आपणांस ह्या सर्व समाजाबद्दल किती घृणा वाटते तेही दिसून येते. तुम्हाला ही घृणा आधीच वाटत असेल, बलात्कार हे फक्त निमित्त आहे त्या घृणेला बाहेर काढण्याचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
च
चैतन्य ईन्या Mon, 01/25/2016 - 14:28 नवीन
नारायण दत्ता तिवारी, तहेलकाचा तरुण तेजपाल ह्यांना विसरलात काय? मोठ्यांचे बाहेर येत नाहीत. इन्फोसिसचे फानिश मूर्ती? ते जावू द्यात. विन्ग्लंडच्या य्मपी लोकसचे कारनामे विसरलात काय? पोर्ण पाहून वर बिल पारलमेंटला दिले होते. प्रख्यात फुटबॉल प्येलर ह्यांचे कारनामे वाचाच. आपल्याकडे बाहेर येत नाही इतकेच आहे. नाहीतर जितके झोपडपट्टीतील लोक करतात तितकेच पांढरपेशे पण करतात. संधी मिळाल्यावर पांढरपेशे पण आपला रंग दाखवतात. फार कमी लोक आतून आणि बाहेरून संत असतात. तेंव्हा फक्त वृत्तपत्रातल्या बातम्यांवरून हे असे निष्कर्ष काढणे थोडे चुकीचे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
प
प्रदीप साळुंखे Mon, 01/25/2016 - 16:00 नवीन
सामुहीक बलात्कार यातले आरोपी पाहीलेत तर एक जात सगळे झोपडपटटीत राहणारे आहेत.निर्भया प्रकरण, शक्तीमील गॅंगरेपमधले आरोपी आजुबाजुच्या झोपडपट्टीतलेच होते.
विषयाशी संबंधित नाही, पूर्णपणे बरोबरही नाही, पण पूर्णपणे चुकीचे आहे असेही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/25/2016 - 15:40 नवीन
काकासाहेब तुमचा हा प्रतिसाद उपरोधिक असावा. इतरत्र तो शोभला असता तरी इथे तो तितकासा ठीक नाही असे वाटते. कारण त्याने इतकी चांगली चाललेली चर्चा भरकटण्याचाच जास्त संभव आहे. असो. जर हा प्रतिसाद उपरोधिक नसेल तर मात्र, नक्कीच तुमचा गैरसमज झाला आहे. गंभीर विषयासंबंधी अशी एकांगी विधाने करण्याने त्या विधानांचे व विधान करणार्‍याचे वजन कमी होते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
स
संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 15:42 नवीन
सहमत. संपादकांना विनंती की जमल्यास ही अवांतर चर्चा पूर्णपणे काढून टाकावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ज
जव्हेरगंज Mon, 01/25/2016 - 17:23 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्राची अश्विनी Mon, 01/25/2016 - 16:11 नवीन
@ काकासाहेब केंजळे , तुम्ही माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला आहे. तुमच्या मताशी पूर्णपणे असहमत. "बहुतांशी बलात्कारी हे झोपडपट्टीत राहणारे ,लो इन्कम ग्रुपमधलेच असतात.एक तर व्यसनी अस्तात ,त्यात लहानपणापासून वाईट संगतीत असतात.' ९८% रिपोर्टेड बलात्काराच्या केसेसमध्ये माहितीतील लोकांनी गुन्हा केला आहे. बाकी तुमच्या मतांवर न बोलणेच जास्त योग्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
च
चलत मुसाफिर Mon, 01/25/2016 - 17:32 नवीन
हा प्रतिसाद म्हणजे विनोदनिर्मितीसाठी केलेला खवचटपणा असेल तर ठीक आहे. नाहीतर मात्र संतापजनक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
ब
बोका-ए-आझम Mon, 01/25/2016 - 19:17 नवीन
गुन्हा हा गुन्हा असतो. तो करणाऱ्याने का केला हे महत्त्वाचं. तो कशा परिस्थितीतून आलाय आणि त्याच्या आजूबाजूला काय वातावरण आहे हे मुद्दे निर्णायक नसतात. सगळेच लो इन्कम ग्रुपमधले आणि व्यसनी लोक बलात्कार किंवा तत्सम गुन्हे करत नाहीत. असं सरसकटीकरण करुन तुम्ही गरिबीत राहूनही कुठल्याही प्रकारचा गुन्हा न करता आयुष्य जगणाऱ्या लोकांचा अपमान करताय असं तुम्हाला वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
स
सूड Mon, 01/25/2016 - 14:52 नवीन
विशेषत; low income group. त्यामुळे स्त्रियाना छेडछाड, बलात्कार वगैरे गोष्टीं वाढल्यात का? ( यात बलात्कार , छेडछाड फक्त असेच लोक करतात असे म्हणायचे मुळीच नाही .)
बाई/मुलगी कार्ड स्वाईप करुन आत शिरली की डेस्कपर्यंत जाईस्तवर तिला नखशिखान्त 'स्कॅन' करणारा एक टीम लीडर होता. सो इन्कम ग्रूपशी काही घेणं देणं नसतं. प्रत्येक हेट्रोसेक्शुअल अ‍ॅट्रॅक्शन असणारा पुरुष (घरी भोळा सांब बनत असला तरी) जरा बरी बाई दिसली की वळून बघतो'च'!! त्यामुळे लोकांवर ताशेरे मारताना आपल्या सौभाग्याचे धनी पण हेच करत असतात हे बायका सपशेल विसरतात. दृष्टीआड असली म्हणून ती सृष्टी अस्तित्वातच नसते असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
प्राची अश्विनी Mon, 01/25/2016 - 16:28 नवीन
@ सूड, अशा गुन्ह्यांचं सामान्य वर्गीकरंण करायचं झालं तर हे तीन ठिकाणी होतात. १ घरात ( बर्‍याचदा ऑळखीच्या व्यक्ती, नातेवाइकाकडून)- एकूण रिपोर्टेड केसेसच्या ९८% २ कामाच्या जागी ( तरुण तेजपाल, ई. ) ३ सार्वजनिक ठिकाणी ( निर्भया केस) या प्रत्येक ठिकाणच्या गुन्हेगाराचं सोशिओइकॉनाँमिक स्टेटस वेगवेगळे असते. जेव्हा मी low income groupम्हट्ले त्यात सार्वजनिक ठिकाणचे गुन्हे म्हणायचे आहेत. "प्रत्येक हेट्रोसेक्शुअल अ‍ॅट्रॅक्शन असणारा पुरुष (घरी भोळा सांब बनत असला तरी) जरा बरी बाई दिसली की वळून बघतो'च'!! त्यामुळे लोकांवर ताशेरे मारताना आपल्या सौभाग्याचे धनी पण हेच करत असतात हे बायका सपशेल विसरतात. दृष्टीआड असली म्हणून ती सृष्टी अस्तित्वातच नसते असं नाही." बहुतांश पुरुष दिसलेल्या स्त्रीला आपल्या कल्पनेत आणून बघतात हे सत्य आहे. कुणी उघड्पणे स्कॅन करत किंवा कुणी मनातल्यां मनात. पण हे आणि छेड्छाड यात फरक नाही का? हे म्हणजे "पॉर्न बघणारा माणूस बलात्करी असतो" असं मानण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सुबोध खरे Mon, 01/25/2016 - 19:38 नवीन
प्रत्येक पुरुष( वय १५ ते ७५ ) बाजूने जाणार्या चांगल्या रूपाच्या किंवा पोषाखाच्या स्त्रीकडे एकदा तरी बघतोच. पण ते बघणे केवळ वासनेने भरलेले नसते. तर पुरुषाचा मेंदू तसाच काम करतो. स्त्रीकडे पाहून मेंदू त्याचे विश्लेषण करतो आणि त्याप्रमाणे मेंदूची पुढची प्रतिक्रिया असते.उदा . मुलगी लहान असेल तर तो तिला आपल्या मुलीकडे पाहतो तशा नजरेने पाहिल. काही माणसे मात्र नतद्रष्ट आणि वासनेने भरलेल्याच नजरेने कोणत्याही वयाच्या स्त्रीकडे पाहतात. म्हणून प्रत्येक पुरुष स्त्रीकडे लाल्सेनेच पाहतो हे म्हणणे चुकीचे ठरेल. सर्व स्त्रियांनी आपला नवरा इतर स्त्रियांकडे पाहतो म्हणून लगेच त्याच्या हेतूंबद्दल शंका घेऊ नये. जेंव्हा तो इतर स्त्रियांकडे पाहणे सोडेल तेंव्हा तो तुमच्याकडे सुद्धा पाहणे सोडून देईल. यालाच विरक्ती म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/25/2016 - 21:48 नवीन
१०० टक्के सहमत. कित्येकदा सौंदर्यवतीचे सौंदर्य वाखाणण्याच्या हेतुनेही पाहिले जाते. तिथे वासनेला स्थान नसते. प्रत्येक पुरुष वासनेने लिप्त नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौकटराजा Tue, 01/26/2016 - 10:07 नवीन
माझ्या ओफीसात माझ्या शेजारीच एक सुन्दर मुलगी काम करीत असे. मी तिच्याशी बर्‍यापैकी मनमोक॑ळे पणे उघड होत असे. आमचा ओफीसात एखादी तिशीवरची स्त्री आली तर मी या मुलीकडे प्रतिक्रिया देत असे. एकदा तिने मला विचारले " तुम्हाला सगळ्या आन्ट्या कशा आवडतात दिसण्यात ? आमच्या पैकी तुम्ही कुणाला सुन्दर आहेस हे म्हटल्याचे दिसत नाही. तेम्व्हा मी दिलेले उत्तर असे " त्याना तरी मी कुठे म्हटलेय की तुम्ही सुदर आहात म्हणून नम्बर दोन तुम्हाला पाहिले तर मी तुम्ही मुली आहात बाया नाही या रितीने पहातो. व जर म्हटले की सुन्दर आहात तर आपल्या वयातील अन्तराने त्या पावती पेक्षा पोलीसान्च्या दंडाची पावती नशीबाला येईल की काय असे भय असतेच ! " हे झाले अवांतर . मी पत्नीशी इतके मोकळे नाते ठेवून आहे की नात्यातील सर्व स्त्रीयांचे दिसण्याविषयीची आवड नावड मी खुलेपणाने तिच्याकडे व्हक्त करू शकतो. लोकशाही आहे आमचा इथे. पण आज ५० वर्शात थेटपणे तू सुंदर आहेस किंवा तुम्ही सुन्दर आहात असे कोणाला म्हटल्याचे स्मरत नाही.( बायको त्यात आलीच )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सूड Wed, 01/27/2016 - 10:18 नवीन
"पॉर्न बघणारा माणूस बलात्करी असतो" असं मानण्यासारखं आहे.
तुमच्या आधीच्या प्रतिसादातून तसंच ध्वनित होतंय म्हणून लिहावं लागलं. वरचं जे काही वर्गीकरण दिलयंत, ते आधीचा उथळ प्रतिसाद द्यायच्या आधी लक्षात आलं असतं तर फार बरं झालं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/27/2016 - 15:25 नवीन
आता गंमत वाटेल कारण या विषयावर बरंच संशोधनही झालं आहे. पण एकेकाळी, दुसऱ्या पिढीतल्या, कडेलोट* अमेरिकन स्त्रीवादी स्त्रिया म्हणत असत - पॉर्न या सिद्धांताची बलात्कार ही सिद्धता आहे. Porn is the theory, rape is the practice. रॉबिन मॉर्गन या बाईचं हे विधान होतं, कॅथरीन मककिनॉन, आंद्रेया ड्व्रॉर्किन अशा काही प्रसिद्ध (कडेलोट) स्त्रीवाद्यांना हे विधान खरं वाटत असे. *कडवा शब्दही थोडा गोड वाटावा म्हणून कडेलोट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मृगनयनी Mon, 01/25/2016 - 18:05 नवीन
सुबोध'जी... अतिशय सुन्दर आणि महत्वपूर्ण लेख!!!... अत्यंत वास्तववादी निरीक्षण!!!... आवडला! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
स
सुबोध खरे Mon, 01/25/2016 - 19:22 नवीन
पॉर्न बघण्यामुळे बलात्कारात किंवा छेड छाड मध्ये वाढ होते हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा अद्याप तरी मिळालेला नाही. पोर्न पाहून उलट माणसे हस्तमैथुन करून "शांत" होतात या उलट सिनेमात अर्ध वस्त्रांकित नट्या पाहून सेक्स पासून लांब असलेल्या अशा तरुणांच्या भावना जास्त चाळवल्या जातात आणि त्यातून हे तरुण असे गुन्हे करायला उदयूक्त होतात. शिवाय सिनेमातील नायकांची /खलनायकांची रांगडी भाषा अशा तरुणांना जास्त भावणारी असते असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
म
माहितगार Wed, 01/27/2016 - 10:04 नवीन
मुंबई मध्ये भारतभरातून तरुण वर्ग नोकरी धंद्यासाठी येतो . त्यात अशिक्षित , अविवाहित किंवा ज्यांचे कुटुंब गावी आहे असे तरुण बरेच असतात . त्यांच्या नैसर्गिक लैंगिक भावना पोर्न बघितल्याने शमतात का? की दिवसभर कुठल्याही वेळी अत्यंत सहजपणे पोर्न उपलब्ध असल्याने अधिक उद्दीपित होऊन अपुऱ्या राहतात?
या तर्कात एक बाजू लक्षात घेतलेली नाही कि आधूनिक माध्यमे उपलब्ध नसली तरीही परंपरागत माध्यमातूनही कामुक साहित्याची निर्मिती होते, इतरवेळी सर्वसामान्य वस्तु अथवा क्रियांचा अनपेक्षीत पणे कामुक विचारांशी संबंध लावला जाऊ शकतो, अगदी अमूर्ततेत इतर मूर्त रुपही शोधता येते तसे कामुकता अमूर्ततेतही शोधता येऊ शकते. एकुण कोणत्याही वस्तु अथवा सर्व कामुक साहित्य उपलब्ध नसले तरीही कामुकतेची भावना निर्माण होऊ शकते, कामुकतेची भावना पॉर्न डिपेंडंट नसावी. या तर्कात अजून एक बाजू लक्षात घेतलेली नाही कि उद्दीपित झालेल्या नैसर्गिक लैंगिक भावनांच्या शमनासाठी मानवाकडे -स्त्री असो अथवा पुरुष- हस्तमैथूनाचे साधन आहे जे बर्‍यापैकी प्रभावीपणे वापरात असते. आधूनिक माध्यमांतून पॉर्नची उपलब्धता सहज होऊ शकते, ज्या प्रमाणात आधूनिक साधनांनी पॉर्नची उपलब्धता वाढली त्या प्रमाणात क्राईम वाढला असता तर या नववर्षाच्या रात्री जर्मनीत जी स्थिती होती ती सर्वत्र सातत्याने राहिली असती तसेही होताना दिसत नाही. तरीही पॉर्नने शरीराचे ऑब्जेक्टीफिकेशन होते का ? आणि सुख हे ओरबाडून मिळवण्याची वस्तु आहे अशा मिथकाची निर्मिती बाजारू पॉर्न मधून होत असेल तर बेसिकली तो पॉर्नद्वारे लैंगिक गोष्टी दाखवताना सुयोग्य लैंगिक दृष्टिकोणाची निर्मिती होत नाही हा क्वालिटीचा प्रश्न झाला त्यामुळे सुयोग्य लैंगिक दृष्टिकोणाची निर्मितीस साहाय्यभूत पॉर्नची उपलब्धता सहज ठेऊन गैर दृष्टीकोण निर्माणकरणारे पॉर्न मागे टाकले जाण्यासाठी काही मार्ग उपलब्ध झाल्यास बरे पडेल का ? आणि त्यासाठी काही मार्ग असू शकतो का ? हा प्रश्न अधिक महत्वाचा असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
स
संदीप डांगे Wed, 01/27/2016 - 10:36 नवीन
प्रतिसाद आवडला. अगदी मुद्द्याचे प्रश्न आहेत. खूप वर्षांआधी ओशोच्या एका वाक्याने मला फार विचारात पाडले होते. ते म्हणजे असे की "कागदावर दिसणार्‍या रंगरेषांमधून जर कामभावना उत्पन्न होत असेल तर ती तिथे कागदावरच्या रेषांमधे आहे काय?" कामभावना ही मनात आहे. बाह्य वस्तू ट्रीगर आहेत. त्यात शब्द, रेषा, देह हे काहीही कारण पुरते. ज्याच्या मानेवर तलवार ठेवली आहे, कुठल्याही क्षणी जीव जाईल तेव्हा ह्यापैकी कोणतीही वस्तू त्याची कामभावना उद्दिपित करणार नाही. असो, हे सगळे विचार फिलॉसॉफिकल आहेत. या धाग्यावर ते संयुक्तिक वाटणार नाहीत. पण तुमच्या प्रश्नांच्या गाभ्यात ह्या विचारांचा प्रतिध्वनि आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्राची अश्विनी गुरुवार, 01/28/2016 - 05:09 नवीन
@ सूड, तुमच्या बुद्धीला जर प्रतिसाद कळला नसेल तर तो उथळ? असो. @मारवाजी, काही महिन्यापूर्वीची एक घटना . कित्येक वर्ष नियमाने येणारा इस्त्रीवाला भैय्या मध्ये काही दिवस आला नाही . चौकशी केल्यावर कळले की पोलिसांचे लफडे झाले . घडले ते असे. एका इस्त्रीवाल्याकडे सुमारे १० ते १५ मुले असतात . १२, १३ वयापासून २० २२ वर्षाची . हे सर्व एका खोलीत राहतात .बऱ्याचदा एक वयस्कर आजी सगळ्यांचा स्वयंपाक करते . प्रत्येक मुलाला मिळालेल्या पैशाचे तीन भाग होतात . एक घरी पाठवला जातो, एक मुख्य इस्त्रीवाल्याला राहण्या जेवणाचा खर्च म्हणून दिला जातो आणि उरलेला स्वत:साठी . साधारणत: महिन्याला १०००० पर्यंत एवढे उत्पन्न असते. प्रत्येक मुलाकडे मोबाईल असतोच . अशाच एका मुलाला ट्रेन मध्ये धक्काबुक्की करताना पोलिसांनी पकडलं होतं . "क्या करे म्याडम ,हम भी ऐसेही राहते थे लेकिन आजकाल के लडके पुरा दिन मोबाईल देखते रहते है , फिर रहा नाही जाता , हफ्ते में एकबार छुट्टी लेके लोकल ट्रेन, स्टेशन में होके आते है .वो भी क्या करेंगे " गर्दीच्या ठिकाणी छेडछाड करताना असाच एक मुलगा पकडला गेला . माझ्या अनुभवत फक्त इस्त्रीवालेच नाही तर गाडी पुसणारी मुले देखील अशी राहतात. (इतर अनेक व्यवसायही असतील .) शाळेत कॉलेजात जाणाऱ्या मुलामुलीना मित्र मैत्रिणी असतात . या वयात अत्यंत नैसर्गिक अशी opposite sex च्या व्यक्तीच्या सहवासाचे आकर्षण थोडाफार मैत्रीतून पूर्ण होते . पण या मुलांनी काय करावे? किवा ते काय करतात? "मुंबई मध्ये भारतभरातून तरुण वर्ग नोकरी धंद्यासाठी येतो . त्यात अशिक्षित , अविवाहित किंवा ज्यांचे कुटुंब गावी आहे असे तरुण बरेच असतात . त्यांच्या नैसर्गिक लैंगिक भावना पोर्न बघितल्याने क्षमतात का? की दिवसभर कुठल्याही वेळी अत्यंत सहजपणे पोर्न उपलब्ध असल्याने अधिक उद्दीपित होऊन अपुऱ्या राहतात? विशेषत; low income group. त्यामुळे स्त्रियाना छेडछाड, बलात्कार वगैरे गोष्टीं वाढल्यात का?" याचा अभ्यास होणे गरजेचे आहे . आणि म्हणूनच अदिती ताईने केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणेच अशा प्रकारच्या सर्वेक्षणात सोशिओइकोनोमिकॅल घटकांचा अंतर्भाव असावा . --
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्रतिक कुलकर्णी Mon, 01/25/2016 - 12:23 नवीन
त्या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर माणसाने लिहिले असल्याने विश्वासार्ह वाटले :) वैद्यकीय दृशिकोनासोबत भारतीय कायदा पोर्न बाबद काय म्हणतो ते जाणून घेण्यास आवडेल.
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Mon, 01/25/2016 - 12:37 नवीन
वंध्यत्वावर तुम्हीही काम केलं आहे आणि मी देखिल काम केलं आहे. तुमचे अनुभव पेशंटचे आहेत, माझा अनुभव वैयक्तिक आहे. इथे विस्तारानं लिहीणं धोरणात बसणार नाही म्हणून संक्षेपात लिहीतो. लग्नाला चार वर्ष होऊन, वंध्यत्त्वावरचे सगळे उपाय थकल्यावर (खरं तर त्यासाठी होणारा अफाट खर्च आणि तिची ओढाताण यांना कंटाळून), असे सर्व उपचार पूर्णपणे बंद करून, केवळ पारस्पारिक अनुबंधावरच्या कमालीच्या विश्वासामुळे आम्हाला मुलगा झाला आहे. इतकंच नाही तर तो शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे सक्षम आणि देखणा आहे. या शिवाय तिची इंडोक्राइन सिस्टम, जी मेडिकली मॉनिटर करावी लागे, ती कोणत्याही औषधाविना पूर्णपणे सक्रिय झाली आहे. तस्मात, स्त्री देह, त्याची कार्यप्रणाली, इंडोक्राइन सिस्टम, स्त्रीची मानसिकता, तिचं भावविश्व, तिची जननाकांक्षा, प्रणयाचे सर्व पैलू यावर, एका स्त्रीसाठी का होईना, गहन आभ्यास केला आहे. या सर्व आभ्यसाचा निष्कर्ष असा की पारस्पारिक अनुबंध असेल तर वंध्यत्वासारखा गहन प्रश्न असो की रोजच्या जगण्यातले मतभेद असोत, सर्व प्रश्न सुटू शकतात. याही पुढे जाऊन मला असं वाटतं की, जर एक पुरुष स्त्रीला तिच्या गहन प्रश्नातून सोडवणूक मिळवून देऊ शकतो तर, त्याचा कॉनवर्स म्हणून, पुरुषावर संपूर्णपणे फिदा असलेली स्त्री, पुरुषाचे सगळे न्यूनत्त्व देखिल दूर करु शकते, कारण स्त्रीची प्रणय शक्ती अफाट आहे. त्यामुळे तुम्ही म्हटलंय : पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात. तसं नाही... जर युगुलात अनुबंध असेल तर त्यांचा प्रणय ही कायम रंगणारी मैफिल आहे. त्यासाठी कोणत्याही उस्तादगीची गरज नाही. एकमेकांप्रती वाटणारी कृतज्ञता आणि एकमेकांना सुख देण्याचा भाव ही परिमाणं प्रणयाचा रंग गहिरा करतात. तर साधा मुद्दा असाये की, जिथे काहीही प्रश्न नाही तिथे प्रणय निसर्गतःच उत्कट असायला हवा आणि पॉर्नची गरज नाही. तुम्ही दिलेल्या उदाहरणात, स्टार्ट-अप म्हणून ती गरज असेल हे मान्य आहे पण कंटीन्यूटीसाठी, एकमेकांच्या सहवासाची ओढ आणि त्या उबेत रमण्याची मजा नसेल तर मग प्रणय जनना पलिकडे निरर्थक आहे. आणि अशा निरर्थक प्रणयावर काय लिहीणार? तिथे पॉर्नचे सायकॉलॉजिकल प्रॉप्स जितका काळ काम करतील तितका करु देत .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/25/2016 - 16:04 नवीन
ठाकूर साहेब, तुमचे म्हणणे तुमच्या वैयक्तिक बाबतीत सत्य व योग्य असेल, नाही असे नाही. मात्र, तुमच्या इथल्या आणि मिपावरील इतर प्रतिसाद लेखनावरून असेच दिसते की तुमच्या इतकी मानसिक, वैचारीक, अध्यात्मिक, इ ताकद सर्वसामान्य माणसात असणे शक्य नसते. तेव्हा केवळ शास्त्रिय शब्दांत म्हणायचे झाले तर... तुमचे अनुभव उत्तम आणि प्रशंसनिय असले तरी ते शास्त्रियदृष्ट्या "अपवादात्मक (आऊटलायर)" आहेत व त्यांची उंची सर्वसामान्य माणसाला गाठणे शक्य होत नाही. अर्थातच, सर्वसामान्य लोकांच्या आचार-विचार-उपचार संबंधांत असे अनुभव उपयोगी ठरण्याची शक्यता फार कमी असते. सर्वसामान्य माणसांच्या संबंधांत, सर्वसामान्य माणसांच्या मनोवस्थेचा विचार करून, आचार-विचार-उपचार संबंधी सल्ला दिल्यासच तो उपयोगी ठरेल. या लेखात डॉक्टरसाहेबांचा आणि प्रतिसादांत बहुतेक सर्वांचा हाच प्रयत्न चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Mon, 01/25/2016 - 18:44 नवीन
मी सामान्य व्यक्ती असून सामान्यांना उपयोगी तेच लिहीतो आहे. त्यात आध्यात्मिक परिमाण तर अजून आणलेलं देखिल नाही, ते आणलं तर प्रतिसाद अजून गहिरे होतील. तुम्ही म्हटलंय : तुमचे अनुभव उत्तम आणि प्रशंसनिय असले तरी ते शास्त्रियदृष्ट्या "अपवादात्मक (आऊटलायर)" आहेत व त्यांची उंची सर्वसामान्य माणसाला गाठणे शक्य होत नाही. अर्थातच, सर्वसामान्य लोकांच्या आचार-विचार-उपचार संबंधांत असे अनुभव उपयोगी ठरण्याची शक्यता फार कमी असते. परस्परात प्रेम असणं यात अपवादात्मक असं काय आहे? आणि प्रेम नसेल तर त्या व्यक्तीचा सहवास प्रिय कसा वाटेल? मग कोणताही पॉर्न पाहून व्यक्ती कितीही बेभान झाली तरी जिच्याशी संग करायचा ती व्यक्तीच मान्य नसेल तर त्या प्रणयातून सुख कसं आणि कुणाला मिळेल? तस्मात, फँटसीला काय अर्थ आहे? सामान्य माणूसच स्वतःच्या पत्नी समवेत आयुष्य जगत असतो. दोघं एकमेकांच्या संगतीनंच तर संगोपन, अर्थार्जन, भोजन, ते पार हॉस्पिटलायजेशन, आप्तांचे मृत्यू असे जगण्यातले बरे वाईट अनुभव, शेअर करत असतात. जर विवाहितांना आपल्या साथिदाराचा सहवास प्रिय असेल तर उत्तेजना स्वाभाविक आहे. आणि अत्यंत सरळ सांगायचं तर स्पर्श ही पॉर्नपेक्षा कैक पटीनं प्रभावी उत्तेजना आहे. जर पत्नीच्या स्पर्शानं पती उत्तेजित होऊ शकला नाही तर पॉर्न हे केवळ काल्पनिक उत्तेजक आहे, त्याचा टिकाव फार वेळ राहात देखिल नाही, मग अशा पॉर्नचा उपयोग काय? आणि जो पती आपल्या पत्नीला उत्तेजित करु शकत नाही त्याची पत्नी त्याला काय प्रणय सुख देणार? सर्वसामान्य माणसांच्या संबंधांत, सर्वसामान्य माणसांच्या मनोवस्थेचा विचार करून, आचार-विचार-उपचार संबंधी सल्ला दिल्यासच तो उपयोगी ठरेल. या लेखात डॉक्टरसाहेबांचा आणि प्रतिसादांत बहुतेक सर्वांचा हाच प्रयत्न चालू आहे. बहुदा आपण काल्पनिक परिस्थितीचा विचार करतो आहोत असं प्रतिसादांवरून आणि लेखातून दिसतंय. कुणीही स्वतःला केंद्रस्थानी ठेवून, पॉर्नची प्रणयातली आवश्यकता याविषयी लिहीतांना दिसत नाही. संदीपनं म्हटलंय त्याप्रमाणे `पॉर्नचा स्टँड अलोन उपयोग आहे किंवा नाही' याविषयी लेखात किंवा प्रतिसादात चर्चा दिसत नाही. तशी चर्चा झाली तर पॉर्नपेक्षा प्रेम ही प्रत्यक्ष आणि कमालीची उत्कट उत्तेजना आहे हे उघड दिसेल. आणि मुद्दा तर इतका सरळ आहे की स्पर्श हाच प्रणयाचा आत्मा आहे. पॉर्न हा विज्युअल स्टार्ट-अप असेलही पण जर स्पर्श सुखाचा भाग वेगळा केला तर प्रणय उथळ आणि अर्थशून्य होईल. तस्मात, वैवाहिकात अनुबंध नसेल तर स्पर्शसुखापासून व्यक्ती कायम वंचित राहातील आणि म्हणून पॉर्न एका मर्यादेपलिकडे निरुपयोगी आहे. आता या प्रतिसादात मी काय असामान्य लिहलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा