Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)

प
पिलीयन रायडर
Wed, 02/15/2017 - 17:16
🗣 340 प्रतिसाद
बर्‍याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अ‍ॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये. माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत. सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ. आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही. इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो. मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्‍या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे. पण दुसर्‍या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल. हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्‍या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते. परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
वर्गीकरण
परदेश अनुभव

प्रतिक्रिया द्या
118041 वाचन

💬 प्रतिसाद (340)
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/16/2017 - 15:14 नवीन
वळणाचे पाणी वळणावरच जाते किंवा apple doesn't fall far from the tree... आलं माझ्या लक्षात तुला काय म्हणायचंय ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
W
wrushali kulkarni गुरुवार, 02/16/2017 - 15:18 नवीन
तुमचा प्रतिसाद वाचून खात्री झाली की मी योग्य दिशेने जात आहे. धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 02/16/2017 - 10:44 नवीन
मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. --- असे असेल तर भारतात परत येणे उत्तम. तुम्ही स्वतः आणी तुमच्या नवऱ्याला काय वाटते म्हणजे अमेरिकेत राहावे का भारतात परत जावे हे महत्वाचे. तुमच्या मुलाला अमेरिकेत जसे शिकवले जाते तसे तुम्ही स्वतः देखील घरी शिकवू शकता. अर्थात जर तुम्हाला अमेरिकेतील प्रगत जीवनाची ओढ वाटत असेल तर तिथेच राहणे योग्य आहे. कारण कुणीही कितीही विकासाच्या गमजा मारल्या तरी माझ्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे व मताप्रमाणे अमेरिका हा भारताच्या तुलनेत फारच प्रगत देश आहे आणी अमेरिकेची बरोबरी करणे आपल्याला शक्य होईल असे मला वाटत नाही. प्रगत म्हणजे फक्त रस्ते किंवा अन्य पायाभूत सोईसुविधा ह्या अनुषंगाने मी बोलत नाहीये तर तिथल्या लोकांचे एकूणच वागणे, बोलणे, शिस्त (जे वर खटपट्या ह्यांनी नमूद केलेले आहे) ही आपल्याकडे कधी येईल असे वाटत नाही. बाकी संस्कृतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारतीय संस्कृती म्हणजे खुप काहीतरी भारी, जगात सर्वश्रेष्ठ असे काही मला वाटत नाही. ज्याला कुणाला वाटत असेल त्याला वाटू दे. काहीही वाईट नाही तिथल्या संस्कृतीत. सर्वसामान्य माणसाला शक्यतो कुठलाही त्रास किंवा भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत नाही तिथे हे तुम्ही अनुभवले असेलच. लोक किती प्रेमळपणे बोलतात, शिस्तीत वागतात हे देखील अनुभवले असेल. प्रत्येक देशाच्या संस्कृतीत काही तरी चांगल्या गोष्टी असतातच. भारतीय संस्कृती म्हणजे खूप काहीतरी भारी अशी असती तर आपला देश आज निश्चितपणे जगातली एक महासत्ता असता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही भारतात राहून कितीही आपली संस्कृती मुलावर बिंबवण्याचा प्रयत्न केला तरी एका टप्प्यानंतर मुले त्यांना हवी तशीच वागण्याची शक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 02/16/2017 - 11:10 नवीन
पूर्ण सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/16/2017 - 11:27 नवीन
मी १९९१ ते १९९८ या काळात जवळपास ६ वर्षे परदेशात होतो. त्यातील ५ वर्षे अमेरिकेत होतो. तिथे माझे उत्तम चालले होते. स्थिर आयुष्य होते. कंपनी हरितपत्र स्पॉन्सर करायला तयार होती. परत येण्यासाठी काही सबळ कारण नव्हते. तसेच कायम राहण्यासाठीही सबळ कारण नव्हते. तरीसुद्धा परत आलो. मागे वळून बघितले तर नक्की का परत आलो ते सांगता येणार नाही. जेव्हा गेलो तेव्हापासूनच आपल्याला इथे कायम रहायचे नाही ही भावना मनात होती. परदेशात कोणीही सोम्यागोम्या कायमस्वरूपी राहू शकत नाही. परदेशात राहण्यासाठी सुद्धा कॉम्पॅटिबिलिटी असावी लागते. नाहीतर न घरका ना घाटका अशी परिस्थिती होऊ शकते. परत येऊन जवळपास १८ वर्षे होऊन गेली. कधीकधी असे वाटते की तिथेच रहायला हवे होते. उगाचच परत आलो. परंतु तिथे आपण कायमस्वरूपी राहू शकलो असतो का हा प्रश्नसुद्धा पडतो. तिथे कायम रहायचे का भारतात परत यायचे हे तुमच्या प्राथमिकतेवर अवलंबून आहे. दोन्हीकडे काही गोष्टी चांगल्या आहेत तर काही वाईट आहेत. तुमच्या प्राथमिकतेनुसार कोणत्या गोष्टी जास्त प्रमाणात कोठे साध्य होऊ शकतील तिथे तुम्ही रहायचा निर्णय घ्यावा. पैसे दोन्हीकडे भरपूर मिळू शकतात, शिक्षणाचा दर्जा अमेरिकेत भारताच्या तुलनेत जास्त चांगला आहे परंतु तेथील शिक्षण भारताच्या तुलनेत खूप महाग आहे. भारतात पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन नंतर तिथे शिकायला जाता येतेच. भारतातील वैद्यकीय सेवा अमेरिकेच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. भविष्यातील आर्थिक सुरक्षा ही आपण आर्थिक प्लॅनिंग कसे करतो त्यावर अवलंबून आहे. भारतात राहूनही भरपूर आर्थिक सुरक्षा मिळविता येते किंवा वाटही लागू शकते. अमेरिकेतही तसेच आहे. माझ्या ओळखीचा एक जण ६ वर्षे अमेरिकेत राहून आला. परंतु कोणतेही आर्थिक नियोजन न केल्याने व काही वाईट सवयी लागल्याने त्याची भारतातील आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे व त्याच्या पत्नीला दुसर्‍यांकडे पोळ्या करून संसाराला हातभार लावावा लागतो. भारताच्या तुलनेत अमेरिकेतील दैनिक जीवन सुसह्य व शांत आहे हे निश्चित. तिथे वीज, पाणी, वाहतूक इ. समस्या जवळपास नाहीतच आणि असल्यातरी त्यांचा लगेच निपटा होतो. भारतात मात्र दैनंदिन जीवन त्रासाचे आहे. एकंदरीत आपल्या व आपल्या कुटंबाच्या प्राथमिकतेवरच कोठे रहायचे हे ठरवायला हवे. जिथे रहायचे असेल तिथल्या सामाजिक जीवनाशी, संस्कृतीशी जितक्या लवकर जुळवून घेता येईल तितक्या लवकर द्विधा मनस्थिती संपुष्टात येईल. एका सामाजिक अभ्यासानुसार, साधारणपणे परदेशातील पहिली पिढी ६०% संस्कृती टिकवून ठेवते. परंतु दुसरी पिढी फक्त १०% संस्कृतीच टिकवू शकते. तिसर्‍या पिढीचा व मूळ संस्कृतीचा संबंधच राहत नाही. हे लक्षात घेऊन आपली मूल्ये, संस्कृती इ. आपली मुले टिकवून धरतील का याविषयी फार विचार करू नका कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते होणे अवघड आहे. मुले नवीन मूल्ये, नवीन संस्कृती आत्मसात करणारच. ते थांबविणे कोणालाही शक्य होणार नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 02/16/2017 - 11:59 नवीन
साधारण असेच माझेही मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/16/2017 - 15:29 नवीन
गुरुजींशी सहमत. देशप्रेम वगैरे भानगडींचा मी विचार करत नाही. कुठे राहायचं हे तुमच्या प्राथमिकतेवर अवलंबून आहे. कुठलाही निर्णय घेताना काही प्रॅक्टिकल अडचणी नक्की लक्षात घ्या. १. तुम्ही (किंवा तुमचा नवरा) एच-१ विसावर गेला आहात. ९० टक्के लोकांना ज्या प्रोसेमधून जावे लागते त्या प्रोसेसमधून गेलात तर ग्रीनकार्ड यायला १०-१२ वर्ष लागतील. सध्याचे एच-१ किंवा ग्रीनकार्डचे नियम तेच राहतील असा अंदाज बांधला आणि या १०-१२ वर्षात इमिग्रेशन - विसा रिलेटेड कुठलीही रिस्क घ्यायची नसेल तर आहे कदाचित त्याच एम्प्लॉयरच्या दावणीला बांधून राहावे लागेल आणि तुमच्या (किंवा नवऱ्याच्या) करियरची उमेदीची वर्षे निघून जातील. ग्रीनकार्ड येईपर्यंत चाळीशी आली असेल आणि तोपर्यंत आयटी डेवलपरच्याच रोलवर (ग्रीनकार्डसाठी) राहावे लागले असेल तर करियर पूर्णपणे संपून गेली असेल. ही फॅक्ट आहे. २. अमेरिकेतील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडत चाललंय हे स्पष्ट दिसतंय. ट्रंपसारख्याचं निवडून येणं हे स्थलांतरितांसाठी चांगलं लक्षण नाही. अमेरिकन नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ट्रंप किंवा पुढच्या कुठल्याही प्रेसिडेंटवर प्रचंड दबाव असणार हे उघड आहे. तुम्ही किंवा तुमचा मुलगा अमेरिकन नागरिक नाही. (जर मुलगा अमेरिकन नागरिक असता तर त्याला या निर्णयांचा फायदा होऊ शकला असता). स्थलांतरितांना उपलब्ध असलेल्या संधींचा संकोच होण्याची मोठी शक्यता आहे. ३. आज तुम्हाला मुलाची काळजी वाटते. उद्या तुमचे किंवा नवऱ्याचे आईवडील वृद्ध झाल्यावर त्यांची काळजी वाटेल. त्या परिस्थितीत काय निर्णय घेणार याचा आजच विचार करुन ठेवा. ४. भारताची परिस्थिती कितीही वाईट वाटत असली तरी गेल्या चार पाच वर्षात (हो. अगदी यूपीएच्या काळातही) जीडीपी ग्रोथ चांगली होत आहे, परदेशी गुंतवणूक वाढत आहे, संधींची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वृद्ध होत असलेल्या (आणि तरुण स्थलांतरितांना विरोध करणाऱ्या अमेरिकेपेक्षा) भविष्यात भारतात संधी चांगल्या असण्याची शक्यता खूपच जास्त आहे ५. दिवसेंदिवस श्रीमंत होत असलेल्या प्रगतीपथावरील भारतात तुमच्या मुलाने राहावे अशी इच्छा आहे की संधींचा संकोच होत असलेल्या वयस्कर अमेरिकेत राहावं वाटतंय या दृष्टिकोणातून विचार करा. ---- अमेरिकेतील शिक्षण, कामाचे अनुभव खूपच चांगले आहेत पण ते घेण्यासाठी तिथं कायमचं राहायची गरज आहे असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे गुरुवार, 02/16/2017 - 15:41 नवीन
हे पण मुद्दे पटले. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सही रे सई गुरुवार, 02/16/2017 - 18:04 नवीन
मुद्दा क्र १ बद्दल शंका : ग्रीन कार्ड साठी अॅप्लाय करताना जो हुद्दा (पोझिशन ) असतो त्यावरच रहाव लागत का ग्रीन कार्ड येई पर्यंत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/16/2017 - 20:57 नवीन
मुद्दा क्र १ बद्दल शंका : ग्रीन कार्ड साठी अॅप्लाय करताना जो हुद्दा (पोझिशन ) असतो त्यावरच रहाव लागत का ग्रीन कार्ड येई पर्यंत?
नाही. ग्रीनकार्ड ज्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय केलेलं असतं ती फ्युचर पोझिशन असते. सध्याच्या पोझिशनवर काम चालतं त्याचं वर्क परमिट एच-१ विसामुळे मिळतं. मात्र मुख्य मुद्दा एच-१ विसाची सहा वर्षाची मर्यादा संपल्यावर ग्रीनकार्डच्या विलंबित अर्जाचा आधार घेऊन आणखी वास्तव्य वाढवता येते. हल्ली भारतीयांना ग्रीनकार्ड मिळण्यास १० ते १२ वर्षे (कदाचित १५) लागतात. मग सहा वर्षाची मर्यादा संपल्यावर पुढच्या एक्स्टेंशनसाठी ग्रीनकार्डचा अर्जाचा उपयोग होतो. या दरम्यान नोकरी बदलली तर ज्या कंपनीने आधी हा अर्ज दिला होता ते तो काढून घेऊ शकतात आणि पुढच्या कंपनीला शून्यापासून सुरुवात करावी लागते. (त्यातही थोडे लूपहोल्स आहेत) पण एकंदरीत किचकट प्रकार आहे. नोकरी बदलतानाही एच-१ स्पॉन्सर करण्याची तयारी असणारा, सर्व कायदेशीर प्रोसेस (४-६ आठवड्यापर्यंत) पूर्ण होईपर्यंत वाट पाहणारा आखूडशिंगी बहुदुधी नवा एम्प्लॉयर मिळत नाही. विशेषतः नोटीस पीरियडची भानगड नसणारे अॅट विल एम्प्लॉयमेंटचे कल्चर असल्यावर हे सगळे सोपस्कार पूर्ण व्हायची वाट बघणे गैरसोयीचे असते. एच-१ वाल्यांना नोकरी बदलाच्या कालावधीत अमेरिकेत राहणे स्ट्रेसफुल असते. पगार न मिळणारा प्रत्येक दिवस हे बेकायदेशीर वास्तव्य मानले जाते. त्यामुळे आहे तीच नोकरी टिकवून ठेवण्याची मानसिकता तयार होते आणि चांगल्या संधींचा लाभ मिळण्याची शक्यता कमी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/16/2017 - 21:17 नवीन
आता तर नवीन एच-१ घेणे पण मंदावले आहे ना? आमच्या कंपनीत २-३ जण येणार होते त्यांच सगळं होल्डवर गेलंय. इतरही कारणं असू शकतील. पण ट्रंपच्या राज्यात इमिग्रंट्सना बरे दिवस आहेत असं वाटत नाही. ग्रीनकार्डाला लागणारा वेळही कमी होईल असं वाटत नाही. इथे तर वेगवेगळ्या राज्यात रेड्स पडत आहे पासून ते पटेल ब्रदर्सच्या बाहेर्च पोलीस उभे आहेत स्टेटस चेक करायला इथवर बातम्या रोज फिरत असतात. उगाच अस्थिरतेचे वारे वहायला लागल्या सारखे वाटतेय.. बादवे.. तुम्हाला स्रुजाने मांडलेल्या कामाच्या क्वालीटीच्या मुद्द्याबद्दल काय वाटते? भारतात अजुन ते नाही आणि भारतीय मॅनेजर्सची मानसिकता हा अमेरिकतही त्रासाचा विषय आहे. भारतात तो अजुनच तीव्र आहे. हा मुद्दा कसा टॅकल करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
N
nanaba गुरुवार, 02/16/2017 - 11:59 नवीन
Are available in India as well. There are good schools which are very out of the box, have similar or better education strategy. Eg. Gram mangal learning home, swadha, Anandkshan, schools like aksharnandan which are more structured. On maayboli there is a group called "pasarun pahe". With many articles and practical experiences. We were on USa from 2008 to 2013 Dec. We returned because we realized we can't live with the thought of "what if".. So wanted to give it a try. We couldn't be happier.. returning was the best thing we did.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 02/16/2017 - 12:25 नवीन
फारच समर्पक सल्ले ! मिपावर कसल्याही समस्यांचा किती सांगोपांग आणि आत्मीयतेने उहापोह केला जातो याचं उत्तम दर्शन धाग्याच्या प्रतिसादातून झाले. मी जरी कधी परदेशी गेले नाही, तरी दोनच गोष्टी सांगू इच्छिते , १. तुम्हाला निर्णय-स्वातंत्र्य आहे, ही फार मोलाची आणि भाग्याची गोष्ट आहे, याची जाणीव असूदे .फार कमी लोकांना अशी संधी मिळते. २. कोणताही निर्णय घेतला तरी पुढे घडणाऱ्या गोष्टींसाठी स्वत:ला किंवा सल्ला देणाऱ्यांना जबाबदार धरू नये, तर हे होणारच आहे, अशा तयारीने त्यांचा समान करा. कारण कोणताही निर्णय शंभर टक्के बरोबर नसतो आणि शंभर टक्के चूकही नसतो. आपल्या मनाचा कल बघ आणि निर्णय घे. ...अखेर ऐकावे जनाचे...! शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/16/2017 - 16:27 नवीन
१. तुम्हाला निर्णय-स्वातंत्र्य आहे, ही फार मोलाची आणि भाग्याची गोष्ट आहे, याची जाणीव असूदे .फार कमी लोकांना अशी संधी मिळते. + १००० हा निर्णय कायम करण्यासाठीचा पहिला मुद्दा होऊ शकत नाही, पण निर्णयप्रक्रियेत त्याला विसरण्याची चूक करू नये इतका महत्वाचा मुद्दा नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ग
गवि गुरुवार, 02/16/2017 - 14:53 नवीन
रहायला मजा येतेय ना अमेरिकेत. बिंधास्त रहा आणि एंजॉय करा. शिक्षणपद्धती वगैरे जस्टिफिकेशन शोधू नका. कोणी मागितलंय? भारतात खरंच यावंसं वाटणारे (फारच थोडे असतात) पण परत येऊन टाकतात. पण X=X+1 सिंड्रोममधे अडकणार्यांना मात्र कारणं भरपूर सापडतात. खरंच कोणी वर म्हटल्याप्रमाणे फॉर हियर ऑर टु गो मधला x=x+1 सिंड्रोम वाचा.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 02/16/2017 - 16:41 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/16/2017 - 21:03 नवीन
x=x+1 सिंड्रोम काय आहे ? अहो पुण्यात म्हणतात ना, पुढच्या वेळी आल्यावर जेवायलाच या. त्याचीच आवृत्ती आहे ही. पुढच्या वर्षी भारतात कायमचं परत जाऊ असं दरवर्षी म्हणायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 02/17/2017 - 08:38 नवीन
निर्णय घ्यायचा नसला की मन तुम्हाला पुढच्या तारखेचा वायदा देतं, याला प्रोक्रास्टीनेशन म्हणतात. खरं तर मनाला निर्णय घेण्यात इंटरेस्टच नसतो, त्याला फक्त चर्चा हवी असते कारण निर्णय घेतला की मनाला कामच उरणार नसतं! पुढची तारीख आली की मन नवं आणि एकदम वॅलीड कारण पुढे करतं. अशा तारीखपे तारीख पडत जातात आणि निर्णय काही होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
म
मराठी_माणूस Fri, 02/17/2017 - 09:49 नवीन
बरोबर. तसेच बर्‍याचदा मनात निर्णय झालेला असतो पण त्या निर्णयाला कीती पाठींबा आहे हे चाचपडले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 02/17/2017 - 11:02 नवीन
पण आपल्या निर्णयाला इतरांचा असलेला पाठींबा चाचपडण्यात पुन्हा नवा किंवा विरोधी मुद्दा आला की परत मेरी- गो- राऊंड सुरु !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
प
पुष्करिणी Fri, 02/17/2017 - 13:32 नवीन
if ‘X’ is the current year, then the objective is to return in the ‘X + 1’ year. Since ‘X’ is a changing variable, the objective is never reached. chained to his cultural moorings and haunted by an abject fear of giving up an accustomed standard of living, the Non-Resident Indian vacillates and oscillates between two worlds --- आंजावरून साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 02/17/2017 - 14:16 नवीन
Since ‘X’ is a changing variable, the objective is never reached. पण कोणताही निर्णय घेणं अवघड होण्याचं कारण फार मजेशीर आहे . मनाला निर्णय घेता येत नाही , त्याचं काम फक्त वेगवेगळे विकल्प मांडणं आहे . निर्णय कायम व्यक्तीलाच घ्यावा लागतो पण व्यक्ती मनाकडे कौल मागते . मग मन पुन्हा नवनवे विकल्प देतं त्यानं व्यक्ती आणखी कन्फ्युज होते . खरं तर मेंटल अॅक्टिविटी पूर्ण थांबल्याशिवाय निर्णय असंभव असतो . पण व्यक्ती मनाला कायम टरकून असते, न जाणो एखादा निर्णय चुकला तर मन पुन्हा म्हणणार ' मी त्याच वेळी सांगितलं होतं ! घातला ना घोळ ? आता निस्तरा ! ' त्यामुळे व्यक्तिला वाटतं निर्णयाचं काम बेटर मनावरच सोपवा. मग व्यक्ति मनाकडे पाहाते आणि मन व्यक्तिला पुन्हा स्वतःच्या मेरी गो राऊंड मधे बसवतं ! हा खरा X <-> Y सिंड्रोम आहे ! Where X is mind & Y is you . The dilema is tossing the Ball to each other & the result is an unending game which makes any outcome impossible.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Fri, 02/17/2017 - 15:21 नवीन
हो, होतं असं. खरं तर प्रत्येक निर्णय घेताना होतं. पण जेंव्हा एखदा निर्णय चुकण्याची किंमत बरीच मोठी असायची शक्यता असते /बॅकट्रॅक करणं सोपं नसतं किंवा सगळेच पॅरमिटर्स 'लॉजिकल' नसतात, काही 'भावनिक' सुद्धा असतात तेंव्हा मनाकडे कंट्रोल जातो. प्रत्येकाच्या सद्य परिस्थितीवर ते अवलंबून असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 02/17/2017 - 16:22 नवीन
भावना म्हणजे विचारामुळे हृदयात निर्माण झालेला हलकासा ट्रेमर . सुरुवातीला विचार फक्त मेंदूत असतो पण मनाला फुल थ्रॉटल जायचं असेल तेव्हा मन एखादा हृदयस्पर्शी विचार निर्माण करतं . इथे व्यक्ति फुल गर्तेत जाते आणि भावनेला शरण जाऊन निर्णय घेते . निर्णय विचारांनी घेतला काय की भावनेनी, शेवटी तो मनानंच घेतलेला असतो . निर्णय यशस्वी झाला तर क्रेडीट मनाकडे जातं पण फसला तर खापर तुमच्यावर येतं ! सो मेंटल अॅक्टिविटीकडे एकदाच बघायचं, काय वॅलीड आहे ते ठरवायचं आणि मग मनानं कितीही बोंबाबोंब केली तरी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून स्वतः निर्णय घेणं ही सगळयात सोपी, जलद आणि निर्णायक प्रकिया आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/19/2017 - 06:53 नवीन
रहायला मजा येतेय ना अमेरिकेत. बिंधास्त रहा आणि एंजॉय करा. शिक्षणपद्धती वगैरे जस्टिफिकेशन शोधू नका. कोणी मागितलंय?
प्लस. १०००. आणि हजारवेळा सहमत. माझ्यादृष्टीने चर्चा इथेच संपली आहे. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
च
चतुरंग गुरुवार, 02/16/2017 - 15:16 नवीन
त्यामुळे पुन्हा तेच मुद्दे मांडण्यात हशील नाही. मुलांच्या बाबतीत काय करायचे याचा प्रश्न उभा राहतो तेव्हा मला सावरकर आजोबांचा संदेश आठवतो -
माझं लोकांना एकच सांगणं आहे की मुलांवर असे प्रेम करा की ती आपण होऊन तुमच्याजवळ येतील. अपेक्षा ठेवू नका. त्यांना आयुष्याचा आनंद घेऊ देत.
प्रत्येक आईबापाने आपल्या मुलांना असे प्रेम द्यायला हवे की मुलाला बापाबद्दल द्वेष वाटता कामा नये.
आणि सरतेशेवटी मी तरी खलील जिब्रानची ही कविता डोळ्यांसमोर ठेवायचा शक्य तेवढा प्रयत्न करतो. तुम्हाला निर्णय घेता येण्यासाठी शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/16/2017 - 15:43 नवीन
शिक्षणाचा मुद्दा निर्विवादपणे सगळ्यांनीच मान्य केलाय. अमेरिकेत ते अधिक चांगल्या दर्जाचे आहे. पण त्यानिमित्ताने पुण्यातल्या चांगल्या शाळांची नावं मिळाली. परतल्यास भारतातही उत्तम पर्याय आहेत हा एक दिलासा आहे. प्रतिसाद वाचुन किमान एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. ती म्हणजे माझी मूळ भीती ही आपला मुलगा आपल्यापेक्षा काही तरी भलत्याच वेगळ्या संस्कॄतीची पताका पुढे नेणारे. आणि ही गोष्ट चांगली अथवा वाईट असण्यापेक्षाही माझ्यासाठी नवीन आहे. तेव्हा पालक म्हणुन मी ते हाताळु शकेन का अशी एक भीती मला वाटतेय. भारतातही हे होईलच पण अमेरिकेत मला ते तीव्रतेने जाणवतं इतकंच. शिवाय भारतासाठी डोळ्यात पाणी न येणे एकवेळ मी समजु शकते. पण त्याने अमेरिकेच्या झेंड्याशी जास्त इमान राखलं तर मला धक्का बसेल हे नक्की आहे. पद्मावती आणि वैषाली म्हणाल्या तसं ते पुन्हा एकदा आमच्याच हातातही आहे. आम्ही आमची संस्कॄती किती जोपासतोय ह्यावर मुलापर्यंत काय पोहचेल हे अवलंबुन आहे. खरं तर मी भारतातही निवडक सण सोडुन फार काही करत नाही, इथे तर आनंदच आहे. मला त्या अर्थाने त्याला भारतीय बनवायचे नाही. मला माझ्या मुलाच्या निष्ठा दुसर्‍या देशासाठी समर्पित असु शकतील हे पचायला अवघड जातंय. त्याने कोणतेही सणवार नाही केले तरी मला तसा काहीच फरक पडत नाही. पण भारताच्या झेंड्याचा अभिमान त्याला असावा असं मला वाटतं. देशाभिमान हा फक्त भारतात राहिल्याने व्यक्त होतो असं काही माझं आत्यंतिक मत नाही. आयुष्यात परसेशात रहाण्याचा अनुभव फार मोठे बदल करतो, तुमच्या जाणीवांना प्रलग्भ करतो हे मला दिसतंचे. पण माझं घर हे अखेर भारतात आहे, इथे मी पाहुणी... ही भावना मला अजुन तरी काढुन टाकता येत नाही. इथुन कुणीही मला निघुन जा म्हणुन शकतं, ह्या देशाच्या नियमांवर माझे आयुष्य फार जास्त अवलंबुन आहे ह्या ही जरा बोचणार्‍या गोष्टी आहेत. पण मी ह्या गोष्टींवर चिडचिड करत असताना, अनेक लोक ही भावना दूर करुन इथे रहातात, मुलांना उत्तम शिक्षण देतात. तेव्हा मला वाटतं की मी जास्त हळवी होतेय का? ह्या सगळ्या भावना मी नुकतीच इथे आल्याने आणि अजुन इथे कमवत नसल्याने* अत्यंत तीव्र आहेत. देशभक्तीच्या ह्या कल्पना बोथट होतील का? किंवा चक्क उद्या मुर्खपणाच्याच वाटतील का? *(हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, स्रुजा म्हणते तसं माझ्या नवर्‍याचंही मत आहे. अमेरिकेत काम केल्यावर अमेरिका जास्त आवडायला लागते. मी भारतात एका अमेरिकन बेस्ड कंपनीसाठीच काम केलेले आहे. आणि सगळी सुत्र अमेरिकेतुन हलतात ह्याचा अनुभव आहे. तेव्हा खरंच दर्जा काम करायचं असेल तर ते इथे करायला मिळेल असं मलाही वाटतं.) प्रतिसाद आणि व्यनि मधुन इतकी चांगली चर्चा चालु आहे. अवांतर :- मला फक्त अमेरिकेचा अनुभव आहे. पण इतर देशांमध्ये शिक्षण आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चरचे अनुभव कसे आहेत?
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/16/2017 - 16:05 नवीन
देशाभिमान आणि झेंड्याशी निष्ठा वगैरे समजले नाही. नक्की काय म्हणायचंय? अमेरिकेत कायमचं राहण्याचा निर्णय घेणारे भारताचा देशाभिमान वगैरे तर लोलियतच वाटतं. (तुम्हाला उद्देशून नाही. इन जनरल इथल्या पॉटलक मित्रांशी बोलतो तेव्हा जे वाटतं ते) एक जुनं कार्टून आठवलं. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/16/2017 - 16:19 नवीन
हे बघा.. त्याचं असंय की देशात राहिलं की च आपण देशप्रेमी असतो असं मला वाटत नाही. समजा मी माझ्या देशासाठी वेळ नाही देऊ शकत, पण पैसे देऊ शकते. तर मी ते कुठेही राहिले तरी देऊच शकते. आपण कुठेही राहुन देशासाठी योगदान देऊ शकतो असं मला वाटतं. बाकी झेंडा आणि राष्ट्रगीत ह्यांच्यासाठी मी जरा सेंटी आहे. म्हणून मुलाला जेव्हा शाळेत अमेरिकेच्या झेंड्यासमोर प्रतिज्ञा म्हणताना पाहिलं तेव्हा फार त्रास झाला. आज तो पोपटपंची करतोय, उद्या मनापासुन अमेरिकेला त्याचा देश मानेल. ज्याचा एक सेंटी माणुस म्हणुन मला त्रास होईल. बाकी तुम्ही म्हणताय तसे लोक मला नाही भेटले अजुन. सुदैवाने सगळे भारताच्या प्रेमातलेच आजुबाजुला आहेत. ते लोक भारत वाईट आहे म्हणुन इथे नसून, इथे जास्त चांगल्या संधी आहेत म्हणुन आहेत. ह्यात भारतासाठी द्वेष वगैरे नसून, प्रॅक्टिकली जे आवश्यक आहे तो पर्याय निवडला असं असण्याची शक्यता जास्त आहे. मग असं असताना त्यांनी इथे राहुन भारताविषयी प्रेम व्यक्त केलं तर हरकत नसावी. मागे एकदा इंडीया डे परेडच्या फोटोंवर कुणी तरी भारतातल्या मित्राने असाच ह्या लोकांच्या राष्ट्रभक्तिवर सवाल केला होता. ते ही चूकच वाटले होते. भारतात बसलाय म्हणुन हा फार मोठा देशभक्त आहे आणि इंडीया डे परेडमध्ये सगळे एकजात दांभिक आहेत हा अ‍ॅप्रोच चुकीचा आहे. बादवे.. तुमचा वरचा प्रतिसाद खूप आवडलाय. मुद्द्यांमध्ये दम आहे. ट्रंप आल्यानंतर विचार झपाट्याने बदलले हे नक्की. ह्या माणसाच्या आमदनीत रहावं का असं दिवसातुन चारदा तरी वाटायला लावतोय तो आजकाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
W
wrushali kulkarni गुरुवार, 02/16/2017 - 18:09 नवीन
तु म्हणालीस की तुझे वडील मराठवाड्यातून पुण्यात आले. तुझे प्रेम मराठवाड्यावर जास्त आहे की पुण्यावर? जिथे आपण रुजतो तिथलेच प्रेम वाटणार . त्यामुळे आपल्या मुलांना भारत आवडेल पण ते God bless America!! म्हणणारच. १५ आॅगस्ट ऐवजी ४ जुलै जास्त प्रिय असणार . याचा आपल्याला त्रास होतो पण इथे राहून या देशावर प्रेम न करता भारतावर कर हे जरा अवघडच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सप्तरंगी Fri, 02/17/2017 - 14:05 नवीन
जसे तू भारतात जास्त राहिलीस आणि तुला भारताबद्दल जास्त प्रेम वाटते तसे त्याला त्याचे बालपण usa मध्ये गेले म्हणून usa च्या झेंडयाबद्द्ल जास्त प्रेम वाटलं तर चूक काय?. आपण ज्या शहरात / राज्यात राहतो त्याबाबतीत पण तर आपण असेच वागतो ना? एका ठिकाणी तू लिहिलेस कि '' पण आम्ही त्याला क्षणभरही विसरु देत नाही की भारत आपला देश आहे '' . हे त्याला सांगता सांगत तु तुला स्वतःलाही सतत सांगते आहेस का? इथे मी उलट विचार करून बघतेय, असे बिंबवण्यापेक्षा आणि मग नंतर confuse होण्यापेक्षा आपण दोन्ही देशांवर डोळसपणे प्रेम करावे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 02/16/2017 - 16:19 नवीन
मी अमेरिका सोडून इंग्लंड मध्ये राहिलो आहे. शिक्षणाचे काही माहीत नाही पण अमेरिके इतकेच किंवा काकणभर सरस वाटले इंग्लंड मधील इन्फ्रास्ट्रक्चर. तसेच भारतातून आलोय म्हणून कधी कुठेही हीन वागणूक मिळाली नाही. उलट लोक ज्या प्रेमळपणे बोलत, आस्थेवाईकपणे विचारपूस करत ते माझ्यासाठी नवीन होते. इंग्लंड मला अमेरिकेपेक्षाही आवडला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रसन्न३००१ Fri, 02/17/2017 - 06:45 नवीन
माझा हि असाच अनुभव आहे इंग्लंड मधला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
J
Jack_Bauer Mon, 02/20/2017 - 22:16 नवीन
आपण खालील मुद्दे देखील विचारात घ्यावेत : १. खाण्या पिण्याच्या सवयी : जर अमेरिकेत अधिक काळ राहणार असाल तर पुढे मागे तुमचीही नोकरी सुरु होईल. आणि जेव्हा दोघेही काम करत तेंव्हा २-३ दिवसांचे जेवण एकदम करून ठेवले जाते. बऱ्याचदा फ्रोझन फूडचा पर्याय देखील वापरला जातो. रोज फ्रिज मधून अन्न काढून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे ती खूप कॉमन गोष्ट आहे. सांगण्यासाठीचे कारण असते कि वेळ आणि पैसा वाचतो परंतु ताजे बनवलेले अन्न आणि फ्रोझन फूड यातील फरक नव्याने सांगायला नको. असे फ्रोझन अन्न खाल्यान्ने अनेक विकारांना आमंत्रण मिळते. अमेरिकेतील सर्वच भारतीय असे करतात असे नाही परंतु बरेचसे करतात त्यामुळे आपल्या बाबतीत देखील हि शक्यता ध्यानात घ्या. २. पैसा आणि पैसा : आपण दोघेही जरी नोकरी करत असाल तरी देखील भारतातल्यासारखे घरकामासाठी माणूस ठेवणे परवडत नाही. त्यामुळे नवरा बायकोला नोकरी करून वर घरातीलदेखील कामे करावी लागतात. वीकएंड हे ग्रोसरी आणणे , घर vacuum करणे , मुलांना वेगवेगळ्या क्लासना सोडणे , आणणे , कपडे धुणे, इस्त्री करणे, भांडी घासणे, मोठे घर असल्यास गवत कापणे, बागेची निगा राखणे इ. अनेक कामे करण्यात जातात. बरेचसे लोक त्यामुळे आयुष्य किती busy आहे हे भारतातल्या लोकांना सांगतात असतात. हे सर्व करून मुलांसाठी, आपल्या स्वतःसाठी (छंद इ.) किती वेळ आणि energy शिल्लक राहील ह्याचाही विचार करावा. ३. मुले : मुले थोडी मोठी (टिन एज ) झाल्यावर आपल्या मुलाकडून अगर मुलीकडून समजा पुढील प्रश्न विचारले गेले तर कसे उत्तर द्यायचे ह्याची तयारी ठेवा: - That’s my life, that is none of your business - मुलीकडून : Joe is black guy, so what ? Look at his body, he looks like your “Salman Khan”, I would love to go out with him. - You are asking too many personal questions. - “I don’t get any clue what they are saying in that Pooja Ceremony and still you want me to seat 2 hours there. This is a torture. - You asked me to come with you at the temple, when I asked significance of the murti , clothing on Murti etc.. even you were at loss of words. I am not convinced, sorry I would stay at home, you guys go to the temple , Satnarayan Puja whatever.. आर्थिक स्वास्थ्य आहे पण मानसिक नाही अशी अवस्था अनेकांची होते. अशी अनेक उदाहरण बघितली आहेत जिथे पैसा आहे पण आपली वाटावीत , ज्यांच्या बरोबर आपले यश , प्रगती शेअर करावी अशी आपली माणसे जवळ नाहीत. ज्या मुलांसाठी आपण इतके कष्ट केले ती मुले मोठी (टिन एज ) झाल्यावर बऱ्याचदा पैसा किंवा तत्सम आर्थिक आधार हवा तेंव्हाच जवळ येतात , इतर वेळी आपल्या स्वतःच्या जगात अशी परिस्थिती. काही बोलताही येत नाही कारण आपणच आपल्या भारतातल्या मित्र , नातेवाईक ह्यांच्या समोर इथे आपण किती भारी आयुष्य जगतोय ह्याचे सुंदर चित्र रंगवलेले असते. प्रत्येक भारतीयाला असाच अनुभव येईलच असे नाही पण बरयाचदा वर सांगितलेले देखील होणारच नाही ह्याची खात्री कोण देईल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/21/2017 - 04:07 नवीन
प्रतिसाद आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Jack_Bauer
प
पद्मावति Tue, 02/21/2017 - 10:17 नवीन
'रोज फ्रोज़न फुड खाणे'या अर्बन मीथ्स वाटतात मला तरी. अगदी साठीच्या दशकात, सत्तरिच्या दशकात जे लोक अमेरिकेत आले त्यांना भारतीय ग्रोसरी मिळायची नाही सहजासहजी. तेव्हा असे तुम्ही म्हणताय तसे व्हायचे हे खरंय. पण जे नव्वदीचे दशक आणि पुढे अमेरिकेत आले त्यांच्या घरात अस फ्रोज़न फुड (फ्रोज़न मटार, फ्रोज़न बीन्स किंवा फ्रोज़न कॉर्न ठीक आहे) खाणे नाही दिसणार. मी स्वत: त्या देशात पंधरा वर्षे राहीले आहे. अगदी ओहायो मधल्या खेडेगावापासून महानगरापर्यंत. फ्रोज़न फुड खाणे हा प्रकार मी तरी कधी माझ्या घरात किंवा आमच्या नातेवाईक, मित्र परिवारामधे ( भारतीय) बघितला नाहीये. सगळ्या घरांमधून व्यवस्थीत भाजी पोळी, वरण भात, चटणी, कोशिंबिरीचा स्वयंपाक असतो. जॉब करणार्‍या स्त्रिया सुद्धा रोज छान साधा का होईना स्वयंपाक करतात. जास्तीत जास्तं पोळ्या बाहेरून आणतात. घर कामासाठी माणुस बळ नसते हे मात्र खरंय. पण थोडं फार.. उदा. गवत कापण्यासाठी, घराच्या क्लीनिंग साठी लोकांना हायर करता येतं ते केलं की आपला वेळ वाचतो. बाकी मुलांचं म्हणाल तर ' नन ऑफ युवर बिज़्नेस' , ' यू आर आस्किंग टू मेनी क्वेस्चन्स' असे टीनएज टॅंट्रम्स जर कधी त्यांनी केलेच तर देसी आई वडिलांना मुलांना योग्य वळणावर कसे आणायचे ते बरोबर कळते. पूजेला, मंदिरात ही मुलं त्यांच्या आई वडिलांबरोबर नक्की येतात. आधी मे बी बोर होत असतीलही. पण म्हणतात नं '' अच्छी आदतें हमेही तो लगानी हैं' हे आई वडीलांनी पक्कं ध्यानात ठेवलं की सोपं होतं सगळं मग. मुलांच्याही ते अन्ग्वळणी पडतं. मग एकदा त्या टीनएज ' ओह नो' फेज़ मधून बाहेर आले आणि संसाराला लागले की तेही आपले संस्कार, चालीरीती त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचाव्या याची निश्चित पणे काळजी घेतात यात काहीही शंकाच नको. फक्त आई वडीलांनी गोडी गुलाबीने आणि प्रसंगी स्ट्रिक्ट्ली या सवयी मुलांना लावायला हव्यात आणि ते करतातही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Jack_Bauer
J
Jack_Bauer Tue, 02/21/2017 - 15:40 नवीन
फ्रोज़न फुड म्हणजे फक्त पटेल ब्रदर्समध्ये मिळणारे असे नसून आपण बनवलेले आणि फ्रिजमध्ये ठेवून ३ दिवसांनी खाल्लेले हे देखील येते. घरातील स्त्री हि जर रोज ८ तास नोकरी , साधारण १ ते दीड तासाचा रोजचा घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हा प्रवास , किमान रोजची ७ तास झोप हे करून आपल्या म्हणण्यानुसार जर रोज व्यवस्थीत भाजी पोळी, वरण भात, चटणी, कोशिंबिरीचा स्वयंपाक करून, भांडी घासून (कारण इथे भांडी घासायला बाई नसते ) , किचन आवरून वर कुटुंबाला आणि स्वतःला वेळ देत असेल तर खरंच कौतुकास्पद आहे. कदाचित आपल्याला अशी उदाहरणे दिसली असतील पण माझ्या पाहण्यात तरी जितके परिवार आले त्यांच्या फ्रिजमध्ये फ्रोझन फूड हे असतेच असते. काही कामाकरिता लोकांना हायर करता येतं हे आपला म्हणणं खरं आहे. परंतु गवत कापायला जेव्हा सरासरी $१२० आणि घराच्या साफ सफाईला जेव्हा सरासरी $११५ म्हणजे एका वेळेसाठी साधारण $३०० (+टीप पकडून ) द्यायची वेळ येते तेव्हा किती जण हा मार्ग निवडतील आणि किती वेळा निवडतील हा प्रश्नच आहे. मुलांच्या बाबतीत म्हणाल तर पालकांनी काय करावे काय करू नये हे न सांगता मी एवढाच म्हटलं आहे :
आपल्या मुलाकडून अगर मुलीकडून समजा पुढील प्रश्न विचारले गेले तर कसे उत्तर द्यायचे ह्याची तयारी ठेवा:
ह्या उपर आपले मूल कसे हाताळायचे हा प्रत्येक पालकाने घ्यायचा निर्यय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
फ
फेरफटका Tue, 02/21/2017 - 16:30 नवीन
तुमच्या निरिक्षणाशी सहमत आहे. अमेरिकेत रहायचं तर अमेरिकेतली लाईफ स्टाईल अंगिकारावी लागते. आणी ती जर अंगिकारली, तर असा काही त्रास वगैरे होत नाही. उगाच बाऊ करावी ईतकी परिस्थिती वाईट अजिबात नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
स
संदीप डांगे गुरुवार, 02/16/2017 - 16:09 नवीन
पिराताई, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. मुलाने भारताच्य झंड्याशी इमान राखावं, अमेरिकेच्या जास्त नको हे विचार जरा विचित्र आहेत बघा... वरिल सर्वांच्या प्रतिसादात कुणी आयडेन्टीटी क्रायसिसचा उल्लेख किंवा त्यानुषंगाने चर्चा केली आहे काय? पिरातैच्या वरच्या प्रतिसादात व्यक्त झालेल्या मतांमध्ये मला त्यांच्या मुलाला टीनेजपासूनपुढे आयडेन्टीटी क्रायसिस ला सामोरे जावे लागू शकते असे पोटेन्शियल दिसत आहे. उद्या त्याने एफबीआयमध्ये, सीआयए मध्ये नोकरी केली आणि भारताविरुद्ध गुप्त कट रचण्याची त्याच्यावर जबाबदारी आली तर हे आयडेन्टीटी क्रायसिस त्याला त्रास देऊ शकतं असं वाटतं.... अर्थात ही एकदम फारफेच्ड सिचुएशन मांडली आहे. तरीही...
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/16/2017 - 16:24 नवीन
फार फेच्ड नाही बोलताय तुम्ही. अगदी रास्त मुद्दा आहे. मी स्वतः इतका ताणुन विचार केलाय एकदा. उद्या अमेरिका आणि भारताचे युद्ध झाले तर? पार इथवर... माझा मुलगा किती प्रॅक्टीकल निघेल ह्यावरही बरेच अवलंबुन आहे. पण आम्ही त्याला क्षणभरही विसरु देत नाही की भारत आपला देश आहे. समजा मी हा अतिरेकीपणा थांबवला तरी त्याची नाळ जुळलेली रहाणारच आहे भारताशी. उद्या हा मुलगा अमेरिकेचा नागरिक झाला तरी अमेरिकेसाठी आणि खास करुन भारताविरुद्ध काम करु शकेल का? त्याला हे प्रश्न पडतील असं वाटतंय.. (मुळात असे संरक्षण खात्यात जन्माने अमेरिकन नसलेले लोक घेतात का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ट
ट्रेड मार्क Sat, 02/18/2017 - 19:20 नवीन
असे युद्ध ही गोष्ट फार लांबची आहे पण आपल्या इतिहासात पण भारतात राहून इंग्रजांच्या बाजूने आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध लढलेल्या भारतीयांची संख्या काही कमी नाहीये. अजूनही भारतात राहून भ्रष्टाचार करणारे, नियम व कायदे न पाळणारे, अतिरेक्यांना व भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांना वैचारिक का होईना पण पाठबळ देणारे हे पण भारताविरोधात अप्रत्यक्षपणे लढतच आहेत. संरक्षण खात्यात जन्माने अमेरिकन नसलेले लोक घेतात का? घेत असावेत. पण अगदी खूप वरच्या हुद्द्यावर जाण्यासाठी वेगळे निकष असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आनंदयात्री गुरुवार, 02/16/2017 - 17:04 नवीन
शेवटी आयुष्य तुमचे आहे आहे आणि मुलाबाळांचे आयुष्य तुमच्या आयुष्याशी बांधलेले आहे. जसे तुमचे माझे आणि सगळ्यांचे त्यांच्या त्यांच्या पालकांशी होते. त्यांनी त्याकाळात केलेले भारतातल्या भारतात केलेले स्थलांतर, खेड्यातून शहरात किंवा लहान शहरातून मोठ्या शहरात, त्यांच्या आयुष्यात प्रगतीच्या संधी, कंपॅरिटिव्हली सुखकर आयुष्य घेऊन आले. तसेच वाईट हवा, ताजा भाजीपाला, एकत्र कुटुंब, शेतीविषयक जीवनशैलीशी ताटातूट, सणवार प्रथांमध्ये काटछाट, कुटुंबाला एकत्र कमी वेळ असे काही दुष्परिणामही घेऊन आले असेलच. त्यांचे पाल्य म्हणून ते आपल्या वाटेलही आलेच. सध्याचे आयुष्य तुमचे आहे, मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला जसे जगायला आवडेल तसे त्याला जगता आले पाहिजे याला सक्षम बनवणे एवढेच आपले कर्तव्य, असे वाटते. त्यासाठी तुमच्या आयुष्यात मिळणाऱ्या संधींशी किंवा आवडीनिवडींशी 'त्यागाच्या' लेव्हलवर तडजोड करावी लागू नये असेही वाटते. भारतातली आणि इथली टोकाची यशस्वी आणि टोकाची अयशस्वी उदाहरणे ना घेता पहिले तर, इथे शिकणाऱ्या मुलांना बेटर ह्युमन बनवायचा शाळांचा प्रयत्न असतो असे वाटते. कचरा ना करणे वैगेरे क्लिशे उदाहरणांपुढे जाऊन एक उदाहरण घ्यायचे झाले तर collaboration over competition सारखे मूल्य मुलांमध्ये अधिक रुजलेले दिसते. अजानुकर्णाच्या प्रतिसादतल्या मुद्दा १ आणि ३ शी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
स
सही रे सई गुरुवार, 02/16/2017 - 19:27 नवीन
फार छान विषय आणि त्यावरची चर्चा आहे सुरु. मी पण याच दोलायमान स्थिती मध्ये असते कधी कधी. म्हणजे मला माहिती आहे कि कायमस्वरूपी मी इथेच नाही राहू शकणार. पण मग किती वर्ष राहायचं हा एक प्रश्न असतो माझ्या साठी. तुझ्या प्रश्नाबद्दल माझे काही विचार : बऱ्याच जणांनी म्हणल आहे त्या प्रमाणेच मी म्हणेन कि फक्त मुलाच शिक्षण किंवा नवर्याच्या ऑफिस मधल वातावरण या गोष्टींचा विचार करून इथेच राहायचा निर्णय घेऊ नये. तुला आणि नवर्याला इथे कायम राहायला आवडेल का हा विचार महत्वाचा आहे. प्रत्येकाची प्रकृती आणि मानसिकता वेगळी असते. त्यामुळे एखाद्याला भारतात जास्त आवडेल कारण तिथे आपली माणसं, आपले सणवार, खाण पिण यात मन जास्त गुंतलं असेल. तर दुसर्याला या गोष्टींपेक्षा जास्त चांगल्या सोयी सुविधा, स्वतः साठी मिळणारा वेळ , मुलांसाठी आणि स्वतः साठी चांगल्या संधी यात जास्त रस असेल. जस इथे राहून तू मुलाला भारतीय संस्कृती बद्दल शिकवू शकतेस त्याचप्रकारे भारतात राहून मुलाला वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे, सार्वजनिक ठीकाणी वर्तन कसे असावे हे सगळ घरातल्या घरात पण शिकवू शकतेस च. भारतात राहून तो एक उत्तम नागरिक बनवायची जबाबदारी तू आणि तुझा नवरा मिळून पार पडू शकता. माझ्या मते (हे फक्त माझ्या पुरत मर्यादित आहे) मला ३-४ वर्ष इथे राहून परत भारतात जावस वाटतंय. याला माझी वैयक्तिक कारण पण आहेत. जस कि इथे मी माझी नोकरी बदलू नाही शकत (एल १ मुळे). त्या उलट पुण्यासारख्या ठिकाणी मी हव तिथे काम करू शकते (काही वर्षांनी ग्रीन कार्ड च्या इ.ए.डी. वर बदलू शकेन. पण तो पर्यंत बंधन आहेच) पण त्या व्यतिरिक्त कारण म्हणजे मी माझ्या नातेवाईकांशी जास्त अॅटॅच आहे. मला लग्न, मुंज, बारशी, डी जे या साऱ्यामध्ये खूप मजा येते. नातेवाईकांच घरी येण जाण, कधीही कोणालाही गरज पडली कि पटकन धावून जाणं आणि तेव्हढ्याच हक्काने त्यांना पण माझ्या मदतीला बोलावण. शेजारणी बरोबरचे माझे संबंध, कार्यक्रम, त्यांना पण हक्काने मदत मागण आणि मदत करण (लोक म्हणतील अमेरिकेत पण हेच करा सगळ. पण इथे शेजारणी कडे जायचं झाल तरी फोन करून मग जाते. आणि तेव्हढा हक्क जवळीक नाही जाणवत इथे. तुझ्या इथे जर्सी सिटी मधलं वातावरण बरच वेगळ असेल. पण जिथे भारतीय लोक खूप नाहीत तिथे राहाण थोड वेगळ आहे) माझे पालक जरी आज धडधाकट असले तरी उद्या कधी तरी वृद्धापकाळी जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मी त्यांच्याजवळ असण माझ्या साठी गरजेच आहे. ते तिकडे बिछान्याला टेकलेत आणि मी माझ्या नोकरी मुळे त्यांच्याजवळ महिनाभराच्या वर जाऊन राहू शकणार नाहीये ही परिस्थिती मला फारच क्लेशदायक असेल. माझे वडील काही वर्षापूर्वी गेले तेव्हा नेमकी मी अमेरिकेला होते (दोन महिन्याच्या बिझिनेस टूर वर) आणि अगदी तातडीने विमान पकडून भारतात जाऊनही मी त्याचं शेवटच दर्शन नाही घेऊ शकले. या गोष्टीच शल्य आयुष्यभर वेळोवेळी मला त्रास देणार आहे. दुसरी भीती ही पण आहे कि माझी मुलगी अमेरिकन संस्कारात वाढायला लागली कि छोट्या छोट्या गोष्टींचे मला नक्कीच त्रास होतील. माझ्या शेजारची ७-८ वर्षाची मराठी मुलगी जेव्हा मी बघते तेव्हा ते जास्त जाणवत. तिला दसरा दिवाळी पेक्षा हेलोवीन आणि ख्रिसमस च महत्व, अपूर्वाई जास्त वाटते. एखाद्या वेळी पंजाबी ड्रेस घाल अस तिची आई म्हणाली कि ती फार चटकन तयार होत नाही. कोणी मोठ्ठ घरी आल कि आपण जसे चटकन त्यांच्या पाया पडायचो तसे या मुलीला तिच्या आईने वेळोवेळी सांगूनही वाटत नाही किंवा करायला सांगितला नमस्कार तर ती थोडे आढेवेढेच घेत कसतरी मान्य करते. कायमस्वरूपी इथे राहायचं ठरवल्यावर जर उद्या माझ्या मुलीने एखादा गोरा किंवा निग्रो कोणाशीही लग्न करायचं म्हणल किंवा तसच राहायचं म्हणल तरी ते मी मान्य करेनही पण त्यात काही तरी मनासारख झाल नसल्याची भावना असेलच. तू म्हणतेस तस देशप्रेम वगैरे तर फार दूरचीच गोष्ट आहे. पण जर इथे राहून खरच तुमच मन रमलं असेल आणि वरच्या सगळ्या गोष्टी फारश्या महत्वाच्या नसतील तर नक्कीच इथेच राहण्याचा निर्णय योग्य राहील.
  • Log in or register to post comments
अ
अनरँडम गुरुवार, 02/16/2017 - 20:07 नवीन
निग्रो
हा शब्द अमेरिकेत कृष्णवर्णियांच्या भावना दुखावणारा आहे. कृपया अमेरिकेत पब्लिकमध्ये हा शब्द वापरू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
स
सही रे सई गुरुवार, 02/16/2017 - 20:28 नवीन
अर्थात.. पब्लिक मध्ये नाहीच वापरत. पण भारतात आपण हाच शब्द वापरतो म्हणून इथे वापरला आहे. तरी हरकत असेल तर सा. सं., तो शब्द काढून टाका किंवा बदला अशी विनंती. कोणालाही दुखावयाच्च्या हेतूने तो लिहिला नाही . सहज ओघात लिहिताना वापरला गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनरँडम
ल
लीना कनाटा Sat, 02/25/2017 - 21:48 नवीन
विठोबा आणि रखुमाई कृष्णवर्णीयांना विठोबा आणि रखुमाई म्हणा, कोणाला काही कळत तर नाहीच परंतु ईश्वर नामाचे पुण्य देखील गाठीस लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
ज
जुइ गुरुवार, 02/16/2017 - 20:00 नवीन
इमिग्रेशनचा मुद्दा आता अगदी ठळक झाला आहे. कारण की अमेरिकेत भारतातून येणार लोकांचा प्रचंड रेटा. त्यामुळे ग्रीन कार्ड मिळण्यासाठी लागलेली भली मोठी रांग या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. सध्या देशागणिक प्रति वर्षी फक्त ७% टक्के लोकांना ग्रीन कार्ड मिळत आहेत. ही परिस्थिती इमिग्रेशन रिफॉर्म झाल्याशिवाय बदलणार नाही. इमिग्रेशनसाठी इतर देशांमध्ये कदाचित इतकी अवघड परिस्थिती नसावी. मी अमेरिकेत आयटीत सुमारे ५ वर्ष काम केले आहे. शिवाय मध्यंतरी परत भारतात जाऊन १ वर्ष काम केले आहे.भारतात परत गेल्यावर आयटीत काम करणे खूप त्रासदायक वाटते. इथेही शक्यतो भारतीय मूळ असलेले वरिष्ठ टाळावेत असे वाटत राहते.जे अवघड आहे कारण आयटी मध्ये काम करणार्‍या अमेरिकेतील भारतीय लोकांची संख्या जास्त आहे. शिवाय खूप जास्त विचार केला की प्रश्न जास्त जटिल होतात.
  • Log in or register to post comments
N
nanaba गुरुवार, 02/16/2017 - 20:33 नवीन
http://www.maayboli.com/node/55237 I am not sure what misalpav policy is on sharing external links and hope it's fine. If not, admins please feel free to remove my post.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा गुरुवार, 02/16/2017 - 20:43 नवीन
सई शी बर्‍याच अंशी सहमत ( मुलांचं लग्न हा विषय सोडून) माझ्या मामेभावाने , जो आमच्यासारखाच इथेच वाढला, एका स्कॉटीश - अमेरिकन मुलीशी लग्न केलंय. माझ्या एक दोन कलिग्ज्स पण भारतात वाढल्या, नोकरी केली आणि ब्रिटीश लोकांशी लग्न केलं म्हणुन नंतर लंडन ला स्थायिक झाल्या आहेत. या तिघांनी ज्यांच्याशी लग्नं केली म्हणजे स्कॉटीश मुलगी आणि ब्रिटीश मुलं, ती आपापल्या संस्कृतीत आपापल्या आईवडीलांबरोबर वाढली तरी परदेशी नवरा/ बायको निवडला. आता त्यांच्या आईबाबांच्या अँगल ने पण पाहा. त्यामुळे या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या आहेत. त्यात आतापासून डोकं शिणवण्यात काही अर्थ नाही. आणि मी आधीच म्हणलं त्याप्रमाणे कुठल्याही फॅमिलीमध्ये लोकांशी वाईट वागा, जोडीदाराशी प्रामाणिक राहू नका वगैरे सांगत नाहीत. कॅनडामध्ये अमेरिकेपेक्षा कौटुंबिक व्यवस्था जास्त मजबूत आहे म्हणुन असेल पण मला आजुबाजुची कुटुंबं, नवरा बायको , लिव्ह इन पार्टनर्स आमच्यासारखेच दिसतात. उन्नीस बीस चा फरक. एक बाप मुलीच्या जुनिअर प्रॉमला निघाला होता, सुपरव्हाईज्ड प्रॉम होता, पालकांना निमंत्रण होतं पण त्याच्या मुलीचा बॉ फे येणार म्हणुन जरा धास्तावला होता. आपल्याकडच्या सर्वसामान्य वडीलांसारखाच ! फक्त इथल्या समाजात हे सकारात्मक स्विकारण्याइतका प्रगल्भपणा आहे, तो आपल्याकडे अजुन हळु हळु विकसित होतोय. अशा बर्‍याच गोष्टी आपल्याकडे परस्पर निभतात कारण सोशल स्टिगमा खुप आहे. त्यामुळे त्या गोष्टींना सामोरं जाण्याची वेळच येत नाही आपल्यावर. पण, इथे ती वेळ आली तर होणारा त्रास, वाटणारी काळजी सगळं सारखंच असतं फक्त सोशल स्टिग्मा नसतो. व्हायचा त्रास कुणालाच चुकत नाही. माणसासारखी माणसं सगळीकडे असतात. आपली संस्कृती किती चांगली आहे किंवा आहे की नाही पेक्षा ही मला हा मुद्दा महत्त्चाचा वाटतो. हे एकदा डोक्यात बसवलं की मग अनोळखी किंवा परकीय संस्कृतीची निदान भीती तरी वाटत नाही. इथे माझ्या ओळखीत, अगदी वर म्हणलं तस जवळच्या नात्यात मिक्स्ड रेस लग्नं आहेत आणि खुश आहेत सगळे. मुख्य म्हणजे भारतीय संस्कृती म्हणा, रिती रिवाज म्हणा अगदी जेवण म्हणा मुळातच रंगीबेरंगी, व्हायब्रंट आहे, सगळ्या गोष्टी साजर्‍या करायचा आपला मुळ स्वभाव आहे - इथे ते चटकन उठुन दिसतं आणि अशा लग्नांमध्ये भारतीय पद्धती अगदी कौतुकाने स्विकारतात, नव्हे त्यांना त्या जास्त आवडतात. एक मुद्दा वर जो मांडलाय आजानुकर्ण यांनी - तरुण भारताचा, तो मला अगदी मनापासून पटतो. खरं तर २ महिन्यांपूर्वी मी भारतात जाऊन आल्यापासून मला जाणवतोय, त्यांनी तो अगदी नेमका पकडलाय. सध्या भारतात खुप मजा मजा चालू आहेत. गोष्टी फटाफट बदलतायेत, नव-नवीन गोष्टींचा सतत ओघ चालू आहे, सुधारणा होण्यास भरपूर वाव असल्याने आणि सध्या कमावता वर्ग तरुण असल्याने नवलाईच्या गोष्टी येत राहतात आणि लवकर प्रचलित पण होतात. विकसित देशांमध्ये हे अगदी उलट चित्र आहे. इथे गरजेच्या म्हणजे "मस्ट हॅव" वर्गातल्या सगळ्या गोष्टी आधीपासून्च आहेत. त्यामुळे इथुन पुढच्या प्रत्येक गोष्टीला " नाईस टु हॅव" ला जो प्राधान्यक्रम मिळतो तोच मिळणार. शिवाय कमावता वर्ग हा आता ४०शी च्या पुढचा आहे, याच वर्गाला नवीन गोष्टी परवडतील अशा असतात पण तो वयाने मोठा असल्याने त्या गोष्टी लगेच उचलण्याइतकी गरज किंवा ओपननेस दोन्ही कमी असतं. भारतात मात्र जीवन वाहतं राहतं - अगदी दैनंदीन जीवन पण काही तरी नवीन गोष्टी ऑफर करू शकतं. आणि कुणी सांगावं , आज आपण म्हणतोय मुलांसाठी परदेश बरा, २५ वर्षांनंतर तेच इथे नोकर्‍या - व्यवसाय करायला आले, संधी जास्त आहेत म्हणुन, तर काय घ्या. टाईड कॅन चेन्ज ईदर वे ! प्रत्येकाचे आपापले प्राधान्यक्रम हा एक मुद्दा आहेच. कौटुंबिक स्थिती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यात आता असलेली सांपत्तिक स्थिती पासून ते आईवडिलांच्या तब्येती सगळं येतं. पण इथे समजा सगळं जुळून आलं आणि राहायचं ठरलं तर इथली जीवनशैली जुळवून घेणं किंवा ती मनापासून आवडणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात एखाद्या पार्क मध्ये जाऊन कुटुंबाने बार्बेक्यु करण्यापासून ते दैनंदिन जीवनात प्रचंड अ‍ॅक्टीव राहणं, हे सगळं इथे राहताना मनापासून आवडयला हवं. जायचं की राहायचं पेक्षा ही राहयचं ठरवल्यावर काय आणि जायचं झालं तर वर नोकरी मधल्या वातावरणासारख्या टाळता न येणार्‍या गोष्टींचं काय हे समजायला हवं. पैकी नोकरीच्या जागी कामाचं सुख मिळणे ही एक च गोष्ट माझ्यासाठी सध्या अन-नोन व्हेरीएबल आहे. त्याचं काय होतंय ते ऐन वेळीच कळेल.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/16/2017 - 21:29 नवीन
लग्नाचय बाबतीत सहमत. ते काही आपल्या हातातच नाही. काय होईल ते होवो. पण परकीय संस्कॄतीची भीती वाटते हे खरंय. माझ्या मैत्रिणीने अमेरिकन मुलाशी लग्न केलं तर मला तब्बल १ वर्षभर वाटायचं की त्यांच्यात लवकर डिव्होर्स होतात, हीच कसं होईल!?! पण काही नाही, उत्तम चाललं आहे. राहता राहिलं नोकरीच्या जागी सुख! हा मुद्दा मात्र फिरुन फिरुन अमेरिकेच्याच बाजुने येतो. बाकी सगळ्यात भारतात उत्तम पर्याय आहेत. पण नोकरीत डोक्याला असणारी शांतता आणि घरच्यांना देता येणारा वेळ हे दोन ठसठशीत मुद्दे इथे दिसतात. इथेच माझ्या विचारांचं घोडंही अडलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा