Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)

प
पिलीयन रायडर
Wed, 02/15/2017 - 17:16
🗣 340 प्रतिसाद
बर्‍याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अ‍ॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये. माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत. सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ. आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही. इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो. मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्‍या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे. पण दुसर्‍या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल. हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्‍या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते. परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
वर्गीकरण
परदेश अनुभव

प्रतिक्रिया द्या
118041 वाचन

💬 प्रतिसाद (340)
आ
आजानुकर्ण Fri, 02/17/2017 - 20:18 नवीन
अमेरिकेत नोकरीच्या जागी सुख हे इतकं सरसकटीकरण करता येणार नाही. २००८-२००९ च्या मंदीनंतर अमेरिकेतली परिस्थिती बरीच बदलली आहे. कामाचे प्रेशर अनेकदा भारतात असते तितकेच असते. बे-एरियातले माझे दोन मित्र रोज रात्री आठ-साडेआठपर्यंत ऑफिसात असतात. मागच्याच वर्षी अॅमेझॉनच्या वर्ककल्चरची धुणी पब्लिकमध्ये धुतली होती https://www.nytimes.com/2015/08/16/technology/inside-amazon-wrestling-big-ideas-in-a-bruising-workplace.html भारतात निदान सकाळी चहानाष्ट्याचा तासभर ब्रेक, लंचचा तासभर ब्रेक, दुपारी गप्पाटप्पा आणि स्नॅक्स, अधूनमधून सुट्टा ब्रेक असं निवांत चालतं. इथं तसं करता येत नाही. नवराबायको दोघेही काम करणारे असतील तर घरातील कामासकट सगळंच अंगावर पडतं. भारतात निदान मोलकरीण वगैरे पर्याय उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
श
शब्दबम्बाळ Fri, 02/17/2017 - 04:55 नवीन
बऱ्याच लोकांनी बरीच मते दिली आहेत.. काहींनी चांगला विचार करून मुद्दे दिलेत पण काहींच्या मुद्द्यात भारतात सगळे खराबच आहे जणू असा रोख वाटला... ज्याचे त्याचे मत शेवटी! भारतात शिक्षण पद्धत खूप खराब आहे म्हणावं तर याच पद्धतीत शिकलेले लोकच आत्ता चांगल्या हुद्द्यांवर आणि उत्तम आर्थिक परिस्थितीत देखील आहेत. राहिला विषय खेळांचा तर मला वाटत भारतात लोकांना पहिल्यांदा आर्थिक दृष्ट्या स्थैर्य असणे महत्वाचे वाटते (त्यामुळेच आपल्याकडे सेविंग करण्याचे प्रमाणही पुष्कळ आहे मध्यमवर्गीयात) त्यामुळे अभ्यास करून मुले स्थिरस्थावर व्हावीत हा सगळ्यांचा खटाटोप असतो. जर कुटुंब उत्तम आर्थिक परिस्थितीत असेल तर बहुधा मुलांना खेळ वगैरे वर लक्ष देण्याचं स्वातंत्र्य मिळते... पण हा तरीही एक जनरल मुद्दा झाला! अनेक प्रकारच्या शाळा अनेक शहरात मिळतील भारतात, पण मग मुलांच्या शिक्षणासाठी शहरे बदलणार तरी किती ना.. कुठे राहावे, हा प्रश्न जितका जास्त विचार करू तितका कठीण होत जातो असं मला वाटत.. मी जर्मनीमध्ये असताना तिथे सेटल होण्याचा ऑप्शन होता अजूनही आहे. तसा चांगला देश आहे खूप गर्दी नाही शिस्त वगैरे सगळं नीटनेटकं! पण मला तिथे स्वतंत्र वाटत नाही. सतत हे जाणवत राहत कि आपण इथले नाही. न्यूनगंड वगैरे नाही हा! तिकडचे काही लोक चांगले ओळखीचे झाले, बराच फिरलो पण... तरीही मनातून ती भावना जात नाही. मग उगाच चांगली लाईफ स्टाईल असावी म्हणून तिकडे राहावे वाटत नाही. इथे भ्रष्टाचार आहे, धूळ आहे, गर्दी आहे पण म्हणून मला तरी देश सोडून बाहेर जावे आणि मग माझ्या देशाची आठवण काढत बसावी हे पटत नाही. बहुतांश लोक देश सोडत नाहीत तर शहर सोडतात असे मला वाटत... आपल्यापैकी किती लोक "भारत" फिरून इकडे तिकडे नोकरीसाठी राहतात? मी स्वतः आत्ता बंगलोर मध्ये राहतोय ३-४ वर्ष झाली. भाषा, खाणे पिणे याची संस्कृती इथेही वेगळी आहे. फक्त हे भारतात आहे. तरीही कधी कधी वाटत सेटल कुठं व्हायचं? पण जोपर्यंत इथून निघायची इच्छा होत नाही तोपर्यंत राहावं म्हणतोय इकडेच... :) तुम्ही पण बघा तुम्हाला नक्की 'वाटतंय' काय ते... बाकी फेसबुक वगैरे वर देशाचा झेंडा ठेऊन आय लव्ह माय इंडिया लिहून US मध्ये ३-३ वर्ष राहणारे आणि भांडून भांडून स्टे वाढवून घेणारे लोक पण पाहिले आहेतच. जर खरंच देशप्रेम वगैरे असेल तर मग इथे राहून आपल्याला शक्य असणाऱ्या गोष्टी कराव्यात माणसाने! भारतात अगदीच राहणे शक्य नाही इतकीही काही खराब परिस्थिती नाहीये... चांगल्या राहणीमानासाठी बाहेर राहून आम्ही परकीय गंगाजळी भारतात पाठवतो म्हणून भारताचा फायदा आहे असे सांगून समाधान करून घेण्यापेक्षा जर खरंच "देशप्रेम" असेल तर इथेच राहून छोट्या छोट्या गोष्टी तरी कराव्यात असे मला वाटते. हि माझी वैयक्तिक मते आहेत पटली पाहिजेत असे काही नाही! :) मुद्देसूद लिहायला जमले नाही जसे सुचले तसे लिहलंय... यावर्षी ऊसगावाला जायची ऑफर आहे बघूया कसे आहे...
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 02/17/2017 - 07:11 नवीन
माझ्या मनातले मांडले अगदी! दुबई मलेशियाच्या ऑफर सोडण्यामागे असाच विचार होता. मला नवीन ठिकाणी जाऊन नवीन लोकांशी जुळवून घेण्यात काही दिव्य वाटत नाही, मी जिथे जिथे राहिलोय, अकोला, मुंबई, ठाणे, वाशी, नाशिक, ग्रामीण पुणे अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं कल्चर आहे पण आपण वेगळे आहोत ही जाणीव नसते. अगदी कोलकाता, गुजरात, राजस्थान, भारताच्या कोणत्याही भागात फिरलं तरी माणसं आपली आहेत हे जाणवतं. संधींची उपलब्धता हे एक रडके कारण आहे असं वाटतं, अनेक आयआयटीयन्स लोकांनी इथेच साम्राज्ये उभी केलीत, अजून खूप स्कोप आहे. येत्या पंचवीस वर्षात खूप सकारात्मक बदल होणार आहेत भारतात, लायक व्यक्तींसाठी इथे संधींची कोणतीच कमतरता नाही. दोन चार वर्षे परदेशी जाऊन राहणे ठीकच, पण तीकडे राहून येऊन इकडच्या समस्यांचा पाढा वाचणे नै पटत. कभी किसीको मुकम्मल जहाँ नही मिलता कभी जमी तो कभी आसमाँ नही मिलता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
आ
आजानुकर्ण Fri, 02/17/2017 - 20:19 नवीन
पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
अ
अभिदेश Fri, 02/17/2017 - 20:22 नवीन
अगदी हेच लिहायला आलो होतो. पीरबाई , तुम्हाला अमेरिकेत राहायचे असेल तर उगाच त्याला मुलाच्या शिक्षणासाठी वगैरे कशाला बोलताय. तुम्ही मान्य करा ना मला इकडे आवडलाय म्हणून मी राहतिये, उगाच लंगडी कारण देऊ नका. ज्या शिक्षण पद्धतीवर तुम्ही टीका करताय त्याच पद्धतीतून लाखो लोक परदेशी गेलेत , मोठ्या पदावर पोचलेत, अगदी तुम्ही आणि तुमचे यजमानसुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
प
पिलीयन रायडर Sat, 02/18/2017 - 02:50 नवीन
थोडं जास्त नाही का झालं हे? माझ्याविषयी धाग्यातल्या पन्नास ओळींपेक्षा जास्त माहिती नसताना ही अशी विधानं केलेली मला तरी आवडत नाहीत. तेव्हा वैयक्तिक न होता चर्चा करावी. बाकी तुमच्या शिक्षणाविषयीच्या विधानाला व्यवस्थित उत्तर आहे माझ्याकडे. पण मी ह्या टोन मध्ये दिलेल्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देत नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
अ
अभिदेश Tue, 02/21/2017 - 17:02 नवीन
कसं काय झालं ? आता तुम्ही मांडलेला विचार हा वैयक्तिकच आहे ना ? मग त्याला आलेलं उत्तर हे वैयक्तिक नको हे कसं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 02/21/2017 - 17:19 नवीन
तुम्ही कोण मला सांगणारे की माझी कारणं लंगडी आहेत? किंवा मला हे ऐकवणारे की मला इथे रहायचंय पण मी उगाच कारणं शोधत फिरतेय? मला कुणाची फिकीर आहे इथे की मी लंगडी कारणं शोधत फिरु? मी इथे मला अजिबात माहिती नसलेल्या लोकांचं अप्रुव्हल घ्यायला धागा काढलाय असं तुम्हाला वाटतंय का? मी माझ्या आयुष्यातला एक विचार मांडलाय. शिक्षण पद्धतीविषयी आणि भारतीय संस्कॄतीविषयी.. बास.. तुम्हाला इतकंच माहिती आहे ह्या प्रश्नाबद्दल. आणि मी सुद्धा तेवढीच चर्चा करतेय. ह्यावरुन मला हे ऐकवण्याचा संबंध काय की मी कारणं शोधत फिरतेय? आणि मी एक माझा प्रश्न मांडला तर मी हे ऐकुन घ्यावं? मी सुद्धा भारतातच शिकलेय आणि त्यात काय तृटी आहेत हे मला १००% माहिती आहे. तुम्ही ते सांगण्याची गरज मला वाटत नाही. हाच मुद्दा तुम्हाला सभ्य भाषेत मांडता आला असता. तर मी सुद्धा सभ्यपणे त्याचा प्रतिवाद केला असता. पण ज्या माणसाचे मत हे मुळात मी हे जे लिहीतेय ते खरं नाही, दिखावा आहे असं असेल, त्याला कोणतंही उत्तर देणं मी लागत नाही. तुम्ही विचारलं ना कसं झालं? तर हे असं झालं. (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
प
पिलीयन रायडर Tue, 02/21/2017 - 19:19 नवीन
प्रतिसादातला काही भाग संपादित करुन दिल्याबद्दल म्हात्रे काकांचे आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अभिदेश Tue, 02/21/2017 - 20:29 नवीन
मला जे म्हणायचे आहे , ते मांडणारे अनेक प्रतिसादांत आलेले असल्यामुळे पुन्हा तेच लिहीत नाही. मुद्दा हाच आहे कि अमेरिकेत राहायचे असेल तर राहा पण जस्टिफिकेशन नका देऊ. तूर्तास एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
च
चित्रगुप्त Fri, 02/17/2017 - 06:10 नवीन
अत्यंत उद्बोधक धागा आणि चर्चा. 'हे विश्वचि माझे घर' असे मानून कुठेही आनंदाने, बिनधास्त रहावे. आपल्या स्वतःच्या निर्णयाप्रमाणे आयुष्यातील सर्व घटना घडून येतात वा येणार आहेत, असे वाटत राहण्याचे वय वा स्थिती उलटून गेली, नियतीच्या योजनेप्रमाणे सर्व घडत असते याची स्वानुभवाने खात्री पटली, की मग तुम्ही कुठेही असलात तरी 'आनंदाचे डोही आनंद तरंग' .
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 02/17/2017 - 06:56 नवीन
1)वर बहुतेकांनी भारतातही अमेरिकेच्या तोडीचे किंवा चांगले शिक्षण मिळते असे लिहिले आहे. पण हे खरे नाही. 'चांगले शिक्षण' देणाऱ्या शाळा फार तुरळक आहेत. राहत्या घरापासूनच्या अंतराच्या दृष्टीने अशा शाळा सोयीस्कर नसतात. फारच थोड्या भाग्यवंतांना अशा 'चांगल्या' शाळा मिळू शकतात. 2) काही परदेशस्थांनी भारतातली परिस्थिती सुधारेल असा आशावाद व्यक्त केला आहे. एका स्तराची (आय टी वगैरे)आर्थिक परिस्थिती सुधारेलही कदाचित. पण सध्या विषमता इतकी टोकाची आहे की समृद्धीचे फायदे सार्वत्रिक दिसू लागायला अथवा तळागाळात झिरपायला कमीतकमी तीन पिढ्या जाव्या लागतील. तोपर्यंत दारिद्र्य, बकालपण आणि भणंग-गणंगांचा सुळसुळाट इथे ठायी ठायी दिसतच राहणार. ३)इथल्या सामाजिक जाणीवा प्रचंड मागासलेल्या आहेत. वर्कमनशिप अगदी तळाच्या पातळीवर आहे. स्वत: लक्ष्य दिले नाही तर कुठलेही मामुली कामसुद्धा सुघडपणे होणे कठीण. ४)भारतात याविषयी चिडचिड, संताप, असहायतेची भावना जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या मनात खदखदत असते. इथे राहाण्यातल्या असंतुष्टतेचे कारण प्रामुख्याने हेच असते. आणि इतर कोणतेही 'कलरफुल' सोहळे, नातेवाईकांचा गोतावळा, लग्न-मुंजी, ढोल, ताशे, उत्सव, आवाज ही ठसठस दूर करू शकत नाहीत. अर्थात 'आपुलकी' ही भावना या सर्वांहून वेगळी आणि वरचढ असते. निर्णयावर या भावनेचा अधिक पगडा असणे साहजिक आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 02/17/2017 - 07:47 नवीन
वाचतोय. उगाचच मनाला लावून न घेता प्राप्त परिस्थितीचा उत्तम उपयोग करावा अशा मताचा मी आहे. जीवन जगताना आणि इतिहास शिकताना अस्मिता बाजूला ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 02/17/2017 - 08:01 नवीन
तुम्हाला जर मनातून वाटत असेल की तिथेच रहावं (शिर्षक वाचून तसं वाटलं) तर निर्णय घेऊन टाका. ह्या बाबतीत गविंच्या मताशी सहमत - बिंधास्त रहा आणि एंजॉय करा. इतर कुठलंही जस्टिफिकेशन शोधायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
प
पद्माक्षी Fri, 02/17/2017 - 09:07 नवीन
जर मुलासाठीच निर्णय घ्यायचा असेल तर त्यालाच विचारा कि त्याला काय आवडतंय , इथे राहणे कि भारतात जाऊन राहणे. :) अमेरिकेतली शिक्षणपद्धती ही भारतातल्यापेक्षा कैक पटींनी चांगली आहे हा मुद्दाच आपल्याला पटत नसल्याने त्या मुद्द्यावर पास.
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Fri, 02/17/2017 - 11:42 नवीन
परदेशात कधीही न गेलेला असलो ( आणि जाण्याची शक्यता हि दिसत नाही ) तरीही लिहितोय . तुम्हाला वागण्या बोलण्यातील फरक जाणवतो असं म्हणताय . पण तो फक्त पुणे आणि अमेरिकेत आहे का ? तुम्ही आणि तुमचे आई वडिल तुमच्या वयात असताना किंवा लहानपणी च्या वागण्यात फरक नाहीये का ? आज मी बिनधास्त माझ्या आई वडिलांना त्यांच्या पूर्ण आदर राखून हे म्हणू शकतो . कि बाबा तुम्ही बोलताय ते चूक आहे, हे असं नसतं. ते त्यांच्या लहानपणी त्यांनी आपल्या पालकांना म्हणणं अशक्य होतं . किती मोठी चूक असली . तरी फक्त ते "मोठे आहेत" या कारणा साठी गप्प बसावं लागत होतं माझ्या आधीच्या पिढीला . हा फरक नाहीये का ? बाकी . पुस्तकी घोकंपट्टी पेक्षा , दगड आणि फुलं बघायचं शिकतोय हि माझ्यासाठी तरी खूप चांगली गोष्ट आहे. आणि "आपले संस्कार " म्हणालात . तर मग त्याच्यासाठी घरी आहातच तुम्ही पालक म्हणून . बाहेर तिथल्या गोष्टी शिकेल , घरी आल्यावर तुम्हा दोघांकडून भारतातल्या सारख्या गोष्टी शिकेल . त्या कश्या सांगायच्या ते तुम्हीच ठरवाल . जेणेकरून त्याला त्याचा भार वाटणार नाही.. उलट दोन्ही कडे चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतो हा फायदा मिळेल
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 02/17/2017 - 16:36 नवीन
अमेरीकेतली नोकरी भारतातल्या नोकरीपेक्षा चांगली असते. (बॉसींग वगैरे वगैरे ). तिकडचा कोणी मराठी उद्योजक वगैरे नाही का मिपावर ? धंदा करण्यासाठी भारतापेक्षा चांगली परिस्थिती आहे काय ? इझ ऑफ डुईंग बिजनेस ? भारतापेक्षा जास्त नफा कमविण्याच्या संधी ? बहुतेक अमेरीका रिटर्न गुजराती / पंजाबी यांच्याकडूनच माहिती घ्यावी लागणार. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी नोकरीच्याच दृष्टीकोनातून आयुष्याकडे बघतो काय ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 02/17/2017 - 17:17 नवीन
और ये लगा सिक्सर....!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
पिलीयन रायडर Sat, 02/18/2017 - 02:55 नवीन
मराठी माणसाचं इन जनरल माहिती नाही, पण मला स्वतःला कैकदा वाटलंय की कुठेही स्वतःचा काही व्यवसाय करावा. पण माझ्यात ती धडाडी नाही. जो व्यवसाय करायचा आहे निव्वळ तेवढेच स्किल्स असून फायदा नाही तर अर्थशास्त्रही समजायला हवं. मला एकंदरितच फायदा-तोटा, पैसा खेळवणे, वाढवणे, फिरवणे इ कोणत्याही गोष्टीत गतिच नाहीये. म्हणून माझे विचार नोकरी पर्यंतच. पण तुमचा मुद्दा रास्त आहे. मला स्वतःला तरी कल्पना नाही इथेल्या मराठी उद्योजकांबद्दल. खरंच शोधायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
र
रुपी Sat, 02/18/2017 - 04:10 नवीन
स्वतःचा स्टार्टअप असणार्‍यांना उद्योजक म्हणू शकतो का? मिपाकर नाटक्या यांनी रंगमंचबद्दलच्या मुलाखतीत सांगितलंय ना ते. बे एरियामध्ये माझे कित्येक जण ओळखीतले आहेत - मराठी लोक आहेत - स्वतःची कंपनी सुरु करणारे- अगदीच एकटे नाही केली तर २-३ जणांत मिळून करतात. त्या सर्वांना मिपावर यायला वेळ मिळत नसावा कदाचित. बाकी चर्चा खूप उपयुक्त आहे. मला काही नवीन मुद्दे मिळाले तर लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Sat, 02/18/2017 - 04:30 नवीन
प्रतिसाद लिहीताना माझ्या डोक्यात अगदी तेच आले होते. पण मला नक्की कल्पना नाहीये त्यांच्या स्टार्टप बद्दल म्हणून लिहीलं नाही. २-३ जणांचा मिळून आहे इतकंच माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
S
Snow White Fri, 02/17/2017 - 18:32 नवीन
मी मिपाची नवीन सदस्य... ही चर्चा वाचली आणि खूप आवडली...तुमच्यासारखंच भारतात परत जायचं की अमेरिकेत राहायचं, ही चर्चा आमच्या घरातही नित्यनेमाने घडते, पण फरक इतकाच की अजून मुले, शिक्षण या दिशेने विचार करायची गरज पडत नाहीये. एच १ विसा आणि इमिग्रेशन रीफोर्म यावर सतत चालणाऱ्या चर्चा ऐकून आम्ही दोघेही आता विसा संपला की परत जायचं या विचारापर्यंत आलो आहोत. प्रत्यक्ष कृतीत आणायला अजून वेळ आहे. पण काहीही झालं तरी हा परका देश आहे आणि अगदी कायम रहिवासी स्टेटस मिळालं तरी आपल्या देशात राहिल्याचं फिलिंग येईल असं वाटत नाही आणि तोपर्यंत एक अनिश्चितता सतत वाटत राहील. आपली मुळे एका मातीतून काढून दुसऱ्यात रुजवणं इतकं सोपं नसतं. इथे सगळ्या सोयी-सुविधा असल्या तरी आपलं असं काही वाटत नाही. आम्ही दोघेही माणसांमध्ये रमणारे आहोत त्यामुळे एकटेपणा जाणवतोच. इथेही मित्रपरिवार आहे, पण भारतात संबंधांमध्ये जी सहजता आणि मोकळीक असते, ती इथे जाणवत नाही. घरी आणि मराठी मंडळात सगळे सण साजरे होतात पण आपली नाती इथे नसल्यामुळे काहीतरी उणीव भासतच असते. मराठी मंडळात मी बरीच मुले बघते ज्यांचे आईवडील आपल्या संस्कृतीबद्दल मुलांना आपलेपणा वाटावा म्हणून प्रयत्नशील आणि आग्रही आहेत; प्रत्यक्षात मात्र मुलांना त्यात फारसा रस नसतो. ते तेवढ्यापुरतं काहीतरी करतात, पण ज्या गावाला जायचंच नाही, त्याचा पत्ता कशाला विचारा, असा गोंधळ त्यांचाही कधीतरी होतच असणार... अशी पण काही घरं आहेत, जिथे मुले कॉलेजमध्ये आहेत, इतके वर्षं इथे राहिल्याने त्यांच्यावर इथल्या विचारसरणीचा प्रभाव जास्त आहे, खूप प्रक्टिकल आहेत. त्यांच्याशी जुळवून घेताना भारतीय मनाच्या आईबापांना थोडा त्रास होतोय. पण परत जावं म्हटलं तर आता मुले भारतात जुळवून घेऊ शकणार नाहीत. स्वत: जायचं तर आईवडीलाना गरज असताना वेळ देऊ शकलो नाही आणि आता मुलांच्या गरजेच्या वेळेस त्यांना कसं सोडून जावं, अशा मन:स्थितीत आहेत. थोडक्यात, प्रत्येक टप्प्यावरच्या भारतात वाढलेल्या पती-पत्नींना प्रश्न थोड्याफार प्रमाणात सारखेच पडले आहेत. शिक्षणाचं म्हणलं तर इथलं निश्चित थोडं सरस आहे, पण भारतातली मुलंही प्रगती करतातच...कोणाशी कसं वागायचं, बोलायचं ते आपल्या अनुकरणातून शिकतच असतात. भारतातली परिस्थितीही बदलतेय. तुलना दोन्ही देशांची होऊच शकत नाही कारण त्यासाठी काहीतरी कॉमन ग्राउंड पाहिजे, दोन्ही देश सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या फारच वेगळे आहेत. सतत इमिग्रेशन रिलेटेड प्रश्न, अनिश्चितता, भिन्न संस्कृतींचा गोंधळ आणि आपली माणसं सोबत नसणं या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता तरी २ वर्षांनी परत जायचं, हे ठरलंय...सध्या इथलं लाईफ एन्जॉय करतेय...पुढे काय होईल ते पुढचं पुढे बघूया...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/22/2017 - 14:43 नवीन
कोणताही अ‍ॅटीट्यूड न ठेवता अगदी मनापासून लिहिलेला प्रतिसाद आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Snow White
प
पिलीयन रायडर Sat, 02/18/2017 - 02:46 नवीन
वाचतेय..
  • Log in or register to post comments
स
समर्पक Sat, 02/18/2017 - 05:57 नवीन
पिलियन रायडरजींना व्यनितून लिहिली होती पण त्यांनी सांगितले म्हणून चर्चेत जोडत आहे... जिथे कुठे असाल तिथे आपली मूल्ये टिकविण्याचा व संक्रमित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न निश्चित करावा. "आपली संस्कृती" याचा अगदी सखोल विचार होऊ दे. पूजा पद्धती, उपास-तापास, सण-उत्सव हे सगळे त्याचा भाग आहेत पण अगदीच वरवर, ते सतत बदलतच आले आहेत आणि राहणार आहेत. त्या पलीकडे भारतीयत्व कशात आहे असा शोध घेतला तर ते जिथे असाल तिथे ते जपण्यास भक्कम हिम्मत येईल. भारतात ते शोधणे नाही साधले तरी जपणे सहज होते कारण समाजाचे-नात्यांचे जाड आवरण नेहमी भोवती असते. इथे ती उब आपल्याला एक एक माणूस जोडून तयार करून घ्यावी लागते. खऱ्या नात्याची भरपाई करू शकेल अशी नाती इथे निर्माण करून मुलांना तो जिव्हाळा उपलब्ध करून देणे हे आपल्या पिढीचं दायित्व आहे. त्यानुसार आपल्या विचारात व वर्तनात खूप बदल करावा लागेल हे लक्षात येईल. शुद्ध आणि सात्विक प्रेम निर्माण होणे व त्यानुसार वर्तन घडणे झाले कि बऱ्याच गोष्टी परदेशात असूनही सोप्या होतात व तेव्हा "वसुधैव कुटुंबकम् जगणारी संस्कृती" काय आहे हे समजण्याचा प्रवास कदाचित सुरु होतो... भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ वगैरे तुलनाच का व्हावी हा प्रश्न पडतो. आई चे स्थान हे अढळ असते. ती दुसऱ्याच्या आईपेक्षा सुंदर आहे का श्रीमंत आहे हे सर्व अर्थहीन आहे असे मला वाटते. असो... चर्चेचा परीघ थोडा रुंदावला तर अजून काही गोष्टींकडे तुलनात्मक दृष्ट्या पाहू शकतो. थोड्या पलीकडल्या काळात स्थलांतरित झालेल्या भारतीयांची आजची पिढी कशी आहे हे पहिले तर ४-५ पिढयांपूर्वी स्थलांतरित झालेले भारतीय (फिजी, त्रिनिदाद, सुरिनाम - त्यातले काही आपल्याप्रमाणे तिथून अमेरिकेत आले त्यामुळे अधिक माहिती मिळू शकते आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये उत्तरेकडे त्यांची संख्या बरीच आहे) २-३ पिढ्यांपूर्वी संधीच्या शोधात स्थलांतरित झालेले भारतीय (इथे यातले भरपूर आहेत, तसेच इंग्लंड दुबई सिंगापुरातही बरेच असतील) आणि पहिल्या पिढीचे स्थलांतरित झालेले आपल्यासारखे , यात काय काय फरक आहेत हे संधी मिळाली तर जरूर पहा. त्यांचे आजचे वंशज कसे आहेत हे हि पहा. फार काही शिकावयास मिळू शकेल... तुमच्या तिथे भरपूर आहे अशांची लोकसंख्या. त्यांची भारत हि ना जन्मभूमी ना कर्मभूमी, पण धर्मभूमी जरूर आहे... हि नाळ जागरूक राहून जपली पाहिजे (अर्थात त्याचे महत्व असेल तर) आणि हि जागरूकता नसेल तर माझ्या एका अमेरिकन मित्राचे वाक्य जसेच्या तसे भाषांतरित : "अरे असाल तुम्ही पी. आय. ओ. आज, आणि बाळगता भारतीयत्वाच्या खुणा, पण लिहून घे, आज पासून जास्तीत जास्त तिसरी पिढी... त्याच्या आधीच हे सर्व स्वतःच्या हाताने पुसून टाकाल... कारण तो ताण सहन होणार नाही. हा मेल्टिंग पॉट आहे आणि येथे आज ना उद्या सर्व इंटिग्रेट होणारच..." पण त्याविरुद्ध भारतीय म्हणून आपल्याला "मेल्टिंग पॉट" पेक्षा "टॅको-सॅलड" प्रकारची संस्कृती हवी आहे, म्हणजेच, सर्व जण एकत्र राहू पण आपापले रंग, चव, गंध याचे वेगळेपण जपून राहू. मार्गदर्शनाचा अधिकारी मी नाही, कदाचित मी लहानच असेन आपल्यापेक्षा. पण येथील काही द्रष्ट्या संस्था-व्यक्तींच्या कार्याने प्रभावित होऊन काही सांगावेसे वाटले ते हे... कुठे राहतो याला आजच्या युगात खरेच काही महत्व नाही... अमेरिकेला आणि भारतालाही ढीगभर नावं ठेवायला काही कष्ट लागणार नाहीयेत.. त्यानी कोरडे समर्थन होईलही कदाचित, पण खरा प्रश्न अमेरिकेत आत्ता आहोत, व पुढे राहिलो तर आपले एक भारतीय म्हणून सामाजिक दायित्व काय आहे हे ओळखून तसे होण्याचा प्रयत्न ठेवणे व आपल्या परीने मुले तशी घडविणे हा नक्की आहे. आणि तो भारतात व बाहेर दोन्हीकडे सारखाच चॅलेंजिंग आहे. (आणि त्यासाठी "एक भारतीय म्हणून..." असे जेव्हा उल्लेखतो तेव्हा "पासपोर्ट सरेंडर केल्यानंतरही जे जात नाही ते" - 'भारतीयत्व' नेमके काय आहे याचा शोध घेत राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे व तो प्रवास आपल्याला सतत नवे शिकवत राहणार आहे...)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 02/18/2017 - 06:29 नवीन
वाह, काय विचार आहेत या विषयावर. खूप भावले. या धाग्यासाठी धागाकर्तीचे अन एकाहून एक प्रतिसादांसाठी सर्व प्रतिसादकांचे आभार. मी अमेरिकेत येऊन अनेक वर्षे लोटली. माझ्यासाठी शांतता, (बर्‍यापैकी) शुद्ध हवा, ट्रॅफिकमध्ये रोजचा अमुल्य वेळ न जाऊ देणे असे घटक जगण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. या कारणांमुळे इथे राहू लागल्यावर मी माझ्यातर्फे येथे स्थायिक होण्याचा निर्णय नैसर्गिक होते. आता अमेरिकन प्रशासनाने धोरण बदलल्यास अथवा माझ्या बाबतीत नकार दिल्यास माझ्या स्वतःच्या निर्णयाला काहीच अर्थ राहणार नाही ही गोष्ट वेगळी :-). एकंदरित फार जास्त विचार करुन निर्णय घेण्याचे धोरण राबवू नये असे मला वाटते कारण फार कमी वेळा आपल्या भोवतालची परिस्थिती आपल्या नियंत्रणात असते. बहुतांश वेळी आपण परिस्थितीशी जुळवून घेत असतो. जुजबी विचार करुन निर्णय घ्यावा व भविष्यात जे घडेल त्याचा सामना करण्याची तयारी ठेवावी हेच उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक
प
पिलीयन रायडर Sat, 02/18/2017 - 15:35 नवीन
हा एक नितांत सुंदर व्यनि प्रतिसाद म्हणुन इथे दिल्याबद्दल आभारी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक
ट
ट्रेड मार्क Sat, 02/18/2017 - 19:25 नवीन
सुंदर प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
श
श्रीगुरुजी Sat, 02/18/2017 - 16:29 नवीन
आणि हि जागरूकता नसेल तर माझ्या एका अमेरिकन मित्राचे वाक्य जसेच्या तसे भाषांतरित : "अरे असाल तुम्ही पी. आय. ओ. आज, आणि बाळगता भारतीयत्वाच्या खुणा, पण लिहून घे, आज पासून जास्तीत जास्त तिसरी पिढी... त्याच्या आधीच हे सर्व स्वतःच्या हाताने पुसून टाकाल... कारण तो ताण सहन होणार नाही. हा मेल्टिंग पॉट आहे आणि येथे आज ना उद्या सर्व इंटिग्रेट होणारच..."
एका समाजशास्त्रज्ञाने लिहिलेल्या लेखात मी हेच वाचले होते. स्थलांतरितांची पहिली पिढी आपली मूळ संस्कृती जास्तीत जास्त ६०% टिकवून धरू शकते. दुसरी पिढी जेमतेम १०% मूळ संस्कृती टिकवू शकते. तिसर्‍या पिढीपासून हे प्रमाण जवळपास शून्य होते म्हणजेच तिसरी पिढी ही सर्वार्थाने नवीन देशाच्या संस्कृतीशी एकरूप झालेली असते. अमेरिकेत माझ्या ओळखीचा एक ज्यू होता. त्याचे मूळ रशिया होते. सर्वात पहिल्यांदा त्याचा पणजोबा अमेरिकेत आला होता. हा चौथ्या पिढीचा प्रतिनिधी. तो आयुष्यात कधीही रशियाला गेलेला नाही व कधी जाण्याची इच्छा देखील नाही. आपले मूळ काय होते हे शोधण्याची, समजून घेण्याची त्याला कणभरही उत्सुकता नव्हती. तो सिनेगॉगमध्ये सुद्धा कधी जात नव्हता. असाच दुसरा एक रूमेनियन होता. तो देखील तिसर्‍या किंवा चौथ्या पिढीचा प्रतिनिधी होता. तू कधी रूमेनियाला गेला होतास का असे विचारल्यावर तो कुत्सित हसून म्हणाला कशाकरता मी जाऊ तिथे? माझा रूमेनियाचा काय संबंध? कोणी कितीही प्रयत्न केले तरी पुढच्या पिढीत आपली मूळ संस्कृती रुजवून टिकवून ठेवणे जवळपास अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक
स
स्रुजा Sat, 02/18/2017 - 16:53 नवीन
अप्रतिम प्रतिसाद आहे ! हॅट्स ऑफ .. !!!
"एक भारतीय म्हणून..." असे जेव्हा उल्लेखतो तेव्हा "पासपोर्ट सरेंडर केल्यानंतरही जे जात नाही ते" - 'भारतीयत्व' नेमके काय आहे याचा शोध घेत राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे व तो प्रवास आपल्याला सतत नवे शिकवत राहणार आहे.
याचा विचार खरंच करायला हवा. प्रयत्न करुन ही अजुन हे पकडीत सापडलेलं नाही. सापडलं म्हणता म्हणता निसटुन जातं. कुठे एका ठिकाणी राहणं किंवा एकिकडे च राहणं हे आजच्या काळात शक्य नाही - निदान विकसनशील देशांत आणि त्या ही तुम्ही भारतीय असाल तर मुळीच नाही. अशा वेळी हे " भारतीयत्व" काय हे मनाशी पक्कं बिंबवून घेऊन जगभर फिरणं सोपं होईल पण ते काय हे मात्र सुस्पष्ट व्हायला हवं. तुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर अजुन एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट - जी वर स्नेहा ताईने पण अधोरेखित केली - ती म्हणजे हा निर्णय घेण्याचा चॉईस आहे आज आपल्याकडे ! भारतीय म्हणुन आपल्याला या बाबतीत कृतज्ञता वाटायला हवी. आज सिरियन्स कडे बघा, इराकी लोकांकडे बघा - बिचार्‍यांनी त्यांचं घरदार , देश, मुळं सोडली की हयातीत परत तिकडे जाण्याचा पर्याय त्यांना नाहीये. निदान कायमचं जाण्याचा तर नाहीच नाही. काही जणांची माणसं पण तिकडे आहेत. माझा ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर एक गणिताचा प्राध्यापक होता इराक मध्ये. सगळं सोडून इकडे आला, पिझा प्लेस मध्ये काम केलं अजुन काही केलं आणि फायनली ड्रायव्हिंग शिकवायला लागला. तो ही एकदा जुन्या आठवणींनी हळवा झाला होता, तुम्ही लोकं लकी आहात म्हणे आधीच ईंग्रजी शिकुन येता, चांगल्या पगाराचे जॉब्ज मिळवता, हवं तर परत जाता. आम्हाला तो पर्याय च नाहीये म्हणे. परत एकदा, नितांत सुंदर आणि " समर्पक" प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक
च
चित्रगुप्त Sat, 02/18/2017 - 08:24 नवीन
एकंदरित फार जास्त विचार करुन निर्णय घेण्याचे धोरण राबवू नये असे मला वाटते कारण फार कमी वेळा आपल्या भोवतालची परिस्थिती आपल्या नियंत्रणात असते.
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Sun, 02/19/2017 - 02:06 नवीन
मस्त चालू आहे चर्चा. ( पिरातै चे कौतुक नवनवीन विषयावर चर्चात्मक धागे काढत आहे.) माझ्या मते सध्या अमेरिकेत किंवा पुण्यात घर घेतले कि पुढील ५ वर्षे कुठे राहायचे हा प्रश्न निकाली निघतो ( EMI ) त्यामुळे ५ वर्षांनी बघू .... आजचे समीकरण x = x +५
  • Log in or register to post comments
श
शेखर काळे Sun, 02/19/2017 - 06:48 नवीन
आमचा निर्णय २४ वर्षांपूर्वी असा ठरला की अमेरिकेत रहायचे. लग्न नुकतेच झाले होते. आम्ही दोघेही नागपूरचे. नोकरी पुण्यात लागली होती. घराची चणचण तेव्हाही होतीच. एका मित्राकडून कळले की अमेरिकेत बे-एरियाला जाण्याची संधी आहे. ओळखीचे कोणीच नव्हते. आम्ही तेव्हा विचार केला की जाऊन तर पाहू. भारतीय लोक हळूहळू येत होते. सुरुवातीलाच समानवयी मित्र मिळाले आणि आम्ही एकमेकांना मदत करत राहीलो. एकदा भारतात - नागपूर आणि पुणे जाऊन आल्यावर इथे राहण्याचा बेत पक्काच केला. त्यानंतर ज्या अडचणी आल्या - घर, नोकरी, संस्कृती-मेळ त्या सगळ्यातून मार्ग काढला. आमच्या दोघांच्या घरून या निर्णयाचं स्वागतच झालं. आमच्या दोघांचेही आई-वडील आमच्याकडे बरेच वेळा राहून गेलेत. पण त्यांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्हाला आमच्या आयुष्याचा मार्ग शोधण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं आणि आहे. आम्हा दोघांचंही एकमत होतं की परत जायचं झालं तर नागपुरातच जायचं अन्यथा नाही. पुणं छान आहे - पण त्याच्या जागी. बर्याच लोकांनी या चर्चेत नोकरी / धंद्याबद्दल सांगितले आहेच. त्यात नवीन काही सांगण्यासारखे नाही मला. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते मला की आम्ही कुटुंब म्हणून बर्याच गोष्टींचा बरोबर मिळून आनंद घेतला - ते मला असं वाटतं की भारतात कदाचित जमलं नसतं. पण भारतात राहणारे माझे मित्र, नातेवाईक हे त्यांच्या तऱ्हेने एंजॉय करतातच की. इथे आम्हाला आमच्या आई-वडिलांबरोबर छानच वेळ घालवता आला - त्यांना बऱ्याच ठिकाणी नेता आलं - त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस साजरे करता आले. अर्थात हे सगळेही भारतात होतेच.. मला वाटतं आम्ही त्यांना वेगळं काही दिलं. शाळांबद्दल म्हणाल तर आम्ही शिक्षकांबरोबर नेहमीच संपर्क ठेवला. जिथे मुली कमी पडतात असे वाटले तिथे त्यांना मदत केली - माझे इतर मित्रही करतातच. आता मुख्य विषय - संस्कृती - आपण आपल्या आई-वडिलाच्या वेळची संस्कृती पाळतो ? माझ्या आजोळी औदुंबराचं, वडाचं झाड होतं. तेव्हा आजोळी वेगळे उत्सव व्हायचे. माझ्या लहानपणी, आई-वडिलांकडे वेगळे उत्सव व्हायचे. त्यांनी आपल्या सोयीनुसार आमच्यावर संस्कार केले. काही संस्कार संघात जाऊन, गणपतीउत्सवात, वेगवेगळ्या देवळात जाऊन आम्ही उचलले. काही वाचनातून, टीव्ही, सिनेमे बघून झाले. मला आश्चर्य वाटतंय की आजकालच्या काळात - जेव्हा इतक्या सोयी आहेत - तेव्हा नातेवाईक / संस्कृती हे मुलांपासून दूर जातील असं वाटावं ? माझी मोठी मुलगी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन शिकते. ती महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात मराठी गाणी गाते तेव्हा ऐकून कुणी म्हणणार नाही की ही मुलगी मराठी नाही किंवा जन्मापासून परदेशात राहिलेली आहे. संस्कार ही पालकांची जबाबदारी आहे. याच गोष्टी आम्ही इतर भारतीय कुटुंबातूनही पाहतो. शिख समुदायाकडून आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यांनी त्यांची संस्कृती जपलेली आहे. दुसऱ्या, तिसऱ्या पिढीपर्यंतही जपलेली आहे. उलट मलातर म्हणायचे आहे की भारतात राहून मराठी संस्कृती जपली जातेय ? टीव्ही वरचे कार्यक्रम पहा .. किती इंग्रजी शब्द वापरले जातात .. तेव्हा संस्कृतीचा काही प्रश्न नसतो का ? मराठी शाळांत मुले जातात ? मराठी वाचतात ? भारतीय संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. महाराष्ट्रीय .. काही शे वर्षे - ती आपल्या गतीने पुढे सरकेलच. माझं असं मत आहे की आम्ही भारतीय, मराठी - अमेरिकन संस्कृतीत काही योगदान देतो आहोत - जे पुढच्या काही पिढीनंतर मान्यता पावेल. इथला इतिहास जेव्हा भविष्यात लिहिला जाईल तेव्हा या योगदानाला मान्यता द्यावीच लागेल.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Sun, 02/19/2017 - 10:21 नवीन
अजून दोर पूर्णपणे कापलेले नाहीत तो पर्यंत या परत ! तिथे राहण्यासाठी जी कोडगी मानसिकता लागते ती नाही तुमच्याकडे ! उगाच जीवाची दैना करून घेण्यात काय हशील? सारे जहां से अच्छा , हिंदोस्ता हामारा , ही काही भंपक बॉलिवूडी मेलडी नाही ! सोपाय, सुख पाहिजे असेल तर भारतात या, यश पैस्से , साधन सम्पत्ती हवी असेल तर तिथेच राहा. बाकी मुले वगैरे मुद्दा गौण आहे, आपण मुलांचे भविष्य घडवतो वगैरे या गैरसमजुतीतून लौकर बाहेर या. थोडे कडक लिहिले , पण उपमर्द करण्याचा हेतू नाही.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Sun, 02/19/2017 - 10:21 नवीन
अजून दोर पूर्णपणे कापलेले नाहीत तो पर्यंत या परत ! तिथे राहण्यासाठी जी कोडगी मानसिकता लागते ती नाही तुमच्याकडे ! उगाच जीवाची दैना करून घेण्यात काय हशील? सारे जहां से अच्छा , हिंदोस्ता हामारा , ही काही भंपक बॉलिवूडी मेलडी नाही ! सोपाय, सुख पाहिजे असेल तर भारतात या, यश पैस्से , साधन सम्पत्ती हवी असेल तर तिथेच राहा. बाकी मुले वगैरे मुद्दा गौण आहे, आपण मुलांचे भविष्य घडवतो वगैरे या गैरसमजुतीतून लौकर बाहेर या. थोडे कडक लिहिले , पण उपमर्द करण्याचा हेतू नाही.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Sun, 02/19/2017 - 10:21 नवीन
अजून दोर पूर्णपणे कापलेले नाहीत तो पर्यंत या परत ! तिथे राहण्यासाठी जी कोडगी मानसिकता लागते ती नाही तुमच्याकडे ! उगाच जीवाची दैना करून घेण्यात काय हशील? सारे जहां से अच्छा , हिंदोस्ता हामारा , ही काही भंपक बॉलिवूडी मेलडी नाही ! सोपाय, सुख पाहिजे असेल तर भारतात या, यश पैस्से , साधन सम्पत्ती हवी असेल तर तिथेच राहा. बाकी मुले वगैरे मुद्दा गौण आहे, आपण मुलांचे भविष्य घडवतो वगैरे या गैरसमजुतीतून लौकर बाहेर या. थोडे कडक लिहिले , पण उपमर्द करण्याचा हेतू नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 02/19/2017 - 16:38 नवीन
कुडन्ट अॅग्री मोअर. माहीत असलेले सर्व अमेरिकावासी अशीच कारणं शोधताना दिसतात. स्वतःचीच समजूत काढायला. ते परत येण्याची काडीची शक्यता नसते. फक्त एकीकडे परत न येण्याचं काहीतरी कारण शोधत राहतात. आत्ता तर आलोय. क्ष इतके डॉलर शिलकीस टाकून परत जाऊ. उफ्.. मुलांची शाळा स्थिरस्थावर, शिक्षणपद्धती चांगली.. त्यांचं शिक्षण होईस्तो राहू. भारतात करप्शन, धूळ इ.इ आहे हे अॅडिशनल एव्हरग्रीन कारण. ते कधीच परत येत नाहीत. फक्त दिल के बहेलाने के लिए गालिब, ये खयाल अच्छा है, म्हणत अक्षरशः उगीच जस्टिफिकेशन शोधतात. मुलगी अपत्य असली की काही काळात बडगा दिसतो. पण उशीर झालेला असतो. मुलगा अपत्य कॅन गेट अवे विथ एव्हरीथिंग. ३०-४० उदाहरणं पाहिलीत. टिपिकल गिल्ट आणि कन्फ्युजन. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/19/2017 - 17:07 नवीन
१००% सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संदीप डांगे Sun, 02/19/2017 - 20:58 नवीन
+10000 गवि, अगदी अचूक निरीक्षण आणि थेट शब्दात मांडल्याचे आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आनंदयात्री Mon, 02/20/2017 - 00:21 नवीन
>>मुलगी अपत्य असली की काही काळात बडगा दिसतो. पण उशीर झालेला असतो. मुलगा अपत्य कॅन गेट अवे विथ एव्हरीथिंग. मुलगा अपत्य असेल तर काळ का म्हणे नाही बडगा दाखवत? किंवा पालक 'गेट अवे विथ एव्हरीथिंग' करू शकतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
पिलीयन रायडर Mon, 02/20/2017 - 01:18 नवीन
मला एक कळत नाही की ह्यातलं कोणतंही कारण महत्वाचं नाहीये का? पैसा मिळवणं ही लोकांची गरज किंवा चक्क स्वप्नं असू शकतं. अनेकांना देशाची कितीही ओढ असली तरी घरची परिस्थिती अशी असू शकते की पैसा मिळवणं क्रमप्राप्त आहे. त्यांना अमेरिकेची संधी मिळाली तर का बुवा त्यांनी म्हणू नये की अमुक एक रक्कम जमवुन जाऊ? किंवा इथल्या शाळेत आपल्या मुलांना जास्त चांगल्या पद्धतीने शिकायला मिळत असेल, तर भारतीय मानसिकतेचे पालक अगदी सहज मुलांसाठी हा निर्णय घेऊ शकतात. अगदी प्रदुषण आणि धूळ हे ही तितके लहान कारण नाहीये. मी एक निव्वळ उदाहरण म्हणून सांगते, माझ्या नवर्‍याला कफाचा बराच त्रास होतो. पुण्यात ४५ मिनिटं बाईक चालवत जाणे ह्याने त्याची पाठदुखी आणि कफ दोन्ही वाढलाय. पण इथे येऊन तो त्रास खूपच कमी आहे. समजा एखाद्याला हा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्याच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहेच. भारतात स्वच्छ हवा, प्रशस्त बंगला, आजुबाजुला झाडं, नितळ नद्या वगैरे मिळणं आता अशक्य आहे. ज्याला हे महत्वाचं वाटतं त्याने सगळ्या गोंधळातून अखेर ह्या मुद्द्यांखातर इथे रहायचं ठरवलं तर त्यात चूक काय? हे सगळे त्रास असूनही मला भारतात परत जायचंय, म्हणून मी ते मुद्दे मांडलेही नाहीते धाग्यात. पण म्हणून ज्या लोकांनी "स्वच्छ वातावरण" ह्या कारणासाठी अमेरिका निवडली त्यांना मी हिणवणार नाही. ज्या देशात आपण २५-३० वर्ष राहिलो, जिथे आपले लोक आहे- परिवार आहे, ते सगळं कायमचं सोडून, नव्या देशात जम बसवण्याचा निर्णय घेणं सोपं काम नाही. दुसर्‍या देशातली सुबत्ता आणि त्याचा पुढच्या पिढीला होऊ शकणारा फायदा खुणावत असतो, तिकडे मन तर भारतातही गुंतलेलं असतं. अशावेळी ही घालमेल, अशी जस्टीफिकेशन्स मी समजु शकते. तुम्हाला हा सावळा गोंधळ वाटत असेल, नव्हे तो असतोच. पण लोक तो हेतुपुर्वक करत नसतात. प्रॅक्टीकल निर्णय घेणार्‍या माणसांना भावनाच नसतात असं नाही. आणि भारतात परत येणं हाच सर्वात मॉरली करेक्ट निर्णय असेल असंही नाही. म्हणुनच माझी ओढ जरी भारताकडे असली तरी परत न येणार्‍यांना मी हिणवत नाही हे नक्की. तुमच्या प्रतिसादातून मात्र तसं होताना जाणवतंय. कारण काही कळालं नाही. बाकी अपत्याबद्दलच्या मताबद्दलही असहमती आहेच. बडगा दिसतो वगैरे शब्दांनी सरसकट पुढच्या पिढीची वाटच लागते आणि पालकांना पश्चातापच होतो असा सूर लागलाय. जो फारच चुकीचा आहे. पद्धती आणि मुल्य बदलत असतील नव्या पिढीची.. पण अनेकांनी वर ह्याबद्दल अत्यंत सकारात्मक मतं मांडली आहेत. शेखर काळे ह्यांनी आपल्या मुलीचे उदाहरण दिले आहे. आमच्या घरात जुलै मध्ये लग्न होऊन येणारी मुलगी भारतीय वशांची पण अमेरिकन आहे. चांगल्या मुली आहेत ह्या. अनेक असतील अशा. असं असताना मुलगी अपत्य असेल तर... वगैरे विधानं तर अगदीच गैरलागु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संदीप डांगे Mon, 02/20/2017 - 06:04 नवीन
धूळ, पोलुशन, ट्राफिक, दगदग बद्दल सतत येणारे प्रतिसाद बघता फक्त मुंबई पुणे म्हणजे भारत असा काहीसा दृष्टिकोन दिसतोय... वरील मुद्दे मला मुंबई च्या वास्तव्यात जाणवले तेव्हा मी नाशिकला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. सॉफ्टवेर इंडस्त्रीतल्या लोकांसाठी इथेही संधी आहेत, इथल्या कंपन्यांना चांगले टॅलेंट मिळत नाही कारण ते सर्व इथून निघून मुंबई पुण्यात जायला प्राधान्य देतात, कारणं देतात, पैसा, प्रतिष्ठा. इ इ. स्वच्छ हवा, आजूबाजूला झाडे नितळ नद्या आहेत भारतात, फक्त पुण्यात-मुंबईत नाही मिळणार. भारतात गर्दी आहेच, तो नाकारण्याचा मुद्दा नाही. पण जेव्हा देश म्हणतो आपण तेव्हा तो फक्त मोठ्या रस्त्यांवर, चौकातल्या ट्राफिक मध्येच दिसतो असं काही प्रतिसाद बघून जाणवलं . रस्ते, धूळ, ट्राफिक, मुंबई, पुणे च्या बाहेर खूप मोठा देश आहे आपला. काही शहरं वाईट, काही खूप चांगली आहेत, कुठे संधी आहेत, कुठे शांतता सुख आहे. दोन देशांची तुलना करायची तेव्हा दोन पाच सॅम्पल वरून बनवणे गैर तर आहेच तसेच अशी तुलनाच गैर आहे असे आता वाटायला लागलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 02/20/2017 - 06:17 नवीन
गैरच आहे. पण पर्यायच तेच आहेत. दुसरं असं की "प्रामुख्याने" जे लोक अमेरिकेत जात आहेत ते आयटी क्षेत्रातले आहेत. ह्या क्षेत्राशी निगडीत नोकर्‍या भारतात "प्रामुख्याने" मेट्रो सिटी मध्ये आहेत. जिथे वर नमुद केलेले प्रश्न भेडसावतात. नाशिक बद्दल मला कल्पना नाही. पण ते ही एक मोठे शहरच आहे, लहान शांत गाव वगैरे नाही. आणि तसं तर आमच्या औरंगाबादमध्येही स्वतःची आयटी कंपनी असलेला (आणि ती इबेला विकणारा) एक मराठी माणुस आहेच. पण % किती अशा लोकांचा? अमेरिकेतून परत येणारा माणुस परत येऊन शांत प्रदुषणविरहीत गावखेड्यात रहाण्याचं प्रमाण किती असेल? सध्या असलेल्या स्किलसेटसोबत ही अमेरिकेतल्या कंपन्यांमधुन परतलेली माणसं नक्की तिथे काय करणार? बहुतांश लोकांचं जे होतं त्यावरच चर्चा होणार ना डांगेअण्णा! ह्यात मुद्दाम पुणे मुंबईपुरतीच चर्चा व्हावी असा हेतू नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 02/20/2017 - 06:44 नवीन
वैयक्तिक निर्णयामागे वैयक्तिक कारणे असतात व ती मान्यच. त्यातही कोणता वाद नाही. पण बहुतेक गिल्ट लपवण्यासाठी जी जस्टीफिकेशन दिली जात आहेत काही प्रतिसादांतून त्यामुळे भारताचे वैट्ट देश असे काहीसे सरसकट चित्र उभे करण्याचा काहींचा प्रयत्न दिसतोय, तो होऊ नये म्हणून वरील प्रतिसाद दिलाय. वैयक्तिक लोभापायी देशाला नावे ठेवणं अजिबात पटत नाही. "इथे कशाला परत यायचं, काय आहे इथे" असली विचारसरणी वाल्याना (तुम्ही नाही) सांगू इच्छितो की इतर कोणत्याही देशांत कुठेही तुमच्या अस्तित्वावर प्रश्न उभा राहिला की हाच देश तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे कायम. एवढी जाणीव असली तरी पुरे. मला इथे काही जिंगोईजम मिरवायचा नाहीये बस एक सत्य समोर ठेवायचे आहे. अशी लोकं तिथले प्रॉब्लेम्स अजिबात उघड करत नाहीत पण इथले मात्र चढाओढीने चर्वत असतात असे निरीक्षण आहे, वरून देशभक्तीचा फुरकाही येताजाता मारत असतात... अशांसाठी माझा प्रतिसाद होता. असो. विषय अजून भटकू नये म्हणून थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ग
गवि Mon, 02/20/2017 - 07:36 नवीन
मला एक कळत नाही की ह्यातलं कोणतंही कारण महत्वाचं नाहीये का? पैसा मिळवणं ही लोकांची गरज किंवा चक्क स्वप्नं असू शकतं. अनेकांना देशाची कितीही ओढ असली तरी घरची परिस्थिती अशी असू शकते की पैसा मिळवणं क्रमप्राप्त आहे. त्यांना अमेरिकेची संधी मिळाली तर का बुवा त्यांनी म्हणू नये की अमुक एक रक्कम जमवुन जाऊ?
अवश्य म्हणावं. आपण आपल्या आयुष्याचे मालक. आपण कोणत्याही अपेक्षा, टार्गेट्स ठेवावीत. इथे मुद्दा इतकाच की या परत येण्याची जोरदार इच्छा असलेल्या लोकांतले ९९% लोक टार्गेट्स/ रक्कम/ कर्जफेड/ शिक्षण / ठरलेली वर्षे इ.इ. पूर्ण झाली तरी परत येतच नाहीत. नवनवी कारणरुपी ध्येयं निर्माण करुन उद्यावर ढकलतात परत येणं. तिथे कायम राहण्यामागे खरी कारणं उदा. तिथलं स्वातंत्र्य, सासरच्या कटकटींतून सुटका, समाजाच्या भोचक टेहेळणीपासून दूर मुक्त मनाने राहता येणं, व्यावसायिक आणि अभ्रष्ट कार्यपद्धती, मुख्य म्हणजे समृद्ध राहणीमान(पैसा आलाच त्यात) वगैरे अशी अनेक असतात. पण प्रामाणिकपणे ते मान्य करुन पक्का निर्णय करण्याऐवजी भारताकडे वळून एक पाय परतीकडे ठेवायचा अन कुचमत राहायचं असं चित्र मेजॉरिटीमधे दिसतं. बोलताना सतत भारतात जायचंय, जाणार, आय मिस इंडिया अशा आशयाचं केवळ उल्लेखत मात्र राहायचं पण वीसतीस वर्षं परत यायचं नाही हे हरकत घेण्याजोगं नसलं तरी ती आत्मवंचना वाटते इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मराठी_माणूस Mon, 02/20/2017 - 07:57 नवीन
नेमके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अभिदेश Tue, 02/21/2017 - 17:07 नवीन
हेच मी आधीच्या प्रतिसादात मांडले तर पीरबाईना ते वैयक्तिक वाटले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
र
रेवती Mon, 02/20/2017 - 15:05 नवीन
मुलगी अपत्य असली की काही काळात बडगा दिसतो. पण उशीर झालेला असतो. मुलगा अपत्य कॅन गेट अवे विथ एव्हरीथिंग. अमान्य आहे. हे असं बोलणंही बरोबर नाही. जे पालक मुलांना व मुलींनाही एक चांगला नागरिक बनवण्यासाठी झटत असतात त्यांचा विचार करता हे बोलणे टाळलेले बरे. इथे आजूबाजूला शेकड्याने भारतीय लोक आहेत ज्यांची मुले, ज्यात मुलीही आल्याच व्यवस्थितपणे वाढतायत. बडगा कसाला हो? भारतात मुलगे आणि मुली काय कमी बडगे दाखवतात का? एकदा डॉ. खरे यांचे लेख वाचलेत किंवा त्यांना विचारलेत तरी समजेल. माझा मुलगा इथे वाढवताना त्याने कसेही वागलेले मी चालवून घेईन का? तर नाही. तुम्ही असे बोलताना पुन्हा विचार केलेला बरा. तुम्ही भारतात राहता, आता तुमच्या अपत्याने कसेही वागले तर चालेल का?? लोकांच्या मुलांच्याबाबतीत बोलताना विचार करा. उलट परिस्थिती आहे. भारतात मुलगे हवं ते करून पळून जाऊ शकतात पण इथे डि एन ए टेस्ट करून ज्याच्या जबाबदार्‍या त्याच्या गळ्यात घातल्याशिवाय कोणी गप्प बसत नाही. भारतात मुलींवर झालेले अन्याय, अत्याचार लपवण्याकडे कल अजूनही आहे तितकासा इथे माझ्या पाहण्यात नाही. मुलींना भारतापेक्षा जास्त कायद्याचा आधार आहे. तुमचे विचार योग्य शब्दात मांडू शकता तसेच अनुभव लिहू शकता पण अश्याप्रकारे आमच्या मुलामुलींबाबत सरसकटपणे लिहिलेले मान्य नाही. तुमच्याकडे आमच्याबाबत पुरावा असल्यास द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 02/20/2017 - 15:50 नवीन
१. स्वतःच्या बारातेरा वर्षांच्या मुलीने पियर प्रेशरने कॅज्युअल फ्री सेक्स करणं.. हे शुद्ध तुपातल्या देसी आईवडिलांना चालणं. किंवा २. आजूबाजूला सर्वजण ते करत असताना तिला भारतीय संस्कृतीचा वास्ता देऊन संस्कारीपणे दूर ठेवणं आणि तथाकथित पण तिच्या बाबतीततरी सत्य असा न्यूनगंड / एलियन असल्याची जाणीव निर्माण होऊ देणं.. असे दोन ऑप्शन्सच उपलब्ध असल्याचं याविषयीच्या स्टडीजमधून वाचलं आहे. यापैकी कोणताही ऑप्शन मुलीसाठी योग्य वाटत असल्यास समस्त अमेरिकावासीय पालकांची हात जोडून माफी. डिफेन्स आणि स्वतःला समजावणं अमेरिकन पालकांकडून शिकावं. असो. यापुढे नाही बोलणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
स्रुजा Mon, 02/20/2017 - 16:32 नवीन
या ज्या स्टडीज असतात ना ते " हे प्रमाण वाढलं आहे" हे दाखवतात, सरसकट सगळे तसेच वागतात असं सांगत नाहीत. मी पहिल्या प्रतिसादापासून तेच सांगायचा प्रयत्न करते आहे की नीतीमुल्यं कुणाची ही वेगवेगळी नसतात. कुणी ही १२-१३ वर्षाच्या मुलीला सेफ असो वा आदरवाईज, सेक्स साठी परवानगी देणार नाही अगदी अमेरिकन पालक पण नाहीत , भारतीय वंशाचे तर नाहीच नाही. आणि असं काही पीअर प्रेशर नसतं, ते तुमच्या संगतीवर अवलंबुन असतं आणि शाळेत दिलं जाणारं सेक्स एजुकेशन बघता त्या वयाच्या मुलांना आपण काही तरी चूकीचं म्हणा किंवा नंतर अवदसा ओढवून घेणारं करतोय याची जाणीव नक्कीच असते. आणि ती तीव्रतेने होतेच. त्यांचं घरचं वातावरण, मित्र मैत्रिणी असे नाना घटक त्यात असतात - आणि हेच सगळं आपल्याकडे ही असतं. जगाच्या पाठीवर कुठे ही गेला तरी माणूस सारखाच. अशा स्टडीज भारताच्या बाबतीत पण असतात - उद्या कुणी निर्भया केस वरुन इथे स्त्रियांचं आयुष्य धोक्यात आहे अशी स्टडी केली तर? तुमच्या प्रतिसादाला उद्देशुन हे बोलायची वेळ आली असती असं वाटलं नव्हतं पण हा धागा निघाल्यापासून जे बोलायचं टाळते आहे ते हे की " भारतीय संस्कृती महान, त्यांच्याकडे फक्त पैसा आणि साधन संपत्ती " हा भारतीयांनी करुन घेतलेला गोंडस गैरसमज आहे - अहंकार कुरवळायला बरं पडतं मग ! त्या देशांनी जे करुन दाखवलंय त्यासाठी प्रचंड प्रमाणात सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती लागते. आपला देश साफ राहिला पाहिजे, इथे इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे हे तिथल्या प्रत्येकाला मनापासून वाटलं आणि आज ४ पिढ्या झाल्या तरी ते लोकं ती मुल्यं मनापासून जपतात. गेल्या काही वर्षात आपली निम्मी सामाजिक इच्छाशक्ती कामाला लागलीये तर घडणारे बदल ठसठशीत पणे दिसायला लाग्ले आहेत. शेवटी मुल्यं - व्हॅल्युज म्हणजे वेगळं काय असतं? राजकीय नेते पण त्याच जनतेमधुन येतात त्यामुळे आपल्याकडच्या भ्रष्टाचाराचं उत्तरदायित्व, मुलं जर खोटं बोलून बाहेर बॉफे / गफे ला नुसतं भेटायला जात असतील, आम्ही आमच्या बॉफे. गफे ला भेटायला जातोय हे मोकळेपणाने ते घरी सांगू शकत नसतील तर पालक म्हणुन उत्तरदायित्व आपल्याकडेच येतं. यात तमाम भारतीय पब्लिक आलं - बाहेर राहणारं, देशात राहणारं. आपण हे कधी समजून घेणार की नीतीमुल्यं ही तुमच्या दैनंदीन जीवनात सचोटीने जगणे यापेक्षा फार काही मोठी किंवा वेगळी नसतात. रेवाक्का म्हणते तसं काही वेडं वाकडं झालं तर त्या मुलीला देणार आहे का आपला देश/ समाज थारा? आपल्याकडचा सोशल स्टिग्मा तिला जिणं नकोसं करेल आणि त्याचा परिणाम त्या अर्भकावर होणार - समाज म्हणुन आपली जबाबदारी नाही? समाजातल्या प्रत्येक घटकाला - अगदी बाहेरून आलेल्याला पण - एका ठराविक सन्मानाने जगता येईल अशा प्रकारची जीवनशैली ऑफर करण्याची ताकद त्या देशांमध्ये आहे - आपण आपल्या महान संस्कृतीमध्ये आपल्याच लोकांना तो सन्मान जेंव्हा देऊ तेंव्हाच यातुन बाहेर येऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा