Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७

ग
गॅरी ट्रुमन
Fri, 12/01/2017 - 07:04
🗣 310 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीचे पडघम वाजू लागले आहेतच. राज्यात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सकाळपासूनच मिपावर ऑनलाईन असणारच आहे. या लेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयीचे माझे मत मांडणार आहे. खालील नकाशात दाखविल्याप्रमाणे गुजरात राज्यात कच्छ, सौराष्ट्र, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच विभाग आहेत. Gujarat (संदर्भः http://www.gujaratindia.com/images/guj-map-divied.jpg) खालील तक्त्यात या विभागांमध्ये येणारे जिल्हे आणि एकूण विधानसभा मतदारसंघ दाखविले आहेतः Regions खालील तक्त्यात या विभागांमध्ये गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल कसे लागले हे बघता येईल. 1 २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामुळे २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील विभागांमधील मतदारसंघांच्या संख्येत फरक होता हे या तक्त्याच्या शेवटच्या दोन कॉलमवरून कळेलच. या तक्त्यावरून आपल्याला पुढील निष्कर्ष काढता येतातः १. राज्यात भाजप सर्व विभागांमध्ये बर्‍यापैकी शक्तीशाली आहे. अनेकदा राज्यात सत्तेत असले तरी राज्याच्या सर्व विभागांमध्ये एखाद्या पक्षाची ताकद असतेच असे नाही. गुजरातमध्ये भाजपची अशी स्थिती नाही. २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्येच भाजपने काँग्रेसपेक्षा दोन जागा कमी जिंकल्या होत्या. इतर सर्व विभागांमध्ये भाजपने काँग्रेसपेक्षा बर्‍याच जागा जास्त जिंकल्या होत्या. २. एकेकाळी दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष बर्‍यापैकी ताकद राखून होता. पण हळूहळू भाजपने काँग्रेसला तिथूनही हुसकावून लावले असे दिसते. ३. तक्त्यावरून कळेलच की मध्य गुजरातमध्ये २०१२ मध्ये २००७ च्या तुलनेत ४ विधानसभा जागा जास्त होत्या तर दक्षिण गुजरातमध्ये ३. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील जागांची संख्या अनुक्रमे ४ आणि ३ ने कमी झाली. यातही अजून महत्वाचे म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागातील विधानसभा जागांची संख्या वाढली आहे तर ग्रामीण भागातील जागांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील तीन सर्वात मोठी शहरे आहेत अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा. त्यापैकी दोन, अहमदाबाद आणि वडोदरा मध्य गुजरातमध्ये आहेत तर सुरत दक्षिण गुजरातमध्ये आहे. २००७ मध्ये अहमदाबाद शहरामध्ये १२, सुरत शहरामध्ये ७ तर वडोदरा शहरामध्ये ३ जागा होत्या. त्या २०१२ मध्ये वाढल्या आणि अहमदाबादमध्ये आता १७, सुरतमध्ये ९ आणि वडोदरामध्ये ५ जागा झाल्या आहेत. गुजरात हे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे त्या राज्यात शहरी भागातील विधानसभेच्या जागांची संख्या वाढणे क्रमप्राप्त होते. भाजप शहरी भागांमध्ये बर्‍यापैकी बलिष्ठ आहे. त्यामुळे शहरी भागामधील विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याचा फायदा २०१२ मध्ये भाजपलाच झाला होता. मी म्हणत आहे की भाजप शहरी भागांमध्ये बलिष्ठ आहे. वर दिलेल्या तक्त्यावरून ते कळणार नाही. त्यासाठी आपल्याला राज्यातील शहरांमध्ये २०१२ च्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होती हे बघायला लागेल. ते खालील तक्त्यात दिले आहे. 1 यावरून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. २०१२ मध्ये भाजपने या शहरांमधील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या म्हणजे या शहरांमध्ये भाजपचा 'स्ट्राईक रेट' जवळपास ९०% होता. २०१२ मध्ये भाजपने पूर्ण गुजरातमध्ये १८२ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ ही शहरे सोडून राज्याच्या इतर भागांमधून भाजपने १४१ पैकी ७८ जागा जिंकल्या होत्या म्हणजेच ही शहरे वगळता भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५५% म्हणजे त्या मानाने बराच कमी होता. उरलेल्या १४१ जागांपैकी अनेक जागा निमशहरी भागातील आहेत. या जागांवर भाजपचा स्ट्राईक रेट ९०% नसला तरी ५०% पेक्षा नक्कीच बराच जास्त होता. म्हणजेच ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५०% पेक्षा थोडा कमीच होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागांमधील जागा वाढल्याचा भाजपला कसा फायदा झाला हे त्यातून समजू शकेल. गुजरात निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आता लिहितो. २०१७ च्या परिस्थितीविषयीचे माझे मत राज्यात भाजप मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या कालावधीतला खंड वगळता) सतत सत्तेवर आहे. इतकी वर्षे सत्तेत असल्यामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसणे अपेक्षित आहे. त्यातच हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले होते. २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागात भाजपने आपला बालेकिल्ला राखला पण ग्रामीण भागात मात्र बर्‍यापैकी पिछेहाट झाली होती. अशावेळी भाजपला या निवडणुका जड जाणार का या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा तौलनात्मक अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही. याविषयी मला पुढील मुद्दे मांडायचे आहेतः १. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा लोकप्रिय स्थानिक चेहरा नाही हा पक्षापुढे असलेला मोठा अडसर आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केलाच पाहिजे ही गरज आता राहिलेली नाही. कारण नरेंद्र मोदींचे स्थान आता इतके मोठे झाले आहे की मोदी राज्यांमध्ये मुख्यमंत्री व्हायला जाणार नसले तरी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप मोदींच्या नावावर मते मागू शकतो. उत्तर प्रदेशात त्यातून मोठे यश पक्षाने मिळवले होते. पण जर विरोधी पक्षांनी स्थानिक लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर मात्र भाजपचा पराभव होऊ शकतो हे दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालातून कळतेच. गुजरातमध्ये काँग्रेसकडे असा चेहरा मुळातच नाही याचा त्रास काँग्रेसला होईल असे मला वाटते. २०१२ मध्ये मी गुजरात विधानसभा निवडणुकांचा बराच अभ्यास केला होता.तेव्हा जाणवले होते की स्थानिक उमेदवार कोणीही असला तरी मतदारांपुढे मोदींचा चेहरा आणि त्यांची लोकप्रियता हे मुद्दे महत्वाचे होते म्हणजे एका अर्थी सर्व १८२ जागांवर भाजपकडून नरेंद्र मोदीच निवडणुक लढवत आहेत अशी परिस्थिती होती. आज मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपदावर गेले असले तरी या परिस्थितीत फार फरक पडलेला दिसत नाही. २. नोटबंदी आणि जी.एस.टी नोटबंदी आणि जी.एस.टी चा भाजपला त्रास होईल का? हे दोन्ही निर्णय घेताना मोदींनी मोठी राजकीय जोखिम उचलली होती. व्यापारी आणि छोटेमोठे व्यावसायिक हा जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचा पाठिराखा होता. गुजरातमध्ये या वर्गाचे प्रमाण बरेच मोठे आहे.या वर्गातून करचुकवेपणाचे प्रमाण मोठे होते हे अगदी उघडे गुपित आहे. पण जी.एस.टी मुळे यांनाही कर भरणे सक्तीचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात भाजपविरोधी असंतोष असणे अपेक्षित आहे. तरीही याविषयी मला दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतातः २अ: नोटबंदीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि त्याचे प्रतिबिंब उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये उमटणार असे चित्र उभे केले गेले होते. तसे काहीही झाले नाही. याचे कारण काय असावे? माझ्या मते नोटबंदीनंतर प्रथमच श्रीमंतांची तारांबळ उडत आहे, त्यांना बँकेपुढे रांगा लावाव्या लागत आहेत असे चित्र उभे राहिले. नाही म्हटले तरी गरीब वर्गात श्रीमंतांना असा त्रास द्यायचा निर्णय मोदींनी घेतला याचे समाधान वाटले असेल तरी आश्चर्य वाटायला नको. त्यातूनच पूर्वी भाजपला कधीही मत न दिलेल्या वर्गानेही भाजपला मते दिली. म्हणजे नोटबंदी आणि जी.एस.टी मुळे भाजपचा पारंपारिक समर्थक वर्ग जरी दुखावला गेला असला तरी त्याची भरपाई भाजपला पूर्वी कधीही मत न दिलेल्या वर्गाच्या समर्थनातून होऊ शकेल असे मला वाटते. २बः दुसरे म्हणजे जरी नोटबंदी आणि जी.एस.टी हे निर्णय आवडले नसले तरी दुखावल्या गेलेल्या वर्गापुढे दुसरा कोणता समर्थ पर्याय आहे का? राहुल गांधींनी कितीही राणा भिमदेवी थाट आणला असला तरी त्यांच्या मर्यादा सर्वांनाच माहित आहेत. याविषयी भाऊ तोरसेकरांनी एका लेखात म्हटले आहे की ऐन दिवाळीत महाराष्ट्रात एस.टी चा संप झाला त्यावेळेनंतर टमटम, खटारा इत्यादी स्थानिक वाहतुक सेवांना पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त बरकत आली का? तर तसे होऊ शकले नाही कारण शेवटी गावांमध्ये सेवा पुरविण्यात एस.टीचा हात कोणी धरू शकत नाही.त्यामुळे लोकांना एस.टी शिवाय पर्याय नव्हता. भाजपची गुजरातमधील स्थिती काहीशी तशीच आहे. ३. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश त्रिकूट हार्दिक पटेलने भाजपपुढे सुरवातीला मोठे आव्हान उभे केले ही गोष्ट खरी आहे. पण काँग्रेसने त्याचा योग्य फायदा उचलला नाही असे म्हणावेसे वाटते. हार्दिक पटेलची मागणी आहे पाटिदार समाजाला आरक्षण द्यावे. आणि असे आरक्षण दिल्यास मुळात आरक्षण मिळणार्‍या ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी एक वाटेकरी येणार म्हणून ओबीसींचा या पाटीदार आरक्षणाला विरोध आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचे म्हणणे तेच आहे. म्हणजे हार्दिक आणि अल्पेश यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. या दोघांनाही काँग्रेसने एकाच वेळी एकत्र आणले असले तरी त्यामुळे त्यांचे समर्थक मात्र दुखावले गेले आहेत हे नक्कीच. सुरवातीला आपले आंदोलन गैरराजकीय असेल असे जाहिर करणार्‍या हार्दिकने नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली हे न आवडल्यामुळे हार्दिकच्या अनेक समर्थकांनी त्याच्या आंदोलनाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे सुरवातीला हार्दिक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या होत्या. तसेच नंतर हार्दिक समर्थकांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये आधी जाहिर केलेले उमेदवार बदलले. काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर युती करताना जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होताना दिसत आहे. जो काही निर्णय असेल तो पडद्याआड घेऊन मग जाहिर करणे श्रेयस्कर ठरले असते पण काँग्रेसने घाईघाईत निर्णय घेतला हे जाहिर केले आणि दुसर्‍या पक्षाच्या हातात जास्त बार्गेनिंग पॉवर आपण होऊन दिली. आता दलित नेता जिग्नेश मेवानीने काँग्रेसबरोबर निवडणुक न लढवता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवायचे ठरवले आहे. इतके दिवस या त्रिकूटाचा पाठिंबा आपल्याला असणार असे चित्र काँग्रेसने उभे केले होते. भाऊ तोरसेकरांनी हार्दिक पटेलविषयी एक म्हणणे मांडले आहे. ते म्हणतात की २०१२ मध्ये पाटीदार समाजाचे सर्वात ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून मोदींना आव्हान उभे करायचा प्रयत्न केला होता. त्याचे काय झाले? केशुभाईंच्या पक्षाला ३% मतेही मिळू शकली नव्हती. हार्दिक हा केशुभाईंपेक्षा जास्त लोकप्रिय आहे का? भाऊ तोरसेकरांनी आणखी एक मुद्दा मांडला होता. १९७० च्या दशकात गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले होते त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांची नावेही आपल्या आता लक्षात आहेत का? असे नेते येतात आणि जातात. विशेषत: धरसोडपणा केल्यास अशा नेत्यांची विस्मृतीत अस्तंगत व्हायची शक्यताच सर्वात जास्त. ४. काँग्रेसमधील लाथाळ्या गुजरात निवडणुकांपूर्वी काही महिनेच शंकरसिंग वाघेला पक्षातून बाहेर पडले. वर दिलेल्या तक्त्यातून समजते की २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा २ जागा जास्त जिंकल्या होत्या. त्याच भागात-- पंचमहल, दाहोद, गोध्रा शंकरसिंग वाघेलांना काही प्रमाणावर जनाधार आहे. वाघेलांनंतर काँग्रेसचे अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलच्या समर्थकांना उमेदवारी द्यायला लागली म्हणून काँग्रेसने आधी उमेदवारी जाहिर केलेल्या काहींचे तिकिट कापले. हे सगळे प्रकार काँग्रेससाठी नक्कीच चांगले नाहीत. विशेषतः २२ वर्षांनंतर भाजपला हरवायची संधी प्रथमच चालून आलेली असताना एकदिलाने आणि व्यवस्थित आखणी करून निवडणुकांना सामोरे जायला पाहिजे होते. तसे होताना मात्र दिसत नाही. काँग्रेस बर्‍यापैकी सुस्थितीत असलेल्या उत्तर गुजरातमध्ये (पाटण, बनासकांठा जिल्ह्यात) पूर आला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगलोरला जाऊन बसले होते हे चित्र उभे करण्यात भाजप बर्‍यापैकी यशस्वी झाला. जर पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असेल तर त्याचा दोष राज्य सरकारला जायला हवा. पण नेमक्या त्याचवेळी काँग्रेस आमदार बंगलोरला जाऊन बसल्यामुळे राज्य सरकारला 'तुम्ही काय केलेत' हा प्रश्नही काँग्रेसला विचारायची कोंडी झाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांविषयीचे माझे मत या सगळ्या परिस्थितीत मला वाटत आहे की भाजपला या विधानसभा निवडणुका जिंकायची चांगली संधी आहे. सुरवातीला अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेसने नेहमीप्रमाणे सगळ्याचा विचका केलेला दिसत आहे. मला वाटते की भाजप १८२ पैकी १३० ते १३५ जागा जिंकेल. प्रत्यक्षात काय होईल हे १८ डिसेंबरलाच समजेल. राजदीप सरदेसाईंचे गुजरातमधील राजकीय परिस्थितीविषयी एक विधान देऊन हा लेख संपवतो. राजदीप सरदेसाई म्हणतातः “Only anger can unseat BJP in Gujarat. At the moment, there is disappointment with BJP but not outright anger” १४ डिसेंबरला दुसर्‍या फेरीतील मतदान झाले की नंतर एक्झिट पोल्सचे निकाल येतील. शक्य झाल्यास त्यापूर्वी मतमोजणीपूर्व धागा काढून कसेही निकाल लागल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी माझे मत मांडेन.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
83433 वाचन

💬 प्रतिसाद (310)
ग
गॅरी ट्रुमन Fri, 12/01/2017 - 07:12 नवीन
मी राजकीय परिस्थितीवर भाष्य करायला https://www.facebook.com/indian.political.observer/ हे फेसबुक पेज सुरू केले आहे. या लेखातील बरेचसे मुद्दे त्या पेजवर आधीच मांडले आहेत. आपली इच्छा असल्यास ते पेज लाईक/ फॉलो करावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 12/01/2017 - 07:34 नवीन
खरं म्हणजे, मीडियातील बातम्या वाचून माझं असं मत झालंय .... निवडणूक तशी बी जे पी जिंकेल, पण लीड बराचसा कमी असेल.... परंतु त्यामुळे (म्हणजे जिंकूनही) देशाचा मूड बदलत (विरोधात जायला सुरुवात) आहे असा मेसेज जाईल... फक्त बी जे पी ने स्वीपिंग विजय मिळवल्यावरच, अमित शहा / मोदी जोडगळीच्या चेहेऱ्यावर खरे हास्य फुलेल... नाहीतर बीजेपी अंतर्गत लाथाळ्या लवकरच दिसू शकतात.. राहुल गांधी सर्वात सेफ पोजिशन मध्ये आहे, अपयश आले तर नावे ठेवायला काही जास्त स्कोप नाही, अलरेडी खूपच हेटाळणीला तोंड दिलंय, मात्र यदाकदाचित जर ... टफ फाईट दिली जातेय किंवा निसटते बहुमत जरी जवळपास आले, तर पप्पू पप्पू म्हणून इतकी संभावना केलेल्या व्यक्तीकडूनही मोदी सारख्या राजकीय शक्तिशाली व्यक्तीला टफ फाईट मिळाली तर, भक्तांना 'फूट इन माऊथ' स्थितीचा सामना करावा लागू शकतो ... बघूया काय होतंय ! सध्याला सट्टेबाजांकडून बीजेपी फेवरीट आहे ....
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 12/01/2017 - 07:48 नवीन
फक्त बी जे पी ने स्वीपिंग विजय मिळवल्यावरच, अमित शहा / मोदी जोडगळीच्या चेहेऱ्यावर खरे हास्य फुलेल...
म्हणजे किती? १५०? माझा (बातम्या बघून/वाचून बनलेला) अंदाज: भाजप १२०. काँग्रेस ५०.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 12/04/2017 - 05:27 नवीन
सेफ पोजिशनमध्ये
अहिल्याबाई होळकर यांचे राज्य जप्त करण्याच्या इराद्याने, जेव्हा रघुनाथ पेशवे मोहिमेचा विचार करू लागले, तेव्हा अहिल्याबाईनें रघुनाथ पेशव्यांना पत्र धाडले, लिहिले, तुम्ही युद्ध करून, मला पराजित केले, तर जग म्हणेल, त्यात काय विशेष, एका स्त्रीला युद्धात हरवले तर काय मोठा पुरुषार्थ तो ??? बाईसाहेब दुर्बलच आहेत, हरणारच होत्या.... परंतु यदाकदाचित जर, माझ्यासारख्या एका स्त्रीकडून पराभव स्वीकारावा लागला, तर आपल्या पुरुषार्थाची किती नाचक्की होईल ??? हा मुत्सद्दी विचार करूनच आपण, नर्मदेच्या पैलतीरी पाय ठेवाल....मग रघुनाथ पेशव्यांनी प्लॅन कॅन्सल केला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
व
विशुमित Fri, 12/01/2017 - 08:15 नवीन
इथे EVM ने पारदर्शक काम केले पाहिजे फक्त. बाकी जनतेच्या कौलाचा आदर आहे.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 12/01/2017 - 09:18 नवीन
EVM ने पारदर्शक काम केलेलं ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक Fri, 12/01/2017 - 11:09 नवीन
निवडणुकीचा निकाल काय लागतो यावर रडारड करायची की नाही ते ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
श
श्रीगुरुजी Fri, 12/01/2017 - 10:06 नवीन
इथे EVM ने पारदर्शक काम केले पाहिजे फक्त. बाकी जनतेच्या कौलाचा आदर आहे. शक्यता क्र. १) भाजपचा विजय निष्कर्ष - EVM मध्ये गडबड शक्यता क्र. २) भाजपचा पराभव निष्कर्ष - EVM मध्ये गडबड नाही यापूर्वी झालेल्या निवडणुकांवरून निघालेले निष्कर्ष - पंजाब, बिहार, दिल्ली, नांदेड महापालिका, मालेगाव महापालिका, भिवंडी महापालिका - EVM मध्ये गडबड नाही महाराष्ट्र, हरयाना, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, पुणे व इतर ११ महापालिका - EVM मध्ये गडबड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे Fri, 12/01/2017 - 14:19 नवीन
इथे EVM ने पारदर्शक काम केले पाहिजे फक्त अपयशाची कारणे शोधण्यापेक्षा "कशावर तरी खापर" फोडण्यातच जर विरोधकांना रस असेल तर २०१९ च काय २०२४ ला पण पराभव निश्चित असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
B
babu b Fri, 12/01/2017 - 14:24 नवीन
मोदीनीदेखील अमक्या तमक्याचे पणजोबा खापरपणजोबा काढण्यापेक्षा विकासावर लक्ष द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/02/2017 - 03:29 नवीन
भाषणामध्ये दहा मिनिटं पणजोबा, खापरपणजोबा, राजकीय टीका नाही केली तर विकास होतो आणि टीका केली तर खुंटतो असं काही आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
व
विशुमित गुरुवार, 12/07/2017 - 10:38 नवीन
काँग्रेस अशा प्रकारे दक्षता घेत आहे हे चांगलेच आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-give-training-to-candidates-for-investigation-of-evm-in-gujarat-election-1597194/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
mayu4u Fri, 12/01/2017 - 10:17 नवीन
गुरुजींशी सहमत. कम्पूबाजीची बोंब मारणाऱ्या वेडगळ लोकांना फाट्यावर.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 12/01/2017 - 11:10 नवीन
...किंवा धरणात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
अ
अमर विश्वास Fri, 12/01/2017 - 11:28 नवीन
UP Civic Polls चा रिझल्ट आला आहे ,,,, आणि हो .. ही निवडणूक EVM वर नव्हती (१६ महानगर पालिका सोडून )
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 12/01/2017 - 14:14 नवीन
गॅरी ट्रुमन, धाग्याबद्दल आभार. भाऊ तोरसेकरांच्या अनुदिनीवरून एक चित्रं उचलंत आहे : Image removed. यांतून भाजपची (म्हणजे मोदीशहांची) निवडणूकींची व्यूहनीती स्पष्ट होते. आजवर जो उदासीन मतदार होता त्याला घराबाहेर काढून मतदानकेंद्रापर्यंत घेऊन जाणे, असं तिचं थोडक्यात वर्णन करता येईल. असा आग्रहाने घराबाहेर काढला गेलेला मतदार साधारणत: घराबाहेर काढणाऱ्या पक्षालाच मत देतो. मोदीशहांचं उद्दिष्ट १५०+ जागा आहे. त्यासाठी ७६ % मतदान व्हायला हवं. मोदीशहा मतदारऔदासिन्य किती घटवतात यावर जागांचा निश्चित आकडा ठरेल. मतदान टक्केवारी कितीपर्यंत जाईल याचा काही अंदाज कोणी बांधलाय काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Fri, 12/01/2017 - 16:32 नवीन
70% पेक्षा जास्त होईल असे वाटते. गेल्या काही निवडणुकीत ते प्रमाण वाढले आहे. तरीही अन्य काही घटक विरोधात गेले तरी १३० कुठे जात नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पगला गजोधर Fri, 12/01/2017 - 16:51 नवीन
माझ्या मते मतदानाची जास्त टक्केवारी, इज डायरेकट्ट्ली रिलेटेड टू अँटीइनकंबन्सी .. त्यामुळे जेवढे जास्त मतदान तेव्हडे बिजेपीला धोकादायक... इथं तर उलटी गंगा वाहतिये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ख
खेडूत Fri, 12/01/2017 - 17:53 नवीन
उलटी गंगा वाहते कारण नवीन १८ वर्ष पूर्ण झालेले तरूण स्वत: विचार करून मतं देत असणार. पूर्वी ट्रक भरून माणसं आणायचे तेव्हा एकगठ्ठा मतदान होत असे. फुकट वाटप, उसन्या अस्मिता, पूर्वजांची पुण्याई, जातीचा उमेदवार, असे दहा-बारा घाणेरडे निकष मतदान करताना लावणे बंद झाले तरच भारतीय लोकशाहीला भवितव्य असेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 12/01/2017 - 19:02 नवीन
वॉव... वरील चार्ट मधील खालची पातळी 64 % ते वरची पातळी 76%, असं 12% टोटल मतदानाचें स्विंग फक्त, "नवीन १८ वर्ष पूर्ण झालेले स्वत: विचार करून मतं देत असलेले नवतरुण" करू शकतील, असा आपला आत्मविश्वास, काबिल ए तारीफ आहे.... काय बोलणार..._/\_ बा द वे हार्दिक पटेल वय फक्त 23 वर्षे... जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकूर.... तरुण आहेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ट
ट्रेड मार्क Fri, 12/01/2017 - 22:40 नवीन
ठरलं मग, जास्त मतदान झालं तर भाजप हरणार. तुम्ही खुश आहात ना? मग झालं तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sat, 12/02/2017 - 01:36 नवीन
ठरलं बिरल नाही काही, आणि माझ्या खुश होणे न होणें याचा इथं संबंध नाही.... तुम्हाला वैयक्तिक कॉमेंट करायचे आहे का , या धाग्यावर?? का चर्चा करायची आहे ???... उगाच आपलं ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
B
babu b Sat, 12/02/2017 - 04:22 नवीन
मतदार उदासीन होता म्हणे. मागची २० वर्षे भाजपाचेच सरकार , अन मतदारांची उदासीनता आता म्हणे भाजपाच दूर करणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मार्मिक गोडसे Sat, 12/02/2017 - 05:14 नवीन
मागची २० वर्षे भाजपाचेच सरकार , अन मतदारांची उदासीनता आता म्हणे भाजपाच दूर करणार ! अखेर इतकी वर्षे उदासीन मतदारांकडे उदासीनपणे पाहणारे सत्ताधारी विरोधी पक्षाच्या प्रचाराला घाबरून का होईना जागे झाले म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
ग
गॅरी ट्रुमन Sat, 12/02/2017 - 05:48 नवीन
हो हा तक्ता भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवर मी बघितला होता. याविषयी मतमोजणीपूर्व धाग्यात लिहायचे ठरविले होते. पण आता तुम्ही तो विषय काढलाच आहे म्हणून लिहितो. इतकी वर्षे जास्त मतदानाची टक्केवारी म्हणजे सत्ताधारी पक्षाचा हमखास पराभव असे गृहित धरले जायचे. पण मोदी आणि शहांनी निवडणुकीच्या खेळाचे आयाम बदललेले दिसत आहेत. आता जास्त टक्के मतदान होणे म्हणजे सत्ताधारी पक्षाचा अधिक मोठा विजय होणे असाही अर्थ त्यातून निघू शकेल अशी परिस्थिती मोदी-शहांनी तयार केली आहे. जर सत्ताधारी पक्षाविरूध्द राग असेल तर तो व्यक्त करायला आणि सत्ताधारी पक्षाला हरवायला मतदार मुद्दामून मतदान करायला जातोच. पण सत्ताधारी पक्षाविरूध्द विशेष राग नसेल किंवा काही अंशी समाधान असेल तर बरेच मतदार मुद्दामून घराबाहेर पडून मतदान करायला जातीलच असे नाही. अशा उदासीन मतदारांना घराबाहेर काढून मतदान करायला लावणे हा या डावपेचाचा भाग आहे. आणि अशा मतदारांना जर सत्ताधारी पक्षाच्या कारभाराविषयी समाधान असेल तर ते सत्ताधारी पक्षालाच मत देतील ही शक्यता जास्त. अमित शहांनी 'पत्रा प्रमुख' ही कल्पना सुरू केली आहे. 'पत्रा प्रमुख' म्हणजे मतदारयादीच्या एका पानावरील मतदारांपैकी जास्तीत जास्त मतदारांना मतदान करायला घराबाहेर काढायची जबाबदारी असलेला कार्यकर्ता. मतदारयादीच्या एका पानावर ५०/१०० नावे जरी असतील तरी त्या ५०/१०० मतदारांसाठी एक कार्यकर्त्याला जबाबदारी देण्यात आली आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण गुजरातमध्ये भाजप संघटनेचे जाळे आहे त्यामुळे असे कार्यकर्ते सगळीकडे मिळण्यात काहीही अडचण आली नाही. भाजपचे बूथ लेव्हल मॅनेजमेन्ट खूपच चांगले आणि शिस्तबध्द आहे. उत्तर प्रदेशात सव्वा तीनशे जागा जिंकल्या त्यात या बूथ लेव्हल मॅनेजमेन्टचा वाटा बराच मोठा आहे. इतर पक्षांना या बाबतीत अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तेव्हा १९९० किंवा २००० च्या दशकातले आयाम लावून गुजरात निवडणुकांकडे बघता येणार नाही. कारण मोदी-शहांनी ते आयाम पूर्ण बदलून टाकले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पगला गजोधर Sat, 12/02/2017 - 07:31 नवीन
कारण मोदी-शहांनी ते आयाम पूर्ण बदलून टाकले आहेत.
सहमत, अलिकडच्या दशकात, भारतीय निवडणुकीत मोदींनी, प्रचारतंत्र प्रभावीपणे वापरून, अनेक जुनाट आयाम परिमाणे संपूर्णपणे बदलली आहेत. आजचा भाजप हा भाजप (एम) आहे. ब्लिट्झक्रिट्झ पद्धतीचा झंझावाती प्रचार हे आजच्या बिजेपीचा युएसपी निश्चितच म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अमितदादा Fri, 12/01/2017 - 16:49 नवीन
असाच एक अंदाज भाजप १००-१०५, काँग्रेस ७०-७५.
  • Log in or register to post comments
B
babu b Fri, 12/01/2017 - 17:30 नवीन
भाजपा बिलो १०० काँग्रेस अबाव १००
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/02/2017 - 03:30 नवीन
भाजप ९९ आणि काँग्रेस १०१ असं चालतंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Sat, 12/02/2017 - 04:12 नवीन
तेवढ्या शिटा तरी असायला हव्यात .
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/02/2017 - 04:52 नवीन
हाहाहा...चला म्हणजे समजले तरी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
स
सचिन Sat, 12/02/2017 - 19:12 नवीन
पण यावेळी नक्कीच टफ दिसतय.... घरच्या निवडणुकीला सुद्धा सगळी फौज कामाला लावावी लागलीये म्हणजे ....
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 12/03/2017 - 03:14 नवीन
पण यावेळी नक्कीच टफ दिसतय.... घरच्या निवडणुकीला सुद्धा सगळी फौज कामाला लावावी लागलीये म्हणजे ....
गुजरातमध्ये निवडणुकांच्या वेळी असे वातावरण निर्माण करायची मिडियावाल्यांना सवय आहे. २००२ मध्ये दंगलींमुळे मोदींचा पराभव होणार असे वातावरण निर्माण करायचा प्रयत्न झाला होता.प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. २००७ मध्ये गोवर्धन झाडपियांसारख्या नेत्यांच्या बंडामुळे सौराष्ट्रात भाजप मार खाणार असेही वातावरण निर्माण केले गेले होते. पण कुठचे काय.२००२ पेक्षा २००७ मधे सौराष्ट्रमध्ये एक जागा जास्तच मिळाली. २०१२ मध्येही केशुभाई पटेल यांच्या बंडामुळे भाजप मार खाणार असे वातावरण निर्माण केले गेले होते. अर्थात तसे काहीही झाले नाही. आतापर्यंत 'अ ब्लो टू मोदी' या बातम्या किती वेळा आल्या असतील याची गणतीच नाही. Modi is one person media loves to hate. त्यामुळे प्रत्येकवेळी असे वातावरण निर्माण केले जाते. दुसरे म्हणजे सहज जिंकायची खात्री असलेल्या निवडणुकीत मोदी-शहांनी प्रचार का करावा असे म्हणणे आणि सचिनने केनियाविरूध्दच्या मॅचमध्ये का खेळावे असे म्हणणे यात फार फरक नाही. असे प्रश्न उभे करणार्‍यांना मोदी-शहांची रणनिती समजलेलीच नाही असे दिसते. विधानसभेत जास्तीत जास्त जागा जिंकून त्यातून राज्यसभेत लवकरात लवकर बहुमत मिळायचा मार्ग खुला करणे ही ती रणनिती असावी असे मला वाटते. उत्तर प्रदेशात शेवटी मोदी वाराणशीमध्ये २-३ दिवस तळ ठोकून होते त्यावेळी मिडियामध्ये असे वातावरण निर्माण केले गेले होते की शेवटचा पुश मारून हातातून निसटून चालणारे बहुमत मिळवायचा मोदींचा प्रयत्न होता. पण मोदींचा प्रयत्न निसटून चाललेले बहुमत मिळवायचा नव्हे तर ३०० च्या पलीकडे झेप घ्यायचा होता. असो. प्रत्यक्षात काय होते ते १८ डिसेंबरला समजेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
श
शलभ Sun, 12/03/2017 - 10:50 नवीन
सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sun, 12/03/2017 - 03:16 नवीन
विधानसभेत जास्तीत जास्त जागा जिंकून त्यातून राज्यसभेत लवकरात लवकर बहुमत मिळायचा मार्ग खुला करणे ही ती रणनिती असावी असे मला वाटते.
असे मला वाटते याऐवजी भाऊ तोरसेकरांचे हे मत मला पटते असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.
  • Log in or register to post comments
स
सचिन Sun, 12/03/2017 - 21:03 नवीन
सोपे नाही यावेळी हे निश्चित !! २००२ पासून प्रत्येक वेळी भा ज प च्या सीट्स कमी झालेल्या आहेत. (१२७--११७--११५). आता अमित शहा १५० म्हणतायत ! फील्डमधल्या काही भा ज प कार्यकर्ते मित्रांच्या (जे आत्ता गुजरातमधे कामावर आहेत) मते वेळ आणीबाणीची आहे. जिंकण्याचा विश्वास आहे, पण सीट अजून कमी झाल्या तर त्या जिंकण्याला मजा नाही. २-३ मित्र आहेत तिथे कार्यरत. १५० वगैरे शक्य नाही असे खात्रीशीरपणे वाटतय. overconfidence नडणार आहे. अर्थात माझा काही अभ्यास बिभ्यास नाही .. फक्त common sense.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 12/04/2017 - 15:01 नवीन
२००२ पासून प्रत्येक वेळी भा ज प च्या सीट्स कमी झालेल्या आहेत. (१२७--११७--११५) ट्रेंडचा हा मुद्दा बरोबर आहे. पण २००७ व २०१२ साली दोन्हीवेळेस भाजपमधे फुट पडली होती व त्यामुळे भाजप हरणार असे म्हटले जात होते. त्याऐवजी फक्त जागा कमी झाल्या. यावेळी तरी अजून पर्यंत कोणी फुटुन बाहेर पडलेले नाही त्यामुळे हा ट्रेंड तसाच चालू राहिल का पूर्णपणे उलटा होईल ते पहावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
प
पुंबा Mon, 12/04/2017 - 07:00 नवीन
माझा अंदाज भाजप- १००-११०
  • Log in or register to post comments
श
शलभ Mon, 12/04/2017 - 07:06 नवीन
मला वाटतं १२८ येतील. नक्की किती ते १८ ला समजेलच..
  • Log in or register to post comments
B
babu b Mon, 12/04/2017 - 15:10 नवीन
ओखी वादळही गुजरातकडेच चालले आहे.
  • Log in or register to post comments
B
babu b Mon, 12/04/2017 - 15:10 नवीन
ओखी वादळही गुजरातकडेच चालले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 12/05/2017 - 16:07 नवीन
बरं मग यातही मोदींचा हात आहे असं म्हणायचं आहे का? )))---(((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
स
सचिन Mon, 12/04/2017 - 16:02 नवीन
फायनल ओपिनिअन पोल - ए बी पी - आलाय आज .... ९५ - ८२ - ५ (बी जे पी - कौंग्रेस - अन्य ) !!!!!!!!
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/04/2017 - 16:16 नवीन
त्यातल्या त्यात सध्या केवळ अ‍ॅक्सिस आणि चाणक्यचे एक्झिट पोल्स विश्वासार्ह आहेत. बाकी सगळ्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांमधल्या एक्ज्झिट पोल्सच्या आकड्यांवरून मला काय म्हणायचे आहे ते समजून येईलच. Image removed. यात एबीपीचे आकडे किती गंडलेले होते हे दिसेलच. दिल्लीमध्ये केवळ अ‍ॅक्सिसने आपला ६० जागा दिल्या होत्या. बिहारमधील अ‍ॅक्सिसचे भाकित अगदी पूर्ण बरोबर आले होते. पंजाब आणि गोव्यामध्ये कोणाचेच भाकित प्रत्यक्ष निकालाच्या जवळपासही आले नव्हते. तेव्हा या आकड्यांना नक्की किती महत्व द्यावे हे आपणच ठरवायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
B
babu b Mon, 12/04/2017 - 16:40 नवीन
http://www.trendinghindinews.com/opinion-poll-for-gujarat-election-2017/ ९५ - ८२ - ५ (बी जे पी - कौंग्रेस - अन्य )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 12/05/2017 - 08:23 नवीन
जर का ट्रेंड बघितला तर गुजरातच्या मतदारांनी प्रत्येकवेळी एका पक्षाच्या बाजूने स्पष्ट कल दिलेला आहे. १९८० मध्ये काँग्रेसने १८२ पैकी १४१ १९८५ मध्ये काँग्रेसने १८२ पैकी १४९ १९९० मध्ये जनता दल-भाजपने १५० जागांवर युती केली होती आणि उरलेल्या ३२ जागांवर मैरीपूर्ण लढती होत्या. त्यावेळी जनता दल-भाजपने १३७ १९९५ मध्ये भाजपने १२१ १९९८ मध्ये भाजपने ११५ २००२ मध्ये भाजपने १२७ २००७ मध्ये भाजपने ११७ २०१२ मध्ये भाजपने ११५ तेव्हा १८२ पैकी ९५ म्हणजे अगदी काठावरचे बहुमत देणे गुजरातच्या मतदारांना भावत नाही असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
श
श्रीगुरुजी Tue, 12/05/2017 - 10:40 नवीन
एबीपीने यापूर्वी ८ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या सर्वेक्षणाचे आकडे असे होते. - संभाव्य मतांची टक्केवारी १) सौराष्ट्र: भाजप ४२, कॉंग्रेस ४२ २) उ. गुजरात: भाजप ४४, कॉंग्रेस ४९ ३) मध्य गुजरात: भाजप ५४, कॉंग्रेस ३८ ४) द. गुजरात: भाजप ५१, कॉंग्रेस ३३ एका मोठ्या भागात दोन्ही पक्ष बरोबरीने आहेत, तर दुसऱ्या मोठ्या भागात कॉंग्रेस पुढे आहे (एकूण १०७ जागा). भाजप तुलनेने दोन लहान भागात (एकूण ७५ जागा) पुढे आहे. भाजपला राज्यात सरासरी ४७% (११३-१२१ जागा) व कॉंग्रेसला सरासरी ४१% (५८-६४ जागा) मतांचा अंदाज आहे. _______________________________________________________________________ त्यानंतर बरोबर २६ दिवसांनी काल नवीन सर्वक्षणाचे आकडे जाहीर झाले. त्यानुसार, - संभाव्य मतांची टक्केवारी १) सौराष्ट्र: भाजप ४५, कॉंग्रेस ३९ २) उ. गुजरात: भाजप ४५, कॉंग्रेस ४९ ३) मध्य गुजरात: भाजप ४१, कॉंग्रेस ४० ४) द. गुजरात: भाजप ४१, कॉंग्रेस ४२ भाजपला राज्यात सरासरी ४३% (९१-९९ जागा) व कॉंग्रेसला सरासरी ४३% (७८-८६ जागा) मतांचा अंदाज आहे. ______________________________________________________________________ केवळ २६ दिवसांच्या अंतराने जाहीर झालेल्या दोन्ही सर्वेक्षणातील आकड्यांची तुलना केली तर असे लक्षात येते, - सौराष्ट्रात भाजपच्या मतांमध्ये ३% ची वाढ झाली आहे व काँग्रेसच्या मतांमध्ये तितकीच घट झाली आहे. सौराष्ट्र हा पटेलबहुल भाग मानला जातो व माध्यमातून असे चित्र दाखवित आहेत की पटेल मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात आहेत. असे असताना केवळ २६ दिवसांत ३% मते वाढण्यासारखे भाजपने नक्की काय केले व तितकीच घट होण्यासारखे काँग्रेसने नक्की काय केले हे उलगडत नाही. दोघांमध्ये ६% मतांचा फरक हा बर्‍यापैकी मोठा फरक आहे. - उत्तर गुजरातमध्ये २६ दिवसात दोन्ही पक्षांच्या टक्केवारीत फारसा फरक पडलेला नाही. - केवळ २६ दिवसात मध्य गुजरातमध्ये भाजपची मते तब्बल १३% इतक्या फरकाने कमी झाली असे हे सर्वेक्षण सांगते, परंतु काँग्रेसच्या मतांमध्ये फक्त २% वाढ झाली आहे. मधली ११% मते कोठे गेली असावीत? गुजरातची निवडणुक ही बहुतांशी द्विपक्षी निवडणुक आहे. त्यामुळे या उर्वरीत ११% मतांचे गूढ आहे. भाजपने जेमतेम २६ दिवसात तब्बल १३% मते गमाविण्याइतके नक्की काय वाईट केले असावे हे समजण्यापलिकडचे आहे. - द. गुजरातमध्ये २६ दिवसांंमध्ये भाजपने तब्बल १०% मते गमाविली व यातील बहुसंख्य मते ९% काँग्रेसकडे वळली असे हे सर्वेक्षण सांगते. पुन्हा एकदा हाच प्रश्न उद्भवतो की भाजपने जेमतेम २६ दिवसात तब्बल १०% मते गमाविण्याइतके नक्की काय वाईट केले असावे हे समजण्यापलिकडचे आहे. - २६ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण राज्यात भाजपच्या मतांमध्ये ४% इतकी घट झाली असून काँग्रेसच्या मतांमध्ये २% इतकी वाढ झाली आहे. ________________________________________________________________________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
B
babu b Tue, 12/05/2017 - 11:04 नवीन
भाजपला राज्यात सरासरी ४३% (९१-९९ जागा) व कॉंग्रेसला सरासरी ४३% (७८-८६ जागा) मतांचा अंदाज आहे. ह्यांचे ४३ % म्हणजे ९०-९९ आणि त्यांचे ४३ % म्हणजे मात्र ७८ - ८६ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Tue, 12/05/2017 - 15:19 नवीन
या मतांच्या टक्केवारीचे अंदाज बरोबर आहेत असे गृहित धरू. तसे असेल आणि जर दोन्ही पक्षांना साधारण सारखीच मतांची टक्केवारी (४३%) मिळणार असेल तर काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा मिळतील. त्या परिस्थितीत काँग्रेस १०० पण ओलांडू शकेल. याचे कारण भाजपचे काहीकाही बालेकिल्ले आहेत. त्या बालेकिल्ल्यांमधून भाजपला जोरदार यश मिळते. उदाहरणार्थ अहमदाबाद शहर आणि परिसरात एलिसब्रिज, घाटलोडिया, मणीनगर, नारणपुरा (पूर्वीचा सरखेज) असे काही मतदारसंघ आहेत त्यात भाजप प्रचंड बलिष्ठ आहे. २०१२ मध्ये घाटलोडियामधून आनंदीबेन पटेल ५३% मताधिक्याने तर एलिसब्रीजमधून भाजप उमेदवार अतुल शाह ५०% मताधिक्याने निवडून गेले होते. देशातील कित्येक मतदारसंघात विजयी उमेदवाराला ५०% मते नसतात. आपण इथे ५०-५३% मते नाही तर मताधिक्याविषयी बोलत आहोत. अहमदाबादमध्ये आणि वडोदरा, सुरतमध्ये भाजप उमेदवाराने ३०% पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला असे अनेक मतदारसंघ आहेत. यावेळीही भाजपचे हे बालेकिल्ले ढासळतील याची शक्यता फारच थोडी. त्यामुळे भाजप अशा बालेकिल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मते घेईल आणि काँग्रेसला या भागात बरीच कमी मते मिळतील. जर दोन्ही पक्षांना सारखीच मतांची टक्केवारी असेल तर राज्याच्या इतर भागात काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त मते मिळतील आणि अर्थातच त्यामुळे जागाही जास्त मिळतील. याविषयी सर्वात उत्तम उदाहरण २००४ च्या लोकसभा निवडणुकांचे आहे. या निवडणुकांमध्ये भाजपला ४७.४% आणि काँग्रेसला ४३.९% मते होती. पण १८२ पैकी ९० मतदारसंघात भाजपला तर ९२ मतदारसंघात काँग्रेसला आघाडी होती. भाजपला काँग्रेसपेक्षा ४ लाख ३३ हजार मते जास्त मिळूनही दोन कमी मतदारसंघात आघाडी मिळाली होती. हे का झाले? सरखेज आणि एलिसब्रीज हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ अडवाणींच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात होते. त्यापैकी सरखेजमध्ये अडवाणींना १ लाख २६ हजार मतांची तर एलिसब्रीजमध्ये ४८ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्याचप्रमाणे सुरत लोकसभा मतदारसंघात येणार्‍या चोरासी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या काशीराम राणांना सुमारे ९० हजार मतांची आघाडी मिळाली होती. पूर्ण राज्यात भाजपला काँग्रेसपेक्षा ४ लाख ३३ हजार मते जास्त होती त्यापैकी २ लाख ६४ हजार मतांची आघाडी केवळ या तीन मतदारसंघांमधून होती. त्याउलट काँग्रेसची मते बर्‍यापैकी विखुरलेली होती. त्यामुळे राज्याच्या इतर भागातून काँग्रेसला जास्त मतदारसंघांमध्ये आघाडी मिळविणे शक्य झाले. गुजरात निवडणुकांमध्ये अंदाज बांधताना हे गणित लक्षात ठेवलेच पाहिजे. २००४ मध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा ३.५% मते जास्त होती तरीही आघाडी दोन कमी मतदारसंघात मिळाली होती. यावरून भाजपला गुजरातमध्ये काठावरचे बहुमत हवे असेल तरी काँग्रेसपेक्षा किमान ४.५% मते जास्त हवीत असे मला वाटते. आणि जर भाजपला आरामात विजय मिळवायचा असेल तर काँग्रेसपेक्षा किमान १०% मते जास्त हवीत. या लेखात मी भाजपला १३०-१३५ जागांचा अंदाज बांधला आहे त्यात भाजपला ५०% तर काँग्रेसला ४०% मते मिळतील हे गृहितक आहे. २०१२ मध्ये भाजपला ४७.९% तर केशुभाई पटेलांच्या गुपपला ३.६% मते होती. म्हणजे या दोन पक्षांच्या मतांची बेरीज ५१.५% होती. तर काँग्रेसला ३८.९% मते मिळाली होती. नुसत्या भाजपला काँग्रेसपेक्षा ९% (आणि गुपपची मते विचारात घेतली तर १२.६%) मते जास्त होती. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला ६०.१% तर काँग्रेसला ३४.४% मते होती. राष्ट्रीय पक्षांना विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकांपेक्षा कमी टक्के मते मिळतात तेव्हा २०१४ च्या त्सुमानीपासून भाजपची १०% मते कमी झाली त्यापैकी ५.५% काँग्रेसला तर ४.५% अपक्ष आणि इतरांना मिळतील हे गृहितक आहे. त्यातून भाजप १३०-१३५ जागा मिळवू शकेल. पण भाजपच्या विरोधात आणि काँग्रेसच्या बाजूने आणखी ३% चा स्विंग असेल तर मात्र या सर्वेक्षणात दिल्याप्रमाणे अटीतटीची लढत होईल. आणि दोन्ही पक्षांना ४३% मते मिळाल्यास काँग्रेस शंभरी पण ओलांडेल. मला वाटते की या सर्वेक्षण करणार्‍यांनी हा महत्वाचा मुद्दा लक्षात न घेता धोपट मार्गाने जागांचे अंदाज बांधले आहेत. तसेच श्रीगुरूजींनी वर म्हटल्याप्रमाणे पटेल समाज जर भाजपपासून दुरावलेला असेल तर पटेल समाजाचे प्राबल्य असलेल्या सौराष्ट्रमध्ये भाजपची मते ३% नी कशी वाढली, दक्षिण गुजरातमध्ये इतकी कमी कशी झाली या प्रश्नांबरोबरच हा प्रश्नही महत्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अनुप ढेरे Wed, 12/06/2017 - 04:47 नवीन
२०१४ नंतर आत्तापर्यंत झालेल्या राज्य निवडणूकांमध्ये भाजपाने आपला व्होटशेअर २०१४ लोकसभा निवडणूकांइतकाच राखला आहे. उ.प्र., उत्तराखंडमध्ये. बिहार, दिल्लीमध्येपण. (पंजाबात काय झालं आठवत नाही) सो इथे भाजपा ६० वरून डायरेक ४९-५०वर येईल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा