Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...

य
यनावाला
Mon, 02/19/2018 - 16:03
🗣 247 प्रतिसाद
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत. " ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्‍या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो? आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे. यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ? देवदर्शनाला जाणार्‍या तसेच दर्शन घेऊन परत येणार्‍या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ? कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्‍या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही. वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ? अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते. अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्‍नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे, "दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली. आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥ विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली. रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ? पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥" तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल. .................................................................................
वर्गीकरण
चर्चा (काथ्याकूट)

प्रतिक्रिया द्या
82228 वाचन

💬 प्रतिसाद (247)
ड
डॉ.नितीन अण्णा गुरुवार, 02/22/2018 - 12:39 नवीन
आमचे जीवन *शरद तळवलकर* आहे. देव बाप्पा कान कापेल म्हणून आमचे बालपण देखील शरद तळवलकर होते. आता वाटते "देव बाप्पा कान कापेल" हे तपासायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सप्तरंगी Tue, 02/20/2018 - 14:10 नवीन
मला एक प्रश्न पडलाय - जो नाहीच्चे त्याबद्द्ल (त्या देवाबद्दल ) यनावालासर इतके सतत का लिहीत राहतात. तो नाहीये हे मान्य ना मग त्याला जरा आरामात बसू द्या ना, नास्तिकांनी का इतके enguage करून ठेवायचे , थोडा तर आस्तिकांच्या वाट्याला येऊ द्या त्याला ! कि यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे ??
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/20/2018 - 16:34 नवीन
समाजात वावरतांना लोक देवधर्माचे प्रचंड बळी ठरतात. विवेक गमावून बसतात, त्याचं आपलं प्रबोधनाचं काम. पटलं तर घ्या नाय तर सोडून द्या. अशिक्षित लोकांचं एक वेळा प्रबोधन करता येईल पण उच्चशिक्षितांचं प्रबोधन करणे फ़ार अवघड आहे, ही वाढत्या देवधर्माच्या ठिकाणी वाढलेली गर्दी पाहता आणि भोंदुबाबांच्या नादी लागलेल्यांच्या बातम्या पाहता काही गोष्टी लक्षात येतात , त्यामुळे त्याचं एकमेव काम प्रबोधनाचं आहे, असे वाटते. एक अभंग आहे, जरासा वेगळा फ़क्त कामापूरत्या ओळी डकवतो. देव न लगे देव न लगे । साठवणेचे रुधले धागे ।। देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करू ।। -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
A
arunjoshi123 Tue, 02/20/2018 - 17:47 नवीन
आधुनिक समाजात वावरताना माणसानं थोडं व्यवहारी असावं. धर्मव्यवस्थेअंतर्गत सव्वा रुपया दक्षिणा लूटून पळणार्‍या भटाच्या मागे पळण्याऐवजी अर्थव्यवस्थेअंतर्गत ११५०० कोटी रुपये लूटणार्‍या मोदीच्या मागे लागावे.
वाढत्या देवधर्माच्या ठिकाणी वाढलेली गर्दी पाहता
असली आत्मसृजित स्वप्नं कुठून येतात कुणास ठाऊक. आम्हीही याच भारतात राहतोय. उच्चशिक्षित भारतीय आणि युरोपीय गोरे यांच्या संस्क्रुतीत फरक उरलेला आम्हाला दिसत नाही. देवाधर्माच्या जागी गर्दी वाढलेली कुठे दिसते? आमच्या शेजारच्च्या मॉलमधे देवपूजेची आणि दारूची दुकानं शेजार शेजारी आहेत. कुठलं ओसाड असतं हे लिहायची गरज नाही. दारुच्या अड्डयावर गर्दी करण्यापेक्षा देवळात केलेली कधीही बरी. देवळात, चर्चात वा मशिदीत सणासुदीला जमा झालेले जमाव बिनडोक नास्तिकांना एक प्रचंड भयप्रद झुंड वाटते, मूल्यहिन असा एकूल एक बसलेला नास्तिक देखील तितकाच भयप्रद लांडगा असू शकतो. आपण रिचर्ड डॉकिन्सचं उदाहरण घेऊ. https://www.huffingtonpost.com/2013/09/09/richard-dawkins-pedophilia_n_3895514.html हा इसम एक प्रतिष्ठित नास्तिक आहे. जगातला अग्रगण्य. ओबामाला आमच्या देशात सर्व धर्मांचा/विचारांचा आदर होतो इ इ करिता प्रत्येक धर्माचे लोक व्हाईट हावसात बोलावले होते त्यात हा नास्तिकांचा प्रतिनिधी म्हणून भेटायला आलेला. हा इसम म्हणतो कि बालकांवर धर्मसंस्कार करणं त्यांच्यावर बलात्कार करण्यापेक्षा घृणास्पद आहे. नि विधान कितीही विरोध होऊन त्यानं आजतागायत मागं घेतलं नाही. बालबलात्कारानं कायमचं असं कोणतंही नुकसान होत जे धार्मिक झाल्यामुळं आयुष्यभर होतं असा या इसमाचा युक्तिवाद आहे. म्हणजे उद्या एक पादरी आणि एक पेडोफाईल याच्याकडे आला तर आपलं मूल पेडोफाइलला देईल!!! https://www.youtube.com/watch?v=8EC42_2KIx0 ==================== विकृती या सर्वच प्रकारच्या व्यवस्थांत निर्माण होऊ शकतात. ज्या ज्या व्यवस्थांचे फेस व्हॅल्यू वर उद्दिष्टं चांगली आहेत नि आताचे चालक बरे आहेत तिच्यात सहभागी. तिच्या विरोधी व्यवस्थेशी सहिष्णोता असावी. नि परस्परविरोधी अशा दोन्ही व्यवस्थांतील वाईटपणा घालवण्यासाठी प्रयत्न करावेत, ती व्यवस्थाच नष्ट करायला जाऊन कलह माजवू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/20/2018 - 18:37 नवीन
बाकी दैववादी असेच बिथरलेले असतात. त्यांचं प्रबोधन होऊ शकत नाही. मी आजच्या साठी थांबतो. आपलं प्रवचन सुरु ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ब
बिटाकाका Tue, 02/20/2018 - 19:51 नवीन
तुम्हाला त्यांच्या मुद्द्यांचं खंडन करता येत असेल तर बघा, नाहीतर तुम्ही इतरांना देता तो सल्ला लागू करून पहायला हरकत नसावी! इग्नोर करणे...उगाच बिथरल्यासारखं करून काय उपयोग? ============================== अजो...तुमचा मुद्दा पटतोय थोडा थोडा! शहरातल्या मंदिरात गर्दी नसली तरी, ठराविक देवस्थानांना होणारी तुफान गर्दी लक्षणीय आहे. अर्थात ती गर्दीही एकूण ईश्वरवादी लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे म्हणा. सगळेच ईश्वरवादी मंदिरात गर्दी करून अंधश्रद्धांना बळी पडतात हे स्वतःच्या नास्तिकतेला फुलवण्यासाठी नास्तिकांनी तयार केलेलं तुणतुणे आहे जे सदानकदा वाजवून स्वतःची नास्तिकता जागृत ठेवण्याची अपरिहार्यता नास्तिकांवर असते असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 09:24 नवीन
ठराविक देवस्थानांना होणारी तुफान गर्दी लक्षणीय आहे. अर्थात ती गर्दीही एकूण ईश्वरवादी लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे म्हणा.
मुद्दा शांतपणे समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. ------------------ जनरली थोडसं आक्रामक वा तत्सम स्टाईलनं संवाद केला तर अंततः जी मंडळी तरीही सुसंवाद्य वा फक्त शांतपणे मुद्द्याचं बोलतात ती लवकर कळतात. ही एक रिलेशन बिल्डिंग वा कम्यूनिकेशन स्ट्रॅटेजी आहे नि त्यात हेतू कुणाला दुखवायचा इ. नसतो. व्यक्तिगत आयुष्यात मोस्टली सगळी मंडळी छानछानच असतात. जालावर ज्वरपूर्ण संवाद त्यामानानं सेफ असतो. --------------------------------- आता ईश्वरवादी लोक गर्दी करतात हि काय तक्रार झाली? देशात काय १४४ लागू असतं का नेहमी? नास्तिक लोक किती नगण्य आहेत तरी किती पार्ट्या करतात! तुच्छात तुच्छ नास्तिक त्या त्या सर्कल मधे प्रसिद्ध असतो. ते अंधश्रद्धावाले किती तरी मोर्चे मेळावे काढतात. दाभोळकरांच्या भाषणाला होते तिला गर्दीच म्हणतात ना? ------------------ लोक झेंडावंदन करायला किती गर्दी करतात. सरकारी खर्चानं देखावे इ इ होतात. काय गरज आहे? झेंडा नि देव त्याच अर्थांनी नि त्याच नियमांनी निरर्थक नाहीत का? देश असायला झेंडा कशाला लागतो? बिनझेंड्याचा देश का असू शकत नाही (बाय द वे, उगाच ७ बिलियन मधल्या काही लोकांचा एक उपगट बनवणे हे सुद्धा निरर्थकच आहे म्हणा, पण ते असो. असला निर्थकतेचा पाढा लै लांब जातो म्हणून माणसानं अस्तिक बनून सर्वाथ पाहिलेला परवडतं)? बिचार्‍या लहान्या पोरांना छळतात तालमी करवून करवून. --------------------- आता ठराविक जागांचं काही असतं म्हणून तिथं जास्त गर्दी होते. लाल किल्याच्या झेंडावंदनाला जास्त गर्दी होते. मग? नास्तिकी नियमांनुसार सर्व भूमींचे थोड्या फार फरकाने तेच रासायनिक कंपोझिशन असले तरी अस्तिकाच्या दृश्टीने स्थळाची वेगळा महिमा, पावित्र्य, वैशिष्ट्य, महात्म्य, इ इ असतं. ----------------------- गर्दी हा शब्द नास्तिकाकडनं वापरला जातो तेव्हा त्याला एक तुच्छता अभिप्रेत असते. नास्तिकाचं म्हणणं असतं कि मला कशाचाच डिफेन्स करायचा नाही तेव्हा मी जिंकणारच. पण कशाचाच डीफेन्स न करायच्या नादात शेवटी स्वतःचाच डिफेन्स करता येत नाही मग म्हणून चार गोष्टींना हो चार गोष्टींना नाही करायच्या नादात ते विचित्रविचारधारी बनतात. धागालेखक याचं आदर्श उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Wed, 02/21/2018 - 10:45 नवीन
गर्दी, त्याचा तुच्छतादर्शक उल्लेख याबतीतील मुद्दा इतर उदाहरणामुळे पटला. त्यामुळे ते नास्तिकांचं एक राहू देतो. ------------------------------------------- पण धार्मिक स्थळी ते ज्या देवाला मानतात त्याचे काही सेकंदासाठी दर्शन घेण्यासाठी जी रेटारेटी, फसवणूक (स्वतःची आणि दुसऱ्यांची) चालते, हे कसे समर्थनीय आहे? देव चराचरात आहे हि शिकवण सर्व ईश्वरवाद्यांना का मान्य नसावी? हे एकूणच ईश्वरवादी व्यवस्थेचे फेल्युअर मानावे का? यामुळेच नास्तिकांचे फावते असे म्हणणे चुकीचे ठरेल काय? ------------------------------------------ अर्थात गर्दीच्या तशा वागण्याने कोणाचेच काही नुकसान होत नाही असे मला वाटते. मात्र अंधश्रद्धा बोकाळवणारी गर्दी मात्र डोक्यात जाते. उदा. नवस फेडायचा म्हणून मंदिरावरून लहान मुलांना खाली फेकणारी गर्दी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 06:25 नवीन
न बिथरलेले असतानाही लोकांना लोक दैववादी आहेत का अजून काही आहेत हे कळत नाही. बिथरण्या न बिथरण्यात कै फरक असला पायजे राव. ============== बाय द वे, दैववादी मंजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मामाजी Tue, 02/20/2018 - 17:52 नवीन
प्रा. साहेब माफी असावी पण सध्या येथे होणारे लेखन बघता मला "देवधर्म" हा शब्द बदलून त्या ऐवजी "मोदिद्वेष"हा शब्द वापरावसा वाटतो. कारण आपण केलेले सर्व वर्णन "मोदिद्वेष" या शब्दाला तंतोतंत लागू पडत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
A
arunjoshi123 Tue, 02/20/2018 - 17:53 नवीन
पण उच्चशिक्षितांचं प्रबोधन करणे फ़ार अवघड आहे,
जगात नास्तिकवादाचे अनेक विकृत उपप्रवाह जन्माला आलेत. हे उच्चशिक्षित असल्यानं, नि अकलेचा महाभयंकर माज असल्यामुळं, त्यांचं प्रबोधन असो त्यांचेशी संवाद साधणं सुद्धा असंभव आहे. त्याचं एक उदा. मिलिटंट अथेईझम नावाचा पंथ. धर्म नष्ट करण्यासाठी काहिही मंजे काहिहि केलं पाहिजे असं अनॉफिशियल सूत्र असलेले लोक. दुसरे हे बालबलात्कारवादी. --------------------------- आपण फक्त जास्त शहाणे आहोत इतकंच दाखवण्यासाठी जे लोक नास्तिक होतात पण ज्यांची नैतिक मूल्यं व्यवस्थित असतात नि ज्यांच्याकडून उपदेशांचे डोस प्यावे लागतात, असे नास्तिक डोकेदुखी आहेत, पण इतकी डोकेदुखी जगरहाटीचा भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विकास Tue, 02/20/2018 - 19:08 नवीन
हा लेख तसेच इथले आधीचे आणि या आधी उपक्रमावरील लेखन, अर्थात armchair activism पाहून हसायला येते. खरेच जर प्रबोधन करायचे असेल तर ते करण्यासाठी आभासी जाला पेक्षा वास्तवातील जगात करावे लागते. जसे नजीकच्या भूतकाळात दाभोलकरांनी केले होते, अजूनही ते कार्य करणारे ज्ञात अज्ञात भरपूर आहेत आणि न बोलता केवळ कृतीतून करणारेतर अनेक आहेत. यातील प्रत्येकाचा प्रत्येक विचार पटेलच असे नाही. पण त्यांच्या तळमळी बद्दल आदर वाटतो. इथे मात्र दिवाळीतील atom bomb च्या वातीला उदबत्ती लावून लांब उभे राहून अथवा कानावर हात ठेवून वागल्याप्रमाणे लेखन वाटते. लेखकाबद्दल आदर राखून म्हणावेसे वाटते, की खरेच असे half hearted प्रबोधन आणि मुख्यत्वे लेखनातला तिरस्कार पाहून वाटते की त्याना अशा एखाद्या भोंदू ईश्वरवादीचा अथवा एखाद्या बाबा- महाराजाचा व्यक्तिगत वाईट अनुभव आला आहे म्हणून हे सर्व चालले आहे. कालानुरूप प्रबोधनात पण बदल करणे गरजेचे असते. नाहीतर काय तो पण एक पंथच होतो आणि त्यावर चालणारे, महाजनो येन गत: स पंथ: प्रमाणे वाटचाल करत राहतात. दुर्दैवाने "निरीश्वरवाद पंथीय प्रबोधन" हे पण असल्या लेखात एखाद्या जुनाट पोथी सारखे वापरले जात आहे आणि त्यावर आधारित जिथे गरज नाही अशा ठिकाणी लेखन करून प्रबोधनाचे फळ मिळणार आणि आपल्याला हवा तसा समाज बदलणार अशी अंधश्रद्धा आहे. शेवटी काय, "साक्षात" मार्क्स बाबांनी म्हणल्याप्रमाणे रिलीजन (म्हणजे पंथ. भारतीय भाषांमधील "धर्म" नाही) अफूची गोळी आहे. हा रिलीजन भल्या भल्यांना नशा चढवतो. ती नशा हि निश्रीश्वारवादी पंथीयांना पण चढते. विशेष करून दुसर्या बाजूकडील जनतेला तुच्छ लेखायचे झाले की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पैसा Wed, 02/21/2018 - 03:44 नवीन
>>>>>इथे मात्र दिवाळीतील atom bomb च्या वातीला उदबत्ती लावून लांब उभे राहून अथवा कानावर हात ठेवून वागल्याप्रमाणे लेखन वाटते. >>>> नुसते सुतळीबॉम्ब नाहीत, तडतड्या, साप गोळ्या, फुलबाज्या, भुईचक्र, भुसनळे, फुसके फटाके, लवंगी, केपा सगळे प्रकार प्रतिक्रियामध्ये पण बघायला मिळत आहेत. मजा आली! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
बिटाकाका Wed, 02/21/2018 - 06:24 नवीन
प्रचंड सहमत! प्रतिसाद आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 09:48 नवीन
आवडला प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/23/2018 - 05:38 नवीन
प्रबोधनाची अशी एक कोणती जागा नसते. चळवळींची सुरुवात कुठूनही होत असते, गल्ली बोळातून, कट्ट्यातून, कुठूनही. वास्तव जग असो की आभासी असो, विचारांची गरज असतेच असते. विशेषतः आपण जेव्हा स्वतःला सुशिक्षित म्हूणन घेतो तेव्हा तर त्याची खूप आवश्यकता असते. उच्चशिक्षित असून तुम्ही तुम्ही जर देवाळू लोकांच्या प्रवृत्तीमुळे अजूनही अज्ञानी म्हणून जगत असाल तर गेली अनेक दशके ज्या समाजधुरीनांनी प्रबोधन म्हणून जे प्रयत्न केले ते वायाच गेले असे म्हणावे लागेल. मला वाटतं यनांसरांचा प्रयत्न त्याचाच भाग आहे. कोणाला पटो ना पटो. अनेक शतकांच्या वहिवाटीमुळे हिंदू धर्मात कित्येक आततायी रुढी तयार झाल्या. व्रतवैकल्य, नवससायास, शुष्क कर्मकांड, निरर्थक-शाब्दिक तत्वचर्चा, विधिनिषेधात्मक क्रियाकर्म, हे आजही सुरुच आहे असे दिसते. विविध प्रकारचे देव, त्यांचे ते वेगवेगळे मंत्र, त्याचे ते क्लिष्ट तंत्र, त्यांची गुंतागंतीची पूजा यावर पहिलं प्रबोधन संतांनी केलं. अशा हाडामासात जाऊन बसलेल्या नव्हे रुतलेल्या गोष्टीतून बाहेर येणं इतकं सोपं नाही, कारण तो संस्काराचा भाग होता. आता त्यावर नक्कीच विचार केला पाहिजे. बाकी, भोंदू बाबा, चोवीस बाय सात चालत असलेली वाहिन्यांवरील विविध बापू, महाराज, मा, अक्का यांच्या अनुभवातून काय काय बाहेर येतं ते पाहिलंच पाहिजे. उगाच डोळेझाक करुन किंवा कोणाला त्याचा वाईट अनुभव असेल तर त्याचा विचार केलाच पाहिजे. देवाळू लोकांच्या अंधश्रद्धेमुळे देवाच्या नावावर दलाली करणारे मूर्ख, लबाड, ढोंगी निघत असूनही त्यांच्यावर बोलण्याऐवजी प्रबोधन करणार्‍यांकडे शंकेने पाहावं, त्यांच्या नावाने शिमगा व्हावा हे पाहून मात्र नवल वाटते. महाराष्ट्रात प्रबोधनाचा फार मोठा इतिहास आहे, तुम्हाला तो सर्व माहितीही आहे. आपलं वाचनही मला माहिती आहे. प्रबोधनाचा विडा उचलणारे संत असतील, आधुनिक विचारांचा पुरस्कार करणारे लोकहितवादी आणि त्यांच्या परंपरेतील सहकारी असतील म. फुले असतील या लोकांनी नेहमीच वास्तवाचं भान दिलं आहे हे नाकारुन चालणार नाही. आजही जागोजागी देवाच्या नावावर फसणारी मंडळी आहे, आजारपणात दवाखान्यात जाण्याऐवजी अंगारे धुपारे, गंडे दोरे यावर विश्वास ठेवणार्‍यांची संख्या पाहता आपण कोणत्या पुरातन काळात जगत आहोत असे वाटायला लागते. आराम खूर्चीतली चळवळ म्हणा किंवा आणखी काही म्हणा मिपावरच्या काही प्रतिक्रिया पाहता प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता आहे, यनासरांचे विचार भले कोणाला पटत नसतील, पण त्याच्या जागराला समर्थन देण्याची मला गरज वाटते. आता पन्नाशीला पोहचणारी पिढी बदलेल असे म्हणने तसे धाडसाचे आहे, पण येत्या पिढीला शहाणे सुरते करता आले, आधुनिक विचाराकडे घेऊन जाता आले तरी ते पुरे आहे. आपल्या आवडत्या संताचा दाखला देऊन या धाग्यावर थांबतो. (चुभुदेघे) सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सुबोध खरे Fri, 02/23/2018 - 06:06 नवीन
बिरुटे सर लौकिकार्थाने मी काही आस्तिक नाही ( कदाचित नास्तिकही नाही) मी आजवर मुंबईत राहून सिद्धिविनायकाला गेलो नाही शिर्डी किंवा तिरुपतीलाही गेलो नाही. ( लष्करी अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवल्यास तात्काळ प्रवेश मिळत असतानाही). पण तरीही यनावाला यांचा अभिनिवेश कि नास्तिक लोकच हुशार असतात आणि आस्तिक लोक मूर्ख आहेत हा पटत नाही. जर समाजात जागृती करायची असेल तर मीच शहाणा हा अविर्भाव घेऊ चालत नाही. यनावाला प्रत्यक्ष तसे नसतील परंतु त्यांच्या एकंदर लेखामध्ये असा अविर्भाव नक्कीच जाणवतो. मागच्या लेखात त्यांनी श्रद्धेवर जहाल टीका केली होती. अशा तर्हेने टीका करण्यासाठी त्या माणसाला "तितका अधिकार" असावा लागतो आणि समाजमनात अधिष्ठान असावे लागते.(जसे महात्मा फुले किंवा संत तुकाराम यांचे होते) आज अनेक लोक वेगवेगळ्या मर्त्य माणसांवर श्रद्धा बाळगून असतात ज्यात स्वतःचे वडील, शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशी माणसे असतात. हि माणसे काही अस्खलनशील नसतात पण माणसे त्यांच्यावर निरागस पणे निस्सीम श्रद्धा ठेवून असतात. अशा माणसांना आपण तुमची श्रद्धा हि अंधश्रद्धा आहे असे सांगून प्रबोधन करू शकत नाही. कारण आपली श्रद्धा हि दुसऱ्याची अंधश्रद्धा असते. उदाहरण म्हणून देतो-- एखाद्या अतिलठ्ठ माणसाला "तू मूर्ख आहेस आणि इतकं साधं कळत नाही का कि अति खाऊ नये" हे सांगितले तर तो तुमचे म्हणणे ऐकेल का? बाकी उच्च पातळीवरची चर्चा काही मला झेपत नाही तरी यनावालांचा प्रबोधनाचा हेतू स्तुत्य असला तरीही त्यांचा असा आक्रमक पवित्रा मात्र उलट परिणाम करेल असेच वाटते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रकाश घाटपांडे Fri, 02/23/2018 - 06:44 नवीन
प्रबोधन काही वेळा आंजारुन गोंजारुन करावे लागते तर काही वेळा काहींसाठी प्रहार करुन. यना वाला हे प्रहार करुन प्रबोधन करतात. ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या परिक्षणात जयंत नारळीकर म्हणतात," 'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही. लहानपणी सूर्य आणि वार्‍याच्य़ा चढाओढीची गोष्ट वाचली होती, त्याचा प्रत्यय येथे येतो. वारा आणि सूर्य दोघांपैकी कोण एका पादचार्‍याचा कोट त्याच्या अंगावरुन काढून दाखवेल, अशी स्पर्धा होती. वारा वेगाने वाहू लागला, तसे पादचा-याने कोट आवळून धरला. अखेर वाराच थकला. मग सूर्य पुढे आला. त्याने संथपणे प्रकाशणे चालू ठेवले आणि काही वेळाने पादचार्‍याने फार उकडायला लागले, म्हणून कोट काढला. आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का? घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रदीप Fri, 02/23/2018 - 15:03 नवीन
घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे.
अर्थातच, प्रकाशच तो! तुमचे सगळेच लिखाण, त्यामागील संयत भूमिका नेहमीच अतिशय आवडत आलेले आहे. आता ह्या धाग्यावरही तुमचे प्रतिसाद, तुमच्या ह्या संयत भूमिकेला अधोरेखित करणारेच आहेत. वयाने वाढत असतांना माणसे अधिकाधिक नम्र व्हावीत, दुसर्‍यांबद्दल त्यांच्या मनांत आदर वाढावा, शब्द जपून बोलावेत व लिहावेत असे अपेक्षित असते. तुमची वाटचाल अशीच आहे. दुर्दैवाने, इतर काही मात्र जुन्याच, पोरकट म्हणाव्या अशा आक्रस्ताळी भूमिकेस चिकटून बसले आहेत. त्यांच्याविषयी काय म्हणणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ब
बिटाकाका Fri, 02/23/2018 - 06:15 नवीन
काही अतिशयोक्त वक्त्यव्ये ज्यांचं इथे मिपावर कोणीच समर्थन केल्याचं दिसत नाही. केलं असल्यास दाखवून द्या, मी माझे वक्तव्य मागे घेण्यास तयार आहे. १. उच्चशिक्षित असून तुम्ही तुम्ही जर देवाळू लोकांच्या प्रवृत्तीमुळे अजूनही अज्ञानी म्हणून जगत असाल......म्हणजे नेमके कसले अज्ञान? जगात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या अज्ञानात असतो. जोपर्यंत त्या अज्ञानाचा काही दुष्परिणाम नाही तोपर्यंत त्याचा काय त्रास आहे? तुम्ही म्हणता त्या अज्ञानाचा नेमका त्रास काय? २. समाजधुरीनांनी प्रबोधन म्हणून जे प्रयत्न केले ते वायाच गेले असे म्हणावे लागेल.....यात कोणते समाजधुरीनी तुम्ही गृहीत धरता? सगळे समाजधुरीनी नास्तिक (किंवा तुमच्या भाषेत अ-देवाळू) होते असा आपला दावा आहे का? ३.भोंदू बाबा, चोवीस बाय सात चालत असलेली वाहिन्यांवरील विविध बापू, महाराज, मा, अक्का यांच्या अनुभवातून काय काय बाहेर येतं ते पाहिलंच पाहिजे.....नक्की पहाच. ते त्यांच्या प्रवचनांमधून समाज प्रबोधन करतात कि अंधश्रद्धा पसरवतात हे कळण्यासाठी ते आधी पाहणे गरजेचे आहे. ४. ...ढोंगी निघत असूनही त्यांच्यावर बोलण्याऐवजी प्रबोधन करणार्‍यांकडे शंकेने पाहावं, त्यांच्या नावाने शिमगा व्हावा हे पाहून मात्र नवल वाटते.....शंका येते कारण ढोंगी निघण्याचे प्रमाण १००% गृहीत धरण्यात येत आहे. शिवाय जे देवाळू आहेत आणि अशा भोंदू लोकांवर विश्वास ठेवतात त्यांचे प्रमाणही सहेतुक १००% धरण्यात येत आहे. ५. आजारपणात दवाखान्यात जाण्याऐवजी अंगारे धुपारे, गंडे दोरे यावर विश्वास ठेवणार्‍यांची संख्या पाहता.....हे अतिशय परिस्थितीला धरून नसणारे वक्तव्य आहे. दवाखान्यात जाणाऱ्यांची संख्या वाढतेय कि कमी होतेय? मग खेड्यापाड्यात दवाखाने नाहीत, शहरात जावे लागते हि ओरड बरेच वेळेस ऐकण्यात का येते? कि शहरातले लोक गंडे दोरे आधी करतात आणि मग दवाखान्यात जातात? ते "संख्या" मध्ये नेमके प्रमाण किती गृहीत धरत आहात आपण? आणि कोणते देवाळू लोक त्याचे समर्थन करतात? ६. तुकारामांचा अभंग तुम्ही मानता, तुकाराम देवाला मानीत याबद्दल आपले काय म्हणणे आहे? ----------------------------------- स्वतःच्या सोयीसाठी देवाळू लोक म्हणजे अंधश्रद्धाळू लोक हे गृहीतकच मुळी नास्तिकांवर घेण्यात येणाऱ्या शंकांचं कारण आहे असे मला वाटते. ---------------------------------- तुम्ही प्रतिसादाला उत्तर नाही दिलेत तरी चालेल, प्रत्येक प्रतिसादाला उत्तर दिलेच पाहिजे हा मिपाचा नियम नाही. पण चर्चा अशी झाली पाहिजे, तशी झाली पाहिजे असे सांगणे म्हणजे....लोका सांगे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रचेतस Fri, 02/23/2018 - 06:21 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 10:26 नवीन
अशिक्षित लोकांचं एक वेळा प्रबोधन करता येईल
ठ्ठो!!! यावरून नास्तिक इफेक्टिवली अशिक्षित असतात असं सिद्ध होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गामा पैलवान Tue, 02/20/2018 - 16:57 नवीन
सप्तरंगी, यनावाला हे नास्तिपक्षाचे आस्तिक आहेत. एकदा का आस्तिक म्हंटलं की देवाचा विचार मनांत यायलाच हवा, बरोबर? ईश्वराच्या मनांत ईश्वरासंबंधी विचारंच नसतो. म्हणूनंच या अखिल ब्रह्मांडात केवळ ईश्वर हा एकमेव खराखुरा नास्तिक आहे. बाकी सगळे यनावालांसारखे स्युडो-नास्तिक. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
भ
भीडस्त Fri, 02/23/2018 - 05:55 नवीन
माझ्या मनात या 'engauge' ने घर केले आहे कृ ह घे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
A
arunjoshi123 Tue, 02/20/2018 - 16:35 नवीन
जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात.
यनावाला, आपण देव मानणार्‍या लोकांना अस्तिक आणि यनावालांना मानणार्‍या लोकांना यनास्तिक म्हणू. तुम्ही ही सारे विशेषणे लावून आणि अन्य काही इतकी विशेषणे स्वतःला लावून लोकांचा एक सर्वे करा. तर देवाची विशेषणे आणि देवाचे स्वरुप असू द्या, पण यनावालांची विशेषणे, स्वरुप आणि सर्व्हेमधे आलेली उत्तरे चेक करा. आता तुम्हाला नक्की काय विशेषणे बसतात नि काय नाही याची माहिती ते तुम्ही स्वतःच असल्याने माहित असेलच. तर लोकांची उत्तरे नि स्वस्वरूप मॅच करून बघा. पॉइंट असा आहे कि तुम्ही काहीही भारंभार विशेषणे वापरून कशाला काहीही म्हणणार का? लोकांनी काय विशेषणे लावली यावरून यनावालांचे स्वरुप कसे काय ठरू शकते? यावरून तर मोदींचेही स्वरुप ठरू शकत नाही. लोक असं असं म्हणतात तो ईश्वर? ही मेथडॉलॉजी कित्ती अशास्त्रीय आहे? आणि देव स्थिर स्वरुपाचा असतो कशावरून? त्याचं स्वरुप बदलत असेल नि लोक त्यावेळेस नविन विशेषणं लावत असतील. म्हणून कदाचित देव त्या त्या वेळी तसा तसा असेल. उदा. ईश्वर जर सर्वशक्तीमान असेल, तर माझ्याकडे जी शक्ती आहे तिचा काय हिशेब? ती तर मी स्वतः सोडून कोणाच्या बापाला वापरू देत नाही. वा कदाचित ते मला शक्यही नसावं. ह्या सगळ्या वजाबाक्या अ‍ॅडजेस्टमेंट्स न लिहिता तुम्ही लोक काय मानतात हे आपलं आपण काहीही गृहित धरणार का? आणि ही सगळी विशेषणं लागू असणारा, देव असेल तरी तो बाकीचं सगळं डिट्टॉ त्याच्यासारखं का बनवेल? मग त्याला काही महत्त्व उरेल का? देव थोड्या वेगळ्याच टाईपचा असावा. व्हायरस दर मायक्रोसेकंडाला मरतात, करोडोनी. तेव्हा देवाला मरणाबिरणाचं फार कौतुक नसावं, बाकी छुटपुट दु:खांचं असोच. माणसात नि व्हायरसात फरक काय? आकाराचा? क्लिष्टतेचा? देवाला आकार नि क्लिष्टता यांना जास्त भाव द्यावा असं वाटायचं कारण काय? त्यामुळे देव कसा हिशेब करत असेल वा त्याचा हिशेब कसा चूकिचा आहे असल्या हिशेबात पडू नये.
आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे.
मंजे मागे खूप चांगला अर्थ होता? जेव्हा वेगळा अर्थ होता तेव्हा काय होता?
( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.)
जग हे निर्माण झालं हे कुणी सांगीतलं? जग असणं वेगळं आणि निर्माण झालेलं असणं वेगळं? निर्माण झालं तर मूळात कशातून निर्माण झालं? का निर्माण झालं? कधी निर्माण झालं? कोणत्या प्रक्रियेनं निर्माण झालं? जसं निर्माण झालं आहे तसंच का झालं, दुसरं कसं का झालं नाही? काय जबरदस्ती होती का जग अस्संच असायची? हे सगळं ब्लूप्रिंट कुणी केलं का ते मधे मधे शून्यातनं पैदा होत असतं मधे मधे? शून्यातनं कसं काहीतरी अशून्य पैदा होतं? या निर्मिकांच्या मूर्खपणात नि अस्तिकांच्या मूर्खपणात काहीतरी फरक आहे का? मूर्ख तो मूर्ख. एक मूर्खपणा, एका अनालिसिस मधे एक लॉजिकल चूक करणारा निर्मिक आणि दहा हजार चूका करणारा दोन्ही सारखेच मूर्ख. उगाच त्या निर्मिकांना चढवून ठेऊ नका. त्यांचा बौद्धिक स्तर वरचा मानायची वा हानिदायक नाही मानणं हे चूकिचं.
जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत.
आपल्याला असं करता येतं केवळ या इतक्या एक कारणानं, याची कोणतीही सिद्धता न देता येता, नि असं करणं पूर्णतः आपल्या मर्जीची गोष्ट आहे म्हणून, लोक जेव्हा आपलं आणि आपलेतर विश्वाचं काही कनेक्शन आहे असं मानू इच्छितात तिथं अस्तिकपणाची पहिली ठिणगी पडते.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 02/20/2018 - 19:59 नवीन
आजच वाचण्यात आलेले काही... Image removed.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 02/21/2018 - 07:07 नवीन
मग योद्धे ते अवसरी । युद्धास ठाकले झडकरी । प्रतिसादाच्या झडल्या फैरी । हारजीत काही ठरेना ।। एक म्हणे तुम्ही वाचाळ । उगाची लाविता पाल्हाळ । करीता बडबड बाष्कळ । म्हणता देव आहे हो ।। कुणी देवदर्शनासाठी गेला । तिथे चेंगराचेंगरीत मेला । कुणी वाटेत ट्रकखाली आला । नाही वाचवले देवाने ।। येरु म्हणती मग सात्विक । मरत नाही का रे नास्तिक । विरोधी भक्त तू तात्विक । दिसे देव मिपाधागी ।। अशा त्या काळाच्या गोष्टी । काळापव्यये इतरांस हाणीती । आपलीच पाठ थोपटती । रिकामटेकडे लेकाचे ।।
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 02/21/2018 - 07:18 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
पैसा Wed, 02/21/2018 - 07:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/21/2018 - 07:53 नवीन
धन्यासेठ, अजुन प्रतिसाद लिहायचेत मला. देव जो पर्यन्त म्हणत नाय की राजा, आता थांब रे... तो पर्यन्त काथ्या कुटनार आहे. ;) देवभजनी लागलेल्या उच्च शिक्षित अंधभक्ताची थोड़ी ज़रा झोपमोड़ झाली तर निरीश्वरवादी यशस्वी झाले म्हणू ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 09:45 नवीन
मनःशांतीसाठी सगळे नास्तिक योगा करताहेत जगभरात. आणि योगा नास्तिकी उपचारपद्धती नाही. =================== सवड मिळाली तर कधी फेथ आणि स्लिप यांचं कोरिलेशन वाचा. ===================== माझी (तसा मी यावेळी झोपलेलो नसतो म्हणा) झोपमोड केल्याचा आनंद घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
N
NiluMP Wed, 02/21/2018 - 17:07 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/21/2018 - 08:59 नवीन
=)) =)) =)) कुणी देवदर्शनासाठी गेला । तिथे चेंगराचेंगरीत मेला । कुणी वाटेत ट्रकखाली आला । नाही वाचवले देवाने ।। असे झाले की डायरेक्ट स्वर्गात जागा मिळते, त्याचे काय ?! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चौकटराजा Wed, 02/21/2018 - 09:11 नवीन
अनन्त खवटी ओवी नायक धन्य म्हाराज की जय हो ! )))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चौकटराजा Wed, 02/21/2018 - 09:18 नवीन
ऐला , हापिसात आज येळ रिकामा दिसतुया !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/21/2018 - 16:17 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ग
गामा पैलवान Wed, 02/21/2018 - 08:55 नवीन
यनावाला, तुमच्या प्रश्नातंच घोळ आहे. 'निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही' हा प्रश्न मुळातून चुकीचा आहे. समजा ईश्वराने यनावाला नामक एखाद्या निरीश्वरवाद्यांस शिक्षा केली. पण यनावाला तर ईश्वराचं अस्तित्व मानणारे नाहीत. मग त्यांना कसं कळणार की आपल्याला ईश्वराने शिक्षा केलीये ते? शिवाय ही शिक्षा निरीश्वरवादाच्या अपराधासाठी केली आहे हे देखील कसं कळणार? तुमच्याकडे ईश्वराशी संपर्क साधण्याचा काही मार्ग आहे का? तो नसतांना उपरोक्त प्रश्न निरर्थक आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/21/2018 - 12:16 नवीन
ईश्वर ही नुसती कल्पना आहे, त्यामुळे तो कोणाचे काही करू शकत नाही. त्यामुळे तो ना निरीश्वर वाद्यांना शिक्षा करतो ना दिवस रात्र देवळात जाऊन डोकं उठवणा-या घन्टा वाजवून भजनं म्हणून म्हणून कोणा विवेक बुद्धी गमावणा-यांना प्रसन्न होतो. मुळात जिथे कोणत्याही क्रियेवर जिथे काही प्रतिक्रियाच येत नाही, तिथे कोणत्याच कृतीचा परिणाम होत नाही. म्हणून देव नावाची कल्पना कोणाला मदत करीत नाही आणि ती कोणालाही शिक्षा देत नाही, हेच सत्य आहे. म्हणून त्यांचा प्रश्न योग्य आहे. देव देव म्हणून उर बडवून घेणा-यांना ते एक समजून सांगितलेलं उत्तर आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ब
बिटाकाका Wed, 02/21/2018 - 12:32 नवीन
मुळात ईश्वरच नाही असे मानणार्यांनी मग तो अमुक का नाही करत नाही म्हणणे चुकीचे आहे असे त्यांना म्हणायचे असावे बहुदा! हे म्हणजे गंपाच्या गाभण म्हशीची कथ्था!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/21/2018 - 09:08 नवीन
अ‍ॅक्चुअली यनावाला आस्तिक आहेत व या सगळ्यामागे यनावालांना ईश्वराला भेटायचा कावा आहे असे वाटते. असे आस्तिकंना सतत सतावत राहीलो तर, ईश्वर समोर उभा राहून, "मी स्वतः ईश्वर आहे आणि बघ आता मी तुला शिक्षा देतो." असे म्हणेल. म्हणजे, यनावालांची चलाखी यशस्वी ठरून त्यांना याची देही याची डोळा ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन मिळेल... आला का ध्यानात सगळा प्रकार मंडळी ???!!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 02/21/2018 - 09:14 नवीन
+++++ =)) क्या बात है ! अताच मला देवाचा फोन आला..." येतोच्च यनावालाला भेटायला ! "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रकाश घाटपांडे Wed, 02/21/2018 - 09:16 नवीन
खर तर परमेश्वरच नास्तिक आहे. पण अस्तिकांमधे त्याची गोची होते म्हणून तो यनावालांच्या माध्यमातून लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 09:32 नवीन
घाटपांडे साहेब, वास्तवाचा असा विपर्यास कदापि सहन होणार नाही. यनावालांचा असा अपमान करता तुम्ही? ते विधान असं हवं: "खरं तर यनावालाच परमेश्वरच आहे. पण नास्तिकांमधे त्याची गोची होते म्हणून तो परमेश्वराच्या माध्यमातून लिहितो."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ग
गामा पैलवान Wed, 02/21/2018 - 14:04 नवीन
अरुण जोशी, एका अर्थी खरंय हे. नास्तिक असले तरी यनावाला अंतिम सत्याचा अंश असू शकतात ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 15:17 नवीन
अहो त्याच अर्थानं मी लिहिलं होतं. त्यांचा नि आमचा तिथून कनेक्ट आहे म्हणूनच नै का आम्ही त्यांचा ट्यार्पी वाढवत असतो? हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 09:39 नवीन
तुम्हाला यनावालांवर विश्वासच नाय राव. यनावालांची अश्रद्धा काय इतक्या हिन दर्जाची आहे देवानं अजूनही त्याची दखल घेतली नसणार? फ्लॅश दर्शन काय मंता देवानं त्यांना कंप्लीट लाईट टूर घडवून आणलीय स्वर्गाची. आता देव युद्धपातळीवर संशोधनाला लागलाय कि एखादी गोष्ट भास नाही हे "सायंटिफिक मेथडनं" मेंदूत कसं घुसडायचं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/21/2018 - 12:38 नवीन
वालावलकर यांच्या लेखनाबद्दल बोलण्या ऐवजी सर्व लोक यनांबद्दल व्यक्तिगत बोलतात त्याची मात्र गम्मत वाटते. :) देवाचा अस्तित्वाविषयी प्रेमाने टाहो फोड़णा-याना तो सर्वात अगोदर दर्शन देईल... कारण त्या विषयीचं ममत्व आस्तिकाना अधिक आहे. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 14:03 नवीन
यनांचं एकूण अस्तित्वच एक व्यक्ति म्हणून आहे असं तेच म्हणालेच. (ते तर फक्त स्वतःला आधार कार्ड नंबर म्हणतात, आम्ही तितकी कृपणता करणार नाही.) मग व्यक्तिगत नाही बोलायचं तर काय? वाईट बोलू मंजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शिवाय Wed, 02/21/2018 - 10:06 नवीन
सर्वाना कामाला लावून यनावाला फरार . दर्शन दे रे दे रे भगवंता किती अंत पाहाशी यना तू महंता
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Wed, 02/21/2018 - 10:11 नवीन
अरुण जोशी यांचे सर्व प्रतिसाद पटले ! ==== === हे स्वत:ला नास्तिक म्हणवून घेणारे लोक, एका आस्तिकांने मांडलेल्या मुद्द्याला शांतपणे कधीच प्रतिवाद करत नाहीत. फक्त आक्रास्तळेपणा व तुम्हा आस्तिकांचे प्रबोधन करणे शक्यच नाही वगैरे म्हणत मुद्दा मांडणार्‍यालाच मुर्खात काढायला बघतात
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा