निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला
जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत.
" ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे.
सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो?
आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे.
यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ?
देवदर्शनाला जाणार्या तसेच दर्शन घेऊन परत येणार्या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ?
कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही.
वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ?
अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते.
अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे,
"दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली.
आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥
विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली.
रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ?
पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥"
तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे.
देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल.
.................................................................................
“तुंम्हाला पुलंचे म्हणणे पटते, का फक्त त्यांचा सांगण्याचा मार्ग यनावालांपेक्षा पटतो?”पुलंचे म्हणणे आणि सांगण्याचा मार्ग, दोन्हीही पटतात. स्वतःचा देवावर, धर्मावर किंवा एखाद्या विचारसरणीवर विश्वास असणे-नसणे हा वैयक्तिक हक्कांचा भाग आहे. स्वतःचे मत स्पष्ट, समतोल, संयत व शास्त्रिय पद्धतीने दुसर्यांना सांगून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणे हे योग्य आहे. पण अश्या स्वतःच्या अथवा दुसर्याच्या विश्वासाचा उपयोग इतरांची दिशाभूल/फसवणूक/अपमान/जबरदस्ती करण्यासाठी करणे हे सर्वथा निषिद्धच आहे.तुमचा सर्व विरोध हा केवळ अास्तिकांचे ज्या पध्दतीने प्रबोधन केले जात अाहे, तिला अाहे, हे स्पष्ट झाले.हे आणि इतर काही. यनावालांच्या या व इतर अनेक लेखांच्यावरचे माझे प्रतिसाद पाहिले असतेत तर, हेच मी पुन्हा पुन्हा स्पष्टपणे लिहित आहे, हे तुमच्या ध्यानात आले असते. :) आजतागायत मानव या जगातल्या बर्याच गोष्टींबाबत अज्ञानी आहे याचे ज्ञान झाले की, मनाचे अंधत्व, हट्टीपणा व अडेलतट्टूपणा खुल्या मनाने टाळून, इतरांच्या मानवी अधिकारांवर गदा न आणणार्या कोणत्याही विचार व कृतीचे खुल्या मनाने विश्लेषण करणे शक्य होते. या विचारसरणीला अज्ञेयवाद असे म्हणतात... अज्ञानाचे ज्ञान... "अज्ञानाचे ज्ञान" झाले की; इतरांचे विचार व कृती... (अ) पटले तर, अहंकार बाजूला ठेवून, खजिल न होता, स्विकारता येतात आणि (आ) नाही पटले तर, "असहमतीवर सहमती" असा मध्यममार्ग काढून सरळ सुखाने राहता येते. "अज्ञानाचे ज्ञान" झालेले नसले की; आस्तिकांत, नास्तिकांत किंवा इतर कोणत्याही विचारधारेत, "मी म्हणतो तेच ज्ञान हेच अंतीम सत्य" अशी अंधश्रद्धा व त्या पायावर निर्माण झालेला अहंकार दोन्हीही, इतके बळावतात की आपले म्हणणे खरे करायला माणूस कोणत्याही थराला जायला तयार असतो. आणि ते करताना, तो स्वतः जप करत असलेल्या त्याच्या विचारधारेच्या मूलतत्वांची पायमल्ली होते आहे, याची त्याला पर्वा अथवा खंत वाटत नाही. असे करताना त्याचे बोलणे-लेखन-कृती स्वतःच्या विचारधारेपासून दूर जावून वैयक्तिक स्वार्थ व हितसंबंधाच्या दिशेने केव्हा जाते हे त्यालाही कळत नाही. ही एक प्रकारची अंधश्रद्धाच झाली, नाही का? जर कोणी असा दिशाबदल जाणीवपूर्वक करत असला, तर "तो त्याच्या कथित विचारधारेच्या पडद्यामागून चलाखीने वैयक्तिक स्वार्थ व हितसंबंध साधतो आहे", असेच म्हणावे लागेल ! ही तर सरळ सरळ बदमाषी झाली, नाही का ? (अज्ञानाचे ज्ञान... या विषयावर एक लेख लिहावा असे बरेच दिवस मनात आहे. पण ते "थोडक्यात पण समर्पकपणे" लिहायचे म्हणजे फुरसतीने लिहायला लागेल, म्हणुन ते काम मागे पडले आहे.)कदाचित यनावाला येतीलही तिथे :-)किती अतीआशावादी आहात तुम्ही ! दुसर्यांच्या धाग्यावर त्यानी लिहिलेले माझ्यातरी नजरेस आलेले नाही. स्वतःच्या धाग्यावरही ते अपवादाने प्रतिसाद देतात. :) ;) (वस्तूस्थिती आहे, पण हघ्यावेसांन)कॉलरा, पटकी आणि इतर काही पूर्वापार चालत आलेले आजार सोडले तर बाकीच्या आजारांशी देवाचा काहीही संबंध नाहीहे कोणत्या निकषांवर ठरवले ???!!! कॉलरा, पटकी या रोगांचा प्रादुर्भाव करणार्या मायक्रोब्जचा शोध लागून आणि त्यांच्यावरचे खात्रीचे औषोधोपचार सापडून अनेक दशके लोटली आहेत. "इतर काही पूर्वापार चालत आलेले आजार" हे काय असतात ? असे देवांशी संबंध असलेले कोणतेच आजार आस्तित्वात नव्हते/नाहीत/नसतील... अश्या आजारांची कल्पना भूतकालात, सद्यकालात आणि भविष्यकालातही १००% अंधश्रद्धा होती/आहे/असेल.