निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला
जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत.
" ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे.
सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो?
आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे.
यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ?
देवदर्शनाला जाणार्या तसेच दर्शन घेऊन परत येणार्या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ?
कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही.
वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ?
अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते.
अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे,
"दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली.
आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥
विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली.
रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ?
पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥"
तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे.
देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल.
.................................................................................
रिलिजन आणि स्पिरिचुअलिटी या भिन्न गोष्टी आहेत.मुद्दा फक्त देव मानणे वा न मानणे याचा आहे. मी ना धर्माविषयी बोलतोय ना अध्यात्माविषयी आणि त्याची तुलना पण चर्चेत नाहीये. सर्वसामान्य लोक जे सतत कुठल्या ना कुठल्या अडचणींचा सामना करत असतात, ते थोडा मानसिक आधार, शांतता मिळण्यासाठी देवाचे स्मरण/ पूजा करत असतील किंवा देवळात जात असतील किंवा सकाळसंध्याकाळ घरातल्या देवापुढे हात जोडत असतील किंवा स्तोत्र मंत्र म्हणत असतील तर त्यांना मूर्ख बिनडोक का म्हणायचं?ऑफिसला वेळेत जाण्याचे,लाच न घेण्याचे आणि व्यवस्थित काम करणार्यांचे उदाहरण आपण दिले आहे. पण त्यात विशेष ते काय? हे त्यांचे कर्तव्यच असते. ते त्यांनी केलेच पाहिजे.तुम्ही उदाहरण अर्धवट वापरलेत. मुद्दा असा आहे की देवभोळे पापभिरू लोक निदान देवाच्या कोपाच्या वा नरकात जायला लागेल या भीतीने तरी चुकीचे काम करणार नाहीत. पण देव न मानणाऱ्यांना ही भीती नसेल. मग फक्त या "विवेकबुद्धी"वर अवलंबून राहायचं म्हणलं तर किती जणांकडे ती असते? असं म्हणतात की प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने बरोबरच असतो. माझ्या विवेकबुद्धीला जे पटते ते तुमच्या विवेकबुद्धीला पटेल असं नाही. मग याचे प्रमाण कोणते मानायचे?श्रद्धाळू असणे हा एखाद्यायाचा व्यक्तिगत स्वभाव झाला पण स्वतःच्या नकळत त्याचा अतिरेक होऊ लागला तर ते त्याला आणि समाजाला हानिकारक आहेमी तेच तर म्हणलंय. यात सश्रद्ध आणि अश्रद्ध दोघेही आले. मी माझ्या प्रतिसादात लिहिलंय की आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या नीट सांभाळून जर कोणी देवदेव करत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? कोणी जर प्रवासातल्या वेळेत मनातल्या मनात जप किंवा स्तोत्र म्हणत असेल तर इतर कोणाला काय प्रॉब्लेम असावा? बाकी देवपूजा करण्यात वेळ घालवल्यामुळे घरात निर्माण ताणाबद्दल म्हणाल तर अश्रद्धांमुळे किंवा त्यांच्या विरोधामुळे घरात ताण निर्माण होत नसेल? नाहीतर मग अश्रद्धाचे आईवडील, जोडीदार, मुले हे सर्वच तितकेच अश्रद्ध असले पाहिजेत. सर्वसाधारणपणे नवरा आणि बायको वेगवेगळ्या स्वभावाचे असतात आणि आवडीनिवडीसुद्धा अगदी सारख्या नसतात. अगदी टोकाच्या नास्तिक नास्तिक व्यक्तीचा जोडीदार थोडा जरी आस्तिक असेल तर किती तणाव किंवा कुचंबणा असेल याचा विचार करा.पण त्या श्रद्धेमुळे आपण स्वतःच नुकसान करुन घेत असतो पण देवाळू मोडमुळे माणूस कितीही नुकसान झालं तरी ते नुकसान होतंय, हे कळतंय तरी ते कबूल न करणे आणि त्यातच डुंबत जाणे हे घातक होत जाते.हे वाक्य हे गृहीतक जास्त वाटतंय. श्रद्धेमुळे का आणि कसं स्वतःचं नुकसान होतं? कशावरून सर्व श्रद्धाळू कर्मकांडांच्या मागे लागतातच? घरातल्या लोकांच्या सहन करण्याबद्दल बोलायचं तर घरातले सर्व जण सारख्याच लेव्हलचे नास्तिक असायला पाहिजेत तरच वाद होणार नाहीत. कारण एक टोकाचा अश्रद्ध असेल आणि दुसरा थोडा जरी सश्रद्ध किंवा अज्ञेयवादी असेल तरी कोणा एकाची कुचंबणा होणार. या सगळ्यात आपण कुठे थांबायचं हे कळणं महत्वाचं. एखादा नास्तिक मुलगा आस्तिक मुलीच्या प्रेमात पडला तर केवळ आपलं नास्तिक्य टिकवण्यासाठी प्रेमाचा अव्हेर करेल का? आपण प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी (आई, वडील, जोडीदार, मुलं, मित्र) जर कधी देवासमोर हात जोडावे लागले किंवा प्रसाद घ्यावा लागला तर काय फरक पडतो?बाकी, अश्रद्धांळूचा मात्र असा कोणताही गजर नसतो. असं माझं मत आहे.यनावाला सारखा हा गजर करतात ना, इतरांना मूर्ख बिनडोक पण म्हणतात. वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पण देण्याचं सौजन्य दाखवत नाहीत.यनासर, व्यक्तीगत कोणाला मूर्ख बिनडोक म्हणाले असतील असे मला वाटत नाही.तुम्ही त्यांचे बाकीचे लेख वाचले असतील असं मला वाटलं होतं. त्यांनी सरसकट सगळ्या श्रद्धा ठेवणाऱ्यांना तत्सम विशेषणांनी गौरविलेले आहे.यनावाला सरांचा गजर प्रबोधनाचा आहे, त्याचा झाला तर फायदाच होतो नुकसान होणार नाही.हे तुमचं वैयक्तिक मत झालं. मला जर रोज गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीसा म्हणल्याने छान वाटत असेल तर कोणाला काय प्रॉब्लेम असावा? हे मंत्र म्हणणे मूर्खपणाचे आहे असं मला सांगून माझा काय फायदा होणार आहे?मिपावर टाकलेल्या लेखनाला प्रतिसादाला उत्तर दिलंच पाहिजे असा काही नियम नाही, ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे.हे तुम्ही कोणासाठी म्हणताय ते कळलं नाही. जर यनावाला उत्तर देत नाहीत या म्हणण्यावर असेल तर त्यांनी काढलेल्या धाग्यांवर विचारलेल्या प्रश्नांना तरी उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे की त्यांना सोयीस्कर असेल त्या ठिकाणी मात्र ते प्रतिसाद देतात. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे - हा ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे.कूच दर्द हे मेरे सिने मेंकुछ म्हणायचं आहे का तुम्हाला ? "कूच/कुच"चा अर्थ जरा वेगळा होतो :) ;)विज्ञानाच्या नावाने आपले ईश्वरविषयक अज्ञान खपवण्यात उत्साही पुरोगामी नास्तिक तरबेज असतात. हा. हा.बरोबर ओळखलंत तुम्ही. आणि अशा लोकांना उघडे पाडण्याचे तुम्ही जे धर्मकार्य अंगिकारले आहे त्यासाठी तुमच्याबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे.