जनातलं, मनातलं

सी पी बेरार सर्किट

Primary tabs

आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली.

माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो. त्या माझ्या भारत देशात, ज्यावर माझं प्रेम आहे, ज्याच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मी पाईक आहे, त्या देशात तेव्हा २२ राज्यं आणि ९ केंद्रशासित प्रदेश होते असं मला आठवतं.

अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि गोवा ही त्यावेळी राज्यं झालेली नव्हती. दिल्ली पण. हे सर्व केंद्रशासित प्रदेश होते.

"गोवा दमण दीव" ऊर्फ "गो.द.दी." हा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश. नकाशावर गोवा कुठे, दीव कुठे आणि दमण कुठे..!! पण आम्ही बच्चे लोक ते एकच आहेत हे स्वीकारायचो. आमच्या दैनंदिन जीवनात, म्हणजे काजूची बोंडे चोखणे किंवा पर्ह्यातले बारके मासे पिशवीत पकडणे यात, त्याने काय फरक पडत होता?

मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार ही भलीथोरली पसरलेली भव्य राज्यं. जगातल्या अनेक देशांपेक्षा आकाराने मोठी होती. त्यावेळी.

मधल्या काळात बघता बघता वयाची पन्नाशी आली आणि बघता बघता नवीन राज्यंही तयार झाली, जिल्हे फुटले, "केंद्रशासित"ची राज्यं बनली आणि राज्यांचे "केंद्रशासित" बनले.

आता २८ राज्यं आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत असं दिसलं गूगललं तेव्हा.

हे सर्व नॉस्टॅल्जिक पुराण आता का आठवावं? तर पुढच्या मजकुराला प्रस्तावना हवी ना. थेट मुद्द्याला हात घालायचा म्हणजे कायतरीच.

पुन्हा एकदा सुकाणू मूळ विषयाकडे आणतो. तर .. नुकतंच एका ठिकाणी फिल्म डिस्ट्रिब्यूशन ऊर्फ चित्रपट वितरणाच्या प्रदेशांविषयी वाचलं. त्यातली दुर्बोध नावं बघून कळेचना की या कोणत्या टेरिटरीज बुवा ? मला वाटलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यावर यथावकाश जी भाषावार प्रांतरचना झाली त्यानुसारच या सिनेमा वितरणाच्या टेरिटरीजसुद्धा असतील.

पण यांची नावे पाहतो तर, "निझाम टेरिटरी", "सीपी अँड बेरार" वगैरे.

बेळगाव हे महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांच्या सोबत. बॉम्बे टेरिटरी ही एक मोठी प्रसिद्ध.

शोध घ्यायला लागलो तर दिसलं की अगदी आजही याच टेरिटरीज त्याच जुन्या काळच्या नावांसहित चित्रपट वितरणाच्या धंद्यात टिकून आहेत. तो धंदा अजूनही त्या काळच्या भूगोलात गोठला आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं काम आहे त्या प्रकारे उत्तम चाललं आहे.

उलट आता त्यात उगाच बदल करणं हे जास्त अडचणीचं आहे. म्हणतात ना की देअर इज नो प्रॉब्लेम टू सॉल्व्ह फॉर देम.

भारतात फिल्म डिस्ट्रिब्यूशन व्यवसायात टेरिटरीसाठी आजही "सर्किट्स" ही संकल्पना वापरली जाते, जी घटनेनुसारच्या, राजकीय राज्यांच्या सीमांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

१९५० मध्ये "सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार" (C.P. Berar) हे "राज्य" (?) संपुष्टात आलं.

१९५६ मध्ये भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाली.

पण चित्रपट वितरणात अजूनही सीपी बेरार जिवंत आहे.

त्यात महाराष्ट्राचा विदर्भ भाग, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा काही भाग येतो. चूकभूल देणे घेणे. मराठी सिनेमे या टेरिटरीत चांगले चालतात.

आणखी एक असेच सर्किट, "निजाम सर्किट". यामध्ये तेलंगणा आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा भाग येतो.

इथेही मराठी सिनेमे चांगला धंदा करतात.

देश बदलला, नकाशावर रेषा बदलल्या, पण चित्रपट वितरकांनी आपली जुनी पाळंमुळं उखडली नाहीत. ते बदलले नाहीत. आजही "बॉक्स ऑफिस"चे आकडे मोजताना विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग न धरता सीपी बेरारचा भाग मानला जातो.

रोचक भाग असा की ही सर्किटस फक्त मेजॉरिटी लोकांची भाषा हा एकच क्रायटेरिया न मानता प्रेक्षकांच्या आवडीनिवडीवर ठरलेली आहेत असं मला वाटतं. म्हणजे कदाचित, विदर्भातल्या प्रेक्षकांचा आवडता "सिनेमा टाईप", किंवा अभिरुची म्हणू.. मुंबईपेक्षा वेगळी असू शकते, म्हणूनच ते अजूनही स्वतंत्र सर्किट म्हणून ओळखलं जात असू शकेल. राज्यांच्या रेषा आखून तिथल्या माणसांचे सगळेच चॉईसेस बदलत नसतात.

आजच्या आधुनिक भारतात चित्रपट व्यापार आजही ब्रिटीशकालीन आणि संस्थानकालीन नकाशावर चालतो हे मला तरी रोचक वाटलं.

आणि बॉम्बे टेरिटरी या नावावरून लहानपणी कोणाकडून तरी ऐकलेलं वाक्यही आठवलं, "कापडं काय बॉम्बेवरून आणली का?"

तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा. नॉस्टॅल्जियाला आताशा* कोण विचारतो!? आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बोलत राहू..

* तळटीप: आताशा..!!! छे... च्यायला वय झालं राव..

फ्रान्सची सीमा सगळ्यात जास्त लागून कुठल्या देशाला आहे? स्पेन? जर्मनी? बेल्जियम? नाही! उत्तर आहे ब्राझील!

गवि

रोचक आहे.

आणि जगात अनेक असे प्रदेश आहेत जे कोणत्याच देशात येत नाहीत.

गवि

आपली अंदमान निकोबार बेटं ही अंतराच्या दृष्टीने भारतापेक्षा थायलंडच्या जास्त जवळ आहेत.

गामा पैलवान

१९६५ च्या भारतपाक युद्धाच्या वेळेस इंडोनेशियाने अंदमान व/वा निकोबार ताब्यात घ्यायच्या हालचाली केलेल्या होत्या. पण पुढे फारसं काही झालं नाही.
-गा.पै.

गामा पैलवान

अवांतर :

पहिल्यांदा CP & Berar ( सी.पी. अँड बेरार ) वाचलं तेव्हा ते बीदर वाटलं. म्हंटलं, Central Provinces च्या सोबत नागपुराऐवजी बीदर का बरं जोडलंय? बरीच वर्षं गुंता उलगडला नाही.

शेवटी एके दिवशी मेंदूत दिवा पेटला. ज्या कोणी वऱ्हाडचं स्पेलिंग Berar केलं त्याच्या अंगठाछापपणास कडक कुर्निसात. म्हणतात ना कृत्रिम बुद्धीमत्तेस अंत असो वा नसो, नैसर्गिक बावळटपणा अमर्याद आहे.

-गा.पै.

मनो

गा.पै. मी परवा एका इंग्रज प्रवाशाची दैनंदिनी वाचत होतो, त्यात Metrich नावाचे गाव होते, ते मिरज आहे हे कळायला दोन दिवस लागले. इंग्रजीत जुन्या काळात जसे उच्चार तसे स्पेलिंग देण्याची मुभा होती असे कळते. Standardization नंतर अठराव्या शतकात आले.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्या नगर आहे! विशेष म्हंजे हा जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्याही भौगोलिक भागात येत नाही, ना खानदेशात ना मराठवाड्यात, ना कोकणात, ना पश्चिम महाराष्ट्रात ना कोकणात ना विदर्भात, प्रशासकीत विभाग उत्तर महाराष्ट्रात येतो.
महाराष्ट्रील सर्वात मोठा तालुका धुळे जिल्ह्यातील साक्री हा आहे, ह्या तालुक्यात तब्बल २२५ गावे आहेत, हा तालुका इतका मोठा आहे की स्थानिक लोकानी सोयीसाठी चार किथे भाग पाडले आहेत, ह्या तालुक्यात चार मोठे भाग आहेत नी त्यांची नावे लोक वापरात आहेत, ते भाग म्हणजे काटवान, कोकण , माळमाथा नी पांझरा- कान परिसर.

एखाद्या तालुक्यात चार मोठे लोकवापरातील उपविभाग असतील ह्याचे हे उदाहरण मालतारी एकमेव दिसले.

आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूचा भूगोल माहिती असणे गरजेचे आहे- निदान एखादे गाव आपल्या गावाच्या कोणत्या दिशेला येते, तिथे जाताना कोणती गावे मधे लागतात अशी माहिती नसेल तर मात्र हसे/अडचण/खोळंबा जे काही असेल ते होऊ शकते. त्याचे एक उदाहरण आमच्या कॉलेजातील एका कन्यकेचे. ती राहायला होती कोल्हापुरात आणि तिचे कॉलेज सांगलीत. ती आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायची. घरी जाताना नेहमी बसने जायची. पण एकदा ट्रेनने जायला निघाली. सांगली ते कोल्हापूर हा मार्ग बसने आणि ट्रेनने थोडा वेगळा आहे. ट्रेनने जाताना सांगली-मिरज-जयसिंगपूर आणि पुढे कोल्हापूर असा मार्ग आहे. वास्तविक जयसिंगपूर आहे सांगलीजवळ. रस्तामार्गाने कोल्हापूरला जाताना सांगलीनंतर लगेच १५ मिनिटात जयसिंगपूर येते आणि मिरज लागत नाही. पण रेल्वेमार्ग मात्र सांगलीहून मिरजला जातो आणि तिथून परत उलट्या दिशेने जयसिंगपूरला. मिरजहून जयसिंगपूरला जाताना ट्रेन एक मोठ्ठा गोल वळसा त्यामुळे घेते.

तर ही कन्यका कोल्हापूरला घरी जायला म्हणून मिरज स्टेशनला गेली. रस्ता आणि रेल्वेमार्गातील हा फरक तिला माहित नव्हता. तिला वाटत होते की मिरज-सांगली-जयसिंगपूर आणि पुढे कोल्हापूर अशी ट्रेन जाईल. त्यामुळे कोणाला तरी अमुक एक ट्रेन सांगलीमार्गे जाते का असे विचारून ती पुण्याला जायच्या पॅसेंजरमध्ये चढली. मिरजनंतर सांगली स्टेशन दिसल्यावर आपण योग्य मार्गावर आहोत असे तिला वाटले असावे. पण ती बरोबर उलट्या दिशेला चालली होती. आता जयसिंगपूर कधी येते याची ती वाट बघत होती. पण कुठचे काय ती जयसिंगपूरची वाट बघत बघत कराडला पोचली. योगायोगाने आमच्याच कॉलेजमधील कराडची एक मुलगी तिच्याच डब्यात पुण्याला जायला म्हणून चढली. मग- अगं तू इथे कुठे हा प्रश्न आलाच. तर ही कन्यका- मी घरी निघाले आहे असे बिनधास्तपणे बोलून गेली. मग झालेला घोटाळा लक्षात आला. मग ती सातार्‍याला उतरून बसने कोल्हापूरला गेली. त्यानंतर ती कन्यका आमच्या कॉलेजात एक लिजेंड असल्यासारखी झाली होती. त्या दुसर्‍या मुलीने तिसरीला, तिसरीने चौथीला 'फक्त तुला म्हणून सांगते इतर कोणाला सांगू नको' असे म्हणत सांगितलेली गोष्ट पूर्ण कॉलेजात पसरायला फार वेळ लागला नाही :)

गवि

कोल्हापुरात राहणाऱ्या कन्येला जर मिरज, सांगली आणि मग कोल्हापूर असा ट्रेनचा रूट अपेक्षित असेल तर अवघड परिस्थिती आहे. :-))

अभ्या..

मीही तो एक लिजंड आहे. :)
.
अजून असेच एक कांड केलेले मी.
मी कोल्हापूरला पहिल्यांदा गेलो ते एसटीने. स्टँड (कोल्हापूरच्या भाषेत सीबीएस) च्या दारात सिटी बस स्टॉप होता. तेथून डायरेक्ट कळंबा बस पकडून आयटीआय स्टॉप उतरायचे. आयटीआयच्या समोर आपले कलानिकेतन इतकेच माहीत होते. परत येताना सेम स्टोरी. काही दिवस बसने गेल्यावर काही मिरजेचे मित्र भेटले ते सगळे ट्रेनने येत. त्याचा स्टुडंट पास अविस्वसनीय कमी किमतीत असायचा. मग त्यांच्यासोबत ट्रेनने तिकिट काढून आलो. स्टेशनवर उतरताच ते एक्झीट गेट मधून निघून गेले. मी एकाला सीबीएस विचारले त्याने स्टेशनच्या दुसर्‍या टोकाला (कोल्हापूर हे रुटवरचे शेवटचे स्टेशन आहे, पुढे ट्रेन जात नाही) एक क्रॉसिंग गेट आहे तेथुन जाण्यास सांगितले. तेथे जाऊन मी कळंबा बस पकडली. ती फिरुन स्टेशनच्या दारात असलेला बससस्टॉप करुनच व्हीनस टॉकीजवरुन पुढे जायची हे लक्षातच आले नाही. परत येतानाही उलटा तसाच आलो.
ट्रेनने कॉलेजात येणारे मित्र भेटेपर्यंत माझी ही पायपीट पार पडली. नंतर खुलासा झाला.
.
त्यानंतरही एकदा संभाजीनगर(कोल्हापूरचे दुसरे बस स्टॅन्ड, इथे झपाटलेला मधला बाहुला बस पकडून जातो त्या भागाचे चित्रण झालेले म्हणे) हून स्टेशनला जायला बस मिळाली ती कसबा बावडा बस होती. आक्खे गाव फिरवून ती वेगळ्याच रुटने आली आणि माझे ईच्छित स्टॉप सोडून कधी पुढे आली ते कळलेच नाही. एक लाहनसे हेर्ले का काहीतरी गाव होते तिथे उतरुन परत आलेलो अजून आठवते.

रोचक :)

एक लाहनसे हेर्ले का काहीतरी गाव होते तिथे उतरुन परत आलेलो अजून आठवते.

हो. कोल्हापूर-सांगली रोडवर हेर्ले या गावाची पाटी बघितली आहे.

मॅपवर मुशाफिरी करताना कुलवंतीन कोड्याचा माळ हे प्रकरण दिसले. कोणतीतरी प्रीहिस्टॉरिक साईट असावी. कातळशिल्प सदॄश्य. की कोण्या बोअर्ड मेंढपाळाचे अर्वाचीन काम?

कुलवंतीन कोड्याचा माळ : लोकेशन

प्रचेतस

धन्यवाद.
तुम्ही दिलेल्या लोकेशनवर जाऊन पाहिले असता शिलावर्तुळ दिसले. अश्मयुगीन मानवांची दफनभूमी.

अभ्या..

भारतातले सर्वात मोठे शिलावर्तूळ (stone labyrinth) नुकतेच सोलापूरनजिक बोरामणी इथे सापडले आहे.
lb

आजकाल उठवळ इन्फ्लुएन्सर इतिहास संशोधक कुणालाही घेऊन असल्या गोष्टींचा इतिहास पिळूनच काढतात.

वरील वर्तुळे कोडे म्हणूनच प्रसिद्ध आहे आणि आता तिथे नेहमीप्रमाणे प्रचंड छेडछाड तर झालीच आहे पण एकूण त्याला प्रिझर्व करण्याचे प्रयत्न झालेले आहेत.

तरीही मुख्य प्रवाद हे एक कोडे आहे आणि ते अर्वाचीन आहे असाच आहे म्हणजे ४०० वर्षापूर्वीचे वगैरे.

ही दफनभूमी आहे हे सिद्ध करणे अवघड आहे का? अभ्या म्हणताहेत त्यावरून पॅटर्न वगैरे पाहता तसेच असायची शक्यता आहे.

परंतु सध्या लोकांची डोकी भलतीच उत्साही असल्याने हे कोडेच म्हणून याची इन्फ्लुएंसर वाट लागेल असे वाटत आहे.

काय पण धागा काढलायं
एखाद्या कापडातून एखादा धागा बाहेर यावा आणि तो उसवता उसवता दुसरा, मग तिसरा असे करता करता सगळेच धागे बाहेर निघावेत अगदी तस्से झालेय या धाग्याचे. लगे रहो मुविभाई !
मजा आ गया !