सकाळधरन पापणी फडफडत हुती.
कितीवेळा गळ्यातली साखळी पापणीला लावून म्हणलं, "जे काय हुनार आसल ग्वाड हूदे."
कावळाबी नेमका कोकलत हुता. बूटीतन भाकरीचा टुकड़ा आणून त्याला टाकला, कुणाला ठाव तो येणार म्हुन तर नसलं आला सांगायला.
दोन महिने झाले जाऊन त्याला. मागच्या टायमाला आंद्याच्या लग्नात आला हुता. औंधाच्या मुलीच वर्हाड आलंवत. लगीनभर नुसता माग पुढं करीत होता. वरातीत मागच्या माग पाण्याच्या टाकी आड नेलं हुत. हातात हात घेऊन म्हणला हुता, "आता लांब शहरात जाणार हाय. कामधंदा करून चार पैक जोडून हात तुझा मागणार हाय. राजाची राणी म्हुन नेणारे. येशील ना?