Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंत्रसामर्थ्य

य
यनावाला
Sat, 11/14/2015 - 16:55
🗣 233 प्रतिसाद
परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे. आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत. हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही. ** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?. **थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही. **" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.) "शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हेही एक होते. अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:-
:--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"
लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"
असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"
हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................
वर्गीकरण
चर्चा:-देव-धर्म-कर्मकांडे-मंत्रजप

प्रतिक्रिया द्या
141687 वाचन

💬 प्रतिसाद (233)
M
mystic man Sun, 11/15/2015 - 18:33 नवीन
नास्तिक लोक स्वतःवर मृत्यूची छाया पडल्यावर गलितगात्र होताना इतकी वर्षे पाहत आलो आहे खरे आहे. अशा वेळीस नास्तिकता गुंडाळून ते भिका मागू लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा Sun, 11/15/2015 - 19:32 नवीन
मानसिक आधार जो घ्यावा लागतोय तो शब्दच उघडपणे स्वतः सांगत आहे की संबधित व्यक्ती ही स्वतःचा विवेक तर्क फायटींग स्पीरीट हरवुन बसलेली आहे. एक व्यक्ती अमुक इतक्या टोकाला परीस्थीती ताणली गेल्यावर विवेक- तर्क- संघर्ष क्षमता गमावते दुसरी व्यक्ती अमुक इतक्या टोकाला गमावते. तिसरी व्यक्ती कधीच गमवत नाहीत. हे त्या व्यक्तीच्या शिक्षण क्षमता अनुभव वैचारीक बैठक कंडीशनींग आदि अनेक घटकांवर अवलंबुन आहे. तर तुम्ही दिलेल्या उदाहरणात ती दुर्देवी व्यक्ती आवश्यक विवेक तर्क संघर्ष क्षमता हरवुन बसलेली आहे. आता हे झाल्यावर दोन उपाय आहेत हरवलेली क्षमता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणे किंवा प्रवाहपतीत होऊन त्याच्या विरोधी टोकाला उपलब्ध असलेले मार्ग अवलंबणे उदा. मंत्रतंत्र , जप जाप वा इ. इ. ते वरील संबधित दुर्देवी व्यक्तीला बहुधा तिबेटन मंत्रात तो दुसरा मार्ग अवलंबत आहेत, तर त्यांच्याविषयी पुर्ण सहानुभुती बाळगुन मी असे म्हणेन की ते चुकीचा मार्ग अवलंबत आहेत त्यांनी विवेक तर्काची कास न सोडता संघर्ष केला पाहीजे. असे करुन काही होणार नाही. मी त्यांच्याकडे ते एक चुक करत आहेत असे बघतो त्यात मला त्यांच कौतुक करावस वाटणार नाही राग ही येणार नाही एक सहानुभुती वाटेल कोणी त्यांच्याविषयी मला विचारल तर मी अस म्हणेन की दुर्देवाने ते चुकीच्या मार्गाने जात आहेत त्यात काही चांगल नाही कौतुकास्पद नाही गौरवास्पद तर नाहीच नाही, आता टर्मिनल अ‍ॅट द डेथ बेड वर असुनही भीषण आजाराने ग्रस्त असुनही शेवटपर्यंत कुठल्याही ईश्वराला बाबाला मंत्राला मद्तीकरता न बोलावीता आपल्या दुर्धर अखेर खंगत खंगत मृत्युकडे नेणार्या आजारातही ताठ कण्याने स्वयंपुर्णतेने विवेकाने निर्भयतेन व स्वत्;च्या कठोर वैचारीक भुमिकेवर ठाम राहुन प्राण सोडणारे लोक अनेक लोक माझ्याही अनुभवात आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा Sun, 11/15/2015 - 19:41 नवीन
अटळच आहे मृत्यु तर त्यालाही अटळच असेल आजार तर त्यालाही एक ताठ कण्याने कोठल्याही काल्पनिक शक्तीला दुर्बलतेने न आळवता कोठल्याही बाबाला स्मरण न करता आहे त्या वास्तवाला कठोर नैसर्गिक सत्याला एका डिग्नीटीने एका स्वछ् निर्मल दृष्टीने त्या सत्याला भिडुन ही जगाचा जीवनाचा निरोप घेता येत असतो. नेहमीच त्यापुढे हतबल होण्याची रडण्याची आवश्यकता नसते पुरेसा विवेक वैचारीक बैठक कणखरपणा असल्यास सहजतेने व्यक्ती मृत्यु दुर्धर आजारपण आदीला फेस करु शकते. करते अस होत सर असेही लोक आहेत जीवनात आणि ते अस असण गौरवास्पद कौतुकास्पद आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सुबोध खरे Mon, 11/16/2015 - 09:08 नवीन
मारवा साहेब तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच. "पुरेसा विवेक, वैचारीक बैठक, कणखरपणा " असे सर्व सामान्य माणसांमध्ये असते तर गणपती दुध पितो, मंत्र म्हटल्याने हरवलेली वस्तू सापडते ख्रिस्तःच्या मूर्तीतून रक्त आले असे (अंध)विश्वास का तयार झाले असते. बाकी वय फार झाले कि मृत्यूची भीती कमी होते. आपण असलो काय किंवा नसलो काय जगाला काही फरक पडत नाही याची जाणीव होते शिवाय आपल्या बरयाचशा श्रद्धा आपल्या उपयोगी पडत नाहीत याचा हि पडताळा येतो. तेंव्हा अनुभव आणि नैराश्याने माणूस जास्त अश्रद्ध होताना दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Mon, 11/16/2015 - 11:07 नवीन
सुबोध जी तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच. मी एखाद्या तरुणाला त्या १०० मधील १ चे उदाहरण आदर्श गौरवास्पद म्हणुन देईल तुम्ही सांगितलेल्या तिबेटन मंत्र वाल्या व्यक्तीचे उदाहरण देणार नाही. तो एक मानवी कमकुवतता कशी असते, हतबलता असहाय्यता का कशी निर्माण होते त्या हतबलतेच्या परीणामाने माणसे कशी विवेकहीन तर्कहीन वागतात ते वागण्यात कसा निरर्थकता आहे हे सर्व मानवी जीवनातले नकारात्मक पैलु सांगण्यासाठी समजावण्यासाठी देइल. आदर्श गौरवास्पद उदाहरणासाठी शंभरातला वरील १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम Tue, 11/17/2015 - 10:04 नवीन
पुण्यात झालेलं जोशी-अभ्यंकर हत्याकांड सगळ्यांना माहित असेल. राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह या चौघांनी या निर्घृण हत्या केल्या. यथावकाश ते पकडले गेले, मग खटला झाला आणि सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. जक्कल तेव्हा भर कोर्टात बेशुद्ध पडला होता. इतकंच काय, त्यातल्या दोघांना अक्षरशः खेचत वधस्तंभाकडे न्यायला लागलं. पहिल्याला ज्याला फाशी दिलं त्याच्या फाशीच्या वेळी खटका ओढल्याचा आवाज आला त्याने बाकीच्या तिघांपैकी दोघांचे कपडे खराब झाले. त्यांना परत आंघोळ करायला लावून मग फासावर चढवण्यात आलं - त्याउलट जनरल अरुणकुमार वैद्यांचे मारेकरी जिंदा आणि सुखा हे अगदी शेवटपर्यंत शांत होते. इथे कुठेही कुणाचंही उदात्तीकरण करण्याची इच्छा नाहीये, फक्त मरण समोर आल्यावर लोक एखाद्या विश्वासामुळे किंवा त्याच्या अभावामुळे त्याला कसं सामोरं जातात त्याचं उदाहरण द्यायचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गुलाम Tue, 11/17/2015 - 13:30 नवीन
मरण समोर आल्यावर लोक एखाद्या विश्वासामुळे किंवा त्याच्या अभावामुळे त्याला कसं सामोरं जातात त्याचं उदाहरण द्यायचं आहे.
+१. बायदवे, भगतसिंगला जेंव्हा फाशी झाली होती तेंव्हा तुरुंगात त्याने Why I am an Atheist हा निबंध लिहिला होता. भगतसिंग किती धैर्याने मृत्युला सामोरे गेला हे तर आपल्याला माहित आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मारवा Wed, 11/18/2015 - 11:10 नवीन
बोकोबा सुबोधजींनी जे उदाहरण दिले होते ते डेथ बेड वर गंभीर आजारी असतांना तो एकच उपाय विश्वासाचा माणसाकडे या अर्थाने. त्यावरील प्रतिवादात मी मांडलेलं आहे की ज्याचा विवेक इ. असतो तो विश्वासाच्या अभावतही शांततेने धैर्याने असा स्थितीला फेस करु शकतो. आता तुम्ही जे उदाहरण दिलेल आहे ते परत धार्मिक व्यक्तीचा विश्वास हा प्रसंगी कीती घातक होऊ शकतो उदा. अतिरेकी धार्मिक विश्वासाच्या भविष्यकालीन धार्मिक कल्याणाच्या आशेने इ. बळावर थंडपणे माणसे मारतात आपण सर्वच बघतो. किंवा मी जणु हत्या नाही धर्मकार्य धर्मसंमतीने योग्य च असे केलेले आहेत असे. जे तुम्ही जिंदा सुखा इ. च्या दिलेल्या उदाहरणातुन दिसते. तुम्हीच मांडत आहात अजुन एक निगेटीव्ह बाजु जी धार्मिक विश्वासातुन उदभवते. मी धार्मिक विश्वासातुन उदभवत असलेली लाचारी परावलंबित्व अयोग्य मुल्यांवर विश्वास हे दर्शविले. तुम्ही आणखी एक बाजु प्ल्स धार्मिक विवेकहिन विश्वास कीती संवेदनशुन्य होऊन थंड पणाने माणस मारु शकतो. तुम्ही संवेदनशुन्यतेकडे निर्देश केला व उदाहरण दिल, जो धार्मिकांच्या बाबतीतला आहे. विवेकी व्यक्ती अर्थातच अशा तुम्ही दिलेल्या उदाहरणातल्या सारखी शांत नसते व सुबोधजींच्या उदाहरणातल्या सारखी हतबल नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सुबोध खरे Tue, 11/17/2015 - 13:56 नवीन
मारवा साहेब "आदर्श गौरवास्पद उदाहरणासाठी शंभरातला वरील १" हे बरोबर पण बाकी ९९ % लोकांनी ते धारिष्ट्य कुठून आणायचे? असणं कधी समजावण्याचे प्रसंग आपल्यावर आले आहेत का? केमो चालू असलेला माणूस अमुक बाबांचे तीर्थ तमुक बाबांचा अंगारा लावू का विचारतो त्याला हे "बौद्धिक" कसे उपयोगी पडेल? त्यांना जोवर त्यांच्या केमो मध्ये बाधा येणार नाही अशा गोष्टी करा असेच सांगावे लागते. पुरेसा विवेक वैचारीक बैठक कणखरपणा अस असण गौरवास्पद कौतुकास्पद आहे मान्य पण १०० पैकी ९९ माणसं अशी नाहीत. त्यांना काय ताठ कण्यावर भाषण द्यायचं? चार मंत्र म्हटले असता त्या माणसाला मानसिक शांती मिळत असेल तर त्याला असे उच्च तत्वज्ञान सांगून काय उपयोग? भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला( काही कोकणी मुसलमान दालदी म्हणून ओळखले जातात) विश्वेश्वराच्या घाटीवरून कुराण वाचून दाखवण्यासारखे आहे .--इति पु. ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्रकाश घाटपांडे Tue, 11/17/2015 - 14:02 नवीन
खर आहे. अनिश्चिततेला तोंड देण्याच्या प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात. तसेच त्या सर्वकालीन सारख्या नसतात. डॉक्टर साहेब आपण तर असंख्य रुग्णाचे भावविश्व जवळून पाहिले आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्राची बलस्थाने व मर्यादा ही आपण जाणता. त्यामुळे आपले प्रतिसाद वाचनीय असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा Wed, 11/18/2015 - 10:26 नवीन
हे बरोबर पण बाकी ९९ % लोकांनी ते धारिष्ट्य कुठून आणायचे? असणं कधी समजावण्याचे प्रसंग आपल्यावर आले आहेत का? असे प्रसंग माझ्यावर काही फार आलेले नाहीत . पण आले तर काय उपाय असावा काय नाही हा वेगळा भाग आहे. समाज जितका जास्त प्रगती करेल जितकं शिक्षण विवेक इ. च प्रमाण वाढेल जितकी स्वयंपुर्णता आर्थिक व वैचारीक निर्माण होइल तस तसे वरील समस्या नक्कीच कमी होत जातील अशी खात्री वाटते. मात्र मोठा प्रश्न हा आहे की तुम्ही कुठल्या मुल्याला महत्व देणार कुठल्या मुल्याचा प्रचार प्रसार करणार. तुम्ही अज्ञानातुन परावलंबनातुन निर्माण होत असलेल्या भय लाचारी इ. चा गौरव आदर्श समोर ठेवणार की निर्भयता स्वावलंबन (वैचारीक) इ. चा आदर्श समोर ठेवणार. हे बघा आदर्शाप्रत पोहोचणं पुर्णपणे हा एक भाग व त्या दिशेने सातत्याने अथक वाटचाल करत राहण हा दुसरा भाग. तर मान्य आहे की १०० पैकी सर्वच ही आदर्श अवस्था प्राप्त करु शकणार नाहीत पण प्रयत्न तर त्या दिशेनेच करणे व तो आदर्श डोळ्यासमोरच ठेऊन करणे अगत्याचे नाही का ? मुळात तुम्ही तुमचा मुल्य निर्णय काय करतात ? आदर्श काय ठेवतात तो आहे ? एकदा ते निश्चित झाल्यावर त्यात आपण कीती कमी पडतोय कीती अधिक प्रयत्न करण आवश्यक आहे किती नव्या साधनांची उपायांची गरज आहे हा सर्व पुढचा भाग झाला. मुळ प्रश्न तुमची निवड कोणत्या बाजुला आहे ? तुम्ही त्या मानवी असहाय्यतेला हतबलतेच्या बाजुने आहात की मानवी विवेक वैचारीक स्वावलंबन संघर्षशीलता या बाजुने आहात हा आहे. कारण यावरच पुढे तुमचे प्रयत्न तुम्ही कोणत्या दिशेने वळवता हे आहेत. मला तुमच्यासारखा प्रसंग (जो कधी येत नाही फारसा ) तर मी अगोदर त्याला विवेकवादाकडे वरील मुल्यांकडे प्रवृत्त होण्यास प्रामाणिक प्रयत्न करेल त्यात मला १००० मधुन २ वेळा समजा जरी यश आलं तरी चालेल. मी त्याकडे एक सुरुवात एक वाटचाल एक छोटी छोटी प्रगतीच्या दिशेने टाकलेली पावल या अर्थाने बघेल. आणि त्यात ९९८ वेळा येत असलेल्या अपयशाला एक धडा एक अभ्यास एक आपण कुठे कमी पडतोय या अर्थाने बघेल. प्रश्न कोणत्या बाजुचं कुठल योग्य की अयोग्य कुठला मुल्य कुठली नैतिक भुमिका तुम्ही घेत आहात तो मुलभुत आहे. प्रयत्न उपाययोजना पुढील भाग एक प्रथा उदा. चुक आहे की नाही हे ठरवण महत्वाच मानवी की अमानवी हे ठरवण महत्वाच मग तीचे उच्चाटन कसे करता येईल काय उपाय कीती हजारो वर्ष लागतील आदी बाबी त्यानंतरच्या अगोदरच्या नव्हेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा Wed, 11/18/2015 - 10:50 नवीन
चार मंत्र म्हटले असता त्या माणसाला मानसिक शांती मिळत असेल तर त्याला असे उच्च तत्वज्ञान सांगून काय उपयोग? हा तुम्ही तुम्हाला पटत नसलेल्या मात्र समोरच्या व्यक्तीला तात्कालिक फायदा होत असेल तर काय हरकत आहे असे सांगुन असे म्हणताय. यात तुम्ही त्या व्यक्तीचा तात्कालिक फायदा करुन त्याला कायमचा मानसिक अवलंबनात ढकलताय. उदा. एक भिकारी आहे त्याला आज भुक लागलेली आहे त्याला आजच्या जेवणापुरते तुम्ही पैसे दिले व त्याची आजची महत्वाची तात्कालिक भुक मिटवली. तर तुम्ही नक्कीच संवेदनशीलता दाखवली मात्र तुम्ही जर त्याला त्याऐवजी त्याच्या मुळ आर्थिक परावलंबित्वाच्या समस्येवर जर काही उपाय दिला काही त्याच्या लायक नोकरी मिळवुन दिली. काही त्याच्या हाताला काम दिल आणि कायमस्वरुपे त्याच्या मुलभुत समस्येवर (आर्थिक परावलंबन ) पासुन मुक्ती दिली तर तुम्ही खरया अर्थाने त्याला मोठी मदत केली असा होतो. आता तुम्ही वारंवार जर त्याची तात्कालिक समस्या तात्पुरत्या स्वरुपात सोडवुन देत राहीलात नेहमीच तर तो कायम आयुष्यभर आर्थिक परावलंबनातुन बाहेर येऊच शकणार नाही. याचा अर्थ असा आहे का की जी तात्कालिक मदत तुम्ही त्याला केली ती चुक आहे ? तर नाही ती योग्यच आहे मात्र हि मदत तात्कालिकच आहे ही अपुर्ण आहे याने त्याच्या जीवनातील मुलभुत समस्या सुटणार नाहीत तो याच्या वारंवार मदतीने कदाचित अधिकच आळशी होत जाईल याची पुर्ण जाणीव ठेऊन व आज ना उद्या त्याच्या साठी या पुढची पायरी घेऊन मोठा उपाय करणे हाच एकमेव उपाय आहे हे भान ही जाणीव अशी मदत करतांना ठेवणे आवश्यक आहे. या जाणीवे सहीत मात्र सध्या आपला नाईलाज म्हणुन अशी तात्कालिक मदत करत राहण्यात काहीच गैर नाही. पण तात्कालिक मदत हीच योग्य आहे असे समजुन बसुन त्याच्या मुलभुत समस्येचे अस्तित्वच अमान्य करणे त्याकडे डोळेझाक करणे त्याविषयी उदासीन असणे. अनेकदा आपली तात्कालिक मदत व आपल्यापुरते साधलेले मदत केल्याचे तात्कालिक समाधान हेच त्या पीडीतासाठी आयुष्यभरासाठी दिर्घकाळासाठी घातक आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. उदा. नाना पाटेकर सध्याच्या प्रत्येक कार्यक्रमात म्हणतात तस की मी जी मदत करतोय ती तात्कालिक आहे हा यावरचा कायम स्वरुपी उपाय नाही पण अती बिघडलेल्या परीस्थीतीत सध्या ती देखील महत्वाची आहे असे या विधानात नाना पाटेकर या पुर्ण जाणीवेने की आपण जे करतोय ही तात्कालिक मदत आहे हेच समजुन करतात. त्यांना असलेले हे वास्तवाचे भान फार कौतुकास्पद आहे. ते मी करतोय हेच बरोबर याहुन अधिक काही गरज नाही बस झाली समस्या झालो मी मोकळा असे नाही त्यांना स्वतःच्या आवाजाला कसेबसे थांबवण्यात रस नाही. वर यनावाला अवहेलना सहन करुन ही जे अशा धाग्यांमार्फत प्रयत्न करतात ते असेच महत्वाचे आहेत. त्यांच्या कडे असलेल्या इतर अनेक सुंदर ज्ञानाला आवडत्या विषयांना मुरड घालुन ते हा सर्व आघात स्वतःहुन ओढवुन घेतात पॉलिटीकली करेक्ट राहण्याचा नेहमी प्रयत्न करण प्रत्येकवेळी स्तुतीची प्रशंसेची आस बाळगुन असण हे ते करत नाहीत. व दिर्घ मुदतीचा अधिक कष्टाचा त्रासाचा मार्ग कठीण आहे म्हणुन काय उपयोगाचा असा विचार करणे चुक आहे. एक स्टीफन कोव्हे च्या पुस्तकावर "Give a man a fish and you feed him for a day; teach a man to fish and you feed him for a lifetime." हा सुविचार आहे जो अनुकरणीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
P
pacificready Wed, 11/18/2015 - 11:04 नवीन
विवेकवाद म्हणजे नेमकं काय? आस्तिकतेच्या प्राथमिक आवश्यक गोष्टी मध्ये विवेक, वैराग्य, शमादिषटक आणि मुमुक्षत्व सांगितलं जातं. यात विवेक म्हणजे जे नाश पावणारं आहे त्याच्या मागं न जाता जे स्थिर अविनाशी आहे त्याचा विचार करणे व त्याचा पाठपुरावा करणे. तुमचा विवेक काय सांगतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
भ
भाऊंचे भाऊ Sun, 11/15/2015 - 18:39 नवीन
असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते
. या विधानात तथ्य नाही असे नमुद करावेसे वाटते. पण अर्धवट विधान न तोडता आपण संपुर्ण वाक्य बघुया.
मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही.हे वैज्ञानिक सत्य आहे.
मला विज्ञान फार आवडते. पटत नाही तरीही आवडते. चित्रपट विडीओ गेम्स पासुन ते अनेक बुध्दी भ्रमीत करण्याचे तथा या संपुर्ण प्रुथ्वीचा नाश करायचे सामर्थ्य अन मस्ती विज्ञान मानवामधे अत्यंत व्यवस्थीत निर्माण करु शकते. मिसळपाव सारख्या संस्थळापासुन ते मती भ्रमीत करणार्‍या एच डी पॉर्न स्थळापर्यंत सर्व काही भ्राम मायाजाल विज्ञानच रचु शकते. विज्ञानाच्या या सामर्थ्याला सगळेच घाबरतात त्याच्या प्रभावाने बरेच भ्रमीत होतात. अन विज्ञान किर्तनी रममान होतात हे ही एक उघड गुपित आहेच... पण हळु हळु ते सामजावण्यात मज्या आहे म्हणून विषयाकडे वळुया... म्हणून मला कायम मनात प्रश्न निर्माण होतो की हे विज्ञान काय आहे ? आणी त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे वैज्ञानीक सत्य म्हणजे नक्कि काय असते हे जरा स्पश्ट कराल का ? माझा तरी वैज्ञानीक सत्य हा शब्द ऐकल्यावर प्रचंड गोंधळ उडतो ( जर तो शब्द विनोद म्हणून योजला नसेल तर) . विज्ञानाच्या नियमाने न चालणारी गोष्ट अस्तित्वात नाही असे विज्ञान ठाम्पणे का म्हण्ते हेही जाणुन घ्यायला आवडेल. हे म्हणजे अमुक धर्माप्रमाने जगाहे आचरण नसेल तर इतर कोणत्याही धर्माचे जगात केले जाणारे आचरण धार्मीक आचरण नाहीच मुळी असा घातक कट्टरतावाद मानु नये ?
वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे
तुकारामांचे एक वाक्य आहे लोका सांगे ब्रम्हज्ञान ... .. ..ण. ( कृपया गाळलेली जागा भरावी)

आजची स्वाक्षरी :- पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला.

  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 11/15/2015 - 18:54 नवीन
तुम्ही भाऊंचे भाऊ कधी झालात? पहिले अवतारकार्य संपले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भाऊंचे भाऊ Sun, 11/15/2015 - 19:10 नवीन
पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला
यासम ओवी मी एका धाग्यावर प्रतिसादात लिहली होती तो प्रतीसाद गायब झाला असे दिसले तितक्यात माझा द-बाहुबली हा आयडी सुध्दा बॅन झाला. असो या चर्चा व्यनीत वा खरडवहीत कराव्यात असा मिपा संस्थळाचा दंडक आहे तुम्ही तो तोदल्याचा मला आनंद आहे असे म्हणून मी अदचणीत येउ इच्चीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
M
mystic man Sun, 11/15/2015 - 18:44 नवीन
हा mystic man कोणाचा डुआयडी एस - Sun, 15/11/2015 - 22:03 हा mystic man कोणाचा डुआयडी आहे हे ओळखणे अजिबात अवघड नाही. एस साहेबांच्या दिव्यदृष्टीने प्रभावित झालो. उद्या मी जर सं.मं.ला विनंती केली की माझे आयडी नाव स्वप्स असे करुन द्या तर मग मी स्वॅप्स साहेबांचा डुआयडी झालो की!!! रामा... रामा...
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 11/15/2015 - 18:56 नवीन
फारच भाबडे ब्वॉ तुम्ही! असो. बाण बरोबर लागलेला आहे! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mystic man
भ
भाऊंचे भाऊ Sun, 11/15/2015 - 19:13 नवीन
हा mystic man कोणाचा डुआयडी आहे हे ओळखणे अजिबात अवघड नाही. एकाने हा म्हाझा डु आयडी अहे काय असे खासगीत विचारले आहे म्हणून स्पश्टीकरण इथेच देतो mystic man हे सदस्यनाम मी तयार केलेले अथवा वापरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mystic man
म
मारवा Sun, 11/15/2015 - 18:54 नवीन
संपादक मंडळ इथे जी चर्चा विधायक दिशेने सुरु आहे त्यात अडथळा आणुन वातावरण कलुषीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृपया येथील प्रतिसादांची पाहणी करावी यात काही चुकीच्या दिशेने जाणरे प्रतिसाद असतील तर त्यावर कार्यवाही करावी ही विनंती, यात माझाही काही प्रतिसाद चुकीचा वा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारा असेल तर त्यावरही कार्यवाही करावी. कृपया येथील प्रतिसादांची एकदा तरी पाहणी करावी ही कळकळीची नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 11/15/2015 - 18:59 नवीन
इथे जी चर्चा विधायक दिशेने सुरु आहे त्यात अडथळा आणुन वातावरण कलुषीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे मग फक्त अध्यात्मावर बेताल टीका होत असेल तर ती विधायक का? धन्यवाद मारवा साहेब...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Sun, 11/15/2015 - 19:03 नवीन
वाद टीका याच्याशी कधीच अडचण नाही नेव्हर जो प्रतिसाद व्यक्तीगत पातळी सोडुन होतोय तो तर्कहीन दर्जाहीन भावनाविवश आहे केवळ ज्याने चर्चा एक इंच देखील सकारात्मकतेने पुढे सरकत नाहीये किंबुहना ज्याने अडथळाच येतोय केवळ तितक्या आणि तितक्याच मुद्द्यावर आक्षेप आहे. बाकी कशाचीच अडचण नाही काहीच तक्रार नाही खरच त्यावरच केवळ आक्षेप आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Sun, 11/15/2015 - 19:16 नवीन
आपल्या विचारांशी मी सहमत आहे. असे प्रतिसाद नक्किच दिले गेले नाही पाहिजेत चर्चा सकारात्मक खुल्या मनाने आणी आवश्यक मुद्याभोवती व भावनेला थारा न देताच घडणे अपेक्षीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
भ
भंकस बाबा Sun, 11/15/2015 - 19:05 नवीन
मी स्वतः नास्तिकतेकडे झुकणारा आहे पण एक खरा घेतलेला अनुभव सांगतो. मध्य रेल्वेवर कर्जत फाट्याला भिवपूरी रोड म्हणून स्टेशन आहे. तेथील उकरुळ गावात मी राहात होतो. माझ्याकडील एका कामगाराच्या बायकोला रात्री ११च्या सुमारास विंचु चावला. बाई पाण्यातून काढलेल्या मासळी सारखी तड़फडत होती. डॉक्टरकडे कर्जतला नेतो बोललो तर नको बोलली . शेवटी गावातील एका मांत्रिकाकड़े नेली. त्याने आत फ़क्त काहीतरी पुटपुटल्यासारखे केले . पंधरा मिनिटांनी बाई पुष्कळशी सावरली. सकाळपर्यन्त विंचुदंशाचे नामोनिशान नव्हते. काय असेल ते? कदाचित त्या मंत्राने प्लासिबोचे काम केले असेल. आणि हो याच रायगड जिल्ह्यात विंचुदंशाने माणसे मरतात म्हणून हिंम्मतराव बाविस्करानी आपले सर्व आयुष्य पणाला लावुन संशोधन केले. त्यांचे हे संशोधन लैन्सेट मधे देखील छापुन आले होते. विचारवंतांनी दोन्ही बाजू बघुन मते मांडावित. गावाचे नाव सविस्तर दिले आहे. खात्री करून घ्यावी
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 11/15/2015 - 19:06 नवीन
माझा देखील प्रतिसाद असा चुकीचा आढळला तर तो तात्काळ काढावा हीच विनंती करतोय किमान एकदा तरी येथील प्रतिसादांची पाहाणी करावी हीच एकच छोटी विनंती आहे संपादक मंडळ प्रगल्भ अनुभवी आहे ते नक्कीच योग्य निर्णय घेतील त्यांनी च प्रतिसादाचा दर्जा ठरवावा
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 11/15/2015 - 19:18 नवीन
कदाचित यापूर्वी यावर मी लिहिले असेल, पण परत लिहितो - मी ऐकलेले २ अनुभव आणि पाहिलेला एक १. पहिला अनुभव माझ्या बाबांचा आहे - माझा जन्म तेव्हा व्हायचा होता/ नुकताच झाला होता. आमची म्हैस किडे पडून उठवणीला आली होती. आतापर्यंतच्या लोकांच्या अनुभवानुसार आता तिला वाचवणे कोणालाही शक्य नव्हते, अगदी गुरांच्या डोक्टरनी पण हात टेकले होते. त्या दिवसांमध्ये माझ्या बाबांचा खाडीपलिकडे दवाखानाजातानाएक दिवस ती म्हैस अगदी मरायला टेकली होती, आणि बाबांना तर दवाखान्यात जायचे होते, त्याप्रमाणे ते गेले, जातानाच गावातील ४ माणसांना सांगून गेले संध्याकाळी फेरी टाका, बहुतेक म्हैस उचलायला लागेल. दवाखान्यात कोणाशी तरी त्या म्हशीचा उल्लेख आला, तेव्हा त्याने सांगितले की इथे कोणीतरी मांत्रिक राहतो, त्याला विचारा. मग त्याला बोलवणे पाठविले, आणि तो आला. त्याने विचारले म्हशीचे नाव काय आहे? यांनी त्याला काय ते नाव सांगितले, आणि त्याने मंत्र टाकला. तेव्हा बाबांना काही त्याचे गांभीर्य कळले नाही, पण गम्मत म्हणजे बाबा घरी आले तेव्हा त्या म्हशीच्या जखमेतले सगळे किडे निघून गेले होते आणि म्हैस पूर्ण बरी होऊन पुढे ४ वर्षे जगली. २. असाच अनुभव मी आमच्या बैलाच्या बाबतील स्वतः घेतला आहे. सर्व तथाकथोत वैद्यकीय उपाय थकल्यावर मंत्राने त्या बैलाला गुण आलेला मी पाहिला आहे. पण त्यावेळेस त्या माणसाने एक पाळ त्या बैलाच्या तोंडासमोर माळ्यावर ठेवायला सांगितले होते, त्यामुळे या प्रसंगाला एक गुण कमी. तरी सुद्धा औषध आणि रोग्याचा प्रत्यक्ष शारिरिक संपर्क नाही ३ तिसरा प्रसंग पुन्हा माझ्या बाबांचा आहे - वर सांगितल्याप्रमाणे खाडीपलिकडील दवाखान्यात गेलेले असताना तिथे एक गारूडी आला. यांनी सहज त्याला विचारले की तू साप बोलवू शकतोस का? तो म्हणाला हो. एव्हढेच नव्हे तर त्याने असे सागितले की इथे एकूण ३ साप (नाग) आहेत. त्यातले २ माझी आज्ञा मानतात. तिसर्‍याची श्रेणी वरची आहे, त्याला माझ्या आज्ञा लागू होत नाहीत, असे म्हणून त्याने मन्त्र म्हणून कवड्या फेकल्या. २ मिनिटात तिथे २ नाग फुत्कारत हजर झाले, त्या कवड्या म्हणे त्यांच्या फण्यात रुतून बसल्या होत्या. त्यातला एक साप तर बाबांच्या बाजूला फणा काढून उभा होता. त्याने ते साप बाबांना दाखवून एका सापाच्या तोंडातून सो कॉल्ड नागमणी काढून बाबांना दिला. यामुळे मंत्रांचे सामर्थ्य या गोष्टीबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही. माझे व्यक्तिगत अनुभव आअहेत, पण ते काही कारणाने लिहू शकत नाही.(त्यबद्दय माझ्यावर होणारे सारे आरोप सहन करण्याची माझी तयरी आहे) बाकी मंत्राच्या सामर्थ्याबद्दल वल्गना करणार्‍यांबद्दल माझ्या मनात राग मात्र आहे. कारण ते एकूणच अध्यात्माचा बाजार मांडतात. आणि मंत्रंमध्ये सामर्थ्य नसते असे म्हणणार्‍यांबद्दल माझ्या मनात दया आहे. नास्तिकता ही त्या माणसाची चुकी नाही असे मी मानतो, एखाद्याला देवाचा अनुभव नसेल तर त्याने देवावर विश्वास का म्हणोन ठेवावा? मी तर नसता बुवा ठेवला.
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Sun, 11/15/2015 - 19:22 नवीन
झालं ? समोर वाचुन झाली गिता ? काय फरक पडणार आता ? काय ? उद्याचा गोंधळ कँसल होइल म्हणताय.. फार सुरेख आशावाद आहे आपला. असो, प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Mon, 11/16/2015 - 04:19 नवीन
प्रतिवाद करायला कोणी नाही येणार हे मला माहीत आहे. कारण #३ अक्षरशः धडधडीत अंधश्रद्धा(?) आहे. आणि हा अनुभव बाबांनी मला गारूडी खरा की खोटा हे सांगायला नव्हे, तर तो नागमणी घरात बघितल्यावर हा तुम्हाला कसा मिळाला या कुतुहलापोटी सांगितलेला अनुभव आहे. व्यक्तिशः मला माझ्या वडिलांच्या सत्यकथनाबद्दल तिळमात्र संदेह नाही. पण इथल्या विवेकवाद्यांना असेल याबद्दलही माझ्या मनात शंका नाही. बाकी अगदी तुम्ही त्या गारूड्याने नजरबंदी केली असे म्हणले तरी ती देखील अंधश्रद्धाच नाही का? एखाद्याला काही खायला प्यायला न देता त्याला नुसत्या मनाच्या साअमर्थ्यावर संमोहित करणे ही अंधश्रद्धाच नाही का? (मला हा प्रश्न श्याम मानवांना विचारायचा आहे) या यादीत तर संमोहन देखील आहे. ते विवेकवाद्यांना आरोप करायला कसे काय चालते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/16/2015 - 09:47 नवीन
अहाहा ! सापाच्या तोंडातुन सो कॉल्ड नागमणी काढून दाखवला ! व्वा सुरेख. और भी आने दो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Mon, 11/16/2015 - 10:46 नवीन
ते वरचे पण पहा की वो जरा. त्यांनी म्हणे मंत्राने साप बोलावला तिथे. पुंगी वाजवून नव्हे. आणि हा खेळ उघड्या मैदानात नव्हे तर जंगलात चालला होता. असो. तुमच्याबद्दल मनात आदर आहे म्हणून भाषेला आवर घालतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/19/2015 - 06:45 नवीन
>>>>> तुमच्याबद्दल मनात आदर आहे आदराबद्दल आभारी आहे. धन्यवाद. >>>>म्हणून भाषेला आवर घालतोय. काय लिहायचं ते व्यक्तिगत शेरेबाजी सोडुन बिंधास्त लिहा आणि व्यक्तिगत शेरेबाजी केली तरी आम्हाला आता काही वाटत नाही. आमची गेंड्याची कातडी झाली आहे, आम्हाला काहीही टोचत नाही. बिंधास्त लिहा. मंत्राने अजुन काय काय होतं ते लिहा वाचायला आवडेल. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Fri, 11/20/2015 - 06:13 नवीन
तुमचा प्रतिसाद तात्विक पातळीवर वाद घालण्याऐवजी प्रतिसाद्कर्त्याची अक्कल काढाण्याकडे जास्ती झुकत होता म्हणून मी वैयक्तिक बोललो. अन्यथा माझी लेखणी सहसा पातळी सोडत नाही. सबब व्यक्तिगत शेरेबाजी करणे हा माझा प्रांत नाही, तस्मात पास. राहिला प्रश्न अनुभवांचा. त्याबाबतीत इथे काही न बोलणेच उत्तम, कारण माझ्या पूर्वायुष्यात मी देखील अज्ञेयवादाकडे झुकत चाललो होतो, पण काही स्पष्ट वैयक्तिक अनुभवांमु़ळे मी आस्तिक झालो. आणि हे अनुभव संकटात असताना देवाने मदत केली अश्या स्वरूपाचे नाहीत हे स्पष्ट करतो. हे अनुभव कधी बोलायचे झाले तर प्रत्यक्ष भेटलो तरच. ते अनुभव वैयक्तिक असून पब्लिक करता येत नाहीत. पण म्हणूनच माझ्या मनात प्रामाणिक नास्तिकांबद्दल आदरच आहे. अगदी त्यांनी पातळी सोडली तरी. अर्थात जोपर्यंत ते काही अनैतिकपणा, दांभिकपणा करत नाहीत तोपर्यंत. त्याच न्यायाने माझ्या मनात तुम्ही किंवा प्रकाश घाटपांडे किंवा यनावाला यांबद्दल आदर आहे. म्हणून मी वर थांबलो. तुम्हाला जर खरेच चर्चा करायची असेल तर वर उल्लेखलेल्या अनुभवांना तुमच्या अनुभवाच्या पातळीवर कसे खोडून काढता येईल याबद्दल लिहा. अनुभवांची सत्यता किंवा विश्वासार्हता याबद्दल टीका करून काहीच साध्य होणार नाही, कारण माझ्या वडिलांनी असत्य संभाषण केलेले मी आजपर्यंत बघितलेले नाही. त्यामुळे तो दांभिकपणा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/20/2015 - 06:54 नवीन
प्रतिसाद कसेही असले तरी मी कोणाची अक्कल काढत नाही. मात्र काही प्रतिसाद वाचुन हसुन हसुन पुरेवाट होते. आपला प्रतिसाद वाचुन क्षमा करा पण माझी हसुन हसुन पुरेवाटच झाली आहे हे नम्रपणे नमुद करतो. मंत्र म्हटल्याने म्हशीच्या अंगावरील किडे पळुन जाणे, मंत्र म्हटल्याने नाग फुत्कारत येणे, नागमणी काढुन देणे, हे सर्व हास्यास्पद वाटतं हो बाकी काही नाही. आपल्या वडीलांबद्दल आणि आपल्याबद्दल आदर आहे पण आपल्या प्रतिसातील गोष्टी न पटणार्‍या आहेत. मंत्राने वरील गोष्टी होतात तर मंत्र म्हटल्याने एटीएममधील पैसे कार्ड न टाकता पीन कोड न टाकता काढून दाखवता येतील का ? मला नाही वाटत असं काही करता येईल. म्हणुन दोन हजार सोळा उजाडले तरी अशा गोष्टी वाचल्या की वाईट वाटते हो बाकी काही नाही. आणि माझ्या प्रतिसादाचंही खूप मनावर घेऊ नका सोडुन द्या. आपले प्रतिसाद मात्र वाचत राहीन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Fri, 11/20/2015 - 18:19 नवीन
प्रश्न हास्यास्पद असण्याचा नसून यामध्ये प्रचलित विज्ञानाच्या बाहेरचे काही नाही हे सिद्ध करण्याचा आणि त्यामागचा कर्यकारणभाव सांगण्याचा आहे. वर उल्लेखलेल्या घटना सत्य आहेत याबद्दल् संशय नाही. आणि म्हणूनच मी म्हणले तसे हा विषय तात्विक चर्चेने सोडवता येत असेल तर ठीक आहे. नाहीतर वैयक्तिक पातळीवर येऊन शेरेबाजी करण्याची माझी इच्छा नाही. तुम्हीदेखील नेऊ नका. उगीच तुमच्याबद्दलचा आदर कमी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/21/2015 - 03:19 नवीन
आपल्या अनुभवाची तात्विक पातळीवर चर्चा होऊ शकत नाही. मी सांगितलंय मी व्य्क्तिगत शेरेबाजी करत नाही. बाकी मिपावर कोणी माझा आदर करावा म्हणून लिहित नाही. बाकी आपली मर्जी. मला जे वाटतं ते मी लिहिल्या शिवाय राहात नाही, हा माझा प्रॉब्लम आहे. -दिलीप बिरुटे -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sat, 11/21/2015 - 06:58 नवीन
एकदम परफेक्ट.
आपल्या अनुभवाची तात्विक पातळीवर चर्चा होऊ शकत नाही.
म्हणूनच मी कधीच नास्तिकांशी वाद घालायला जात नाही. कारण त्यांची दुसर्‍याच्या अनुभवावर विश्वास ठेवायची, किंवा स्वतः अनुभव घेण्यासाठी लागणारा वेळ देण्याची देखील इच्छा नसते, आणि अध्यात्माच्या तत्वज्ञानानुसार हे चर्चेचे नसून अनुभवाचे शास्त्र आहे. त्यामुळे दोन आस्तिक किंवा दोन नास्तिक यांच्यामध्ये "चर्चा" होऊ शकते. एक आस्तिक आणि एक नास्तिक यांच्यात "चर्चा" होऊ शकत नाही. आपली वर जी काही "चर्चा" झाली त्याने देखील हेच अधोरेखित केले. जाता जाता हे मात्र नमूद करू इच्छितो की मी अनुभवांवर आधारलेला आस्तिक आहे, आणि माझे अनुभव बुवा बापूंसारखे प्रार्थना केली आणि कुत्रा मिळाला असे नसून माझ्या अल्पमतीच्या पातळीवर चिकित्सा करूनच स्वीकारलेले आहेत. गंमतीचा भाग म्हणजे मी एकाच वेळी राम-कृष्ण आणि उत्क्रांतीवाद या दोन्हींवर विश्वास ठेवतो. जे खरे म्हणजे हास्यास्पद आहे, पण मला अजून सत्य माहीत नाही. कारण उत्क्रांतीवाद स्वतःचे म्हणणे पुराव्यानिशी सिद्ध करतो, तर मला आलेल्या पॅरानॉरल् अनुभवांमागचा कार्यकारणभाव अजूनही कळलेला नाही. वर लिहिल्याप्रमाणे मी पूर्वी अज्ञेयवादी होतो, आता आस्तिकतेकडे झुकलेला अज्ञेयवादी आहे. अध्यात्मात त्याला बर्‍याच वेळेस जिज्ञासू असे म्हटले जाते. कारण मला आलेले अनुभव हे प्रचलित विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाहीत, आणि जर तसे असेल, तर मला विज्ञानालाच धरून ठेवण्यात रस वाटत नाही. अध्यात्म आणि विज्ञान हे वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे एकच कोडे उलगडायचा प्रयत्न करत आहेत, आणि कधीतरी या दोन्ही वाटा एकत्र येतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे नास्तिकांना शिव्या घालणारे आस्तिक आणि आस्तिकांना शिव्या घालणारे आस्तिक यांना मी एकाच पारड्यात तोलतो. (काही अपवाद वगळता) असो. इत्यलम. मी आस्तिक का आहे, आणि आस्तिकवादावरची चर्चा मला का आवडत नाही यामागची ही भूमिका. चु. भु. दे. घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 11/21/2015 - 07:05 नवीन
मानवता, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही मूल्ये मानणारे अस्तिक वा नास्तिक काहीही असले तरी फरक पडत नाही. मी अश्रद्ध किंवा सश्रद्ध आहे व जगाने पण तसेच असले पाहिजे अन्यथा ते कीवेस पात्र आहेत. मग बुद्धीचा तोकडेपणा आकलनाच्या मर्यादा वगैरे वगैरे चालू होते जणू काही यांना सगळ्या जगाचे आकलन झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sat, 11/21/2015 - 10:30 नवीन
सहमत. आणि याच मुद्द्यावर माझे अनिसशी मतभेद आहेत. कारण ते केवळ प्रबोधन करत नाहीत, तर त्यासोबत व्यक्तिगत निंदानालस्ती आणि आरोप देखील करतात. आणि गंमत म्हणजे एका मिथ्याविज्ञानाचा आधार घेऊन ते एका आध्यात्मिक संस्थेवर आरोप करत आहेत. जाताजाता, मानवी जीवन सुखकर करणे नुसत्या विज्ञानाला शक्य नाही, तसेच ते नुसत्या अध्यात्मालादेखील शक्य नाही याबाबत माझ्या मनात संदेह नाही. त्यामुळे केवळ एकच बाजू पकडून जाणार्‍यांशी माझे पटत नाही. मग ते केवळ अध्यात्म असो किंवा केवळ विज्ञान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Mon, 11/16/2015 - 10:46 नवीन
आणि मंत्रंमध्ये सामर्थ्य नसते असे म्हणणार्‍यांबद्दल माझ्या मनात दया आहे
मी दयेस पात्र आहे http://www.misalpav.com/comment/770329#comment-770329
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/16/2015 - 10:49 नवीन
आणि मंत्रंमध्ये सामर्थ्य नसते असे म्हणणार्‍यांबद्दल माझ्या मनात दया आहे
अहो त्यांन्ना ढुश्शी मारुन दरवाजे तोडणारा दया म्हणायचे असेल बहुतेक =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
स्यमन्तक Sun, 11/15/2015 - 20:34 नवीन
लेखन छान आहे... मस्त
  • Log in or register to post comments
द
दिवाकर कुलकर्णी Sun, 11/15/2015 - 21:21 नवीन
१९७० च्या आसपासची गोष्ट,मंत्रोचारानं अग्नि निर्माण करतो,हा एकाचा दावा. (पुणे सोडून हे अन्यत्र कुठे असणार ?)त्यानी होम कुंडं प्रत्यक्षात पेटवून दाखवली.नियत कालीकं याला जबरदस्त प्रसिध्दि देत.श्री साप्ताहिक व त्यातले अरुण ताम्हणकर हे हिरीरीनं कव्हर करीत.उलट सूलट चर्चा वेदात हे कसं तपशीलवार आहे पासून त्या ग्रुहस्थाचं उच्चारण कसं सदोष आहे, पासून ही भंपकगिरी आहे पर्यंत सर्व कांही.हे चर्चा चर्वण अनेक दिवस चालू होतं.अनेक अतिरथी महारथी त्यात उतरले होते. आणि शेवटी त्याचा फुगा असा फुटला कि मंत्रोचारण वगैरे सर्व बकवास होतं,होमात समिधा वगैरे जे कांही ते महाशय टाकायचे त्यात फॉस्फरस असं काही होतं,आणि त्या महाशयाना याचं तपशीलवार ज्ञान होतं कारणं ते पूर्वी विम्को(काड्यापेटी)कंपनीत कामाला होते. अशा तर्हेने मंत्रोचारणानं कधीच न पेटलोला तो अग्नि शामक दलाशिवायच विझला. त्यात दरम्यान अहमदनगरला मंत्रोचारणानं पाऊस पाडतो असा दावा केला होता. आणि या लोकांचं नशीब असं बलवत्तर कि त्या पावसाचे चार शिंतोडे पडलेहि होते पण खरतर बिरबलाच्या खिचडी पकवण्याचा तो प्रकार होता.जमिनीवर चार काड्या पेटवून तोंडातल्या तोडांत कांहीं पुटपुटून वरून जर पाऊस पाडता आला असता तर आणखी काय पाहिजे होतं?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 11/16/2015 - 08:51 नवीन
दिवाकर कुलकर्णी, फॉस्फोरस की काहीतरी म्हणजे नक्की काय? कुठला ज्वालाग्राही पदार्थ वापरलेला? आणि तो प्रतिपक्षाच्या नजरेतून सुटलाच कसा? तुम्हाला इथे प.वि.वर्तकांचा प्रयोग अभिप्रेत होता का? पण त्यावेळी अग्नीकुंडासाठी लागणारी सर्व सामुग्री पूर्वपक्षाने प्रतिपक्षाद्वारे कुंडवर्तुळात पाठवायची अशी अट पाळली होती. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/16/2015 - 09:58 नवीन
वालावकर सेठ, लेख आवडला. आपण जितके शिकू तितके अधिक अंश्रद्धाळु होऊ असे वाटते. शिक्षणाने विवेक जागृत व्हावा पण ते दिसत नाही. आपला लेख आवडलाच, साती, मारवा यांचे प्रतिसादही आवडले. काथ्याकुट आणि वाद वाचायला मजा आली. यनावालासेठ लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Mon, 11/16/2015 - 10:25 नवीन
** तानसेन का अजून कोणी महान गायक मेघमल्हार गाऊन पाऊस पडायचा म्हणे. आधुनिक कृत्रिम पाऊस यंत्रणाची काय गरज म्हणतो. मी !
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Mon, 11/16/2015 - 10:40 नवीन
लेख आवडला. बरेच जणांनी तावातावाने लेख शेवटापर्यत वाचायचे कष्ट घेतलेले नाहीत की काय असं प्रतिक्रिया बघून वाटले कारण ...
सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे
. असं म्हटलय.
  • Log in or register to post comments
ज
जातवेद Mon, 11/16/2015 - 10:42 नवीन
अस्स सगळं झालं तर!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 11/16/2015 - 11:17 नवीन
निबंध ठाकठीक आहे. काही नवं दिसलंं नाही. त्यामुळे यात शंभर प्रतिसाद चर्चा करण्याजोगं काय आहे हे मात्र समजलं नाही. असो.
  • Log in or register to post comments
ब
बांवरे Mon, 11/16/2015 - 16:03 नवीन
सौ सुनारकी और एक अतिवास की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
म
मारवा Mon, 11/16/2015 - 11:29 नवीन
इस निबंध मे "जान" है
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा