Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंत्रसामर्थ्य

य
यनावाला
Sat, 11/14/2015 - 16:55
🗣 233 प्रतिसाद
परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे. आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत. हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही. ** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?. **थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही. **" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.) "शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हेही एक होते. अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:-
:--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"
लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"
असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"
हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................
वर्गीकरण
चर्चा:-देव-धर्म-कर्मकांडे-मंत्रजप

प्रतिक्रिया द्या
141687 वाचन

💬 प्रतिसाद (233)
य
यनावाला Mon, 11/16/2015 - 17:20 नवीन
श्री.भाऊंचे भाऊ यांनी प्रश्न विचारला अहे, "वैज्ञानिक सत्य म्हणजे काय ?" या प्रश्नाचे माझ्या (समजुतीप्रमाणे) उत्तर:-- ..या विश्वाचे नियमन निसर्गनियमांनुसार होते. ते नियम शोधून काढण्याची क्षमता मानवी बुद्धीत आहे. वैज्ञानिकांनी अनेक निसर्गनियम शोधले आहेत. त्या नियमांची सत्यता तपासली आहे. त्या नियमांवर आधारित तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्याने मानवी जीवन अधिक सुखसुविधापूर्ण आणि सुरक्षित झाले आहे. *चमत्कार करणे म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन करणे. ते कोणालाही कालत्रयीं शक्य नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. समजा एका मोकळ्या मैदानावर उभे राहून हाताने एक चेंडू उंच फेकला. तर थोड्या वेळाने तो चेंडू खाली येऊन पडेल. हे वैज्ञानिक सत्य आहे. चेंडू खाली पडू नये म्हणून कितीही मंत्र म्हटले, मैदानावर यज्ञकुंडे रचून होम-हवन केले, इंद्राची स्तुती केली, "हे इंद्रा तू सर्वशक्तिमान आहेस. ऊर्ध्वदिशेने प्रक्षेपित केलेल्या या कंदुकाचे अधांतरी स्तंभन करण्यास केवळ तूच समर्थ आहेस. तरी त्याचे अध:पतन होणार नाही असे कर. तुला अतिप्रिय असलेल्या सोमरसाचे आम्ही हवन करतो."अशा अर्थाचे कितीही ऋचागायन केले तरी चेंडू खाली पडणारच. हे वैज्ञानिक सत्य आहे. (एक गरुडपक्षी उडत आला.चोचीत चेंडू घेऊन गेला. असल्या कल्पना लढवू नयेत. तो चेंडू हवेत तरंगत आहे असे दिसले पाहिजे.) *अपारदर्शक कागदाच्या एका जाड लखोट्यात हजार रु.ची नोट ठेवली. लखोटा सील बंद केला. एका सिद्ध योग्याच्या हाती तो लखोटा दिला. त्याने तो लखोटा न उघडता आपल्या योगसामर्थ्याने ,दिव्य दृष्टीने तो क्रमांक सांगावयाचा आहे. त्या योग्याने कितीही डोळे फाड-फाडून लखोट्याकडे पाहिले, ध्यान लावले,लक्ष एकाग्र केले तरी त्याला लखोट्यातील नोटेचा अचूक क्रमांक सांगता येणे शक्य नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 11/16/2015 - 17:49 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
व
विजुभाऊ Tue, 11/17/2015 - 08:36 नवीन
दिव्य दृष्टीने तो क्रमांक सांगावयाचा आहे. त्या योग्याने कितीही डोळे फाड-फाडून लखोट्याकडे पाहिले, ध्यान लावले,लक्ष एकाग्र केले तरी त्याला लखोट्यातील नोटेचा अचूक क्रमांक सांगता येणे शक्य नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे.
पुण्यात मगरपट्टा परीसरात रहाणारे श्री वनारसे अशा प्रकारचे ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग घेतलेली मुले डोळे बांधुनसुद्धा नोटेचा नंबर सांगु शकतात. तुमच्या मोबाईलमधला एस एम एस वाचू शकतात. वनारसे याचे प्रयोग देखील करतात. त्यामागील शास्त्रीय तत्व शिकवतात. त्यात कोणताही चमत्कार नाही असेच ते सांगतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
प
प्रसाद१९७१ Tue, 11/17/2015 - 10:05 नवीन
धन्य ते वनारसे आणि त्या पेक्षा धन्य तुमची विजु भाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गामा पैलवान Tue, 11/17/2015 - 15:06 नवीन
यनावाला, >> चमत्कार करणे म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन करणे. ते कोणालाही कालत्रयीं शक्य नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. यालाच तुम्ही चमत्कार म्हणत असाल तर मी तुम्हाला एक चमत्कार करून दाखवतो. खरंतर तुम्ही स्वत:च करून पाहू शकाल. तुमच्या घरी दूरचित्रक (=टीव्ही) असेल. तो सुरू करा. आता त्याचा दूरनियंत्रक (=रिमोट) घ्या. आणि वाहिनी (=च्यानेल) बदला. बदललं गेलं तर आपला चमत्कार यशस्वी झाला आहे. याला चमत्कार का म्हणायचं ते सांगतो. दूरनियंत्रकात संदेश पाठवण्यासाठी अतिरक्त (=इन्फ्रारेड) दिवा असतो. तर असा प्रक्षेपित केलेला संदेश ग्रहण करण्यासाठी दूरचित्रकावर संवेदक (=सेन्सर) असतो. दूरनियंत्रकात जो संदेशप्रक्षेपक दिवा असतो त्याची संरचना (=डिझाईन) हे 'प्रकाश लहरींप्रमाणे वातावरणात पसरतो' या तत्त्वानुसार केलेलं असतं. हा निसर्गनियम आहे. मात्र दूरस्थ संवेदकाची संरचना 'प्रकाश हा फवाऱ्याप्रमाणे कणांचा बनलेला आहे' या तत्त्वावर आधारित असते. हे वरील निसर्गनियमांच्या विरुद्ध आहे. एकाच प्रसंगात निसर्गनियमांच्या बाजूने आणि विरुद्ध दोन्ही वर्तने पाहता येतात. म्हणून सोफ्यावर बसून रिमोटने टीव्हीचं च्यानेल बदलणे हा चमत्कार आहे. बोला गामाबाबाकी जय! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
व
विवेक ठाकूर Tue, 11/17/2015 - 15:41 नवीन
आता त्याचा दूरनियंत्रक घ्या. आणि वाहिनी बदला. ....मी चुकून `वहिनी बदला' वाचलं. भलताच चमत्कार व्ह्यायचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
भ
भाऊंचे भाऊ Sat, 11/21/2015 - 17:05 नवीन
तर प्रथम वाक्यात काही अपरीपुर्णता नक्किच आहे म्हणून शंका विचारुन ती दुर करुन घेतो म्हणजे तुमेचे नियम मला निसर्ग नियमाप्रमाणेच शोधुन व समजुन घेउन त्यावर आधारीत तत्वज्ञान मला विकसीत करता येइल. कारण आपण म्हणत तसे निसर्गाने ही क्षमता मला दिलेली आहे. असो नमनाला जास्त तेल न घालवता पहिली शंका विचारतो आशा आहे प्रांजळ उत्तराने समधान करालच.
या विश्वाचे नियमन निसर्गनियमांनुसार होते. ते नियम शोधून काढण्याची क्षमता मानवी बुद्धीत आहे.
ते सर्व नियम शोधुन काढायची क्षमता मानवी बुद्धीत आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
मांत्रिक Sat, 11/21/2015 - 17:10 नवीन
खिक्क! बाहुबली, ते उत्तर देणारच नाहीत. त्याऐवजी दुसरा काहीतरी टुकार रेफरन्स काढून वाद घालत बसणार. काय तुम्ही पण राव अपेक्षा करता? आजची स्वाक्षरी: पाहुनी विज्ञानाच्या बला! सांगा कोण भ्रमिष्ट झाला!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
आ
आनन्दा Sun, 11/22/2015 - 09:53 नवीन
बाकी मला कशावरही बोलायचे नाही. फक्त एका वाक्यावर एक पिंक टाकतो -
"चमत्कार करणे म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन करणे. "
चमत्कार म्हणजे निसर्गनियमांचे उल्लंघन नव्हे, तर चमत्कार म्हणजे प्रचलित निसर्गनियमांचे उल्लंघन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
अ
अर्धवटराव Sun, 11/22/2015 - 20:16 नवीन
लेखकाचे मूळ गृहीतकच चुकीचे आहेत... आणि ते समजुन घेण्याची त्यांच्या मनाची तयारीच नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
प्रकाश घाटपांडे Mon, 11/23/2015 - 04:36 नवीन
अजून एक पिंक टाकतो चमत्कार म्हणजे निसर्गनियमांचे उल्लंघन नव्हे, तर चमत्कार म्हणजे आजमितीस अज्ञात असलेल्या निसर्गनियमांचे पालन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
संदीप डांगे Mon, 11/23/2015 - 05:05 नवीन
हे हे, :-) आफ्रिकेच्या जंगलात जाउन 'अज्ञात' आदिवासींवर टॉर्चचा प्रकाश पाडणे 'चमत्कारच'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मारवा Mon, 11/16/2015 - 17:42 नवीन
हे इंद्रा तू सर्वशक्तिमान आहेस. ऊर्ध्वदिशेने प्रक्षेपित केलेल्या या कंदुकाचे अधांतरी स्तंभन करण्यास कंदुक हा मुळ संस्कृत शब्द आहे का ? कुठे या शब्दाचा उल्लेख आलेला आहे एक मराठी शब्दही बनतो का या शब्दाच्या च मुळापासुन ?
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 11/17/2015 - 10:10 नवीन
कंदुक म्हणजे चेंडू. हा संस्कृत शब्द आहे. व्युत्पत्ती माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Tue, 11/17/2015 - 15:25 नवीन
छान नविनच शब्द आहे कुठेतरी वाचलेला आठवतोय तेव्हाही अर्थ कळलेला नव्हता. शोधुन काढतो आता एकदा व्युत्पत्ती सुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
फ
फारएन्ड Tue, 11/17/2015 - 19:36 नवीन
"रत्नकंदुका जागी हाती, मातीची खेळणी" - हे गदिमांनी लव कुशांच्या अवस्थेचे केलेले वर्णन "दैव जाणिले कुणी" या (येथील चर्चेच्या दृष्टीने अत्यंत विसंगत अशा नावाच्या) गाण्यात ऐकले असेल बहुधा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
अ
अन्नू Mon, 11/16/2015 - 18:05 नवीन
शिर्षक वाचून हे काहीतरी कर्मकांड वगैरे असेल असं वाटलं होतं. पण हे तर भलतंच निघालं! Image removed. एकदम जबराट.. अजुनही डोकं गरगरतंय!
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।" हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव!
Image removed.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Mon, 11/16/2015 - 18:51 नवीन
लेखाचा उद्देश जरी चांगला असला तरी लोकांना जर आपले म्हणणे पटवून द्यायचे असेल तर नुसती टीका करून उपयोग नाही असे वाटले. म्हणजे समजा एखाद्याची बायको जाड(समस्त स्त्री वर्गाची माफी मागून!) आहे. त्याला ते दिसतंय पण बायको ऐकणार नाही हे त्याला माहितीये(किंवा स्पष्टपणे सांगितल्यावर त्याचा उलट परिणाम होईल असे त्याला वाटतंय) तरीपण तो "तू फारच जाडी झालीयेस, जरा कमी खात जा!" हे सांगेल का? अश्याने भांडणच होणार ना!! शिवाय ती बारीक पण होणार नाही! म्हणजे डबल लॉस... या ऐवजी तिला लठ्ठपणाचे दुष्परिणाम सांगून "मला तुझी काळजी वाटते" असे गोड बोलून काही फरक पडतो का बघता येऊ शकतो ना! आता हा लेख वाचून जे लोक अनुमोदन देत आहेत ते बहुतांशी आधीपासूनच या विचारांचे आहेत. पण ज्यांच्यासाठी हा लेख असू शकतो (टार्गेट ओडियन्स) त्यांच्यात कसा फरक पडेल? कसा पडेल हे मला पण माहिती नाही पण टीका करून दरी कमी होण्या ऐवजी वाढतच जाइल असे वाटते... बाकी तुम्ही जास्त अनुभवी आहात... पुलेशु
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 11/17/2015 - 02:15 नवीन
वन ऑफ द राईट पर्तिसाद ऑन धिस लेख! +१ Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/17/2015 - 06:54 नवीन
'७८६' आणि 'होली वॉटर' चे बुरखे फाडणार्‍या पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/17/2015 - 07:19 नवीन
..खवचट वैट्ट वैट्ट प्रतिसाद. पण मुद्दयात साला मार्मिकपणा असला लाजवाब आहे की आम्हाला दाद देण्यावाचून पर्याय नाही.. हा तुमचा (जुनाच) हलकटपणा आहे पराषेट..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/17/2015 - 10:11 नवीन
हा हा हा धन्यवाद. पण आमचे जागृत मन जे बोलले ते आम्ही शब्दात उतरवले बघा. आता हे धाडस लेखक करेल तर आमचा मानाचा मुजरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मांत्रिक Tue, 11/17/2015 - 10:27 नवीन
अशा माणसांची नास्तिकता ही सिलेक्टीव्ह असते. उत्तर मिळणारच नाही तुम्हाला. त्याऐवजी पुन्हा पुन्हा १) अध्यात्मशक्तीने चेंडू हवेत अधांतरी ठेवा. २) मंत्राच्या बळावर डास मारुन दाखवा. ३) ध्यानसामर्थ्याने बंद पाकिटातील नोट ओळखून दाखवा. असले निरर्थक प्रश्न मांडले जातील. साहजिक आहे. त्यांना अध्यात्म तर सोडाच, विज्ञान सुद्धा कळालेलं नाही. अध्यात्माकडून असल्या फालतू अपेक्षा एकतर ज्याचा असल्या गोष्टींच्या मागे धावून दारुण अपेक्षाभंग झालाय असाच व्यक्ती करतो नाहीतर अगदी निरक्षर अडाणी माणूस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
स्पा Tue, 11/17/2015 - 09:41 नवीन
चना (जोर गरम) वाला यांच्यात तेवढा जोर नसावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/17/2015 - 10:13 नवीन
जोर फक्त प्रतिकार न करणार्‍यांवरच दाखवला जातो सर. ;) 'पलिकडे' जायचे म्हणले की नाडी सुटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ब
बॅटमॅन Tue, 11/17/2015 - 13:11 नवीन
शिवाय पुरोगामी = हिंदू धर्माला नावे ठेवणारा ह्या समीकरणाचेही पालन करीत असावेत हे लेखकराव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नाखु गुरुवार, 11/19/2015 - 08:12 नवीन
असं सगळ उघड करू नये, मग आडून आडून सगळ्या सश्रद्धांना "नरबळी" देणार्यांच्या+जारण मारण लाईनीत बसविणार्यांची पंचाईत होते ना राव! माझ्या देव-पुजेचा कुणालाही त्रास होणार नाही याची (आणि फक्त इतकीच) सदा काळजी घेणारा नाखुस अडाण@@
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
संदीप डांगे गुरुवार, 11/19/2015 - 08:23 नवीन
नाखुकाका, नेहमीप्रमाणे अगदी नेमकं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मूकवाचक Wed, 11/18/2015 - 17:37 नवीन
ओम मणि पद्मे हूम आणि णमोकारादि मंत्रावरच्या लेखाच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सर्वसाक्षी Tue, 11/17/2015 - 07:43 नवीन
अमुक साबु लावल्याने करियर उजळते! मुलीचे कर्तृत्व हे अमुक मलम लावून रंग उजळल्यानेच विकसीत होते! अमुक फवारा मारल्याने तमाम स्त्रिया मागे लागतात! अमुक पोषक घेतल्याने पहिला क्र्मांक येतो! अमुक मीठ खाल्ल्याने कलेक्टर होता येतं! अमुक सॅनिटरी नॅपकिन वापरल्याने मुलगी महान पत्रकार होते! हे आणि असे असंख्य मंत्र 'एमेन्स्नी' पंथाचे अनेक महामांत्रिक दिवसरात्र उच्चारत असतात आणि त्यांना या मंत्रपठणाने नित्यनियमाने करोडोंचा नफा मिळतो. या महामांत्रिकांचे काय?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/19/2015 - 04:51 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
व
विवेक ठाकूर Tue, 11/17/2015 - 10:29 नवीन
दाद देणारे सुद्धा त्याच रांगेत आहेत. मंत्र या शब्दाचा अर्थ मन + तंत्र असा आहे. तो मनावर काम करतो. लेखकानं उर्जेची व्याख्या अशी केली आहे : कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत. मंत्र मानसिक उर्जा देतो. लेखक अत्यंत बालीश विधान करतात : आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने ? ॐ मुळे अणु विभाजन होत नाही , ती भौतिक घटना आहे त्यासाठी भौतिकशास्त्राचे नियम लागू होतात. तद्वत एका सदस्येनं पॅरासिटॅमॉलचं उदाहरण दिलं आहे ते देखिल लेखकाच्या विचारसरणी सारखं आहे. शरीरशास्त्राचे नियम शारीरिक आजाराला लागू होतील फॉर्म्युला पठण नाही ही उघड गोष्ट आहे. मंत्र मनावर काम करतो की नाही हा व्यक्तिगत अनुभव आहे, तरीही ॐ सारखा मंत्र मन एकसंध करण्याचं काम निश्चितच करतो कारण मनाचा अत्यंत मोठा भाग ध्वनी निर्मित आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हे एकप्रकारे मंत्रशास्त्रच आहे. उदा. यमन राग हा विशिष्ठ ध्वनींचं संयोजन आहे. त्यामुळे तो गाणार्‍याचं मन तर एकसंध करतोच शिवाय ऐकणार्‍यांचं मनही प्रसन्न करतो. थोडक्यात, मल्हार रागानं वर्षा होईल किंवा दिपरागानं दिपप्रज्वलन होईल हा तसा प्रचार करणार्‍यांचा निर्बुद्धपणा आहे त्याचप्रमाणे असे चमत्कार घडत नाहीत म्हणून मंत्रशास्त्रच व्यर्थ आहे किंवा त्याचा मनावर परिणामच होऊ शकत नाही म्हणणं अज्ञानाचं आहे. मंत्र म्हणून भौतिक घटना घडण्याची किंवा गायत्री जपानं डास मरण्याची शक्यता नाही ही साधी गोष्ट न कळल्यानं लेखकानं लेखन प्रपंच केला आहे आणि समविचारींनी टाळ्या पिटल्या आहेत. शेवटी लेखकानं म्हटलंय : सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. मंत्र मनाचं संयोजन करतो हे लेखकाच्या शेवटी तरी लक्षात आलं आहे असं दिसतंय. आणि एकसंध मन हा उर्जेचा स्त्रोत आहे.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Tue, 11/17/2015 - 10:39 नवीन
+१११११११११११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Tue, 11/17/2015 - 10:40 नवीन
माझा हा वरील प्रतिसाद विवेक ठाकूर यांच्या विवेचनाला दिलेला होता. सं.मं. कृपया बदल कराल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
P
pacificready Tue, 11/17/2015 - 14:17 नवीन
फुटकळ लेख आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Tue, 11/17/2015 - 19:16 नवीन
प्रतिसाद आवडला नाही. -विका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
P
pacificready Wed, 11/18/2015 - 04:57 नवीन
तुम्हास मुद्दा समजलेला नाही. लेख खरंच फुटकळ असल्यानं त्याला फुटकळ म्हटलं आहे. काय म्हटलं सांगा? आणि 100 वेळा म्हणा देखील. शब्दात अशीही ताकद नसतेच. आवड नावडीचा प्रश्न येतोच कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
क
कवितानागेश Wed, 11/18/2015 - 06:18 नवीन
अरे वा! मागच्या लेखातले मी विचारलेले प्रश्न सरांनी ऑप्शनला टाकलेले दिसतायत! आणि आता नवीन /तेच ते प्रबोधन!! आता या लेखावर मी प्रश्न विचारू की नको? तरी विचारतेच, बद्धमूलासन म्हणजेनक्की काय?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 11/18/2015 - 06:19 नवीन
देव अध्यात्म, कर्मकाण्ड , उपचार ( थेरपी या अर्थाने) देश भाषा अन्क ई गोष्ट्री निसर्ग निर्मित नाहीत. तर मानवाच्या मानसिक विकासाचे ( की भ्रमाचे ) ते परिपाक आहेत. विश्वातील सर्वच घटना अगदी सर्वार्थाने फिजिक्स पातळीवर घडत नाहीत कारण॑ मन असलेले सजिव व मन नसलेले जड यांच्या दोघांच्याही धर्माचा मिलाफ ( अट्रीब्युट या अर्थाने ) वैश्विक घटनात होत असतो.याचाच अर्थ प्लसिबो हा अस्तित्वात असतोच कारण मन हे जीवमात्रात असतेच. सबब एखाद्याला एखाद्या मंत्राचा फायदा झाला तर तो मंत्राचा गुण नव्हे तर ऐकणार्‍याचा आहे. म्हणूनच खंडोबा कोकणस्थांच्या अंगात येत नाही कारण्॑अ कोकणस्थात॑ ते दैवत नसल्यामुळे प्लसिबो निर्माण होत नाही. मारवा हा राग औदासिन्य निर्माण करतो का हे ब्रिटीश माणसाला विचारले तर तो फार वेगळे उत्तर देण्याची शक्यता जास्त. कोणी सफेद रंग विरक्तीचा मानतील तर कोणी शरणागतीचा . असा फरक जड वस्तू करणार नाहीत. ( एका अर्थाने त्यांच्यात अक्कल कमी व भ्रमही )
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 11/18/2015 - 06:27 नवीन
प्लासिबो म्हणजे नक्की काय? जर का प्लासिबो या तंत्राचा उपयोग होतो तर महागडी टेक्निक्स कशासाठी वापरायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्रकाश घाटपांडे Wed, 11/18/2015 - 09:02 नवीन
http://misalpav.com/node/3973 इथे वाचा प्लासिबोबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
य
यनावाला Wed, 11/18/2015 - 16:45 नवीन
लिमा उजेट प्रश्न करतात, "बद्धमूलासन म्हणजे काय ?" उत्तर: या आसनाला मूळबंधासन ,वज्रासन अशीही नांवे आहेत. "अर्जुना हे मुख्य जाण ।मूळबंधाचे लक्षण ।वज्रासन गौण । नाम एयाचे ॥१९९॥[ज्ञाने.अ.६वा] बद्धमूलासन (मूळबंधासन) कसे घालावे याचे सविस्तर वर्णन ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओव्या १९३ ते १९९ , यांत आहे. पुढे कुंडलिनी जागी होऊन काय काय करते ते सांगितले आहे. नंतर संपूर्ण कायाकल्प झालेल्या योग्याचे वर्णन आहे.(ओ.२५८-२९२)...."निडाराचेनि कोंधाटे। मोतियें नावरती संपुटे । मग सिवणी जैसी उतटे शुक्तिपल्लवांची ॥तैसे पातियांत न सामाये । दिठी जाकळोनि निगो पाहे।आधिलीच परी होये।गगनाकळिती ॥२६७॥..... हे सर्व वर्णन अवश्य वाचावे.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Wed, 11/18/2015 - 17:09 नवीन
बद्धमूलासन नावाचे कुठलेच आसन नाही. हां, वज्रासन घातल्यावर गुदद्वाराचे आत श्वास खेचून आकुंचन करणे याला मूलबंध प्राणायाम म्हणतात. त्याच्यायोगे कुंडलिनी शक्ती वर सुषुम्नामार्गे सहस्राराकडे खेचली जाते. हा अतिशय अवघड प्रकार आहे व तज्ञ्याच्या मार्गदर्शनाखालीच करतात. बाकी तुम्हाला प्रतिसाद द्यायची इच्छा नव्हती पण तुम्ही कोणतीही माहीती नसताना बिनधास्त काहीही ठोकून देता. त्यातून या विद्येविषयी गैरसमज पसरतात. म्हणून बोलावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
य
यनावाला गुरुवार, 11/19/2015 - 09:05 नवीन
मूळबंध, मूळबद्ध, बंधमूळ, बद्धमूळ तसेच मूलबंध, मूलबद्ध, बंधमूल, बद्धमूल या सर्व सामासिक शब्दांचा व्यकरणदृष्ट्या अर्थ एकच आहे. कारण,मूळ==मूल तसेच बंध = बद्ध (बांधलेले.) बद्धपद्मासनाला कमलबंधासन म्हटले तरी अर्थहानी होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक गुरुवार, 11/19/2015 - 09:12 नवीन
तीन वेगवेगळे बंध आहेतः १) उड्डीयान, २) मूल व ३) जालंदर. यांचा आसन व प्राणायामाशी काहीही संबंध नाही. आसन करून मग प्राणायाम केल्यानंतर यापैकी आपणांस आवश्यक ते बंध गुरुने सांगितलेल्या क्रमाने करायचे असतात. प्रत्येक बंधाचे शारीरीक व मानसिक प्रभाव वेगवेगळे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/19/2015 - 09:47 नवीन
अहो कोणाला आणि कशाला सांगताय. अज्ञानात सुख असते असू द्यावे. आपल्याला अनुभव असेल तर घ्यावा. अनुभवाशिवाय सगळे बुडबुडेच आहेत. (आशा आहे की हा प्रतिसाद तुम्ही योग्य अर्थानी घ्याल).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
य
यनावाला गुरुवार, 11/19/2015 - 16:27 नवीन
.....ज्ञानेश्वरी, सहाव्या अध्यायात १९९ वी ओवी आहे,"
अर्जुना हे मुख्य जाण । मूळबंधाचे लक्षण । वज्रासन गौण । नाम येयाचे ॥" याचा स्पष्ट अर्थ असा की वज्रासन हे या मूळबंधाचे (बद्धमूळाचे) गौण (कमी महत्त्वाचे)नाव आहे.
तत्पूर्वी ओवी क्र.१९४ ते १९८ पर्यंत हे आसन कसे घालावे याचे सविस्तर वर्णन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक गुरुवार, 11/19/2015 - 16:45 नवीन
आसन, प्राणायाम व बंध या अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कदाचित वज्रासनात मूलबंध घालणे सोपे जात असावे म्हणून त्यांनी तशी सांगड घातली असावी. कारण वज्रासन घातले तर मूलाधार चक्र अगदी आरामात राहते. तसेही आसन घालून प्राण आत शरीरात कोंडून मग बंध केले जातात. त्यामुळे या गोष्टी त्यांनी एकत्रच गृहीत धरलेल्या असाव्यात. बाकी तुम्हाला २००च करायचेत का? बाकी सदस्यांनी पण नवीन लेख टाकलेत. तिकडे वळू देत जरा पब्लिक. पुन्हा सांगतो बंध म्हणजे आसन नव्हे. तुमच्या माझेच बरोबर हे सिद्ध करायच्या हेक्यासाठी त्या महात्म्याला वेठीस धरू नका. तुम्हाला लाल रंग देऊ पाहिजे तर. ज्ञानेश्वरीतील केवळ हीच वचने तुम्हाला चिंतनीय वाटली म्हणजे आमचे परममित्र प्रगोअण्णा व प्यारेबुवा म्हटले तसे ते गोचिड, गाईचे आचळ, रक्त वगैरे वगैरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/19/2015 - 10:16 नवीन
अगदी अगदी....सोडीयम क्लोराईड म्हणले काय अन क्लोरीयम सोडाईड म्हणले काय... सारखेच. खारट ते खारटच राहाणार ना. गोड थोडीच होणार? अज्ञानी जनांना कळतच नाही बघा. (बाय द वे, प्रत्येक Body Of Knowledgeची स्वत:ची अशी टर्मिनॉलॉजी असते हो. व्याकरणदृष्ट्या सेम असलं तरी तुम्हाला त्या Body Of Knowledgeवर काही टीका करायची असली तरी त्याच टर्मिनॉलॉजीचा आधार घ्यावा लागतो हो. उगा वाट्टेल ते शब्द स्वतःच उभे करून कसे चालावे?) (बाय द वे १, मला माझ्या लहानपणीचा एक किस्सा आठवला. लो. टिळक असे लिहिताना लो. म्हणजे लोकमान्यचा शॉर्टफॉर्म असा लिहिला जातो हे कळल्यावर माझ्या एका (पुढे खूपच उत्तम शिक्षण घेतलेल्या) वर्गमैत्रिणीने पेपरात वेळ पुरला नाही म्हणून शेवटच्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना ते आख्खे उत्तर शॉर्टफॉर्ममध्ये लिहिले. म्हणजे, 'शिवाजी महाराजांनी गडावर पोचल्यावर तोफा उडवल्या' असे लिहायच्या ऐवजी 'शि. म. ग. पो. तो. उ.' असं लिहिलं. .... तेव्हाही ती बाईंना हेच बोलली होती... 'समजून घ्या ना हो बाई. वेळ नव्हता पूर्ण लिहायला.')
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
स
संदीप डांगे गुरुवार, 11/19/2015 - 10:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा