Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बुलेट ट्रेनचा अट्टाहास का?

ग
गॅरी ट्रुमन
Sun, 12/13/2015 - 18:19
🗣 269 प्रतिसाद
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या भारत दौऱ्यात कालच ९८,८०५ कोटी रूपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बांधायच्या करारावर सही झाली. ९८,८०५ कोटी रूपये म्हणजे सध्याच्या भावाने सुमारे १५ बिलिअन डॉलर होतात. अन्य एका बातमीप्रमाणे बुलेट ट्रेनचा खर्च १५ बिलिअन डॉलर आहे. त्यापैकी ८०% म्हणजे १२ बिलिअन डॉलरचे कर्ज जपानची Japan International Co-operation Agency देणार आहे अशी बातमी आहे. हे कर्ज ०.१% व्याजाच्या दराने ५० वर्षे मुदतीचे असेल आणि मुद्दलाची परतफेड १५ वर्षांनंतर सुरू होणार अशी बातमी आहे. भारत सरकारला २०% म्हणजे सुमारे २० हजार कोटी रूपये या प्रकल्पात टाकावे लागतील आणि उरलेले सुमारे ८० हजार कोटी कर्जाऊ असतील. या कर्जाचे व्याज ०.१% आहे. सरकारच्या इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०.१% इतका कमी नक्कीच नसेल विशेषत: भारत सरकारच्या बॉंडवर ७-८% व्याजाचा दर आहे हे लक्षात घेता. तरीही आकडेमोडीच्या सोयीसाठी इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०% आहे आणि व्याजाचा दर ०.१% आहे असे समजू. या बातम्या वाचून काही प्रश्न माझ्यापुढे पडले आहेत. १. सुरवातीचे १५ वर्ष ८० हजार कोटींवरील व्याज म्हणजे ८० हजार कोटी गुणिले ०.१% = ८० कोटी रूपये द्यावे लागेल. ती रक्कम विशेष मोठी नाही. त्यानंतर कर्जाची एकूण ३५ वर्षात परतफेड करायची आहे. अशा पायाभूत सोयींसाठीच्या प्रकल्पावरील कर्जाची परतफेड बहुतांश वेळा बलूनिंग (सुरवातीला कमी आणि जशी वर्षे जातात त्याप्रमाणे जास्त) असते. या परतफेडीचे आकडे याक्षणी माझ्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी ३५ वार्षिक हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड होईल असे गृहित धरू. वार्षिक हप्ता सुमारे २,३२७ कोटी रूपये इतका येईल. प्रत्यक्ष हप्ता सुरवातीला २,३२७ कोटींपेक्षा कमी आणि नंतर जास्त असेल. म्हणजे बुलेट ट्रेनचे उत्पन्न दिवसाला २,३२७ कोटी भागिले ३६५ बरोबर ६.३८ कोटी रूपये असेल आणि बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तरच बुलेट ट्रेन वार्षिक हत्प्याला लागतील तितके पैसे उभे करू शकेल. २. आज मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुमारे २५ रेल्वेगाड्या दररोज धावतात. यात अहमदाबादपर्यंत जाणाऱ्या आणि अहमदाबादमार्गे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जाणाऱ्या गाड्यांचा समावेश होतो. मुंबई-अहमदाबाद रेल्वे प्रवासाला आज ८-९ तास लागतात. तर त्याच प्रवासाला विमान सव्वा तास (आणि चेकीन टाईम इत्यादी धरून २ तास घेते). जर बुलेट ट्रेन दोन तासात अहमदाबादला पोहोचवणार असेल तर त्या ट्रेनचा Target Group सध्या विमानाने प्रवास करणारे प्रवासीच असतील-- सध्या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी नव्हे. सध्या मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर २१ विनाथांबा विमाने दररोज उडतात. एका विमानात २०० प्रवासी असे धरले तर सगळी विमाने १००% भरली तर ४,२०० प्रवासी दररोज विमानाने मुंबई ते अहमदाबाद प्रवास करतात. अर्थातच दररोज सगळी विमाने १००% भरत नसतात. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी दररोज ४,००० प्रवासी प्रवास करतात असे समजू. इथे समजते की २०११-१२ ते २०१२-१३ या काळात देशातील सर्व विमानतळावर मिळून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे ४% ने घट झाली होती. AAI च्या संकेतस्थळावर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही मिळतील. ते करायला याक्षणी वेळ नाही. चर्चेत इतर मुद्दे आले आणि त्यामुळे गरज लागली तर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही तपासून सांगतो. संपूर्ण देशात त्या एका वर्षात डोमेस्टिक प्रवाशांच्या संख्येत ४% घट झाली असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा कमी असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा जास्त असेल. उदाहरणाच्या सोयीसाठी आपण असे समजू की पुढील १५ वर्षात मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट होईल-- म्हणजे दर वर्षी सुमारे ४.७३% ने प्रवासी संख्या वाढेल. म्हणजे १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद प्रवास करू इच्छिणारे दररोज ८००० प्रवासी असतील. तितकेच प्रवासी उलट दिशेनेही प्रवास करतील असे गृहित धरू. म्हणजे दररोज १६,००० प्रवासी मुंबई-अहमदाबाद मार्गावर विमानाने प्रवास करू इच्छितील असे गृहित धरू. ३. आज प्रवासाच्या एक दिवस आधी विमानाचे तिकिट विकत घेतले तर ते ४,००० रूपयांपासून उपलब्ध आहे. पुढील १५ वर्षे दरवर्षी सुमारे ७.५% ने तिकिटांचे दर वाढतील असे गृहित धरले तर आणखी १५ वर्षांनी ते तिप्पट म्हणजे १२,००० रूपयांपासून तिकिटे उपलब्ध होतील. आणि अर्थातच तिकिटे १०-१५ दिवस आधी विकत घेतल्यास ती आणखी स्वस्तही मिळतीलच. आज १५ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास ते २,००० रूपयांना उपलब्ध आहे. म्हणजे १ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास जितके पैसे मोजावे लागतील त्याच्या अर्धी रक्कम!! हेच गुणोत्तर १५ वर्षांनीही राहिल असे गृहित धरले तर तिकिटे ६ ते १२ हजार रूपयांमध्ये मिळतील. सरासरी तिकिटाची किंमत १० हजार रूपये समजू. म्हणजेच आणखी १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद विमान प्रवासासाठी सर्व प्रवासी दररोज १६ हजार गुणिले १० हजार बरोबर १६ कोटी रूपये खर्च करतील. यातही किती गृहितके आहेत हे वर आपण बघितलेच. बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तर वार्षिक हप्त्याला लागतील तितके पैसे उभे करायला दररोज ६.३८ कोटी रूपये इतके उत्पन्न बुलेट ट्रेनला मिळायला हवे. आणि अर्थातच बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य नक्कीच नसणार. बुलेट ट्रेनला अगदी ४०% फायदा होणार (तिकिटांमधून मिळणारे उत्पन्न वजा Operating Costs) असे धरले तरी बुलेट ट्रेनचे दररोजचे उत्पन्न ६.३८ भागिले ४०% बरोबर १५.९५ कोटी रूपये हवे. याचाच अर्थ अन्यथा विमानाने प्रवास केला असता त्या सगळ्या प्रवाशांना बुलेट ट्रेनने आपल्याकडे आकर्षित करायला हवे. विमानापेक्षा जास्त तिकिट बुलेट ट्रेन ठेऊही शकणार नाही. आणि बुलेट ट्रेनला अंडरकट करायला विमानकंपन्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर तिकिट कमी ठेऊन प्रवासी बुलेट ट्रेनकडे वळणार नाहीत याची काळजी घेतीलच. या सगळ्या गणितामागे किती liberal गृहितके घेतली आहेत हे समजून येईलच. एक तर दरवर्षी ४.७३% ने पुढील १५ वर्षे प्रवासीसंख्या वाढेल हे प्रचंड धाडसी गृहितक आहे. तसेच प्रत्येक विमानात ४०००/४२०० = ९५% प्रवासी भरलेले असतात हे गृहित धरलेले आहे. प्रत्यक्षात हा आकडा सरासरी ८०% च्या आसपास असतो. आणि मुख्य म्हणजे Return on Equity ०% धरला आहे. प्रत्यक्षात तो ७-८% असेल. तेव्हा ही बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती तर होणार नाही ही शंका वाटते. अशाप्रकारच्या प्रकल्पात अनेक प्रकारचे इतर फायदे (externalities) असतात. प्रदूषण कदाचित काही प्रमाणात कमी होईल.त्या व्यतिरिक्त आणखी कुठले फायदे बुलेट ट्रेनने होतील यावर बराच विचार केला. पण ते फायदे सापडले नाहीत. मला वाटते की बुलेट ट्रेनवर खर्च करण्यापेक्षा प्राधान्याने हाती घेण्याजोगे इतर अनेक पायाभूत प्रकल्प आहेत. ५०० किलोमीटर अंतरासाठी सुमारे १ लाख कोटी म्हणजे किलोमीटरला २०० कोटी इतका प्रचंड खर्च या प्रकल्पात आहे. त्यामानाने रस्ते दर किलोमीटरमागे ६ ते ६.५ कोटी (आणि डोंगरदऱ्या असतील तर थोडे अधिक-- मुंबई ते अहमदाबाद मार्गावर तोपण प्रश्न नाही) इतका खर्च येतो. प्रवासासाठी वेळेची बचत म्हणाल तर ती पण फार होताना दिसत नाही. कदाचित विमानप्रवासाला लागणारा वेळ आणि बुलेट ट्रेनला लागणारा वेळ यात विशेष फरक असेल असे दिसतही नाही. वर्तमानपत्रातील सर्व बातम्या तरी मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ २ तास होईल असेच म्हणत आहेत. विमानालाही (चेकीन टाईम वगैरे धरून) तितकाच वेळ लागतो की. बुलेट ट्रेनचा अट्टाहास का लावला जात आहे हेच अजून मला तरी समजलेले नाही. ज्या बी.के.सी मध्ये बुलेट ट्रेनचे स्टेशन होणार असे म्हटले जात आहे त्या बी.के.सी मध्येच संध्याकाळी वाहतुकीची किती कोंडी होते हे त्या भागात दररोज ऑफिसला जाणारा कोणीही सांगू शकेल. मग या समस्या आधी सोडविल्या जाणे अधिक महत्वाचे नाही का? मुंबईतील बंदरे (मुंबई आणि उरण) येथून मालगाड्यांना प्रवासी रेल्वेगाड्यांमुळे बाजूला टाकले जाते आणि त्यामुळे मुंबई ते दिल्ली या प्रवासासाठी मालगाड्यांना काही दिवस लागतात. त्यामुळे मुंबई ते दिल्ली या मार्गावर केवळ मालगाड्याच जाऊ शकतील असा Dedicated Freight Corridor करणे, Delhi-Mumbai Indistrial Corridor वगैरे कामांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेनचा मुद्दा ऐरणीवर का आणला जात आहे हे समजण्यापलीकडचे आहे. माझ्या हातून काही मुद्दे निसटत आहेत का? या विषयावर साधकबाधक चर्चा व्हावी-- विशेषत: मोदीभक्त विरूध्द मोदीद्वेष्टे असे स्वरूप या चर्चेला न आले तर फारच उत्तम. मिपावरील जाणकारांचे याविषयी काय मत आहे?
वर्गीकरण
अर्थकारण

प्रतिक्रिया द्या
115078 वाचन

💬 प्रतिसाद (269)
ह
हेमंत लाटकर Tue, 12/15/2015 - 05:03 नवीन
आपल्याकडे कोणतीही नवीन गोष्ट आणायची म्हटले की विरोध केलाच पाहिजे म्हणून विरोधी पक्ष, टिकाकार तयार असतात.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 12/15/2015 - 05:22 नवीन
So, 1. Total expense in seven years of Mumbai- Ahmedabad Bullet train: 98000 Crores 2. More than 79000 crores (80%) will be given by Japan on loan for 50 years for 0.1% (almost 0%) interest 3. India can start paying after 15 years 4. If the inflation after 50 years is considered, India might end up paying less than the principle amount 5. That's what happens when you put a Gujju as a PM wink emoticon 6. Even then Indian media is calling this deal as 'stupid' or 'white elephant' I see this deal started making money even before it started making money. या तर्काने एन्ट्री लेव्हल कार वापरणार्‍या माझ्यासारख्या कुणाला कुणी ०.१% व्याजदराने रोल्स रॉइस कार घ्यायला कर्ज दिल्यास तो माझ्यासाठी अत्यंत फायदेशीर व्यवहार होईल :-) . उत्तर प्रदेशच्या सरकारचे मुख्य माहिती सचिव व माजी प्रधान सचिव श्री जावेद उस्मानी यांचे ही पोस्ट देखील माहितीपूर्ण आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Tue, 12/15/2015 - 07:53 नवीन
या तर्काने एन्ट्री लेव्हल कार वापरणार्‍या माझ्यासारख्या कुणाला कुणी ०.१% व्याजदराने रोल्स रॉइस कार घ्यायला कर्ज दिल्यास तो माझ्यासाठी अत्यंत फायदेशीर व्यवहार होईल :-) तुम्ही जर ती रोल्स रॉईस भाड्याने देऊन पैसे कमावले तर नक्कीच होईल. स्वतःच्या वापरासाठी ठेवली तर नाही. ही बुलेट ट्रेन मोदींना जायला जायला राखीव नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Tue, 12/15/2015 - 16:11 नवीन
मी सध्याची कार ज्या कामासाठी वापरतो त्याच कामासाठी रोल्स रॉइस पण वापरयची अशी अट अध्याहृत होती. प्रतिसाद टाकल्यावर लक्षात आले पण झोप आल्याने उपप्रतिसाद द्यायचा कंटाळा केला. माझी वरची प्रतिक्रिया त्या चक्रम तर्कावर होती. अवांतर - आपल्याला ०.१% व्याज दराचे आश्चर्य वाटत असेल पण जपानमध्ये शून्य अन उणे व्याजदरही असतात असे वाचले आहे. तिथे लोकांना पैसा सुरक्षित ठेवायचा असतो अन त्यासाठी असे चमत्कारीक व्याजदर असतात. या योजनेमुळे जपान सरकारलाही दीर्घकालिन सुरक्षित गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळत आहे. जपानी लोक आयुष्यभर बचत करत राहतात अन मरताना मागे संपत्ती सोडून जातात अन अमेरिकन लोक जपानकडून घेतलेल्या कर्जावर आयुष्यभर चंगळ करत राहतात अन बरेचदा दिवाळखोर होऊन मरतात असे गमतीने म्हंटले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
अ
अभिजित - १ Wed, 12/16/2015 - 09:34 नवीन
तुमचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. पण बुलेट ट्रेन ला सपोर्ट करण्याच्या नादात तुम्ही इथे फार वाहवत गेलात. काय हिशोब / गणिते करून तुम्ही ठरवले कि रोल्स रोईस विकत घेणे फायदेशीर ठरेल ? जर का ०.१% दरानी कर्ज मिळत असेल तर ? टोयोटा कॅमरी - देशी लोकांची फेवरीट कार - किमत - USD २० हजार फक्त. रोल्स रोईस घोस्ट - USD २.५० लाख. दर वर्षीचा insurance . काय फरक असेल वरील दोघा कार मध्ये. समजा पकडु १० हजार USD दर वर्षी ? आणि हो सरकार चा tax - http://www.fairfaxcounty.gov/dta/cartax_carvalues.htm रोल्स रोईस वर नुसता वार्षिक tax च ११ हजार USD पडतोय. तोच कॅमरी वर फक्त - ११०० USD . दहा पट कमी . आणि हो या इतक्या महाग कार चा वार्षिक maintenance ? कि दर सहा महिन्यांनी walmart मध्येच oil change करून घेणार ? अगदी या सगळ्या खर्चाला जरी कर्ज मिळाले तरी , ते शेवटी कर्जच आहे आणि तुम्हालाच ते फेडायाचेय. समजा तुम्हाला अमेरिका नको वरील उदा मध्ये आणि भारत हवा असेल तर तो अजूनच तोट्याचा सौदा ठरेल. इथे १० लाखात मस्त सेदान गाडी येते. आणि तुमची रोल्स रोईस ४.५० कोटी रुपये फक्त ला. ४५ पट जास्त पैसे . आता तुम्हाला आजू बाजूच्या जनतेवर / मित्र वर्गात शायनिंग मारायचे असेल तर गोष्ट वेगळी. हौसेला मोल नसते. पण याच्यात आर्थिक शहाण पणा अजिबात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 12/16/2015 - 12:47 नवीन
मला जे म्हणायचे आहे त्याचा पूर्णपणे उलटा अर्थ तुम्ही घेतला आहात. तुमच्या अगोदर आदिजोशी यांनी मला अभिप्रेत असलेला अर्थ घेऊन त्यावर उप-प्रतिसादाद्वारे अभिप्राय देखील लिहिला होता अन त्यावर मी उत्तर देखील लिहिले आहे. माझा या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद वाचल्यास पुरेसे स्पष्ट होईल की मी या प्रकल्पाचे समर्थन करत नाहीये तर त्याच्या आर्थिक व्यवहार्यतेबाबत प्रश्न उपस्थित करत आहे. मी च्योप्य पस्ते केलेल्या चेपू फॉरवर्डचा मुद्दा क्षणभर ग्राह्य धरला की भारतात होणारी चलनवाढ या व्याजदरापेक्षा खूपच अधिक असल्याने हा व्यवहार एकदम फायद्याचा होईल. पण हीच चलनवाढ प्रकल्पाची किंमत वाढवू शकते, सव्वापट, दीडपट, दुप्पट किंवा अधिकही. त्यामुळे आर्थिक धोका बराच आहे. ही वाढलेली किंमत भारताने सहन करायची की जपानने याबाबत करारात काय ठरले आहे याबाबत मला काहीच ठाऊक नाही. परंतु इतके मोठे करार दोन्ही बाजूंसाठी समतोल असल्याखेरीज दोन्ही बाजू तो मान्य करणार नसतातच. किंमत वाढण्याची कारणे भारताच्या बाजूने असल्यास जपानने त्याचे मोल का चुकवावे अन याउलट असल्यास भारताने का चुकवावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
स
स्मिता. Tue, 12/15/2015 - 06:40 नवीन
चर्चाप्रस्ताव लेखकाची मते नेहमीच अभ्यासपूर्ण असतात, त्यावर मी प्रश्न विचारण्याचे काहीही कारण नाही. तरी माझ्या अल्पमतीला जे वाटतं ते लिहितेय. बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करायचाय म्हणून सरकारने सार्वजनिक शौचालये, रस्तेबांधणी, इ. मुलभूत बाबींवरचा खर्च कमी केलाय असं मला वाटत नाही. प्रत्येक प्रकल्पाकरता एक बजेट ठरवून ते राबवले जात आहेत/ जातील अशी माझी आशा आहे. तसंच मुंबई-अहम्दाबाद हा पायलट (मराठी चपखल शब्द सुचत नाही) प्रकल्प आहे. त्यामुळे हा पहिलाच आणि काहीसा प्रयोगात्मक प्रकल्प मुंबई-दिल्ली सारख्या दीर्घपल्ल्याकरता राबवण्याइतका डोलारा सांभाळायला अवघड होईल. एकदा तंत्रज्ञान मिळाले आणि मध्यमपल्ल्याच्या प्रकल्पाचे बरे-वाईट अनुभव मिळाले तर भविष्यात कमी बजेटमधे दीर्घपल्ल्याच्या बुलेट ट्रेन्स येतिलच. आता माझा व्यक्तिगत अनुभव आणि मत: फ्रान्ससारख्या प्रगत आणि भारतापेक्षा बर्‍याच कमी घनतेच्या लोकसंख्येच्या देशात विमान वाहतुकीचे जाळे भारतापेक्षा बरेच मोठे आहे, अनेक लहान शहरे विमानसेवेने जोडलेली आहेत. लोहमार्गाचे जाळे तर त्याहुनही मोठे आहे. विमानसेवा बरीच स्वस्त आहे आणि बर्‍याच वेळा बुलेट ट्रेन्सचे भाडे विमानापेक्षा कमी असते. ही एवढी पार्श्वभूमी असूनही भरपूर लोक विमानापेक्षा लोहमार्ग निवडतात. याची कारणे अनेक आहेत आणि ती भारतातही तेवढीच लागू होतील. स्वानुभव असाच आहे की प्रवासाच्या २-४ दिवस अगोदर ट्रेनचे तिकीट मिळालेले नाही. (अवांतरः तसेच मुंबईपासून ३५०-४०० किमी दूर असलेल्या माझ्या शहरात पोहोचायला मला रेल्वेने ७-८ तास लागतात यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पण हा मागास तंत्रज्ञानाचा वेगळा मुद्दा आहे.) या अनुभवावरून मी असा अंदाज करू शकते की मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनदेखील रिकामी/तोट्यात नक्कीच धावणार नाही. बरेच विमान-प्रवासी तर बुलेट ट्रेनकडे वळतीलच पण सध्याच्या गाड्यांनी जाणारेही अनेक प्रवासी बुलेट ट्रेनला प्राधान्य देतील. ८-९ तासाचा प्रवास २ तासावर आला तर ते नक्कीच स्वागतार्ह असेल. विमानप्रवासाला जरी तेवढाच वेळ लागत असला तरी प्रवासाच्या तासभर आधी आणि अर्धातास नंतर असा दिड तास उगाच वाया जातो. शिवाय रेल्वेस्थानक शहराच्या मध्यवर्ती भागात असतात. वेळबचतीच्या या सर्व कारणांमुळे मी तरी विमानापेक्षा बुलेट ट्रेनला प्राधान्य देईल. थोडक्यात मला असंच वाटतं की आज जरी हा खर्च प्रचंड वाटत असला तरी वेगवान वाहतुकीकरता गरजेचा आहे.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 12/15/2015 - 09:30 नवीन
पायलट = पथदर्शी या मार्गावर दोन्ही बाजूंनी मिळून रोज ४०,००० (अन्दाजे) प्रवासी जातील असं वाचलंय. वेळ तिप्पट कमी आणि तिकीट एसीच्या दीड्पट आहे म्हणे. वर म्हट्ल्याप्रमाणे आठ कोटी महसूल रोज मिळ्ण्यासाठी २००० रु. ति़कीट असावे लागेल. चार हजार असेल तर फायद्यात चालायला हवी. पण जर-तर आहे सगळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
क
काकासाहेब केंजळे Tue, 12/15/2015 - 07:19 नवीन
ताशी पाचशे किलोमीटर वेगाने जाणर्या ट्रेनमध्ये कुणी बसायचे धाडस करेल असे वाटत नाही.त्याच बरोबर अश्या अत्याधुनिक रेल्वेचे मेंटनन्स ठेवन्यासाठी जे कुशल मनुष्यबळ जपानकडे आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे का याचा विचार करायला हवा,पाचशे कीमी वेगाने जाणार्या ट्रेनला छोटासा भुकंपाचा धक्कादेखिल डीरेल करु शकतो.असा अपघात घडल्यास आतल्या लोकांचा चेंदामेंदा होतो.असे दुर्दैवाने घडल्यास परत त्या ट्रेनमध्ये बसायचे धाडस कुणी करणार नाही व प्रकल्प तोट्यात जाईल. काँकोर्ड विमानाचा भिषण अपघात झाल्यानंतर ति सेवा पुर्ण तोट्यात गेली व बंद पडली, तसेही घडू शकते.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 12/15/2015 - 07:31 नवीन
शुभ बोल रे काक्या! टीप - केवळ म्हणीचा मीटर चुकू नये म्हणून 'काक्या' म्हटले. तसा आदर आहेच, काकासाहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
आ
आदिजोशी Tue, 12/15/2015 - 07:56 नवीन
अशा प्रकारचे प्रकल्प बांधताना ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेतलेल्या असतात. शहरातले साधे फ्लायओवर बांधतानाही भुकंपाची शक्यता, वार्‍याचा वेग, वाहनांचे वजन अशी हजार गणितं मांडली जातात. कुशल मनुष्यबळ उपलब्ध करणे हा मुद्दाच नाही. आज जर मर्क आणि बीमर सारख्या गाड्या बनवायला मनुष्यबळ मिळते तर ह्यासाठी का नाही मिळणार? उगाच काय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
स
संदीप डांगे Tue, 12/15/2015 - 08:13 नवीन
कैच्या कै... जिथून ही बुलेट ट्रेण येणार्‍ है तिथे रोजच्या रोज भूकंप होतात. अप्घत होऊ नये म्हनून रस्त्यावर चालूच नये काय काकासाहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
S
sagarpdy Tue, 12/15/2015 - 08:04 नवीन
बुलेट ट्रेन पुणे-मुंबई मध्ये झाली असती तर स्विच मारायला ऑप्शन वाढले असते राव! (हिंजवडी फेज - ४ च्या प्रतीक्षेत) [कुठे नेउन ठेवलीये मेट्रो आमची मंडळ]
  • Log in or register to post comments
E
Ea imputo praemitto Tue, 12/15/2015 - 08:47 नवीन
हा जुगार आहे, आणि जुगारात 'रिस्क' घेणाराच जिंकतो. आता गरज नाही आहे पण भवीष्यात बुलेट ट्रेन काळाची गरज आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Tue, 12/15/2015 - 09:01 नवीन
बस !! आपल्याला हाय फाय पाहिजे सगळे. उपनगरी ट्रेन मध्ये रोज १०/१५ लोक मेले तर ते त्यांचे नशीब. किडा मुंगीची जिंदगी जगणारे तसेच मरणार. प्रगती साठी कोणाचा तरी बळी द्यावा लागतोच. मी आणि माझे तर नाही ना बळी जात आहोत ? मग झाले तर !! अशी विचारसरणी असलेल्या लोकांचा देश म्हणजे - मेरा भारत महान. अरे आम्ही कुठे म्हणतो कि बुलेट ट्रेन नको ? जरूर आणा. पण आधी लोकांच्या रोजच्या जगण्या मरण्याचा प्रश्न झालाय तो सोडवा ना. पण मोदी भारतीय लोकांना उत्तम ओळखून आहेत. त्या मुळे असले प्रकल्प ते करू धजतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto
स
सुबोध खरे Tue, 12/15/2015 - 09:21 नवीन
हे "आफ्रिकन चाइल्ड सिंड्रोम" किंवा तत्सम तत्वासारखे आहे. म्हणजे कुठेही पैसे आणी कितीही खर्च करायचे झाले कि ताबडतोब "याच पैशात आफ्रिकेत किती मुलांना जेवायला घालता आले असते याचा हिशेब करण्यासारखे आहे. अहमदाबादला जायला ५० गाड्या आहेत यात बसून प्रवास करणारया १०,००० पैकी ५००० तरी प्रवासी काम करणार्या वयातील असतील. मग रोजचे ५०००X ५ = २५००० मनुष्य तास आणी तितकेच तास त्या लोकांना दगदग झाली म्हणून फुकट जाणारे तास. म्हणजेच ५०००० मनुष्य तास रोज वाचतील ना? तुमच्या लोकल दुरुस्त करायला कोण पैसे देणार आहे? इथे बिनव्याजी पैसे जपानी देत आहेत म्हणजे तुमच्या खिशातील पैसे तुम्ही न भरता तुम्हाला बुलेट ट्रेन मिळते आहे तरी त्यात तोंड वाकडेच? या वाचलेल्या मनुष्य तासात बुलेट ट्रेनचे पैसे तुम्ही वळते करू शकलात तर हि गाडी तुम्हाला फुकट मिळाल्यासारखी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
व
विकास Tue, 12/15/2015 - 13:18 नवीन
हे "आफ्रिकन चाइल्ड सिंड्रोम" किंवा तत्सम तत्वासारखे आहे. आपल्याकडे "इंडीयन सोशल सिंड्रोम" आहे ना! ;) म्हणजे, मंगळावर जाण्याच्या खर्चात किती शाळा, शौचालये वगैरे तयार करता येतील वगैरे वगैरे बोलले जातेच... खर्चावर चर्चा करताना गॅरींचा मुद्दा भविष्यात आपण तेव्हढे पैसे परत करू शकू का, हा आहे... $१५ बिलियन्स आत्ता खर्च होत नाही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/15/2015 - 14:05 नवीन
+१००० "आफ्रिकन चाइल्ड सिंड्रोम"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/15/2015 - 14:11 नवीन
.

"याच्या बदल्यात ते" या चलाख राजकारणी हिशेबी वादविवादात आपली शक्ती नेहमी खर्च होते आणि त्या ओघात "हे आणि ते, दोन्ही बरोबरीने करता येते" हे आपण विसरून गेलोय :(

देशातले सगळे गरीब श्रीमंत झाल्यावरच विकासाच्या इतर गोष्टी करायच्या असे ठरवले असते तर सद्याचे कोणतेही प्रगत राष्ट्र आजही प्रगत राष्ट्र झालेले नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Tue, 12/15/2015 - 15:22 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अभिजित - १ Tue, 12/15/2015 - 16:05 नवीन
आफ्रिकन मुलांचा आणि माझा / मुंबई कर ट्रेन प्रवासी लोकांचा किवा भारताचा काही संबंध नाही. त्या मुलांचे काम , त्या देशाने बघावे हि सरळ अक्कल मला पण आहे. पण इथे मुंबई मध्ये गेली किती तरी वर्ष रोज १०/१५ लोक मरतायत. त्यांचा आणि आपला संबंध आहे ना ? कि नाही ? इथे बघा २००८ मधली एक लिंक. ती पण सांगते कि रोज १० लोक मरतात. मग आपले प्राधान्य कशाला पाहिजे ? हा साधा सरळ प्रश्न आहे. http://www.ibnlive.com/videos/india/killer-trains-288579.html Mumbai's death trap: 10 railway commuters die per day मंगल यान खर्च ४५० कोटी रुपये फक्त. बुलेट ट्रेन खर्च - १ लाख कोटी. जपान काही खिरापत वाटत नाहीये. परत करायचे आहेत ते पैसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ख
खेडूत Tue, 12/15/2015 - 16:49 नवीन
अरे देवा! आपणास मुद्दाच समजला नाहीय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Tue, 12/15/2015 - 17:05 नवीन
सरासरी ने रोज १० ते १५ लोकांचा मृत्यू . आणि ते हि गेली ८ ते १० वर्ष. दर रोज .. याच्या पेक्षा कोणताही मुद्दा मोठा नाही असे मला वाटते. तुमचे चालू द्या .. मी याच्या पेक्षा जास्त काही समजावून सांगू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
स
सुबोध खरे गुरुवार, 12/17/2015 - 05:36 नवीन
आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद वळवणे हे वस्तुस्थितीला धरून नाही. रोज होणार्या अपघातांपैकी बहुसंख्य (८०%) मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना होतात. As per the statistics provided under the RTI query, apart from 6,989 passengers who died after falling from trains, 22,289 passengers succumbed while crossing the tracks (trespassing). - A railway officer, on condition of anonymity, said, “This is true that number of cases of falling of passengers has gone up, but it also includes those cases when many people lost their lives while performing stunts.” यात परत बहुसंख्य लोक बाहेर लटकताना स्टंट केल्याने खांबावर डोके आपटून मृत्यू पावतात. आपला मुद्दा समजावून सांगण्यासाठी विदा देता ती संपूर्ण सत्य असावी आपल्याला जी सोयीस्कर आहे अशी देऊ नये एवढीच विनंती. रच्यकने-- माझा सख्खा भाऊ गर्दीमुळे रेल्वेतून पडला होता आणि त्याच्या डोक्याला मार लागला होता( खांबावर डोके आपटून नव्हे.) तेंव्हा मला या बाबत कोणतीही संवेदना नाही असे कृपा करून म्हणून नका. सत्य हे सत्य स्वरुपातच मांडले गेले पाहिजे अशा आग्रही मताचा मी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ गुरुवार, 12/17/2015 - 12:17 नवीन
A whopping 25,722 passengers fell from suburban trains in last 10 years, of whom 6,989 commuters died while 18,733 survived, said RTI activist Anis Khan रोज २ लोक मरतात पडून. इतर लोक रूळ ओलांडताना मरतात. मान्य आहे. पण हा प्रश्न सोडवणार कोण ? रेल्वेच ना ? मग हा का सुटत नाही ? हा सोडवण्याची जबाबदारी कोणाची आहे ? रेल्वेची ना ? आणि इतर जे १८ हजार लोक ट्रेन मधून पडले त्यांचे काय ? ते का पडत आहेत ? कि सगळेच stunt बाज लोक आहेत हे असे तुमचे म्हणणे आहे ? - ४०० लोक दर वर्षी गुदमरून मरतात ट्रेन मध्ये. कमी आहेत का ? http://www.misalpav.com/comment/784262#comment-784262 - 6,989 passengers who died after falling from trains. रोज लोक मरतात हे तर सत्य आहे ना ? मग ते आधी सुधारा कि. रोज रूळ तुटत आहेत , ते सुधारा. या सगळ्या गोष्टी सोडून बुलेट ट्रेन ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गॅरी ट्रुमन Wed, 12/16/2015 - 16:48 नवीन
हा आफ्रिकन चाईल्ड सिन्ड्रोम कसा काय? १ लाख कोटी रूपये बुलेटवर खर्च करण्यापेक्षा संडास बांधावेत असे काही मी कुठे लिहिले आहे? माझा मुद्दा एवढाच की या प्रकल्पातून खर्चाच्या मानाने परतावा आहे का? त्यापेक्षा तोच पैसा मुळात अस्तित्वात असलेल्या रेल्वेवरील कामांसाठी वापरले तर त्यापेक्षा जास्त परतावा मिळणार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभिजित - १ Wed, 12/16/2015 - 17:27 नवीन
+१०० इथे आफिकन चाईल्ड सिंड्रोम कसा लागू करतात हे लोक, हे समजत नाही. काय आहे कि हे लोक कधी स्वत रोज लोकल ट्रेन ने प्रवास करत नाहीत. त्या मुळे त्यातला त्रास त्यांना समजत नाही. ज्याचे जळते त्यालाच कळते .. म्हण आहे ना, ती खरी करून दाखवत आहेत हे लोक . आत्ता काही महिन्या पूर्वी दिवा मध्ये दंगल उसळली होती. रेल्वे मंत्री पर्यंत पोचली होती ती बातमी दिल्लीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुबोध खरे गुरुवार, 12/17/2015 - 05:21 नवीन
हे लोक कधी स्वत रोज लोकल ट्रेन ने प्रवास करत नाहीत. त्या मुळे त्यातला त्रास त्यांना समजत नाही.हे म्हणजे तुम्ही बाई नाही म्हणजे मग तुम्ही ढीग स्त्रीरोग तज्ञ असलात तरी बायकांचा त्रास तुम्हाला कसा कळेल? हे म्हणण्यासारखे आहे. रच्याकने-- सध्याचा दाव्खाना सुरु होण्याच्या अगोदर दोन वर्षे मी एशियन हार्ट इन्स्तीत्युट मध्ये काम करीत असताना रोज मुलुंड ते कुर्ला लोकलनेच प्रवास करीत होतो आणी १९६५ सालापासून( जन्मापासून) मी मुंबईतच राहत आहे. तेंव्हा असे वक्तव्य करण्याअगोदर वस्तुस्थितीची खात्री करून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
स
संदीप डांगे Tue, 12/15/2015 - 09:29 नवीन
इथे बिनव्याजी पैसे जपानी देत आहेत म्हणजे तुमच्या खिशातील पैसे तुम्ही न भरता तुम्हाला बुलेट ट्रेन मिळते आहे गॅरीसाहेब, हा मुद्दा तुम्ही विसरलात का? जर हे खरे असेल तर मग पांढरा हत्ती कसाही परवडेलच जर मला फक्त मांड ठोकून अंबारीमध्ये फिरायचे असेल तर.....
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 12/15/2015 - 10:13 नवीन
शेंच्युरी उलटलेल्या बद्दल सर्वांनच आगामी बुलेट ट्रेनचा व्हिआयपी पास देऊन सत्कार करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम पास धारी कार्यकर्ते..
  • Log in or register to post comments
G
gogglya Tue, 12/15/2015 - 10:34 नवीन
जमा खर्च कसा काय मांडला नाही?
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 12/15/2015 - 14:20 नवीन
ही गाडी व त्यासाठी लागणाऱ्या एकूण एक गोष्टी फक्त जपान मध्ये बनून त्या डायरेक्ट भारतात आणून बसवणार आहेत का? माझ्या मते तंत्रज्ञान जरी जपानी असलं तरी बहुतेक सर्व गोष्टी भारतात बनतील. त्यामुळे मिळणाऱ्या रोजगाराचा पण विचार करायला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रकल्पामध्ये अगदी मजुरांपासून ते उच्च तांत्रिक ज्ञान असलेल्या लोकांची गरज भासणार. दुसऱ्या शब्दात ९८००० कोटी हे रुपये फक्त काही गाडीची किंमत नाहीये तर पूर्ण प्रकल्पाची किंमत आहे. जपानला तंत्रज्ञानाचे व इतर मुख्य भागांचे पैसे जरी मिळाले तरी भारतीय लोकांना पण काम मिळेल. म्हणजे ९८००० कोटीमधील बराचसा भाग भारतातील लोकांना मिळणार आहे. वर कोणीतरी रोल्स रॉईसची तुलना केलीये. पण रोल्स रॉईस कुठेतरी बनून तुमच्या घरी येइल. तेच तुमच्या कुटुंबातील लोकांना काम मिळून ती गाडी कशी बनवायची ते शिकवलं तर? त्यातूनही गाडी जर भाड्यानी देणार असाल तर हा नक्कीच तोट्याचा व्यवहार नसेल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Tue, 12/15/2015 - 14:36 नवीन
सुरवातीला एशियाड बसच्या बाबतीत कोण प्रवास करणार व तोट्यात जाणार असे बोलले जायचे. पण लाल डब्यात जेवढे प्रवासी प्रवास करत तेवढेच प्रवासी एशियाड मध्ये प्रवास करत.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 12/15/2015 - 16:36 नवीन
एशिआडला विरोध अगदी तुरळक झाला. झाला तो भाडे कदाचित जास्त पडेल या शंकेने झाला. उलट एस.टीच्या डबड्यात सुधारणा हवी ही मागणी होती. एशिआडला आल्या आल्या उत्तम प्रतिसाद मिळाला. दोन्ही बाजूंनी चढणे-उतरणे, मध्ये मोकळी जागा, हवेशीर खिडक्या या सर्व गोष्टी लोकांना आवडणार्‍याच होत्या. लोक सरसकट विरोध करीत नाहीत. आपल्या सोयीगैरसोयी त्यांना बरोबर कळतात. वरती एक्स्प्रेस वेचा उल्लेख झाला आहे. खरे तर १९९०-२००० या काळात मुंबई-पुणे वाहातूक खूपच वाढली होती. अपघात आणि खोळंबेही वाढले होते. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातून मुंबईकडे येण्याचा तो एकच मुख्य मार्ग होता आणि वारंवार वाहतूक-खोळंब्याने अनेकांची-त्यात वी.आय.पी,आणि बडी धेंडेसुद्धा असत, अडचण होई. बहुतेक सगळ्या मंत्रीगणांना या खोळंब्याचा प्रसाद मिळाला होता. एकदा चौदा तासांचा खोळंबा झाला. पर्यायी मार्गाचा विचार तातडीने सुरू झाला. त्यात १९९६साली बाळासाहेबांच्या पत्नी सौ. मीनाताई यांचे कर्जत येथील एका फार्महाउसवर निधन झाले. संबंधितांना तिथे त्वरित पोचता आले नाही. ती शेवटची काडी होती. सरकारी पातळीवर हा रस्ता प्रथम प्राधान्यावर आला. लोकही रोजच्या कटकटींना कंटाळले होते. मात्र रस्त्याच्या कामाला विरोध पर्यावरणवाद्यांकडून झाला. कारण अख्खा घाट फोडण्यामध्ये बरीच वृक्षराजी नष्ट होणार होती, माती सैल होणार होती, दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढणार होते, अनेक आक्षेप होते आणि ते अंशतः खरे होते. पण शेवटी या रस्त्यामुळे होणार्‍या फायद्याचे पारडे पर्यावरणाच्या नुकसानापेक्षा भारी ठरले आणि रस्ता झाला. या 'नो अ‍ॅक्सेस' रस्त्यामुळे घाटातली काही गावे विभागली गेली, शेती दुभंगली, गुराढोरांच्या चरण्यावर मर्यादा आली म्हणून काही गावांतल्या लोकांनी विरोध केला. शेवटी काही जोड-उड्डाणपूल अधिकचे बांधून तो मिटवण्यात आला. सगळ्याच सुधारणांना लोक विरोध करतात असे नाही. त्यांच्या काही प्रायॉरिटीज़ असतात आणि त्या प्रायॉरिटीने पूर्ण व्हाव्या अशी त्यांची अपेक्षा असते. त्या डावलल्या गेल्या तर विरोध होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
श
श्रीरंग_जोशी Tue, 12/15/2015 - 16:39 नवीन
आशयाशी सहमत केवळ एक तांत्रिक दुरुस्ती. विदर्भातून मुंबईला जायला राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जो नाशिकहून मुंबईला जातो हा वापरला जायचा / जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Tue, 12/15/2015 - 17:16 नवीन
होय ती चूकच झाली. लिहितानाही लक्ष्यात आले होते. पण विदर्भ-मराठवादा हे जोडशब्द अगदी सहजतेने येतात. चूक लक्ष्यात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
व
विकास Tue, 12/15/2015 - 16:57 नवीन
खरे तर १९९०-२००० या काळात मुंबई-पुणे वाहातूक खूपच वाढली होती. अपघात आणि खोळंबेही वाढले होते.... नजिकच्या भविष्यातले आणि अजून पुढच्या भविष्यातला विचार करून डेव्हलपमेंट करायची असते. पण आपल्याकडे जो पर्यंत (माझ्या दृष्टीने) समाजवादी पगडा होता तो पर्यंत तशी मानसिकता नव्हती... तरी देखील शिवसेनेला विशेष करून बाळासाहेबांना याचे पडले होते असे वाटते. संबंधितांना तिथे त्वरित पोचता आले नाही. ती शेवटची काडी होती. या बाबतीत मला चांगले आठवते त्याप्रमाणे... नव्वदच्या विधानसभा निवडणूकीत भाजपा-सेना, "एकच लक्ष विधानसभा" म्हणत एकत्र आले. त्यावेळेच्या म्हणजे १९९० च्या "वचननाम्यात" देखील पुणे-मुंबई प्रवास अडीच तासात करण्यासाठी हायवे बांधू म्हणून होते. अर्थात, त्यावेळेस युतीचे सरकार आले नाही. तरी देखील बाळासाहेब (आणि मला वाटते प्रमोद महाजन) हे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांना जाऊन भेटले आणि त्यांनी युतीने तयार केलेला पुणे-मुंबई महामार्गाचा अहवाल दिला. ठाकरे म्हणाले होते की आम्ही निवडून आलो नसलो तरी ही काळाची गरज आहे आणि जे कोणी सत्तेवर असतील त्यांनी ती केली तरी हरकत नाही... तो फोटो ९० साली.. महाराष्ट्र टाईम्स मधे बघितल्याचे आठवते आहे. अर्थात ते काही झाले नाही. कदाचीत पवार राहीले असते तर निदान थोडेफार तरी झाले असते. पण ते ९१ साली ते केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले आणि तो अहवाल तसाच धूळ खात पडला. १९९५ मधे जेंव्हा युती सरकार आले, तेंव्हा रिमोट कंट्रोलने (पक्षी:बाळासाहेबांनी) नितीन गडकरींना पूर्ण पाठींबा देत स्वातंत्र्य दिले. गडकरींनी ते करून दाखवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Tue, 12/15/2015 - 17:21 नवीन
कोणी केले हा मुद्दा नाही. लोकांचा विरोध नव्हता हे सांगायचे आहे. लोकांना तो हवा होता, अगदी १९९० पासून हवा होता. जाता जाता : जुन्या मुंबई-पुणे मार्गावर पुण्याहून येताना दस्तुरखुद्द शरद पवारसुद्धा तीन चार तास अडकले होते. ज्येष्ठ मंत्री अडकण्याचे प्रमाण वाढले तशी पर्यायी मार्गाची वरिष्ठ पातळीवर निकडही वाढली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
श्रीरंग_जोशी Tue, 12/15/2015 - 17:28 नवीन
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मुंबईहून नाशिकच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शरद पवार कारने नाशिकला निघाले होते. बहुधा कसारा घाटात झालेल्या मोठ्या अपघातामुळे तसेच त्या हायवेचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मोठा जॅम झाला होता. पवार तीन किलोमिटर पायी चालत गेले होते अन तिथून दुसर्‍या कारने नाशिकला रवाना झाले होते. मुख्यमंत्री असल्याने विलासराव विमान वा हेलिकॉप्टरने नाशिकला पोचले होते. आता तो हायवेही चौपदरीकरणामुळे उत्तम झालेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मराठी_माणूस Wed, 12/16/2015 - 06:27 नवीन
तसेच त्या हायवेचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मोठा जॅम झाला होता.
हे चौपदरीकरणाचे काम त्या प्रसंगानंतर सुरु झाले. आपल्याकडे विशिष्ट व्यक्तींना त्रास झाल्यावरच सुधारणा सुरु होतात. सामान्य माणसे वर्षानुवर्ष त्रास सहन करतच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 12/16/2015 - 13:06 नवीन
माहिती दुरुस्त करण्यासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
ग
गामा पैलवान Fri, 12/18/2015 - 16:02 नवीन
राही, १९९६ च्या सौ. मीनाताईंच्या मृत्यूसंबंधाने लिहिलेले बरोबर आहे. असेच काहीसे त्यावेळी वृत्तपत्रांत वाचल्याचे स्मरते. शिवाय काही महिनेच आधी बाळासाहेबांच्या थोरल्या चिरंजीवांचे श्री. बिंदुमाधव यांचे याच रस्त्यावर अपघाती निधन झाले होते. नव्या रस्त्याचे हे देखील एक सबळ कारण होते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मार्मिक गोडसे Tue, 12/15/2015 - 15:22 नवीन
सुरवातीचे माहीत नाही.परंतू मी जेव्हा जेव्हा एशियाड बसने प्रवास केला तेव्हा त्या गाडीत स्टँडिंग प्रवासी घेतलेले बघितलेल्रे नाही जे साध्या बसमध्ये घेतले जातात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 12/15/2015 - 15:31 नवीन
आणि माहितीपुर्ण प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/15/2015 - 16:32 नवीन
या प्रकल्पाचा मोठा खर्च भारतातच होणार आहे, त्यामुळे... १. इथे नसलेले पण प्रकल्पामुळे भारतात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान व त्यांचे रेल्वे व इतर उद्योगधंद्यांवर होणारे सकारात्मक परिणाम (उदाहरणादाखल, छोट्या मोजपट्टीवर का होईना, कोकण रेल्वेचा इतिहास व फायदे तपासून पहावेत); २. त्या रेल्वेमार्गावर अवलंबून भारतात निर्माण होणारे (सर्विस व प्रोडक्ट सप्लायर) उद्योग; ३. त्या रेल्वेमार्गामुळे इतर रेल्वेशी असंबंधित भारतिय उद्योगांना मिळणारी मदत (उदा. मुंबई-पुणे जलदगती मार्गाने झालेली मुंबई-पुणे पट्ट्यातील व्यवसाय-उद्योगांची वाढ, इ); ४. वरच्या १, २ व ३ वर अवलंबून भारतात निर्माण होणार्‍या नोकर्‍या; ५. वाढलेल्या नोकरदार लोकांच्या वाढलेल्या क्रयशक्तीमुळे वाढणारे स्थानिक छोटेमोठे व्यवसाय व उद्योग; ६. भारतिय जनतेची सोय (उदा: केवळ वादासाठी अगदी असे मान्य करू की बुलेट ट्रेनचे तिकीट श्रीमंतांनाच परवडेल; तरीही त्यांची सामान्य ट्रेनवरची संख्या कमी झाल्याने सामान्य लोकांना सामान्य ट्रेनने प्रवास जास्त सुलभ होईल, नाही का ?); इत्यादी... (आत्ता सहज इतके मुद्दे सुचले. पण शांतपणे अभ्यास केला तर अजून बरेच मिळतील.) वरच्या सगळ्या आणि इतर बर्‍याच मुद्द्यांनी होणारा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा जमेस धरल्याशिवाय या प्रकल्पाचे सोपे (सिंल्पिस्टिक) समीकरण मांडणे योग्य होणार नाही... तसे असते तर गुंतागुंतीचे प्रकल्प बनवायला उच्च प्रतिच्या तंत्रज्ञांची गरजच पडली नसती. या प्रकल्पात भारत जपान सारख्या जागतिक ब्रँड असलेल्या देशाची मदत घेत आहे. इतकेच नव्हे तर तो देश या प्रकल्पात स्वतःचे ८०% पैसे नगण्य व्याजदराने टाकतोय. जर हा प्रकल्प फसला तर त्या देशाचे मोठे धन तर बुडेलच पण जगभर असलेले ब्रँडनेमही बुडेल (देशाची नामुष्की होईल व इतर देश त्यांच्याकडून बुलेट ट्रेन तंत्रज्ञान घ्यायला तयार होणार नाहीत). जेव्हा एखाद्या प्रकल्पाबद्दल पूर्ण माहिती नसते तेव्हा मोघम माहितीवर मत देणे चूक असते, हे खरे मानले तरीही, वरच्या वाक्यातल्या सत्य परिस्थितीच्या (ज्याबद्दल शंका नाही) पार्श्वभूमीवर इतकेच म्हणता येईल की, "जपानसारख्या देशाने या प्रकल्पात सहभाग घ्यायचा निर्णय मूलचांचण्या (फिजिबिलिटी स्टडी) न करता घेतला असेल हे म्हणणे धारीष्ट्याचे होईल". विषेशतः भारतातील प्रकल्पांचे इतर अनेक पर्याय समोर असताना जपानने असे करणे जपानी व्यवस्थापनशास्त्रात बसणारे नसेल हे नक्की.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/15/2015 - 16:57 नवीन
अजून एक फार महत्वाचा आणि कळीचा मुद्दा... केवळ जपान हा एकच देश बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर विकायला उत्सुक आहे असे नाही... यामध्ये त्याला चीन, जर्मनी आणि फ्रांस हे तुल्यबळ स्पर्धक आहेत. त्यामुळे भारतातला हा प्रकल्प यशस्वी होणे हे भारतापेक्षा जपानला अतिशय जास्त आवश्यक आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मनो Tue, 12/15/2015 - 16:48 नवीन
हे ९८,००० कोटी इथेच खर्च होणार ना - बहुदा जागा मिळवण्यासाठी त्यातले १०,००० कोटी द्यावे लागतील? त्यातला काही हिस्सा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतील त्यांना मिळेल. ज्या कंपन्या बांधकाम करतील त्या इथल्याच असतील. आणि भाजपाला त्यातला काही हिस्सा देणग्या म्हणूनपण मिळेल. त्यामुळे उद्याच्या पिढीवर कर्ज टाकून आजच्या घडीला ते पैसे उपलग्ध होतील. त्यातून भारताची अर्थव्यवस्था सुधारेल कारण ते पैसे इथेच खर्च होणार आहेत याचा फायदा तुम्ही धरलेला नाही हिशोबात. त्यातून हे सहज कळेल की हा प्रकल्प का होतो आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 12/17/2015 - 12:29 नवीन
त्यातून भारताची अर्थव्यवस्था सुधारेल कारण ते पैसे इथेच खर्च होणार आहेत याचा फायदा तुम्ही धरलेला नाही हिशोबात.
अर्थव्यवस्था सुधारायला असे पैसे इथेच खर्च होऊन उपयोग नसतो. मग त्या न्यायाने मनरेगा म्हणजे अर्थव्यवस्थेला प्रचंड चालना देणारी गोष्ट ठरायला हवी होती. तसे झाले आहे का?
त्यामुळे उद्याच्या पिढीवर कर्ज टाकून आजच्या घडीला ते पैसे उपलग्ध होतील.
हे थोडेसे क्रुगमन स्टाईल बोलणे झाले. यावर कॅफेहायेक (http://cafehayek.com/) या ब्लॉगवर क्रुगमनवर बरीच टिकाही झाली होती. हा ब्लॉग अती उजवा आहे त्यामुळे त्यावरील सगळी मते सर्वांना मान्य होतीलच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
ल
लॉरी टांगटूंगकर Tue, 12/15/2015 - 17:07 नवीन
क्लिंटनराव ह्यो प्रॉब्लेम मला ष्ट्याटीक न वाटता डायनामिक वाटून राहिलाय. घेतलेले गृहितकं ष्ट्याटीक वाटतायत. डिमांड साईड- जर मार्केट अंडर पेनिट्रेटेड असले तर सद्य परिस्थिती वरून दहा पंधरा वर्ष नंतरची आकडेवारी काढणे चुकीचे असू शकते. आपण सद्य परिस्थितीत देश म्हणून / इमर्जींग इकनॉमी म्हणून मस्त डेव्हलप होत आहोत. आपला वाढीचा दर जगाच्या तुलनेत लै म्हणजे लै मस्त आहे. उदाहरणार्थ बोलायचं झालं तर हे बघा . Image removed. ref- prof vidyanathan’s presentation आणि हा लहान ट्रेंड नाही लै लांबचा आहे. आमची डेव्हलप मार्केटमध्ये बसलेली पालक कंपनी पाच आणि सात टक्के ग्रोथ रेटचे टार्गेट ठेवते. भारतीय कारट्याला (ज्यात आम्ही काम करतो) तीस टक्के ग्रोथ ठेवायला प्रॉब्लेम येत नाय. तर मुद्दा हा आहे की आर्थिक शक्तीचा अक्ष ब्रिक्सकडे येतो आहे. क्रयशक्ती ज्याला सामान्य भाषेत पर्चेसिंग पावर म्हणतात, ती वाढते आहे. डेव्हलप मार्केटपेक्षा प्रत्येकाकडे असलेले पैशे सद्यस्तिथीत कमी आहेत पण ते वाढायला हरकत नाही. इन्कम पिऱ्यामिड मधला भाग मोठा होत त्याची शंकरपाळी होतांना दिसत आहे. ठीक ठाक सुविधा आहेत पण त्या रहाणीमाना बरोबर सुधारायला हव्यात. मिळणारे वॅल्यू प्रपोझीशन बदलायला हवे. (लाईफबॉयच्या ऐवेजी लक्स किंवा अजून अपग्रेड होऊन शॉवरजेल अशा टाईपमध्ये). रमा बिजापुरकर म्हणतात की भारतात अनेक एकमेकांपासून वेगळी मार्केट्स आहे आणि प्रत्येकाची गरज पुरेशी वेगळी आहे. थोड्या लोकांकडे पैका आहे बाकी लोक्सकडे येईल. पर क्यापिटा प्यासिंजर मोबिलिटीचा डेटा पाहिला तर सामान्य भारतीय माणसाने युरोपियन आणि अमेरिकन मनुष्याच्या तुलनेत एक द्वितीयांश आणि एक तृतीयांश अंतर प्रवास केलेला. (संदर्भ- http://www.indiaenergy.gov.in/demand_passenger.php ). आता रेल्वेच्या वेगाबाबत वेगळी आकडेवारी द्यायची गरज मला वाटत नाही. वेगवान वाहतूकीची साधने ही गरज अर्थातच आहे आणि या साईडला पुरेसा सप्लाय नाहीये किंवा जास्त सप्लाय घ्यायची क्षमता आहे आणि वाढेल असं म्हणता येऊ शकतं. सेक्टोरिअल तुलना- विमानवाहतूकीचे दिवस सध्या क्रूड ऑईल पडल्याने बरे चालले आहेत. सर्व देशभर विमान विरुद्ध बुलेट ट्रेन्स असा विचार करून पाहू. विमान म्हणजे एअर ट्र्याफीक आली. ल्यान्डीग आणि टेक ऑफ साठीचे रन वे आले. सप्पकन उभे उडणारे विमानं आले तर ही गोष्ट लागू होणार नाही पण जर ते आले नाहीत तर विमानतळ वाढवण्याची क्षमता विरुद्ध ट्रेन स्टेशन्स अपग्रेड करायची क्षमता असं ढोबळपणे पाहिल्यास ट्रेन्स जास्त प्याशिंजर घेऊ शकतील असे वाटते. Image removed. दोन तीन देशातील ट्रेन आणि विमान प्रवासाची तुलना पाहिली असता ट्रेन जास्त महाग आहे असेच दिसते. ज्या अर्थी चिकन चाऊमीन खाऊन यांनी जालावर वेळापत्रके टाकली आहेत त्या अर्थी यात प्याशिंजर जात असणार. महाग तिकीटे का घेता आहेत हे मला माहिती नाही. तिकडे घेतायत तर इथे घेतील का? माहिती नाही पण कदाचित घेऊ शकतील. इंधन – क्रूड किमती सध्या मजबूत खाली आहेत. प्रोजेक्शन्स करणाऱ्यांचे मत आहे की अजून थोडेफार खाली खाली जाईल. बुलेट ट्रेन इलेक्ट्रिक आहे. विमानाला सध्या इलेक्ट्रिसिटी हा पर्याय नाही त्यांची प्रॉफिट्याब्लिटी संपूर्णपणे क्रूडवर आहे. क्रूडचे वीस वर्षाचे प्रोजेक्शन करण्यापेक्षा इलेक्ट्रिसिटीचे आकडे जास्त ष्ट्याटीक वाटतात. किमान ते क्रूड सारखे उभे आडवे भसकलेत असं झालं नाहीये. आता सध्याचे ट्रेंड पहाता सोलर एनर्जी जास्त वेगाने स्वस्त होते आहे आणि अजून बरीच होईल (गॉर्डन मूरचा नियम?). Image removed. पीटर डीमिन्डीसच्या बोल्ड किंवा अॅबन्डन्स या पैकी कोणत्या तरी एका पुस्तकात ही संकल्पना दिलेली आहे. इमेज जालावर सापडली. सोलर एनर्जीमुळे एकंदर वीज स्वस्त होईल हे वैयक्तिक मत आहे. पण त्याचा परिणाम कसा होईल आणि क्रूडचं काय होईल माहीत नसल्याने हा बिंदू बाजूला ठेवू. आता फ़ायनान्शिअल आकडेमोडीवर येऊ.- पीपीपी अॅरडजस्टेड तिकीट किमती दुप्पट तिप्पट तरी असायला हव्यात (सन्दर्भ- http://articles.economictimes.indiatimes.com/2012-12-17/news/35868768_1_passenger-freight-trains-rail-fares). आपली ट्रेन मुळातच कचकून तोटा करते आहे. तिकीट किमती दुप्पट केलेल्या चालाणारेत? इथेच बोंबलायला का आत्ताच्या आत्ता क्याशमध्ये फायदा बघा? इथे मला प्रॉफिट्स किंवा पे ब्याक डीसीएफ करण्यापेक्षा सद्य स्थितीत गुंतवणूक करण्याची क्षमता आहे का नाही हे पहाणे जास्त महत्वाचे वाटते. पाच दहा वर्षाची प्रॉफिटॅब्लिटी आणि त्या विरुद्ध अपॉर्च्युनिटी. बुलेट ट्रेन किती काळ लांबवता येईल? जर समजा दहा वर्षानी सुरुवात केली तर पायलट रनला दोन-पाच वर्षे आणि त्या नंतर मुख्य फेज असं गणित करावं लागेल. नउ- दहा टक्के महागाई दर आणि पाच सात टक्के जीडीपी ग्रोथ असतांना ०.१ टक्का व्याजदराने कर्ज उचलणे म्हणजे लैच स्वस्त झाले. बाकीच्या देशांच्या तुलनेत आपल्या बोडक्यावर कर्ज कमी आहे. Image removed. अशा वेळेला थोडं कर्ज घेऊन ग्रोथ बूस्ट करायला हरकत नसावी. इथे ग्रोइंग फेज मध्ये मोठा क्यापेक्स दिसतो आणि ब्यालंसशीटचा कचरा होतो पण कप्याशिटी आणि फ्युचर ग्रोथ साठी बेस तयार होत असतो. त्याचं गणित मांडण अजूनच अवघड होतं. इथे आपण रिसर्चवरचा खर्च काहीच करत नाही. जीडीपी च्या तुलनेत विचार केला तर भारताचा ट्रान्स्पोर्टेशन वर होणारा खर्च खूप जास्त वाटतो. याचं कारण सद्याचं असलेलं टुकार इन्फ्रास्ट्रक्चर. ई कॉमर्स कंपन्यांना कुरिअर्सचं मुलभूत इन्फ्रास्ट्रक्चर नसल्याने त्या भागावर बराच खर्च करावा लागलेला. हे एका सीईओ कडून प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. आपले ट्रक ड्रायव्हर अमेरिकन-युरोपिअन ट्रक ड्रायव्हरच्या तुलनेत दिवसाला अर्धच अंतर कापत आहेत. एकंदर बेसिक ट्रान्सपोर्ट आणि अपग्रेडेशन झाल्यावर हा खर्च (ओपेक्स वगळून) कमी होईल पण त्याला आत्ता पर्याय नाही. कोणाला उत्साह असल्यास जपान ने जेव्हा हा प्रोजेक्ट सुरु केलेला तेव्हाची त्यांची फायनान्शिअल कंडीशन आणि आत्ताची आपली कंडीशन असा तुलनात्मक अभ्यास करून पाहावा. येती पंधरा वर्ष आपला महागाई दर आठ-नउ टक्के राहील असं समजून पुढील गणित करू. रुपयाची पर्चेसिंग पावर सहा टक्के दर वर्षी कमी होते असं पकडू. बाकी देशांमध्ये हा दर अर्थातच वेगळा असणार. जपान मध्ये एक टक्क्याच्या खाली आहे. अपने को उसका क्या? Image removed. नंबर अर्थातच प्रेडीक्टेबल नाहीयेत पण थोडा अंदाज घ्यायला पुरेसे असावेत. आज ऐंशी हजार कोटी पण जेव्हा आपला पे ब्याक सुरु होईल तेव्हा पंधरा वर्षात त्याचे मूल्य तीस पस्तीस हजार कोटी इतकंच होईल. करन्सी चेंज मुळे हे आख्ख गणित अर्थातच बदलेल. तर पंधरा वर्षानी वार्षिक हप्ता सुमारे २,३२७ कोटी रूपये इतका येईल असं म्हणतो आहोत तो महागाई दरामुळे तितका मोठा असणार नाही इतकंच या मागे सांगायचं आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा- कन्सेप्च्युअल चुका असल्यास दुरुस्त कराव्यात. माझं या संदर्भातील वाचन फारसं नाहीये. I have right to be wrong.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 12/15/2015 - 21:41 नवीन
@मंद्या: एकदम भारी विश्लेषण आहे. बरेचदा आपण आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे भविष्यातल्या गोष्टींचं मूल्यमापन करतो. परिस्थिती बदलत राहते हे कुठे तरी नजरेआड होतं. तुमच्या प्रतिसादात मात्र सगळं आकड्यांनी दाखवून दिलंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा