बुलेट ट्रेनचा अट्टाहास का?
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या भारत दौऱ्यात कालच ९८,८०५ कोटी रूपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बांधायच्या करारावर सही झाली. ९८,८०५ कोटी रूपये म्हणजे सध्याच्या भावाने सुमारे १५ बिलिअन डॉलर होतात. अन्य एका बातमीप्रमाणे बुलेट ट्रेनचा खर्च १५ बिलिअन डॉलर आहे. त्यापैकी ८०% म्हणजे १२ बिलिअन डॉलरचे कर्ज जपानची Japan International Co-operation Agency देणार आहे अशी बातमी आहे. हे कर्ज ०.१% व्याजाच्या दराने ५० वर्षे मुदतीचे असेल आणि मुद्दलाची परतफेड १५ वर्षांनंतर सुरू होणार अशी बातमी आहे.
भारत सरकारला २०% म्हणजे सुमारे २० हजार कोटी रूपये या प्रकल्पात टाकावे लागतील आणि उरलेले सुमारे ८० हजार कोटी कर्जाऊ असतील. या कर्जाचे व्याज ०.१% आहे. सरकारच्या इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०.१% इतका कमी नक्कीच नसेल विशेषत: भारत सरकारच्या बॉंडवर ७-८% व्याजाचा दर आहे हे लक्षात घेता. तरीही आकडेमोडीच्या सोयीसाठी इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०% आहे आणि व्याजाचा दर ०.१% आहे असे समजू.
या बातम्या वाचून काही प्रश्न माझ्यापुढे पडले आहेत.
१. सुरवातीचे १५ वर्ष ८० हजार कोटींवरील व्याज म्हणजे ८० हजार कोटी गुणिले ०.१% = ८० कोटी रूपये द्यावे लागेल. ती रक्कम विशेष मोठी नाही. त्यानंतर कर्जाची एकूण ३५ वर्षात परतफेड करायची आहे. अशा पायाभूत सोयींसाठीच्या प्रकल्पावरील कर्जाची परतफेड बहुतांश वेळा बलूनिंग (सुरवातीला कमी आणि जशी वर्षे जातात त्याप्रमाणे जास्त) असते. या परतफेडीचे आकडे याक्षणी माझ्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी ३५ वार्षिक हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड होईल असे गृहित धरू. वार्षिक हप्ता सुमारे २,३२७ कोटी रूपये इतका येईल. प्रत्यक्ष हप्ता सुरवातीला २,३२७ कोटींपेक्षा कमी आणि नंतर जास्त असेल. म्हणजे बुलेट ट्रेनचे उत्पन्न दिवसाला २,३२७ कोटी भागिले ३६५ बरोबर ६.३८ कोटी रूपये असेल आणि बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तरच बुलेट ट्रेन वार्षिक हत्प्याला लागतील तितके पैसे उभे करू शकेल.
२. आज मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुमारे २५ रेल्वेगाड्या दररोज धावतात. यात अहमदाबादपर्यंत जाणाऱ्या आणि अहमदाबादमार्गे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जाणाऱ्या गाड्यांचा समावेश होतो. मुंबई-अहमदाबाद रेल्वे प्रवासाला आज ८-९ तास लागतात. तर त्याच प्रवासाला विमान सव्वा तास (आणि चेकीन टाईम इत्यादी धरून २ तास घेते). जर बुलेट ट्रेन दोन तासात अहमदाबादला पोहोचवणार असेल तर त्या ट्रेनचा Target Group सध्या विमानाने प्रवास करणारे प्रवासीच असतील-- सध्या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी नव्हे.
सध्या मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर २१ विनाथांबा विमाने दररोज उडतात. एका विमानात २०० प्रवासी असे धरले तर सगळी विमाने १००% भरली तर ४,२०० प्रवासी दररोज विमानाने मुंबई ते अहमदाबाद प्रवास करतात. अर्थातच दररोज सगळी विमाने १००% भरत नसतात. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी दररोज ४,००० प्रवासी प्रवास करतात असे समजू. इथे समजते की २०११-१२ ते २०१२-१३ या काळात देशातील सर्व विमानतळावर मिळून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे ४% ने घट झाली होती. AAI च्या संकेतस्थळावर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही मिळतील. ते करायला याक्षणी वेळ नाही. चर्चेत इतर मुद्दे आले आणि त्यामुळे गरज लागली तर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही तपासून सांगतो. संपूर्ण देशात त्या एका वर्षात डोमेस्टिक प्रवाशांच्या संख्येत ४% घट झाली असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा कमी असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा जास्त असेल. उदाहरणाच्या सोयीसाठी आपण असे समजू की पुढील १५ वर्षात मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट होईल-- म्हणजे दर वर्षी सुमारे ४.७३% ने प्रवासी संख्या वाढेल. म्हणजे १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद प्रवास करू इच्छिणारे दररोज ८००० प्रवासी असतील. तितकेच प्रवासी उलट दिशेनेही प्रवास करतील असे गृहित धरू. म्हणजे दररोज १६,००० प्रवासी मुंबई-अहमदाबाद मार्गावर विमानाने प्रवास करू इच्छितील असे गृहित धरू.
३. आज प्रवासाच्या एक दिवस आधी विमानाचे तिकिट विकत घेतले तर ते ४,००० रूपयांपासून उपलब्ध आहे. पुढील १५ वर्षे दरवर्षी सुमारे ७.५% ने तिकिटांचे दर वाढतील असे गृहित धरले तर आणखी १५ वर्षांनी ते तिप्पट म्हणजे १२,००० रूपयांपासून तिकिटे उपलब्ध होतील. आणि अर्थातच तिकिटे १०-१५ दिवस आधी विकत घेतल्यास ती आणखी स्वस्तही मिळतीलच. आज १५ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास ते २,००० रूपयांना उपलब्ध आहे. म्हणजे १ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास जितके पैसे मोजावे लागतील त्याच्या अर्धी रक्कम!! हेच गुणोत्तर १५ वर्षांनीही राहिल असे गृहित धरले तर तिकिटे ६ ते १२ हजार रूपयांमध्ये मिळतील. सरासरी तिकिटाची किंमत १० हजार रूपये समजू.
म्हणजेच आणखी १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद विमान प्रवासासाठी सर्व प्रवासी दररोज १६ हजार गुणिले १० हजार बरोबर १६ कोटी रूपये खर्च करतील. यातही किती गृहितके आहेत हे वर आपण बघितलेच. बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तर वार्षिक हप्त्याला लागतील तितके पैसे उभे करायला दररोज ६.३८ कोटी रूपये इतके उत्पन्न बुलेट ट्रेनला मिळायला हवे. आणि अर्थातच बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य नक्कीच नसणार. बुलेट ट्रेनला अगदी ४०% फायदा होणार (तिकिटांमधून मिळणारे उत्पन्न वजा Operating Costs) असे धरले तरी बुलेट ट्रेनचे दररोजचे उत्पन्न ६.३८ भागिले ४०% बरोबर १५.९५ कोटी रूपये हवे.
याचाच अर्थ अन्यथा विमानाने प्रवास केला असता त्या सगळ्या प्रवाशांना बुलेट ट्रेनने आपल्याकडे आकर्षित करायला हवे. विमानापेक्षा जास्त तिकिट बुलेट ट्रेन ठेऊही शकणार नाही. आणि बुलेट ट्रेनला अंडरकट करायला विमानकंपन्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर तिकिट कमी ठेऊन प्रवासी बुलेट ट्रेनकडे वळणार नाहीत याची काळजी घेतीलच.
या सगळ्या गणितामागे किती liberal गृहितके घेतली आहेत हे समजून येईलच. एक तर दरवर्षी ४.७३% ने पुढील १५ वर्षे प्रवासीसंख्या वाढेल हे प्रचंड धाडसी गृहितक आहे. तसेच प्रत्येक विमानात ४०००/४२०० = ९५% प्रवासी भरलेले असतात हे गृहित धरलेले आहे. प्रत्यक्षात हा आकडा सरासरी ८०% च्या आसपास असतो. आणि मुख्य म्हणजे Return on Equity ०% धरला आहे. प्रत्यक्षात तो ७-८% असेल. तेव्हा ही बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती तर होणार नाही ही शंका वाटते.
अशाप्रकारच्या प्रकल्पात अनेक प्रकारचे इतर फायदे (externalities) असतात. प्रदूषण कदाचित काही प्रमाणात कमी होईल.त्या व्यतिरिक्त आणखी कुठले फायदे बुलेट ट्रेनने होतील यावर बराच विचार केला. पण ते फायदे सापडले नाहीत.
मला वाटते की बुलेट ट्रेनवर खर्च करण्यापेक्षा प्राधान्याने हाती घेण्याजोगे इतर अनेक पायाभूत प्रकल्प आहेत. ५०० किलोमीटर अंतरासाठी सुमारे १ लाख कोटी म्हणजे किलोमीटरला २०० कोटी इतका प्रचंड खर्च या प्रकल्पात आहे. त्यामानाने रस्ते दर किलोमीटरमागे ६ ते ६.५ कोटी (आणि डोंगरदऱ्या असतील तर थोडे अधिक-- मुंबई ते अहमदाबाद मार्गावर तोपण प्रश्न नाही) इतका खर्च येतो. प्रवासासाठी वेळेची बचत म्हणाल तर ती पण फार होताना दिसत नाही. कदाचित विमानप्रवासाला लागणारा वेळ आणि बुलेट ट्रेनला लागणारा वेळ यात विशेष फरक असेल असे दिसतही नाही. वर्तमानपत्रातील सर्व बातम्या तरी मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ २ तास होईल असेच म्हणत आहेत. विमानालाही (चेकीन टाईम वगैरे धरून) तितकाच वेळ लागतो की.
बुलेट ट्रेनचा अट्टाहास का लावला जात आहे हेच अजून मला तरी समजलेले नाही. ज्या बी.के.सी मध्ये बुलेट ट्रेनचे स्टेशन होणार असे म्हटले जात आहे त्या बी.के.सी मध्येच संध्याकाळी वाहतुकीची किती कोंडी होते हे त्या भागात दररोज ऑफिसला जाणारा कोणीही सांगू शकेल. मग या समस्या आधी सोडविल्या जाणे अधिक महत्वाचे नाही का? मुंबईतील बंदरे (मुंबई आणि उरण) येथून मालगाड्यांना प्रवासी रेल्वेगाड्यांमुळे बाजूला टाकले जाते आणि त्यामुळे मुंबई ते दिल्ली या प्रवासासाठी मालगाड्यांना काही दिवस लागतात. त्यामुळे मुंबई ते दिल्ली या मार्गावर केवळ मालगाड्याच जाऊ शकतील असा Dedicated Freight Corridor करणे, Delhi-Mumbai Indistrial Corridor वगैरे कामांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेनचा मुद्दा ऐरणीवर का आणला जात आहे हे समजण्यापलीकडचे आहे.
माझ्या हातून काही मुद्दे निसटत आहेत का? या विषयावर साधकबाधक चर्चा व्हावी-- विशेषत: मोदीभक्त विरूध्द मोदीद्वेष्टे असे स्वरूप या चर्चेला न आले तर फारच उत्तम. मिपावरील जाणकारांचे याविषयी काय मत आहे?
💬 प्रतिसाद
(269)
अ
अभिजित - १
Fri, 01/08/2016 - 07:30
नवीन
http://www.dnaindia.com/money/report-mumbai-ahmedabad-bullet-train-may-run-on-elevated-corridor-cost-to-rise-by-rs-10000-crore-२१६३४५७
Mumbai-Ahmedabad bullet train elevated corridor to increase cost by Rs 10,000 crore
Date published: Friday, 8 January 2016 - 11:10am IST | Place: Mumbai | Agency: PTI
फक्त १० हजार कोटी ना ? हुं .. काय फरक पडतो ? अशाच बातम्या , बुलेट ट्रेन खर्च वाढीच्या , वेळो वेळी वाचायची सवय लावून घेऊया !!
मैने एक बार ठाण लि तो फिर मै खुद कि भी नाही सुनता !! - ओळख पाहू कोण ?
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 01/09/2016 - 15:38
नवीन
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सोबत रेल्वेच्या इतर प्रकल्प जसे सेमी फास्ट ट्रेन्स म्हणजे १५० च्या स्पीड ने जाणार्या आणि इतर प्रकल्पांना कोणी आडकाठी आणली नाही आहे ते सुद्धा होतच आहे. बुलेट ट्रेन साठी चीनी तंत्राञान स्वस्त होते पण भारताने एवढी मोठी गुंतवणूक चीन च्या घश्यात घालू नये ह्या साठीच जपान ने तंत्राञान सोबत कर्ज अशी अभिनव योजना भारतापुढे ठेवली व भारताने ती मान्य केली
ह्याचा अर्थ असा कि एवढे मोठे कर्ज जपान ने भारताला बुलेट ट्रेन्स साठीच दिले.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 01/09/2016 - 15:50
नवीन
जपानी माध्यमांच्या नजरेतून भारत व जपान चा बुलेट करार
त्यांची वैशिष्ट्ये
इतर परदेशी माध्यमांच्या नजरेतून हा करार
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Fri, 02/19/2016 - 17:06
नवीन
बुलेट ट्रेन सध्या नको, ‘मेट्रो मॅन’ डॉ. ई.श्रीधरन
‘मेट्रो मॅन’ डॉ. ई.श्रीधरन यांचे मत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी सध्या त्याची गरज नाही. उलट, भारतीय रेल्वेला तंत्रज्ञान, प्रवाशांची सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या पातळीवर सक्षम करावे. कालांतराने बुलेट ट्रेनचा विचार करावा, असे मत ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांनी व्यक्त केले.
खास प्रतिनिधी, नागपूर | February 19, 2016 1:04 AM
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Fri, 02/19/2016 - 17:10
नवीन
रिअल इस्टेट मात्र वरती येईल खूप. या नवीन स्टेशन च्या जवळ. लोढा ने एव्हाना जागा घेऊन पण ठेवल्या असतील. काय माहित ? आणि मुंबई ला खाली दाबण्याची संधी गुज्जू लोकांना. इथले शेअर मार्केट, हिरे , आणि इतर मोठे धंदे तिकडे नेउन.
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Sat, 02/20/2016 - 14:19
नवीन
हे कुणी सांगितल हि नेहमीची बोंब आणि गुज्जु
गेलेतर जाउदे तुम्हीकरा नवीन चालु हाकानाका
आणि करा प्रगती का आपण फक्त मुजरा,माज,
छाती,मनगट एवढच करायच
ती व्यापारी लोक फायदा असेल तिकडेच जाणार
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
गुरुवार, 03/17/2016 - 11:42
नवीन
मग कायमचे तिकडे जा ना . इथे थांबूच नका. पण धंदा करायला गुजरात आणि मौज मज करायला मुंबई हा प्रकार नको. जो मोदी करू बघत आहेत. भारतीय रेल्वेचा बळी देऊन.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 03/17/2016 - 22:04
नवीन
विनोद करत नसाल तर हे बळी प्रकरण समजवुन सांगा ना प्लीज. प्रपोज्ड बुलेट ट्रेनमुळे रेल्वेचा बळी नेमका कसा घेणार आहेत मोदि?
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Sat, 03/19/2016 - 09:18
नवीन
अर्धवट राव तुमच्या आकलन शक्तीच्या बाहेरचे आहे ते. सोडून द्या. जर का हि ट्रेन झालीच तर ( खूप कठीण आहे ते म्हणा ) .. पण समजू या झाली .. तर तिचा तोटा भरून काढायला लोकल चे भाडे .. ठाणे - CST - २१५ रु. वन वे फक्त , बाकी सगळी पण याच स्तरावर , भरायची तयारी ठेवा.
नक्की बळी कोण ? बाकी भारतीय ट्रेन का उपनगरी ट्रेन का फक्त ट्रेन प्रवासी . इ. इ. फालतू काथ्याकुट करायची माझी इच्छा नाही. तुम्ही करा.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 03/19/2016 - 20:29
नवीन
विनोद धड नाहि करता आला तर आपण विनोद करतोय असं बोंबलायचं तरी. काथ्याकुट करायला आड्यात नसेल काहि, निदान पोहर्यातलं तरी वापरा. कळु दे कि तुमची आकलनशक्ती (असेल तर)
- Log in or register to post comments
म
मैत्र
Fri, 02/19/2016 - 18:02
नवीन
मेट्रो मॅन ई श्रीधरन यांचं मत वाचलं आणि या चर्चेत टाकावं असं वाटलं पण धागा शोधून शिळ्या कढीला उत कशाला असा विचार केला.
बाकी मुंबई आणि उपनगरी रेल्वे पलिकडे भारत आणि प्रचंड मोठी भारतीय रेल आहे.
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Railways-to-launch-new-projects-worth-Rs-10000-crore-during-fortnight-programme/articleshow/47531810.cms
http://www.thebetterindia.com/46805/indian-railways-projects/
http://www.financialexpress.com/article/budget-2016/indian-railways-commissions-advanced-signalling-system-for-khurja-railway-station-irctc-co-in/213482/
मुख्यतः मार्ग वाढवण्याचे / अतिरिक्त ट्रॅक टाकण्याचे / अद्ययावत सिग्नल यंत्रणा इ. स्वरुपाच्या प्रोजेक्टवर भर दिसतो आहे. हे नक्कीच चांगले आहे. या वेळी स्वस्त कर्ज मिळते आहे म्हणून बुलेट ट्रेन करावी का हा मुद्दा ओपन आहे.
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Fri, 02/19/2016 - 18:15
नवीन
एकदम मान्य. पण बुलेट ट्रेन मुंबई मध्ये करायचे स्वप्न आहे मोदी साहेबांचे. हे म्हणजे भुके कंगाल माणसाला ३०३ / विटा एक्स जबरदस्तीने देण्या सारखे आहे हो.
इथे मुंबई मध्ये रोज ट्रेन किती लोकांचे बळी घेते ते माहित आहे ना ? कि मला काय त्याचे ?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 02/19/2016 - 20:43
नवीन
याचं कारण म्हणजे अशा प्रयोगांना मुंबईशिवाय पर्याय नाहि.
अजीबात नाहि. बुलेट ट्रेन जर फायद्याचा धंदा करु शकेल तर ते केवळ मुंबईत.
बुलेट ट्रेन प्रॉजेक्टचा झालाच तर फायदाच होईल उर्वरीत रेल्वे सिस्टीमला... नुकसान तर नक्कीच होणार नाहि.
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
गुरुवार, 03/17/2016 - 16:19
नवीन
बुलेट ट्रेन प्रॉजेक्टचा झालाच तर फायदाच होईल उर्वरीत रेल्वे सिस्टीमला... नुकसान तर नक्कीच होणार नाहि.
कसे काय???
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 03/17/2016 - 22:09
नवीन
कशाबद्दल विचारताय? नुकसान न होण्याबद्दल कि फायद्याबद्दल? फायदा म्हणाल तर शक्य तितक्या लवकर रेल्वेला तिचा २जी-३जी-४जी उत्कर्ष साधायचाच असेल तर शुभस्य शीघ्रम. नुकसान होणार नाहि कारण बुलेट ट्रेन उर्वरीत रेल्वेच्या ताटातलं अन्न स्वतःकडे वळवत नाहि (थोडंफार शफलींग होईल, एक्स्पेक्टेड आहे)
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 03/18/2016 - 06:45
नवीन
मुंबै-अहमदाबाद बुलेट ट्रेनची आयडीआ कोणी आणि कधी आणली ते गूगल करा.
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Wed, 04/20/2016 - 22:52
नवीन
यातले रुळ ओलांडताना रेल्वेखाली येणारे जास्त आहेत
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
गुरुवार, 03/17/2016 - 11:46
नवीन
२४ तासांत १७ लोकल प्रवाशांचा बळी
Maharashtra Times| Mar 17, 2016, 02.55 PM ईष्ट
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/17-killed-on-rly-tracks-in-one-day-6-of-them-trespassers/articleshow/51440506.cms
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 03/17/2016 - 22:10
नवीन
बुलेट ट्रेन लोकलला धडकल्याची बातमी दिसत नाहि कुठे.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 03/17/2016 - 12:33
नवीन
बुलेट ट्रेन मधे बसून प्रतिसाद देतोय.
आपल्याला हवीच बुट्रे....!
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Tue, 04/19/2016 - 14:20
नवीन
http://www.loksatta.com/desh-videsh-news/mumbai-ahmedabad-bullet-train-will-need-to-make-100-trips-a-day-to-be-viable-iim-study-1228575/
दिवसाला १०० फेऱ्या झाल्या तरच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन व्यवहार्य. भारताला हे कर्ज ५० वर्षात फेडायचे आहे.
पीटीआय, अहमदाबाद | April 18, 2016 11:32 AM
- नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला व्यवहार्यतेच्या मुद्द्यावरून ब्रेक लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुलेट ट्रेनला फायद्यात चालवायचे असेल तर भारतीय व्यवस्थापन संस्थेने (आयआयएम) काही पर्याय अहवालाद्वारे रेल्वेसमोर ठेवले आहेत. हे पर्याय पाहता बुलेट ट्रेन रूळांवरून धावणे कितपत व्यवहार्य ठरेल, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या अहवालानुसार रेल्वेला बुलेट ट्रेन फायद्यात चालवायची असेल तर दिवसाला किमान ८८ हजार प्रवासी वाहून न्यावे लागतील अथवा बुलेट ट्रेनने दिवसाला १०० फेऱ्या मारल्या पाहिजेत. ‘डेडिकेटेड हायस्पीड रेल्वे नेटवर्कस इन इंडिया: इश्यूज इन डेव्हलपमेंट’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 04/19/2016 - 15:37
नवीन
१५ वर्षांनी तिकीटाचा दर १५०० रूपये ?? इतका कमी दर गृहीत का धरलाय ?
- Log in or register to post comments
र
रॉजरमूर
Tue, 04/19/2016 - 17:31
नवीन
तो दर म्हणजे फक्त गाजर आहे लोकांना भूलवायला ,लोकांचा ह्या प्रोजेक्टला विरोध होऊ नये म्हणून ,
सरकारवर कधी विश्वास ठेवायचा असतो का ? फारच भाबडे बुवा तुम्ही .
समजा ती ट्रेन झालीच तर त्यावेळी तिचे वेगळे महामंडळ वगैरे करतील दर ठरवण्याचा अधिकार त्यांचा असेल .सरकार हात झटकून मोकळे होईल .
तसं तर
मुंबई मेट्रोत पण १० रु.त प्रवास करता येईल असे गाजर दाखवलं होते,
किती दिवस १० रु. मध्ये प्रवास केला लोकांनी?
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Tue, 04/19/2016 - 19:24
नवीन
मेट्रो व्यवहार्य नाही.
तितक्याच पैशात विमानप्रवास होइइल.
नवे रूळ , नवे रेल्वेचे धूड यावर खर्च न करता विमानप्रवास सुरु करावेत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 04/21/2016 - 09:03
नवीन
मोगा खान
जुलै १६ मधल्या बुधवारी सर्वात स्वस्त विमानाचे तिकीट १५९० रुपये जालावर आहे त्यात अजून २०० रुपये CONVENEINCE CHARGES आहेत ( कसले ते माहित नाही) तरीही जेंव्हा कच्च्या तेलाचे दर निम्न असताना हे दर आहेत तर १५ वर्षांनी विमानाचे हेच दर असतील हे म्हणणे चूक आहे. शिवाय तेवढ्याच वेळात तुम्ही पोहोचत असलात तर विमानाने एवढेच सामान घ्या, ते सुद्धा १ तास अगोदर चेक इन करा, स्वतःची पूर्ण तपासणी करा हि कटकट आहेच
तेंव्हा मेट्रो व्यवहार्य नाही असे म्हणणे बरोबर नाही. दिल्लीत सुद्धा मेट्रो हे श्रीमंतांचे चोचले आहेत असे म्हणणार्या कम्युनिस्ट लोकांची आता दातखीळ बसली आहे याची आठवण झाली.
- Log in or register to post comments
M
mugdhagode
गुरुवार, 04/21/2016 - 09:43
नवीन
मुम्बै अहमदाबाद ए सी स्लीपर बसने १५०० रु लागतात.
विमानाने गेल्याच आठवड्यात १८०० रुत आलो. बुकिंग १५ दिवस आधी केले होते. लगेज ७ किलो. सँडविच पेप्सीचे २५० अलग.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 04/21/2016 - 08:55
नवीन
मुंबई मेट्रो १० रुपये तिकीट हे "सुरुवातीचे" दर आहेत असे स्पष्ट म्हटले होते.
इतके कमी दर असतील हि अपेक्षा करणेच चुकीचे आहे
घाटकोपर ते अंधेरी बसचेच तिकीट २५ रुपये आहे.टिनपाट रिक्षावाला सुद्धा आत बसण्याचे १८ रुपये घेतो
तर मेट्रो ने वातानुकुलीत प्रवास करण्यासाठी दहा रुपये अपेक्षा करणे हि चूकच गोष्ट आह.
दर वाजवी असावेत. उगाच सवंग लोकप्रियतेच्या नादाला लागणे चूकच आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 04/19/2016 - 18:16
नवीन
ही बातमी दिल्याबद्दल धन्यवाद.
प्राध्यापक रघुराम यांनी नक्की कोणती गृहितके आधारभूत धरली आहेत हे तो अहवाल वाचल्यावरच समजेल. रघुराम हे पायाभूत क्षेत्रातले मान्यवर आहेत. किंबहुना या लेखासाठी मी पाकिटाच्या मागे आकडेमोड केली (back of the envelope) त्याची प्रेरणा रघुराम यांच्याच क्लासमधून होती.
बुलेट ट्रेन फायद्यात चालवायची असेल तर दिवसाला १०० बुलेट ट्रेन सोडाव्या लागतील हे याच चर्चेतील एका प्रतिसादात म्हटले होते :) तेव्हा I am feeling vindicated :)
इकॉनॉमिक टाईम्समधील बातमीनुसार रघुराम यांनी externalities चा उल्लेख केला आहे. त्याविषयी या अहवालात काही लिहिले आहे का हे तपासून बघायला हवे. मला वाटते की या externalities चा अजिबात उल्लेख नसेल तर तो अहवाल अपूर्णच असेल.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 04/21/2016 - 04:43
नवीन
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन२१ कि.मी सागरी बोगद्यातून
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Odum Unakithu... ;) :- Yaaruda Mahesh
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
गुरुवार, 04/21/2016 - 05:42
नवीन
वरती बुलेट ट्रेन यशस्वी (अर्थदृष्ट्या) करायला दिवसाच्या 100 फेऱ्या की 88,000 प्रवासी हे आकड़े दिले आहेत ते पाहून मला एक अजुन प्रश्न पडला आहे , तो म्हणजे फीडर सर्विसेजचा एक शक्यता म्हणून जर आपण दिवसाला किमान 88,000 प्रवासी प्रवास करतील हे ग्राह्य धरले तरी त्या सकल 88,000 कस्टमर्स ना बीकेसी मधे बुलेट ट्रेन स्टेशन पर्यंत पोचण्यात जी काही सोय/गैरसोय होईल तो एक महत्वाचा डीसाइडिंग फॅक्टर असेल असे वाटते. प्रचंड आकार अन वस्तुमान असलेल्या उदाहरण म्हणून पाहता येण्यालायक प्रकल्प म्हणजे DMRC उर्फ़ दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन हा होय , दिल्ली मेट्रो सक्सेसफुल आहे कारण त्यांनी फीडर बसेस वर सुद्धा लक्ष दिले होते. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन चा ह्या बाबतीत काही रोड मॅप आहे का??
अहमदाबाद बद्दल तर काही कल्पना नाही पण मुंबई मधे ट्रॅफिक जॅम म्हणजे ताप असतो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 04/21/2016 - 08:46
नवीन
नानासाहेब
Thane handles as many as 6.54 lakh passengers daily. Every day, more than 1,000 trains pass through Thane, which has 10 platforms catering to two corridors each for the fast and slow tracks and the Trans-harbour network. As many as 55-60 long distance trains halt at the station. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Thane-is-busiest-railway-station-in-Mumbai/articleshow/20129363.cms
या तुलनेत ८८ हजार म्हणजे फार नाही असे वाटते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 04/21/2016 - 08:50
नवीन
From a modest beginning as a two-platform terminus about two decades ago, LTT (also known as Kurla Terminus) quickly leapfrogged Dadar and Bandra as one of the busiest railway stations on the Central Railway. Lack of space – on an average 80,000 commuters use the station daily हि २०१२ ची स्थिती आहे. म्हणजे आज त्यात नक्कीच बरीच वाढ झालेली असेल. तेंव्हा प्रवासी संख्या ८८००० काही फार जास्त वाटत नाही.
http://epaper.timesofindia.com/Default/Scripting/ArticleWin.asp?From=Archive&Source=Page&Skin=MIRRORNEW&BaseHref=MMIR/2012/11/27&PageLabel=10&EntityId=Ar01000&ViewMode=HTML
- Log in or register to post comments
M
mugdhagode
गुरुवार, 04/21/2016 - 09:38
नवीन
ते बुलेट ट्रेन स्टेशनबद्द्ळ बोलत नाही आहेत. जवळच्या कुर्ला घाटकोपर सांताक्रुज स्टेशनातुन बीकेसीत असलेल्या बुलेट ट्रेन स्टेशनात रोज लाखभर लोक रिक्षा ट्याक्सी कार बस यातून जाणार. ते त्या ट्राफिकबद्दल बोलत आहेत.
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
गुरुवार, 04/21/2016 - 09:32
नवीन
सरजी मी मेन स्टेशन हैंडलिंग कैपेसिटी किंवा इंफ्रा बद्दल बोलत नाहीये तर फीडर सर्विसेज बद्दल बोलतोय. If u know what I mean sir. :)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 04/22/2016 - 20:04
नवीन
अर्धवटराव ५ वर्षांनी बी.एम.डब्ल्यु अफोर्ड करेल कि नाहि याचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा त्याने ५ वर्षाने बी.एम.डब्ल्यु घ्यावीच याचे प्लान करावे. चटणी-भाकरीचं गावजेवण देण्याची सोय होतपर्यंत वाट बघण्याऐवजी २ वर्षाने लाडुजिलबीची पंगत कशी बसेल याचं प्लॅनींग करावं.
१५ वर्षांत चीन आखाती देशातला कदाचीत सर्वात मोठा तेल आयातदार असेल. दक्षीण चीन समुद्रात ड्रॅगनने दात खुपसले असतील. त्याच्याच शक्तीवर पाकिस्तान पुष्ट झाला असेल. आज बलवान असणारे देश अधिक बलवान झाले असतील. अशावेळी भारताने १ लाख कोटींच्या कर्जाची काळजी करावी हे फारच दयनीय असेल. १५ वर्षानंतर एक बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती म्हणुन पस्तावा करण्याऐवजी अगोदरच अशा १० बुलेटट्रेन का सुरु केल्या नाहित याचा पस्तावा व्हावा, अशी परिस्थिती निर्माण करावी भारताने.
आपण हे मेण्टेनन्स मोड ची मेण्टॅलिटी सोडुन डेव्हलपमेण्ट मोड चं धाडस जितक्या लवकर अंगी बाणवु तेव्हढं चांगलं. तसं करायचं नसल्यास हा लोकशाहीतुन समाजहीत वगैरे फार्स बंद करुन रहुल गांधी वा तत्सम नेत्याच्या हाती कम्युनिस्टांच्या टेकुवर उभी केलेली सत्ता द्यावी व जनतेने चारा खायला मोकळं व्हावं.
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Sat, 04/23/2016 - 03:10
नवीन
वेगवान सेवांचं जाळं हवेच आहे.
पण बु ट्रे पेक्षा विमानं परवडतील.
...
नेहरु गांधींच्यामुळे आमचा देश समर्थ बनुन तुम्ही आम्ही दिवसभर राबुन हफिसात चटणीभाकर खातो व रविवारी घरच्यांबरोबर लाडुजिलेबी खातो.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 04/23/2016 - 06:15
नवीन
अंत्योदय योजनेअंतर्गत पशुपालनाकरता सरकारी अनुदानं देऊन घोडागाडीने प्रवास करणे सर्वात किफायतशीर उपाय आहे. उगाच विमानांचा खर्च करु नये.
चटणी भाकर देऊन हाफीसात राबवलं जाणं हे देखील गुलामीचं प्रतीक आहे. कल्याणकारी राज्यात हे चालणार नाहि. गांधी नेहरुंना हलवाई बनवुन मिठाई विकायला लावणार्या मानसीकतेचा तीव्र निषेध.
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Sat, 04/23/2016 - 06:26
नवीन
भाजप्याच्या लोकानी घोड्याचे पाय मोडले तर लोकांची पंचाइत होइल. विमानेच बरी. वैदिक विमानसुद्धा चालेल.
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
Sat, 04/23/2016 - 09:00
नवीन
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 04/23/2016 - 18:00
नवीन
तुम्ही कशाला काळजी करताय कुणाचा पाय मोडण्याची? आणि वैदीक विमानांना देखील जपानी अर्थसहाय्यने मेक इन इंडीयाअंतर्गत डेव्हलप करायचा प्रोग्राम आहे युपीए सरकारचा.
- Log in or register to post comments
श
शलभ
Sat, 04/23/2016 - 11:41
नवीन
+१. हा धागा पहिल्यांदा वाचल्यावर असच काही वाटलं होतं. पण शब्दात मांडता येत नव्हते. हा तर पायलट प्रोजेक्ट असेल. पुढे पूर्ण देशभरात बुलेट ट्रेनचं जाळे होईल २०५०-६० पर्यंत.
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Sun, 04/24/2016 - 19:17
नवीन
चीन / अमेरिका या लोकांशी बरोबरी करण्याची दिवास्वप्ने उगाच बघू नका. जर का काही natural calamity येउन हे देश खाली गेले तरच आपण बरोबरी करू शकतो. नाहीतर नाही.
बाबू शाही / नोकरदार वर्गाचा भ्रष्टाचार / सर्वसामान्य भारतीय लोक - मला काय त्याचे mentality / सरकारी अधिकारी आणि नेते यांचा काहीही निर्णय न घेण्याचा स्वभाव .
चीन मधल्या अति सामान्य माणसाचे पण देशावर अफाट प्रेम असते. आहे का भारतीय लोकांचे असे ? तुम्हीच विचार करा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 04/24/2016 - 20:17
नवीन
मग काय. आहेच तर? फक्त भारतीय मुस्लिमांचे देशावर प्रेम नाही, तेवढे सोडून प्रत्येक नागरिकाचे देशावर अखंड प्रेम आहे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 04/25/2016 - 07:59
नवीन
प्रत्येक प्रगत देश हे सगळं पचवुनच पुढे गेला आहे. त्यात काहि नवीन नाहि. शिवाय, भारताला कोणाची बरोबरी वगैरे करण्याचं कारण नाहि. आपलं हीत साधावं बस.
आणि भारतीयांचे भारतावर प्रेम आहेच. गरज प्रेमाची नाहि तर भारताची काळजी घेण्याची आहे.
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
गुरुवार, 07/21/2016 - 17:52
नवीन
इतर देशांना ते प्रश्न सोडवायची इच्छा होती म्हणून ते सुटले . अशीच जादूची कोणती तरी कांडी फिरवून नाही.
आपल्या देशाला ( थोडक्यात राज्य कर्ते ) करप्शन , बाबूशाही , लोकांवर होत असलेले अन्याय .. कोणताही प्रश्न सोडवायची इच्छा अजिबात नाही हे 100 टक्के सत्य .. अजून 100 वर्षांनी पण हे प्रश्न असेच असणार आहेत. ज्यांना या प्रश्न पासून मुक्तता हवी असेल , त्यांनी देश सोडून जाणे हाच एकमेव पर्याय आहे.
आता जर का " यदा यदा हि धर्मस्य ..." झाले तर आणि फक्त तरच हा प्रश्न सुटेल नाहीतर कदापि नाही ..
चीनमधील केएफसी, ऍपल आऊटलेट्सवर हल्ला...
गुरुवार, 21 जुलै 2016 - 02:25 PM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=WA5R9T
बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांच्या मालकीहक्कावरुन चीनच्या फीलिपीन्स व इतर देशांशी असलेल्या वादचा फटका केफसी व ऍपल यांसारख्या कंपन्यांच्या चीनमधील शाखांस बसला आहे!
"चिनी जनता विशेषत: चिनी तरुण अत्यंत राष्ट्रभक्त व राष्ट्रवादी आहेत. केएफसी व ऍपल यांचा अमेरिकेशी अर्थातच घनिष्ठ संबंध आहे. तेव्हा येथील जनसमूहाच्या आवाक्यात असलेल्या केएएफसी व ऍपल आऊटलेट्सविरोधात हे तरुण हिंसक आंदोलन करत आहेत,‘‘ असे चीनमधील एका संशोधन कंपनीत कार्यरत असलेल्या जेम्स रॉय यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले.
साऊथ चायना सी प्रश्न बहुतेक मिपा कर लोकांना माहित असेलच !! कुठलातरी बादरायण संबंध लावून चीन प्रचंड मोठा एरिया खायला बघतोय. परत apple आणि KFC यांचा काय इथे संबंध ? त्याच्या वरून हि चिनी जनता इतकी पेटली आहे.
नाहीतर भारताच्या बुडाखाली चिक्कार वेळा आगी लावून पण पाकिस्तान ची चाटायला इथले खूप लोक कायम पुढे. असो ..
पण हो .. भारतीय सैनिक नेहमीच लढाऊ असतात आणि बलिदान द्यायला मागे पुढे बघत नाहीत हे नक्की.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 07/21/2016 - 17:57
नवीन
शुभस्य शीघ्रम्. लवकर निघा. सावकाश जा. सुरक्षित पोहचा.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Fri, 07/22/2016 - 07:43
नवीन
असला प्रकार राष्ट्रवाद नव्हे तर भिकारचोटपणा आहे. अमेरिकेने कुरापत काढली (असेल तर) असताना, अमेरिकेशी टक्कर घ्यायला जीएमडी नाही. म्हणून अमेरिकन दुकानांवर हल्ले करणे, हा राष्ट्रवाद असूच शकत नाही.
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
गुरुवार, 08/04/2016 - 18:21
नवीन
जीएमडी कोनात नाही ते दिसतेच आहे.
CHina is doing Naval exercises. ALso they are talking about closing Air traffic also ...
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 08/05/2016 - 01:59
नवीन
मालक, you are grossly uninformed and ignorant of robust Indian adventures and ventures in the south china sea, perhaps u find peace only in thrashing your own country.असो!
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 07/22/2016 - 08:20
नवीन
हेच चाईनीज लोक apple फोन घ्यायला रांगा लावतात , किडन्या विकतात.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »