Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्द झाले मोती.. - २

ग
गणेशा
Sat, 05/09/2020 - 13:55
💬 240 प्रतिसाद
शब्द झाले मोती..१ मागील धाग्याबद्दल : या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले. नियम : तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही. उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..

प्रतिक्रिया द्या
177646 वाचन

💬 प्रतिसाद (240)
ग
गणेशा Sat, 05/09/2020 - 14:23 नवीन
खरे तर लिखान बंदच आहे, आता कवितेच्या स्पर्धेला सुरुवात झाली.. आणि आमचा मित्र वल्ली याने लिहिणार का विचारले.. कविता आता लिहिताच येत नाहीत असेच वाटते.. पण लिहु म्हंटले.. पहिली कविता चांगली झाली.. पण कुठे तरी ती माझ्या अगोदरच्याच कविते प्रमाणे झाली.. नाविन्य नव्हते... मग दूसरी लिहिली.. आणि मला मी पुन्हा कविता लिहु शकतो ,अगदी वेगळी .. पहिल्या पेक्शा वेगळी असे वाटले.. आनंद वाटाला.. तेव्हड्यात चला लय लागली आहे तर, काही तरी मुली बद्दल लिहु म्हंटले, एक तर ती गावाला आहे, लॉकडाऊन मुळे मुद्दाम तिकडे पाठवलेली.. पण झाले तसेच पुन्हा लिहायला घेतले आणी शब्द सुचेनात.. बोबडे बोबडे बोल.. पासुन इवली इवली बोटे झाली पण मला काही त्यात अर्थ वाटेना.. बाबा, मुळातच हळवा असतो, आणि लेक झाल्यापासुन , तीच्या लग्ना नंतर आपले कसे होईल, असे त्याला वाटत असते.. आणि सहज लिहिताना ही कविता सुचली .. जशी सुचली तशी लिहिली.. शब्दबदल बघु नंतर सनईचे.. सूर वाजले.. दारी ------------------------------------------------------- मुलगी : गालावर.. लाजची गं.. लाली हळदीची.. काया माझी.. ओली सुखाची गं..सर ही.. आली हुरहुर.. मनी माझ्या न्हाली ||१|| वीज झडे.. आतुन गं..कोवळी कळी कळी.. श्वासांची ग बोली गालावर.. लाजची गं.. लाली हळदीची.. काया माझी.. ओली ||२|| आई: सनईचे.. सूर वाजले.. दारी || मंडपात.. आनंदाच्या.. सरी || माहेराची.. माया ही.. सारी || सासराला.. मिळेल गं.. भारी ||१|| कुंकवाची..चंद्रभागा.. दारी|| सासर तुझे..आहे गं.. पंढरी || नटली ग.. माझी लेक.. नवरी|| आस ही.. प्रेमाची गं.. सारी ||२|| सनईचे.. सूर वाजले.. दारी || मंडपात.. आनंदाच्या.. सरी || बाबा : राजा-राणी दिसता छान.. त्याला सुखाची झालर.. दूर चालली चिमणी माझी.. काळजाच्या आरपार... थेंब थेंब मोती ओला.. ओघळला गालावर.. रिते झाले गाव माझे.. रित्या झाल्या भावना दूर वाजते सनई चौघडे.. त्याला आभाळ पुरेना.. --- शब्दमेघ
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/11/2020 - 20:47 नवीन
दूर चालली चिमणी माझी.. काळजाच्या आरपार... थेंब थेंब मोती ओला.. ओघळला गालावर.. रिते झाले गाव माझे.. रित्या झाल्या भावना दूर वाजते सनई चौघडे.. त्याला आभाळ पुरेना.. इतके खरे कसे लिहू शकता आपण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
मन्या ऽ Sat, 05/09/2020 - 20:33 नवीन
प्रिय बाबांस, बाबा आज परत एकदा लहान व्हावस वाटतंय मला.. तुम्ही गर्दीत पकडलेला घट्ट हात. आपण खारुताईच्या बागेत गेल्यावर तुम्ही दिलेला झोका देताना तुम्ही "मने, ती बघ घार" अस बोलायचात. मी अजुन जोरात म्हणत खळखळुन हसायचे.. ते सारं काही अगदी कालच घडल्यासारख स्पष्ट आठवतंय मला. पण बाबा मी 'मोठी' झाल्यापासून आपल आधीसारख बोलणं च होत नाही. मला खुप गप्पा मारायच्या आहेत तुमच्यासोबत. एकदातरी जमेल का हो आपल्याला. आपल्यातली दरी मिटवायला? परत लहान होऊन मजामस्ती करायला.. एकदातरी? तुमची मांजर..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 05/09/2020 - 21:21 नवीन
बाबांचा विषय आलाय म्हणून बोलतो थोडे मनातले आधी.. 1. उरुळी कांचन ला खेडेगावात वाढलो मी.. तेंव्हा आम्ही वडलांच्या पाया पडत पण त्यांना मिठी मारणे हे म्हणजे माझ्या स्वप्नात पण नव्हते कधी कि असे वडलांना मिठी मारतात ते. हळू हळू मी मोठा झालो, वडील म्हातारे... पण काय माहीत का ते रिटायर झाल्या पासून मला त्यांना एकदा तरी मिठी मारावी वाटती.. पण संस्कृतीच्या या नियमांनी.. कि माझ्या वर बिंबवलेल्या संस्कारांनी मला ते अजून हि करता येत नाही.. पाहताना हि खुप सोप्पी गोष्ट वाटते.. पण नाही जमत.. हे शल्य घेऊन मी अजूनही जगतोय.. बारामती ला गेलो त्यांना भेटायला तरी नाही जमत... फोनवर तर मी आई बरोबरच जास्त बोलतो... त्यांच्या बरोबर मी जास्त बोलत हि नाही.. आदर होताच आणि आहे.. पण असे मनातले भाव हि दाखवता येत नाही त्याचे वाईट वाटते.. असो.. आराध्या ला, माझ्या मुलीला मात्र मी, मैत्रीण म्हणूनच वाढवणार हे नक्की... ---- 2. बाकी एक बाप म्हणून मी नक्कीच सांगतो.. बापाला त्याच्या मुली एव्हडे जगात कोणीच प्रिय नसते..लहान पणी तायडीचे खुप लाड व्हायचे.. सगळे लाड तिचेच... मग माझे भांडण व्हायचे.. आई म्हणायची तू बाप झाल्यावर कळेल तुला.. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते म्हणून लाड असतात.. मी म्हणायचो लग्नाला किती वेळ आहे, आता पासून कशाला असे लाड.. मग माझे म्हणने कधी ऐकणार? पण एक बाप झाल्यावर कळाले मला..ते काय सांगत होते ते..
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 05/10/2020 - 07:43 नवीन
वाह! हे आवडले!! स्फुट लिखाणात तुम्ही माहीर आहात!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
मन्या ऽ Sun, 05/10/2020 - 06:00 नवीन
गेल्यावर्षी १३ ऑक्टोबर ला ताईला मुलगी झाली. त्यावेळी हॉस्पिटलमधे समोरच्या बेडवर एक दादा काळजीत होता. विचारलं तर समजल तो एकटाच या सगळ्या प्रोसेस कंप्लिट करतोय मदतीला-सोबत जवळच अस कोणीच नाही.. बाळ हातात येईपर्यतचा त्याचा प्रवास! माझ्या नजरेतुन... बापजन्म! काल पाहिला मी एक बाप जन्मताना O.T. बाहेर अस्वस्थ घुटमळताना होणाऱ्या चिमुकल्या जिवासाठी तिळ तिळ तुटताना कोण म्हणतं कि मातृत्वाच्या वेदना फक्त आईलाच होतात बापालाही होतच असतात.. पण त्या त्यालाच व्यक्त करायच्या नसतात लागताच पिलाच्या येण्याची ती चाहुल बापाचे डोळेसुद्धा अश्रुमय होतात पण जगाला खंबीर आहे दाखविण्यासाठी पापणीतच दडतात आई-पिलु सुखरुप आहेत; आता एवढंच ऐकायला त्याचे कान तरसतात आणि डोळ्यांना वेध मात्र त्या जिवाचे लागतात पिलाला कुशीत घेताना त्यालाही त्यांचा नऊ मासांचा तो प्रवास आठवतो कोण रे होत लबाड अस खोट खोट दटावुन भाळावर अलगद ओठ टेकवतौ नंतर मी खंबीर आहे. असं जणु स्वतःलाच बजावत "फोन आलाय" बहाण्यान रुमबाहेर जातो ; अन् पापणीतला तो एक उनाड अश्रु त्याच्या नकळत रुमालाने टिपतो!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 05/10/2020 - 06:19 नवीन
( नावे बदलली आहेत ) ------------------------------------------------------- मेसेंजरवर मी सहसा नसतो... पण काल सहज गेलो त्यावर ... आणी काय आश्चर्य, सोनाली ..माझी कॉलेजची मैत्रीण ऑनलाईन होती. ( एफ.बी. फ्रेंड डायरेक्ट दिसतात तेथे) २००२ ला बिसीएस संपले, २००६ ला मी कंपणीत होतो तेंव्हा सोनालीशी एकदा भेट झाली होती.. बस्स. त्या नंतर आजच बोलत होतो, ९ मे २०२० ला. म्हणत होती ती आपला तिघांचा छान गृप होता.. काही आठवणी... आणि बोलता बोलता, मी सांगितले , फेब्रुवारी मध्ये मी जयाच्या कॉलेजला गेस्ट लेक्चर द्यायला गेलो होतो. भेटलो आम्ही.. जयाने च invite केले होते. त्या नंतर तीचे हे वाक्य म्हणजे ...काय बोलु ? " मला तर आता वाटते, तुम्ही दोघांनी तेंव्हा लग्न केले असते तर कीती छान झाले असते " या अश्या अचानक वाक्यावर मी हा हा हा केले उगाच.. नंतर लिहिले , चालायचेच, अजुन ही I respect her... तुझा सुद्धा करतोच.. खरेच आपला गृप छान होता. पण रात्री झोपताना मात्र डोळे ओलावले... -------------------------------------------------------------------------------------------- २००२ ला कॉलेज संपले , आणि नंतर तीचे लग्न झाले त्या नंतर मी २०१५-१६ पर्यंत तीचे नाव कधीच कोठे शोधले नाही.. की तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही.. कदाचीत यालाच प्रेम म्हणातात.. २०१५-१६ ला मित्राने मला facebook account काढुन दिले, ऑर्कुट ला माझे खुप मित्र होते, शब्दमेघ या नावाने लिहित असल्याने माझ्या खर्‍या नावाने बरेच जन ओळखत ही नव्हते.. कायम भेटणार्‍या लोकांना माहित होते.. पण ऑर्कुट संपले आणि मी सोशल साईट वरुन लांब गेलो होतो.. पण मित्राने facebook account काढले आणि मी जया ला शोधले... २०१६ ला आम्ही फोन वर बोललो. त्या नंतर या चार वर्षात दोन तीन महिन्या ने आम्ही एखादवेळेस बोलत असु.. आणि फेब. मध्ये कॉलेज ला गेस्ट लेक्चर ला गेलो मी त्यांच्या कॉलेजला.. त्या नंतर पण बोललो आम्ही.. दोघांचे ही म्हणणे होते, आपण आहे तसेच आहोत.. १८ वर्ष झाले तरी आपण इतके वर्ष भेटलो नाही.. १४ वर्षे बोललो नाही असे वाटतच नाही. ती बाहेर सोडवायला आली. उन्हात आम्ही थोड्या वेळ बोललो ... पुन्हा भेटु म्हणुन निघालो तेथुन.. छान वाटाले बस. जया अजुनही तशीच आहे, शालिन.. तीचे मन अजुनही तसेच आहे.. एखादी गोष्ट मिळाली नाही तरी तिच्याकडे मनमुराद हसण्याची कला होती, ती अजुनही जानवली.. मी मात्र उतावळा, हळवा.. आणि तीच्या भाषेत टुकार पण होतो.. पण आता ती म्हणाली तु तेंव्हा ही टुकार नव्हता.. आता ही टुकार नाही.. यातच मला आनंद आहे... खरेच हे फुलपाखराचे रंग उडुन गेले आहेत आता.. पण आठवणींचे काय .. त्या कायम राहणारच....
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 05/10/2020 - 07:46 नवीन
काय कातिल लिहाताय राव!! कलेजा तुट गया!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/11/2020 - 20:49 नवीन
जव्हेरगंज म्हणतात तसेच, कातिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
च
चांदणे संदीप Sun, 05/10/2020 - 06:41 नवीन
आज रविवार... उशीरा उठायचं असं ठरवूनच रात्री झोपलेलो. पण नेहमीप्रमाणे सकाळीच आई आणि बायको असा दोन्हीकडून गोळीबार सुरू झाल्यावर पर्याय नव्हता. अजून सूर्यही उगवलेला नव्हता. बाल्कनीतून बाहेरचा परिसर शांत आणि आल्हाददायक वाटत होता. (आजकाल बाल्कनीतच झोपतोय मी) त्या क्षणी मनात विचार आला की मी तर राजा आहे, माझे घर हे माझे साम्राज्य आहे. आणि ही आजूबाजूची राज्ये. माझ्या साम्राज्यातून मी कुठेही बघू शकतो. कितीही वेळ. आणि माझ्या साम्राज्यात हवा तसा फिरू शकतो. आणि त्या वेळेला चक्क मायमराठीने पाठ फिरवून इंग्रजी भगिनीला माझ्याकडे धाडले आणि मग इंग्रजीतून ह्या ओळी स्फुरल्या: I am the king, though, not wearing a crown ready to take another quiet day of lockdown birds are chirping and sun is rising as usual me enjoying, sitting in balcony, being casual forgotten all the pretty leisures of my life forgotten drinks, drinking tea, brought by wife time is passing, though, clocks are shutty fading the glow and charm from the beauty this phase shall pass, the mind always says for the unknown future, present always pays सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 05/10/2020 - 08:29 नवीन
सुंदर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ग
गणेशा Sun, 05/10/2020 - 10:33 नवीन
@ संदीप तुमची कविता आवडली. इंग्रजी ची पण प्रतिभा तुमच्याकडे आहे हे पाहुन छान वाटले.. ------------------------------------- मी माझा राजा, घर माझे साम्राज्य ही कल्पनाच मस्त झाली... आणि मग काय माहीत माझ्या विचारांत असे असंख्य राजे, राण्या पटकण येवून गेले.. अगदीच हेच काय.. 'चौकट राजा' हा सिनेमा आणि त्यातील एक झोका.. चुके काळजाचा ठोका.. हे गाणे सुद्धा आठवले.. ही ओळ लिहिताना मोबाईल वर गाना.कॉम वर लगेच हे गाणे लावले ही... त्याच वेळेस मला जंगलाचा राजा आठवला, मन आपले कसे ही ..कुठे ही.. कसे धावत असते नाही ? बर, जंगलाचा राज्याला आता काय वाटत असेल हे मी माझ्या मनातच अधोरेखित केले.. तो म्हणत असेल " माझ्या साम्राज्याला तु खालसा केले माणसा.. गगन भेदी इमारती बांधुन तु तुझे साम्राज्य वाढवले.. पण तु त्यात तरी आनंदी रहा.. येथे शिल्लक राहिलेल्या जंगलात मी समाधानी आहे.. तु आनंदी आहेस का ? की त्या उंच इमारतीप्रमाणे तुझा आनंद ही खोटा आहे ? "
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 05/10/2020 - 11:12 नवीन
@ मन्या (माझा फुलपाखराचे रंग प्रतिसाद लिही पर्यंत तुमचा हा प्रतिसाद आला आणि मी तो खुप नंतर पाहिला) बापजन्म कविता वाचली, अन मन माझे गेले २० जानेवारी २०१४ ला. ------------ १९ जानेवारी ला चतुर्थी होती , माझा जन्म ही चतुर्थीचाच म्हणुन माझे नाव आई ने 'गणेश' ठेवले. नंतर कधी तरी वडिलांनी सांगितले की, ते माझे नाव दत्तात्रय ठेवणार होते, नव्हे तेच ठेवले होते .. पण आई ने बदलले. दत्तात्रय चे कारण काय तर आईने मी पोटात असताना, ग्रहण काळात नवनाथ ग्रंथ वाचला होता.. हे असे झाले असते तर मिपा वर 'माझा गणेशा झाला' ह्या वाक्या ऐवजी 'माझा दत्तु झाला' ही म्हण प्रचलित झाली असती... बर, म्हणजे काही केल्या तरी कोणात्या तरी देवाचा आमच्यात नाही पण निदान आमच्या नावात प्रवेश हा ठरलेलाच होता, ( काय सांगायला जातोय आणि मी काय सांगतोय .. सांगायचे आहे बापजन्म बद्दल आणि मी माझ्याच जन्माला सांगायला लागलो, हे असेच होते मनात येइल ते लिहिताना ) ----------------------------- हा तर , १९ जानेवारी ला चतुर्थी होती, रविवार असल्याने मी मुंबई वरुन माझ्या गाडीने नाव्हरा(आलेगाव), तालुका शिरुर्,पुणे. गाठले.. सासुबाईंनी माझ्या सर्वात आवडीच्या असलेल्या पुरणपोळ्या केल्या होत्या.. पुरणपोळी आपला विक पॉईंट , आपण खुप खाल्ल्या.. रात्री उशिरा बायकोला दवाखाण्यात अ‍ॅडमिट केले... मला मुलगी हवी होती.. तीला मुलगा.. १-२ महिण्यांपुर्वी, तीच्या गावातल्या कोणात्या तरी आज्जीबाई ने पोटावर हात फिरवून सांगितले होते , मुलगा आहे. तीचा अनुभव आहे बोलली. आमची ही, नंतर लाडेलाडे मला तेच गिरवत असे कायम, पण आपले ठाम होते.. आपल्याला मुलगीच होणार.. आमच्यात ठरले मुलगी झाली की तिचे नाव, तिचे असंख्य निर्णय मी घेणार.. मुलगा झालाच तर बघु, तु ठेव तुला आवडेल ते नाव, वगैरे. आणि २० जानेवारी २०१४ ला कन्या रत्न झाले.. माझ्या आनंदाला सिमा नव्हती.. पुर्ण हॉस्पिटलला पेढे दिले.. ( मला काजू कतली खुप आवडती, पण तिथे नव्हती. नंतर अक्सेंचर च्या पुर्ण बे ला काजु कतली दिली मुंबईला ) बाळाला बाजुच्या पलंगावर ठेवले होते.. मी पहिलाच आत जाणारा, तीचे इवले इवले हात, इवले इवले बोटे हातात घेतली.. तिने ही माझे बोट धरण्याचा प्रयत्न केला जणु.. हळुच तीचा हात वर करुन आमच्या हिला दाखवले मी बाळ) मोबाईलच्या या जगात पण, मी बाळाचा फोटो काढण्याचे विसरलो होतो..बाप हा बाप असतो.. माझ्याकडे नाहिये तिच्या पहिल्या दिवसांचे फोटो , सातव्या दिवसाचे येथे देवू शकतो... नाव आता मी ठेवणार होतो, असंख्य नावे मी तयार ठेवली होतीच.. पण नेमके मला कुठले नाव ठेवावे आणि कुठले नाही हे कळेना.. बायकोची पण तीच अवस्था... मला तीचे नाव माझ्या नावाशी साधर्म्य असणारेच हवे होते.. नव्हे ते माझ्या नावानेच पुर्ण झाले पाहिजे असेच माझे म्हणणे होते.. त्यामुळे असंख्य नावे मागे पडली... आणी 'आराध्या' हे नाव पक्के झाले... आराध्या-गणेश आणि येथुन माझ्या जगण्याचा सुवर्णकाळ सुरु झाला..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 05/10/2020 - 11:47 नवीन
सुरेख लिहिलंस रे गणेशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
मोदक Sun, 05/10/2020 - 13:13 नवीन
झकास लिहितो आहेस गणेशा.. आजिबात ब्रेक न घेता लिखाण सुरू ठेव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
भ
भीमराव Sun, 05/10/2020 - 13:52 नवीन
अंधारात चालण्याची सुद्धा स्वत:ची एक वेगळी मजा आहे. कधीतरी बघा जमलं तर ट्राय करून, निवांत रस्त्यावर अगदी कुणी असो अथवा नसो. तसंही असल्या नसल्याशी आपल्याला काय म्हणा? आता हेच बघा ना दररोजच्या प्रवासात दिवसाढवळ्या कितीतरी माणसं आपल्या आजुबाजूला फिरत असतातच की. त्यातल्या तरी किती लोकांचे चेहरे आपण बघत असतो? बघितलेल्या किती जणांशी आपण स्वत: बोलतो? बोलणं राहुद्या बघणं पण सोडूनच द्या हो एकवेळ. आपल्याला किती तरी वेळा जाणिव तरी असते का की शेजारी कोण आहे? असुदे की असलं तर आणि नसूदेत सुद्धा. आपल्याला काय? हा आपण आधी कुठे होते? काय म्हणता? अंधारात? अंधारात कशाला मरायला? बर अंधाराचाच विषय निघाला आहे तर तुम्हाला सांगतो अंधारात चालायची सुद्धा स्वत:ची एक वेगळी मजा आहे. निवांत बघा कधीतरी एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावर चालून समोर उभा किर्र अंधार त्याला कापत जाणारा निपचीत रस्ता, डोळ्यात बोट घालेपर्यंत कळणार नाही. सावध, संथ पावलं नकळत अगदी नकळत पटापट पडायला लागतात. मधेच कुठेतरी चुकार टुकार दगड असतोच पडलेला. आणि मुबलक खड्डे. खड्डयांच सुद्धा अगदी राष्ट्रीयकरण झालय बहुतेक. बघावं तिकडे खड्डे च खड्डे. कधीतरी वाटतं कंत्राटदारांना सरकार खड्डेच बांधायचं कंत्राट देतं बहुतेक. चालताना तर दिवसा ढवळ्या डोळे फुटल्यासारखंच वाटतं. दिवसा चालताना जर असे हाल तर रात्री? मग तर बोलायलाच नको. रात्रीवरून आठवलं, तुम्हाला सांगतो अंधारात चालायची सुद्धा स्वत:ची एक वेगळी मजा आहे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 05/10/2020 - 14:07 नवीन
आता थांबु नका तुम्ही. इतक्या वर्षांनी लिहताय तर लिहा पटापट. पुर्वीचे मिपा परत येतंय असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 05/10/2020 - 15:22 नवीन
कितीतरी वेळा असं होतं. सायंकाळचा वारा मोठमोठ्याने गाणं म्हणायला सांगतो. जसाजसा सूर्य डोंगराआड जाऊन प्रकाश कमी होतो आणि हवेतला गारवा गुलाबी होत जातो तेव्हा तोच वारा सावकाश पण आर्त असे काही गायला लावतो. अंधाराची मात्रा वाढते तसा किती नाही म्हटलं तरी उदासपणा दाटतोच. मग कुठलीशी सल अजून हळुवार गुणगुणायला लावते. अशा वेळी जर जवळ मित्र असेल तर मैफल रंगते. दु:खाचीही गाणी होतात. कुणी जवळ नसल्यावर मात्र तो अंधार आणि ती रात्र खायला उठते. सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/11/2020 - 20:58 नवीन
तू जवळ नसताना, मी गाणी लावते. तू माझ्यासाठी म्हंटलेला 'तू मेरी जिंदगी है' मला आठवते लख्ख मी पण तुझ्यासाठी म्हंटले होते गाणे. आठवते आहे कोणते? सांग पाहू? नाही आठवत ना? ही रात्र हि अशीच असतें रिती, तुझ्या सारखीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ग
गणेशा Sun, 05/10/2020 - 15:57 नवीन
@ ईश्वर अंधार म्हंटले की मला आठवतात सातपुडा पर्वता मधील रांगा.. तोच शापित प्रदेश.. रात्रच नाही, तर पुर्ण जींदगीच अंधारात काढलेली माणसे.. अं हं, तुम्हाला वाटेल मला कसे ठावूक हे .. पण मला ठाऊक आहे.. हे आठवताना माझे मन जाते उडत २०११ मध्ये ----------------------------------------------- तेंव्हा मी एक झाड होतो... रात्रीच्या वेळेस ही पूनमेला १ चिमणी यायची माझ्याकडे.. नाजुकश्या पंखांची गगनभेदी भरारी घेवुन झाल्यावर कधी एकदा चिमणी पुन्हा इथे येते आहे असे व्हायचे मला.. ती आली की ती मला तिथली सगळी कहानी सांगायची.. झाडांच्या पानातुन ... दूर क्षितिजापल्याडचा सूर्य मावळताना अताशा झाडास चिमणीचाच भास होतो... ती नाही आली तर काय करत असेन आता ती ... शांतीच्या संदेशाला देता देता.. माझ्या सारखी असंख्य झाडे तिचे सोबती झाले असतील ना ? मला आठवते आहे, ती हळुच दूरवर असलेल्या झोपडीमध्ये डोकावुन यायची, तेंव्हा तिथले अनुभव मला सांगायची .. तेंव्हा खर सांगतो मन भरुन यायचं... म्हणुन त्या झोपडीतल्या माणसाने माझ्यावर कुर्‍हाड जरी चालवली ना तरी मी खुशाल माझे हात पुढे करायचो... चिमणी अताशा हे झाड विसरली आहे... कदाचीत या झाडाचीच ती चुक आहे, त्यालाच त्या चिमणीची आधी विचारपूस करता आली नाही कधी ... पण झाड पुन्हा आस लावून बसले आहे.. त्याची चिमणी येईल... नक्की येइल... यावेळेस झाडाला मात्र त्या चिमणी बरोबर जायचे आहे.. ही पानांची सळसळ.. हवेतली शुद्धता...सगळे काही त्याने चिमणी ला द्यायचे ठरवले आहे.. झाडाला अजुनही वाटते..अंधाराकडुन प्रकाशाकडे जाणार्‍या त्या वाटेवरचा तो एक सोबती व्हावा.. पंखभरल्या चिमणीचा एक दाणा व्हावा... चिमणी ला आठवताना, झाडाला आठवते तीने त्या अंधारातल्या माणसांची सांगितलेली कहाणी.. ती कहानी नुकतीच या झाडाने त्याच्या फांदीवर लिहुन ठेवली आहे, कधीच विसरु नये म्हणुन.... क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला त्यांचा हा भाळ रे अंधार म्हंटले की मला आठवते हे सगळे.. अंधारतली माणसे.. अन.. पुनवेची चिमणी...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 05/11/2020 - 05:39 नवीन
काल ठरवले होते, उद्या पासुन पुन्हा कामात व्यस्त व्हायचे.. सकाळी १० पासुन कामामध्येच स्वताला कोंडून घ्यायचे.. शेअर मार्केट, कविता, मिपा इतर असे लक्ष द्यायचे नाही असे ठरवले... पण रात्री झोपताना मोदक चा 'आम्हां घरी धन -३' हा धागा वाचायला काढला आणि सुबोध खरे यांचा एक रिप्लाय नसलेला प्रतिसादा पाशी येवून मी थांबलो .. त्यांनी विचारले होते 'गेले द्यायचे ते राहुन' या आरती प्रभु यांच्या गाण्याचा अर्थ सांगेल का कोणी .. अन मन माझे उडत २००७ ला गेले... आशा भोसलेंनी गायलेले हे गाणे अगदी लख्ख आठवले.. रात्री मनातुन काही केल्या शब्द जात नव्हते..भावनांची अनेक स्तित्यंतरे जानवत होती.. आणि काय माहीत आज मी या साठी १ तास आधी उठलो आणि लिहायला बसलो... ---------------------- मोदक चे हे धागे मी मिपावर नसताना आले होते, काल परवाच ते धागे पाहिले आणि खुप भारी वाटले.... निवांत वाचु म्हणाताना, रात्री भाग ३ पहिल्यांदा वाचायला घेतला. मोदक (मनोज) तसा आपला जूना मित्र. वल्ली इतकी आमची भेट किंवा बोलणे होते नाही.. पण त्याच्या सायकल च्या धाग्यांनी माझे जगच पालटून टाकले.. २०१८ ला त्याच्यामुळेच मी सायकल घेतली.. असंख्य ट्रीपा केल्या.. पुणे ते कर्दे सायकल ट्रीप, पुणे ते पन्हाळा, पुणे ते लिंगाणा ह्या ट्रीप तर खासच.. ह्या सार्‍या आनंदाच्या गोष्टी त्याच्यामुळेच माझ्या जीवणाअत आल्या.. त्याला मी कधीच विचरु शकणार नाही... सुबोध खरे, - खरं तर आमची जास्त ओळख नव्हती, परंतु मागे मिपा वर आल्यावर आमच्यात राजकीय धाग्यात अनेक साद-प्रतिसादांच्या फैरी झडल्या... वाद हा शब्द मी मुद्दाम टाळतो आहे. कारण ते आणि मी, दोघे ही आपले विचार समोरच्याची भिडभाड न बाळगता मांडायचो, पण तितकाच पुढच्याचा आदर करणार्‍या भाषेत आम्ही लिहायचो... त्यांची आणि माझी समाजिक, राजकीय मते तंतोतंत वेगळी होती आणी कदाचीत अजुनही आहेतच.. विचार वेगळे असणे नाही, तर स्वता:चे विचार असणे हे जास्त महत्वाचे असे मला नेहमी वाटते. त्यामुळे मी त्यांना तितक्याच आदराने उत्तर द्यायचो.. कुठे तरी त्यांना जानवले की मी त्यांचा राग करत होतो .. एका रिप्लाय ला त्यांनी लिहिले पण तसे की, स्पष्ट बोलले की राग येतोच.. पण तसे नव्हते... मला त्यांचे विचार बाजुला ठेवले तर त्यामागे असणारे त्यांचे मत स्पष्ट दिसत होते, ते काही कुठल्या राजकीय भांडणाप्रमाणे आयटी सेल च्या भाडोत्री मतांचे शब्द देत नव्हते.. त्यात ही कुठे खोल अर्थ किंवा काही तरी खरे होते... असे कितीही लिहिले तरी मात्र माझी मते त्यांच्या सारखी होणार नाही हे खरे, कारण माझा भौगलिक, राजकीय आणि सामजिक वावर हा त्यांच्या पेक्षा वेगळ्या वातावरणात झाला आहे हे नक्की,, त्यामुळे मी पाहिलेली परिस्तीथी मी बोलतो आणि ते ती.. असो.. मनातले जसेच्या तसे लिहिताना असे बर्याचदा मन इकडे तिकडे जाते , मी लिहायला आलो होतो आरती प्रभुंच्या कवितेचा अर्थ आणि लिहितोय व्यक्तीचित्रे .. असो.. कवितेचा अर्थ खालच्या प्रतिसादा मध्ये लिहितो ... त्या सुंदर कवितेला वेगळा प्रतिसाद बनतोच यार... या प्रतिसादाला व्यक्तीचित्रे म्हणुयात आणि हे लिहिताना माझे टाईम मॅनेजमेंट गडबडले.. कामाला उशीर होणार आज.. हा प्रतिसाद क्रमशा: --
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 05/11/2020 - 06:45 नवीन
क्रमशा: हा तर मी काय म्हणत होतो... 'गेले द्यायचे राहून' हे आरती प्रभुंच्या गाण्याबद्दल.. २००६-०७ या काळात मी पहिल्यांदा कविता लिहिण्यास सुरिवात केलेला काळ.. त्या काळात मी असंख्य पुस्तके वाचत असे... कवी ग्रेस आपले आवडते कवी..माझ्या 'आई' कवितेला त्यांनी दिलेली सही मी अजुनही जपुन ठेवली आहे.. त्या वेळेस अशी असंख्य कविता/गाणी/कथा मी वाचली ऐकली... त्यातले हे गाणे मला खुप आवडायचे त्याबद्दल, सुबोध जींनी याचा अर्थ मागितला होता २०१३ मध्ये , मी आता लिहायला बसलो आहे.. माझ्या मनातील अर्थ..(तो तुम्हाला चुक ही वाटु शकतो...) ------------------------------------------- मुळ कविता : गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने.. आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त. आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा.. गाणे https://youtu.be/yCrF5yQKlqM माझा अर्थ मला माहीत आहे, मी उंच नभ होतो तुझ्या पुढे... प्रिये , माझ्यापुढे तू अतिशय खुजी होऊन गेली होती.. माहीत आहे मला. तरीही मला माहीत आहे तुझ्या जगाचे सारे आभाळ मी व्यापले होते.. नव्हे मीच तुझे आभाळ होतो.. पण माफ कर प्रिये.. या आभाळाला तुझ्यात कधी समरसून जाता आलेच नाही.. माझे नक्षत्रांचे देणे तुला कधी देता आलेच नाही... _____ माझ्याकडे, बोलायचे राहिलेले आता खुप सारे आहे, अताशा त्या शब्दांच्या कळ्याच राहिल्या आहेत माझ्या मनात...अजुनही... त्या शब्दांची..त्या कळ्यांची फुले कधी झालीच नव्हती..तुझ्या साठी... त्या मुळे तुझ्या आठवणींची पाने आणि माझे डोळे दोन्ही ओले आहेत.. ||१|| तू आता या जगातून जायच्या तयारीत आहेस.. तरीही तुझे हे आभाळ तुझ्याकडे अजुनही आले नव्हते..तुला पाहिजे तसे... पण या तुझ्या अखेरच्या प्रवासात.. तुझ्या अखेरच्या श्वासांसाठी मी उगाच तुझ्याकडे खोटे हसू घेवून आलोय.. दुसरे आहे तरी काय माझ्याकडे तुला देण्यासारखे..? मी ना तुला कधी काही दिले ना काही देवू शकलो.. आता तुझ्या कडे आलोय तरी, तुझ्या मनासारखे मी जगु शकत नाही.. कारण तुझ्या श्वासांची ही शेवटची तडफड पाहतोय मी.. मग आता तुझ्या शेवटापर्यंत प्रत्येक दिवस मला ओझेच वाटतोय.. तुझ्या माझ्याप्रती असलेल्या अपेक्षांचे... आणि रात्र झाली की तुझ्या बद्दलच्या राहिलेल्या गोष्टी माझे मन पोखरून टाकतात.. जनू त्या माझे रक्त शोषीत आहेत असेच वाटते.. ||२|| आता ह्या असल्या रात्री विचार करताना, मला कळते आहे, माझे मन आधी तुझ्यापाशी कधी नव्हतेच.. नव्हे त्या मनाला तुझे कधी काही सोयरसुतक वाटलेच नव्हते.. आता या क्षणी माझी चुक माझ्या लक्षात आली आहे, पण आता काय करायचे ? नक्षत्रांचे हे देणे तुला कधी या आभाळाला देता आलेच नाही. पण आता या क्षणी मी त्या मनाचा दगड ,अन तुला दिलेले दु:खाचे घाव, डोळे मिटुन उगाच आठवतोय... आणि माझ्या शब्दांची तुझ्यापाशी कधी फुले झालीच नव्हती, त्या अश्या मी न बोललेल्या शब्दकळ्यांचे निर्माल्यच झाले येथे.. तुझ्या आयुष्यापाशी... आणि तुझ्या आठवणींचा पाचोळा उडतोय सैरभैर ..... ----------- शब्दमेघ
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Mon, 05/11/2020 - 21:01 नवीन
आठवणी : आत्ता लॉकडाऊनच्या काळात सगळ कुटुंब एकत्र.. कितीतरी आठवणी जमा झाल्यात. ज्या आता शेवटपर्यत सोबत असतील.. आजचा दिवस तसाच. आयुष्यात बाळ म्हटल कि टेन्शन, चिडचिड हे माझ्या नजरेतलं समीकरण आता बदलु लागलंय.. कधीच बाळाशी न खेळणारी मी. आता त्या बाळाच पसरलेलं हसरं बोळक बघताना माझ मन उगाचच भरुन येत. पहिल्यांदा असा निरपेक्ष आनंद अनुभवायला मिळतोय.. आणि सोन्यासारख्या आठवणीं जमा होताएत.. थँक्स पिलु! तुझीच माऊ..
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/11/2020 - 21:11 नवीन
@ माऊ.. राधा, माझी मुलगी. तिच्यासाठी, किती धावपळ व्हायची माझी. काम, स्वयंपाक, घर, नोकरी. पण घरी आली आणि माझ्याकडे धाव घेणारी राधा पहिली कि माझा सर्व थकवा निघून जायचा. निरपेक्ष आनंद दुसरा कुठला असूच शकत नाही. गर्भ माझा होता, पण स्वर्ग तिने निर्माण केला.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 05/12/2020 - 05:35 नवीन
लहान मुलांना पाहणं, खेळताना पाहणं हे खूप मजेशीर आणि आनंददायक असतं. त्यांनी खेळताना आपल्या कल्पनाशक्तीने त्यांना हव तसं जग निर्माण केलेलं असतं आणि त्यात ते सारं विसरून समरसून जगत असतात. कधीकधी त्यांच्याही नकळत, निरागसपणे ती असं काही बोलत रहातात की आपल्याला आश्चर्य वाटावं की अरेच्चा हे कुठे ऐकलं किंवा पाहिलं असेल यांनी. त्यांच्यासोबतचे सगळे क्षण म्हणजे आयुष्यातल्या रणरणत्या उन्हात मिळालेली गारेगार सावलीच जणू. शेजारच्यांची लहान मुलं. जवळच्या नात्यातली लहान मुलं यांनी मला भरभरून आनंद दिलेला आहे. अजूनही देत आहेत. लहान मुलांसोबत खेळायला मी कधीही तयार असतो. आता माझ्या मुलींनी माझ्या आयुष्याचा ताबा घेतलाय. सं - दी - प
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 05/12/2020 - 09:18 नवीन
पसारा आवरायचा एक दिवस येतोच. कपाट, त्याचं ड्रॉवर, पुस्तके, फाईली किंवा हार्ड डिस्कमध्ये स्टोअर केलेले फोटो. पसारा आवरून तो पुन्हा नीट लावताना तासन् तास कसे निघून जातात ते कळत नाही. हे नेहमीच होतं. आज हार्डडिस्कमध्ये नवे फोटो टाकून ठेवायचे होते म्हणून हार्डडिस्क लॅपटॉपला जोडली. फोटोंच्या फोल्डर मध्ये गेलो. तिथं मी एक अनसॉर्टेड नावाचं फोल्डर करून ठेवलेलं आहे. ज्यात मी भराभर आधी सारं टाकून घेतो आणि नंतर सावकाश त्या त्या प्रसंगानुसार, कार्यक्रमानुसार, तारखांनुसार पुन्हा त्यांना योग्य जागी लावून ठेवीत असतो. परंतु, बर्‍याच वर्षांत अनसॉर्टेड मध्ये फक्त भरणाच झाला आहे. सॉर्टिंग असं करताच नाही आलं. त्याच कारण म्हणजे मोबाईलने काढलेले भरमसाठ फोटोज आणि व्हिडिओज. हे फोटो पाहिले तर एखाद्याला वाटेल की च्यामारी, ह्याला तर आयुष्यात काहीच कष्ट पडले नसतील. आयुष्याचं सोपंसच गणित याच्या वाटेला आलंय. लहानपणासून ते आतापर्यंत चांगलं सुखासीन आयुष्य जगत आलेला आहे हा. अर्थातच ते खूपसं चूक आणि काही अंशी खरंही आहे. पण फोटो तर वेगळीच कहाणी सांगत आहेत. मग विचार केल्यावर लक्षात आलं की आपल्या लक्षात वेगळं राहतं आणि कॅमेर्‍याच्या वेगळं. पण एक गोष्ट नक्की, खूप काही बघून, फिरून, मजा करूनही झालेली आहे. जितके फोटो, व्हिडिओ आहेत तेवढे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात येऊन गेलेलेच आहेत. या वेळी तुकारामबुवांची सुख पाहता जवापाडे, दु़:ख पर्वताएवढे या उक्तीचा नव्याने साक्षात्कार झाला! मनोमन तुकारामबुवांना नमस्कार केला आणि पुन्हा कधीतरी आवरूया म्हणून लॅपटॉप बंद केला. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 05/12/2020 - 15:18 नवीन
@ संदीप , पसारा/फोटो... ---------------------------------------------------- खरंच, ह्या लॉकडाउनच्या काळात मी पण आपोआप ह्या कपाटातील/स्टोअर रुम मधील गोष्टीं आवरल्या. गेल्या वर्षीच घराला रंग दिला होता, त्यामुळे सगळ्या जुन्या डायरी, पुस्तके एका बॉक्स मध्ये भरुन ठेवले होते, त्याला आता मुहुर्त लागला.. पुस्तके बॉक्स मधुन पुन्हा कपाटात ठेवली.. अजुन व्यवस्थीत नाही ठेवली.. आजच त्यातल्या माझ्या जुन्या डायर्‍या शोधल्या... एक खुप जूनी डायरी सापडली.. त्यावेळेस मी कविता लिहित नव्हतो.. काहीच लिहित नव्हतो...त्यावेळेस तीच्या डायरीतील काही छान छान वाक्य त्यात लिहिलेली होती ती बघितली.. वाचली. त्यावेळी मी चित्र काढयाचो, त्या डायरी मध्ये काही चित्रे रेखाटलेली होती, ते पाहुन छान वाटले.. अश्या असंख्य गोष्टी विस्मरणात गेलेल्या होत्या.. त्या पुढे आल्या.. त्या डायरीतल्या या ओळी आवडायच्या मला, या ओळींचा कवी कोण माहित नाही.. तू हसलीस की फुले उमलु लागतात अन त्याचे रंग, तुझ्या ओठांवर खुलू लागतात.. तू अशीच हसत रहा.. सर्वांचे मन मोहत रहा.. माझी नसताना पुन्हा माझीच होत रहा.. त्या डायरीच्या शेवटी एक गाणे लिहिले होते, ते नंतर देतो.. अश्या किती आठवणी आपल्या प्रत्येक गोष्टीला चिकटुन बसलेल्या असतात नाही ? आयुष्याच्या या परिघात आपण मात्र अश्या असंख्य गोष्टी, असंख्य आठवणी बर्याचदा विसरुन गेलेलो असतो.. पण पुन्हा जेंव्हा हे समोर येते तेंव्हा त्या आठवणी सरकन डोळ्यासमोरुन जातात.. जनु तो काळच पुन्हा अवतरतो डोळ्या पुढे... फोटोंचे पण अगदी तसेच, माझ्या कडे २-३ पेन ड्राईव्ह भरुन फोटो आहेत.. लॅपटॉप मध्ये ही आहेत.. लग्ना नंतर मात्र मी प्रत्येक ट्रीपचे फोटो.. मग सिलेक्टेड फोटोज असे फोल्डर केले आहेत. त्यात फॅमिली ट्रीप, वयक्तीक ट्रीप , ट्रेकिंग, आराध्या, आराध्या फेवरेट.. असे असंख्य फोल्डर आहेत. पण मला डिजीटल फोटो पहायला आवडत नाही.. मी ट्रीप प्रमाणे असंख्य अलबम प्रींट करुन आणले आहेत. ते अलबम पहायला जी मज्जा येते ती दुसरी कशातच नाही. बर्याचदा आराध्याचे फोटो पाहतो, काल तीच्या जन्माच्या ओळी लिहितानाच तीचे फोटो पाहिले होते.. आमचे फोटो पाह्यचे झाले तर केरळ चे किंवा हिमाचल चे फोटो पाहतो मस्त वाटते.. येथे ह्या दोन्हीचे धागे लिहलेले आहेत ते आठवले.. २०१३ नंतर प्रवासवर्णन बंदच केली मी लिहायला... सुख-दु:खाचा खेळ तर चालुच असतो.. पण तो काळ पुन्हा अनुभवने हे सुखच असते... काळाच्या विरुद्ध जाऊन जुने क्षण आनंदाने जगण्यासारखे दूसरे सुख नाहीच. --------------------------------- वरती माझेच लिहिलेले पुन्हा वाचले..अताशा एक सारखेच प्रतिसाद झालेत का काय माझे असे उगाच वाटुन गेले.. पुढच्यावेळेस असले आठवणींचे आठवण्या पेक्षा साधे सरळ काही मनात यावे असे वाटते.. म्हण्जे थोडे मजेचे.. रोजचे क्षण ... आठवणींच्या बाहेरचे आयुष्य पण सुंदर आहेच .. सुंदरता ही रोजच्या गोष्टीत असते.. म्हणुन तर त्याच्या सुंडर आठवणी असतात नाही.. ?
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Tue, 05/12/2020 - 20:36 नवीन
@ संदीप, @गणेशा राधा ने केलेला पसारा बरा, तेव्हडा श्री चा टेबल, कपाट आवरायला वेळ लागतो, रोजचेच हे, रुटीन. अश्या रुटीनचे आयुष्य तसे मला आवडते. एका परिघावर फिरत राहायचं बस. स्वप्ने जास्त नव्हतीच.घर हेच माझे स्वप्न.म्हणून पसारा आवडतो, आणि पसारा करणारे पण. आठवण नाही येत कोणाची. रोजच हे, त्यात नविन काही नाही. माझ्या स्कुटर वर राधाला पुढे उभे करून जाताना, ती दोन्ही हात विमानाच्या पंखां सारखे करते, तिचे स्वप्न किती नितळ आहे असे मला नेहमी वाटते, कधी कधी स्वप्नांचे पंख तिला मिळाल्यात असं वाटतं.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Tue, 05/12/2020 - 21:17 नवीन
स्वप्नसुखांचे लेवुन पंख घे भरारी गगनात आभाळ आहे तुझेच परि तु आईला तुझिया विसरु नको श्वासात घे भरुन तु ती अविरत ऊर्जा त्या भानुची घे भरारी गरुडापरि तु एक नजर असुदेत या भुवरी नंदादीप जळत राहो तुझ्या आकांक्षाचा निसर्गाचे ते अमोल देणे तु परतवत रहा त्याला (तुमच्या राधासाठी या काही पंक्ती सहजच सुचल्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिती-राधा
म
मोदक Tue, 05/12/2020 - 22:03 नवीन
वाचतोय... मस्त सुरू आहे डायरी. तुम्ही सगळे इतकं तरल.. हळूवार कसे काय लिहिता याचे आश्चर्य वाटत राहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Wed, 05/13/2020 - 20:37 नवीन
धन्यवाद माऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 05/13/2020 - 11:17 नवीन
मास्कआडचा माणूस मास्कआडच्या माणसाला म्हणाला, "काय कसे काय?" "बरे चालले आहे, थोडे सामान घ्यायचे होते म्हणून बाहेर पडलो, आज एका दुकानाच्या लायनित उभे रहायचे आणि उद्या दुसर्‍या, दोन तासात जमेल तेवढे सामान घ्यायचे" "मी पण तसेच करतो, मुलगा म्हणतो ऑनलाईन मागवा, पण घरी बसुन बसुन कंटाळा येतो हो.. जरा पाय मोकळे झाले की बरे वाटते" "हो मी पण रोज थोडे थोडे सामान घेतो, जेवढे उचलता येईल तेवढे" "तुम्हाला काय वाटते या वेळी ट्रंप परत निवडून येईल का?" "येईल न यायला काय झाले? त्याला विरोध करणारे कोण उरले आहे आता?" "तिकडच्या दुकनात रोज हिंदुस्तानचे पॅटीस येतात माहित आहे का?" "हो माहित आहे परवा घ्यायला गेलो होतो पण लाईन बघुन परत गेलो" "चला झाली माझी खरेदी, बरं वाटलं तुमच्याशी बोलून, एकदा घरी गेलो की उद्या पर्यंत कोणी दिसत सुध्दा नाही. दिवसभर टिव्हिवरचे तेच तेच जुने कार्यक्रम पाहून कंटाळा येतो" "हो चला अच्छा काळजी घ्या" मास्कआडचा माणूस मास्कआडच्या माणसाला म्हणाला, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 05/13/2020 - 12:11 नवीन
चेहर्‍यावरचा मास्क बरा जो चेहरा झाकून घेतो आपल्या आत जे असेल ते आपल्यापाशी ठेवतो उघडउघड जी मुखकमले दिसती आणिक हसती कसे कळावे ओठी त्यांच्या हसू की, स्मिते जळकी? चेहरा लपवलात तरी डोळ्यांचं काय करणार? किती नाही म्हटलं तरी ते सारं उघडं पाडणार! - सं - दी - प
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/13/2020 - 12:20 नवीन
@ पैजारबुवा , नमस्कार तुम्हाला प्रथम. ------ लॉकडाउनमधील मन हेलवणारी ही कालचीच गोष्ट, अजुन ही काय वाटते निट शब्दात बोलता येणार नाही. काल कॉलनीत एक म्हतारी आली होती.. शहरात असुनही सोसायटीतल्या पिंजर्‍यात राहत नसल्याने येतात माणसे येथे. घरी आता कोणी नाही.. मुलगा , त्याच्या सासरी.. गाव तिचे होते पाले, मावळ. इथ चालत चालत कशी आली माहीत नाही. निटसे तीला ऐकु येत नव्हते असे बायको म्हणाली.. मी वरती होतो. तीला भुक लागली होती.. शेजारच्यांनी तीला हाका मारुन बोलावुन घेतले, फळे दिली, पाणी दिले.. समोरच्या बंगल्याच्या नारळाच्या इवल्याश्या जागेत तीला बसवले. समोरच्या घरात स्वयंपाक करत होत्या, त्यानी जेवायचे का विचारले तर हा म्हणाल्या आज्जीबाई.. गरम जपाती, मेथीची भाजी पाहिली, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले.. किती दिवस झाले असे जेवण त्यांनी बघितले नाही असेच भाव होते.. बायकोच्या डोळ्यात ही पाणी आले, तीने ही चिवडा आणि इतर पदार्थ दिले त्या माउली ला.. पाटील बाई म्हणाल्या, नको जास्त काही विचारायला, वेगळी काय कथा असणार, जेवुद्या पोटभर.. बायकोने हे मला सांगितले तेंव्हा तीच्या आणि माझ्या डोळ्यात पाणी तरळत होते, त्या म्हतारीचा चेहरा समोरुन जात नव्हता.. तीचे पाणीभरले डोळे तीच्या या अवस्थेला काय बोलत असतील, घरदार सोडुन असे वनवन भटकताना तीच्या मनाला काय यातना होत असतील ? हे लिहिताना ही डोळ्यात पाणी तरळले... थांबतो..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/13/2020 - 12:40 नवीन
@ संदीप ----- मुखवट्यांच्या या जगात, माणुस स्वताला विसरत चालला आहे. आरश्याला पण प्रश्न पडत असेल, हा कालचाच माणुस आहे ना ? प्रत्येक ठिकाणी मुखवटे.. राजकीय बोलताना .. मुखवटा धर्माचा आर्थिक बोलताना.. मुखवटा धंद्याचा सामजिक बोलताना .. मुखवटा सुधारकाचा विज्ञानाचे बोलताना .. मुखवटा ज्ञानाचा मैत्रीत बोलताना.. मुखवटा खोटेपणाचा.. तुम्ही कितीही डोळ्यात पहा.. तेथे ही गर्वाचा मुखवटा लपलेला असतोच म्हणजे असतो..
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Wed, 05/13/2020 - 21:05 नवीन
एखाद्याला बाबारे तु जसा आहेस तसाच रहा! अस म्हणुन आपण स्विकारतो(?) त्या माणसाला आपल्या आयुष्यात.. मग तो मनुष्य कोणीही का असेना. आई-वडिल,भाऊ/बहीण, नवरा-बायको अगदी कोणीही! पण कालांतराने आपल्याला त्याच माणसांच्या बारीक-सारीक गोष्टी का बर खटकु लागतात? का होत असाव अस? विचार केल्यानंतर देखील मला मिळालेली उत्तरे. मला स्वतःलाच पटत नाहीत. पहिलं उत्तर सवय! जुनी लोक म्हणतात " जित्याची खोड मेल्याशिवाय सुटत नाही." पण हे खरं मानलं तर शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेला 21 दिवसांचा दावा! तो कसा खोटा ठरवावा? जाऊदे. मरुदेत.. तो सवयीचा विचार करता करता "माझी अतिविचार करायची." सवय मला परत लागायची..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Wed, 05/13/2020 - 21:16 नवीन
निरुत्तर केले मन्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Wed, 05/13/2020 - 21:01 नवीन
मी आरश्या समोर उभी राहिल्यावर प्रश्न आरश्या ला नाही मला पडतो, मीच का हि? आज आरश्यात पाहतानाच बाजूला गाणी चालू होती. आणि स्मिता पाटील च गाणं लागल. स्मिता मला आवडायची. राज बब्बर नव्हता आवडत. जैत रे जैत, मस्तच.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 05/13/2020 - 21:21 नवीन
राज बब्बरला अभिनेता म्हणावं हा त्याचा वकुब नाही.. स्मिता पाटीलनी त्याच्याशी लग्न करावं ह्यापेक्षा दुसरे दुर्भाग्य नाही.. तेरी तो... ये तो शेर हो गया! 😜
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 05/14/2020 - 04:41 नवीन
@ टर्मीनेटर... वा वा, बागा. फुलवणारा माणूस आज शब्द फुलवायला लागला.. काय. मोगरा, काय गुलाब, सुगंधाचाच हा खेळ जमायला लागला. ------------- स्मिता पाटील, माझ्या आईची आवडती अभिनेत्री... म्हणून माझ्या मनात पण घर करून गेली.. तिचे डोळे आवडतात मला.. जैत रे जैत, गाण्यांमुळे गाजला.. पण आपल्याला स्मिता साठी तो सिनेमा लय आवडतो.. नभ उतरू आले, मी कात टाकली, आम्ही ठाकर.. अशी किती गाणी सुंदर आहेत.. आणि त्यात स्मिताचे डोळे.. ना. धो. महानोरांच्या सुंदर निसर्ग शब्दाना असा नितळ चेहरा लाभला होता कि बस.. स्मिता म्हणजे आपल्या सारखा चेहरा.. पण उत्तुंग अभिनय.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 05/14/2020 - 21:00 नवीन
मिपा वर आल्यापासून, काव्यस्पर्धेतील नविन कविता वाचते. रात्री झोपताना या धाग्यावर येऊन एखादा विचार लिहिते. दिवसभर काम असते. बाकी जास्त जण का लिहीत नाही माहित नाही. पण मला आवडते काहीही लिहायला. ~~~~~~~~ आज राधा चा मराठी चा अभ्यास घेतला. अ, आ, ई, इ शिकवायला छान वाटले, ते येते तिला पण काना, मात्रा शिकवले. ऑनलाईन आणि ते झूम काय खरे त्याचे? अशी शाळेची मजा सगळी जाणार.. तुम्ही बघा, कॉलेज ला, ऑफिसला न जाता घरा मध्ये राहून काम करताना, अभ्यास करताना कंटाळा नाही येणार? मुलीला आवडते घरून, शिर्या ला ती काम काही करू देत नाही. जळालं मेलं ते वर्क फ्रॉम होम. दिवस भर चहा चा रतीब नाही तर काय तरी हे अन ते. कधी हा करोना जातोय काय माहीत.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 05/14/2020 - 21:18 नवीन
मला लिहून आता बरेच वर्ष झाली. आणि इतक्यात काही उतरेल अशी आशाही नाही. पण माझी लेकही फार छान कविता करते. ८वीत आहे. फक्त तिची विचार करण्याची भाषा आहे इंग्रजी. त्यामुळे तिच्या कविता इंग्रजीमधून येतात. खाली एक उदाहरण देतो, बघा आवडते का: Blooming Flowers ================ This bare, leafless tree once had blooming flowers not a little but tons beautiful flowers .. Now the last brown leaf falls off, leaving memories behind memories of the leaf when it was a little green child .. It grew up to become a charming life..leaf new and confused about the world but full of life how elated would the tree have felt .. Until it grew old, fragile and brown lifeless like a rotten petal the tree would have felt despondent like the old, frail lady on the start .. Her children left her alone the bossom died away the leaves fell off but the tree stands bare, leafless .. In the hope that they will return... The blooming flowers Saee Mande (Somewhere in May 2018)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 05/14/2020 - 21:20 नवीन
आणि हि अजुन एकः FIRE ========== I am energy I am power I am light I am might I am magic Two sides of the same coin I am the mother of inventions I am the fiery destruction Saee Mande (Somewhere in Sept 2019)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मन्या ऽ गुरुवार, 05/14/2020 - 21:38 नवीन
सुंदर व्यक्त झालीये तुमची परी!.. तिला शाबासकी द्या माझ्याकडुन.. आणि कविता आवडल्या हे सुद्धा सांगा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
ग
गणेशा Fri, 05/15/2020 - 04:53 नवीन
प्रथमतः नमस्कार मिका भाऊ.. सई ला अनेक आशीर्वाद.. तुझी प्रतिभा, नव्हे त्या पेक्षा ही जास्त सई मध्ये दिसते आहे. कविता मस्तच. ट्री च्या कवितेत काय सुंदर कल्पना आहे.. जणू आयुष्य आपले... In the hope that they will return... The blooming flowers Wow, येव्हढ्याश्या चिमुकलीचे हे इतके सुंदर विचार.. मस्तच.. ---------------- तुझ्याबद्दल, अरे, तू मला सांगायचा लिही राव, अन आता इतक्यात काही उतरेल अशी आशा नाही.. कविता जाऊदे.. विचार तर लिहू शकशील कि.. वेळ मिळाला कि लिही.. तू अन किसना मुंबईत भेटलेले हे दोन मित्र कायम मला त्या तिथल्या समुद्राची आठवण करून देतात.. असे काहीसे अथांग, अनंत आपल्या बरोबर आहे असेच भासायचे... पण तो समुद्र कधीच हाती लागायचा नाही.. तुझी समुद्राची कविता मला कायम आठवते ती आता सापडत नाहीये.. देतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
ग
गणेशा Fri, 05/15/2020 - 21:09 नवीन
आज माझे मन जाते आहे शाळेत.. ------- जीवन शिक्षण विद्या मंदिर, असं गोंडस नाव असलेल्या झेड पी च्या शाळेत मला पहिलीला घातले गेले.. उरुळी कांचन तेंव्हा छोटेसे खेडेगाव होते.. तेंव्हा पण मी आता सारखाच बडबड करायचो बहुतेक, आई ला बोलावून माझ्या अनेक तक्रारी घरी पोहचलेल्या होत्या. दुसरीत का तिसरीत असताना 'इंजिन दादा इंजिन दादा काय करतो ' हि कविता होती, तेंव्हा बाई हि ओळ म्हणाल्या कि सर्वांनी ती ओळ म्हणायची. असे असताना त्या, हि ओळ संपवत नाही तोपर्यंतच मी 'कोळसा मी खातो ' असे पुढचे म्हणत असे, आणि मार खात असे. तुम्हाला वाट्टेल कवितेचा आणि माझा संबंध तेंव्हाचा का? पण नाही, आपलं आणि कवितेचं जमलंच नव्हतं कधी..कवितेतच काय, मराठी च पण कधी जमल नव्हतं. अपवाद दोनच, नववी आणि अकरावी. महात्मा गांधी विद्यालयामध्ये, नववीत मराठी ला चव्हाण बाई होत्या.. आपल्याला त्या आवडायच्या.. या पहिल्या बाई नव्हत्या ज्या मला आवडत होत्या, सहावीत असताना थोडे दिवस होत्या त्या घुणागे आणि नंतर मोरे बाई यांचा नंबर पहिला येतो लिस्ट मध्ये, दोघी आपल्याला लय आवडायच्या. शास्त्र आपल्याला तेंव्हा पासूनच आवडायला लागले. हा तर नववीत असलेली 'कणा' हि आपल्याला पहिली आवडलेली कविता. हि कविता आपल्याला पाठांतरा ला होती. आपल्याला लय आवडायची. अजूनही पाठ आहे. आठवा तास असल्या वर बाई वाचन घ्यायच्या मी 'धुणं' हा धडा घेऊन वाचायचो, आपल्याला आवडायचा तो धडा. अकरावी मराठी भारी होते.. 'प्रेमाचा गुलकंद' आपल्याला आवडायची कविता. मराठी आणि कविता याबाबत आपले एव्हडेच नाते होते कवीला काय अर्थ अभिप्रेत आहे असले भंकस प्रश्न मला कधी जमलेच नाही.. असा मराठी ह्या विषयात अजिबात गोडी नसणारा मी नंतर कविता लिहिल हे मला कधीच वाटले नव्हते....मराठीत नववी आणि अकरावी सोडले तर मी काठावर पास होत असे. शुद्धलेखन हा शब्द ज्याला शुद्ध लिहिता येत नव्हता त्याची इतर काही सांगायची गरज नसावी.. --- गणितात आपण मात्र बीसीएस होई पर्यंत topper होतो. त्याची कथा खालच्या प्रतिसाद देतो.. तीच लिहायला आलो होतो आणि हे वेगळेच शब्द येतात.. चालायचेच.. Cont...
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 05/15/2020 - 22:01 नवीन
महात्मा गांधी विद्यालय - माझ्या हायस्कूलचे हेच नांव होते. रयतची शाळा. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीला आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम असायचे. या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा गांधी टोपी डोक्यावर आली. कार्यानुभव म्हणजे शाळेच्या शेकडो एकर जमिनीत संपूर्ण शाळेने जाऊन सोयाबीन पेरायचे आणि नंतर काढणीला आले की तीन चार दिवस तिकडेच शाळा भरायची व सोयाबीन काढणी सुरू असायची. फुल्ल मजा..! ********** धुणं म्हणजे साटंलोटं नात्यातली कथा आहे का रे..? एका बाईच्या सांगण्यावरून सासू सुनेला त्रास द्यायचा विचार करते आणि भर उन्हात धुणं धुवायला पाठवते.. आणि सून धुण्याला जायच्या वेळी सासूमधली आई जागी होते आणि तिला उन्हात जाऊ देत नाही अशी कांहीशी कथा..? ********** मराठी १० वी पर्यंतच होते. नंतर ११ वी व १२ वीला मराठी ऐवजी स्कोअरिंग सब्जेक्ट म्हणून संस्कृत घेतले. बालभारतीच्या वेबसाईटवर अगदी अलिकडे कांही मराठी पुस्तके वाचावयास मिळाली. आपण ज्या लोकांना आज इतके ग्रेट मानतो त्यांचे साहित्य शाळकरी वयापासून आपल्यासोबत आहे पण त्यावेळी त्या साहित्याची गोडी न लागता "कुठला प्रश्न किती मार्काला आहे?" असल्या नीरस आणि उदास भावनेने त्या सगळ्याकडे पाहिल्याचे आज कधीकधी वाईट वाटते. आज इतक्या वर्षांनंतर या सगळ्याकडे मागे वळून पाहताना प्रश्न पडतो की १० / १२ मध्ये मिळालेले मार्क आणि त्यासाठी केलेली धडपड खरंच तितकी "वर्थ" होती का.? आणि अ‍ॅट द कॉस्ट ऑफ व्हॉट...?? ********** कणा.. आपली पण एकदम आवडीची कविता. गेली अनेक वर्षे बीजी लिमये यांच्या कॅलिग्राफीच्या प्रेमात आहे... त्यांच्या लेखणीतून साकारलेला.. "कणा आणि त्याचा अनुवाद.." Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Sat, 05/16/2020 - 10:12 नवीन
@ मोदक --- हो धुणं तोच धडा, बरोबर. वा कॅलियोग्राफी भारीच.. मनात घर करणारी..खुप आवडली... ---- कणा बद्दल काय बोलु, अजुनही ते दिवस अगदी मनात घर करतात.. मला आवडलेली पहिली कविता. एक छोटासा किसा आठवतोय, बगाडे आमच्या वर्गातला 'ढ' मुलगा होता, आणि त्याला ही पाठांतरा ला 'कणा' होती. आणि बिचार्‍याने म्हणताना अश्या दोन ओळी म्हणाल्या.. लय जोरात सहलो होतो मी, चव्हान बाईंनी मग मला उभे केले होते.. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन माहेरवाशीन पोरिसारखी, चार भिंतीत वाचली मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र नाचली अजुन पण हसतो आहे... ---------------- जाता जाता कुसुमाग्रज यांच्या दोन कविता आठवल्या , विशाखा मधील त्यातील ह्या दोन ओळी मला लय आवडतात "काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात दूर देशी उभे, दिवसाचे दूत" आणी त्यांनी लिहिलेली शेवटच्या कवितेतील ह्या ओळी उगवतीचे उन आता, मावळतीला चालले आहे. मार्गक्रमण मार्गापेक्षा मरणात अधिक साचले आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मन्या ऽ Sat, 05/16/2020 - 11:39 नवीन
कुसुमाग्रज यांच्या कविता मी जास्त वाचलेल्या नाहीत.. पण ज्या ज्या वाचल्या त्या ठळकपणे मनावर कोरल्या गेल्या.. गणेशदा, तु दिलेल्या ओळी स्वप्नांची समाप्ती या कवितेतल्या.. एकीकडे पहाटेच इतकं सुंदर वर्णन तर दुसरीकडे प्रेम कराव भिल्लासारख! कवितेत कशालाच कसल्याच उपमा न देता थेट. प्रेम कस कराव. बजावत/सांगणारी प्रेमकविता. दोन्ही कवितांमधे केवढं ते वेगळेपण..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
मन्या ऽ Sat, 05/16/2020 - 11:47 नवीन
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकु नकोस बुरुजावरती झेंड्यासारखा फडकु नकोस उधळु दे तुफान सगळ काळजामध्ये साचलेल प्रेम करावं भिल्लासारख बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवुनसुद्धा मेघापर्यत पोचलेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा