Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्द झाले मोती.. - २

ग
गणेशा
Sat, 05/09/2020 - 13:55
💬 240 प्रतिसाद
शब्द झाले मोती..१ मागील धाग्याबद्दल : या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले. नियम : तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही. उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..

प्रतिक्रिया द्या
177646 वाचन

💬 प्रतिसाद (240)
ग
गणेशा Fri, 05/15/2020 - 21:56 नवीन
हा तर पुन्हा सुरु करतो, जीवन शिक्षण विद्या मंदिर, असं गोंडस नाव असलेल्या झेड पी च्या शाळेत मला 1987 साली पहिलीला घातले गेले.. उरुळी कांचन तेंव्हा छोटेसे खेडेगाव होते.. वडपल्ले बाई मला शिकवायला होत्या, आता सारखी नाटके तेंव्हा नव्हती, चौथी पर्यंत त्याच आम्हाला शिकवायला होत्या. गणित, मराठी, शास्त्र या तीन विषयात आपले डोके चालायचेच नाही. वडपल्ले बाई, आपल्याला लय बडवायच्या. मी आणि शफया आम्ही दोघे ठरलेले होतो मार खायला. मला चांगले आठवते, काही सापडले नाही तर बाई मला पाटी च्या टोकाने डोक्यात मारायच्या. एकदा मला आणि शफया ला बाईनी उभे करून लय मारले. मी शफया ला विचारले, तुला का मारले, तो म्हणाला मला गणितात 2 मार्क मिळाले आणि शास्त्रात 4 म्हणून. त्या पेक्षा आपल्याला निम्म्या हुन कमी मार्क मिळाले होते. म्हणजे 0 आणि 1. बाई ओरडल्या 'तुम्ही दोघे आयुष्यात कधी पुढे जाणार नाही, आणि गेला तर माझे नाव बदलून ठेवा.. ' या वाक्य नंतर पण मी हसलो म्हणून मी आणखीन जास्त, शफया पेक्षा जास्त मार खाल्ला.. शास्त्रा चे मला चांगले आठवते, बाईंनीच सांगितले होते ' सजीव म्हणजे असा कि जो दुसऱ्याला जन्म देउ शकतो, टेबल दुसरा टेबल जन्माला घालतो का? मग तो निर्जीव.. ' हीच व्याख्या मी पाचवीत गायकवाड बाईंनी प्रश्न विचारल्यावर सांगितली होती, त्या बस खाली, शहाणा. म्हणाल्या होत्या.. गणित म्हणजे महाकठीण काम, शिक्षकांच्या पोरांना लय यायचे तेंव्हा पण. गायकवाडा चा मह्या, आणि सच्या बागडे पहिले दुसरे यायचे. गणित आपल्या पुढचा लय मोठा प्रश्न होता. तिसरीत आपण चार विषयात नापास झालो होतो, बाईंनी शाळेत आई ला बोलावून एका विषयात पास केले होते, आणि तीन विषय नापास असुन हि आम्ही चौथी ला आलो होतो.. ते तीन विषय होते मराठी, गणित, शास्त्र.. (यातल्या गणिताचे आपण नंतर कॉलेज ला गेस्ट lecture घेतले, बीसीएस ला असताना 12 वी गणिताचे क्लास घेतले त्यात 22 पैकी 18 मुलांना 80 च्या वर मार्क मिळाले हे खरे वाटत नाही. ) चौथी झाल्यावर पाचवीत गेलो तेंव्हा आपल्याला फक्त सोप्पी बेरीज, आणि दोना चा पाढा पाठ होता. बाकी पोरे 17 चा पण पाढा कसे म्हणतात हेच आपल्याला आश्चर्य. तेंव्हा पासून मला 13, 17, 19, 23 हे अंक पण आवडत नाही त्याचे कारण हेच कि त्याचे पाढे अवघड होते. पहिल्या चाचणीच्या परीक्षेत मला मराठी ला 11/30 आणि गणितात 14/40 असे मार्क पडून काठावर पास होता आले. इतिहास आणि इंग्रजीत मात्र पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते. मला गणितात काहीच येत नाही हे पाहून भोर बाईंनी मला उठवले, आणि प्रश्न विचारले, मी मोठ्या आवाजात सांगितले मला बेरीज सोडून काहीच येत नाही, वजाबाकी गुणाकार हि येत नाही. हे ऐकून बाईना वाईट वाटले, त्या मारकट नव्हत्या. त्यांनी मला घरी ये रविवारी असे सांगितले. आणि दोन तीन महिने त्या फुकट मला रविवारी शिकवत असत. आणि आश्चर्याचा धक्का... सहामाही नंतर, तिसऱ्या चौथ्या चाचणी परीक्षेत मला 40/40 मार्क गणितात मिळाले होते. मी गणितात पहिला आलो होतो. सहावीत माझे गणिताचे पेपर सर्व वर्गाला दाखवले जायचे. खरात बाईंचा मी आवडता विध्यार्थी होतो. हो मोरे आणि घुनागे बाई याच सहावीतल्या शास्त्रा च्या. त्या मुळे शास्त्र हि माझे सुधारले. गणितात तेंव्हा पासून जे मी topper राहिलो ते बीसीएस, एमसीए होई पर्यंत मी गणितात अव्वल होतो. बीसीएस ला मी कॉलेज ला पहिला आलो होतो. आणि यात भोर बाईंचे उपकार होते. आज पर्यंत गणितच आपला आवडता विषय आहे. ( नोट : मागे आजीबाई यांचा शुद्धलेखनाचा धागा होता, त्यात त्यांच्या शिक्षकांचा उल्लेख होता, मी पण भोर बाई जर मराठीच्या शिक्षिका असत्या तर आजीबाई सारखे ह्या लेखा पेक्षा उगा शुद्धलेखन आणि मराठी च्या गोष्टी केल्या असत्या असे उगाच वाटले ) -- गणेश जगताप
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 05/15/2020 - 22:15 नवीन
उरळी कांचन म्हटल्यावर अनेक गोष्टी आठवतात.. पुलंच्या चित्रमय स्वगत मधले बापू कांचन डोळ्यासमोर येतात.. भुलेश्वर आणि सोलापूर बाजूला सायकल राईड व्हायच्या तेंव्हा हमखास हॉटेल कांचनला जेवणाचा थांबा असायचा. कवडेपाटला पक्षी बघायला गेल्यावर खास पुढे जाऊन किंवा भिगवणहून फ्लेमिंगो बघून परत येताना हॉटेल कांचन हा ठरलेला थांबा असायचा. एकदा काय झालं.. मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कुणालातरी भेटायला गेलो होतो. लिफ्टमध्ये थोडीच लोकं होती आणि अचानक एक अ‍ॅप्रनवाली इंटर्न दिसावी अशी डॉक्टर मुलगी लिफ्टमध्ये शिरली. आत येताच लिफ्टमध्ये मागच्या बाजूला उभ्या असलेल्या एका समवयस्क डॉक्टरला तिने हाय केले. तो फॉर्मल कपड्यात होता पण अ‍ॅप्रन, स्टेथोस्कोप वगैरे कांही नव्हते. तिने त्याला विचारले.. "कुठे असतोस आता..?" तो म्हणाला "UK" (इथे आम्हाला त्या डॉक्टर मुलाबद्दल कौतुक वाटू लागले) मग तिने लगेच शांतपणे विचारले - "उरळी कांचन..?" तो "हो" म्हणाला. ..आणि हे नवीन ज्ञान अचानकपणे सामोरे आल्याने लिफ्टमधील सर्वजण हसू लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Sat, 05/16/2020 - 21:07 नवीन
आज आराध्याचा पावसात भिजतानाचा विडीओ तिच्या मामीने पाठवला.. या लॉकडाऊन मध्ये आराध्या गावाकडे गेलेली आता २ महिने होत आले.. अज्जीबात करमत नाही.. लाडक्या लेकीसाठी... --------------------------- पैजंणांचा आवाज ऐकुन चांदोबास ही गाणे सुचले छम छम छम ताल धरता फुलांनी त्यात सुर गुंफले || गायला मेघ म्हलार ढगांनी चिवचिव गायीले चिमण्यांनी पावसाची आली अल्लड सर त्यात सर्वांनी भिजुन घेतले ||
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 05/17/2020 - 08:02 नवीन
मेघ मल्हार असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
च
चांदणे संदीप Sun, 05/17/2020 - 09:19 नवीन
तू त्यावेळी बोलत नसली तरी तुझं बोलणं शरीराच्या रोमारोमातून व्यक्त व्हायचं. तुझे भिरभिर डोळे आणि त्यातली बेचैनी. बाहेर डोकावणार्‍या थेंबाना पापण्यांच्या कडांवर कितीतरी वेळ अडवून धरणं, त्यांना बाहेर पडू न देणं, हे कसं जमायचं ते तुझं तुलाच ठाऊक पण ते दिसायचं मला. केसांच्या बटा कितीतरी वेळा कानाच्या मागे खोचायचीस पण त्याही सारख्या निसटून वार्‍यावर उडत, कधी डोळ्यांवर तर कधी गालावरून हनुवटीच्या खालीपर्यंत वेढा टाकून बसायच्या. पायाचा अंगठाही मातीशी अविश्रांत बोलत रहायचा. मावळतीकडे, डोंगरांच्या आड सूर्य गेल्यावर सभोवताली मंद संधिप्रकाश पसरून वार्‍याला जेव्हा शब्द फुटायचे तेव्हा ते गुंग होऊन ऐकत असतानाच अचानक तुझी निघायची सूचक हालचाल जाणवली की काळजात धस्स व्हायचे. झंकारणार्‍या वीणेची तार अचानक तुटल्यावर होते तसेच. तो कंप नकोसा वाटतो. आजही तुझ्या नि माझ्या त्या अबोल भेटीचे गाणे एखाद्या सायंकाळी आठवते आणि मी ते गुणगुणत बसतो. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 05/17/2020 - 09:28 नवीन
किती अलवार.. किती सुंदर.. वाचतच रहावे असे शब्द.. अश्या सुंदर भावना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
म
मन्या ऽ Sun, 05/17/2020 - 13:07 नवीन
पुन्हा पुन्हा वाचत रहावी. इतकी सुंदर, ओघवती कविता.. आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
म
मन्या ऽ Mon, 05/18/2020 - 13:18 नवीन
मनाचे वारु सैरावैरा धावु लागले परत त्यांच्यावर ताबा मिळवण कठीण. किती गुरफटत जाते मी विचारांत. ठावच लागत नाही मनाचा. तुला काय हवंय? असा प्रश्न केला तर सगळ्या इच्छा रेल्वे इंजिनाच्या डब्यासारख्या धडधडत एका मागोमाग रांग लावतात. म्हणुन आताशा हा प्रश्नच चुकीचा ठरवुन तो स्वतःला विचारण बंद केलंय मी. मग उरत काय? तर आता काय मिळवायचंय? हा एकच प्रश्न विचारते मी स्वतःला. आणि त्याची उत्तर. ती च शोधतीये.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 05/18/2020 - 20:21 नवीन
मन असतेच असे बिलोरी.. फसवं. कधी वाटते हे मन म्हणजे नक्की कोण आहे? मीच तर नसेल ना? मग पुन्हा असे वाटते माझे मन आहे म्हणजे मीच, माझीच भावना बाकी काय? .. .. छे, काहीच नक्की होत नाही.. मी असेल तर ते असे मुक्त.. स्वैर.. स्वछन्दी कसे काय? मी तर बांधून ठेवलय मला.. लोक काय म्हणतील.. कसे दिसेल.. ह्याला काय वाटेल.. त्याला काय वाटेल असल्या असंख्य बेड्यामध्ये गुरफटलेलोय मी.. हे मन म्हणजे मी नाहीच.. पण पुन्हा वाटते... माझीच तर इच्छा असेल की मन माझे.. माझ्या सारखच फुलपाखरासम इथं तिथं उडणारं. विचारांच्या गर्तेत खोल खोल जाऊन ही, त्या भुलभुलैयातून पुन्हा रस्ता शोधणारं... आपसूकच शांत होणारं.. स्वताचीच स्वतः समजूत काढणारं.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 05/19/2020 - 09:12 नवीन
मरणंच अटळ असेल तर, आपल्या गावाकडं जाऊन मरूया... असं म्हणत जरूरीपुरती आणि झेपतील एवढी बोचकी घेतली डोक्यावर, कंबरेवर, पाठीवर त्याचं ओझं शरीराला लागत नव्हतं मनाला भार जाणवत होता तरीही लागले चालायला इथल्या मरणापासून लांब तिकडच्या जीवनाच्या शोधात.. त्याच्याच शोधात तर आधी शहरात आले होते ते सारे उधार्‍या, उसनंपासनं करून, काहीबाही गहाण ठेऊन हातातले हात सोडवून पुढचं पुढं बघू असं म्हणत... ओळखीच्याचा हात धरून आलेले सुरूवातीला काहीच कळत नव्हतं, काय चाललंय एकेक दिवस एकेक गोष्ट शिकवत होता शहरात रूजवत होता शिकले, रूजले, आताशा कुठे जगायला लागले होते काडी काडी करून एक ओबडधोबड घरटे विणलेले आता पुन्हा त्याच्या काड्या झालेल्या पण या क्षणी परत गावाला जाताना प्रश्न होताच... इथून मुळासकट उपटलेल्या आपल्या आयुष्याची रोपटी पुन्हा गावाकडे जगतील? का जातील जळून? शहराने शिकवलंच की! गावही घेईल सांभाळून आपल्या वाडवडिलांचं आहे ते आई, मामा, मावशी, आत्या, काकांच सारे तर तिथेच आहेत काही जमिनिच्या वर काही जमिनिच्या खाली असा विचार करत... एकेक पाऊल उचललं जात होतं मरणंच अटळ असेल तर, आपल्या गावाकडं जाऊन मरूया... असं म्हणत! सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Tue, 05/19/2020 - 20:00 नवीन
मागच्या आठवड्यात, एक माऊली चालली होती आपल्या 2-3 लेकरांना घेऊन. महाराष्ट्र ते राजस्थान. तिची इवलीशी एक पोर तिच्या मागून रडत खडत चालली होती. इवले इवले पाय तापलेल्या रोडवर चालून काळेकुट्ट पडले होते. तिच्या डोळ्यात मात्र तरीही ओढ होती कशाची तरी. कदाचीत घरी पोहचल्यावर, तिला बाहुली चे आमिष दाखवले असेल किंवा गाडीचे, ह्या असल्या उन्हात तीचे चालणे मनाला लागले. डोळ्यातून पाणी आले, पण आपण करतो का किंमत आपल्या विचारांची? बहुतेक नाही. आपण आता टीव्ही पुढे बसून कोण बरोबर कोण चूक, कोणास काळजी हेच करतो आहोत.. त्या चालणाऱ्या इवल्याश्या मुलीचे मन तर कधीच करपून निघाले असेल, असल्या रखरखीत उन्हात आणि भावनाशून्य माणसांच्या कळपात.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Tue, 05/19/2020 - 21:02 नवीन
न्युज चॅनेल लावला कि घरात ह्याच विषयावर चर्चा सुरु होतात. कोण चुक कोण बरोबर यावर वाद-विवाद! नको वाटत ऐकायला अन् यावर बोलायलासुद्धा. अशावेळी मी तिथुन लांब जाते. पण आत्ता मी बेडवर लोळत हा प्रतिसाद टाईप करतीये. यातच मी सुद्धा तशीच भरल्यापोटी चर्चा करणाऱ्या लोकांपैकी एक कोरड्या मनाची होत चाललीये का??.. अस वाटायला लागलंय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिती-राधा
म
मन्या ऽ Wed, 05/20/2020 - 22:09 नवीन
आज लवकर झोपायचं ठरवलं अन् बेडवर आडवी झाले पण काही केल्या झोपच येईना.. शांततेत गाणी ऐकताना मन अगदीच अलवार कडु गोड आठवणींच्या नव्या-जुन्या पुस्तकाची पान एकेक करुन उलगडु लागलं.. असं मनन करतेवेळी वेळ किती छान जातो ना.. हे विचारायलाच नको.. आता फक्त एकच करायचं बाकी आहे. त्या आठवांची उब घेऊन शांत झोपी जायचंय. परत एकदा आठवणींच्या हव्याहव्याशा प्रवासात.. हातात हात घालुन शीळ फुंकत.. स्वप्नांच्या देशात.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 05/21/2020 - 17:28 नवीन
12-13 तास काम असते आता, त्यामुळे नीट येता हि येत नाही.. पण आलोच आहे तर जाता जाता लिहतो काही सुचते तसे.. ----------- पहाटे पहाटे पैंजणांनी मला जाग यावी ओठांवर अलगद हलकीशी तुझी कळी उमलावी पाकळी पाकळी खुडताना तू सुगंधी मोगरा व्हावी मिठीत गच्च ओढता तू मात्र वीज बनावी -- शब्दमेघ 21st May 2020, 8:57 pm
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Fri, 05/22/2020 - 21:27 नवीन
मी आता ढब्बू मोगरा झाली आहे तू असेच बोलतो मला. कशी असेना मी माझी पण तुझी नजर लागू नये म्हणून अजूनही तीळ माझ्या ओठांवर पहारा देत असते. तू ढब्बू मोगरा बोलला की हे तीळ तुला तिळ तिळ तरसवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
मन्या ऽ Fri, 05/22/2020 - 21:58 नवीन
खिडकीतला मोगऱ्याचा पहिला बहर ओसरल्यानंतर ह्यावर्षी परत मोगरा बहरलाच नाही. गेले 4-5वर्ष जसा उन्हाळा सरेपर्यत रात्र रात्र दरवळायचा. तसा ह्यावर्षी दरवळलाच नाही परत.. :( काय कारण असावे? त्याच्याच मोसमात त्याचे असे रुसायचे.. काही कळायला मार्ग नाही.. का जगभरातल्या "काळाच सावट" त्यालाही खोलवर कुठेतरी जाणवलं असेल? त्यांच्या दुःखात हरवुन तोही त्याच पुन्हा 'बहरण-दरवळण' विसरला असेल??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिती-राधा
ग
गणेशा Sat, 05/23/2020 - 04:52 नवीन
प्रिती-राधा आणि मन्या भारी लिहिले आहे.. ढब्बू मोगरा -:)) -:)) मन्या.. तू खूपच मनाचे ठाव घेणारे लिहिते आहे.. खुप आवडले. ज्या वेळी कविता लिहिली तेंव्हा गॅलरीत मोगऱ्याला फुल आले होते. त्याचा पहिला फोटो काढला होता.. ते पहिले फुल या मोसमाचे.. आता असंख्य कळ्या आल्यात. पांढरी फुले मला कायम आवडतात. आता हा मोगरा आहे की ढब्बू मोगरा -:)) -:)) Image removed. अवांतर : पूर्वपरीक्षण मध्ये हा फोटो दिसत नाहीये. गुगल फोटोज वरून फोटो दिसत नाहीत का येथे? Src हि आहे. - https://photos.app.goo.gl/pGCqHysUHWrgT5Qf8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिती-राधा
ग
गणेशा Sat, 05/23/2020 - 04:52 नवीन
प्रिती-राधा आणि मन्या भारी लिहिले आहे.. ढब्बू मोगरा -:)) -:)) मन्या.. तू खूपच मनाचे ठाव घेणारे लिहिते आहे.. खुप आवडले. ज्या वेळी कविता लिहिली तेंव्हा गॅलरीत मोगऱ्याला फुल आले होते. त्याचा पहिला फोटो काढला होता.. ते पहिले फुल या मोसमाचे.. आता असंख्य कळ्या आल्यात. पांढरी फुले मला कायम आवडतात. आता हा मोगरा आहे की ढब्बू मोगरा -:)) -:)) Image removed. अवांतर : पूर्वपरीक्षण मध्ये हा फोटो दिसत नाहीये. गुगल फोटोज वरून फोटो दिसत नाहीत का येथे? Src हि आहे. - https://photos.app.goo.gl/pGCqHysUHWrgT5Qf8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिती-राधा
म
मन्या ऽ Sat, 05/23/2020 - 05:28 नवीन
प्रतिसादात नाही. पण फोटो लिंकवर दिसतोय. माझ्याकडे घरी बट-मोगरा आहे. पण रुसलाय ह्यावर्षी. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Fri, 05/22/2020 - 21:14 नवीन
12-13 तास काम असते आता, त्यामुळे नीट येता हि येत नाही..
उद्या सुट्टी असेल मग? ह्या घरातून काम करणाऱ्या लोकांनी पार नको नको केले आहे. शिऱ्या पण असे 8-9 तास काम करतो. काय बोअर होते त्यांच्या मिटींग्स ने, कॉल ने. ते लॉकडाऊन तोडून बाहेर गेलेलं परवडले असेच वाटत आहे मला तरी. घराचे ऑफिस केले आहे सारे, अन किचन म्हणजे चहाच्या टपऱ्या.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 05/23/2020 - 05:52 नवीन
असं म्हणतात रात्रीच्या अंधारात चोर, लुटारू घराबाहेर पडतात. पण इथे, दिवसाढवळ्या, जर कोणी अतीव सुंदर डोळ्यांच्या भुलीत पाडून लुटत असेल तर... ...तर आम्ही सर्वस्व लुटायला तयार आहोत! सं - दी - प
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 05/23/2020 - 06:29 नवीन
इथे आहे भाजी ताजी, लवकर इकडे ये , चला घुसा घाई करा, थोड्या हिरव्या मिरच्या दे तिकडे काय आहे बघू, चला वेळ उरला थोडा सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा गावालाही जायचे आहे, चला बस पकडू, धावत धावत जाउ आपण, रांगबिंग मोडू रांगेतबिंगेत उभा राहायला, समजला का मला येडा? सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा रस्त्यात थुंकू नको तर काय तुझ्या खिशात थुंकू? शहाणपणा शिकवू नको, जा रे उगाच नको भुंकू, तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मग तुम्हीच रस्ता झाडा सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा पोलिसाला काही समजत नाही, उगाच मारतो दांडू, मी काय करायचे ते सांगणारा, कोण आहे हा पांडू? घरीच बसा, बाहेर फिरु नका, यांचा रोजचाच पाढा सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे, फुकट सगळे दिले पाहिजे, टॅक्सही माफ केले पाहिजे, अन अनुदानही दिले पाहिजे, पैसे कमी पडले तर, सामान्य जनतेच्या तिजोर्‍याही फोडा सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा आम्ही करोना सोबत राहू पण, पण त्याला ते नको आहे करोना प्राण घातक आहे, हे देखिल सपशेल खोटे आहे, अख्या जगाच्या अनुभवावरुन आम्ही शिकणार नाही धडा सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 05/31/2020 - 10:58 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ग
गणेशा Sat, 05/23/2020 - 07:19 नवीन
@ संदीप तुझ्या शब्दात जादू आहे कसली तरी.. वाचतच बसावे वाटते बऱ्याचदा... @ पैजार बुवा तुम्ही प्रेरणा स्थानी.. एकसुरी लिखाणाला तुम्ही ज्या कलेने वेगवेगळे कंगोरे लिहून तसा आमचा विचार बदलावता ते खूपच भारी वाटते.. तुमच्या लिखाणाला हा धागा खुप मिस करतोय... इतर प्रतिसाद देणारे मनात इतके काहुर उठवतात की बस.. काय विचार.. काय शब्द वाचतच बसावे वाटते... आज काहीतरी लिहीन आवरून आल्यावर... बघू... तुम्ही सगळे लिहीत रहा.. वाचत आहे...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 05/23/2020 - 10:59 नवीन
तुमच्या लिखाणाला हा धागा खुप मिस करतोय... मी पण हा धागा आणि एकंदरीत मिपाच मिस करतोय. सध्या कामाचा बोजा प्रचंड वाढला आहे की मान वर करायला देखिल सवड मिळत नाही. पण तुम्ही सगळे मस्त लिहित आहात तुझा आणि संदिपचा प्रश्र्णच नाही पण या निमित्ताने या धाग्यावर काही नवी नावे दिसली त्यांनी सुध्दा १०० नंबरी अस्सल प्रतिसाद दिले आहेत. मस्त मजा आली आज हा धागा वाचताना. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Sat, 05/23/2020 - 11:14 नवीन
मला पहिल्यांदा आपली विशी खुप आवडायची.. बेधडक .. बेदरकार.. वाट्टेल तसे जगण्याची मज्जा काही औरच होती.. मग आपण तिशीत प्रवेश केला आणि मग जाणवले.. तिशी खुपच हँडसम असते.. खरा भारी पुरुष हा तिशीतलाच असतो असे आपले मत. जीवनाचा काय बॅलंस साधलेला असतो.. प्रेम, माया, बाप, नवरा, अनुभव, घर, माणुस ,हळवा पण तितकाच कणखर. ह्या तिशी वर पण आपण लय प्रेम केले... बाप असल्यामुळे हि ह्या तिशीत ही आपण पुन्हा बरेच बालपण जगुन घेतले... आता ह्या तिशीचा हि उत्तरार्ध चालू झाला आहे... वाईट वाटते.. हे वयच असे आहे.. आता आपल्यालाच असे वाटते, की बाबा रे आता तुझ्या आयुष्यात खुप थोडे दिवस राहिलेत.. जगून घे.. आता नाही तर कधीच नाही.. संपतोयस तू.. उद्याचा दशकातला सूर्य तुझा नसेल.. बऱ्याच गोष्टी राहिल्यात.. राहू दे, दे सोडून.. पुन्हा नव्याने उठ.. नविन गोष्टी कर.. सर्वावर प्रेम कर.. मनसोक्त जग त्या ढगा सारखं.. मुक्त.. स्वैर.. स्वछंद...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 05/24/2020 - 05:07 नवीन
मृग बरसला की तो भेदभाव करत नाही... कसल्याही आठवणींना तो सरळ सरळ झोडपून काढतो.. पापण्यांच्या प्रदेशात मग.. ढगही हुमसू हुमसू रडतो... चंद्रखळ्यांचे तुडुंब भरलेले बंधारे मग फुटून जातात... आठवणींच्या घरट्यात निजलेली स्वप्ने, मग काहुर बनून सैरा वैरा पळू लागतात...
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 05/24/2020 - 06:40 नवीन
पुन्हा आला हा पाऊस पुन्हा हा स्पर्धा करणार यंदाच्या पावसाळ्यात कोण जास्त रडणार सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Sun, 05/24/2020 - 07:41 नवीन
ती आता पावसात भिझायला येत नाही... त्याला मग नायलाजानं माझ्या कडं यावं लागतं.. एक एक थेंबागणिक, तिला आठवावं लागतं.. तिच्या पापण्या पल्याड च्या गावा, हि ओल पोहचत असेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Sun, 05/24/2020 - 08:40 नवीन
तुझ्या आठवणींत भिजायला मला पाऊस लागत नाही... आभाळात ढगांची नुसती दाटी झाली तरी मनात आठवणींच्या सरी पडायला लागतात आणि मी भिजू लागतो... आतल्या आत! सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Sun, 05/24/2020 - 09:33 नवीन
इकडे लिहितो प्रतिसाद.. एका खाली एक खुप बारीक होतो प्रतिसाद.. वाचायला निट जमत नाही.. ------------- त्या ढगाला पण आता काही सुचत नसेल तुझ्या स्वप्नझुल्यावर उगाच रेंगाळताना पावसाला शब्दात पकडणे जमत नसेल... आणि आता तळहातावर पाऊस पकडतोय, तर तोही हात सोडतोय... तुझ्या सारखाच...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 05/24/2020 - 17:28 नवीन
माझं अन पावसाचं नातं तसं फार जुनं आहे .. तू नसताना माझ्या पाशी उगाच त्याचे मागे मागे चुकार घुटमळणे आहे.. आणि आता, गालावरून ओघळताना एक एक थेंब मला तू तिथे दिलेल्या हजारो मुक्यांचे हिशोब मागत बसला आहे...
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Sun, 05/24/2020 - 18:10 नवीन
तुला समुद्र आवडायचा., मला पाऊस! मग पावसात मरीनड्राइव्ह वर आपण असंख्य लाटा अंगावर झेलायचो. नंतर एक लाट अशी आली की मी पुण्यात फेकली गेली, कायमचीच.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 05/24/2020 - 20:23 नवीन
शांतपणे किनाऱ्यावर बसून लाटा बघणे हा एक नितांतसुंदर अनुभव असतो. काही लाटा सरावल्याप्रमाणे येत राहतात एकामागून एक आणि मध्येच एखादी असते जिला इतरांपेक्षा स्वतःला वेगळं दाखवायचं असतं. आपल्या क्षणभंगुर आयुष्याला उंच उठून वाकुल्या दाखवत किनाऱ्याच्या आणखी जरा जवळ येऊन ती आपलं वेगळेपण सिद्ध करते आणि पुन्हा विरून जाते. आपल्या आयुष्यात येणारी काही माणसंही अशीच लाटांसारखी असतात. काही सरधोपट तर काही उंच उठून वेगळं आयुष्य जगणारी. सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Sun, 05/24/2020 - 20:41 नवीन
समुद्र म्हंटला की मला लख्ख चांदण्यात त्याच्या किनाऱ्यावर बसण्यास आवडते. चंदेरी दिसणाऱ्या लाटा सुरेख. पण त्यांचा एका लयीत येणारा आवाज मनात घट्ट बसतो. कोकणात जाते तेंव्हा मी समुद्रावर अशी, रात्री जाते. रात्र मनात साठवणे म्हणजे काय हे तिथे कळते. बाकी तारकांनी भरलेल्या अश्या असंख्य राती, कधी सख्या बनून सोबत राहतात.. कधी विस्मरणात जातात., मला भेटलेल्या माणसांसारख्या.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 05/25/2020 - 12:48 नवीन
आज सकाळीच, फेसबुक वरील मित्राने koama lanbada ह्या गाण्या बद्दल लिहिले होते.. koama lanbada हे ते गाणे. ते वाचले आणि त्या गाण्याला असंख्य वेळा पाहिले.. अशी डान्स असलेली गाणी , तसेच उत्कृष्ट संगीत असलेली गाणी मला खुप आवडतात. मला संगीता मधले काही कळत नाही, डान्स चे ही तसेच, पण मनाला भिडले की ते आपले आवडीचे होते. ----- कॉलेजला असताना वेगवेगळ्या भाषांतील गाणी पण यायची मला Ranu Ranantune Sinnado Sinnado हे तेलगु गाणे तर माझे पुर्ण पाट होते.. इलाई राजा हा आपला अजुनही आवडता संगितकार त्यामुळे त्याची असंख्य गाणी मी शब्द न कळताही ऐकलेली आहेत.. वा इलाई राजा म्हणजे संगिताचा बादशहाच. =============== तर झाले असे २०१६, ला कंपणीत पल्लवी माझ्या टीम मध्ये होती, चांगली मैत्रीण झाली नंतर ती, ती मला म्हणाली न येणार्‍या भाषेतील गाणी ऐकण्या पेक्षा तु इंग्लिश, पाश्चिमात्य गाणी का ऐकत नाही ? निदान २० % तरी कळतीलच की, आणी मग तीने काही गाण्यांची ओळख करुन दिली.. तिला ती गाणी यायची.. तीला वेस्टर्न लाईफचे आकर्षण होतेच .. मग माझा प्रवास सुरु झाला इंग्रजी गाण्याकडे.. तीला कोल्डप्ले आवडायचा.. मग त्याची असंख्य गाणी ऐकली, पाहिली.. त्यावेळेस मला ४-५ च गाणी यायची, तसे तेव्हडीच येतात अजुनही :-). इंग्रजी गाणी येणारे आणि कळणारे पाहिले की मला त्यांचा हेवा वाटतो. ती ४-५ गाणीच अजुन ऐकतो मी मोबाईल ला, ती गाणी म्हणजे - ब्लँक स्पेस. टेलर स्विफ्ट तर आपल्याला लय आवडली, मग तीची इतर ही गाणी बघितली, पण ब्लँक स्पेस म्हणजे क्या कहना.. - cheap thrills च्या गाण्या आणि डान्स मुळे तर मी वेडाच झाले.. आराध्या ला पण हे गाणे माझ्या रिंग टोन मुळे पाठ झाले.. भारीच - Counting Stars हे OneRepublic चे गाणे पण मला आवडलेले.. पाठ पण होते. - The Chainsmokers - Closer हे गाणे तर मला त्याच्या बिट्स आणि लोकेशन मुळे खुप आवडले.. जोडी काय दिसली आहे गाण्यात.. - perfect strangers पण खुप आवडले. तर आपला हा येव्हडाच इंग्लिश गाण्यांचा संबंध.. मध्यतंरी डेस्पेसिटो आलेले, ते पण खुप आवडले. स्पॅनिश संगितात नक्कीच काही तरी जादू आहे असे मला नेहमी वाटते.. त्यामुळे आजचे कोअमा लाम्बाडा हे गाणे आणि तो डान्स प्रकार मनात घर करुन केला... नुकताच एका मैत्रीणीने , डर्टी डान्सिंग पिक्चर बघायला सांगितला त्यामुळे पाहिला , वा काय मस्त डान्स स्टाइल्ची माम्बो पद्धत.. वा.. आजचा दिवस असा डान्स आणि संगिताने परिपुर्ण भरलेला आहे हे नक्की.. मध्येच मग मी आपली आवडीची शकीरा पण ऐकली... कधी कधी अशी गाण्यांची, संगिताची वातावरणात एक वेगळीच नशा चढते.. मजा येते. गेल्या आठवड्यात - केंव्हा तरी पहाटे उलटुन रात गेली, गेले द्यायचे राहुनी आणि ती गेली तेंव्हा पाऊस या गाण्यांनी अशीच माझ्याबोवती रुंझी लावली होती.. अवांतर : डान्स आपल्याला येत नाही, पण गेल्या वर्षी kuala lumpur मध्ये रात्री १-२ ला मी रस्त्यावर भटकायचो तेंव्हा लोकल डान्स बँड मध्ये जावून त्यांच्या तालावर थिरकलो होतो .. वा. भारतात ही डेअरींग कधी करता आली नाही. २०१६ -१७ ला जेव्हडे पब बार मध्ये डान्स केले तेव्हडेच नी आतापर्यंत केलेले डान्स, सहज आठवले हे. आता वाटते आपण डान्स शिकायला हवा होता.. असो.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 05/25/2020 - 17:06 नवीन
.....एका अमावास्येच्या मध्यरात्री कळसूबाई शिखराच्या तळटेकड्यांमधल्या गावात मुक्कामाला असताना आकाशात चा॑दण्या॓चा खच पडलेला दिसला अन त्याचवेळी जवळच्या टेकडीच्या माथ्याशी पिठुर चांदण्यात न्हालेले ढग भिडताना दिसत होते, त्या म॑त्रमुग्ध वातावरणात एक कविता सुचली होती. (जी नंतर मिपावर दिली होती) मला वाटतं प्रत्येक कवितेला अशी एक जन्मकथा असते!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 05/25/2020 - 18:34 नवीन
@ अनन्त्_यात्री माणुस म्हणलं की त्याचे विचार आले.. त्याचे भावविश्व आलं.. त्याने पाहिलेले, अनुभवलेले, मी तर म्हणेल त्याने जगलेले क्षण आले. ह्या सगळ्या गोष्टींना शब्द मिळाले की कविता तयार होते.. कधी कधी ती असते त्या विचारांप्रमाणे भरकटलेली.. तिच्या केसांच्या सारखी.. कधी असते ती, तिच्या नटलेल्या रूपा सारखी, लय बद्ध. कधी कधी अवतरते ती , चांदण्यांनी भरलेल्या आकाशासारखी.. मग कवी ओंजळीत भरून घेतो ते शब्दचांदणे.. चंद्रभूल म्हणा हवे तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/25/2020 - 19:06 नवीन
चंद्रभूल, शब्दातच अशी भूल आहे की त्या चांदण्यारातीला सगळे विसरून मन त्याच्याकडे धाव घेते., भूल नाही नशाच ती. मेले ढग तेथे हि मध्ये येतातच. काय करावे या द्वाड ढगांचे?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/25/2020 - 19:21 नवीन
मग हळूच ढगांच्या पडद्याआडून झाकला चंद्र बाहेर येतो, काळ्या मेघांची किनारही रुपेरी होऊन जाते. रोहिणी चमकू लागते, चंद्रालाही तिची भूल पडू लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिती-राधा
ग
गणेशा Tue, 05/26/2020 - 12:37 नवीन
हे ढग खुप द्वाड असतात, आकाशाच्या शाळेत जाऊनही नेहमी टारगट पोरांसारखे बाहेरच भटकत राहतात... कधी उंच शिखरावर उगाच ध्यानस्त होतात, तर कधी झाडाशी हितगुज करतात..,कधी हलकेच फिरून येतात त्या शेताच्या बांधावरून, त्या निरव शांत तळ्यावरून... कधी ते सूर्याची किरणे लेऊन सोनेरी होतात, तिच्या केसातील बटांसारखे..कधी चंदेरी तिच्या कानातल्या गोल रिंगांसारखे... कधी संध्याकाळी त्यांवर चढते केशरी लाली, तिच्या गालासारखी.. तर कधी ते चंद्रखळे बनतात.. तिच्या कातिल खळ्यांसारखे.... म्हणूनच कदाचीत अजूनही जपून ठेवलंय काही ढगांना मी, माझ्या श्वासात... माझ्या मनात... फक्त तिच्या साठी... --- शब्दमेघ.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Tue, 05/26/2020 - 22:28 नवीन
रंग त्या इंद्रधनुचे आता फिकट होऊन जणु नाहीसेच झाले एक वर्तुळ पुर्ण झाले.. अतुट धागे मनामनांचे जे एकेकाळी वाटले होते ते काही क्षणात तुटले एक वर्तुळ पुर्ण झाले अथांग समुद्र अन् निळ्याशार आभाळाचे नाते समांतर प्रवास करत राहीले.. एक वर्तुळ पुर्ण झाले.. दिप्ती भगत (२७मे, २०२०)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 05/31/2020 - 11:00 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ
व
वीणा३ Tue, 05/26/2020 - 22:44 नवीन
धागा मस्त आहे, वाचत्ये !!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/27/2020 - 06:56 नवीन
@ मन्या.. मला की नाही, मी नेहमी जगाच्या परिघावर असणारा एक बिंदू वाटतो.. या परिघावर.. या वर्तुळामध्ये.. अनेक माणसे येतात, जातात.. पण मला कायम वाटत राहतं, किती हि लांब गेलं ना कोणी तरी ते माणुस पुन्हा भेटत राहतं. कोणाच्या वाटा पुन्हा त्रिज्यां सारख्या मला छेदून जातात.. कोणाचे आठवणींचे ठिपके हळूच दुरावून खुणवत राहतात.. कोणाच्या मोठ्या मोठ्या सावल्या त्या व्यासा वर लोंबकळत राहतात.. अस्पष्ट अश्या... कधी माझ्याच भावनांचा एखादा लंबक, हळूच छेदून जातो तुटलेल्या त्या दूरच्या त्रिज्येला.. आणि विचारपूस करून आपसूक बसतो गप गुमान, आपले स्वतःचे कोण मोजत.. कधी कधी तर मी कोणाला पाहत नाही.. एकटाच असतो या परिघावर.. तरी तीचा आवाज येतो कुठून तरी... "तुझ आभाळ माझ्या समुद्रावर का घोंगावत आहे? " मी बापडा गप्प राहतो फिरत, माझ्याच विचारांच्या कक्षेत.. कधी कधी म्हणूनच माझ्या येथे ग्रहण लागते तीचे.. तिच्या विचारांच्या सहित.. पण थोड्यावेळच...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 05/27/2020 - 07:23 नवीन
रंग त्या टेबलक्लॉथचे आता फिकट होऊन जणु नाहीसेच झाले दोन पेग पोटात गेले.. अतुट पुडके ते चखण्याचे जे एकेकाळी वाटले होते ते हातात फुटून खोलीभर फरसाण उधळले तीन पेग पोटात गेले पियक्कड मित्र अन पतियाळा पेगचे नाते नाते एकत्र प्रवास करत राहीले.. किती पेग पोटात गेले???.. पैजारबुवा, (इ.पू. ३१ फेब्रुवारी २०३६०)
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Wed, 05/27/2020 - 19:42 नवीन
विडंबन आवडलं!! :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ग
गणेशा Wed, 05/27/2020 - 08:24 नवीन
वर्तुळ आणि वर्तुळाची फिरकी (विडंबन) दोन्ही आवडले... :-)) :-)):-))
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Wed, 05/27/2020 - 08:42 नवीन
पृथ्वी सकाळी फिरून पुन्हा त्याच जागेवर आली की सकाळी सकाळी माझे पण वर्तुळ सुरु होते. राधेच्या., माझ्या मुलीच्या गळ्यात टाकलेल्या हातापासून, नक्षत्रांचे हातच ते. मग नंतर, पृथ्वी च्या गतीपेक्षा मी जोरात फिरायला लागते. राधेचा नाष्टा, शिऱ्या चा चहा, त्याची तयारी, कपडे, भांडी भाज्या घेणे हे चक्र असेच चालु राहते. मग राधेला शाळेतून आणताना, मैत्रिणी भेटतात, थोड्याश्या गप्पा, थोडेसे मुलांकडे लक्ष. घसरगुंडी वरून रोज राधेला ओढून आणावे लागते. मग पुन्हा तीचे जेवण, तिला झोपवणे., नंतर उठल्यावर थोडा अभ्यास, थोडे काढलेल्या चित्राला रंग सुचवणे. शिऱ्या आल्यावर पुन्हा त्याचा चहा. मग टीव्ही., मग जेवण. आणि रात्रीला शिऱ्याचे गळ्यातील अवखळ हात, चांदण्यांचा हारच जणू.
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Wed, 05/27/2020 - 08:55 नवीन
सकाळी सकाळी माझे पण वर्तुळ सुरु होते. राधेने., माझ्या मुलीने माझ्या गळ्यात टाकलेल्या मिठीपासुन, नक्षत्रांचे हातच ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिती-राधा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा