कृष्णबावरी..
भारलेल्या त्या स्वरांची तान छेडे बासरी
गीत कान्हाचे असे राधे तुझ्या ओठावरी..
पाहताना दर्पणी त्या रंग भासे सावळा
कृष्णबिंबा! तूच की मी?"... हाय ! राधा बावरी..
मोहनाला रेखिते ती लोचनांच्या अंगणी
दृष्ट काढी काजळाने सावळ्या थेंबावरी..
पैलघंटा वाजते ना सांज आली राऊळी
ऐकण्या आतूर राधा माधवाची पावरी..
नीळवर्णी मोरपीशी गुंतलेली राधिका
ती मयूरा कृष्णवेडी नाचते या भूवरी..
सप्तरंगी नाहला वृंदावनीचा श्रीहरी
ल्यायली श्रीरंग राधा त्या तिच्या कायेवरी..
- प्राजु
मिसळपाव