Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डाॅक्टरांची फी

स
स्वधर्म
Wed, 03/11/2015 - 11:02
🗣 429 प्रतिसाद
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता. एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही. - स्वधर्म

प्रतिक्रिया द्या
82348 वाचन

💬 प्रतिसाद (429)
आ
आयुर्हित Wed, 03/11/2015 - 16:29 नवीन
माझ्या प्रतिसादात "उपचार न घेता घरी बसा" असे कुठे म्हटले आहे? उपचार घ्यायचे तर घरी बसूनही उपचार घेता येतात, या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायची गरजच नाही! आणि फक्त हृदयातिल तर सारे ब्लॉक निघतातच, संपूर्ण शरीरात अजून कोठे(मानेत, मेंदूत, यकृतात, वृक्कमध्ये, डोळ्यात, पायात) असतील तिथले सारे ब्लॉक निघतात. त्यासाठी एवढी महाग आणि जीवघेणी "बायपास"च का? डॉक्टर ती सुचवितात कारण या सर्जरीने एका दिवसात लाखो रुपये कमावता येतात म्हणूनच, इतर काही कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 03/11/2015 - 16:52 नवीन
I don't discuss Modern Medical Procedures with ...... Thank you.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Wed, 03/11/2015 - 17:33 नवीन
आपल्याला Modern Medical Procedures जर माहित असते तर बायपास ला नक्कीच पर्याय सांगितला असता! पण नाही.... माहित असेल तर सांगालना. आपल्या माहितीसाठी मी नीम हकीम नाही तर Modern Medical Procedures चा अभ्यासू व खंदा पुरस्कर्ता आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 03/11/2015 - 16:07 नवीन
उदाहरण अ. मला शर्ट विकत घ्यायचा आहे. ब्रँडेड शोरूममधे "शर्ट" साडेतीन हजार रुपयाला मिळतोय. शेजारीच श्री जयहिंद क्लॉथ स्टोअरमधे "शर्ट" १५००ला आहे बाहेर फुटपाथवर "शर्ट" १५० रुपयांत आहे. घासाघीस करून सव्वादोनशेत जोडी मिळेल. जगातल्या मोठ्ठ्ठ्ठ्या ब्रँड्सचेही कपडे चीन बांग्लादेश वगैरे ठिकाणच्या स्वेट्शॉपमधेच शिवले जातात. लेबलही तिथेच लावतात. पुढची किंमत ब्रँडमुळे वाढते. उदाहरण ब. ताजमधे "चहा" कितीला मिळतो? अमेरिकेत कितीला? बर्‍या हॉटेलमधे? रस्त्यावरच्या टपरीवर? का? उदाहरण क. सरकारी सेवा. रेल्वे. जनरल बोगी तिकिट किती? स्लीपर कोच किती? थर्ड एसी, सेकंड एसी, फर्स्ट क्लास? डिझेल तितकेच, इंजिन तेच, रुळही तेच, मशीनरीतली इन्व्हेस्टमेंटही तीच. त्यातही पासवाल्यांना एसीचा रेट वेगळा, सीझन तिकिट वाल्याला वेगळा, सैनिकाला वेगळा इ. का? उदाहरण ड. व्हॉट्सॅपवरचा फेमस केळीवाला जोक. भैय्या, केले कैसे दिया? घर मे खानेको १० रुपये. मंदिरमे चढानेको १५, अस्पताल्वाले मरीज को देनेके लिये २० एमेसईबी ज्यु. इंजिनियर : भाई, केला वोही, भाव अलग क्यूं? केलेवाला : साब, बिजली वही, डोमेस्टीक, धार्मिक, कमर्शिअल भाव अलग क्युं? चला, निनाद जोशींना सोबत घेऊन आपण या सर्वच प्रकारच्या असमानतेबद्दल आंदोलन करू या. त्यांना (काही) डॉक्टरांना मिळणार्‍या पैशांचा फारच राग आलेला दिसतोय. ;)
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Wed, 03/11/2015 - 16:17 नवीन
फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. डॉक्टरला 'धंदा' कुणी शिकवत नाहीत कालेजात. बिझिनेसचे ज्ञान शून्य असते. घरचा दवाखाना वगैरे आधीच असेल तर वेगळी बाब, पण खानदानात प्रथमच हा उद्योग करणार्‍याचा लोचा होतो. एकतर सरकारी हॉस्पिटलात पैसे घ्यायचे नसतात ही सवय. आपण केलेल्या कामाचेही पैसे मागायची खरच लाज वाटते, अन त्या काळात अनेक फुकटे लुटून घेतात. हे झाले अवांतर. तर गम्मत अशी, की प्रॅक्टीस सुरू केली तेव्हा मी माझी कन्सल्टेशन फी ठेवली होती ३० रुपये. (त्या पहिल्या पेशंटने दिलेल्या १० रुपयांच्या ३ नोटा अजूनही फ्रेम करून ठेवल्यात माझ्यापाशी.) कारण, गावातल्या सिनियर कन्सल्टंट्सची फी ४० रुपये असे. म्हटलं आपण ज्युनियर, आपल्याला जास्त पैसे मागणे शोभणार नाही. ४-६ महिन्यांत एका पेशंटने मला अक्कल शिकवली. नवा असल्याने वेळ भरपूर असायचा, पेशंट्शी गप्पा वगैरे मारायचो. पठ्ठ्या थोड्या गप्पांनंतर खुलून मोकळं बोलत मला म्हणतो कसा, "साहेब काय करणार? गरीबी आहे. थोडे जास्त पैसे गाठीला असते, तर 'भारी' डॉक्टरला दाखवले असते.." दुसर्‍या दिवशीपासून मी माझी फी ५० रुपये आहे असा बोर्ड बाहेर लावला. तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादाने आजपर्यंत दुकान भरभरून वाहते आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 03/11/2015 - 16:23 नवीन
सचोटीने व्यवसाय करणारे किंवा अगदी सेवाभावी वृत्तीने मदत करणारे डॉक्टर नाहीत असे नाही. पण राजकारणी-बिल्डर-कंत्राटदार मंडळींबाबत जे परसेप्शन आहे अगदी तेच परसेप्शन वैद्यकीय व्यवसायाबद्दल का होतंय याचा विचार त्या क्षेत्रातील मंडळींनीच करणं आवश्यक आहे. पब्लिकला आमचा खर्च/अडचणी कळत नाही किंवा डॉक्टरांच्या पैशावर जळतात हे फारच सुलभीकरण वाटते. आजकाल किमान दर्जाची वैद्यकीय सेवा घ्यायची म्हटली तर खर्च होणार याची मानसिक तयारी बहुतेकांची असतेच. मात्र त्या सेवेची खात्री आणि त्यात हलगर्जीपणा झाल्यास त्यासंदर्भातील हॉस्पिटल/डॉक्टर यांनी घ्यायची जबाबदारी याबाबत सर्वत्र आनंदीआनंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 03/11/2015 - 16:58 नवीन
खाली दिलंय ते स्टँडर्ड ग्यारंटीवालं उत्तर आहे. अन त्याला नाईलाज आहे. कारण आम्ही शरीरं रिपेयर करणारे मेकॅनिक्स असलो, तरी प्रत्येक इंजिन वेगळं आहे, अन त्याच रिपेअर टेक्निकला प्रत्येक इंजिन वेगळा रिस्पॉन्स देतं. तोच नट त्याच खाच्यात फिट होईल असंही नसतं, व स्पेअर्स बाजारात मिळत नाहीत हा मोठा प्रॉब्लेम आहे. शिवाय ते इंजिन मुळातच आम्ही बनवलेलं नसल्याने, ब्ल्यूप्रिंट, यूजर मॅन्युअल वगैरे कुठे मिळत नाहीत. असो. या व्यवसायात चोर शिरलेत ते १००% खरे आहे. व त्यांचा बंदोबस्त व प्रतिकार करण्याचा प्रयत्न आमच्यातलेच अनेक लोक करीतच असतात. समाजही आपल्यापरीने आमच्यावर अंकुश ठेवून असतो. ताळतंत्र सोडून स्त्रीभ्रूणहत्या होवू लागल्या, तेव्हा समाज व कायद्याचा बडगा इतका तीव्रतेने पडला, की फॉर्म भरताना कानामात्राविलांटी चुकली तरी डॉक्टरला ५-५ वर्षे खडी फोडावी लागते. परवाची पुण्यातलीच केस आहे पेपरात. सुक्याबरोबर ओलेही जळतेच, पण त्यामुळे सगळ्याच पेशाला बदनाम करणारे असे धागे काढण्यात काय हशिल आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
अत्रन्गि पाउस Wed, 03/11/2015 - 17:57 नवीन
आपण उद्वेगाने असेल कदाचित डॉक्टरांची तुलना मेकानिक्स वगैरेंशी करता ते अतिशय खटकते ... अहो जिवलगांच्या जीवावर बेतते तेव्हा डॉक्टरांची पायरी चढतो माणूस....कमालीच्या विश्वासाने म्हणा किंवा पराकोटीच्या अगतिकतेने डॉक्टर म्हणतील ते करायला तयार असतात सामान्य लोक ..क्षुल्लक गाडी रिपेयर कार्नार्यंची इथे तुलना कशी होऊ शकेल ..... पैसा सत्ता आणि अधिकाराच्या माजोरडेपणाने उन्मत्त वर्तन करणारे काही लोक आहेत पण ते बहुतांश नव्हे .. राग मानू नका पण त्यांच्या समोर तसेही फारसे कुणाचेच काही चालत नाही ... तुमच्यात इतका रोखठोक कडवटपणा आलाय त्याची कारणे असतीलच ..ते नाकारत नाही ...पण एक गोष्ट लक्षात ठेवा आजही डॉक्टर देवासारखे मानले जातात आपल्या देशात...आपल्या माणसाला बरे करणारे डॉक्टर माणूस जन्मभर विसरत नाही हां त्याची पैशात भरपाई करू शकत नाहीत सगळे पण प्रसंगी वाटेल ती मदत करतील त्यांच्या अखत्यारीत .. ... तुम्हाला अनुभव येत असतीलच ..
जाता जाता :
पेशंटच्या आर्थिक /सामाजिक परिस्थितीची एका लिमिटच्या पलीकडे पर्वा न करता कमालीच्या सेवाभावाने आपले काम करणारे आणि हाताला गुण असणारे शेकडो डॉक्टर्स आजहि कार्यरत आहेत आणि तुम्ही कमालीच्या कुत्सितपणे ज्यांना हेटाळून बोलता ते 'जीप्डे'पण आहेत आणि प्रख्यात सर्जन्स वगैरे पण आहेत ...आणि देव करो ते ते तसे सतत कुठे नं कुठे समाजात येत राहोत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 03/11/2015 - 18:05 नवीन
क्षुल्लक गाडी रिपेयर कार्नार्यंची इथे तुलना कशी होऊ शकेल
अत्रंगी साहेब, कष्ट करुन खाणारा कोणीही क्षुल्लक होउ शकत नाही. कृपया कुठल्याही कष्टकरी वर्गाला मग तो किती का कमवत असेना नावं ठेउ नका. धन्यवाद. बाकी प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अत्रन्गि पाउस Wed, 03/11/2015 - 18:09 नवीन
गाडी रिपेयर हे प्राधान्याने 'क्षुल्लक' काम आहे शरीर रिपेयर करण्यापुढे असा त्याचा हेतू आहे ... अहो फार फार तर गाडी स्क्रप मध्ये काढू ...पण शरीराचे तसे नाही ... मेकानिकला नावे ठेवणे हा हेतू नाही आणि अनवधानाने तसे सूचित झाले असेल तर पुन्हा क्षमस्व ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अजया Wed, 03/11/2015 - 16:21 नवीन
फाईव्ह स्टार क्वालिटी ट्रिटमेंट पाहिजे आणि दाम मात्र खाणावळीचे हवे हो!!
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 03/11/2015 - 16:24 नवीन
किंवा फाईव्ह स्टारचे पैसे घेेणार आणि खाणावळीच्या दर्जाचे जेवण देणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
आ
आनंदी गोपाळ Wed, 03/11/2015 - 17:41 नवीन
फाईव्हस्टारचं जेवून खरंच पोट भरलंय का कधी तुमचं? त्या मळमळीत जेवणाला इतके पैसे का घेतात तेच कळत नाही मला. (हो. मिळमिळीत नाही. मळमळीत.) (एका कॉन्फरन्सला ला मेरिडियनवाल्यांनी 'राइस लेंटिल सूप' नावाखाली चक्क अत्यंत बेचव वरणभातात भरपूर पाणी घालून लोकांना खायला ठेवलं होतं. प्र च ण्ड शिव्या घातल्या होत्या, व घालू शकलो होतो, कारण पैसे देणारा ऑर्गनायझर मी होतो. तिथे लूट होते तेव्हा ती कंपनीच्या एक्स्पेन्स अकाऊंटावर जाते म्हणून खुश रहाणारे अकाउंटावरचे शहाणे डॉक्टरला पैसे देताना का खळखळ करतात? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 03/11/2015 - 18:02 नवीन
तिथे लूट होते तेव्हा ती कंपनीच्या एक्स्पेन्स अकाऊंटावर जाते म्हणून खुश रहाणारे अकाउंटावरचे शहाणे डॉक्टरला पैसे देताना का खळखळ करतात?
असंच काल कोणीतरी विचारलं होतं, दुसऱ्याच्या जमिनीवर झालेल्या धरणाचे पाणी तुम्ही पिता तर तुमची जमीन गेली तर त्याचे इतके वाईट का वाटते. I do not have ability to counter this kind of argument.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
क
काळा पहाड गुरुवार, 03/12/2015 - 09:14 नवीन
एका कॉन्फरन्सला ला मेरिडियनवाल्यांनी
बघा. तरी डॉक्टरांना सध्याचे एक्स्पेन्सेस परवडत नाहीत असं तेच म्हणतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अजया Wed, 03/11/2015 - 16:28 नवीन
जाऊ नका ना मग अशा ठिकाणी!शिंपल!!
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 03/11/2015 - 16:34 नवीन
हो पण अशा ठिकाणांची यादी कुठे प्रकाशित होत नाही. पैसे खर्च करुन, शारीरिक हाल झाल्यानंतर आता हे ठिकाण चांगले नाही, दुसरे पाहू अशी काट मारता येते. इथे कुणाला अशा ठिकाणांची माहिती असल्यास ती या निमित्ताने समोर आली तर उत्तम. आयफोनबाबत तसे नाही. निदान वर्षभरासाठीची वॉरंटी तरी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
आ
आनंदी गोपाळ Wed, 03/11/2015 - 16:51 नवीन
आयफोनबाबत तसे नाही. निदान वर्षभरासाठीची वॉरंटी तरी असते.
तुम्हीही 'वरच्या' कंपनीतून आणलेले तुमच्या शरीराचे ग्यारंटी कार्ड मजकडे घेऊन या. तुमच्यावर केलेल्या प्रत्येक उपचाराची "वॉरंटी" त्यावरच ल्हिहून देईन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 03/11/2015 - 16:59 नवीन
उपचारांच्या हलगर्जीपणाबाबत काय अकाऊंटॅबिलीटी आहे, हा प्रश्न विचारला तर डॉक्टर लोक प्रचंड डिफेन्सिव होतात किंवा विनोदी वक्तव्य करुन वेळ मारुन नेतात हा अनुभव नवा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 03/11/2015 - 17:23 नवीन
क्षमा करा, वर उत्तर टाईप करतच होतो. इथे ते ग्यारंटीचे लिहिल्याशिवाय राहवले नाही. डिफेन्सिव्ह का होतात, याचे कारण म्हणजे, अकाउंटेबल रहायला हरकत नाही, पण कित्येकदा परिस्थिती आमच्याही हाताबाहेरची असते, व 'नुकसानभरपाई' इन काइण्ड देणे अशक्य असते. इंजिन खोलतानाची तूटफूट, स्पेअरपार्ट्स इ. वर लिहिले आहेच. तुमच्या गाडीचे इंजीन रिपेयर करताना कुणा मेकॅनिककडून चूक झाली तर तो सिव्हिल ऑफेन्स होतो, की क्रिमिनल? त्याच्याकडून तुम्ही पैसे मागता, की त्याला जेलीत धाडायची वा हातपाय तोडायची मागणी करता? ज्या जीवनाची खरंच ग्यारंटी नाही, ते रिपेअर करतानाची ग्यारंटी इतकीच, की माझे पोट माझ्या रेप्युटेशनवर अवलंबून असते, हे तुम्ही लक्षात घेणे. मी घिसाडघाईने, वा पब्लिकला *तिया बनवून नुसतेच पैसे कमवायचा प्रयत्न केला, तर नक्कीच मारही खाईन व उपाशीही मरेन, हे आजच नाही, प्राचीन काळापासून सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
अजया Wed, 03/11/2015 - 17:22 नवीन
उपचाराने वाचणारे किती,हलगर्जीने दगावणारे किती?काय रेशो? काही विदा? किती आणि कोणते डाॅक्टर ठरवुन हलगर्जीपणा करुन मारतात पेशंटला? हे प्रश्न आयुर्वेदिकच्या नावाखाली,कोणतीही सर्जरी लागणार नाही,औषधांनी बरे व्हा असे सांगुन रितसर भरपूर पैसे घेणार्या इतर पॅथी डाॅक्टर्सना विचारले जातात का?(एक कुतुहल)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 03/11/2015 - 17:50 नवीन
ठरवून हलगर्जीपणा करणे आणि चुकून हलगर्जीपणा करणे यात डावेउजवे असे काही नाही. शिवाय उपचार घेणाऱ्या त्यात पेशंटचा काहीही दोष नाही. जर पैसे घेतात तर त्या दर्जाची सेवा मिळायला हवी हा पेशंटचा हक्क आहे. एवढेच म्हणायचे आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातात ठरवून दुसऱ्याला मारले जात नाही. तरीही अपघातकर्त्याला शिक्षा होतेच. उपचाराने वाचणारे हे हलगर्जीपणाने दगावणाऱ्यांपेक्षा जोपर्यंत जास्त आहेत तोपर्यंत काही काळजी करायची नाही का? अगदी एक जीवही हलगर्जीपणामुळे जात असेल तर त्याची शिक्षा होणे आवश्यकच आहे. माझा स्वतःचा अॅनेकडोटल अनुभव असा आहे की आजपर्यंत चार वेळा मी व घरातील इतर यांना हॉस्पिटलायझेशन करावे लागले. त्यातील तीन वेळा चुकीचे उपचार, चुकीचे निदान आणि अॅडमिट केल्याचे दिवस वाढवण्यासाठी वेळकाढूपणा हे प्रकार अनुभवास आले. यातील एक वेळा आयसीयूपर्यंत विनाकारण फेरी मारावी लागली. या सर्व प्रकारात झालेला मनस्ताप फक्त आम्हाला झालेला आहे. प्रत्यक्षात सदर घटनेस जबाबदार व्यक्तींना त्याची काहीही तोशीस नाही. आता या सर्व गोष्टी कुठे डॉक्युमेंट होतात ते सांगितल्यास मी विदा व रेशो पुरवू शकतो. त्यात सद्य परिस्थितीत पारंपरिक न्यायालयांकडे दाद मागण्याशिवाय रुग्णांकडे काहीही पर्याय नाही. आयुर्वेदिक व्यक्तींना किंवा तत्सम अल्टरनेटिव मेडिसिन प्रकाराला मी डॉक्टरी मानतच नाही. शिवाय अॅलोपथीच्या हॉस्पिटलायझेशनच्या तुलनेत त्यांची फी नगण्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
आ
आनंदी गोपाळ Wed, 03/11/2015 - 18:01 नवीन
शिवाय अॅलोपथीच्या हॉस्पिटलायझेशनच्या तुलनेत त्यांची फी नगण्य आहे.
<< यांना कुणीतरी बालाजी तांबे नामक क्वॅकच्या दुकानातला 'हर्बल चहा' पाजा हो कुणीतरी. पैसे यांच्याकडून घ्या. मग टोटल फीबद्दल बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 03/11/2015 - 18:05 नवीन
बालाजी तांबे आणि डॉक्टर यांचे वर्क एथिक्स एकच असावेत अशी तुमची मागणी असल्यास पुढे चर्चा करण्यात काहीच पॉईंट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आयुर्हित Wed, 03/11/2015 - 17:53 नवीन
मुळात ही सर्व Modern Medicine Procedure आयुर्वेदिक प्रक्रिया नसली तरी त्याचे उद्देश आयुर्वेदिक पद्ध्तीसारखेच आहे आणि ती म्हणजे "आजाराचे संपूर्ण व समूळ उच्चाटन" सर्व प्रक्रिया (Procedure) Non-invasive चिरफाडरहित व धोकाविरहित असल्याने पूर्ण उपचार घेणारे सर्वच जण वाचतात व आयुष्याचा पुरेपुरे आनंद घेतात. अगदी साधारण डॉक्टरांनी "बेड रेस्ट घ्या" म्हणून सुचविलेल्या पेशंटला आपण सिंहगड चढतांना पहिले तर आश्चर्य वाटून घेवू नका! आणि शेवटचे काही महिने उरलेत आता यांची घरी नेवून फक्त सेवा करा म्हणून सुचविलेल्या पेशंटला आपण पुढचे १० ते २० वर्ष जगतांना पहिले तर मुळीच आश्चर्य वाटून घेवू नका!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सुबोध खरे गुरुवार, 03/12/2015 - 06:01 नवीन
आयुर्हीत साहेब आपण बायपास वर सल्ला दिलात म्हणून सांगतो. मी एशियन हार्ट ला असताना ३००० तीन हजार बायपास च्या शल्यक्रिया पाहिल्या आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांना बरेच अडथळे( multiple blocks) असत. एक किंवा दोन अडथळे असतील तर अन्जीयो प्लास्टी केली जाते. बहुसंख्य रुग्णांना लेफ्ट मेन मध्ये अडथळा असे. यातील कित्याक रुग्ण मला असे विचारत( मी रुग्णांशी जास्त मोकळेपणाने बोलत असे म्हणून) कि डॉक्टर माही बायपास केला नाही तर काय होईल. मी त्यांना शांतपणे सांगत असे ९० % काहीच होणार नाही. आणि तुम्हीच मला ५ वर्षाने सांगाल कि अहो डॉक्टर मला बायपास सांगितला होता पण मी तो केला नाही आणि तरीही मी ठणठणीत आहे. पण जर तुम्ही उरलेल्या १० % मध्ये असाल तर तुमचा रोग असा आहे कि तुम्ही कदाचित रुग्णालयापर्यंत सुद्धा पोहोचू शकणार नाही. आता तुम्ही या ९०% मध्ये आहात कि १० % मध्ये आहात हे समजायला मी काही ज्योतिषी नाही. तेंव्हा तुम्ही तुमच्या ज्योतिषाला विचारून पहा कि माझा मृत्युयोग केंव्हा आहे. दुसरे असे आहे कि हा इथे मागे पश्चीम द्रुतगती मार्ग आहे(एशियन हार्ट च्या मागिल खिडकीतून दिसतो) तो आपण डोळे मिटून पार करा १०० पैकी ९० वेळा आपण सुखरूप पार कराल. पण तो धोका पत्करायचा कि नाही ते तुम्ही ठरवा. एका दीड शहाण्या रुग्णाने माझ्या दवाखान्यात हेही सांगितले कि डॉक्टर तुम्ही म्हणता त्याला काही अर्थ नाही. माझा मृत्युयोग नसेल तर मला काहीही होणार नाही. मी त्यानाही थंडपणे सांगितले कि साहेब तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर. तुमचा मृत्युयोग नसेल तर तुम्ही मरणार नाही. पण तुमचा मृत्युयोग नाही म्हणून हे दवाखान्याच्या समोर असलेले रेल्वेचे रूळ तुम्ही डोळे मिटून पार करणार का? हा विचार तुम्हीच करायचा आहे. अर्थात त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. तेंव्हा आपण या ९०% शक्यतेमध्ये खेळत आहात हे ध्यानात ठेवा आणी विचार करा. उरलेल्या १० टक्क्यातील लोक सुद्धा मी बरेच पाहिलेले आहेत कि तीन वर्षे माधवबाग, चिलेशन, बलून पंप वगैरे करून हृदय विकाराचा झटका आला कि यांना बायपासची आठवण होते. असो. जाता जाता के इ एम चे CVTS किंवा, जे जे रुग्णालय किंवा AIIMS आणी आमच्या MH CTC पुणे लष्करी रुग्णालयात येथील डॉक्टराना बायपास केल्याचे पाच पैसे सुद्धा अतिरिक्त मिळत नाहीत मग तेथील डॉक्टर असे बायपास का करतात याचाही विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित गुरुवार, 03/12/2015 - 08:39 नवीन
मानले बुवा आपल्याला. अगदी स्पष्ट शब्दात सांगितले आपण. सर्वात महत्वाचे म्हणजे हृदय विकाराचा झटका आला कि यांना बायपासची आठवण होते! अगदी ह्याच गोष्टीचा डॉक्टर गैरफायदा घेतात, जो त्यांनी घेवू नये. जास्त पैसे हवे असतील तर मेहनत वाढवावी, ४ नवीन ठिकाणी शाखा उघडाव्या अथवा स्वत:चे ४ नवीन हॉस्पिटल उघडावे, पण अडल्या नडलेल्या गरीब श्रीमंत जनतेला नाडू नये, हेच मनापासून वाटते आणि धागाकर्ताही हेच सांगायचा प्रयत्न करतोय. ज्या गोष्टीत धोका आहे ती मुद्दामहून का म्हणून करावी? जी गोष्ट अत्यंत चुकीची आहे, जे ओपेरशन करतांना लोकांची आयुष्यभराची कमवलेली कमाई जाते, किंबहुना बऱ्याच लोकांचा प्राणही जातो, ती गोष्ट का करावी? ज्या गोष्टीला चांगला पर्याय उपलब्ध आहे तो का वापरू नये? अगदी अन्जिओग्राफिच्या खर्चात पूर्ण शरीरातील ब्लॉकेज निघू शकतात ते का सुचवू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रुस्तम गुरुवार, 03/12/2015 - 09:09 नवीन
ज्या गोष्टीला चांगला पर्याय उपलब्ध आहे तो का वापरू नये?
कोणते कोणते चांगले पर्याय आहेत ते सांगावेत. समस्त मिपा कराना फायदा होईल.
अगदी अन्जिओग्राफिच्या खर्चात पूर्ण शरीरातील ब्लॉकेज निघू शकतात.
माहितीसाठी कुठे आणि कस करतात ते सांगाल का? मिपा करांचे रुपये तरी वाचतील…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित गुरुवार, 03/12/2015 - 09:15 नवीन
आपल्या महितातल्या रुग्णाला सांगून त्याची माहिती मला व्यनीतून कळवावी. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि जयपूर येथे ठरवून माझी प्रत्यक्ष भेट घेवू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
क
कपिलमुनी गुरुवार, 03/12/2015 - 10:06 नवीन
अहो साधारण उपचारपद्धती काय आहे ते तरी सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित गुरुवार, 03/12/2015 - 10:25 नवीन
एकदाच व थोडक्यात सांगतो : आजाराची लक्षणे नव्हे तर मूळ करणे शोधणे व त्यावर सुयोग्य (पेशंटला हवा तो परिणाम कायमस्वरूपी साधणारी) उपचार सुचविणे, व ते सहजसाध्य होईल ते पाहणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 03/12/2015 - 11:36 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
स
स्पंदना Fri, 03/13/2015 - 03:45 नवीन
सबिंसा (sabinsa) किंवा (sami labs limited) या कंपनीच्या औषधांबद्दल जर बोलत असाल तर जरा जपून. उगा खेळ व्हायचा कुणाच्या तरी जीवाशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 16:07 नवीन
हा विषय वेगळाच आहे. आपले काही अनमोल अनुभव असतील किंवा याबद्दल अधिक काही सांगायचे असेल तर वेगळा धागा काढाल प्लीज....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ख
खटासि खट Wed, 03/11/2015 - 17:36 नवीन
टंकण्याचा भयानक कंटाळा आल्याने पास होता. पण वेळ मिळेल तसं अनुभव लिहावे असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 03/11/2015 - 18:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Wed, 03/11/2015 - 18:01 नवीन
अनुभव वैयक्तिक आहेत. अनुभव पहिला : तातश्रींना पोटाचा आजार अनेक वर्षांपासून आहे. एका ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी सांगितलं भिंगातून पाहून काय प्रॉब्लेम आहे हे निश्चित करू. पण भूल दिल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. बाहेर तीन सुपुत्र (आम्ही) बसले होते. त्यातल्या एकाच्या सह्या घेतल्या. आठवडाराभर ठेवलं. लाखभर बिल झालं. काही दिवसांनी पुन्हा पोट दुखायला लागलं. मग औषधं लिहून देऊ लागले. पण लघवी कोंडल्यासारखे वाटत असल्याने रात्रभर वेदना होत होत्या. डॉक्टर बदलला : पूर्वीच्या सर्व चाचण्या दाखवल्या. डॉ म्हणाले मुंबईला एक चाचणी करावी लागेल. सुपुत्र क्र्म २ घरी होते. त्यांनी हे काम केलं. मग पुण्यात त्याच चाचण्या वेगवेगळ्या डायग्नॉस्टीक सेंटर मधे करवून घेण्यात आल्या. त्यातलं एक स्वारगेट, दुसरं बंडगार्डन, तिसरं म्हात्रे ब्रिज आणि चौथं पिंपवड येथे. जबरदस्त पुणे दर्शन झाल्यावर रिपोर्ट्स पूर्वीप्रमाणेच नॉर्मल आले. मग आनखी एक टेस्ट करू म्हणाले. दोन दिवसाची औषधं दिलेली. झोप लागली. घरचे खूष. तिस-या दिवशी पहिल्यापेक्षा जास्त वेदना. सदर सुपुत्र घरी आल्यावर गोळ्या पाहील्या तर वेदनाशामक ! सहा महीने सहन करून झाल्यावर फरक पडला नाही. आता पुन्हा डॉक्टर बदलला. आता कर्वे रस्त्यावर एका सराफाच्या इमारतीतला ! पुन्हा त्याच चाचण्या, पण जवळच्याच इस्पितळात. ही जागा राज ठाकरेंचं नाव घेतलं की लक्षात येते. चाचण्या झाल्या. या वेळी बिल रग्गड आलं. सहजच बिलात पाहीलं तर डॉक्टर फीज २०००० रुपये आणि व्हिजीट फी ३०००/-. याबद्दल विचारलं तर उडवाउडवीची उत्तरं मिळाली. मग बंधूंकडून जुनी बिलं घेतली. सग़ळीकडे हेच. डायग्नॉस्टीक सेंटरकडून विविध चाचण्यांपोटी पाच हजारापासून तेरा हजारापर्यंत डॉक्टरला गेले होते. हे लक्षात येऊनही नाईलाजाने वा-या चालू आहेत. तातश्रींकडे बघवत नाही. आता चांगला म्हणवला गेलेला एकही डॉक्टर शिल्लक नाही. निदान होत नाही. पैसे भरपूर गेले आहेत. आम्ही काही खूप गरीब नसलो तरी श्रीमंत वर्गात मोडत नाही. डॉक्टरच्या अक्कलहुशारीचे असते तर काही वाटलं नसतं. अनुभव २ सासूबाईंना अस्वस्थ वाटलं म्हणून मेव्हण्याने पूर्व भागातल्या एका हॉस्पिटलमधे नेलं. त्याच्या समोरचं हॉस्पिटल क्रमा़ंक एकचं आहे. पण मध्यंतरी डेड बॉडी दाखल करून घेऊन दीड दिवसाचं बिल एक लाख सत्तर हजार दिलं होतं. तो ग्राहक पंचायतीचा ट्रॅप होता. पेपरमधे आलं होतं. ज्यांना हे माहीत आहे ते समोरच्या इस्पितळात जातात. आता देशातील एका लीडींग हॉस्पीटलची मॅनेजमेंट आहे. साबाना अँजिओग्राफी करायची होती. ज्या डॉक्टरने शिफारस केली होती त्याने व्हॉल्व्ह ब्सवण्याची गरज नाही, फक्त पहायचं असं सांगितलं होतं. सहजच रेट पाहून आलो. बाहेरच्यापेक्षा जास्तच होते. पण अँजिओप्लास्टी ७५०००/- त होईल असं मित्रानं सांगितलं. इकडं मेव्हणा गायब होता. तीन तासाने भेटला तर त्याने सांगितलं अडीच लाख खर्च सांगितलाय. तेव्हां त्याला ओरडलोच. मग त्याला घेऊन गेलो तर घोळ होता. हा इन्शुरन्स विभागात गेला होता. तिथला जो कुणी होता तो म्हणत होता तुम्हाला काय करायचंय ? खिशातून थोडीच जातात ? कंपनी कॅशलेस करतेय. याची लिमीट पाच लाख म्हणून अडीच लाख. त्याला त्यांच्याच हॉस्पीटलचे दर सांगितले तर तो म्हणाला इन्शुरन्स कंपनीनेच आम्हाला हे दर सँक्शन केले आहेत. गोची अशी होती की, ज्या हॉस्पीटलची मॅनेजमेंट आहे त्यांचे दिल्लीतले दर कंपनीने सँक्शन केले आहेत. पण पुण्यात हे दर आकारले जात नसताना दिल्लीच्या दराने पैसे घेणं यात चुकीचं काही आहे असं त्यांना वाटतच नव्हतं. माझ्या समोरच त्याचा बॉस आलाअ. दुस-या एका केसमधे त्याने दोन लाखाचं एस्टीमेट कंपनीला दिलं होतं. बॉस त्याला ओरडला अरे या केसमधे मागच्या महीन्यात आपण साडेतीन लाखाचा क्लेम दिलेला आहे... अशाने इन्शुरन्स कंपन्यांचे प्रीमीयम वाढतील हे एक. दुसरं म्हणजे सर्रास अशी फसवणूक होत असेल तर हेल्थ इंशुरन्सच्या बाबतीत गरजूंचे क्लेम्स पास होणार नाहीत हा एक धोका आहे. या दोन्ही अनुभवांमधे डॉक्टरला, हॉस्पिटलला त्यांचे हक्काचे पैसे मिळाले आहेत असं म्हणता येईल का ? हा काही युनिक अनुभव नव्हे.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 03/11/2015 - 18:07 नवीन
चर्चा भरकटू देऊ नका. डागतरांस्नी मन्मानी फीया घ्यायच्या का न्हाय ह्योच सवाल हाय. थे अकौंटीबिलिटी व्यैग्रे वायला टापिक हाय. हलगर्जी झाली तर ग्राहक न्यायालयात जाता येतं. त्याचा डॉक्टरांच्या फीशी काय संबंध? उद्या समजा सगळया डॉक्टरांना सरकारी नोकरीच करायला लावली मास्तरांइतका पगार देऊन तेव्हा उपचारांचा दर्जा काय असेल आणि हलगर्जी झाली तर कोण जबाबदार? जास्त फी आकारणारा डॉक्टर चांगला असतो तो उपचार चांगले करतो म्ह्णून की फी जास्त आकारतो म्हणून? फी जास्त आकारणारा हलगर्जी करण्याची शक्यता कमी आहे, हलगर्जी करणाराकडे पेशंट जाण्याची शक्यता कमी आहे भले तो फुकट का इलाज करेना... तर मंडळी, चर्चेचा मुद्दा आहे डॉक्टरांच्या भरमसाट फिया, हलगर्जी करणारे डॉक्टर नाही. ते त्या मिश्रेयाताईंच्या धाग्यावर आहेत. तिकडे जाऊन भांडा.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Wed, 03/11/2015 - 18:11 नवीन
कॅटरीना कॅटला द्यायच्या पैशात प.पू. पूनमताई पांडेंना साईन कराल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 03/11/2015 - 18:54 नवीन
अहो पण इथे पैसे दिल्यावर कळतं कॅट आहे का पांडेबाई आहे ते. त्याचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ह
हाडक्या Wed, 03/11/2015 - 18:38 नवीन
मास्तरांइतका पगार देऊन तेव्हा उपचारांचा दर्जा काय असेल आणि हलगर्जी झाली तर कोण जबाबदार?
अगदी अगदी.. शिक्षणाच्या दर्जाशी अशीही काही पडलेली नाहीये आपल्याला त्यामुळे इथून पुढे बिनकामी माणसांना दिला जाणारा पगार म्हणून मास्तरांचे पगार रेफर करावेत.. हो ना ? )बादवे, हे आपण वाचले असेलच. आपल्या देशात अशा गोष्टी स्वप्नच राहणार आहेत हे नक्की.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 03/11/2015 - 18:53 नवीन
अहो तो उपरोध होता हो. उपरोध नसता तर मी शालेय शिक्षक असा शब्द वापरला असता. सरकार ज्याप्रमाणे शिक्षकांना वागवते तसेच डॉक्टरांना वागवायला लागली तर जे शिक्षकी क्षेत्रात झालंय तेच वैद्यकिय क्षेत्रात झालेलं चालेल का असा तो प्रश्न होता. माझ्याकडून अनावधानाने शिक्षकांचा अपमान झाला असेल तर क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
क
काळा पहाड Wed, 03/11/2015 - 18:48 नवीन
एकदा नीट ठरवा. डॉक्टरी ही सेवा आहे का धंदा आहे ते. धंदा असेल तर सरळ करा. तुम्ही ब्लॅक मार्केटींग वाला करायला जाता आणि वर सेवाभावाबद्दलच्या मानाची अपेक्षा करता.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Wed, 03/11/2015 - 19:54 नवीन
फक्त याला उत्तर द्यायला लॉगिन झालो. डॉक्टर ब्लॅक मार्केटवाला धंदा करतात, या तुमच्या म्हणण्याला हे माझे हलकट उत्तर आहे. मला सेवाभावाबद्दलच्या मानाची वा देवत्वाच्या देव्हार्‍यात बसण्याची अजिब्बात इच्छा नाही. ती तशी माझ्यासारख्या कोणत्याच 'सेन' डॉक्टरला नसते. पण मला इमानदारीत धंदा तर करू द्याल? मी धंदा करायला लागलो की मला सांगायचं, तू देव आहेस. पैसे मागू नकोस. तू देव आहेस. स्वतःचे घरदार बायकापोरे जेवण्खावण सोडून २४ तास 'सेवा' दे. देवासारखा आमच्या चुका पोटात घाल. वा! अन तुम्हीच बनवलेल्या देवाला तुम्हीच हाताबाहेर घालवून आणलेल्या आजाराच्या उपचारात यश आलं नाही, की लाथाबुक्या घालत माझं घर दार दुकान फोडायला यायचं? हा किती पैसे मागतो म्हणून बोंबा मारायच्या? देवाच्या चुकीचा मार पडतो तेव्हा देवळं फोडायला जाता का? पाऊस पडतोय महाराष्ट्रात. जीव जातोय लोकांचा. किंवा वर त्यांनी विचारलंय, तसं बाकी वैदूंच्या भोंदूगिरीला जाब विचारता का? माझा धंदा आहे. पैसे मी ठरवणार. तुमचा आजार मी तुम्हाला दिलेला नाही. तो आजार बरा करण्याचा प्रयत्न फक्त मी करणार आहे. त्यासाठीची जागा, मशिनरी, स्किलसेट मी स्वतःच्या कष्टाने, माझ्या व आईबापांच्या घामाच्या कमाईतून मिळवलेले आहेत. माझी पायरी चढायची जबरदस्ती मी तुम्हाला केलेली नाही, अहो माझ्याच दुकानात या, अशी साधी जाहिरातही करू देत नाहीत एमेमसीवाले आम्हाला. सिंपल. तेव्हा, तुम्ही ठरवा डॉक्टर देव की दुकानदार. दुटप्पीपणा करू नका. एक काय ते ठरवा. तुम्हाला लुटणारी हॉस्पिटले कुणाच्या मालकीची, ते नीट पहा. डॉक्टरने तुमच्यासाठी नक्की काय केले, व त्याला काय मिळाले तेही पहा. कोणत्याही सामान्य माणसाप्रमानेच मीही, लोकांची फुकट 'सेवा' करून उपाशी मरण्यासाठी जन्माला आलेलो नाही. मलाही इंजिनियरिंग, आयाआयटीत अ‍ॅडमिशन घेता येण्याइतकी हुशारी मिळालेली आहे. ते केलं असतं तर मज्जा केली असती अन इथे धागे पाडले असते. तुमचा माणूस आजारी आहे, व तुम्ही त्याला मजकडे आणलेत, ही माझी चूक कशी???? नक्की ठरवाच एकदा, डॉक्टरकीचा धंदा आहे की 'सेवाभाव'?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
अ
असंका गुरुवार, 03/12/2015 - 03:52 नवीन
अगदी सहमत. सोयीस्करवाद हाच एक खरा वाद राहिलाय म्हणल्यावर ज्याला सचोटीनं जगायचंय त्याला इतकं रोखठोक वागायलाच लागणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
क
काळा पहाड गुरुवार, 03/12/2015 - 07:01 नवीन
माझा धंदा आहे. पैसे मी ठरवणार. तुमचा आजार मी तुम्हाला दिलेला नाही. तो आजार बरा करण्याचा प्रयत्न फक्त मी करणार आहे. त्यासाठीची जागा, मशिनरी, स्किलसेट मी स्वतःच्या कष्टाने, माझ्या व आईबापांच्या घामाच्या कमाईतून मिळवलेले आहेत. माझी पायरी चढायची जबरदस्ती मी तुम्हाला केलेली नाही, अहो माझ्याच दुकानात या, अशी साधी जाहिरातही करू देत नाहीत एमेमसीवाले आम्हाला. सिंपल.
हां आता कसं सगळं स्ट्रेट फॉरवर्ड झालं. उगीच ताकाला जाताना भांडं कशाला लपवायचं? १) आता सगळ्यात पहिल्यांदा ती हिप्पोक्रॅटीक ओथ घेणं बंद करूया. उगीच अडचण. म्हणजे डॉक्टर कोटणीसांसारखे काही ज्यांना तशा प्रकारे काम करायचंय ते ती घेतील, बाकीचे कट प्रॅक्टीस सुरू करेन, इल-लीगल गर्भपात करेन, उगीचच चाचण्या करायला लावेन, अ‍ॅडमीट करायला सक्ती करेन, उगीचच सर्जरी करायला लावेन वगैरे प्रकारची ओथ घेतील. २) त्या नंतर सगळे मिळून एक गुप्त ऑर्गनाय्झेशन काढा जी असं ठरवेल की सगळ्यांनी व्हिजिटींग चार्जेस उदाहरणार्थ हजार रुपयांपेक्षा कमी नको करायला. जो करेल त्याला कोणीच केमिस्ट कट देणार नाही. कोणीच पेशंट रिफर करणार नाही. ३) आता काही काही लोक उगीचच समाजोपयोगी कामं करत असतात. स्वच्छता राखा म्हणणं, पोलियोची लस देणं, हेल्मेट घाला म्हणणं, लशी शोधत बसणं. यानं धंद्यावर किती परिणाम होतो! म्हणून सरकारवर दबाव आणूया की हे सगळं बंद करा. धंद्यावर परिणाम होतो. त्याउलट महानगरपालिकेतल्या अधिकार्‍यांना पैसे चारूया की खड्डे भरू नका, रस्त्यावरचा कचरा उचलू नका, उलट तो थोडा स्वच्छ एरिया मध्ये फैलावत जा, इत्यादी. ४) सरकारवर दबाव आणू की सरकारी इस्पितळं बंद करा. ५) हे जेनेरिक औषधाचं फॅड बंद करायला लावू. जर जनतेला स्वस्त औषधं मिळाली तर मग आम्ही जगायचं कसं? ६) एम एम सी वाल्यांवर दबाव आणायला लावू की जाहीरात करण्याची परवानगी द्यावी. मग हायवे वर मोट्ठे मोट्ठे बोर्ड दिसतील. एड्स वर खात्रीशीर इलाज फक्त डॉक्टर क्ष कडेच, एक महिन्यात कॅन्सर हटवा फक्त डॉक्टर वाय कडेच. बोर्डावर डॉक्टर च्या बाजूलाच दोन सुंदर मॉडेल्स चा फोटो. शिवाय "आजच बुकींग करा आणि बँकॉक ची ट्रिप फ्री मिळवा", "दोन बायपास वर एक बायपास फ्री" इत्यादी अ‍ॅड पण टाकता येतील. शिवाय याचं फंडींग जवळच्या नगरसेवकांकडून घेवून त्याच्या कच्या बच्यांचे फोटो पण खाली "डॉक्टर क्ष आगे बढो" म्हणून टाकता येतील. ७) आपणच केलेल्या सर्जरी साठी अ‍ॅन्युअल मेन्टेनन्स पॅकेज तयार करता येईल. ओपन हार्ट सर्जरी केली की पुढचे दोन वर्ष त्यावर अँजीओग्राफी फ्री आणि अँजीओप्लास्टी वर ५०% फ्री. चु.भू.दे.घे. ८) सध्या काही हॉस्पिटल्स नी पॅकेजेस सुरू केलेलीच आहेत. नी रिप्लेसमेंट चं सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटीनम पॅकेज असल्याचं ऐकलं आहे. आणि काय काय असेल हे माहिती नाही. पण हे साध्या रोगांना का नको? सर्दी, खोकला आणि ताप आला तर तुम्हाला ती एक दिवसात घालवायची तर प्रिमियम फ्लू पॅकेज, तीन दिवसांसाठी मिडीयम आणि सात दिवसांसाठी ऑर्डीनरी. कस्टमाईझ्ड पॅकेजेस सुद्धा तयार करता येतील. फक्त "सर्दी आणि ताप" घालवायचा असेल तर दीड हजार रुपये (किंमत वाढीसाठी पॉईंट २ रेफर करावा) किंवा "फक्त ताप" साठी बाराशे रुपये इत्यादी. आणखी एक हजार रुपये घालणार असाल तर औषधं भेसळफी असण्याची गॅरंटी. ९) सध्याची हॉस्पिटल्स फक्त इलाजच करतात. शी! काय हे. आपण त्याचं पूर्ण हॉटेल करून टाकू. प्रिमियम पॅकेज मध्ये रूम मध्येच संपूर्ण बार कॅबिनेट आणि अनलिमिटेड बूझ फ्री. गोल्ड पॅकेज मध्ये पार्टी करण्याची पूर्ण व्यवस्था होटेल सॉरी हॉस्पिटल व्यवस्था करून देईल, विथ बाऊन्सर्स अ‍ॅन्ड डीजे (अशीही अ‍ॅड करता येईल की आमचे डॉक्टर पार्ट टाईम बाऊन्सर्स म्हणून काम करतात). आता प्लॅटिनम पॅकेज मध्ये एका बार गर्ल चा डान्स रूम मध्येच फ्री. अनलिमिटेड ऑप्शन्स आहेत महाराजा, आहात कुठं! करूयाच 'धंदा' राव! 'सर्व्हिस' मद्धे मज्जा नाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
सौंदाळा गुरुवार, 03/12/2015 - 09:53 नवीन
मलाही इंजिनियरिंग, आयाआयटीत अ‍ॅडमिशन घेता येण्याइतकी हुशारी मिळालेली आहे. ते केलं असतं तर मज्जा केली असती अन इथे धागे पाडले असते.
अजब तर्कट आहे आहे तुमचं बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ब
बॅटमॅन Wed, 03/11/2015 - 20:03 नवीन
या निमित्ताने एक प्रस्ताव परत एकदा मांडतो. झोम्याटो, बर्प, इ. सायटींवरती हॉटेल रिव्ह्यूज़ जसे असतात तसे डॉक्टर रिव्ह्यूवाली एखादी साईट पाहिजे. गैरप्रकार करणार्‍यांवर प्रेशर पडायला अजून जास्त मदत होईल. शिवाय कोणता डॉक्टर किती पैसे घेतो व वागायबोलायला कसा आहे आणि हातगुण/कौशल्य इ. त्या हिशेबाने कसा आहे याबद्दलही सब्जेक्टिव्ह का होईना माहिती मिळेल. आता पेड रिव्ह्यूचा प्रॉब्लेम इथेही असेलच, पण काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेले अतिशय उत्तम असे वाटते. या पद्धतीमुळे इमानदार डॉक्टरांवी आयतीच जाहिरात होईल तर लांडीलबाडीवाल्यांनाही काही अंशी तरी चाप बसेलसे वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गिरकी गुरुवार, 03/12/2015 - 08:12 नवीन
अशा काही साईट्स आहेत. सध्या त्याचं कव्हरेज मेट्रो सिटी मधल्या थोड्याफार डॉक पुरतेच आहे. पण या बाजुने डेव्हलपमेंट सुरु आहेत. परवाच एका प्रथितयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये काही टेकी लोक्स सर्व पेशंटची मुलाखत घेत होते. 'तुम्ही या हॉस्पिटल मधेच का आलात- हॉस्पिटल च्या रेप्युटेशन मुळे की अमुक डॉक फक्त इथेच भेटतात म्हणून' इथेपासून 'कुठल्या डॉक कडे जायचे हे तुम्ही कसे ठरवता' इथेपर्यंत अनेक प्रश्न विचारले गेले. आणि त्यांच्याकडून एका अशा साईटची निर्मिती होत असल्याचे कळले. सध्या मला माहित असलेल्या साईट : https://www.ratemds.com , www.practo.com, शिवाय mouthshut वर देखील काही रिव्ह्यू पाहायला मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
आ
आयुर्हित गुरुवार, 03/12/2015 - 08:43 नवीन
मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरकी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा