Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डाॅक्टरांची फी

स
स्वधर्म
Wed, 03/11/2015 - 11:02
🗣 429 प्रतिसाद
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता. एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही. - स्वधर्म

प्रतिक्रिया द्या
82348 वाचन

💬 प्रतिसाद (429)
स
सुबोध खरे Tue, 03/17/2015 - 16:05 नवीन
भारताचे GDP PER CAPITA १४९८.८७ USD ‎(2013), आणी इंग्लंड चा आरोग्यावर खर्च PER CAPITA ३४०५ USD. हा बाकी सर्व देशांपेक्षा कमी आहे म्हणून त्याची तुलना दाखविली आहे. इंग्लंड अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्राची तुलना करताना हा एक महत्त्वाचा मुद्दा (अनवधानाने कि सोयीस्कर रित्या) विसरला जातो. सर्व उत्पन्नाच्या दीडपट आरोग्यावर खर्च? नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या ? इंग्लंड इतका आरोग्यावर खर्च करायचा तर भारताला १८७५ अब्ज डॉलर्स खर्च करावा लागेल. भारताचा आरोग्यावर खर्च PER CAPITA USD ६१ (२०१३) मोठ्या मोठ्या गोष्टी कर्ण सोपं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Fri, 03/20/2015 - 13:04 नवीन
तिथे आपल्याला जी उपलब्ध आहे तीच सेवा आपल्याला घ्यावी लागते. आपल्या कानात दुखत असेल तर आपला फ्यामिली डॉक्टर ठरवेपर्यंत आपण कानाच्या डॉक्टरकडे जाऊ शकत नाही. त्यामुळेच कानाचा डॉक्टर रोज पाच रुग्ण बघतो आणि आपल्याला पूर्ण न्याय देतो. किंवा आपण पाच ते दहापट पैसे देऊन खाजगी सल्लागार ( कन्सलटंट) कडे जाऊ शकता. जाऊद्या. तुम्ही म्हणता तसं खरं.
तुमचे वाक्य वरीलप्रमाणे होते. त्याचा प्रतिवाद म्हणून यूकेची आरोग्यसेवा सर्व विकसित देशांत सर्वोत्तम कशी आहे याची आकडेवारी मी फक्त दिली. भारतात आरोग्यवर खर्च कमी आहे हे मान्यच आहे. जर सरकारला स्वतः खर्च करायचा नसेल तर कॉर्पोरेट इस्पितळे व विमा कंपन्या अकाऊंटेबल कसे होतील हे पाहणे आवश्यक आहे. अकाऊंटॅबिलिटीचा मुद्दा काढला की डॉक्टर लोक अमेरिकेचे उदाहरण देत 'रुग्णांचा खर्च वाढेल' असे म्हणतात. हे म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटर आणायची बातमी आली की लगेच बिल्डर लोक 'गरीबांना घरे परवडणार नाहीत' अशा बातम्या सोडतात त्या पद्धतीचे वाटते. प्रामाणिक व्यवसाय करणारे एकांडे डॉक्टर आहेतच. मात्र कॉर्पोरेट इस्पितळांचा नॉर्म हा लुबाडणूक करणे हाच झालाय हे कदाचित तुम्हाला अनुभवास आले नसावे किंवा पटत नसावे. त्याबाबत मी फारतर इतरांची माहिती देऊ शकतो त्याव्यतिरिक्त काही करु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 03/20/2015 - 16:27 नवीन
"कॉर्पोरेट इस्पितळांचा नॉर्म हा लुबाडणूक करणे हाच झालाय" हे फार जेनेरिक झालंय. मूळ एक वस्तुस्थिती हि आहे कि उच्च दर्ज्याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च हा प्रचंड वाढलेला आहे.त्याला लागणाऱ्या साधन सामुग्रीचा भांडवली खर्च प्रचंड आहे. आणी हि सामुग्री पाच ते सहा वर्षात नवी घ्यायला लागते. त्यामानाने तो देण्याची मानसिकता लोकांची नाही. कॉर्पोरेट रुग्णालया मध्ये येणारा खर्च हा खरं तर मध्यम वर्गालाही परवडणारा नाही. परंतु त्याच्या तुलनेत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणारी पर्यायी व्यवस्था सरकारने गेल्या वीस वर्षात खिळखिळी करून ठेवलेली आहे.त्यामुळे परवडतहि नाही आणी दुसरा उपायही नाही अशा कात्रीत सापडलेला समाज कॉर्पोरेट रुग्णालयाला दुषणे देताना दिसतो. कॉर्पोरेट रुग्णालयात येणारा माणूस हा अतिशय उच्च दर्ज्याच्या सेवेची अपेक्षा ठेवतो. पण त्यासाठी करायच्या खर्चाची तयारी नाही/ परवडत नाही आणी त्याची तुलना जवळच्या नर्सिंग होमशी होते. उदाहरणार्थ. एखादा माणूस अपरात्री छातीत दुखायला लागले तर अशा रुग्णालयात जातो तेथे ई सी जी काढला त्यात समजा काही स्पष्टपणे निघाले नाही तर तेथील डॉक्टर स्ट्रेस टेस्ट किंवा अन्जीयोग्राफी करायला सांगतात. आता हि जर नॉर्मल आली तर हाच रुग्ण दुषणे देत फिरतो. आणी जर नाही सांगितली आणी रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला तर हा दुसर्या रुग्णालयात जातो आणी आयुष्यभर पहिल्या रुग्णालयाला शिव्या देत राहतो. त्यातून शंभरात एक रुग्ण पैसे द्यायचे नसतील तर वैद्यकीय निष्काळजीपणाचा खटला भरतो. (असे काही खटले मी स्वतः पाहिलेले आहेत) या सर्व आगीत तेल ओतायला आयुषचे लोक आहेतच. बघा साधे ग्यास्मुळे छाती कोंडली असताना अन्जीयो ग्राफी करायला लावली. यातील किती लोक रात्रीबेरात्री छ्तीत दुखणाऱ्या रुग्णाला ई सी जी शिवाय पाहायला तयार होतील. त्यांनी केलेल्या बेछूट आरोपांमुळे सर्वसामान्य माणसाची परिस्थिती गोंधळलेली झालेली आहे. मी अगोदर म्हटले आहे त्याप्रमाणे ९० % लोकांनी अन्जीयोग्राफी केली नाही तर काहीही होत नाही परंतु तुम्ही त्या ९० % मध्ये आहात कि १० टक्क्यात आहात हे सांगणे फार तर ज्योतिषाला शक्य आहे.म्हणजे काय ९० % लोक अशा आयूश वाल्यांच्या ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून कॉर्पोरेट रुग्णालयाला दुषणे देताना आढळतात. ज्यांना प्रत्यक्ष हृदय विकार येतो ते मात्र तेथे पोहोचलो म्हणून वाचलो असे सांगताना आढळतात. आपल्या म्हणण्याप्रमाणे अगदी ५० % कॉर्पोरेट रुग्णालयात लुबाडणूक असेल तरीही हा नोर्म झालाय हे आपले म्हणणे किती संयुक्तिक आहे? सर्वसामान्य माणसाने आरोग्य विमा उतरवणे हि अतिशय आवश्यक गोष्ट झालेली असूनही दुषणे देणारया लोकांपैकी प्रत्यक्ष किती लोकांचा असा विमा आहे हे पाहणे मनोरंजक ठरावे.असा विमा उतरवायला सांगितले तर मला काय धाड भरली आहे पासून कशाला पैसे फुकट घालवायचे पर्यंत सर्व तर्हेचे संवाद ऐकायला मिळतात. जितक्या लोकांकडे मोटार गाडी आहे त्यापैकी किती लोकांकडे आरोग्य विमा आहे हि पण पाहणी मनोरंजक ठरावी. माझ्या अंदाजाप्रमाणे हि आकडेवारी फक्त २५ टक्क्याच्या आसपास आहे. (तरुण असताना मला काय धाड भरली आहे आणी पन्नाशी झाल्यावर विमा फारच महाग आहे म्हणून). मी एक वाक्य स्पष्ट पणे माझ्या रुग्णांना सांगतो. तुम्हाला तुमच्या शरीराचे पैसे मोजायला लागलेले नसल्यामुळे तुम्हाला त्याची किंमत नाही. मोटार तुम्ही हप्ता भारत घेता म्हणून दर ६ महिन्याला त्याचे सर्व्हिसिंग करून घेता पण किती वर्षात शरीराची तपासणी करत नाही? सर्वसाधारण पन्नाशिला पोहोच्लेल्या माणसाची अशी तपासणी गेल्या दहा वर्षात एखाद्या वेळेसच झालेली असते. सारंश आपल्याला आपल्या शरीराचीच किमत नाही. कॉर्पोरेट रुग्णालयात सेवा महाग आहे हि वस्तुस्थिती आहेच आणी तेथेही लुबाडणारे डॉक्टर आहेत हीही वस्तुस्थिती आहे परंतु तो नॉर्म आहे हि फारच अतिशयोक्ती आहे. डिस्क्लेमर -- मी कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयात काम करत नाही किंवा त्यातील कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयाचे समभाग माझ्याकडे नाहीत. आरोग्य विम्याची माझ्याकडे एजन्सीहि नाही. २३ वर्षे सरकारी नोकरी, चार वर्षे कॉर्पोरेट रुग्णालयात काम आणी गेली ५ वर्षे खाजगी व्यवसाय असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/20/2015 - 19:34 नवीन
जर सरकारला स्वतः खर्च करायचा नसेल तर कॉर्पोरेट इस्पितळे व विमा कंपन्या अकाऊंटेबल कसे होतील हे पाहणे आवश्यक आहे. याला +१. बर्‍याच वेळाने, हे एक वाक्य समस्येच्या मूळाकडे थोडासा इशारा करताना दिसले ! मात्र याचा अर्थ... अ) खूप कमी किंमतीत खूप चांगली सेवा देण्याची सक्ती असा नसावा. (कारण तसे केल्यास कोणीच अत्याधुनिक रुग्णालये उभारण्यासाठी गुंतवणूक करणार नाही... आणि सर्व रुग्णालयांचा स्तर सद्याच्या सरकारी रुग्णालयांच्या बरोबर नाही तरी त्यांच्या आसपास गेला तर नवल नाही.) असा नाही तर... आ) सेवेची किंमत तिच्या स्तराशी आणि गुंतागुंतीशी निगडीत असावी (जशी ती इतर कोणत्याही व्यवसाय / उद्योगधंध्यात असते.) असा असावा. ते तसे का असावे याची काही महत्वाची कारणे अशी आहेत... १. पूर्वी, म्हणजे अगदी दीडदोन दशकांपूर्वी पर्यंत, अ) अनेक प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकिय सेवा भारतात उपलब्ध नव्हत्या आ) रुग्णालयातल्या खोल्या व इतर अ-वैद्यकीय अतिरिक्त सेवा खूपच सामान्य स्तराच्या असायच्या आणि त्यात डॉक्टर व रुग्णांना काही विशेष वाटत नसे. इ) अनेक अत्याधुनिक उपचार आपल्या आर्थिक आवाक्याच्या बाहेर आहेत म्हणून त्यांचा विचारही केला जात नव्हता. अर्थातच या सगळ्यांचा परिणाम रुग्णाचा खर्च / बिल कमी होण्यात होत असे. २. सद्या जी मोठी अद्ययावत रुग्णालये उभारली गेली आहेत / जात आहेत, त्यांच्यात जगातल्या सर्वोत्तम सेवा मिळू शकतात. आज अश्या खूपच कमी वैद्यकिय सेवा आहेत ज्या भारतात कोठेच मिळू शकत नाहीत आणि त्याकरिता परदेशात जाणे आवश्यक आहे. पूर्वी अद्ययावत वैद्यकिय उपकरणे भारतात आणणे हे आयात परवाने मिळणे दुरापास्त असल्याने आणि डोईजड कर असल्याने जवळ जवळ अशक्य होते. गेल्या दोन एक दशकांत भारत सरकारने या आयातीवरची बंधने व कर लक्षणिय रित्या कमी केलेले आहेत. ३. अत्याधुनिक उपकरणे, ते वापरण्याचे डॉक्टरने घेतलेले प्रशिक्षण, त्यांची देखभाल आणि सुटे भाग, अत्याधुनिक पण म्हणूनच अजूनही पेटंट कायम असलेली औषधे, इत्यादी आजकाल भारतात मिळणे सोपे झाले आहे. या सगळ्यांचा उपयोग केल्या जाणार्‍या सेवा देण्यामधे अद्ययावत रुग्णालयांत चढाओढ होत आहे. हे रुग्णांचा उपचाराच्या दृष्टीने चांगले आहे. मात्र यामुळे खर्चही वाढला आहे... विषेशतः आयात होणार्‍या गोष्टींचा खर्च पाश्च्यात्य देशात असलेल्या किंमतीत आणि परकिय चलनात करावा लागतो. त्यातच गेल्या दशकात डॉलरच्या तुलनेने भारतिय रुपयाच्या (जवळ जवळ ५०% किंवा जास्त) पडलेल्या दराचा परिणाम या सेवा अजूनच महाग होण्यात झाला आहे. ४. यात अजून एका गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे रुग्णांच्या खोल्यांचा स्तर वाढला आहे. अगदी फाईव्ह स्टार म्हणण्याजोग्या खोल्या सोडल्या तरी इतर सर्वसाधारण खोल्यां आणि इतर अ-वैद्यकिय सेवांच्या बाबतीत रुग्ण (व त्यांचे नातेवाईक) चोखंदळ झाले आहेत. हे नक्कीच चांगले आहे. पण दर सुधारणा तिच्याबरोबर तिची किंमत घेऊन येते हे कोणालाही मान्य करावेच लागेल... आणि वैद्यकिय असो वा अवैद्यकिय, सेवा जितकी जास्त उच्च स्तराची असेल त्याप्रमाणात तिची किंमत वाढत जाते. वरचे वस्तुस्थितीचे त्रोटक विश्लेषण पाहिल्यास सद्या अद्ययावत वैद्यकिय सेवेची किंमत का वाढली आहे आणि सतत का वाढत आहे हे ध्यानात येईल. मुख्य म्हणजे ही चिंता जागतीक असून भारत या बाबतीत अपवाद नाही. अजून एक महत्वाचे... भारतातील अद्ययावत रुग्णालयाने "मेडिकल टुरीझम" व्दारा परदेशातल्या रुग्णांना पाश्च्यात स्तराची सेवा देणे हे सामान्य झाले आहे. या रुग्णालंयांच्या सेवेची पद्धत आणि दर्जा पाश्चात्य देशातल्या रुग्णालयांच्या बरोबरीचा असूनही शिवाय त्यांचे दर पाश्च्यात्य रुग्णालयांपेक्षा कमी असल्याशिवाय शक्य नाही हे समजायला अर्थतज्ञाची गरज नाही. हे सर्व माहीत असूनही, एक अत्यंत महत्वाची गोष्ट नेहमी विसरली जाते की त्याच एका उपचारांची भारतीय रुग्णाला भरावी लागणारी किंमत बहुतेक वेळेस मेडीकल टूरीझम रुग्णापेक्षा कमी असते असेच दिसते. ======= अजून काही वस्तूस्थिती हे सर्वमान्य जागतिक सत्य आहे की, व्यावसायीक रुग्णालये चालविण्यात जेवढा रुग्णसेवा हा उद्देश असतो तितका आर्थिक फायदा हा सुद्धा उद्देश असतो... किंबहुना तसे असावे हेच जनतेच्या फायद्याचे आहे, कारण... अ) संतप्रवृत्तीने रुग्णसेवा करणार्‍या माणसांची या जगातली संख्या या जगातल्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे सेवा शक्य होईल इतकी मोठी कधीच नव्हती आणि तशी कधीच असणे शक्य नाही याबाबत दुमत नसावे. शिवाय, संतप्रवृत्तीने रुग्णसेवा करणार्‍या रुग्णालयांची अत्याधुनिक रुग्णसेवा देण्याइतकी चांगली आर्थिक अवस्था नसते. जरी अश्या सेवेची किंमत अतुलनिय असते हे निसंशय तरी पण तेथे बहुतेक वेळेस प्राथमिक स्वरूपाची सेवा दिली जाते हे पण नि:संशय. त्यामुळे बहुसंख्य जनतेला अत्याधुनिक आणि मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी व्यावसायीक रुग्णसेवा करणार्‍यांची आवश्यकता जगात सर्वच देशांत आहे. आ) व्यावसायिक रुग्णसेवा देणार्‍या रुग्णालयातील गुंतवणुक्दारांना / व्यावसायिकांना योग्य तो परतावा / वेतन न मिळाल्यास त्यांना ते रुग्णालय चालू ठेवण्यात रस राहील असे म्ह्णणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. योग्य परतावा न मिळाल्यास व्यावसायिक रुग्णसेवा आस्तित्वात राहणे शक्य होणार नाही आणि बहुसंख्य नागरिक अत्याधुनिक आरोग्यसेवेला मुकतील. कारण... इ) गुंतवणूकदार आणि वैद्यकिय व्यावसायीक समाजातल्या इतरांसारखी माणसेच असतात, त्यांनाही स्वतःच्या व कुटुंबाच्या रोजच्या खर्चांची, शिक्षणाची, सुखाची आणि भविष्याच्या तरतुदीची व्यवस्था करण्याची इच्छा व जबाबदारी असते, हे विसरून चालणार नाही. ====== सारांश अर्थातच, कोणत्याच मोठ्या रुग्णालयात लुबाडणूक होतच नसेल असा माझा दावा नाही. पण वर दिलेल्या व्यावसायीक रुग्णालये चालविण्यामागील अर्थकारण आणि वस्तुस्थितीच्या त्रोटक विश्लेषणाने हे सिद्ध व्हावे की कोणत्याही सबळ पुराव्याविना सरसकट सगळ्या रुग्णालयांवर आरोप करणे न्यायपूर्ण होत नाही. ====== एका बाजूला कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय व केवळ ऐकीव माहितीवर दावा आहे असे स्वतः कबूल करून, वर सरसकटीकरण करून केलेला... मात्र कॉर्पोरेट इस्पितळांचा नॉर्म हा लुबाडणूक करणे हाच झालाय हे कदाचित तुम्हाला अनुभवास आले नसावे किंवा पटत नसावे. त्याबाबत मी फारतर इतरांची माहिती देऊ शकतो त्याव्यतिरिक्त काही करु शकत नाही. हा दावा धारिष्ट्याचा आहे आणि दखलपात्र होऊ शकतो! त्यामुळे त्यावर इतर काही स्वतंत्र टिप्पणी करण्याचे मुद्दाम टाळले आहे. ======
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Fri, 03/20/2015 - 20:24 नवीन
आतापर्यंत फक्त डॉक्टरांच्या अडचणींचेच दाखले मिळत होते. निदान पेशंटचाही काही प्रश्न आहे हे आता हळूहळू मान्य होतेय ही प्रश्न सुधारण्याच्या दृृष्टीने प्रगती आहे यातच समाधान मानतोय.
हा दावा धारिष्ट्याचा आहे आणि दखलपात्र होऊ शकतो!
हे वाक्य तर अजिबात समजले नाही. कसली दखल आणि कुठे दखलपात्र? एफआयआर वगैरे संदर्भात काही आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/20/2015 - 20:45 नवीन
मतांत सुधारणा होते आहे हे वाचून आनंद झाला :) कोणत्याही, विषेशतः गुंतागुंतीच्या आणि अनेक हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) असलेल्या, विषयाबद्दल सर्वांगिण सबळ माहितीशिवाय, विषयाचा सर्वांगिण अभ्यास करून, मूळ कारणे शोधून काढल्याशिवाय, केवळ ऐकीव माहिती अथवा वरवरच्या समजूतीने ठाम मतप्रदर्शन करणे सरतेशेवटी मूळ उद्देश्याला हानीकारक ठरू शकते. "रोग केवळ त्याच्या वरवर दिसणार्‍या लक्षणांवर उपचार करून बरा होत नाही तर त्याच्या मूळ कारणांवर उपचार केल्याने होतो." हे वाक्य वाच्यार्थाने कोणत्याही क्षेत्रातल्या समस्येला लागू पडते. ====== हे वाक्य तर अजिबात समजले नाही. कसली दखल आणि कुठे दखलपात्र? एफआयआर वगैरे संदर्भात काही आहे काय? यासाठी तुमचा हा दावा वाचा... कॉर्पोरेट इस्पितळांचा नॉर्म हा लुबाडणूक करणे हाच झालाय अश्या गंभीर सरसकट आरोपासाठी तुम्हीच असे म्हटले आहे... त्याबाबत मी फारतर इतरांची माहिती देऊ शकतो त्याव्यतिरिक्त काही करु शकत नाही. कोणत्याही जबाबदार दाव्यासाठी यापेक्षा खूप जास्त आणी सबळ पुरावे असायला पाहिजे असे मला वाटते. ======
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Sat, 03/21/2015 - 14:05 नवीन
अहो काका माझं मत तेच आहे. ११ मार्चला (दहा दिवसांपूर्वी) मी लिहिलेला प्रतिसाद पाहा. मला संपादकीय अधिकार नसल्याने मी तो नंतर एडिट केलाय असेही नाही.
खरंय आजानुकर्ण - Wed, 11/03/2015 - 08:55 जेव्हा तातडीच्या मेडिकल सेवेची गरज असते तेव्हा करता रुग्णाच्या नातेवाईकांकडून अत्यंत भावनिक होऊन विचार केला जातो. अशा प्रसंगी रॅशनल विचार करणे शक्यच नसते. या गोष्टींचा फायदा घेऊन पिळवणूक चालू आहे. अमेरिकेत जसे ओबामाकेअरच्या धर्तीवर इन्शुरन्स कंपन्या व हेल्थकेअर इंडस्ट्रीला चाप लावला आहे त्या धर्तीवर भारतात काहीतरी रेग्युलेशन हवे आहे.
हेच वाक्य मी वर लिहिल्यावर आता तुम्हाला कुठेतरी दिग्दर्शन होत असल्याची जाणीव झाली. कॉर्पोरेट हॉस्पिटलबाबत डॉ. आनंदी गोपाळ यांनी थोडी अंतर्गत माहिती दिली होती तो प्रतिसाद कदाचित तुम्ही वाचला नसावा. अर्थात डॉ. मंडळींनी दिलेल्या प्रतिसादाबाबत सबळ आणि जास्त पुराव्यांची मागणी झाली नसल्याने तो कदाचित योग्य माहितीवर आधारित असावा असे मानून मी पुढले मत बनवले होते. असो.
मोठाली हॉस्पिटल्स चालवणारे नॉनमेडिको हलकट एम्बीए झालेले अ‍ॅडमिनिस्ट्रेटर नोकरीला ठेवतात अन ते ज्युनियर डॉक्टरांना अमुक महिन्यांत इतक्या बायपास नैतर तितक्या हिस्ट्रेक्टॉम्या करा नाहीतर तुमची अ‍ॅटॅचमेंट रद्द करू असल्या 'बिझिनेस टार्गेट' धमक्या देतात, ही तुमच्या समाजाची 'हेल्थ इंडस्ट्री'??? तिथे तुमच्या आयुष्याला सेल्स टार्गॅट ठरवलं तर वाईट वाटत नाही का? एथिक्स लावून डॉक्टरला दाबून मारणार, अन तिकडे हे 'हेल्थ इंडस्ट्रियालिस्ट' कट वाटायला ओपनली पीआरओ ठेवणार, निर्लज्जपणे जाहिरात करणार वर सांगणार की आम्हाला एमएमसीचा कंट्रोल लागू नाही?? सरकारी नोकरांना पैसे खाऊ घालून बिनडोक कायदे पास करून खासगी इमानदार सेवा देणारे दवाखानेच चालणार नाहीत, असा कावा रचणारे कोण आहेत? कॉर्पोरेट हॉस्पिटल अन इन्श्युरन्स्वाले, की डॉक्टर्स? खिशात २० रुपये घेऊन तापाची सुई घ्यायला जा बरं अमेरिकेतल्या दवाखान्यात? अन सांगा त्याला की माझा इन्शुरन्स नाही म्हणून? त्या नॉनमेडिकोजनी हे सगळं केलं, तरी बिलातले ८० हजार डोळ्यात आले लोकांच्या, बाकीचे दीड पावणेदोन लाख गेले कुठे?? ते नाही विचारलंत? बालाजी तांबेचे "बिझिनेस एथिक्स" मी नको पाळू? कंप्यारिझन पण नको? का?? क्वालिफाईड डॉक्टरांचं डॉक बॅशिंग करायला तर भल्ती मजा येते बा! तांबे बॅशिंगही करायचं बघा की कधीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Sat, 03/21/2015 - 07:11 नवीन
आतापर्यंत फक्त डॉक्टरांच्या अडचणींचेच दाखले मिळत होते. निदान पेशंटचाही काही प्रश्न आहे हे आता हळूहळू मान्य होतेय ही प्रश्न सुधारण्याच्या दृृष्टीने प्रगती आहे यातच समाधान मानतोय. आतापर्यंत डॉक्टरांवर अन्याय याचे किती धागे निघाले आणि त्यात किती डॉक्टरनी आपले रडगाणे गायले याची काही विदा द्याल का? डॉक्टर किती पैसे लावतात हा तर एक अतिशय लाडका विषय ( श्रमिक वर्गाची पिळवणूक सारखा) रुग्णांवर सतत अन्याय किती होतो आहे. डॉक्टर कसे चोर, डाकू आणि लुटालूट करीत आहेत याचे किती तरी प्रतिसाद आणि धागे आपल्याला मिपावर सहज मिळतील. उदा. शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली आणि फी फक्त ८००००/- म्हणजे फार स्वस्तात सोडले आपल्याला. नाहीतर आजकाल चोर सुद्धा फक्त १/२ मिनिटात ५००००/- ची गळ्यातली चेन काढून नेतात. त्यामानाने फार कमी पैसे घेतले त्यामुळे आपल्या मित्राचे मनापासून अभिनंदन. ता.क.: बायपास सर्जरी हे एक मोठे फॅड आहे! तेंव्हा हा मानभावीपणा पुरे झाला. मी एक साधा सरळ प्रश्न विचारतो आपल्यापैकी किती लोकानी रेल्वेच्या आरक्षणाच्या कारकुनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे? तो सकाळी आठ ते चार मानेवर खडा ठेवल्यासारखा काम करत असतो. काही चूक झाली तर पैसे त्याला स्वतःच्या खिशातून भरावे लागतात. आपण समजा दोन तास रांगेत उभे आहात आणि दहा वाजता तो माणूस पाच मिनिटे चहा प्यायला गेला तर लगेच आपण त्याच्या नावाने खडे फोडू लागता. मी माझ्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक सेवा हि अशीच आहे हे असे उदाहरण देऊन सांगत असतो. डॉक्टरला एक साधा माणूस म्हणून पहा कि. जीव वाचला (आणि पैसे घेतले नाही) तर एकदम देव. आणि जीव वाचला पण भरपूर पैसे घेतले तर लुबाडणूक आणि जर रुग्ण दगावला तर एकदम सैतान कसाई दरोडेखोर ??? असो या कथ्याकुटातून काहीही निष्पन्न होणार नाही हे माहित असूनही मी काही सत्य परिस्थिती काही सुजाण लोकांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना त्यातून लोणी घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे ज्यांना ताक फुंकायचे आहे त्यांनी तसे करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Sat, 03/21/2015 - 14:21 नवीन
एवढं इमोशनल व्हायची गरज काय आहे हे मला कळत नाही. डॉक्टर-साधा माणूस-कामाबद्दल समाधान वगैरे मुद्दे कशासाठी काढताय. अनरेग्युलेटेड बिझनेस असला की त्यात गैरप्रवृत्ती वाढतात हे वेगळं सांगायला नको. आता हेल्थ इन्शुरन्स आणि हेल्थकेअर इंडस्ट्रीच्या साट्यालोट्यातून या गैरप्रवृत्तींचा सुकाळ दिसतोय. बिल्डर-राजकारण्यांच्या साटेलोट्यात जे दिसतंय तेच इथे आहे. दोन्ही ठिकाणी ग्राहक/रुग्ण हे नशीबावर हवाला ठेवून चाललेत. १९९२ पर्यंत भारतात सेबीसारख्या संस्थांना पुरेसे अधिकार नव्हते. डिमटेरिलयाझेशन वगैरे गोष्टी नव्हत्या. शेअरचे फिजिकल पेपर्स हस्तांतरित केले जायचे. हर्षद मेहताचा घोटाळा झाल्यावर रेग्युलेशन आले आणि सामान्य गुंतवणूकदारांना एक अकाऊंटेबल सिस्टम मिळाली. तोच प्रकार अँफीसारख्या संस्था आल्यानंतर म्युच्युअल फंडांबाबत झाला. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी, आयआरडीए वगैरेंसारख्या रेग्युलेटरी संस्थांमुळे या सर्व सेवाकंपन्या ग्राहकांना अकाऊंटेबल होतायत. त्याच धर्तीवर हेल्थकेअर-हेल्थइन्शुरन्स रेग्युलेशन असायला हवे इतकंच मला म्हणायचंय. आज हेल्थ इन्शुरन्स आवश्यक आहे असं तुम्ही म्हणताय. हेल्थ इन्शुरन्सचे एक्सक्लुजन पेपर्स पाहिलेत का? हेल्थ इन्शुरन्सची कागदपत्र पाहिली तर योग्य कवरेजची खात्री करुन घेण्यासाठी त्या ग्राहकाला वकीलीतली एलएलबी आणि मेडिसिनची एमडी या दोन्ही पदव्या असल्या तर काहीतरी शाश्वती मिळेल असे आज चित्र आहे. उदा. मित्राच्या इन्शुरन्सचे पेपर पाहिले त्यात. 'हॉस्पिटलायझेशनमध्ये कॅथेटरचे पैसे देणार नाही' असे काहीतरी एक्सक्लुजन होते. आता पेशंटला कॅथेटर म्हणजे काय हे माहिती असणे ही आवश्यकता आहे काय? मग कॅथेटरचे पैसे देणारा इन्शुरन्स कोणता असावा बरे? (हे एक उदाहरण झाले. अशी एक्सक्लुजनची १२-१५ पाने असतात). त्यासाठी आजकाल १ हेल्थ इन्शुरन्स घेण्याऐवजी २ वेगवेगळे घ्या म्हणजे कवरेजचे 'चान्सेस' वाढतील अशा काहीतरी युक्त्या सांगितल्या जातात. हा काय प्रकार आहे?
जीव वाचला (आणि पैसे घेतले नाही) तर एकदम देव. आणि जीव वाचला पण भरपूर पैसे घेतले तर लुबाडणूक आणि जर रुग्ण दगावला तर एकदम सैतान कसाई दरोडेखोर ???
भरपूर पैसे ही जीव वाचवण्याची किंमत नसते. उपचाराची जी रास्त किंमत आहे ती घ्यावी. उगीच इन्शुरन्स आहे म्हणून चार्जेस लावायचे आणि जीव वाचवला म्हणजे उपकार केल्याच्या थाटात पेशंटकडून कृतज्ञतेची अपेक्षा करायची हा दांभिकपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 03/21/2015 - 14:27 नवीन
लुबाडणूक करणे हा नॉर्म समजणार्यांकडून "कृतज्ञतेची अपेक्षा" करायची म्हणजे आपण शाकाहारी आहोत म्हणून सिंह आपल्याला खाणार नाही असे समजण्यासारखे बालबुद्धीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ह
हाडक्या Sat, 03/21/2015 - 13:41 नवीन
एक्का काका ... अतिशय सहमत.. दोन्ही बाजूंनी मतं मांडलीयत तुम्ही. पण खूप सारे प्रश्न पण उपस्थित होतायत मग. याची वेगळी चर्चा होऊ शकते. शक्य असेल तर वेगळा धागाच करता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/21/2015 - 14:21 नवीन
धन्यवाद ! हा म्हटलं तर गुंतागुंतीचा आहे आणि खरं तर अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक, इ (गैर)समजूतींनी गुंतागुंतीचा बन(व)लेला आहे. त्यामुळे त्यावर किती चर्चा झाली तरी एकमत होणे कठीण आहे. पण कमीत कमी प्रामाणिक कारणशोध होऊन व्यावहारीक उपाय मान्य केले गेले तरी खूप आहे. आपल्याकडे सर्व "जीवनावश्यक" हे लेबल लागलेल्या सेवा (उदा. वैद्यकीय, रेल्वे, अग्निशमन, पाणी, वीज, इ) जागतिक दर्जाच्या मिंवा किमान उच्च दर्जाच्या असाव्या असे मत असते... पण त्यांच्या उच्च दर्जासाठी अगदी पाश्च्यात देशातले नाही तरी इथले योग्य ते मुल्य मोजायला लागते हे मात्र सोईस्करपणे विसरले जाते. राजकारणीही लोकांच्या या एकांगी आणि स्वार्थी विचारांचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांच्या स्वतःच्या फायद्याचे कायदे-नियम बनवून मजा बघतात आणि मजा करतात ! ही वस्तूस्थिती दु:खदायक आहे, पण दुर्दैवाने खरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Sat, 03/21/2015 - 20:15 नवीन
आपल्याकडे सर्व "जीवनावश्यक" हे लेबल लागलेल्या सेवा (उदा. वैद्यकीय, रेल्वे, अग्निशमन, पाणी, वीज, इ) जागतिक दर्जाच्या मिंवा किमान उच्च दर्जाच्या असाव्या असे मत असते... पण त्यांच्या उच्च दर्जासाठी अगदी पाश्च्यात देशातले नाही तरी इथले योग्य ते मुल्य मोजायला लागते हे मात्र सोईस्करपणे विसरले जाते.
समजा मूल्य मोजायला लोक तयार झाले तरीही
सेवेची किंमत तिच्या स्तराशी आणि गुंतागुंतीशी निगडीत असावी
हे कमीत कमी कोणीतरी निश्चित करावे असे वाटते. ते कोण करणार, डॉक्टरच त्यासाठी योग्य आहेत ना. आजकाल कट प्रॅक्टिस, मनमानी कन्सल्टंट फीज (मी माझे आयटीत आहे हे सांगायला आज काल घाबरतो कारण रिक्षावाल्यापासून डॉक्टरपर्यंत प्रत्येकजण झटक्यात दर वाढवतो! रिक्षावाल्याशी भांडता येते, एखाद्या विजिटसाठी डॉक्टरशी नाही.), कर चुकवेगिरी यासारख्या गोष्टी ज्या वैद्यकीय पेशासंदर्भात सर्वसामान्य बनत चालल्या आहेत ते अतिशय चूक आणि वाइट आहे.
आपल्याकडे सर्व "जीवनावश्यक" हे लेबल लागलेल्या सेवा (उदा. वैद्यकीय, रेल्वे, अग्निशमन, पाणी, वीज, इ)
आता हा अतिशय योग्य मुद्दा म्हणून म्हणू इच्छितो की डॉक्टरला इंजिनीअर अथवा मेकॅनिकशी नका ताडू. फार तर फायरमनशी तुलना करा. जसे की तुमच्या घरी आग लागलीय आणि आता फायरमन विझवण्यासाठी त्याच्या गुंतागुंतीनुसार पैसे चार्ज करतोय. लोक संकटात असतात म्हणून दवाखान्यात येतात आणि म्हणून डॉक्टरांंबद्दल चर्चा होते हो. ते मनावर न घेता, भावनिक न होता डॉक्टर किमान इथे तरी बोलू शकतात ना. कोणीतरी साध्या मारुतीची आणि मर्सिडिजची तुलना केली होती उदा. म्हणून , त्याबद्दल असे म्हणता येईल की अहो इथे सर्वांनाच मर्सिडिज (हे शरीर) दिलीय हो, आणि ती विकून मागितली तरी दुसरी बैलगाडीपण मिळत नाही मग मर्सिडिज आहे तर त्याचा खर्च पण तसाच हा युक्तिवाद आणि विचारसरणी इथे नै पटत.
राजकारणीही लोकांच्या या एकांगी आणि स्वार्थी विचारांचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांच्या स्वतःच्या फायद्याचे कायदे-नियम बनवून मजा बघतात आणि मजा करतात ! ही वस्तूस्थिती दु:खदायक आहे, पण दुर्दैवाने खरी आहे.
हे मात्र खरं. सध्या आमदारांच्या टोलमाफीचा आजचा दंगा पाहून तर हे अधिकच पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/16/2015 - 19:12 नवीन
यूएससारख्या ठिकाणी प्रचंड रेग्युलेशन आणि नियम करुन डॉक्टर व इन्शुरन्स कंपन्या दोघांनाही अकाऊंटेबल केलं आहे. खरी वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. याबाबत अभ्यास केल्यास नक्की मतपरिवर्तन होईल. प्रचंड रेग्युलेशन आणि नियम केल्याने व विशेषत: कायद्याच्या प्रचंड दबावाखाली दबलेल्या अमेरिकन आरोग्यसेवेला "डिफेन्सिव्ह मेडिसिन" असे सार्थक नाव पडले आहे. तेथिल आरोग्यसेवा फार महागडी आहे यामागे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या स्तराचा जेवढा हात आहे तेवढाच (काहींच्या मते त्यापेक्षा बराच जास्त जास्त) रुग्ण आपल्यावर खटला भरणार याची खात्री करण्यासाठी घेतलेल्या काळजीपोटी केलेल्या (शुद्ध शास्त्रीय विचाराने अनावश्यक ठरू शकतील पण न केल्यास कायद्याच्या कचाट्यात सापडवू शकतील अश्या) रुग्णाच्या तपासण्या, प्रशासकिय प्रोसिजर्स, इ चा हात आहे. आजच्या घडीला अमेरिकेसकट कोणताही देश अमेरिकन आरोग्यसेवेचे मॉडेल आदर्श आहे असे म्हणत नाही... किंबहुना आदर्श कसा नसावा याचे उदाहरण म्हणून खुद्द अमेरिकन तज्ञ बर्‍याच वेळा त्याचा उल्लेख करतात ! कॅनडात आरोग्यसेवा तुलनेने सुलभपणे मिळते पण महागडेपणाच्या बाबतीत तो देश अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून आहे. युकेच्या आरोग्यसेवेचा दर्जा उच्च आहे व खर्च इतर विकसित देशांच्या तुलनेने कमी आहे. परंतु ती सेवाही सरकारला दिवसेदिवस डोईजड होऊ लागली आहे. शिवाय युके, अमेरिका, इ देशांतील नित्याच्या शस्त्रक्रियेसाठी (रुटीन ऑपरेशन्स) लांबच लांब प्रतिक्षायाद्या असतात व बहुतेक वेळेस अनेक महिने वाट पहायला लागते. भारत, थायलंड, फिलिपिन्स, इ देशांत "मेडिकल टूरिझम"च्या झालेल्या भरभराटीमागे हा सेवाविलंब, खार्चिकता आणि सेवेचा तुलनात्मक दर्जा ही तीन फार महत्वाची कारणे आहेत. अमेरिकन आरोग्यसेवेबद्दलची तज्ञांची (यात अमेरिकन तज्ञ आणि अमेरिकन कायदेमंडळाचे सदस्यही अंतर्भूत आहेत) सर्वमान्य मते अजिबात गुपीत नाहीत. झटपट माहितीसाठी Mirror, Mirror on the Wall, 2014 Update: How the U.S. Health Care System Compares Internationally हा कॉमनवेल्थ फंडाचा ताजा अहवाल उपयोगी पडेल. एक झलक म्हणून त्या अहवालातले २०१४ सालच्या आकड्यांसह ११ विकसित देशांची तुलनात्मक माहिती देणारे हे टेबल बरेच काही सांगून जात आहे. त्यात कॅनडा आणि अमेरिकेचे सर्वसाधारण मानांकन क्रमांक अनुक्रमे १० आणि ११ आहेत... Image removed. असो. आरोग्यसेवेसारख्या फार महत्वाच्या आणि लोकांच्या जिवनमरणाचा संबंध असलेल्या विषयावर वरवरच्या माहितीवरून आणि एखाद्या स्वानुभवावरून मते बनवली जाऊ नयेत यासाठीच हा लेखनप्रपंच केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 03/16/2015 - 19:46 नवीन
लोकांचे सरासरी आयुर्मान, अॅक्टिव आयुष्याची वर्षे वगैरे पॅरॅमीटर्सवर विकसित देश हे चांगली आरोग्यसेवा पुरवणारे देश आहेत. या देशांमध्ये संपूर्ण खाजगी आरोग्यसेवा असणारी अमेरिका आणि कार्यक्षम आरोग्यसेवा असणारे इतर विकसित देश अशी विभागणी केली आहे. सरकारी आरोग्यसेवा असूनही या देशांमध्ये बऱ्याच मोठ्या लोकसंख्येला समाधानकारक आरोग्यसेवा मिळते आहे. अमेरिकेत जिथे खाजगी आरोग्यसेवा आहे तिथे इन्शुरन्स कंपन्या आणि हेल्थकेअर प्रोवायडर यांच्या नफेखोरीमुळे प्रश्न बिकट झाल्याने अफॉर्डेबल केअर अॅक्टसारख्या सुधारणा कराव्या लागल्यात. (सरकारचे फंडिंग थांबवून गवर्नमेंट शटडाऊन करण्यापर्यंत वेळ आली होती.) भारतात आजकाल इन्शुरन्स कंपन्या किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटल्स यांच्याशी डील कराव्या लागणाऱ्या बहुसंख्यांना काय प्रकारचे अनुभव येतात याची केवळ झलक या धाग्यावर दिसली आहे. सध्याची अंदाधुंदी कमी करण्यासाठी सध्या हे दोन मॉडेल समोर आहेत. चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी आपण सरकारी मॉडेल आणू शकतो किंवा अमेरिकेसारखे रेग्युलेटेड खाजगी मॉडेल आणू शकतो. कदाचित यापेक्षाही वेगळे मॉडेल भारतात निर्माण करणेही शक्य आहे. मात्र आताचा स्टेटस को बदलणे आवश्यक आहे हेच अनेकांना पटतं नाही असं दिसतंय. भारत व इतर देशात मेडिकल टूरिझम वाढण्याचे कारण हे भारतातील सेवा त्या देशांच्या चलनाच्या तुलनेत स्वस्त आहे इतकेच आहे. रुपयांमध्ये कमावणाऱ्यांना रुपयात खर्च करताना ते टुरिझम वाटण्याची शक्यता बरीच कमी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/17/2015 - 13:17 नवीन
भारत व इतर देशात मेडिकल टूरिझम वाढण्याचे कारण हे भारतातील सेवा त्या देशांच्या चलनाच्या तुलनेत स्वस्त आहे इतकेच आहे. इतकेच कारण आहे ?!!! म्हणजे दोन दशकांपूर्वी भारतातली वैद्यकिय सेवा पाश्च्यात्य देशांइतकीच किंवा जास्त महाग होती की काय ?! मी वर फक्त तीन महत्वाची कारणे दिली आहेत. अगदी वरवर संशोधन केल्यास अजून सापडतील. दुसर्‍यांदा उर्धृत करायचा दोष पत्करून माझे विधान परत (आणि या लेखासंदर्भात शेवटच्या वेळी) देत आहे (इथले बरेच प्रतिसाद ते विधान सिद्ध करण्यासाठीच आहेत असे दिसत आहेत !)... जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्‍या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजुतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्‍या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
असंका Tue, 03/17/2015 - 13:35 नवीन
सेफ टारगेटस. अगदी खरं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Mon, 03/16/2015 - 17:33 नवीन
पण वैद्यकीय व्यवस्था समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवली जावी हे काही 'लई' मागणं नसावं. \ \टिपिकल स्वप्नाळू कम्युनिस्ट प्रतिसाद (utopian) जेथे सरकार निम्म्याहून जास्त जनतेला अन्न वस्त्र आणि निवारा सारख्या मुलभूत सुविधासुद्धा पुरवू शकत नाही तेथे वैद्यकीय "व्यवस्था"पुरवण्यासाठी पैसा आणायचा कुठून? बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Mon, 03/16/2015 - 19:43 नवीन
टिपिकल स्वप्नाळू कम्युनिस्ट प्रतिसाद (utopian) जेथे सरकार निम्म्याहून जास्त जनतेला अन्न वस्त्र आणि निवारा सारख्या मुलभूत सुविधासुद्धा पुरवू शकत नाही तेथे वैद्यकीय "व्यवस्था"पुरवण्यासाठी पैसा आणायचा कुठून? बाकी चालू द्या
तुम्ही असं का गृहीत धरताय की वैद्यकीय सेवा ही अन्न वस्त्र आणि निवारा या "नंतर" येते? आणि डॉक्टरसाहेब, जर इथली जनता काँग्रेस चे काळे ढग हाकलून लावू शकते, जर नोकरशाहीला सकाळी ९ वाजता ऑफिसला जाण्याची जबरदस्ती केली जावू शकते, तर हे ही होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Mon, 03/16/2015 - 19:28 नवीन
स्वधर्म यांचा मूळ प्रश्न: मूळ मुद्दा असा की, खरंच एका माणसाच्या कामाची किंमत दुसर्या माणसाच्या कामाच्या १००/२०० पट असू शकते? भले मग तो कितीही कुशल असो. मला या प्रश्नात साम्यवाद दिसून येतोय. कुणीतरी आपल्या अनावश्यक आणि अनैसर्गिक अधिकारांचा वापर करून आपले शोषण करतो अशी भावना सामान्य नागरिकांच्या मनात आली किंवा आणल्या गेली की समजावे साम्यवाद शिरतोय. सर्व माणसे समान, कामाचे समान दाम ही घोषणा कामगार सभेत छान वाटते ऐकायला. चर्चेत हॉस्पीटल्सची महागडी बिले, किंमतीनुसार न मिळणारी सुविधा, कट-प्रॅक्टीसेस, अनैतिक कृती वैगेरे अवांतर गोष्टींवरच भर दिला गेला. त्यामुळे डॉक्टरांचे फी आकारणे हे सुद्धा ह्या क्षेत्रातल्या अनैतिक गोष्टींमधली एक आहे असेच वाटायला लागले. जे चुकीचे आहे असे माझे मत आहे. डॉक्टरांच्या पैशांवर डोळे मोठे करणार्‍या पब्लिकला आपला फ्लॅट ५ लाखात घेउन ५ वर्षात ४० लाखाला विकतांना हाच विचार का सतावत नाही? इथल्या डॉक्टरांनी आपापल्या परीने चांगली उत्तरे दिलीत पण आम्ही खर्च करतो, मेहनत घेतो, वेळ घालवतो, अनुभवाचा पैसा आहे वैगेरे उत्तरे देऊन माझ्यामते थोडीशी सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न झाला तो पटला नाही. हा वरचा प्रश्न नुसता डॉक्टरांनाच नाहीतर सेवाक्षेत्रातल्या सगळ्याच व्यावसायिकांना सतावतो. जेव्हा माणूस देणेकर्‍याच्या भुमिकेत असतो तेव्हा कितीही पैसे द्यावे लागले तरी 'नेहमीच' जास्त वाटत असतात. कारण आपण भारतियांना मुळात श्रमाचा, कौशल्याचा काही खास आदर पुर्वीपासूनच नाही. दुसर्‍याने फक्त शारिरीक, बौद्धिक, वैचारिक मदत केली तर त्यात 'एवढे पैसे घेण्यासारखं एवढं काय?' असा साधारण भाव असतो. वस्तूची किंमत देतांना, वस्तूचा वापर, उपभोग घेतांना हा विचार केला जात नाही. वस्तू तयार करायला कारखाना लागतो, त्याला प्रचंड पैसा लागतो, शिवाय ती वस्तू आपल्या हातात असते. असे सगळे ज्ञान सामान्य माणसाकडे असते. म्हणून त्यात जास्त त्रास होत नाही. फारतर भावताव करून आपल्याला अमूक एक रुपयांची सूट मिळवता आली याचं सुप्त समाधान. पण हातात असलेल्या वस्तुच्या खर्‍या किंमतीचं त्याला कधीच ज्ञान होत नाही. इंटँजिबल अ‍ॅसेट्स च्या बाबतीत लोकांच्या कपाळावर आठ्या येतातच हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी एक कंपनी लोगो बनवायचे सुमारे ५ ते १५ हजार घेतो. दिसायला घड्याळाच्या डायलएवढ्या दोन-तीन वर्तुळं, त्रिकोण, चौकोन असलेल्या रंगीत चित्राला बनवायला फारसा वेळ लागत नसणार हे अगदी बालबुद्धीलाही सुचते. त्यात कंपुटरवर तर बनते आजकाल असे म्हणून काही लोक हे किंमत अत्यंत अवाजवी आहे असं म्हणतात. कारण १० मिनिटांच्या कामाचे १० हजार फारच होतात हा विचार. हेच काम ('असंच' नाही) रोड्साईड डीटीपीवाला त्यांना १०० रुपयात करून देतो. कुणी आणि डिझायनर ५०० रुपयात करून देतो. त्यामुळे मी देणारा वेळ, माझा अभ्यास, कला, अनुभव, झालेलं नाव याच्याशी त्यांना काहीच घेणे-देणे नसते. कारण त्यांच्या हातात फ्रीज, टीवी सारखी दृश्य वस्तू पडत नाही म्हणून फसवल्या जातोय का असा भुंगा सतावतो. याबाबतीत एक जुना किस्सा: सरकारने 'काळ्या नंबरप्लेट बदलून पांढर्‍या करा'चा हुकूम काढला. मी पण एकएक काळा-पांढरा डबा घेऊन आपल्या कलेतून पॉकेट्मनी कमवायला सुरुवात केली. एक मुलगा साधारण १२वीतला आपली लुना घेऊन आला (ब्रह्मे नाही हो) २५ रुपये फार होतात म्हणे, एवढासा तर रंग लागतोय. मी म्हटले, भाऊ, स्किलचे पैसे आहेत. तर तो देव-ग्राहक म्हणाला ते तर गॉड-गिफ्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय कष्ट पडतात? सवयीचं आहे तुमच्या. १५ रुपये घ्या. मी म्हटले घे हा रंगाचा डबा आणि ब्रश. फक्त मला १०च रुपये दे आणि बस रंगवत आपली नंबरप्लेट. उद्या पोलिसाने पकडले तर सांग आपलं दिव्यज्ञान आणि वाचव ५०० रुपये कसे ते? दुसर्‍याच्या श्रमाची किंमत करा, तो जो मागतोय त्या मोबदल्यात तुमच्या हातात काय पडतंय याचा दूरगामी परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो की नाही याचा विचार करा. कोण काय मागतंय यापेक्षा त्यातून माझा काय फायदा आणि त्या फायद्याचं माझं मूल्यमापन काय हा प्रश्न स्वतःला विचारला की कुणाचेही पैसे डोळ्यात येणार नाही. तुमच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया करणारा भले तिथे ८च तास उभा असेल. पण तुम्ही त्या आठ तासाच्या जिवावर कदाचित विसेक वर्ष अजून आनंदानं जगणार आहात. त्याचे ते पैसे आहेत. बाकी परवडत नसेल तर मी सुरुवातीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सरकारी दवाखाने आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 03/17/2015 - 12:44 नवीन
चर्चा बरीच झडली. त्यातून मला कळले ते असे: - महाकुशल लोकांच्या कामाचे मोल करणे बरेच अवघड अाहे. वरवर दिसतो तसा साधा हिशोब लावून कदाचित उपयोग नाही. माझा दृष्टीकोण ओव्हर-सिंपलिफाइड होता. बदलाची गरज अाहे. - परवडले तर घ्या, नाहीतर फूटा हे काही अपवादात्मक तत्व नाही. सर्रास वापरले जाते. तो काही बहुसंख्य लोकांना सतावणारा मुद्दा नाही. - मागणी - पुरवठा - किंमत ही साखळी बरीच खोलवर काम करतेय. सहजासहजी ‘शेवटच्या पायरीवरच्या माणसाचा’ विचार होण्याचे दिवस संपले. - व्यकतीगत उत्कर्ष हे वाटते त्यापेक्षा मोठेच मूल्य अाहे. - मी कुठेच सर्वांना समान मोबदला मिळावा असे मत मांडले नव्हते, अाजूबाजूच्या लोकांच्या जीवनमानाशी काही ताळमेळ असावा, समाजात अनलिमिटेड अार्थिक डिसपॅरिटी नसावी, असे मत होते. अत्यंत भाडवलशाही प्रधान, व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक असलेल्या देशातही एखाद्या शिक्षकाचा पगार अाणि संगणक अभियंत्याचा पगार पाहता, एवढी डिसपॅरिटी अाढळत नाही. अापल्याकडे मात्र ही सर्वत्र केवढी अाहे. कित्येकांना त्यात साम्यवाद, जळजळ इ. दिसले. हे मात्र समजले नाही. डाॅक्टर या एकाच व्यवसायिकावर रोख नव्हता, पण चर्चा मात्र तोच फोकस धरून झाली. त्या जागी कदाचित इतर काही उदाहरणे अाणायला हवी होती. किंवा मूळ लेखातच ती तृटी राहून गेली. असो, पण ते उदाहरण घेतल्याने खोलवर चर्चा झाली हेही खरे. इथे काही प्रतिक्रिया मात्र कारण नसताना व्यक्तीगत अाल्या, ते टाळता अाले असते.
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 03/17/2015 - 13:53 नवीन
काय ठरल म शेवटी ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/17/2015 - 13:57 नवीन
प्रत्येकाचे आपापला मुद्दा बरोबर आहे हे बर्‍याच अंशी ठरवून झाले आहे. बोला, तुम्हाला काय ठरवायचं आहे ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
असंका Tue, 03/17/2015 - 13:54 नवीन
ठिक आहे. फार फरक असूच नये उत्पन्नात. पण त्यासाठी इतरांचे उत्पन्न जास्ती का हाच एक प्रश्न विचारावासा का वाटला? इतरांचे उत्पन्न कमी का असंही विचारता आलं असतं. त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येइल असंही विचारता आलं असतं- उगाच ज्यांनी आपल्या प्रश्नाला आपल्या मताविरुद्ध उत्तरे दिली त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून जात आहात.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/17/2015 - 13:54 नवीन
चला ३०० झाले.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/17/2015 - 14:02 नवीन
३०० प्रतिसाद धाग्यास पडल्याबद्दल टाके घालायची सुई, एक इंपोर्टेड स्टेथोस्कोप, २१ हायपोडेर्मिक सिरिंजेस, पोटदुखीवरची २१ घरगुती औषधे ह्या पुस्तकाची एक पायरेटेड कॉपी देउन धागाकर्त्याचे उपचार केले जात आहेत. (अखिल मिपा मापंकाढे समिती)
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 03/17/2015 - 14:08 नवीन
फुकट ना? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/17/2015 - 14:42 नवीन
हो...अहो सत्कार आहे हा....शालजोड्या संपल्यात नैतर त्यापण देणार होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
स
स्पा Tue, 03/17/2015 - 14:09 नवीन
पुरे झाले आता चिपाड झालेय साफ धाग्याचे :)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 03/20/2015 - 09:19 नवीन
http://www.bbc.co.uk/hindi/india/2015/03/150319_private_health_sector_reforms_vr आज हे वाचले
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 03/20/2015 - 15:03 नवीन
शायद हल ये है कि सरकारी अस्पतालों को बेहतर बनाया जाए ताकि मरीज़ों के पास एक रास्ता और भी हो.
याला खरं तर पर्यायच नाही. मोदी सरकारने खरं तर दोन गोष्टींकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय त्यातली एक गोष्ट आहे वैद्यकीय सेवा आणि दुसरी शिक्षण. अर्थात शेती हा एक इश्यू आहेच पण शहरी जनतेसाठी तरी महत्वाच्या अशा या दोनच गोष्टी. सरकारनं असं का केलं हे समजायला मार्ग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
आ
आजानुकर्ण Sun, 03/22/2015 - 13:57 नवीन
Corruption ruins the doctor-patient relationship in India हा डॉ. डेविड बर्गर यांनी ब्रिटिश मेडिकल जर्नमध्ये लिहिलेला लेख या प्रश्नाचे विस्ताराने वर्णन करतो http://pbtindia.com/wp-content/uploads/2014/06/BMJ-Article-May-2014-Healthcare-corruption-in-India.pdf डॉ. समीरन नंदी यांनी भारतीय दृष्टीकोणातून या लेखाला दिलेली सहमती http://indianexpress.com/article/opinion/columns/first-give-the-patient-right-to-know/ दोन्ही लेख खूपच छान.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 03/22/2015 - 13:58 नवीन
लेखातील वाक्य
Suffice it to say that most doctors with whom I have spoken agree that this state of affairs exists and Transparency International (TI) has concluded that the Indian healthcare sector is the second most corrupt organisation that an ordinary citizen has to encounter (next to the police force).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
न
नगरीनिरंजन Sun, 03/22/2015 - 14:41 नवीन
अरेरे.. वाईट वाटलं. पेशंट दगावल्यावर डॉक्टरांना धरुन मारणार्‍या व हॉस्पिटलची तोडफोड करणार्‍या लोकांना नावं तरी कोणत्या तोंडाने ठेवायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Sun, 03/22/2015 - 15:23 नवीन
डॉ. बर्गर यांनी जागतिक वैद्यकीय सेवेची इंटिग्रिटी राखण्यासाठी विकसित देशांनी भारतातल्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांतून डॉ. झालेल्यांना झालेल्यांना potentially corrupt मानून त्यांची पदव्या अग्राह्य धरण्यास पुढाकार घ्यावा अशा आशयाचा सल्ला दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
आ
आजानुकर्ण Sun, 03/22/2015 - 15:23 नवीन
त्यांच्या पदव्या*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 03/22/2015 - 20:42 नवीन
आजूबाजूला उघडपणे घडणार्‍या गोष्टींची कारणपरंपरा समजायला भारतियांना पाश्च्यात लेखांची गरज पडते हीच तर खरी शोकांतिका आहे. तसे आपल्याला बर्‍याच गोष्टी पाश्चिमात्य लोकांनी कान पकडून सांगितल्यानंतरच पटण्याची प्रथा आहेच म्हणा ! दादासाहेब/नानासाहेब/बाबासाहेब/ इ नी सरकारकडून खाजगी मेडिकल / इंजिनियरिंग / बी एड कॉलेजचा परवाना मिळवला की आपण कौतूकाने त्यांचा उदोउदो करतो. इतकेच नाही तर तेथे ७५ / ५० / २० / १० लाखांची डोनेशन देऊन त्या कॉलेजांत नावे दाखल होऊ लागली की त्या कौतूकाला अजूनच असूयायुक्त उधाण येते; काही लोक तेथे पैसे हातात घेऊन आपल्या पाल्याचे नाव दाखल करायला रांगेत उभे राहतात. अनेक दशलक्ष भरून कॉलेजात दाखल झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक खर्च केलेले पैसे कमीत कमी वेळात फायद्यासह कसे परत मिळवायचे याचा विचार करत नसतील, असा विचार करणे किती शहाणपणाचे आहे ??? इथे डॉक्टरांच्याबद्दल तावातावाने तक्रार करणार्‍यांतील किती लोकांनी या कॉलेजेसच्या सरकारी खिरापतीचे (कमीत कमी अश्या कॉलेजमधील डोनेशनचे) कौतूक न करता त्याविरुद्ध आपल्या लोकप्रतिनिधीकडे तक्रार केली आहे, किंवा ही पद्धत गैर आहे म्हणून मोर्चा नेला आहे ? त्यापेक्षा सॉफ्ट टारगेट असलेल्या डॉक्टरांविरुद्ध / हॉस्पिटल्सविरुद्ध सरसकटीकरण करून ऐकीव माहितीच्या बळावर मत बनवून एखाद्या संस्थळावर अथवा खाजगीत शेरे मारणे आणि एखाद्या हॉस्पीटलची मोडतोड करणे जास्त सोईचे आणि सुरक्षित आहे हा "सारासार विचार" सहजपणे केला जातो... जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्‍या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजूतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्‍या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!! "आपली कृती गैर होती आणि समस्येचे मूळ कारण दुसरेच होते" हे नंतर केव्हातरी आपल्याला पाश्चिमात्य लोक सांगतिलच... आणि आपला पूर्वेतिहास पाहता तेव्हा ते आपल्याला नक्कीच पटेलसुद्धा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Sun, 03/22/2015 - 23:36 नवीन
ब्रिटिश मेडिकल जर्नल हे वैद्यकीय क्षेत्रात सन्मान्य समजले जाते असा माझा समज होता. या विषयातही आपले आणि बाहेरचे असा स्पृश्यास्पृश्यपणा करायचा असतो ही अक्कल अजूनही मला आलेली नाही. हळूहळू येईल म्हणा. व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून आलेल्या एका पाहुण्या डॉक्टरला थोडक्या काळात जो भ्रष्टाचार दिसला त्याचे पुरावेच आतापर्यंत मागितले जात होते. हिम्मतराव बावस्करांचाही या कटप्रॅक्टिसबाबत लेख आला होता. दुर्दैवाने त्याचा दुवा सापडत नाहीये. मात्र आता नावाजलेल्या जर्नलमधील लेख दिसल्यानंतर मूळ कट-प्रॅक्टिस-भ्रष्टाचार आणि अकाउंटॅबिलिटीबाबत बोलण्याऐवजी भारतीय आणि पाश्चिमात्य अशी टिप्पणी रोचक आहे.
अनेक दशलक्ष भरून कॉलेजात दाखल झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक खर्च केलेले पैसे कमीत कमी वेळात फायद्यासह कसे परत मिळवायचे याचा विचार करत नसतील, असा विचार करणे किती शहाणपणाचे आहे ???
___/\___ या टिप्पणीबाबत आणि त्यामागच्या अध्याहृताबाबत निःशब्द झालोय. कमीत कमी वेळात फायद्यासह पैसे मिळवण्यासाठी कोणते मार्ग वैध आणि कोणते मार्ग अवैध आहेत याची जाणीव हिपोक्रेटसची ओथ घेणाऱ्या डॉक्टरांना नसावी! हा युक्तिवाद पाहून डॉ. बर्गर सांगतात त्याप्रमाणे अशा दशलक्ष भरुन डॉ. पदवी विकत घेतलेल्यांना पोटेन्शियली करप्ट असा शिक्का मारुन इतर देशांनी त्यांची पदवी अमान्य करणे हा एक योग्य उपाय होईल असे वाटते. गरीब रुग्णांकडून विनाकारण सीटीस्कॅन, एमराय अशा चाचण्या कमिशनसाठी करवून घेणारी इस्पितळे आणि डॉक्टर मंडळी अजून तुम्हाला सॉफ्ट टारगेट वाटतात याचे बाकी नवल वाटते. असो. या विषयावर आता माझ्याकडे नवीन काही प्रतिसाद देण्यासारखे नाही. डॉक्टरांसारख्या सॉफ्ट टारगेटवर टीका करणारा व त्यांच्या पैशावर जळणारा समजून फारतर मला गप्प केले असे समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Mon, 03/23/2015 - 06:04 नवीन
कर्ण साहेब वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचार नाही असे कोणीच म्हणत नाही. किंवा त्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. समाजातील सर्वसामान्य माणूस जेवढा भ्रष्ट आहे तितकेच डॉक्टर भ्रष्ट आहेत. परंतु आपण दिलेला दुवा आपले "नोर्म" किंवा १०० % डॉक्टर भ्रष्ट आहेत याच्या समर्थनार्थ जालावर खोदकाम करून काढलेला दिसतो आहे. कारण याचे सर्व दुवे उत्तर भारतातीलच आहेत. कारण साधे सरळ आहे. आपण बिहार व उत्तर प्रदेशात गेलात तर जवळ जवळ सगळी यंत्रणा किडलेली आहे. पण तशीच परिस्थिती सगळ्या भारतभर आहे हे म्हणणे म्हणजे बिहार मध्ये मास कॉपी करणे चालू आहे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या केंद्रांवर आहे असेच म्हणण्यासारखे आहे. आपण जर महाराष्ट्र गुजरात दक्षिण भारतात गेलात तर परिस्थिती अशी नाही हे आपल्याला कळेल. खाजगी वैद्यकीय महाविद्यालये हि ताबडतोब बंद केली पाहिजेत याबद्दल दुमत अजिबात होण्याचे कारण नाही. तेथील परिस्थिती भयावह आहे. काही दिवसांनी तर आपल्याला नुसता प्रवेशच नव्हे तर परीक्षा पास होण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतील अशी परिस्थिती असेल. आज आपल्याला एम बी बी एस होण्यासाठी ५० ते ७५ लाख रुपये खर्च येतो आणि एवढे होऊन या मुलांच्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल न बोलणे हे श्रेयस्कर राहील. एम यु एच एस ची परिस्थितीसुद्धा वाईट आहे. कारण बर्याच्षा आरक्षणाच्या उमेदवारांना पास होण्यासाठी शैक्षणिक दर्ज्याची पातळी इतकी खाली आणलेली आहे कि काही दिवसांनी केवळ परीक्षेत उपस्थित राहिलात कि पास म्हणून जाहीर करण्यात येईल. (याचे कारण राजकीय हस्तक्षेप). मी प्रत्यक्ष पाहत असलेली हि परिस्थिती भविष्यात भयावह होण्याची दाट शक्यता आहे. ( आरक्षण वादी यावर गोंधळ घालतील हे गृहीत धरून मी लिहित आहे). या कारणास्तव मी अजूनही एम डी चा परीक्षक होण्याचा सन्मान गेली ५ वर्षे नाकारत आलो आहे. लायकी नसलेल्या उमेदवाराला आरक्षण असलेल्या --(आर्थिक/ खाजगी महाविद्यालयातील किंवा जातीवरून सरकारी महाविद्यालयातील) विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याचे पाप मला माझ्या माथी नको म्हणून.आणि याच कारणास्तव मला अजूनही सहा. प्राध्यापक वरून प्रोफेसर( प्राध्यापक) म्हणून मान्यता मिळालेली नाही. (२०१० पासून अर्हता असूनही.) असो मूळ विषय काय आणि यावर आपण केलेलं खोदकाम काय याचा तसा जवळचा संबंध नाही तेंव्हा मी आता येथे थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/23/2015 - 10:40 नवीन
अजानुकर्णसाहेब, नमस्कार ! "समस्या आहे" हे कोणीच नाकारले नव्हते; माझ्यासह अनेक जणांचे जुने प्रतिसाद वाचल्यास त्यात तसा उल्लेख 'आता' दिसू शकेल. त्याबद्दल पाश्च्यात्य जर्नलमधला एक लेख वाचून तुम्हाला खात्रीलायक पुरावा मिळाला असे वाटले, हे खरेच गमतीदार आहे (काहीजण याला काखेत कळसा... इत्यादी इत्यादी असे काहीसे म्हणतील) पण तेही विरळ नाही... तेव्हा असो ! :) पण इथे मुख्य आक्षेप होता तो (अ) सरसकटीकरणाला; (आ) समस्येच्या मूळ कारणांकडे दुर्लक्ष केले जात आहे; (इ) मूळ उपाय केल्याशिवाय समस्या ठीक होणार नाही; आणि (ई) मूळ कारणावरचा उपाय करण्यासाठी लोकांत धारिष्ट्य नाही; यावर. मात्र हे सगळे अनेकदा स्पष्ट करूनही तिकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले आहे आणि काहीतरी नविन फाटा फोडला गेला. असे करणेही फार विरळ नाही त्यामुळे फारसे आश्चर्य वाटले नाही... म्हणून परत असो :) एखादी समस्या खरेच सोडवायची असली तर हे खालचे फारच साधे पण मूलभूत वचन फार महत्वाचे आहे... "समस्या सोडविण्यासाठी प्रयास करणे महत्वाचे असते, पण तो प्रयास कोणत्या दिशेने करायचा हे माहीत असणे-नसणे यावर यशापयश अवलंबून असते." तेही असोच. प्रयासाच्या योग्य दिशेकडे संभाषण वळवण्याचे माझे प्रयत्न, 'फायदा-व्यय गुणोत्तर' खूपच व्यस्त होत चालल्याने, आता आवरते घेत आहे. तुमच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा ! ======= अवांतर : १. कोणत्याही अगदी पियर रिव्ह्युड जर्नल्समधल्याही (ज्यात ब्रिटिश मेडिकल जर्नलची गणना होते) एका लेखातले दावे/निर्णय कधीही सार्वकालीन सत्य (पक्षी : देवाचा शब्द) समजले जात नाहीत. तसे समजणे शास्त्रिय तत्वात बसत नाही. (माहित नसल्यास नोंद करावी). ते दावे इतर संशोधकांच्या स्वतंत्र संशोधनाने सिद्ध व्हावे लागतात. पियर रिव्ह्युड जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले निर्णय स्वतंत्ररित्या सिद्ध न होऊ शकल्यास काही कालाने बाद केले जातात. २. ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील शोधनिबंध पाहू-वाचू शकणे ही नि:संशय फारच चांगली गोष्ट आहे. त्या आणि इतर मान्यवर जर्नल्समधेही (इथे यादी आहे) पाश्चिमात्य देशांसह इतर अनेक देशांतील वैद्यकीय सेवांबद्दल अनेक "स्कॉलरली आर्टीकल्स" सापडतील. त्यांचे वाचन नक्कीच मनोरंजक होईल याची खात्री आहे. कमीत कमी सर्वांगिण माहिती मिळून आपण केलेला वाद एकांगी तर नाही ना याची खात्री करता येईल. शास्त्रिय पद्धतीने वाद करण्यासाठी हे तत्व मूलभूत समजले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/23/2015 - 15:14 नवीन
निम्न स्तरात बर्‍याचदा भोंदु डॉक्टर असतात. खर तर ते बेअरफूट डॉक्टर्स असतात. सभोवतालच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेउन त्यानुसार त्यांना परवडेल अशा फीया ते ठेवतात. जास्त फी लोकांना परवडणारी नसते. जीवापेक्षा काही महाग नाही हा विचार तिथे नसतो. समजा काही बर वाईट झाल तर देवाची इच्छा! आधुनिक व योग्य उपचाराअभावी मरणारी कितीतरी माणसे असतात. पण डॉक्टर या पेशाची सरासरी प्रतिमा ही देवा कडून कसाई कडे चालली आहे हे कुणी नाकारु शकत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Mon, 03/23/2015 - 18:37 नवीन
आधुनिक व योग्य उपचाराअभावी मरणारी कितीतरी माणसे (x) असतात. हे जसे खरे आहे, तसेच आधुनिक पण अयोग्य उपचाराअभावी मरणारी माणसे ही ४ पट जास्त (4x) असतात, हेही तितकेच खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/23/2015 - 19:39 नवीन
आधुनिक पण अयोग्य उपचाराअभावी मरणारी माणसे ही ४ पट जास्त (4x) असतात, हेही तितकेच खरे आहे.
अभावी का मुळे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ह
हाडक्या Mon, 03/23/2015 - 21:11 नवीन
चोप्य पस्ते एररमस्ति.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/24/2015 - 03:58 नवीन
सहज एक शंका म्हणुन विचारतो. एररमस्ति म्हणजे एररम+अस्ति का एरर्+मस्ति????? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/24/2015 - 06:18 नवीन
>>> चोप्य पस्ते एररमस्ति.. शेवटची दोन टिंबे पाहता ते पूर्ण वाक्य "चोप्य पस्ते एररमस्ति अस्ति ।" असेच असावे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/24/2015 - 06:34 नवीन
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हाडक्या Tue, 03/24/2015 - 10:46 नवीन
शेवटची दोन टिंबे पाहता ते पूर्ण वाक्य "चोप्य पस्ते एररमस्ति अस्ति ।" असेच असावे
एक्का काकांना पैकीच्या पैकी मार्क.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बॅटमॅन Tue, 03/24/2015 - 13:39 नवीन
एक नंबर =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आयुर्हित Tue, 03/24/2015 - 04:55 नवीन
आधुनिक पण अयोग्य उपचारामुळे मरणारी माणसे ही ४ पट जास्त (4x) असतात,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा