Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरूके गुलाम

क
क्लिंटन
Tue, 03/31/2015 - 18:20
🗣 893 प्रतिसाद
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया द्या
206836 वाचन

💬 प्रतिसाद (893)
द
दिगोचि Fri, 07/01/2016 - 07:31 नवीन
केजरीवालना दिल्ली सरकार चालवताना किती कमि काम आहे हे त्यान्च्या या व अशा शोधावरुन समजते. काही दिवसापूर्वी वाचले होते की त्यानी इलेक्शन कमिशन्कडे अर्ज टाकून पन्जाब सरकारने नेमलेल्या चोविस पार्लमेन्टरी सेक्रेटरीन्च्या नेमणुकीची चौकशी करावी.
श
श्रीगुरुजी Fri, 07/01/2016 - 11:23 नवीन
केजरीवालांनी मुख्यमंत्री झाल्यापासून मागील १६-१७ महिन्यात खालील महत्त्वाची कामे केली आहेत. १) मोदी रोज कोणते कपडे घालतात यावर लक्ष ठेवून त्याची नोंद ठेवणे. गुगलच्या माध्यमातून ते यावर लक्ष ठेवतात. २) मोदी दिवसातून किती वेळा कपडे बदलतात याची नोंद ठेवणे. ३) मोदींच्या प्रत्येक ड्रेसची किंमत शोधणे. ४) मागील २ वर्षात मोदींनी एकूण किती किंमतीचे कपडे वापरले याची नोंद ठेवणे. ५) मोदी एकदा वापरलेला ड्रेस परत वापरतात का, तो ड्रेस धुतात का याची नोंद ठेवणे. ६) प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे. ७) देशातील कोणत्याही राज्यात खुट्ट झाले तरी लगेच तिथे धाव घेऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी ओरपणे. ८) सकाळी उठल्यावर "मोदी, मोदी, मोदी, ...", दुपारी "मोदी, मोदी, मोदी, ...", संध्याकाळी "मोदी, मोदी, मोदी, ..." आणि झोपताना "मोदी, मोदी, मोदी, ..." अशी जपमाळ ओढणे. ९) दिवसभर ट्विटरवर वेळ घालविणे. केजरीवाल हे बिनखात्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही खात्याची जबाबदारी नसल्याने भरपूर वेळ हातात आहे. त्याचा ते वरीलप्रमाणे सदुपयोग करतात.
↩ प्रतिसाद: दिगोचि
ग
गॅरी ट्रुमन Fri, 07/01/2016 - 10:16 नवीन
केजरीवाल हे अत्यंत नाटकी आणि कमालीचे ढोंगी आहेत आणि त्याबद्दल मी आणि इतर अनेक मिपाकर नेहमीच टिका करत असतो. पण जर त्यांनी एखादी सेन्सिबल गोष्ट केली तर त्याबद्दल त्यांना श्रेय देणेही गरजेचे आहे. आज ती सेन्सिबल गोष्ट केजरीवालांनी केलेली आहे. दिल्लीत राज्य सरकारला नक्की किती अधिकार आहेत आणि केंद्र सरकारला किती अधिकार आहेत हे स्पष्ट करून घ्यायला दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. http://www.ndtv.com/india-news/arvind-kejriwal-government-moves-supreme-court-over-centre-delhi-power-tussle-1426795 राज्यघटनेतील काही बाबींबद्दल पुरेशी स्पष्टता नाही असे कोणाला वाटत असेल तर ती स्पष्टता केवळ सर्वोच्च न्यायालयच देऊ शकेल.हे पाऊल बरेच पूर्वी उचलायला हवे होते.ठिक आहे. बेटर लेट दॅन नेव्हर. फक्त गरज एवढीच की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघायची तयारी असली पाहिजे आणि तो निर्णय विरोधात गेला (याची शक्यता बरीच जास्त) तर मात्र निमूटपणे तो निर्णय मान्य करायची तयारी असली पाहिजे. मग उगीच अमुक काम करू देत नाही, तमुक काम करू देत नाही ही भूणभूण काहीच उपयोगाची नाही.केजरीवालांची आतापर्यंतची वाटचाल बघता असे काही होईल याची शक्यता फारच थोडी.
ब
बोका-ए-आझम Fri, 07/01/2016 - 11:09 नवीन
म्हणजे नंतर झालेले अनेक अप्रिय संघर्ष (शकुंतला गॅमलिन यांची नेमणूक, नायब राज्यपालांशी सतत चालू असलेल्या चकमकी) घडले नसते. ही गोष्ट करणे हे जरी सेन्सिबल असले तरी सेन्सिबल गोष्टींमध्ये त्या योग्य वेळी करणे हेही अंतर्भूत असतेच. आता त्या संसदीय सचिवांचा मुद्दा अंगाशी येतो आहे त्यामुळे ही पश्चातबुद्धी सुचते आहे. शिवाय त्यांनी आत्ता एक अजून भारी विधान केलं - गोवा विधानसभेत आआपला ४० पैकी ३५ जागा मिळतील. आणि का - तर काँग्रेस आणि भाजप हे दोघेही भ्रष्ट पक्ष आहेत आणि आआप हा एकमेव भ्रष्टाचारमुक्त पर्याय आहे. काँग्रेस आणि भाजप भ्रष्ट आहेत हे मान्य आहे. दोन्हींच्या सरकारांमध्ये भ्रष्ट लोक आहेत. पण आआपने दिल्लीतला भ्रष्टाचार कमी केलाय म्हणजे नक्की काय केलंय? त्यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना घालवताना जो तमाशा केला, तो भ्रष्टाचार नव्हता का? शीला दीक्षित यांच्यावर अजूनही खटला भरलेला नाही, निवडणूक आयोगाला खर्चाचं विवरण दिलंय का ते माहित नाही (बहुधा नसावं, कारण त्याची आआपने मोठी बातमी केली असती) - म्हणजे इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळं असं काहीच केलेलं नाही.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Fri, 07/01/2016 - 11:16 नवीन
आज ती सेन्सिबल गोष्ट केजरीवालांनी केलेली आहे. दिल्लीत राज्य सरकारला नक्की किती अधिकार आहेत आणि केंद्र सरकारला किती अधिकार आहेत हे स्पष्ट करून घ्यायला दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ही याचिका वेगळ्या संदर्भात आहे.
The HC had on May 24 reserved its verdict on the plea of the AAP government seeking a stay on the proceedings on the petitions arising out of its standoff with the LG over powers to appoint bureaucrats in the national capital and other issues.
The Supreme Court on Friday agreed to hear on Monday the plea of the Aam Aadmi Party government in Delhi seeking a direction that the high court be restrained from delivering its judgement on issues including the scope of powers of the city government to exercise its authority in performing public functions.
दिल्लीमध्ये वेगवेगळ्या नेमणुका करण्याचा अधि़कार नायब राज्यपालांचा आहे का लोकनियुक्त सरकारचा याविषयीचा निर्णय घेण्यासाठी आआप सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २४ मे ला या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. हा निर्णय जाहीर करण्यापासून उच्च न्यायालयाला रोखावे अशी मागणी आआपने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्या मागणीवरील सुनावणी उच्च न्यायालयात सोमवारी होणार आहे.
फक्त गरज एवढीच की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघायची तयारी असली पाहिजे आणि तो निर्णय विरोधात गेला (याची शक्यता बरीच जास्त) तर मात्र निमूटपणे तो निर्णय मान्य करायची तयारी असली पाहिजे. मग उगीच अमुक काम करू देत नाही, तमुक काम करू देत नाही ही भूणभूण काहीच उपयोगाची नाही.केजरीवालांची आतापर्यंतची वाटचाल बघता असे काही होईल याची शक्यता फारच थोडी.
+१
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बोका-ए-आझम Fri, 07/08/2016 - 09:54 नवीन
ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. याचं स्पष्टीकरण अजून बातमीत आलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाला हा मुद्दा स्पष्टीकरण देण्याजोगा वाटत नसावा - दुस-या शब्दांत सांगायचं तर त्यांना नायब राज्यपाल नजीब जंग यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर घटनात्मक आक्षेप घेण्याची गरज वाटली नसावी - असा याचा अर्थ होऊ शकतो का?
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 07/08/2016 - 10:16 नवीन
ही बातमी मी जेवढी केवढी फॉलो केली आहे त्यावरून समजते की दिल्ली सरकारने सुरवातीला दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी धाव घेतली होती. २४ मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवला. त्यानंतर हे प्रकरण राज्य आणि केंद्र यामधील आहे त्यामुळे उच्च न्यायालयाला या बाबतीत अधिकारक्षेत्र (जुरिसडिक्शन) नाही असा साक्षात्कार दिल्ली सरकारला झाला आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन दिल्ली उच्च न्यायालयाला या प्रकरणी निकाल देण्यापासून रोखावे अशी मागणी केली. अधिक माहिती http://www.thehindu.com/news/cities/Delhi/delhi-govtcentre-row-supreme-court-verdict/article8823875.ece वर प्रत्यक्ष दिल्ली उच्च न्यायालयही या प्रकरणी केजरीवालांच्या बाजूने निर्णय देईल याची शक्यता फार वाटत नाही. कारण न्यायालय सद्यकालीन कायदे आणि राज्यघटना यांनाच बांधील असते. जर सध्याच्या कायद्यांमध्ये आणि राज्यघटनेत दिल्ली हे पूर्ण राज्य नाही हे म्हटलेले असेल तर त्याविषयी दिल्ली उच्च न्यायालय काय करणार? आपण स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या दरबारातून थेट पृथ्वीतलावर पडलो आहोत असे केजरीवालांना वाटत असेलही आणि त्यामुळे 'हम करेसो कायदा' आणि तसा कायदा न केल्यास उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला वेठीस धरायचा यांचा खाक्या आहेही. पण देशाचा कारभार तसा चालत नसतो.कायदे करणे हा संसदेचा विशेषाधिकार आहे इतरांचा नाही. एक गोष्ट मात्र पक्की आहे. समजा निकाल आपल्या बाजूचा आला तर केजरीवाल 'जितं मया' म्हणून जल्लोष करणार आणि विरोधात आला तर मात्र ते थयथयाट करणार. १४ जुलै रोजी निवडणुक आयोगाने आआपच्या २१ आमदारांना लाभाचे पद प्रकरणी सुनावणीसाठी बोलावले आहे. त्यानंतर निवडणुक आयोग निकाल जाहिर करेल. तो समजा केजरीवालांच्या विरोधात गेला तर मात्र मोठ्या आपटर्डचा (केजरीवाल, आशिष खेतान, आशुतोष इत्यादींचा) आणि छोट्या आपटर्डचा (फेसबुक आणि इतर ठिकाणच्या केजरूच्या गुलामांचा) थयथयाट किती होईल हे बघाच.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ग
गॅरी ट्रुमन Fri, 07/01/2016 - 10:31 नवीन
२०१३ मध्ये निवडणुक प्रचारादरम्यान केजरीवालांनी असे वातावरण निर्माण केले होते की त्यांच्याकडे शीला दिक्षितांविरूध्द सज्जड पुरावे (३७० पानी आरोपपत्र) आहेत आणि त्या लवकरच तुरूंगात जातील. अर्थातच तसे काही झाले नाही आणि केजरीवालांनी डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे 'तुम्ही शीला दिक्षित यांच्याविरूद्धचे पुरावे सादर करा मग आम्ही कारवाई करू' हे बोलायचे ढोंगही झाले. मग एसीबी (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) दिल्ली सरकारच्या अंतर्गत नाही, सीबीआय नाही, दिल्ली सरकारला अमुक अधिकार नाहीत, तमुक मला काम करू देत नाहीत वगैरे बकवासही झाली. यावरून एक गोष्ट आठवली. १९८० च्या दशकाच्या सुरवातीला भाजपचे नेते रामदास नायक यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांच्याविरूध्द भ्रष्टाचाराचे आरोप करून कोर्टात धाव घेतली.अंतुले त्यातून पुराव्याअभावी सुटले पण १०-१२ वर्षे त्यांच्याविरूध्द हा कोर्टाच्या केसचा ससेमिरा लागला होता.त्यांचे मुख्यमंत्रीपदही गेले त्यामागे हे पण एक कारण होतेच. रामदास नायक या एका माणसाला या सगळ्या प्रकाराचा पाठपुरावा करणे नक्कीच सोपे गेले नव्हते. पण तरीही एसीबी, सीबीआय इत्यादी काहीही दिमतीला नसताना (किंबहुना विरोधातच असतानाही) रामदास नायक यांनी अंतुलेंना चांगलेच सतावले होते. जर का ३७० पानी आरोपपत्र भरण्याइतके पुरावे केजरीवालांकडे होते तर मग ते स्वतंत्रपणे कोर्टात जाऊ शकतच होते की. कोणी अडवले होते त्यांना? पण अर्थातच नुसता धुराळा उडविण्यातच या गृहस्थाला इंटरेस्ट असल्यामुळे याच्या हातून फारसे काही होईल याची शक्यता फारच थोडी.
श
श्रीगुरुजी Fri, 07/01/2016 - 11:26 नवीन
डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण ७० जागांपैकी भाजप ३२, आआप २८, काँग्रेस ८, संजद १ व अपक्ष १ अशी स्थिती होती. कोणालाच बहुमत नव्हते. त्यावेळी शीला दिक्षितांना वाचविण्याच्या बदल्यात काँग्रेसने आआपला पाठिंबा दिल्याने केजरीवालांनी सरकार बनविले. नंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला धडा शिकविण्यासाठी काँगेसने आपली दिल्लीतील मते आआपकडे वळविली. शीला दिक्षितांवर कारवाई न करणे ही काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याची किंमत होती.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
संदीप डांगे Fri, 07/01/2016 - 15:55 नवीन
सिंचन घोटाळ्याबद्दल अजित पवारांवर कारवाई न करणे ही पण कशाची तरी किंमतच म्हणायची... :)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
भ
भोळा भाबडा Fri, 07/01/2016 - 16:44 नवीन
इथे हे अवांतर होईल,यासाठी वेगळा धागा हवा,पण माझे धागे लगेच उडतात त्यामुळे श्रीगुरूजींनी महाराष्ट्रात भाजपाने दीड वर्षात काय केले हे तपशीलवार लिहावे. 1) सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटळा झाला म्हणणारे, अजित पवार आणि तटकरेंना अटक का करत नाहीत? 2) शरद पवारांना शिव्या देणारे इथले सन्मानणीय सदस्य मोदी-पवार किंवा शहा-पवार यांच्या अंतर्गत राजकारणाबद्दल काय मत आहे? 3) शरद पवारांच्या कामाचा अभ्यास आहे का? http://www.misalpav.com/node/19871 हा मागचाच धागा आहे,इथे पवारांबद्दल कशी गरळ ओकली आहे ते बघा, आणि हा एक↓ http://www.misalpav.com/node/6674 आता या धाग्यावर केजरीवालांबद्दल गरळ ओकत आहेत,काय गरज नाही आणि फायदाही नाही,, कारण इथे 99.99% भाजपेयी लोक्सच आहेत,त्यामुळे आपण स्वतःचेच मनोरंजन करून घेत आहात.
स
संदीप डांगे Fri, 07/01/2016 - 16:48 नवीन
कारण इथे 99.99% भाजपेयी लोक्सच आहेत,त्यामुळे आपण स्वतःचेच मनोरंजन करून घेत आहात.
'विकृत मनोरंजन' असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
ब
बोका-ए-आझम Fri, 07/01/2016 - 18:29 नवीन
कुणा एकाची मक्तेदारी नाहीये डांगेसाहेब. पूर्वग्रह हीसुद्धा विकृतीच. बाकी तुमचा मानसशास्त्राचा व्यासंग चांगला दिसतोय.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 07/01/2016 - 18:34 नवीन
पूर्वग्रह हीसुद्धा विकृतीच, स्पष्ट कराल काय? बाकी तुमचा मानसशास्त्राचा व्यासंग चांगला दिसतोय कसला व्यासंग. साधं 'पिंडी ते ब्रह्मांडी' सूत्र आहे. मै काला जग काला, मै भला जग भला.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
स्पार्टाकस Wed, 07/13/2016 - 23:56 नवीन
डांगेसाहेब, मै भला, बाकी सब चोर असं सूत्रं आहे ते .. केजरीवाल साहेबांचं
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सचु कुळकर्णी Fri, 07/01/2016 - 16:44 नवीन
सिंचन घोटाळ्याबद्दल अजित पवारांवर कारवाई न करणे ही पण कशाची तरी किंमतच म्हणायची... :) पटेश. कारवाई आता होण्याचि चिन्हेहि नाहित. सगळा करसडा काढला भुजबळांवर.
स
सचु कुळकर्णी Fri, 07/01/2016 - 16:46 नवीन
इथे माहिति नसणारेच पवाराना शिव्या देतात.
स
सचु कुळकर्णी Fri, 07/01/2016 - 16:55 नवीन
भोळा भाबडा तुम्हिच गरीब चिमणा असावेत मागच्या अवतारात :) मागच्या अवतारात होबासक्या केलेला सच्या
भ
भोळा भाबडा Fri, 07/01/2016 - 16:57 नवीन
मुद्दे महत्वाचे आहेत न कि आयडी कोण आहे
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
स
सचु कुळकर्णी Fri, 07/01/2016 - 16:59 नवीन
:)
श
श्रीगुरुजी Sat, 07/02/2016 - 19:57 नवीन
अजित पवार तटकरे, सिंचन घोटाळा, त्याबाबत अतिशय व्यवस्थित सुरु असलेली कारवाई इ. वर मी सविस्तर स्पष्टीकरण देऊ शकतो. परंतु हा या लेखाचा विषय नाही. धागा भरकटेल. या विषयावर कोणी वेगळा धागा काढला तर तिथे उत्तर देईन.
श
श्रीगुरुजी Mon, 07/04/2016 - 12:08 नवीन
मोफत वायफाय, ९ वीत गेलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही, २५ लाख नवीन नोकर्‍या, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, जनलोकपाल विधेयक, प्रत्येक खेड्यात मोफत तपासण्या व औषधे, .... वरील गोष्टी परिचित वाटताहेत का?
ई
ईश्वरसर्वसाक्षी Wed, 07/13/2016 - 16:38 नवीन
भगवंत मान युगपुरुषांच्या ट्यार्पि चे स्वारि पार्टि चे सांसद ह्यांचे टल्ली असलेले, पोलिस त्यांना उभे राहण्यास मदत करत असलेले फोटो मध्यंतरी बघण्यात आले होते पण आज कॅ. अमरींदर सिंग ह्यानि गौप्यस्फोट केलाय कि हे भगवंत मान संसदेत सुद्धा दारु पिवुन येत असत. जय हो जय हो पांच साल केजरीवाल
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/14/2016 - 05:56 नवीन
कालपरवाचीच गोष्ट. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते (आणि सध्या कॉंग्रेसमध्ये असलेल्या) संजय निरूपम यांनी शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांच्यावर आरे कॉलनीतील जमीन लाटल्याचा आरोप केला. त्याविरूध्द रविंद्र वायकरांनी निरूपमांना नोटिस धाडली आणि १५ दिवसात जाहिर माफी मागावी अन्यथा अब्रूनुकसानीच्या खटल्याला सामोरे जायची तयारी ठेवावी असे सांगितले. त्यावर न्यूज चॅनेलवर बोलताना निरूपम यांनी म्हटले की ते अजिबात माफी मागणार नाहीत. रविंद्र वायकरांना पाहिजे तर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करू देत. कोर्टाने विचारल्यावर मी कोर्टापुढे पुरावे सादर करेन आणि मग वायकरांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही!! आणि हे आपले युगपुरूष!! उठल्यासुटल्या सगळ्यांवर आरोप करत सुटायचे. मग कोर्टाने विचारल्यावर ’मी असे बोललोच नव्हतो’ असे म्हणायचे. हे बघा-- Image removed. मागे नितीन गडकरींना ’सर्वात भ्रष्ट माणूस’ असे म्हणून झाले. त्यावर गडकरी कोर्टात गेल्यावर आपल्याकडचे पुरावे सादर न करता हे युगपुरूष प्रत्येक वेळी पुढची तारीख मागत राहिले. मग पुढच्या तारखा मागता येणे कठिण झाल्यावर मग तिहार तुरूंगात आठवडाभर राहायचे ढोंग झाले.जामिनावर सुटायची वेळ आली तेव्हा पहिल्यांदा ’मी जामिन भरणार नाही’ असेही म्हणायचे ढोंग झाले. जामिन भरायचा नव्हता तर मग राहायचे ना आयुष्यभर तुरूंगात. हा ढोंगी माणूस कुठून आला आहे कुणास ठाऊक. यावेळी अरूण जेटलींनी या हलकटाला अजिबात सोडू नये अशी फार इच्छा आहे. फेब्रुवारी १९९८ मध्ये तामिळनाडूत कोईम्बतूर येथे लालकृष्ण अडवाणी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभेत भाषण करणार होते त्यावेळी शहरात बॉम्बस्फोट झाले. आणि हे बॉम्बस्फोट रा.स्व.संघाने केले आहेत असा आरोप तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी केला.इतकेच नव्हे तर त्यात रा.स्व.संघाच्या सहभागाविषयी आपल्याकडे पुरावा आहे असेही केसरींनी म्हटले. त्यांच्याविरूध्द रा.स्व.संघाने अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला.पण नंतर तो खटला मागे घेतला. बहुदा केसरींचे वय झाल्यामुळे म्हातारचळ लागले आहे आणि म्हणून ते वाटेल ते बरळत आहेत असे वाटले असावे कदाचित.पण या युगपुरूषांना मात्र अजिबात कोणत्याही प्रकारचे सौजन्य दाखवू नये असे फार वाटते. केजरीवालांचे हे वाटेल ते आरोप करून धुराळा उडवायचा, सतत प्रसिध्दीचा झोत आपल्यावर ठेवायचा आणि मग पुरावे सादर करायची वेळ आली की हात वर करायचे हे 'हिट अ‍ॅन्ड रन' चे दुकान कायमचे बंद करून टाकायला हवे.
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/14/2016 - 11:57 नवीन
याच धाग्यावरील याच विषयाशी संबंधित एक जुना प्रतिसाद जसाच्या तसा इथे देत आहे. http://www.misalpav.com/comment/807812#comment-807812 ________________________________________________________________________________ एक मजेशीर बातमी सापडली. अरूण जेटलींनी केजरीवाल, कुमार विश्वास इ. आआपच्या ६ नेत्यांविरूद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी व बदनानीचा दावा दाखल केला आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून त्यात जेटलींचा हात आहे अशा स्वरूपाचे आरोप (अर्थातच कोणत्याही पुराव्याशिवाय) या मंडळींनी जाहिररित्या केले होते. आपला कोणत्याही भ्रष्टाचारात हात नसून कोणताही पुरावा नसताना केलेल्या या आरोपांमुळे आपली मानहानी व बदनामी झाली आहे असा दावा करून संबंधितांना शिक्षा देण्यासाठी जेटलींनी या सहा जणांविरूद्ध फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही स्वरूपाचे दावे न्यायालयात दाखल केले आहेत. या दाव्याविरूद्ध आपले म्हणणे मांडताना केजरीवालांनी न्यायालयात खालील शब्दात आरोपांचे समर्थन केले. Arvind Kejriwal today responded to Arun Jaitley's defamation suit with a stinging reply in which he taunted the Union Finance Minister for "losing by over one lakh votes" in the national election and said he has no high public "reputation to protect". In a statement to a Delhi court, the Chief Minister said Mr Jaitley's "claim that he enjoys a high public character is totally frivolous and unsustainable." He wrote: "The last time he contested the election to the Lok Sabha was from Amritsar as a BJP candidate in 2014. Despite the success of the BJP this plaintiff lost by a margin of more than 1,00,000 votes. Indian democracy has never accepted his claim of public character." In a democracy, he argued, one's public reputation can only be the reaction, response and manifestation of the people's attitude. हा युक्तिवाद वाचल्यावर हसावे का रडावे का केजरीवालांची कीव करावी हेच समजेना. जो निवडणुक हरतो त्याला कोणतीच सार्वजनिक प्रतिष्ठा नसते (व त्यामुळेच त्याच्यावर कोणतेही आरोप केले तरी त्याची बदनामी व मानहानी होत नाही) व जनता निवडणुकीत जसा जनादेश देते तीच त्याची सार्वजनिक प्रतिष्ठा असते (म्हणजे निवडणुक जिंकलेल्याला सार्वजनिक प्रतिष्ठा असते व हरलेल्याला प्रतिष्ठा नसते) असा अत्यंत अतार्किक युक्तिवाद कोणी न्यायालयात करेल असे कधीही वाटले नव्हते. दस्तुरखुद्द केजरीवाल वाराणशीत मोदींविरूद्ध तब्बल २.५ लाखाहून अधिक मतांनी हरले होते. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज व वाजपेयी हे देखील निवडणुकीत हरले होते. बाबासाहेब आंबेडकर व मनमोहन सिंग हे देखील निवडणुकीत हरले होते. अनेक दिग्गज नेत्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. पुण्यातून अविनाश धर्माधिकारी हे देखील पडले होते. केजरीवालांच्या युक्तिवादानुसार निवडणुकीत पराभव झाल्याने या सर्वांना कोणतीही सार्वजनिक प्रतिष्ठा नाही. http://www.ndtv.com/india-news/what-reputation-arun-jaitley-lost-by-1-lakh-votes-arvind-kejriwal-1264978
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/14/2016 - 14:41 नवीन
असले गुडघ्यातले युक्तिवाद केजरीवाल सोडून अन्य कोणी करू शकेल असे वाटत नाही. उठल्यासुटल्या सगळ्यांवर पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करणार्‍या केजरीवालांना एका तरी केसमध्ये कोर्टाने शिक्षा ठोठावावी असे फार वाटते.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/14/2016 - 08:13 नवीन
दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक चालू करायची आपल्या युगपुरूषांची महत्वाकांक्षा आहेच. त्या मोहल्ला क्लिनिकचा असाही उपयोग होऊ शकेल हे आमच्यासारख्यांच्या लक्षातच आले नव्हते. त्याचे झाले असे की आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कन्या सौम्या हिला दिल्लीमधील जवळपास १०० मोहल्ला क्लिनिक सांभाळायची जबाबदारी देण्यात आली ही बातमी कालच आली. इतकी जबाबदारी देण्यात आली म्हणजे ती किमान डॉक्टर असावी असे कोणाला वाटावे. पण कुठचे काय. ती आहे आर्किटेक्ट!! अर्थातच अशा कोणत्याही पदांवर आपल्याच नातेवाईकांची वर्णी लावली गेल्यास नेपोटिझमचा आरोप होणारच. आणि तो सत्येंद्र जैन यांच्यावर झालाच. त्यानंतर आताच बातमी आली आहे की सौम्या जैनने त्या पदाचा राजीनामा दिला आहे. अर्थातच करदात्यांचे पैसे आपल्यावरच खर्च करणे हा प्रकार आआपला नवीन नाहीच. त्याच उदात्त परंपरेतील हा एक प्रकार दिसतो. मोहल्ला क्लिनिक सांभाळायला डॉक्टर न नेमता आर्किटेक्ट नेमावा यामागचे गणित समजण्यापलीकडचे आहे. आणि आर्किटेक्ट नेमायचा तर नेमायचाच. पण ती आर्किटेक्ट आरोग्यमंत्र्यांची कन्या असणे हा पण योगायोग समजायचा का? बरं ती त्या कामासाठी इतकी पात्र आणि योग्य असेल तर मग बोंबाबोंब झाल्यावर तिनी राजीनामा का दिला असावा? आमच्यासारख्यांनाच हे प्रश्न पडतात. आपटर्ड्सना मात्र असे प्रश्न कधीच पडत नाहीत का?
श
श्रीगुरुजी Mon, 07/18/2016 - 08:49 नवीन
http://m.rediff.com/news/report/repentant-kejriwal-cleans-dishes-at-golden-temple/20160718.htm नौटंकीसम्राटांची नवी नौटंकी
ग
गॅरी ट्रुमन Tue, 07/19/2016 - 10:25 नवीन
नौटंकीसम्राटांची नवी नौटंकी
प्रचंड नाटकीपणा आणि ढोंगीपणा यात केजरीवालांचा हात कोणीच धरू शकत नाही हे कित्येक वेळा सिद्ध झाले आहेच. त्याचेच आणखी एक उदाहरण कालपरवाच पुढे आले. केजरीवालांनी सुवर्णमंदिरात जाऊन भांडी घासली ती म्हणे खरकटी नव्हतीच आणि मुळातच घासलेली स्वच्छ भांडी होती. उत्तम. चालू द्या.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 07/19/2016 - 11:28 नवीन
यांच्या नाटकाची ही चित्रफीत - https://www.youtube.com/watch?v=w4KLuqpGPJ8
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
क
कपिलमुनी Tue, 07/19/2016 - 13:55 नवीन
जशी स्वच्छ जागी पालापचोळा( कचरा) टाकून साफ करण्याचा स्वच्छ भारतची नौटंकी होती तश्शीच का ओ ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अजया Tue, 07/19/2016 - 12:18 नवीन
=))))
म
मोहन Tue, 07/19/2016 - 12:27 नवीन
आजच श्री नवज्योत सिद्धू भा.ज.पा तून बाहेर पडून आ.आ.प मधे जाणार असल्याची बातमी आहे. आपचा पंजाबचा मुख्यमंत्री पदाचा चेहेरा म्हणुनही त्यांचे नाव घेतले जात आहे. आता नौटंकी सोबत कॉमेडीचीही सोय झाली बघा.
क
कपिलमुनी Tue, 07/19/2016 - 13:57 नवीन
कालपर्यंत पवित्र असलेला सिद्धू आज अचानक कॉमेडीयन झाला ! राज्यसभेवर खासदारकी दिली तेव्हा कोणी ब्र काढला नाही.
↩ प्रतिसाद: मोहन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/20/2016 - 13:11 नवीन
आपल्या युगपुरूषांच्या पक्षाच्या एक स्त्री सदस्य सोनी हिने आत्महत्या केली आहे.त्याचे झाले असे की कुणी रमेश वाधवा नामक आम आदमी पार्टीच्या नेत्याने तिचा विनयभंग केला होता.त्यानंतर तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. ही गोष्ट २ जून रोजीची. रमेश वाधवाला पोलिसांनी दुसर्‍या दिवशी अटक केली.पण त्याची ४ जून रोजी जामिनावर मुक्तता झाली. या प्रकारानंतर रमेश वाधवाविरूध्द पक्षाने कोणतीच कारवाई केली नाही म्हणून सोनी अत्यंत व्यथित झाली होती.शेवटी तिने आज आत्महत्या केली. अधिक माहिती इथे. हे जर अन्य कोणत्या पक्षात झाले असते तर या युगपुरूषांनी नक्की काय केले असते याची कल्पनाही करवत नाही. पण कसे आहे हा प्रकार संपूर्ण विश्वातील सर्वात प्रामाणिक पक्षात झाला आहे. त्यामुळे कोणतेही प्रश्न विचारायला बंदीच आहे. (केजरीवालचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाणारा) ट्रुमन
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/04/2016 - 10:48 नवीन
दिल्लीच्या आआप सरकारला उच्च न्यायालयाने आज झटका दिला. सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासून गेली दीड वर्षे सातत्याने नायब राज्यपाल व केंद्र सरकारशी भांडणार्‍या व आपल्या अपयशाचे खापर सातत्याने नायब राज्यपाल व केंद्र सरकारवर फोडणार्‍या आआप सरकारला नायब राज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय मुख्य आहेत व नियुक्तींसाठी व कोणताही चौकशी आयोग नेमण्यासाठी त्यांची संमती अनिवार्य आहे असा उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. आम्ही दिल्लीत निवडून आल्याने आम्हाला वाटेल ते करायची परवानगी आहे, मग ते घटनाबाह्य का असेना अशा आविर्भावात गेली दीड वर्षे वावरणार्‍या व नायब राज्यपाल, मोदी व केंद्र सरकार यांच्यावर जवळपास दररोज अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार्‍या केजरीवाल व आआप सरकार यांना या निर्णयाने नक्कीच झटका बसलेला आहे. In a jolt to AAP, Delhi HC holds Lt. Governor as administrative head In a big blow to the Aam Aadmi Party government's fight for Statehood for Delhi and control of power with the Union government, the Delhi High Court on Thursday held that National Capital Territory continues to be a Union Territory and the Lieutenant Governor is its administrative head. With this, a series of moves made by the Delhi government such as commissions of inquiry into CNG fitness scam, Delhi and District Cricket Association illegalities, policy directions to electricity regulatory commission for compensation to people for disruption in power supply, were declared illegal by the court since the same were made without the approval or views of the Lieutenant Governor. The court also held as illegal the appointment of Nominee Directors of Government of NCT of Delhi on Board of BSES Rajdhani Power Limited, BSES Yamuna Power Limited and Tata Power Delhi Distribution Limited by the Delhi Power Company Limited on the basis of the recommendations of the Chief Minister of Delhi without communicating the decision of the Chief Minister to the Lt. Governor of NCT of Delhi for his views. In its 194-page judgement, the court concluded that “On a reading of Article 239 and Article 239AA of the Constitution together with the provisions of the Government of National Capital Territory of Delhi Act, 1991 and the Transaction of Business of the Government of NCT of Delhi Rules, 1993, it becomes manifest that Delhi continues to be a Union Territory even after the Constitution (69th Amendment) Act, 1991 inserting Article 239AA making special provisions with respect to Delhi.”
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 08/04/2016 - 10:53 नवीन
आता केजरीवाल (किंवा आशिष खेतान) दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीशही मोदींचे किंवा अंबानी-अडानींचे एजंट किंवा बीजेपीच्या पेरोलवर आहेत असे म्हणाले तरी आश्चर्य वाटू नये. गेल्या काही दिवसात केजरीवालांनी अजून जास्त मर्कटलिला केल्याच आहेत. वेळ मिळेल त्याप्रमाणे त्याविषयी अधिक लिहिणारच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. केजरीवाल आणि आआपला मिपावर पूर्ण उघडे पाडणे हे माझे उद्दिष्ट आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी गुरुवार, 08/04/2016 - 15:46 नवीन
मिपावर अरूणाचल प्रदेश च्या वेळी न्यायालयीन निर्णयावर टीका करणारे अचानक निर्णय योग्य असल्याचे सांगतात ते पाहून आश्चर्य वाटले या तो घोडा कहो य चतूर
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
क
कपिलमुनी गुरुवार, 08/04/2016 - 15:44 नवीन
म्हणजे आता दिल्लीचा जे काही वाटोळा चालला आहे त्याला नायब राज्यपाल जबाबदार आहेत का केजरीवाल ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/04/2016 - 16:44 नवीन
अर्थातच केजरीवाल. जे काम करायचे आहे ते सोडून इतर राज्यांना भेटी देऊन तिथल्या प्रश्नात नाक खुपसणे (हैद्राबाद, गुजरात, उ. प्र. इ.), ज्या क्षेत्रात काम करण्याचा घटनादत्त अधिकार आहे तिथे काम करायचे सोडून घटनात्मक अधिकार नसलेल्या क्षेत्रात ढवळाढवळ करणे, रोज एक नवीन नौटंकी करणे, पक्षातील भ्रष्टाचार्‍यांना व गुन्हेगारांना पाठीशी घालणे, प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे, दिवसभर ट्विटरवर वेळ वाया घालवून मोदींना शिव्या देत बसणे, आपल्या पक्षात नसलेल्यांवर वाटेल ते बिनबुडाचे बेछूट आरोप करणे, केंद्र सरकारविरूद्ध सातत्याने न्यायालयाचा पायर्‍या चढणे, बदनामीच्या खटल्यांना तोंड देण्यासाठी वारंवार न्यायालयाच्या पायर्‍या चढाव्या लागणे .... इ. साठी केजरीवालच जबाबदार आहेत. यासाठी नायब राज्यपाल जबाबदार नाहीत. बादवे, सध्या दिल्लीचे वाटोळं होत आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद!
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
त
तर्राट जोकर Fri, 08/05/2016 - 06:07 नवीन
मोदींना शिव्या देत बसणे
केजरीवालबद्दल तुमची दुखरी नस फक्त एवढीच आहे... म्हणून स्वतःचा दिवसातला बहुमुल्य वेळ घालवून इथे त्याच्याबद्दल कुरकूर करायला येता.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मार्मिक गोडसे Fri, 08/05/2016 - 08:32 नवीन
तजो फार दिवसांनी हजेरी लावली व घेतलीही. बरं वाटलं
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
क
कपिलमुनी Fri, 08/05/2016 - 12:39 नवीन
कैच्या काय !
प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे
एवढा पण खोटा बोलू नये , ग्रेट ग्रँड मस्तीचा परीक्षण दाखवा बघू ! किंवा वन नाईट स्टँडचा ! काहीजणांना पतंग उडवायला आवडतो काहींना चित्रपट बघायला .
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 08/05/2016 - 14:23 नवीन
या. केजरीवालांच्या अंधभक्तांचीच वाट पहात होतो.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Fri, 08/05/2016 - 19:38 नवीन
प्रत्येक गोष्ट वाढवून चढवून सांगितली पाहिजे का ? पुन्हा प्रत्येक चित्रपट पाहिल्याचा आरोप सिद्ध करा म्हणला की पळून जाल
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 08/05/2016 - 19:45 नवीन
पहिल्यांंदा चित्रपट न पाहिल्याचा दावा सिद्ध करा.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Sat, 08/06/2016 - 12:20 नवीन
तुम्हाला भूत असल्याचा पुरावा मागितला तर तुम्ही भूत नसल्याचा मागता. तुम्ही जे काय ४ पिक्चर वरुन विधाने केली कारण त्यांनी त्याबद्दल ट्वीट केले. म्हणून लोकांना कळले । यावरुन प्रत्येक पिक्चर बघतात असला बिनडोक निष्कर्ष काय लॉजिक वापरुन काढला?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 08/06/2016 - 13:48 नवीन
केजरीवालांनी फक्त ४ चित्रपट पाहिले असे म्हणून त्यांची खिल्ली उडविणे अयोग्य आहे.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Sat, 08/06/2016 - 18:42 नवीन
मुद्दा संपला , टीपी सुरु ! फिरा गोल गोल
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 08/06/2016 - 19:40 नवीन
फिदीफिदी . . . सगळाच टीपी होता. मुद्दा नव्हताच. मग तो संपणार कसा?
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा