सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता.
प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले,
" तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?"
" मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. "
"कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?"
" हो. कुठल्याच देवाला नाही."
थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला.
" मग मंदिरात कसे आला ?"
" तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो."
" तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?"
"नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो.
"नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?"
मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे.
"नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो."
" देवाला नाही आणि माणसांना का बरे?"
"कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे."
"तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला.
"जशी तुमची इच्छा" मी म्हणालो.
थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच.
तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले.
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्हेने पार पाडली होती.
"आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला.
बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या,
"तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?"
" ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल."
" आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला.
"ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. "
"आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले.
"खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते."
" ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला.
" त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?"
" सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. "
" ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?"
" अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या.
" चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो.
" आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या.
" आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे."
"पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्यांना ऐकू आले असावे.
"तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही."
" पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला.
" ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. "
"गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले.
" ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा."
गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे.
.................................................................................
💬 प्रतिसाद
(421)
त
तिमा
Sun, 12/13/2015 - 16:10
नवीन
आस्तिक असो वा नास्तिक, मला लाडवाचा मोह कधी सुटणार नाही. तसाही अकरा रुपयाला एक लाडु, हा रास्तच भाव झाला. तिरुपतीचे लाडु कधीही मिळाले तर मी ते आवडीने खातोच.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 12/13/2015 - 16:26
नवीन
किती तो तर्कशास्त्र ,तत्त्वज्ञानाचा कीस पाडतात आस्तीक लोक! आणि पुढच्या बाकावरचे नास्तीक.मी यांना नेहमी सांगतो प्रसाद देणाय्रा देवावर माझी अढळ श्रद्धा आहे.सत्यनारायणाचे बोलावणे असेल तर अगोदरच सांगतो मला शिरा बशिभर लागतो आणि तो ते देतातही.प्रसाद खाण्यात थोडासुद्धा मागे हटत नाही त्यामुळे सर्वांचे आशिर्वाद मिळतात.पोथीतही लिहिलं आहे प्रसाद खातो त्याचं भ लं होतं.तो छप्पन भोग घेणारा ठाकुरजी फारच चांगला अगदी दही पोह्यापासून बासुंदी,खीर आणि गराडू चाटसुद्धा खातो.अगदी बॅटमॅनच्या शब्दात सांगायचं तर देव तुमचं भलं करो ही मनोमन इच्छा नास्तीकच व्यक्त करतात.आमच्या दिव्याखालीही उजेडच पडतो.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 12/13/2015 - 16:40
नवीन
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/13/2015 - 18:59
नवीन
एक नंबर प्रतिसाद !
आस्तिक नास्तिक तावतावाने भांडत आहेत आणि कंजूस मात्र बशीभर शिरा किंवा छप्पन भोग खाऊन पोटावर हात फिरवित मजा बघत आहेत असे दृश्य डोळ्यासमोर आले ! ;) :)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 12/13/2015 - 19:11
नवीन
+१ =))
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 12/14/2015 - 04:48
नवीन
=)))अगदी!असेच डोळ्यासमोर आले!
- Log in or register to post comments
य
यनावाला
Sun, 12/13/2015 - 17:30
नवीन
सर्व प्रतिसाददात्या सदस्यांना मन:पूर्वक धन्यवाद ! श्री.प्रभाकर पेठकर यांच्या विस्तृत प्रदिसादात त्यांनी उत्कृष्ट विश्लेषण केले आहे. ते म्हणतात हे अगदी खरे आहे. अशा हितसंबंधी लबाडांमुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक बिकट झाले आहे.श्री.पेठकर यांची लेखनशैली उत्तम आहे. त्यांनी प्रबोधनपर लेख लिहिल्यास वाचकांवर त्यांचा सुपरिणाम होईल. (कदाचित् ते लिहितही असतील. मला कल्पना नाही.)
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 12/14/2015 - 16:51
नवीन
मिसळपाव वर १-२ लेख लिहीले आहेत. भक्तीमार्गातील अडथळे हा २०१४च्या गणेशलेखमालेतील लेख लेटेस्ट म्हणावा लागेल. इतरेजनांचे जाऊदे पण माझ्या स्वतःच्या पत्नीच्या परमश्रद्धाळू स्वभावाला मी बदलू शकलो नाही ह्याचे फार वैषम्य वाटते. पण तिच्या बरोबर मी देवळात जातो. गर्दी नसेल तर आतही जातो. पण नमस्काराला हात जुळत नाहीत. ती प्रसाद आणून कणभर मला देते. (मला मधुमेहामुळे गोड वर्ज्य आहे). मी खातो. तिथे एखादा देणगीचे पुस्तक घेऊन कोणी बसला असेल तर मी देणगीही देतो. हे सर्व मी तिला आवडतं म्हणून, तिचे मन राखण्यासाठी करतो. पण वेळोवेळी तर्किक वादही घालत असतो. असो. ह्या आस्तिकांचे विचार आपण बदलू शकत नाही. पण वरचेवर चर्चाकरून, उदाहरणे देऊन, एखाद्याच्या डोक्यात, त्याच्या मनाविरुद्ध का होईना, विचारांचे बीज रुजले तर त्याचा त्यालाच फायदा होईल ह्या विचाराने माझे विचार मांडत असतो. असो.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 12/13/2015 - 17:54
नवीन
बाकी ते सत्यनारायनाच्या पुजेचं म्हणाल तर ते धर्मसुधारनेचं एक प्रभावी माध्यम आहे असं कुणीसं म्हटलं आहे. ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 12/13/2015 - 18:50
नवीन
आहो..चूक चूक...आपल्याला नेमकं उलट ऐकू आलेलं आहे. त्यांनी ते धर्मसुधारनेचं एक प्रभावी माध्यम आहे.. असं म्हणलेलं नसून त्या(मूळच्या शोषक) माध्यमातून (त्याला बदलवून..) प्रभावी(पणे) धर्मसुधारणा करता येते.. असं म्हटलेलं आहे..
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 12/14/2015 - 06:43
नवीन
म्हणजे परंपरागत पुरोहीत यजमानांचे "शोषण"करतात आणि "धर्मसुधारक"पुरोहीत ते करत नाहीत असे आहे का?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 12/14/2015 - 09:07
नवीन
होय..होय..
"धर्मसुधारक"पुरोहीत ते करत नाहीत
हे अगदी बरोब्बर . ..
परंपरागत पुरोहीत काय करतात? ते त्यांचे त्यांनाच जाऊन विचारा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 12/14/2015 - 09:21
नवीन
तुम्ही सांगा ना प्लीज..
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 12/14/2015 - 09:35
नवीन
मला म्हायती नाही... धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 12/14/2015 - 18:19
नवीन
हे परंपरागत पुरोहितांकडून होणारे शोषण कोणत्या प्रकारचे असते यावर काही प्रकाश टाकू शकाल का?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 12/14/2015 - 20:23
नवीन
अगदी भरपूर टाकीन. व्हॉट्सप वर या..तिकडे असल्या प्रकाश झोतांची उत्तम व्यवस्था केलेली आहे.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 12/15/2015 - 03:49
नवीन
इथे सांगितलेत तर उत्तम होईल. :)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 12/15/2015 - 06:38
नवीन
इथे भरपूरवेळा सांगून झालेलं आहे..तिच तिच चर्चा वारंवार करण निरर्थक आहे..म्हणून मी इथे सांगणार नाही.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 12/15/2015 - 11:44
नवीन
ठीक आहे :)
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Sun, 12/13/2015 - 18:26
नवीन
तुम्ही म्हणता ते शंभर टक्के सत्य आहे. पण जर सर्वच जण नास्तिक झाले तर समाजात जो अनाचार माजेल, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात की डॉ. लागू घेणार आहेत? धर्म ही अफूची गोळी हे खरंच आहे. पण समाज त्यामुळेच एका तरी शक्तीच्या धाकात राहून दरोडे घालत नाही हे काय कमी आहे? इथे साधं हात धुवून जेवावं, रस्त्यात थुंकू नये, शिंकताना समोर रुमाल धरावा वगैरे गोष्टी समाज पाळत नाही. त्याला सारासार विवेक करण्याएवढी अक्कल आहे असा तुमचा समज असेल तर तुमच्यासारखे हुशार तुम्हीच.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sun, 12/13/2015 - 22:41
नवीन
लोक नास्तिक झाले तर अनाचार माजेल ही भीती अनाठायी आहे. थोडी विचारशक्ती, थोडे शिक्षण असेल तर तसे होत नाही.
समजा मी दरोडा घातला तर देव काही करणार नाही. पण माझ्या मुलाने तसेच केले आणि तो पकडला गेला तर काय? माझ्या घरी कुणी दरोडा घातला तर मला आवडेल का? मग मी दरोडा का घालायचा? सर्वच लोक चोरी करु लागले तर समाजात जी अंदाधुंदी माजेल ती मला चालेल का? शिवाय पोलिस पकडू शकतात, लोक पकडू शकतात, मारहाण करु शकतात. गुन्हेगार म्हणून पकडलो गेलो तर कुटुंबाचे काय होईल? हे विचार कुठलाही देव धर्म न आणता लोकांना अशा गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करत नाहीत काय? माझा मते करतात. अगदी स्वार्थी आत्मकेंद्रित व्यक्तीलाही हे कळू शकते की चोर्यामार्या करणे व्यवहार्य नाही त्याकरता धर्माची झापडेच हवीत असे नाही.
पूर्वी रोग आजार हे देवाच्या कोपाने होतात असे समजायचे. भूकंप, पूर, दुष्काळ हेही देवाच्या कोपाने होतात असे वाटायचे. त्याची कारणे आज कळली आहेत त्याचप्रमाणे समाजाचे स्वास्थ्य, कायदा, अनुशासन वगैरे देवाच्या कृपेने आहेत असे समजले जाते. पण हाही बागुलबुवा खोटा आहे हे थोडा विचार केला तर समजेल.
तस्मात समाजात जगण्याकरता जी नैतिक मूल्ये जपावी लागतात ती धर्मामुळेच मिळतात हे खरे नाही.
समाजात जे प्रसिद्ध नास्तिक लोक आहेत त्यापैकी किती लोकांनी बेकायदेशीर धंदे केल्याचे उघडकीस आले आहे?
उलट कुठल्यातरी देवाचे, धर्माचे वा बुवाचे परमभक्त हे विविध परीने समाजकंटक असल्याचे आपण बघत नाही काय?
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Mon, 12/14/2015 - 01:39
नवीन
+१.
तुरुंगात असलेल्या लोकांमध्ये नास्तिकांचं प्रमाण जास्त असतं का? नाही. अमेरिकेतल्या तुरुंगात नास्तिक म्हणवणारांचं प्रमाण ०.०७% आहे. म्हणजे नास्तिक लोक पन्नासेक पट कमी गुन्हे करतात. कारण सर्वसाधारण लोकसंख्येत नास्तिक म्हणवणारांचं प्रमाण ३ टक्के आहे.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 12/14/2015 - 05:08
नवीन
शिवाय गुन्ह्यांचं स्वरुपही पाहायला पाहिजे. आमच्या देवाविरुद्ध बोलला म्हणून एखाद्याला कापून काढणे किंवा प्रो-लाईफ म्हणून ॲबॉर्शन क्लीनिकवर गोळ्या झाडणे असे उद्योग नास्तिक लोक करत नाहीत.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Mon, 12/14/2015 - 06:10
नवीन
नास्तिकांशी वाद घालण्यापूर्वी सर्व आस्तिकांनी ह्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 12/14/2015 - 07:17
नवीन
याच्याशी सहमत पण बहुसंख्य लोक अशा नैतिक मूल्यांचं पालन त्याच्याशी धार्मिक मुद्दे निगडित असले तरच करतील हेही खरं आहे.
- Log in or register to post comments
य
यनावाला
Mon, 12/14/2015 - 16:33
नवीन
@काळा पहाद, बोका-ए-आझम,प्रसाद१९७१
...
" देवा-धर्मामुळे अनैतिकता वाढण्यास मदत होते. प्रत्येक माणसाला सदसद्विवेकबुद्धी असते. चांगले काय वाईट काय, नैतिक काय अनैतिक काय,पाप कोणते पुण्य कोणते हे समजते. वाईट गोष्ट करू नये असेच त्याला त्याची बुद्धी सांगते. पण काम,क्रोध,मद,मत्सर इ.मनोविकार असतात. त्यातील एखाद्याला बळी पडून माणूस दुष्कृत्य करतो. पण त्याची त्याला टोचणी लागते. ती सतत लागून राहिली असती तर त्याने पुन्हा दुष्कृत्य केले नसते. तो पापापासून दूर राहिला असता.पण सदसद्विवेक बुद्धीची ही टोचणी घालवण्याचे, पापक्षालनाचे उपाय धर्मग्रंथांत, साधुसंतांच्या अभंगात आस्तिकांसाठी दिले आहेत. ते नास्तिकांच्या उपयोगाचे नाहीत.
"हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे।
"नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची।"
"अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:।"
"तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन्मुक्त हेळामात्रे।"
अशी आश्वासने ठायी ठायी आढळतात. त्यामुळे सत्यनारायणाची पूजा घातली,साईबाबांना सोन्याचा मुकुट अर्पण केला,तिरुपतीबालाजीच्या हुंडीत दहाहजार रुपये टाकले की पाप संपले. टोचणी बंद.मग पुन्हा फसवायला, लुबाडायला,भ्रष्टाचार करायला मोकळे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Mon, 12/14/2015 - 07:47
नवीन
जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली ह्या कम्युनिस्टांनी केल्या आहेत, मग तो लेनिन असो, स्टॅलिन असो, माओ असो का चँग असो. पॉल पॉट सुद्धा नास्तिक च होता म्हणे. अगदी भारतातले माओ-वादी घ्या ना.
त्यामुळे नास्तिक सज्जन वगैरे असले कन्क्लुजन पटण्यासारखे नाहीच. आणि एकुणात नास्तिकांची कमी असलेली टक्केवारी बघता वर लिहीलेल्या लोकांनी ( कम्युनिस्ट ) केलेली कत्तल आणि छळवणुक ही स्टॅतिस्टिकली नास्तिकां च्या विरुद्धचा विदा देइल.
कदाचित विदा असेही दाखवेल की कम्युनिस्ट, माओवाधी ( म्हणजेच नास्तिक ) ह्यांना कुठलीच बाऊंडरी नसते.
आस्तिक, नास्तिक आणि सज्जनता ह्याचा काडीचा संबंध नाही. उगाच काहीतरी तर्क्ट लढवू नका.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 12/14/2015 - 08:21
नवीन
तुमच्या प्रतिसादवर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाउ द्या..
हा हाहा. मोठे गमतीदार उदाहरण आहे भौ.
याचा अर्थ घ्यायचा झाला तर चंगेझ खान , अकबर , औरंगजेब हिटलर हे कट्टर कम्युनिस्ट होते असेच म्हणावे लागेल
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 12/14/2015 - 11:01
नवीन
की ते नास्तिक असतात. प्रत्यक्षात त्यांचाही देव असतोच. फक्त त्याला ते मार्क्सवाद, दास कॅपिटल, डायलेक्टिकल मटेरियालिझम वगैरे नावं देतात. विचारसरणीमुळे जगातल्या सर्वात जास्त कत्तली झाल्या आहेत. देव, धर्म, एखादा इझम - या सगळ्या विचारसरणीच आहेत.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Mon, 12/14/2015 - 11:03
नवीन
नाही हो बोका. कत्तली स्वार्था मुळे झाल्या आहेत, मग त्या जस्टीफाय करायला विचारसरणी वगैरेंची मदत घ्यायची.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 12/18/2015 - 09:59
नवीन
हे ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल त्या दिवशी बरीच दुकानं बंद होतील.
- Log in or register to post comments
व
वगिश
Mon, 12/14/2015 - 10:41
नवीन
असहमत. बर्याच टोळ्या देवाची पूजा केल्याशिवाय याश दरोड्यास निघत नाही.
साईबाबांच्या पेटीत काळा पैश्याचा हिस्सा दान केला की आपले पाप धुतले गेले असे मानतात.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Mon, 12/14/2015 - 00:10
नवीन
छान लेख!
काही वर्षांपूर्वी असाच मंदिराचा अनुभव माझ्या नजरेतून लिहिला होता आणि काही मित्रांना वाचायला दिला पण ते थोडेफार दुखावले गेले. अर्थात, मित्र असल्यामुळे आम्ही निवांतपणे चर्चा करू शकलो.
पण अनोळखी लोकांपुढे आपले हे विचार मांडणे मी तरी धाडसाचे समजतो आणि तसे केल्याबद्दल तुमचे अभिनंदन!
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Mon, 12/14/2015 - 01:41
नवीन
तुम्हाला देव ही संकल्पनाच मान्य नाही का तुमचा विरोध कर्मकांडाला आहे?
प्रसादाची किंमत कशाला ठरवायची? सगळ्यात उत्तम म्हणजे प्रसाद घ्यायचा आणि एखाद्या भिकाऱ्याला द्यायचा. पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची. असं म्हणून की या प्रसादाची किंमत मी X रुपये ठरवली आहे आणि तेवढी रक्कम मी या गरजूला देत आहे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का कोणाची देवावर श्रद्धा असेल तर अडचण काय आहे? कर्मकांडाला आणि अंधश्रद्धांना विरोध असणं समजू शकतो आणि माझा पण आहेच.
उत्तर द्याल की नाही माहित नाही कारण या आधीच्या धाग्यांवरसुद्धा तुम्ही फक्त तुमच्यासाठी सोयीस्कर प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 12/14/2015 - 04:12
नवीन
हे लई आवडले.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 12/14/2015 - 04:24
नवीन
अशाने भीक मागण्यासारख्या अनिष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना समर्थन मिळेल असं नाही वाटत?
ती पावती न फाडतापण करता येतेच की. उलट अनेक देवस्थानं आपण असं करत असल्याचं सांगतात.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 12/14/2015 - 05:38
नवीन
प्रबोधनाचे प्रयत्न छान आहेत.
दोन कानांच्यामधे असलेला अवयवय, ज्याला मेंदु म्हणतात, त्याचा योग्य वापर माणसाने केला तर जगातल्या बर्याच समस्या सुटतील.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/14/2015 - 05:53
नवीन
मानवी मनाची जडणघडण अशी आहे की जोपर्यंत माणुस आहे तोपर्यंत आस्तिक व नास्तिक दोन्हीही असतील... आणि त्यातले काही आपल्या मतावर ठाम राहतील. जसे आपण इतर बाबतीत म्हणतो तसेच, "दुमत आहे यावर एकमत (अॅग्री टू डिसअॅग्री)" या तत्वावर एकमत करून, आपली मते निष्कारण दुसर्यावर न लादता, दोन्ही गटांचे एकमेकाशी खेळीमेळीचे संबंध असायला हरकत नसावी. कारण, जेव्हा एक गट दुसर्यावर आपली मते लादू लागतो तेव्हाच संघर्ष निर्माण होतो.
स्वतः बदलण्याची इच्छा असल्याशिवाय / झाल्याशिवाय दुसरा कोणीही मानवी मनात बदल घडवून आणू शकत नाही.
विविधता हा जगाचा स्थायीभाव आहे... मग भौतिक असो, अधिभौतिक असो की पार्मार्थिक असो. कुठल्याही संबंधातल्या एकेरी तत्वज्ञानावर आधारीत जग फारच रुक्ष आणि बेचव बनेल, नाही का ?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Mon, 12/14/2015 - 05:53
नवीन
अगदी बरोबर. नास्तिक त्याचा योग्य वापर करतात. आस्तिक अशा अवयवात गोळ्या झाडतात.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 12/14/2015 - 09:05
नवीन
मेंदुचा योग्य वापर आणि आस्तिक/नास्तिक असणं यांचा संबंध काहि कळला नाहि. फार लांब कशाला.. मिपावरच अनेक उदाहरणं मिळतील दोन्हि बाजुने :)
अवांतरः
मला प्रथमतः आस्तिक/नास्तिक म्हणजे काय हेच कळत नाहि... सिरीयसली.
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 12/14/2015 - 06:39
नवीन
ज्या रेट ने हल्ली या विषयावर मिपावर चर्चा {?} होते
मिपा चे नाव बदलून "आस्तिक-नास्तिकपाव.कॉम" ठेवायची विनंती मी नीलकांत ला करतो
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 12/14/2015 - 06:58
नवीन
हेही बरोबर वाटतंय.
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 12/14/2015 - 07:12
नवीन
सश्रद्द लोकांना एका रांगेत(आस्तीक-धर्मवादी-कर्मकांडी-उपासक-मंत्रजागर्वाले-उपासक-नरबळी-जारण मारण ई) उभे करून "झोडपायचा" पदसिद्द अधिकार मिपावर असताना हे तथाकथीत नास्तीक वेगळी साईट काढण्याचा अपशकून करणार नाहीत.
बाकी लोक संपादक पदासाठी नावे सुचवतात थेट संस्थळासाठीच नावे सुचविणारे स्पांडोबा हे खरे सुधारक !!!!!
खाल मुंडी नाखुस
- Log in or register to post comments
म
मयुरMK
Mon, 12/14/2015 - 06:53
नवीन
देव मंदिरात असता तर मंदिराबाहेर बसून भीक मागन्याची वेळ कोणावर आली नसती. आणि या खोट्या देवावर विश्वास ठेवून जर मी देवाला पूजत बसलो असतो तर माझ्या समाजाला भीक मागायची वेळ आली आसती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Mon, 12/14/2015 - 07:05
नवीन
खरे भिकारी मंदिरात असतात.
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Mon, 12/14/2015 - 07:51
नवीन
तुमचा विश्वास नसेल तर इतरांनी तुम्हाला फैलावर घेण्याचे काही कारण नाही. पण जेव्हा तुम्ही आस्तिक लोकांच्या मनातील देवाच्या भितीवर घाला घालायला सुरू करता तेव्हा ते सैरभैर होतात आणि काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत राहत नाहीत. त्यांना तुम्ही त्यांच्या माता-पित्यावर गंभीर आरोप केल्यासारखे वाटू लागते. जे समजा खरेही असेल तरी पटकन मान्य होत नाही.
'देव मानत नाही मग देवाचा लाडू कसा प्रसाद म्हणून घेता' असे ऐकावे लागू नये म्हणून कदाचित तुम्ही तो प्रसाद नाकारला असे वाटत आहे.
देवाची भिती हा भयंकर प्रकार आहे. आपल्याकडे मनाच्या शांती साठी किती जण आराधना करतात आणि किती जण भितीपोटी करतात हे पाहणे रोचक ठरेल. टी.व्ही. पाहत माळ ओढणे, भराभर स्त्रोत्र उरकून घेणे, वाघ मागे लागल्या सारख्या प्रदक्षिणा काढणे, प्रसाद मिळावा म्हणून मारामारी करणे/ भांडणे, रस्त्यावरून जाताना बारकेसे देऊळ दिसले तरी हात जोडत जाणे ही काही उदाहरणे. 'देवबाप्पा शिक्षा देईल' आणी 'बुवा आहे तिकडं' इथूनच हे सगळे सुरू होते त्याला कोण काय करणार.
आणखी एक गोष्ट, काही स्वतःला नास्तिक म्हणवतात पण देवापुरतेच. ज्याप्रमाणे उत्तर ध्रुव असेल तर दक्षिण असलाच पाहिजे तसेच नसले तर नसलाही पाहिजे. त्याचप्रमाणे जर देव नसेल तर इतर अमानवीय शक्तींचे अस्तित्व पण कायमचे अमान्य करता आले पाहिजे. पण सर्वांनाच हे शक्य होत नाही, गर्भगळीत झाल्यावर देवच आठवतो.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Mon, 12/14/2015 - 07:58
नवीन
@ यनावाला - तुम्ही जर स्वताचे निरीक्षण केलेत तर तुमच्यात आणि तो जो सर्वात पहील्यांदी तुम्हाला हटकणारा प्रवासी होता त्याच्यात थोडातरी फरक आहे असे वाटते का? "आपण बरोबर आणि बाकीचे येडे" हे महतवाचे साम्य दिसले नाही का?
प्रसाद न घेणे वगैरे तर फाजिलपणा आहे. तुमच्या सारख्या नास्तिकांमुळे आमच्या सारख्या नास्तिकांना बट्टा लागतोय. . दुसर्यांच्या भावना काही कारण नसताना दुखवणे ही सर्वात साधी गोष्ट आहे तीच तुम्हाला समजत नाहीये.
मी जिथे जाईन तिथे प्रसाद खातो आणि नमस्कार करतो किंवा करत नाही. ज्यांना मी नास्तिक आहे हे माहीती आहे त्यांच्यासमोर मला नमस्कार करुन दाखवायची गरज वाटत नाही आणि ज्यांना मी नास्तिक आहे हे माहीती नाही त्यांच्या भावना मी उगाचच दुखवत नाही.
गणपतीत आरत्या वगैरे मस्त पैकी म्हणतो ( जर मी तिथे असलो तर, मुद्दामहुन आरतीला जात नाही ). वाचन चांगले असल्याने लोकांना देवादिकांचे दाखले वगैरे देतो, गोष्टी सांगतो. आपण चारलोकात असु तर त्या चार लोकांप्रमाणे वागावे हेच तुम्हाला कळत नाहीये.
बिचारे आस्तिक ( हिंदु ) मी नास्तिक आहे माहीती असुन माझ्या बाबत अजिबात दुजाभाव करत नाहीत.
- Log in or register to post comments
स
सप्तरंगी
Wed, 12/16/2015 - 16:30
नवीन
यनावाला काही तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणार नाहीत ते मोजक्या लोकांनाच उत्तर देत आहेत :)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 12/14/2015 - 08:17
नवीन
यनावाला,
मला पटला तुमचा लेख. इथे अनेकांनी मुद्दा मांडला आहे की प्रसाद म्हणुन कशाला, लाडु म्हणुन खा. दुसर्यांच्या भावना का दुखवायच्या... वगैरे वगैरे.
वरकरणी हे मुद्दे योग्य वाटतातही.. मी स्वतः सुद्धा अशीच वागते. माझा देव आणि कर्मकांड ह्यावर अजिबात विश्वास नसताना सुद्धा मी उगाच चर्चा आणि वाद नकोत म्हणुन पटकन पाया पडते.. प्रसाद खाऊन टाकते. पण ते तिथेच संपतं का?
तर नाही...
वाद नकोत म्हणुन मी घरात गणपती.. महालक्ष्म्या.. नवरात्र करते. मी भले पायाही पडत नाही. पण वाद नकोत म्हणुन सवाष्ण ब्राह्मण बोलावते. मग उगाच कुणाला कशाला दुखवायचं म्हणुन १६ भाज्या, ७ कोशिंबिरीचा नैवेद्य, आरत्या, वस्त्रमाळा-आरास जे जे म्हणुन असेल ते सगळंच करते.
आता ह्यात काय कुणाचं वाईट होतंय का? तर छे.. अजिबात नाही.. म्हणुन मी वर्षानुवर्ष ते करतेच आहे. सवाष्ण म्हणुन खात्यापित्या घरातली बाई येते.. तिला मी गरज नसताना ओटी भरुन, कुंकु लावुन्च पाठवते. उगाच कुणाला कशाला दुखवायचं?
मग आता इतकं करतेच आहे तर हळदी कुंकु करण्यात काय प्रॉब्लेम आहे? झालंच तर वाण लुटणे इ होऊ देत की. उगाच वाद नकोत..
आणि इतकं सगळं करुन वर्षातुन एकदा तुळजापुरला जायला आणि पावती फाडायला काय हरकत? गेलोच आहोत म्हणजे दही+केळं वगैरे कुस्करुन जो अभिषेक करतात तो ही करुन टाकु.. आता मला नाही पटत इतक्या सुंदर मुर्तीवर असा अभिषेक करुन तिचे नुकसान करणे. पण बाकीच्यांना पटतं. त्यांच्या श्रद्धेचा मान राखायला हवा, उगाच दुसर्याला का दुखवायंच? म्हणुन मी केवळ वाद टाळायला साडी नेसुन तिथे जाउन उभी रहाते.
हे असंच चालुच रहातं...
ह्या सगळ्यात मी एकदाही देवाच्या पाया पडत नाही.. पडलेच तर माझ्या मनात अगदी काही म्हणजे काहीच भाव नसतात. उगाच आपलं हात जोडायचे. आणि हे सगळं होऊनही मी म्हणे नास्तिक आहे..
आस्तिकांच्या भावनांचा विचार कर करुन आज माझ्या सारख्या नास्तिक व्यक्तिची ही अवस्था आहे.. म्हणुन मला खुप आवडतं जेव्हा कुणी ठामपणे "करणार नाही" म्हणुन उभं रहातं. विचार चुक की बरोबर.. तार्किकदॄष्ट्या योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे.. पण ह्या न त्या कारणाने आपल्या मताप्रमाणे वागायला न मिळणे हा एक मोठाच त्रास असतो.
मला वाटतं नास्तिकांनी जे करायचं ते करावं.. आणि आस्तिकांनी स्वतःच्या आणि नास्तिकांच्या.. कुणाच्याच भावना दुखवु नयेत... ज्याला जे वाटतं तो ते करण्यास मोकळा पाहिजे..
- Log in or register to post comments
र
राही
Mon, 12/14/2015 - 09:42
नवीन
स्वतःच्या तत्त्वांविरुद्ध, केवळ दुसर्याच्या भावना जपणे यासाठी किंवा भिडेपायी काही करावे लागणे यासारखी दुसरी कुचंबणा नाही.
स्पष्ट आणि ठाम प्रतिसाद खूप आवडला.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »