Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

य
यनावाला
Sat, 12/12/2015 - 16:38
🗣 421 प्रतिसाद
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता. प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले, " तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?" " मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. " "कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?" " हो. कुठल्याच देवाला नाही." थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला. " मग मंदिरात कसे आला ?" " तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो." " तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?" "नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो. "नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?" मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे. "नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो." " देवाला नाही आणि माणसांना का बरे?" "कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे." "तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला. "जशी तुमची इच्छा" मी म्हणालो. थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच. तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती. "आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला. बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या, "तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?" " ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल." " आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला. "ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. " "आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले. "खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते." " ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला. " त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?" " सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. " " ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?" " अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या. " चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो. " आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या. " आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे." "पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्‍यांना ऐकू आले असावे. "तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही." " पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला. " ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. " "गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले. " ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा." गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे. .................................................................................
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
107591 वाचन

💬 प्रतिसाद (421)
न
नगरीनिरंजन Wed, 12/16/2015 - 00:56 नवीन
ज्या काही श्रद्धा आहेत त्या घरात पाळून बाहेर त्याची वाच्यता/प्रचार न केल्यास कोणाही नास्तिक माणसाची हरकत नसेलच. खरेतर लेखात लेखकाची मंदिराला वगैरेही हरकत दिसत नाहीय. आस्तिक लोक मात्र देवाला भीतात आणि दुसऱयाला पीडतात एवढेच लेखात अधोरेखित केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
स्वप्नांची राणी Mon, 12/14/2015 - 15:46 नवीन
मंत्रशक्तिने उपचार म्हणजेच आत्ताचे अल्ट्रा साऊंड असे अगदी आत्ताच वाचलय... म्हणजे बघा आपल्याकडे त्यावेळी सुद्धा अल्ट्रा साऊंड होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
आ
आनन्दा Tue, 12/15/2015 - 05:56 नवीन
मला अल्ट्रासाऊंड वगैरे माहीत नाही.. माझ्या आजूबाजूला अश्या होक्स मानणारी बरीच माणसे आहेत, ज्यांच्यामुळे आस्तिक कसा नसावा हे मी शिकलो. परंतु त्याच वेळेस एखाद्या गोष्टीला प्रचलित विज्ञानात आधार नाही म्हणून त्या गोष्टीचे अस्तित्वच नाकारणे हे देखील मला मान्य नाही. विशेषतः इंद्रियजन्य विश्वापलिकडचे अनुभव घेतल्यानंतर तर नाहीच नाही. परत एकदा सांगतो नास्तिकांवर माझा राग मुळीच नाही, माणसाने नास्तिक असावे, अनुभव नाही तर कशाला विश्वास ठेवावा? मी देखील आयुष्याच्या एका काळात नास्तिकपणाकडे झुकत चाललो होतो. पण म्हणून दुसर्‍याच्या अनुभवाची खिल्ली उडवण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे पण लक्षात ठेवले पाहिजे. नेमके तेच हे नास्तिक म्हणवणारे करतात आणि मग इतरांच्या रोषास कारण होतात. बाकी जाता जाता, चाचपडत सुरुवातीनंतर धाग्यावर अखेरीस बॅटिंग सुरू झालेली आहे. हा धागा पण द्विशतक मारणार असे दिसतेय. तसे झाले तर सलग ३ डबल सेंच्युरींचा विक्रम यनांच्या नावावर जमा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
म
मार्मिक गोडसे Tue, 12/15/2015 - 06:26 नवीन
अल्ट्रा साऊंड होते, अणूभट्ट्या होत्या, विमाने होती, हे इंग्रज आले आणी त्यांनी आपले ज्ञान चोरले व आपल्या प्रगतीच्या खाणाखुणा आपल्या प्रगत लोकांच्या डोळ्यासमोर पुसून टाकल्या अगदी आपल्या लोकांचा मेंदूचा प्रगत कप्पा फॉरमॅट केला. त्यामुळे रेल्वेचे इंजीन बघून आपले लोक घाबरून पळू लागले... आपल्या मेंदूचा अप्रगत कप्पा अजूनही त्याचे काम व्यवस्थीत करतो हे ही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
म
मार्मिक गोडसे Tue, 12/15/2015 - 10:44 नवीन
पहिला अनुभव माझ्या बाबांचा आहे - माझा जन्म तेव्हा व्हायचा होता/ नुकताच झाला होता. आमची म्हैस किडे पडून उठवणीला आली होती. आतापर्यंतच्या लोकांच्या अनुभवानुसार आता तिला वाचवणे कोणालाही शक्य नव्हते, अगदी गुरांच्या डोक्टरनी पण हात टेकले होते.
सर्व तथाकथोत वैद्यकीय उपाय थकल्यावर मंत्राने त्या बैलाला गुण आलेला मी पाहिला आहे. पण त्यावेळेस त्या माणसाने एक पाळ त्या बैलाच्या तोंडासमोर माळ्यावर ठेवायला सांगितले होते, त्यामुळे या प्रसंगाला एक गुण कमी. तरी सुद्धा औषध आणि रोग्याचा प्रत्यक्ष शारिरिक संपर्क नाही
आणि प्रत्येक वेळी मांत्रिकाचे पाय धरायला नकोत म्हणून शेवटी अश्या जखमांमध्ये पेट्रोल टाकायला सुरुवात केली.
अहो जेथे गुरांच्या डोक्टरनी हात टेकले होते व व मंत्राने किडे निघुन जात होते तर तुम्हाला मांत्रिकाचे पाय धरायला कमीपणा का वाटला? वर खुशाल गुराच्या जखमेवर पेट्रोल टाकले. ह्या पेट्रोलने किडे निघून जायचे का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Tue, 12/15/2015 - 11:16 नवीन
खरे तर हा प्रतिसाद अस्थानी आहे, पण तरीही देतो. पेट्रोलने किडे निघून जातात. पण त्या जनावराला भयंकर त्रास होतो. बाकी आम्ही मांत्रिकाकडे सारखे का जात नाही हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर मी खाजगीपणाच्या अधिकारात राखून ठेवत आहे. गावकडच्या परिस्थितीत यातल्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Tue, 12/15/2015 - 15:11 नवीन
ओके. परंतू जनावरांच्या जखमेवर पेट्रोल ओतणे हा अघोरी प्रकार आहे , वैद्यकीय उपचार पद्ध्तीत अयोग्य समजले जाते. जखमेतले कीडे कोणत्या प्रकारचे आहेत हे गुरांच्या डॉ.ला माहीती असते व त्यावर खात्रीशीर इलाजही असतो. जखमेची स्वच्छता व मलमपट्टी महत्वाची असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Wed, 12/16/2015 - 06:10 नवीन
या सार्‍याशी मी सहमत आहे. पण तुम्हाला गावाकडच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. डॉ. ला माहीत असते म्हणावे तर आमची एक गाय देखील अशीच गुरांच्या डॉ. नी आता काही इलाज नाही, ही आता मरणार असे सांगितले असताना काही अन्य उपचारांनी बरी झालेली आहे. त्यामुळे गुरांच्या डॉ. कडे या सगळ्यांचे उपाय असतात हीच मुळात अंधश्रद्धा आहे. राहता राहिला प्रश्न त्यांच्या उपलब्धतेचा. गावाकडे साधारण ५०+ गावांमध्ये मिळून एकच, तो पण सरकारी गुरांचा डॉ. असतो, त्यामुळे त्याला तुमच्या घरापर्यंत घेऊन येण्यापेक्षा त्या जनावराला गाडीत टाकून त्याकडे नेणे जास्ती सोपे असावे अशी परिस्थिती. पण तेही शक्य नाही, कारण तो कायम फिरतीवर असतो, त्यातही जर्सी गायींचे फलन करण्यातून त्यांना पण ईझी मनी मिळतो, त्यामुळे तसेही त्यांचा ओढा तिकडे असणे सहाजिक आहे. आज बोलवावा तेव्हा तो १५ दिवसांनी येणार, त्यामुळे बर्‍याच वेळेस नाइलाजातून अश्या गोष्टी होतात. आम्हाला पण दु:ख होते, पण काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 12/16/2015 - 16:54 नवीन
@ आनन्दा. तुमच्या गावाकडील गुरांच्या डॉक्टरांची उपलब्धता त्यांच्या ज्ञानाबद्दल माहीत नव्हते. @डॉ. खरे.
जनावरांच्या जखमेवर पेट्रोल टाकणे हा अघोरी प्रकार आहे असे मला वाटत नाही. ( पेट्रोल टाकून जाळत असतील तर भाग वेगळा). पेट्रोल किंवा तत्सम सेंद्रिय विद्रावक ( ORGANIC SOLVENT) जखमेवर टाकल्याने जखम जळजळत नाही.
पेट्रोलने किडे निघून जातात. पण त्या जनावराला भयंकर त्रास होतो. असे आनन्दाही म्ह्णतात. १० वर्षांपूर्वीची घटना. कुत्र्याच्या शेपटीखाली पेट्रोलची पिचकारी मारून त्या कुत्र्याच्या वेदनांचा आनंद घेणार्‍या काही टवाळ मुलांनी रस्त्यावरील एका कुत्र्याच्या डोक्यावरील किडे पडलेल्या जखमेवर पेट्रोल ओतले होते,जवळजवळ अर्धा तास ते कुत्रे विव्हळत आमच्या सोसायटीत पळत होते. आमच्या येथे नाक्यावर एका सेवाभावी संस्थेची जनावरांवर मोफत उपचार करणारी अँब्युलंस उभी असायची. आम्ही त्यांना बोलावून घेतले. त्यांनी त्यांच्याकडील औषधाने जखम साफ केली,किडेही काढले व आठवडाभर त्याची व्यवस्थीत मलमपट्टीही केली. जखम पुर्णपणे बरीही झाली. कधीही जनावरांच्या जखमेवर पेट्रोल किंवा सपट लोशन टाकू नका, त्यांना जनावरांच्या डॉक्टरांकडे नेल्यास ते पुर्णपणे बरे होउ शकतात असे त्या डॉक्टरानी सल्ला दिला होता. त्यामुळे जखमेवर पेट्रोल टाकणे हे मला अघोरी वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
सुबोध खरे Wed, 12/16/2015 - 07:19 नवीन
जनावरांच्या जखमेवर पेट्रोल टाकणे हा अघोरी प्रकार आहे असे मला वाटत नाही. ( पेट्रोल टाकून जाळत असतील तर भाग वेगळा). पेट्रोल किंवा तत्सम सेंद्रिय विद्रावक ( ORGANIC SOLVENT) जखमेवर टाकल्याने जखम जळजळत नाही. मधुमेहाचे दुर्लक्षित रोगी किंवा कुष्ठरोगी( यांच्या नसा बधीर झाल्याने जखमेची संवेदना त्यांना होत नाही. त्याव्रबास्नार्या माशा सड्णाऱ्या मासांत अंडी घालतात. या अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्य़ा हे सडके मास खातात.) अशांच्या जखमेत वळवळणारे किडे चिमट्याने ओढून काढण्याचे दुर्भाग्य मला लाभलेले आहे. सैनिकांचे आई वडील खेड्यात राहतात आणी तेथे झाडपाल्याचे औषध करत राहतात. त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंती जोवर सैनिक स्वतः लक्ष घालू शकत नाही तोवर वाढत राहतात. श्रीलंकेत असलेल्या सैनिकाच्या वडिलांचे किंवा सियाचेनला असणार्या सैनिकाच्या आईच्या पायातील अशा जखमांचा मी इलाज केलेला आहे. सुरुवातीला सैनिकांचा राग येत असे पण राजा मिळून हा सैनिक प्रत्यक्ष आई बापाना रुग्णालयात आणेपर्यंत ३-४ महिने जातात. हे किडे स्पिरीट हायड्रोजन पेरॉक्साइड सारख्या जन्तुनाशकाना दाद देत नाहीत. त्यामुळे जखमेवर टरपेन्टाइन टाकले कि किडे त्यातून वळवळत बाहेर येतात ते चिमट्याने काढून टाकावे लागतात आणी त्यावर पट्टी करावी लागते. हि प्रक्रिया एखाद्या रुग्णात दोन तीन वेळा करावी लागते जखम पूर्ण बरी होईपर्यंत. तेंव्हा जनावरांवर असा इलाज अघोरी आहे असे मला वाटत नाही. वर्णन किळसवाणे आहे हे मला मान्य आहे पण मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आवश्यक होते. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Tue, 12/15/2015 - 10:47 नवीन
पहिला अनुभव माझ्या बाबांचा आहे - माझा जन्म तेव्हा व्हायचा होता/ नुकताच झाला होता. आमची म्हैस किडे पडून उठवणीला आली होती. आतापर्यंतच्या लोकांच्या अनुभवानुसार आता तिला वाचवणे कोणालाही शक्य नव्हते, अगदी गुरांच्या डोक्टरनी पण हात टेकले होते.
सर्व तथाकथोत वैद्यकीय उपाय थकल्यावर मंत्राने त्या बैलाला गुण आलेला मी पाहिला आहे. पण त्यावेळेस त्या माणसाने एक पाळ त्या बैलाच्या तोंडासमोर माळ्यावर ठेवायला सांगितले होते, त्यामुळे या प्रसंगाला एक गुण कमी. तरी सुद्धा औषध आणि रोग्याचा प्रत्यक्ष शारिरिक संपर्क नाही
आणि प्रत्येक वेळी मांत्रिकाचे पाय धरायला नकोत म्हणून शेवटी अश्या जखमांमध्ये पेट्रोल टाकायला सुरुवात केली.
अहो जेथे गुरांच्या डोक्टरनी हात टेकले होते व व मंत्राने किडे निघुन जात होते तर तुम्हाला मांत्रिकाचे पाय धरायला कमीपणा का वाटला? वर खुशाल गुराच्या जखमेवर पेट्रोल टाकले. ह्या पेट्रोलने किडे निघून जायचे का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
सस्नेह Mon, 12/14/2015 - 11:43 नवीन
श्री यनावाला यांच्या लेखातून असे ध्वनित होते की, १. आस्तिक = मंदिरात जाऊन मूर्तीला नमस्कार करणारे/ कर्मकांड, कुलधर्म पाळणारे/ देवाकडून कसली ना कसली अपेक्षा करणारे/देवाला भिणारे. २. नास्तिक = मूर्तीला नमस्कार न करणारे/ देव या संकल्पनेला निरर्थक मानणारे/ कर्मकांड कुळाचार यांना किंमत न देणारे. ३. मूर्ती/देवत्व हे चांगुलपणाचे/ नैतिक अधिष्ठानाचे/पवित्रतेचे/मांगल्याचे प्रतीक मानता येत नाही. ४. कर्मकांड/कुळधर्म/कुळाचार हे सामान्य जनांसाठी मतीची मलीनता झाडून मन शुद्ध करत राहण्याचे साधन असू शकत नाही. ५. नास्तिक म्हणवणारे सर्व लोक नीतिमत्ता, पावित्र्य, मांगल्य, परोपकार इ. चांगल्या गुणांना श्रेष्ठत्व(देवत्व) समजत नाहीत. ६. देव/धर्म ही संकल्पना सोडली तर सामान्य लोक खात्रीने अधिक उच्च/नैतिक/पवित्र/शुद्ध विचारांनी जीवन जगू शकतील. यनावाला यांचे विचार शास्त्रशुद्ध आहेत, तथापि त्यांच्याइतके परखड अन शास्त्रोक्त विचार सर्वसामान्य लोकांना झेपतील काय ? अफूच्या गोळीने का होईना, समाजात स्थैर्य राहत असेल तर उघड्या सत्याचा अट्टाहास कशासाठी हवा ? पारंपारिक कल्पना बाजूला ठेवल्या तर देवत्व हे सर्व चांगल्या गोष्टींचे प्रतीक आणि योग्य पद्धतीची कर्मकांडे चित्त/विचार शुद्ध ठेवण्याचा मार्ग असे का मानता येऊ नये ? बुद्धीवाद्यांनी देव तत्वाच्या माध्यमातून पहावा, सामन्यांनी कर्माच्या माध्यमातून यात वाईट ते काय ?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 12/14/2015 - 11:24 नवीन
मी व माझा देव http://mr.upakram.org/node/770 रिटायर करायला का होईना लागूंनी देव मानलाच की नाही? :)
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 12/14/2015 - 11:54 नवीन
100
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 12/14/2015 - 12:02 नवीन
निमित्त दोन दळणाचे डब्बे,एक दोर्याचे बंडल आणि ऊडवायला ५-६ पतंग असे साहीत्य तयार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
व
विजुभाऊ Mon, 12/14/2015 - 13:14 नवीन
पुरुष जर नास्तिक असेल आणि त्यात सुद्धा उच्च विद्याविभुषित, तर त्याला आस्तिक सासराकडुन असा काही उपद्रव होत नाही. अगदी स्वताच्या घरातही काही उपद्रव होत नाही. उलट झालेच तर त्याच्या नास्तिकतेचे कौतुक होते
आमाला तर ह्याच्या अगदी उलट्ट अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 13:27 नवीन
विजुभाऊ - तुमच्याकडे मातृसत्ताक पद्धत असावी. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सप्तरंगी Mon, 12/14/2015 - 14:40 नवीन
प्रसाद नाकारण्याचे कारण काय ? जर देव नाही यावर तुम्ही ठाम आहात तर तो प्रसाद देवाचा नाही तर तो एक तुमच्या आमच्या सारख्यांनी बनवलेला पदार्थ आहे नाही का ? मग नाकारून तो बनवणार्या त्या व्यक्तीचा अपमान होईल, देवाचा नाही. सत्य जाणुन न घेता ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. आस्तिकाने तो देवाचा प्रसाद म्हणुन खावा आणि नास्तिकाने पदार्थ म्हणुन खायला काय हरकत आहे. तुम्ही जर देव मानतच नाही तर तो देवाचा प्रसाद आहे आणि म्हणून तो मी खाणार नाही अशी श्रद्धा कशी काय बाळगु शकता ??
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 12/14/2015 - 14:55 नवीन
प्रसाद म्हणजे एक पदार्थ आहे आणि तो नास्तिकाने खाण्यास काय हरकत हा मुद्दा ठीक आहे. पण प्रसाद म्हंटले की अनेक नियम आले ,जसे उजव्या हातानेच स्वीकारावा , आवडला नाही तरी पुर्ण खावाच खावा, त्यावेळी काहीही खाण्याची इच्छा नसली तरी खावा ई. यामुळे मी बहुधा प्रसाद म्हणून मिळणारा खाऊ नाकारतो, त्याऐवजी मंदिरांबाहेर विकले जाणारे कंदी पेढे हा माझा विक पॉईंट, ते मी आवर्जून विकत घेतो. तसेच नास्तिक माणसाच्याही भावना असू शकतात हे अस्तिक लोक समजून घेत नाहीत आणि प्रसादाचा उगाच आग्रह करतात हे मला पटत नाही. प्रसाद खावा न खावा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
स
सप्तरंगी Mon, 12/14/2015 - 15:39 नवीन
पदार्थ म्हणून खाताना प्रसादास लागू पडणारे नियम नास्तिकाने पाळायची गरज नाही. फार फार तर जर आपण देवाला नाही पण माणसांना मानतो म्हणुन आस्तिकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून स्वतःला त्रास न होऊ देत थोडे flexible राहायला हरकत नसावी. अति rigid राहुन टोकाच्या भूमिका घेऊन आपण फार काही साध्य करत नसतो, उलट तो देवाचा प्रसाद आहे हे मानून आपण खाणार नसाल तर प्रसाद आहे असे आपण मानता आहात असाच अर्थ होईल न ? तो पदार्थ असता तर तुम्ही तो न खाण्यासाठी वेगळी करणे दिली असती , ex. मला आवडत नाही , पोट भरले आहे etc . बाकी काय खावे काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न , फक्त मला 'प्रसाद म्हणून खाल्ला नाही ' हे कारण काही पटले नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 12/15/2015 - 07:51 नवीन
आस्तिकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून स्वतःला त्रास न होऊ देत थोडे flexible राहायला हरकत नसावी.
अस्तिकांनाच फक्त भावना असतात का ? नास्तिकांना असू नये का ? आणि दुसर्‍यांवर एखाद्या गोष्टीचा दबाव आणण्यात कसल्या आल्यात भावना ? अस्तिक लोक जेव्हा कर्मकांड करत असतात तेव्हा मी माझ्या 'नास्तिक /निरिश्वरवादाच्या भावना दुखावल्या जात आहेत" म्हणून कांगावा करत नाही, तेव्हा मी सदर प्रसाद खाऊ ई नाकारले तर अस्तिकांनी बोंब मारण्यात अर्थ नाही. अर्थात मला फारसा अनुभव आलेला नाही मी फक्त लेखकाच्या बाजूने लिहिले आहे, त्यांच्या भावना समजण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तिश: मला मंदिरात दिला जाणारा प्रसाद बनवताना कितपत स्वच्छता पाळली जाते याबद्दल शंका असते म्हणून मी तो नाकारतो. तर कधी हात अगदी स्वच्छ नसतात (फिरत असल्याने धूळ वगैरे लागलेली असू शकते) व चमचाभर प्रसाद खाण्याकरिता नळ शोधायचा कंटाळा येतो. मात्र कुणाच्या घरी सत्यनारायण , वास्तू पूजा ई साठी गेल्यास (सदर व्यक्तिच्या आनंदात सहभागी होण्याकरिता मी कधी जातो) मी पुजेला नमस्कार करत नाही मात्र प्रसादाचा शिरा घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
स
सप्तरंगी Tue, 12/15/2015 - 16:28 नवीन
भावना नक्कीच सगळ्यांनाच असतात , पण प्रसादाबद्दलच्या भावना आस्तिकांनाच असतात, नास्तिकांना नाही. नास्तिकांना प्रसादाबद्दल , देवाबद्दल त्या नसतात म्हणूनच कदाचित ते त्याचा पदार्थ म्हणून स्वीकार करू शकतात. अर्थात तुमचे स्वच्छता वगैरे बद्दल चे विचार बरोबरच आहेत ते त्या वेळेस लागू पडत असतील तर आणि तेच निकष सगळ्याच (धाब्यावरच्या हि ) पदार्थांना लावत असाल तर ! खुपदा आपण गोष्टींना brain पेक्षा भावनेने तोलत राहतो, भावना बाजूला ठेवुन विचार केला तर दुसर्यांना समजून घेणे जर सोपे होते. आस्तिक माणसाला देव या संकल्पनेबद्दल असा ब्रेन ने विचार करणे जर अवघड असते त्यामुळे त्यांच्या भावना न दुखावता मत मांडले तर कदाचित नाही पटले तरी ओपिनिअन दिफ्फेर्स असा विचार करत जगणे सोपे होऊ शकते… by the way इथे कोणताच आस्तिक नास्तिकाच्या नावाने बोंब मारत नाहीये हो, उगीच मुद्दा सोडून काहीही बोलू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Wed, 12/16/2015 - 11:56 नवीन
पण प्रसादाबद्दलच्या भावना आस्तिकांनाच असतात
मान्य, पण नास्तिकांनी प्रसाद न घेतल्याने अस्तिकांच्या भावना दुखावल्या जातात हे अमान्य. अस्तिकांनी खावा मनसोक्त प्रसाद नास्तिक अडवत नाहियेत. पण उगाच दुसर्‍याला आग्रह करण्यात काय अर्थ आहे. आणि मनाविरुद्ध काही करायला लागणे वा मनात असूनही करायला न मिळणे (कुणी तरी मनाई केल्याने) या दोन्ही गोष्टींनी भावना दुखावल्या जावू शकतात त्याअर्थी नास्तिकास मनाविरुद्ध प्रसाद खावा लागल्यास त्याच्या भावना दुखावल्या जावू शकतात याचे भान अस्तिकांनी ठेवावे हीच अपेक्षा. थोडक्यात काय तर अस्तिक त्याच्या धर्मभावना / श्रध्दा संभाळ्ताना नास्तिकाबद्दल "ठीक आहे , त्यालाही त्याची नास्तिकता संभाळू देत" असे म्हटले तर काही बिघडणार आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
प
प्रभाकर पेठकर Tue, 12/15/2015 - 21:57 नवीन
>>>>व्यक्तिश: मला मंदिरात दिला जाणारा प्रसाद बनवताना कितपत स्वच्छता पाळली जाते याबद्दल शंका असते म्हणून मी तो नाकारतो. एकदा एका एस्टी प्रवासात एक ८० वर्षाची गरीब म्हातारी काठी टेकत टेकत एस्टीत चढली. एकाहातात काठी आणि दुसर्‍या, मुठ वळलेल्या, हाताने एक बोचकं कमरेवर सांभाळलं होतं. दुपारची वेळ. म्हातारी कुठून चालत आली होती माहित नाही. मी दरवाजाजवळ शेवटच्या बाकावर बसलो होतो. मी शेजारच्याला विनंती करून जरा सरकून घेतले आणि त्या आजींना माझ्या शेजारी बसायला जागा दिली. बसल्यावर आजींनी मला भरपूर आशिर्वाद दिले, खुप लांबून आले बाबा वगैरे सांगितले. पंढरपूरला गेली होती हेही समजले. मग आजींनी त्यांच्या हातात (कधी पासून गच्च धरून ठेवलेला) धरून ठेवलेला प्रसाद मला दिला. तो एक घास काळा पडलेला शिरा होता. त्याच्या दर्शनानेच मला मळमळले. आजींना वाईट वाटू नये म्हणून मी घेऊन ठेवला. खाल्ला नाही. पण आजी मागेच पडल्या, ' अरे! खा. देवाचा प्रसाद आहे.' मी तो काळा पडलेला शिरा तोंडात टाकून गिळून टाकला. चावण्याचे, चव पाहण्याचे धाडस झाले नाही. पांडूरंगाला दोन हात जोडले आणि मनोमन विनंती केली की कांही विपरीत घडू नये. तेंव्हा मी २०-२२ वर्षांचा होतो आणि देवावर बर्‍यापैकी विश्वास ठेवणारा होतो. मी प्रसाद खालेल्ला पाहिल्यावर आजीबाईंना बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
अ
असंका Wed, 12/16/2015 - 06:40 नवीन
मग जे झालं ते चांगलं झालं की वाईट? मी तर अजुनही एकझॅक्टली तेच करीन जे आपण त्या वयात केलं असं म्हणताय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Wed, 12/16/2015 - 09:34 नवीन
चांगले की वाईट पेक्षा अस्वच्छ प्रसाद/शिरा खाणे चुकीचे आहे. आता मी काळा पडलेला प्रसाद/शिरा खाणार नाही. त्या आजीबाईंना तसे सांगेन की प्रसाद/शिरा अस्वच्छ झाला आहे. चांगला असेल तर मी खाईन. निदान आजी बाई पुढच्यावेळी योग्य ती काळजी घेतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Fri, 12/18/2015 - 19:12 नवीन
आपले म्हणणे योग्य आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
S
sagarpdy Tue, 12/15/2015 - 07:54 नवीन
आपण पाहतोय ते हे नास्तीकत्त्व साधारणतः पहिल्या पिढीतील आहे. म्हणजेच स्वतःच्या तार्किक दृष्टीकोनातून आलेले नास्तीकत्त्व, पालकांनी शिकवलेले नास्तीकत्त्व नाही. त्यामुळे "प्रसाद का घेऊ नये?" वगैरे तत्त्वज्ञान चालू आहे. तिथेच आस्तीकत्त्व हे पालकांकडून आलेले, त्यामुळे तशी विचारसरणी हि तर्काने नाही तर संस्काराने मिळालेली. अशा परिस्थितीत
नास्तिक माणसाच्याही भावना असू शकतात हे अस्तिक लोक समजून घेत नाहीत आणि प्रसादाचा उगाच आग्रह करतात हे मला पटत नाही.
हा तार्किक विचार सर्वसाधारण आस्तिक करणार नाही. आणि स्वतःला बुद्धिवादी नास्तिक म्हणवणाऱ्याने हा विचार केला पाहिजे, असे माझे मत. एका फिरंगी नास्तीकाकडून मिळालेले उदाहरण :
या नास्तिक माणसाला प्रश्न विचारला होता कि "तुम्ही तुमच्या मुलाला संता क्लोज बद्दल काय सांगाल?", तेव्हा त्याचे उत्तर होते, मी माझ्या मुलाला सांगतो कि " 'संता क्लोज' वगैरे काही नसतं, पण तुझे मित्र समजतात कि तो खरा आहे, आणि तो येउन त्यांना भेटवस्तू वगैरे देतो याचा त्यांना आनंद होतो. त्यामुळे जरी तुला माहित असल कि संता क्लोज खरा नाहीये, तरी तुझ्या मित्रांना बरं वाटण्यासाठी म्हणून तू त्यांच्यासमोर 'तो खरा आहे' असेच म्हण."
हि विचाराची संयतता हि आपले नास्तीकत्त्व "मिरवण्यापेक्षा" अधिक महत्त्वाची! आपण जी नास्तिकांच्या भावना दुखावण्याची गोष्ट करताहात हि नास्तिकांच्या ३-४ व्या पिढीसाठी ठीक आहे (पण येथे नास्तीकात्त्वापेक्षा "नि"धर्म अस्तित्त्वात येतो). बाकी स्पा, पेठकर काकांशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 12/15/2015 - 10:11 नवीन
हि विचाराची संयतता हि आपले नास्तीकत्त्व "मिरवण्यापेक्षा" अधिक महत्त्वाची!
वर्षभर वेगवेगळे उत्सव , त्यातून होणारा गोंगाट, त्यातून होणारे ट्रॅफिक जॅम ई बिचारा नास्तिक मुकाटपणे सहन करतच असतो अस्तिक लोक वर्षभर त्यांची अस्तिकता मिरवतच असतात ना ? मग प्रसाद न घेणे , मुर्तीला नमस्कार न करणे किंवा देवळात प्रवेशच न करणे असे स्वतःच्या मनाप्रमणे वागणे म्हणजे जर मिरवणे होत असेल तर का मिरवू नये बरे नास्तिकांनी ?केवळ संख्येने कमी आहोत म्हणून ? म्हणजे अस्तिकांच्या झुंडशाहीला शरण जा असेच ना ? नास्तिकांनी स्वतःच्य मनाप्रमाणे न जगता इतरांच्या भावना दुखवू नयेत याची काळजी का करत बसाव ? आणि वर कुणीतरी म्हणत आहेत की बॉसचं ऐकता मग आपल्याच माणसाच का नाही वगैरे... अहो बॉसचं कामापुरतं ऐकतो...काय त्याच्या घरी पाणी भरायला जात नाही. संस्थेचे नियम असतात अधिकाराची उतरंड असते ती मान्य करावीच लागते ? नाहीतर संस्था चालणार कशी ? पण अस्तिक माणसांना बॉस समजावे आणि त्यांचे ऐकावे असं म्हणायचं आहे का आपल्याला ? व्यक्तिश : मी पत्नीला एकदा शिर्डीच्या साईमंदिरात घेवून गेलो होतो, तिने एकटीने रांगेत उभे राहणे योग्य वाटले नाही म्हणून रांगेत दीड दोन तास उभाही राहिलो. मात्र दर्शनाच्या वेळी नमस्कार न करता बाहेर आलो. अर्थात पत्नीनेही मी नमस्कार करावा असा आग्रह धरला नाही. पूढे नवीन फ्लॅटवर रहायला गेल्यावर एक पूजा ठेवावी असे पत्नीला फार वाटत होते. मी पूजेचे सामान आणयला बरोबर गेलो. मी सोबत बसल्याशिवाय पूजा पुर्ण होणार नाही असे ती मानत असल्याने मी पूजेला सोबत बसलो , भटजींनी सांगितलेल्या विधीत पण भाग घेतला. कारण एरव्ही मला पत्नी कोणत्याच कर्मकांडाकरिता आग्रह करीत नाही. मग यावेळी तिच्या भावनांचा मान राखणे मला गरजेचे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
स
सप्तरंगी गुरुवार, 12/17/2015 - 15:18 नवीन
हि विचाराची संयतता हि आपले नास्तीकत्त्व "मिरवण्यापेक्षा" अधिक महत्त्वाची! ***** स ह म त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
प
प्रचेतस Mon, 12/14/2015 - 19:20 नवीन
काही आस्तिकांच्या भावना उगाचच जोरदारपणे दुखावल्या गेल्या असे काही प्रतिसाद वाचून कळते.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 12/14/2015 - 19:54 नवीन
मला वाटते अतिरेक वाईट, मग तो अती आस्तीकतेचा असो वा नास्तीकतेचा. देवाची पुजा न केल्याने किंवा देवाच्या पाया न पडल्याने वा प्रसाद न खाल्ल्याने काही घडणार नाही. पण सहजासहजी विशेष श्रम न पडता चांगल्या तुपातला लाडू ॲज ऐ प्रसाद खायला मिळत असेल अन् त्यामुळे कुणाला आनंद वाटत असेल तर खायला काय हरकत आहे? ट्रस्ट मी आस्तीकतेतच जास्त फायदा आहे ! ;-)
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 12/15/2015 - 03:31 नवीन
ह्यात दुसरा एक प्रकार ही असू शकतो. कदाचित टूरमधल्या कोणी एकाने यनावालांची टाईमपास म्हणुन फिरकी ही घेतली असू शकते. एखादा टोकाची मते असलेला पकडायचा व त्याला मुद्दामुन उकसवायचे. कॉलेज सहलीमध्ये असे प्रकार पाहीले आहेत व कधी कधी अश्या प्रसंगाचा हिस्साही होतो. अर्थात हा प्रकार जेवढ्यास तेवढ्यापुरता असाच असतो. इथेही गाडी सुरु झाल्यानंतर मंडळी पुन्हा उत्साही झाली व मागचे सार विसरुन ही गेली असे लिहिले आहे म्हणुन ही शंका आली. (कदाचित फक्त त्या बाईंनी यनावालांची मते गांभिर्याने घेतली असावीत.)
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 12/15/2015 - 04:49 नवीन
वर दिलेले प्रतिसाद वाचले. चर्चा चांगल्या मार्गाने चालली आहे. मी स्वतः नास्तिक आहे पण माझी आई व् बायको बऱ्यापैकी आस्तिक आहेत. आता यामुळे संघर्ष होणारच. अगदी पहिला वाद इथून फुटतो. मी घरातील कचरा बाहेर टाकायला मनाई करतो. त्यावर प्रक्रिया करुन कम्पोस्ट बनवून मी तो घरातील कुंडयात वापरतो. आईचे व् बायकोचे म्हणणे असे की तो मी तो मी तुळशीची कुण्डी सोडून इतरत्र वापरावे. यावरुन वाद होतात.त्यामुळे मला ती कुंडी टाळावी लागते. तसेच मासे धुवून टाकलेले पाणी देखिल त्यात टाकू शकत नाही. यात पाण्याची बचत होतेच वर झाडाना ख़त देखिल मीळते. आता मी जर माझा हेका धरून बसलो तर पर्यावरण रक्षण होईल पण माझ्या घरात गृहकलह पण नक्की होईल. हेच बाहेर गेल्यावर देखिल होईल. त्यामुळे नास्तिकानी आपल्या भावना दुसऱ्याला दुखावेल अशा व्यक्त करु नये. हां माझा व्यक्तिगत सल्ला आहे. प्रवचन नाही. जर माझ्या नमस्कार करण्याने माझी नाती जपली जात असतील तर काय हरकत आहे? तसेच माझ्या आयुष्यात ज्यानी मला घडवले असे फ्रान्सिस डिमेलो सर व् पगार मैडम(आर.एम्.भट्ट.हायस्कूल, परळ)हे जर मला रस्त्याने जाताना भेटले तर त्यांना वाकुन नमस्कार करण्यात मला काहीच कमिपणा वाटणार नाही.तिथे मी १०१% आस्तिक आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 12/15/2015 - 08:19 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
च
चौकटराजा Wed, 12/16/2015 - 10:33 नवीन
प्लस १११ ! मय यईच करता हय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
स
संदीप डांगे Tue, 12/15/2015 - 07:46 नवीन
लाडू खाल्ला नाही म्हणून भडकले कि नाही बघा लोक...? प्रसाद टाळला की कोप होतो ह्याचा अण्भव आला की नाही सर?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 12/15/2015 - 09:06 नवीन
आपण बहुतेक लोक ( आस्तिक किंवा नास्तिक) संधिसाधू असतो. किती नास्तिक लोक बॉसने तिरुपतीचा प्रसाद दिला तर मी यावर विश्वास ठेवत नाही म्हणून नाकारण्याचे धाडस दाखवतील फार तर १० %. अशावेळी "मौनं सर्वार्थ साधनं" सारखा श्लोक आठवतील. जर वरिष्ठ लोकांच्या पाया पडण्याने त्याचे समाधान होणार असेल तर त्यांच्या पाया पडल्याने काय नुकसान आहे असा फायदेशीर विचार मी करतो/ केला. याचा मोठा फायदा मला बर्याच वेळेस दिसला. लग्नानंतर ज्या कुठल्या घरी मी गेलो तेथील वरिष्ठ लोकांच्या पाया पडल्यावर बहुसंख्य लोकांच्या तोंडून "बघा दोघे डॉक्टर असून किती नम्र आहेत" हे उद्गार ऐकायला मिळाले. ( जसे काही डॉक्टर असलो कि उद्धट असलेले चालते). जर देखल्या देवाला नमस्कार केला तर नुकसान काय असा साधा विचार मी करतो. श्रद्धा आहे कि नाही हे मला स्वतःलाच माहित नाही. बर्याच वेळेस आपण नक्कीच श्रद्धा नाही अशा ठिकाणी सुद्धा जातो (कधी कधी नमस्कारही करतो). उदा गोव्याचे चर्च किंवा फतेहपुर सिक्री तेथील दर्गा. त्यामुळे आपले काय नुकसान होते? मंदिरात गेल्याने ज्याला समाधान होते त्याने जावे. हवं तर नमस्कार करावा. नाही तर मूर्तीतील ( आणी आजूबाजूचं) सौंदर्य पाहावं. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे." यना वाला साहेबांच्या या एकाच वाक्यात द्वंद्व आहे एकीकडे ते म्हणतात माणसांच्या भावना दुखवू नये आणी लगेच म्हणतात तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे. मी त्यांच्यावर टीकाही करीत नाही कारण मला स्वतःलाच मी कोण आहे ते समजलेले नाही. याच बरोबर मी आजतागायत तिरुपती शिर्डी च काय मुंबईत जन्म काढून अजूनही सिद्धिविनायकाला गेलो नाही. पण परवाच देव दिवाळीला आमच्या जवळच्या देवळात दिव्यांची आरास केली होती सर्व विजेचे दिवे बंद करून ठेवलेले होते. ते दृश्य इतके मनोहारी होते कि तेथे पाच मिनिटे बसल्याशिवाय माझे मन बाहेर येण्यास तयार नव्हते. देवळात शिरून देवाला नमस्कार करून तेथे पाच मिनिटे बसल्याने जी मानसिक शांती मिळते( हे तुमच्या संस्कारांचे परिणाम असे मान्य केले तरीही) त्यांची किंमत कशी करणार? म्हणून यनावाला यांच्याशी मी अंशतः सहमत आहे तरीहि पूर्ण सहमत होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 12/15/2015 - 10:13 नवीन
रोचक चर्चा आहे... =))
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 12/15/2015 - 10:36 नवीन
इथे खुप लोक यनावालांच्या आजवरच्या लिखाणाला विचारात घेऊन लिहीत आहेत. म्हणुन कदाचित "नास्तिक स्वतःला शहाणे समजतात" वगैरे प्रतिक्रिया येत असाव्यात, जर व्यक्तिसापेक्ष चर्चा करायची नसेल आणि केवळ आस्तिक - नास्तिक हाच मुद्दा असेल तर माझी विचारप्रक्रिया मांडायला मला आवडेल. मी एक सर्वसाधारण कुटुंबातली व्यक्ति आहे. माझे आई-वडील हे अगदी धार्मिक म्हणावेत असे नसले तरी सश्रद्ध. वडीलांचे वडील पुजा सांगणारे भट, म्हणुन कर्मठ. अगदी शिवाशिव पाळणारे. तर आईचे वडील नास्तिक. माझे आई वडील ह्यांच्या कुठे तरी अध्येमध्ये.. वडीलांचा खरं तर श्राद्ध पक्ष ह्यावर विश्वास नाही. पण आई-भावांचे मन राखायचे आणि कुणाला दुखवायचे नाही म्हणुन सर्व काही करतात. आईने माहेरी कधीच गौरी-गणपती, पुजा-अर्चा केलेल्या नाहीत. पण तरीही ती हौसेने करते कारण तिच्यामते त्यानिमित्ताने गोडधोड होते, लोक घरात येतात. नेहमीपेक्षा वेगळा दिवस जातो. मी इतक्या विचारांमधुन नेमकी नास्तिकताच कशी निवडली ते मलाही नीटसं माहिती नाही. पण मी कधीच देवावर विश्वास ठेवुच शकले नाही हे नक्की. तुमचा देवाला विरोध नसुन, कर्मकांडाला आहे असंही अनेकांनी मला सांगितलेले आहे. पण मुळात माझा देव ह्या संकल्पनेवरच विश्वास नाहीये. ह्या अफाट, अथांग सॄष्टीवर नियंत्रण ठेवणारे कुणी एक आहे...त्याचे/तिचे माझ्याकडे लक्ष आहे. माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना त्या एकाच्या मर्जीने घडत आहे. माझ्या कर्माचा हिशोब कुणी ठेवत आहे इ. कोणत्याही कल्पनेवर माझा विश्वास नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने येणार्‍या पाप-पुण्य, पुजा, उपास-तापास, नवस, अभिषेक (थोडक्यात.. कर्मकांड!) ह्यावरही माझा विश्वास नाहीच. साधारणतः आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटना ह्या आपल्याच निर्णयांचे परिणाम असतात. अर्थात २+२=४ इतकंही ते सोप्पं नाही. पण प्रत्येक गोष्ट घडण्याची एक प्रोबॅबिलिटी असतेच. सापशिडी खेळताना १,२,३,४,५ किंवा ६ पैकी एकच काहीतरी पडणार असतं. पण तो एक आकडा येण्याची प्रत्येक आकड्याची शक्यता असतेच. त्यातला एक कोणता तरी पडतो. ह्याला नशीब म्हणावे असा प्रकार सगळी कडे दिसतो. २-३ दा सलग तोच आकडा आला तर तो योगायोग..! पण त्याची सुद्धा प्रोबॅबिलिटी होतीच की! मला प्रत्येक घटनेमागे कार्यकारण भाव असला पाहिजे असं वाटतं. अनेकदा तो शोधण्याचा मी प्रयत्न करते, अनेक गोष्टी मला समजत नाहीत. पण माझ्या इवल्याशा मेंदुला ह्या अफाट सॄष्टीतलं सगळं कळायलाच हवं असा काही माझा आग्रह नसतो. माणसाला फार थोडं कळालय.. अजुन खुप काही बाकी आहे. And it is okay! पण मला जे समजत नाही ते तातडीने "दैवी" होत नाही. काहींना त्या गोष्टी चमत्कार वाटतात. मला त्या फक्त अनाकलनीय वाटतात. गुढ दोन्ही कडे आहे, पण चमत्कार म्हणलं की विचार बंद होतो.. माणुस त्या घटनेला शरण जातो. दैवी म्हणतो. नास्तिक मनुष्य म्हणुन मी फक्त तेवढं करत नाही. अनेकदा नवस बोलुन लोकांची कामं होतात, मग त्यांना "प्रचिती" आली असं ते म्हणतात. मला किती लोकांनी नवस बोलला आणि किती लोकांची कामं झाली असे प्रश्न पडतात. मला प्रत्येक गोष्टीत प्रश्न पडतात. आंधळेपणानी मी काहीच करु शकत नाही. माझ्या बुद्धीला पटायला हवं इतकंच. जेव्हा आस्तिक "मनाला शांत वाटतं".."प्रचिती आली".. "कुणाला का दुखवायचं"..."देवाची माझ्यावर कृपा असावी"... अशा कोणत्याही कारणाने देव ही संकल्पना मानतात तेव्हा ते नक्की बुद्धिवादी असतात का? निश्चित नसतात. पण ह्याचा अर्थ ते निर्बुद्ध असतात असाही नसतो.. प्रत्येकाची आपल्या आजुबाजुच्या घटनांचीस संगती लावायची आणि त्यातुन निष्कर्ष काढण्याची आपली एक पद्धत असते. त्यांना जो मार्ग सर्वात योग्य वाटतो, तो ते अवलंबतात. माझ्या वडीलांच्या आई-वडीलांनी हे मान्य केलं होतं की देव असतोच. आपण करतोय त्या सत्यनारायण पुजेचा नक्की अर्थ काय वगैरे फंदात ते कधीच पडले नाहीत. त्यांना पाप-पुण्य, मोक्ष कल्पना मान्य होत्या. ते कर्मठही होतेच. आणि त्यात त्यांचा आनंद होता. माझ्या आई वडीलांना देव आहेच, आणि तो आपलं नशीब ठरवणार असलं काही वाटत नाही.. पण त्यांनी आहे त्याला फारसा विरोध न करता आनंदात रहाण्याचा मार्ग शोधला. त्यामुळे विश्वास नसतानाही सर्वकाही एका मर्यादेत करुन त्यांनी आनंद मिळवला. माझे आजोबा जे नास्तिक होते, त्यांनी आयुष्यभर देवधर्म काही पाळला नाही. कॅन्सरच्या यातनाही त्यांना आस्तिकतेकडे वळवु शकल्या नाहीत. आपण आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहिलो ह्यात त्यांचा आनंद होता. शेवटी प्रत्येकजण आनंदच तर शोधत असतो.. आणि तो शोधण्याचा प्रत्येकाला अधिकार असावा. नास्तिकाने आस्तिकाला अमुक तमुक करुच नकोस म्हणुन आग्रह करु नये... आणि आस्तिकानेही आमच्या भावनांसाठी तरी अमुक तमुक करच असा आग्रह करु नये. नाही एखाद्याने नमस्कार केला.. प्रसाद घेतला तर त्याचाही मान राखायला हवा. राहता राहिला प्रश्न की बॉस समोर तुम्ही ही "मिजास" दाखवाल का? हा प्रत्येकाच स्वभाव झाला. मी दाखवते. काहींना बॉसची इतकी भीती असते की ते बॉस जे जे म्हणेल ते ते सर्व काही खालीमान घालुन ऐकतात. ह्यात आस्तिकता- नास्तिकता कुठुन आली? बॉस नास्तिक असेल तर त्याला घाबरणारा आस्तिक मनुष्य बॉसच्या सोयीप्रमाणे स्टॅण्ड घेऊच शकतो. डबल स्टॅण्डर्ड सगळेच दाखवतात. केवळ नास्तिक नाही. लाडु प्रसाद म्हणुन न खाता, एक पदार्थ म्हणुन खायला काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही, मी तर खाते. पण ह्या प्रसंगात यनावालांकडे आलेला माणुस पावतीपुस्तक घेऊन आला होता. मी सुद्धा लाडु नसता घेतला अशावेळी. असे पावती फाडुन लाडु देणारे किंवा रस्त्यावर देवीची परडी फिरवुन कुंकू लावुन पैसे मागणारे ह्यात फरक तो काय? अशा प्रकारचे सर्वच लोक मी सुद्धा टाळते. पण कुणी प्रसाद वाटत असेल तर तो ही खाते.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 12/15/2015 - 11:10 नवीन
पण मला जे समजत नाही ते तातडीने "दैवी" होत नाही
मस्तच ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रकाश घाटपांडे Tue, 12/15/2015 - 11:11 नवीन
+१ तारतम्य कसे असते याचे हा प्रतिसाद म्हणजे उदाहरण. मला तर वाटते की अस्तिक नास्तिक अज्ञेयवादी असणे या मनाच्या अवस्था आहेत. मेंदुतील जैवरासायनिक प्रक्रियांचा तो रिझल्टंट आहे. समाजधुरीणांनी समाजाच्या पुढे किती असावे? इतके असू नये की तुम्ही गेलात पुढे निघून व समाज राहिला मागे! समाजसुधारणेचा सरासरी वेग हा समाजाला अंतर कापून पुढे सरकता येईल इतकाच असावा.काळाच्या रेट्याने समाज बदलतो आहेच. फक्त त्याच्या बदलाचा वेग हा तुमच्या अपेक्षेपेक्शा कमी आहे.प्रबोधन हे आक्रमकतेने करता येत नाही. डॉ नरेंद्र दाभोलकरांना याची चांगली जाण होती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
संदीप डांगे Tue, 12/15/2015 - 11:20 नवीन
सहमत. मानवी बुद्धी व आकलनाला मर्यादा आहेत हे स्वच्छ सिद्ध असतांनाही काही लोक स्वतःला बुद्धीवादी का म्हणवून घेतात हा एक प्रश्न सतत पडत आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
न
नाखु Tue, 12/15/2015 - 11:31 नवीन
सर्वात वाचनीय आणि वाखू साठवण्याचे प्रतिसाद फक्त हे (डांगे यांच्या वरील)दोन आहेत . धन्यवाद.घाटपांडे सर आणि त्यांना उद्युक्त करणार्या "रणरागीणी" यांना... प्रतिसाद मात्र आणि भविष्यात फक्त वाचनमात्र मिपाकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पिलीयन रायडर Tue, 12/15/2015 - 11:39 नवीन
डांगे.. बुद्धिला मर्यादा आहेतच. पण आपल्या तोकड्या का होईना, आकलनातुन माणसाला जे ज्ञान होते ते वापरायला बंदी थोडीचे? भले एखाद्याला विश्वाचे आर्त वगैरे काही कळत नसेल, पण किमान तर्कसुसंगत काय हे तरी समजु शकतेच ना. जितपत समजते तितपत मते बनवावीत, जिथे आकलनाच्या पलीकडे गोष्टी घडतात तेव्हा त्या सोडुन देता येतात. शरणच जायला हवं असं काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 12/15/2015 - 11:52 नवीन
बुद्धिला मर्यादा आहेतच >>> हेच बर्‍याच बुद्धीवाद्यांना स्विकारणे अवघड जाते असा अनुभव आहे. बाकी तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहोतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पैसा Tue, 12/15/2015 - 16:17 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सप्तरंगी Tue, 12/15/2015 - 16:50 नवीन
खूप छान लिहिले आहे, तुमची बुद्धिवादी बद्दल चे वाक्य सोडले तर बाकी सगळे पटले. कारण मला जे आज वाटते , पटते आहे ते बुद्धिवादी असे कसे ठरवणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
य
यनावाला Tue, 12/15/2015 - 17:20 नवीन
@पिलीयन रायडर ... पिलीयन रायडर यांनी हा विस्तृत प्रतिसाद फार छान लिहिला आहे. तो उत्स्फूर्तपणे अभिव्यक्त झाला आहे असेही जाणवते. त्या लिहितात,
मी कधीच देवावर विश्वास ठेवु शकले नाही.... तुमचा देवाला विरोध नसुन, कर्मकांडाला आहे असंही अनेकांनी मला सांगितलेले आहे. पण मुळात माझा देव ह्या संकल्पनेवरच विश्वास नाहीये. ह्या अफाट, अथांग सॄष्टीवर नियंत्रण ठेवणारे कुणी एक आहे...त्याचे/तिचे माझ्याकडे लक्ष आहे. माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना त्या एकाच्या मर्जीने घडत आहे. माझ्या कर्माचा हिशोब कुणी ठेवत आहे इ. कोणत्याही कल्पनेवर माझा विश्वास नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने येणार्‍या पाप-पुण्य, पुजा, उपास-तापास, नवस, अभिषेक (थोडक्यात.. कर्मकांड!) ह्यावरही माझा विश्वास नाहीच.
वाहवा! भले भले! साधु ! साधु ! ब्राहो ! हियर ! हियर !! ....अगदी सुस्पष्ट आणि ठाम बुद्धिवादी विचार. पिलीयन यांचे हे लेखन प्रसंसनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ट
ट्रेड मार्क Tue, 12/15/2015 - 21:25 नवीन
पिरातैंनी एवढा मोठ्ठा प्रतिसाद लिहिला पण यनावालांनी फक्त प्रतिसादातला त्यांना आवडला तेवढा भाग घेतला आणि उत्तर दिलं. तसेही ते फक्त त्यांना सोयीस्कर असेल त्याच प्रतिसादांना उत्तरे देतात. याचा अर्थ असा आहे का की त्यांना चर्चा करायची नाहीये. एकूण प्रकार असा दिसतोय की एक तर माझं मत माना नाहीतर मग तुम्ही निर्बुद्ध घोषित झालेले आहातच. महाशय, जर का स्वतःला एवढे बुद्धिवादी म्हणवता तर मग बाकी प्रतिसादांना पण उत्तर द्या की, निदान तार्किक प्रश्नांना तरी उत्तर द्या. समाज प्रबोधन करायचं तर चर्चेनी होईल. फक्त मी सांगतो तेच बरोबर असं म्हणत राहिलात, इतरांना मूर्ख ठरवत राहिलात तर तुम्हाला विरोधच जास्त होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा