Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

य
यनावाला
Sat, 12/12/2015 - 16:38
🗣 421 प्रतिसाद
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता. प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले, " तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?" " मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. " "कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?" " हो. कुठल्याच देवाला नाही." थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला. " मग मंदिरात कसे आला ?" " तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो." " तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?" "नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो. "नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?" मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे. "नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो." " देवाला नाही आणि माणसांना का बरे?" "कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे." "तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला. "जशी तुमची इच्छा" मी म्हणालो. थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच. तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती. "आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला. बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या, "तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?" " ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल." " आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला. "ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. " "आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले. "खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते." " ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला. " त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?" " सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. " " ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?" " अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या. " चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो. " आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या. " आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे." "पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्‍यांना ऐकू आले असावे. "तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही." " पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला. " ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. " "गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले. " ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा." गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे. .................................................................................
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
107591 वाचन

💬 प्रतिसाद (421)
व
विजुभाऊ Mon, 12/14/2015 - 09:56 नवीन
प्रसाद म्हणुन कशाला, लाडु म्हणुन खा. दुसर्‍यांच्या भावना का दुखवायच्या... वगैरे वगैरे.
अगदी योग्य बोललात पिरा. तो प्रसाद जर मांसाहारी असेल आणि एखाद्या कट्टर शाकाहारी आस्तिकाने तो नाकारला तर ? त्यावेळे " माम्साहार म्हणून कशाला, प्रसाद म्हणून खा. दुसर्‍यांच्या भावना का दुखवायच्या...." हा युक्तीवाद लागू केला तर चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 10:00 नवीन
अहो हे यनावाला स्वता चालत देवळात गेले आणि मग लाडु नको म्हणाले. आधी मुद्दाम जायचे आणि मग लोकांना त्रास द्यायचा, ही कुठली रीत? वेगळी नास्तिकांची टुर करुन जायचे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पिलीयन रायडर Mon, 12/14/2015 - 10:07 नवीन
लोकांना त्रास दिला की लोकांनी तो करुन घेतला? लोकांना उपद्रव होईल असं वागणं तर नव्हतंच त्यांचं. ह्यात आस्तिक लोकच कंपु करुन नास्तिकाला त्रास देत आहेत. तुम्हाला खायचा तर खा ना, प्रसादच काय, अमृत समजुन खा. ज्याला नाही खायचा त्याला तो काहितरी समजुन का होईना खा.. असा आग्रह कशाला? नास्तिकांची टुर कशी असते बुवा..? तसं डिक्लेअर केलं असतं की नास्तिक लोक क्षमस्व तर नसतेच गेले ना यनावाला. हा प्रतिसाद उपरोधाने लिहीलेला असावा अशी फार इच्छा आहे.. अन्यथा फारच मजेशीर प्रतिसाद आहे तुमचा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 10:35 नवीन
ह्यात आस्तिक लोकच कंपु करुन नास्तिकाला त्रास देत आहेत.
हा लेख च लिहीला नसता तर कोण कशाला बोलायला आले असते?
नास्तिकांची टुर कशी असते बुवा..?
आता नसते तर मी काय करणार? यनावालांनी पुढाकार घेउन काढावी टुर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 12/14/2015 - 11:05 नवीन
अहो लेखाबद्दल नाही बोलत आहे हो मी. टुर बद्दल बोलतेय. तिथे अस्तिक लोकांनी मिळुन यनावालांना लाडु का नाही खाल्ला? नमस्कार का नाही केला? अशा विचारणा केल्या. शिवाय "ह्यांना घ्यायलाच नको होतं" इथं पर्यंत बोलले. अणि कुठलीही टुर अस्तिक नास्तिक निष्कर्षावर कशामुळे असावी बरं? यनावालांनी कुठे तक्रार केली आहे की देवळात का नेली म्हणुन टुर? लोकांना प्रॉब्लेम आहे ना इथे त्यांच्या नास्तिकतेशी.. मग त्यांनी काढावी ओन्ली आस्तिक टुर.. हा काय मुद्दाय का? नास्तिकांची टुर... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
इ
इरसाल Mon, 12/14/2015 - 11:40 नवीन
काय टुर टुर लावलीय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सतिश गावडे Mon, 12/14/2015 - 18:46 नवीन
जर हा प्रतिसाद गांभिर्याने दिला असेल तर या धाग्यावरील सर्वात विनोदी प्रतिसाद ठरावा. आपण कसे "वेगळे नास्तिक" आहोत हे दाखवण्याच्या नादात खुपच भरकटला आहात तुम्ही असे दिसते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 10:44 नवीन
पिरा - तुम्ही जी वर उदाहरणे दिली आहेत ती -आस्तिक नास्तिक वादातुन आली नसुन. टीपीकल भारतीय संस्कृती ची उदाहरणे आहेत ज्या स्त्रीयांना मोकळीक द्यायची नाही, सासूचे किंवा घरातल्या मोठ्यांचे ऐकलेच पाहीजे किंवा सासरी आलीय ना मग आमच्या मताप्रमाणे वागायचे असल्या वृत्तीतुन आली आहे. त्याचा संबंध आस्तिक - नास्तिक शी नसावा, कदाचित सासर नास्तिक असेल आणि सुन आस्तिक असेल तर ह्याच्या उलट अनुभव येतील ( आमच्यात नसते सवाष्ण , हळदीकुंकु वगैरे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 12/14/2015 - 11:07 नवीन
बरोबर आहे. हा ही मुद्दा आहेच. पण मी म्हणतेय तसा कुणाच्या भावना दुखावायला नको म्हणुन नास्तिक लोकांनाही अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. तेव्हा त्याच्यांही भावना दुखावल्या जातात पण त्या धार्मिक भावनां एवढ्या धारदार नसल्याने लक्षात येत नाहीत. ज्याला जे जे योग्य वाटेल ते ते करु द्यावे. जिथे आपणामुळे लोकांना उपद्रव नसेल तिथे इतरांनाही हरकत घेण्याचे काय कारण? असा तो सोप्पा मुद्दा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 11:34 नवीन
पुरुष जर नास्तिक असेल आणि त्यात सुद्धा उच्च विद्याविभुषित, तर त्याला आस्तिक सासराकडुन असा काही उपद्रव होत नाही. अगदी स्वताच्या घरातही काही उपद्रव होत नाही. उलट झालेच तर त्याच्या नास्तिकतेचे कौतुक होते. बाई च्या बाबतीत ह्याच्या बरोबर उलटे होते. त्यामुळे सरसकट नास्तिक लोकांना मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागत नाहीत, पण नास्तिक "बाई" ला कराव्या लागतात असे मला म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 12/14/2015 - 11:40 नवीन
हो.. आणि मला पटलय ते.. खरंच आहे तसं.. पण आता ते मी माझे उदाहरण म्हणुन दिले आहे. तरीही.. नास्तिकांवर अशी वेळ ह्या न त्या कारणाने येतच असते. नास्तिक स्त्री असणे हे थोडं जास्त कठीण आहे भारतीय समाजात.. पण पुरुषांनाही अनेकदा असं बळंबळं नमस्कार कर आणि लाडु खा प्रकार करावे लागत असतीलच ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 11:59 नवीन
नमस्कार कर आणि लाडु खा
पिरा - आपल्या कोणाचे मन राखण्यासाठी केला नमस्कार तर काय त्रास होतो हो. इथे ऑफिस मधे कीती मनाविरुद्ध करावे लागते, ते गपगुमान करतोच ना. मधुमेही माणसाला सुद्धा छोटासा बर्फीचा/पेढ्याचा तुकडा घे कधी निमीत्तानी म्हणुन आग्रह करतोच ना. तोही घेतो. त्रास करुन घेण्यापेक्षा आनंदा नी घ्यावे ते आणि सीमारेखा आखावीच, त्या पलीकडे काही करु नये. पण अगदी मने दुखावतील इतकी छोटी सीमारेखा पण नसावी. रसेल चे हे कोट लक्षात ठेवावे. "I would never die for my beliefs because I might be wrong."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 12/14/2015 - 12:11 नवीन
अहो तोच माझा मुद्दा आहे.. नमस्कार कर आणि लाडु खा पर्यंत रहात असतं तर ठिके. ते तसं होत नाही ना पण. सगळ्यात ओढले जातातच शेवटी. शिवाय जसं खाल्ल्याने काही फरक पडत नाही तसा न खाल्ल्यानेही पडत नाहीच ना. एकेकाला वाटतं आपल्या मतांवरच ठाम रहावं म्हणुन. त्यांनी जर कुणाला अपशब्द वापरले नाहीत किंवा लोक लाडु खाताना "किती हा मुर्खपणा" अशी काही भाषणं ठोकली नाहीत. मग कुणाला का इतका फरक पडावा? इन जनरलच, "कुणाचं नुकसान होत नाही ना? मग काय हरकत करायला?" पासुन ते "उगाच कशाला विषाची परीक्षा पहायची? करुन टाकायचं" इथंवर सगळ्या कारणांनी माणुस लहान सहान कर्मकांडाला शरणच जात असतो. मुद्दा हा केवळ एका नमस्कारापुरता नाहीये. मुद्दा एक विचारधारा सार्वजनिकरित्या मांडण्याचा आहे. ह्या लेखाचे शेवटचे वाक्य तेच आहे ना, की कुणी तरी बुद्धिवादाची कास धरेल. केल्याने काय फरक पडतो ह्याच कॅटेगिरीमध्ये मग मी जी वर सगळी उदाहरणे दिली आहेत ती बसतातच. गौरी- गणपती / नवरात्र, केल्याने काय वाईट होतं? तुळजापुरला गेल्याने काय वाईट होतं? काय फरक पडतो? ट्रिप म्हणुन जा की हवंतर.. मुद्दा हा ह्या सगळ्यालाच "नाही" म्हणण्याचा आहे. आणि मुद्दा "नाही" म्हणु देण्याचाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 12:15 नवीन
कुणी तरी बुद्धिवादाची कास धरेल
पिरा - इथेच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. सर्व लेख आणि क्षमा करा पण तुमचा पण रोख नास्तिक पणा म्हणजेच बुद्धीवाद असा थेट आहे. ह्याचाच कॉन्व्हर्स आस्तिकता म्हणजे बुद्धी नसणे असा होतो. तुम्ही किंवा मी, आपल्या विचारांनी नास्तिक असु पण म्हणुन आपल्याला कोणाला निर्बुद्ध ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. यनावाला आपल्या लेखातुन सातत्यानी आस्तिक लोकांना निर्बुद्ध ठरवत असतात हे आक्षेपार्ह आहे. ते अगदी थेट निर्बुद्ध म्हणत नाहीत पण असली वाक्य टाकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ट
ट्रेड मार्क Mon, 12/14/2015 - 15:56 नवीन
बुद्धिवाद म्हणजेच नास्तिक असणं असं आहे का? मग या प्रतिसादाप्रमाणे जगात फक्त ३% लोक बुद्धी असणारे आहेत!!! पिरा - तुम्ही पण देव आणि कर्मकांड यात गल्लत करता आहात. मी देव मानतो पण म्हणून मी चतुर्थीला गणपतीचा देवळात किंवा त्या त्या वाराप्रमाणे त्या देवळात जात नाही. इतकेच कशाला मी अजून एकदाही शिर्डी, तिरुपती ई ई मोठ्या देवस्थानात गेलो नाहीये. मी एखाद्या देवाचा उपास करत नाही. फक्त घरात देव आहेत त्यांच्या समोर हात जोडतो, सर्व अडचणींमधून मार्ग काढायला मदत, मग ती मानसिक असो किंवा एखादा योग्य माणूस भेटणे, अचानक एखाद्या घटनेने सगळं बदलून जाणे असो, केल्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्याकडे सत्यनारायण वगैरे करत नाहीत, गणपती बसवत नाहीत. आम्ही गणपतीच्या दिवसात उगाच बाहेर देखावे बघायला आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत धक्के खायला जात नाही. कुठे थांबायचं हे आपण ठरवू शकतो. उगाच आधीच श्रीमंत असलेल्या देवस्थानांच्या दान पेट्या अजून भरण्यात काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा मी अनाथाश्रमात मदत देतो. एखादा खरंच अडचणीत असेल तर जमेल तेवढी मदत करतो. कोणाचं माझ्याकडून काही वाईट होणार नाही याची काळजी घेतो. उगाच येता जाता कोणाला मूर्ख आणि निर्बुद्ध म्हणत नाही. गरज नाहीये कि तुम्ही कर्मकांड केली पाहिजेत. नशिबानी आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि आपल्या मर्जीप्रमाणे देव मानणे न मानणे, पूजा कर्मकांडे करणे न करणे या वर फार कठोर नियम नाहीयेत आणि शिक्षा पण नाहीये. यनावाला तर या धाग्यात आईच्या संस्कारांवर पण भाष्य करतात. नेहमीच असं दिसतं की नास्तिक लोक स्वतःला सगळ्यांपेक्षा मोठे समजतात. मी तर देवाला मानत नाही मग माझ काय कोण वाकडं करणार आहे ही भावना दिसते. जसे तुम्ही नास्तिक किंवा टोकाचे नास्तिक आहात आहात तसे बाकीचे आस्तिक आणि काही टोकाचे आस्तिक असू शकतात हे मान्य करत नाहीत. मग ते समस्त आस्तिक लोकांना मूर्ख आणि बुद्धी नसलेले समजतात आणि तसं उघडपणे सांगतात सुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
अ
अभ्या.. Mon, 12/14/2015 - 16:43 नवीन
प्रतिसाद पटला.
देव आहेत त्यांच्या समोर हात जोडतो, सर्व अडचणींमधून मार्ग काढायला मदत, मग ती मानसिक असो किंवा एखादा योग्य माणूस भेटणे, अचानक एखाद्या घटनेने सगळं बदलून जाणे असो, केल्याबद्दल धन्यवाद देतो.
हे करतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
स्पा Mon, 12/14/2015 - 17:27 नवीन
ज्या प्रमाणे अतिनिर्बुद्ध आस्तिक असतात तसेच यनां सारखे अतिनिर्बुद्ध नास्तिक असतातच , त्यामुळेच असली वादावादी होते . पण सुदैवाने माझ्या आसपास फक्त अशा दोन टोकाचीच माणसे नाहीत . देवाला न मानता माणुसकी हा एकच धर्म मानणारे मित्र आहेत तसेच माणुसकी जपत, आपली सर्व कर्तव्य पार पाडत,मनात देवाला जपणारे सुद्धा आहेत,, आम्ही सर्व एकत्र आनंदात असतो, आणि असली वांझोटी चर्चा करण्यात आमचा वेळ वाया घालवत नाही बाकी चालू द्या शुभेच्छा आहेतच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
म
मांत्रिक Mon, 12/14/2015 - 17:32 नवीन
ज्जे बात!!!! क्लासच!!! आमची आस्तिकता हीच आहे. माणुसकीचे नियम पाळून इतर कुणाला त्रास होऊ न देता मी माझी श्रद्धा पालन करतो. मी स्वतः कधीच देवळात जाऊन नमस्कार करत नाही. पण नामजप कायम करतो. नेमकं हेच यनावालांना समजेना. उगंच तेच तेच बेचव दळण चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/14/2015 - 20:47 नवीन
@ज्या प्रमाणे अतिनिर्बुद्ध आस्तिक असतात तसेच यनां सारखे अतिनिर्बुद्ध नास्तिक असतातच :- Image removed. सात्त्विक संतापाने चिडलेला पांडू× शांत याssना..,वाला! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रचेतस Tue, 12/15/2015 - 02:35 नवीन
पांडूचं जाऊ द्या. तुमचं बोला. एक पुरोहित ह्या नात्याने तुम्ही आस्तिक आहात का एक धर्मसुधारक ह्या नात्याने तुम्ही नास्तिक आहात का ही नुसतीच अगलतगल आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
नाखु Tue, 12/15/2015 - 04:36 नवीन
काय आहेत याचा बहुअंगाने आणि बहुढंगाने शोध चालू आहे (त्यांचा स्वतःचाही) !!!! सध्या स्पां+धन्या धाग्यावर आल्याचा ते आनंद घेत आहेत.तो घेऊ द्या !!! अखिल मिपा भाव विश्व चाहता संघ व या चिमण्यांनो परत फिरा रे (त्यांना आणा रे) मित्र परिवार संघाच्या पत्रकातून साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 12/15/2015 - 10:33 नवीन
@पांडूचं जाऊ द्या. :- ते माझं मी बघीन.. :-/ तू त्यात सोंड नको टाकू ... हत्ती! Llllllluuuu @तुमचं बोला :- हे घ्या! ह्या नंतरही तुम्ही स्वमनोरंजकनिरर्थकआत्मकुंथन करणार आहातच..! ;) हे मला आधीच माहीत असल्यामुळे तुमच्या त्या आगामी कुंथनास शुभेच्छा देऊन ..मी थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विजुभाऊ Tue, 12/15/2015 - 09:34 नवीन
पिरा - आपल्या कोणाचे मन राखण्यासाठी केला नमस्कार तर काय त्रास होतो हो.
कोणाचे मन राखण्यासाठी तुम्ही गोमांसाचा अगदी छोटास्सा तुकडा खाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 12:07 नवीन
पण पुरुषांनाही अनेकदा असं बळंबळं नमस्कार कर आणि लाडु खा प्रकार करावे लागत असतीलच ना.
हेच तत्वनिष्ठ पुरुष, रस्त्यावर कोणी गावगुंडानी ह्यांची गाडी ठोकली तरी त्या गावगुंडाच्याच शिव्या आणि मार खातात. तिथे सर्व तत्व वगैरे गुंडाळुन ठेवतात, पण आपल्या माणसांसमोर मोठा आव येतो तत्व्निष्ठेचा. हलके घ्या, पण खरे आहे ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अभ्या.. Mon, 12/14/2015 - 12:11 नवीन
एकूण काय प्रसादराव. चिमीत्काराशिवाय नमस्कार नाही. हेच ना? देवाला गरज असेल तर दाखवेल चमत्कार नाहीतर आहेतच फुकट लाडू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
पिलीयन रायडर Mon, 12/14/2015 - 12:15 नवीन
मुद्दा भरकटतोय किनई...?!! तुमच्यात गावगुंडाना उलट परत शिव्या घालण्याचा किंवा बदडण्याचा दम नाही म्हणुन तुम्ही तुमची सगळीच तत्व गुंडाळुन लोकांची मन राखत फिरा.. असं काहीसं वाटतय का ते!!! असोच.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 12:17 नवीन
तुमच्यात गावगुंडाना उलट परत शिव्या घालण्याचा किंवा बदडण्याचा दम नाही म्हणुन तुम्ही तुमची सगळीच तत्व गुंडाळुन लोकांची मन राखत फिरा.. असं काहीसं वाटतय का ते!!!
असली कसली हो तत्वनिष्ठा :-) जिथे मऊ लागेल तिथे खणायचे असे च झाले ना हे. ऑफिसात बॉस धु म्हणला की धुतिल पण घरी बायको म्हणली देवाला नमस्कार कर तर लगेच तत्वनिष्ठ होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 12/14/2015 - 12:30 नवीन
परत तेच.. जौ द्या. हा मुद्दाच मला मान्य नाही तर काय चर्चा कारायची ह्यावर.. तुम्ही नास्तिक असुन हाण्ताय ना लाडु.. हाणा मग!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
स
स्मिता. Tue, 12/15/2015 - 05:27 नवीन
पिरा, तुझा हा प्रतिसाद खूप आवडला. अगदी शब्दन् शब्द माझ्या मनातला लिहिला आहेस. मला वाटतं या 'भावना जपणार्‍या' नास्तिकांत स्त्रियांचं प्रमाण जास्त असावं. कारणाचा उल्लेख करत बसले तर आस्तिक-नास्तिक वादाला स्त्री-पुरुष वादाचा फाटा फुटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
य
यनावाला Mon, 12/14/2015 - 09:29 नवीन
....@ जातवेद श्री.जातवेद म्हणतात,"
'देव मानत नाही मग देवाचा लाडू कसा प्रसाद म्हणून घेता' असे ऐकावे लागू नये म्हणून कदाचित तुम्ही तो प्रसाद नाकारला असे वाटत आहे."
...या प्रसादाच्या लाडवाविषयी अनेक वाचकांचा चुकीचा समज झाला आहे असे दिसते. दर्शनाला आलेल्या प्रत्येकासाठी हा प्रसाद नव्हता. देवस्थानाला देणगी देणार्‍यांसाठी होता. (देणगीची किमान रक्कम मला ठाऊक नाही.) मी देणगी दिली नव्हती तरी माझ्यासाठी लाडू आणला होता. यावरू हेतू समजतो.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 12/16/2015 - 10:49 नवीन
अहो कदाचित, खाऊदे फुकटचा लाडू. प्रसाद खाल्यावर काहीतरी फरक पडेल बुद्धीत म्हणूनही दिला असेल लाडू पाठवून पैसे न देताही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
अ
अजया Mon, 12/14/2015 - 09:30 नवीन
पिरे,प्रतिसादातल्या विचारांशी सहमत !
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 12/14/2015 - 09:38 नवीन
यनावालांच्या मतांबद्दल मी काही बोलू इच्छीत नाही, पण त्यांच्या आधीच्या काही लेखांच्या तुलनेत या धाग्यावर मात्र अत्यंत संयत आणि कित्येक तर पाठिंबा दर्शवणार्‍या प्रतिक्रिया आल्या आहेत, हे अत्यंत स्वागतार्ह आहे. धागा उघडताना, मला तर काय रणधुमाळी वाचायला मिळेल अशीच भीती वाटत होती. ती फोल ठरली. :)
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 12/14/2015 - 09:44 नवीन
मलाही अगदी अस्सेच वाटले. पिरांच्या उपप्रतिसादात तर 'साय्लेंट मेजॉरिटी का काय ती जागी झालेली दिसतेय' असे वाक्य घातलेही होते. नंतर खोडून टाकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विजुभाऊ Mon, 12/14/2015 - 09:53 नवीन
नास्तीक आपली नास्तीकता दुसर्‍यांवर लादत नाहीत. मात्र आस्तिक त्यांची आस्तिकता नेहमीच सर्वांवर लादायचा आग्रह धरतात. यनावालांने बस मधील कोणालाही तुम्ही देवदर्शन करू नका हा आग्रह धरला नव्हता. मात्र बसमधील आस्तिकानी यनावालानी प्रसाद घ्यावा असा असा आग्रह धरला/ सुचवले/ भय घातले ज्यावेळेस आस्तिक हा आग्रह सोडतील त्यावेळेस त्यांची आस्तिकतही सम्पलेली असेल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 10:04 नवीन
नास्तीक आपली नास्तीकता दुसर्‍यांवर लादत नाहीत. मात्र आस्तिक त्यांची आस्तिकता नेहमीच सर्वांवर लादायचा आग्रह धरतात.
ह्याच्या बरोबर उलटा अनुभव आहे. मिपावरच बघा. यनावाला आस्तिकता म्हणजे कसे बुद्धी नसल्याचे लक्षण आहे हे सारखे सांगत असतात. यनावालांसारखे कुठेही गेले तरी आपले वेगळे पण दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतात. मिपावर कधी कोणी आस्तिकाने नास्तिकांच्या मूर्खपणा बद्दल लेख लिहीलेला दाखवुन द्या. एकीकडे धर्म ही वैयक्तीक बाब आहे असे म्हणायचे, हे जर खरे असेल तर नि-धर्म ही सुद्धा वैयक्तीक बाब आहे. ती घरातच ठेऊन यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पिलीयन रायडर Mon, 12/14/2015 - 10:20 नवीन
यनावाला बाकीच्या लेखांमध्ये काय म्हणतात ते ठाऊक नाही, मी वाचलेले नाहीत त्यांचे लेख. पण मुळात
यनावालांसारखे कुठेही गेले तरी आपले वेगळे पण दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतात.
ह्या वाक्यातुन जनरली लोक नास्तिकाकडे कसे पहात असतील हे समजते. एखाद्या गोष्टीला विरोध करणे म्हणजे वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणे कसे काय होते? म्हणजे एकाअर्थी नास्तिक लोक केवळ गर्दीमध्ये उठुन दिसण्यासाठीच (पब्लिसिटी स्टंट?) हा विरोध करण्याचा प्रकार करतात असे आपल्याला म्हणायचे आहे का? कारण मग तुम्ही चक्क तुमच्या विरोधातल्या विचाराला मान्यच करायला नकार देत आहात. आणि त्या विरोधाला एक वैचारिक अधिष्ठानही असु शकते हे विसरत आहात. नास्तिक लोकांवर आस्तिक लोक लेख लिहीत नाहीत त्याला आम्ही काय करणार? लिहावेत लेख.. अजुन काय बोलणार. निधर्म (?) घरीच ठेवलेला असतो. इथे यनावला लोकांना देवाच्या पाय पडु नकात म्हणुन आग्रह करत नाही आहेत.. लोक त्यांना स्वतःच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणुन अमुक समजुन तमुक करा असला आग्रह करत आहेत. इथे नक्की कोण कुणाच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळा ढवळ करत आहे सांगा बरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/14/2015 - 10:28 नवीन
@
निधर्म (?) घरीच ठेवलेला असतो. इथे यनावला लोकांना देवाच्या पाय पडु नकात म्हणुन आग्रह करत नाही आहेत.. लोक त्यांना स्वतःच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणुन अमुक समजुन तमुक करा असला आग्रह करत आहेत. इथे नक्की कोण कुणाच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळा ढवळ करत आहे सांगा बरे..
:--- +++१११ ज्जे ब्बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 10:51 नवीन
पिराताई - मी नास्तिक च आहे. पण मला कोणाच्याच धार्मिकते बद्दल काही कॉमेंट कराविशी वाटत नाही. मला मी जास्त अक्कल असलेला वाटत नाही. त्यामुळे मला कोणी मुढतेच्या अंधारात आडकले आहे असे पण वाटत नाही. मला जॅझ, रॉक वगैरे संगीत कळत नाही त्यामुळे आवडत नाही, पण आपली सिनेमातली गाणी , शास्त्रीय संगीत आवडते. कोणाला ह्याच्या बरोबर उलटे वाटत असेल. पण मी रॉक च्या मैफिलीत जाऊन चेहरा वेडावाकडा करणार नाही आणि आमचे शास्त्रीयसंगीत कसे तुमच्या रॉक पेक्षा भारी आहे असले तत्वज्ञान पण तिथल्या रॉक च्या चाहत्यांना ऐकवणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 12/14/2015 - 11:13 नवीन
मला नाही कुठे कुणी धार्मिक कमेंट केलेली दिसली हो.. मी परत वाचला लेख तेवढ्या करता.. कुणाची अक्कल काढली आहे असेही वाटले नाही. तुमचे यनावालांशी काही आधीचे देणे घेणे असेल तर मला माहित नाही. पण हा पहिलाच लेख वाचला असल्याने माझ्या मनात तरी काही पुर्वग्रह नाहीत. तेव्हा तुम्ही फक्त ह्या लेखापुरते बोलाल का? ते तेवढं नास्तिक लोक वेगळेपणा दाखवयचा प्रयत्न करत असतात आणि ते धर्म-निधर्म ही वैयक्तिक बाब आहे वरती जे मी लिहीलय.. त्यावरही बोलाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
स
स्वप्नांची राणी Mon, 12/14/2015 - 12:26 नवीन
पिरा...अतिशय छान प्रतिसाद!! ईतकं तंतोतंत लिहायला जमलच नसतं!! मलही यनावाला आस्तिकांची अक्कल काढतायेत असे कधी त्यांच्या लेखांवरुन वाटले नाही. अर्थात प्रतिसादात त्यांची वाक्ये सोयिस्कररीत्या उचलून असा कांगावा मात्र केलेला पाहीलाय. मिपावर खरं तर नास्तिक विचारसरणीचे मोजकेच लेख येतात. तंत्रशक्ती, मंत्रशक्ती, श्लोक ई.ई. विषयांवरचे बरेच लेख येत असतात त्यामानाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
न
नाखु Mon, 12/14/2015 - 10:09 नवीन
एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. यासाठी चौराकाकांशी बाडीस, यात वरील प्रतिसादातील कुळधर्म कुळाचार्,चालीरीती+प्रथा हे शब्द घालंण्याची चौराकाकांनी परवानगी द्यावी.. डांगे सर या धाग्यावर दिसेनात ते. प्रगोही दिसत नाही.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 12/14/2015 - 10:25 नवीन
'मला भीती वाटते' हे सांगण्याची अतिशय जटील व अतार्किक पद्धत म्हणजे धर्म.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 12/14/2015 - 10:57 नवीन
बहुधा इथे कोणीच येणार नाही. कारण मागच्या धाग्यांवर सगळे दमलेत. बाकी मी मागच्या धाग्यात माझ्या काही अनुभवांचे स्पष्टीकरण मागितले होतहास्याखिल्ली उडवण्याखेरीज माझ्या हाताला काही लागले नाही, त्यामुळे मी देखील इथे चर्चा करून काही साध्य होणारे नाही या निष्कर्षापर्यंत आलेला आहे. आणि म्हणूनच माझी भूमिका मी इथे स्पष्ट केली आहे. तस्मात आपला पास.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 12/14/2015 - 13:14 नवीन
तुमचे अनुभव वाचले. त्यातून तुमचा नक्की कोणावर विश्वास बसला ते तुम्ही सांगितलेच नाही. मंत्र म्हटल्यावर म्हशीचे किडे गेले हे मान्य केलं तरी मंत्रावर विश्वास बसला म्हणजे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसला व का बसला ते तुम्हाला सांगता येईल का? १. मंत्र म्हणजे किड्यांना समजणारी भाषा. ती भाषा त्या माणसाला येत होती आणि त्यातून त्याने किड्यांना निघून जायची विनंती/आज्ञा केली. २. सगळ्या प्राण्यांना नियंत्रित करणारी शक्ती आहे व मंत्र म्हणजे सगळ्या प्राणिमात्रांना नियंत्रित करणार्‍या शक्तीला समजणारी भाषा. त्या भाषेत त्याने किड्यांना निघून जायला सांगायची त्या शक्तीला विनंती/आज्ञा केली. ३. मंत्र म्हणजे फक्त किड्यांना त्रास होईल अशा फ्रिक्वेन्सीच्या आवाजात केलेली बडबड. त्या त्रासाने किडे निघून जातात. ४. ते किडे त्या माणसाचे पाळीव किडे होते. म्हशींना त्रास देऊन त्यांच्या मालकांकडून पैसे उकळण्याचा त्यांचा भागीदारीत धंदा होता. ५. तो प्राणघातक आजार नव्हता आणि म्हशीच्या प्रतिकारक शक्तीने तोवर आधीच्या औषधांच्या मदतीने युद्ध जिंकत आणले होते व त्याने मंत्र म्हणायला व किडे निघून जायला बोलाफुलाची गाठ पडली. यातल्या एका किंवा इतर कुठल्या शक्यतेवर का विश्वास बसला ते सांगितले की मग बाकीच्या अनुभवांबद्दल बोलू. नुसताच माझा विश्वास आहे असं गोलम्गोल नको. नक्की कशावर विश्वास आहे हे तरी माहित असले पाहिजे स्वतःला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Mon, 12/14/2015 - 14:08 नवीन
तो प्राणघातक आजार नव्हता आणि म्हशीच्या प्रतिकारक शक्तीने तोवर आधीच्या औषधांच्या मदतीने युद्ध जिंकत आणले होते व त्याने मंत्र म्हणायला व किडे निघून जायला बोलाफुलाची गाठ पडली.
यातली हीच एक शक्यता त्यातल्ता त्यात संयुक्तिक आहे, पण तीदेखील प्रॅक्टिकल नाही, कारण गावाकडे कोणालाही जाऊन विचारल्यास तुम्हाला हा आजार किती प्राणघातक आहे हे समजेल. आम्ही नाईलाज म्हणून, आणि प्रत्येक वेळी मांत्रिकाचे पाय धरायलानकोत म्हणून शेवटी अश्या जखमांमध्ये पेट्रोल टाकायला सुरुवात केली. त्या म्हशींना खूप त्रास होतो, पण नाईलाज आहे. तरीही शेवटी त्या बैलासाठी मांत्रिक बोलवावाच लागला. कारण त्याला वृषणावर हा आजार झाला होता आणि तिथे हात देखील लावणे अशक्य होते. त्याने नेमके काय केले हे मला माहीत नाही. पण एक मंत्र म्हणणे, कोणत्यातरी पाळाचा एक तुकडा बैलाच्या डोक्यावर ठेवणे या गोष्टींनी जखमेतील किडे जातील यावर माझा अजूनदेखील विश्वास बसत नाही. त्यामुळे मी संयुक्तिक उत्तराच्या शोधात आहे. तीच गोष्ट नागाची. नागाच्या तोंडातला मणी वगैरे समजा काही काळासाठी विसरून जाऊया, पण मंत्राने सर्प जातीतील दोन प्राणी बोलावणे, आणि त्यांनी तिथे येणे, याचा नेमका अर्थ काय हे देखील मला पडलेले कोडे आहे. याव्यतिरिक्त देखील काही अनुभव आहेत,पण ते व्यक्तिगत पातळीवर असल्यामुळे त्यांची चिकित्सा होऊ शकत नाही. त्यामुळे इथे मांडत नाही. त्यामुळे मी सध्या दोलायमान अवस्थेत आहे. एका बाजूला उत्क्रांतीची शास्त्रशुद्ध स्पष्टीकरणे मिळत आहेत, तर दुसर्‍या बाजूला असे पॅरानॉर्मल अनुभव, ज्यांची सत्यता वादातीत आहे. या दोन गोष्टी एकत्र कश्या आणायच्या याचा विचार करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
आ
आनन्दा Mon, 12/14/2015 - 14:13 नवीन
बाकी माझे असे मत आहे की आपल्याला सध्या ज्ञात असलेल्या जगाच्या पलिकडेदेखील काहीतरी आहे, ज्यातला काहीतरी भाग अपघाताने किंवा अन्य काही कारणाने मानवाला ज्ञात झाला आहे. ज्याला आस्तिक देव म्हणतात, आणि नास्तिक अंधश्रद्धा म्हणतात. त्याचे अस्तित्व असणे कोणालाच सिद्ध करता येत नाही, पण अस्तित्व नसणे हे देखील सिद्ध करता येत नाही. हे नेमके काय आहे याचे उत्तर पुढच्या काही शतकांमध्ये मिळेलच, पण तोवर आपण साप साप म्हणून भुई धोपटू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ट
ट्रेड मार्क Mon, 12/14/2015 - 22:42 नवीन
बाकी माझे असे मत आहे की आपल्याला सध्या ज्ञात असलेल्या जगाच्या पलिकडेदेखील काहीतरी आहे, ज्यातला काहीतरी भाग अपघाताने किंवा अन्य काही कारणाने मानवाला ज्ञात झाला आहे.
पूर्णपणे सहमत. या तथाकथित बुद्धिवाद्यांचा हाच तर प्रॉब्लेम असतो. त्यांच्या दृष्टीने विज्ञानाने सिद्ध होतं तेच फक्त खरं. पण म्हणजे नक्की काय? जे आपल्याला आत्ता ज्ञात आहे, ज्याचे स्पष्टीकरण आपण देवू शकतो ते. बरं ते पण आत्ताच्या आपल्या ज्ञानाप्रमाणे आहे ना? मग आत्ता आहे तेच ज्ञान सर्वसंपन्न आहे असा दावा आहे का? या पुढे काही नवीन शोध लागणार नाहीत? समजा उद्या शोध लागला कि देव म्हणजे नक्की कोण? आधीच्या धाग्यांमध्ये यानावालांनी लिहिलेली निरुपयोगी मंत्रशक्ती कशी उपयोगी ठरू शकते हे सिद्ध झालं तर हे लोक मान्य करणार का नाही? जर का करणार असतील तर मग कशाला एवढा त्रास करून घ्यायचा? विश्वाच्या एवढ्या मोठ्या पसाऱ्यात मानवजात म्हणजे किती छोटी आणि त्यात आपण एक मानव म्हणजे तर एका बिंदू एवढे पण नाही. मग कसला आणि कशाला माज करायचा? आत्ताच्या जगात सुद्धा स्पर्श करता येतील अश्या कितीतरी गोष्टी आपल्या समोर आहेत उदा इजिप्तचे पिरामिड, माचू पिचू, देरीन्कुयू, इस्टर आयलंड, स्टोनहेंग ई ई अनेक आश्चर्ये कोणी आणि कशी बांधली याचे स्पष्टीकरण देत येत नाहीये. मग त्याबद्दल आपण काय म्हणाल? वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे सर्व अनुभवांवर आधारीत असतं . कदाचित यानावालांना अजून अनुभव यायचा असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
न
नगरीनिरंजन Tue, 12/15/2015 - 01:22 नवीन
ते सगळं ठीके हो. एक वैश्विक शक्ती असेल यावर विश्वास असणे वेगळे आणि ती शक्ती माझ्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे असे मानणे वेगळे. विश्व केवढे आपण केवढे हा विचार तेव्हा शिवत नाही मनाला. त्याही पुढे जाऊन शंकर, विष्णु, गणपती वगैरे शक्तींचे नामकरण करणे, मग शंकराला अमुकच हवे तमुक चालत नाही; गणपतीला अमुकच रंगाची फुले आवडतात वगैरे यांना कोण येऊन सांगतं? त्याहीपुढे जाऊन मग माणसांचे वर्गीकरण करुन भेदभाव वगैरे सुरु होतो. आक्षेप घेण्यासारखे खूप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Tue, 12/15/2015 - 17:05 नवीन
मी परत परत विचारतोय धागालेखकांना की त्यांना देव/ वैश्विक शक्ती या संकल्पनेत अडचण आहे का कर्मकांडांना विरोध आहे. पण ते उत्तर न देता फक्त आस्तिक निर्बुद्ध असतात हेच सांगत बसतात. माझा देव/ वैश्विक शक्ती या वर विश्वास आहे पण कर्मकांडांना विरोध आहे. ही कर्मकांडे मधल्या काळात भटजी वगैरे लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बनवली आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. मी काही रोज देवळात जात नाही, रोज पूजा करत नाही, पण घरात देवाला नमस्कार मात्र जरूर करतो. एखादा देवाचा फोटो अथवा मूर्ती हे फक्त त्या निराकार शक्तीला आपण आपल्या अल्पमतीप्रमाणे दिलेलं रूप आहे. पण म्हणून मला असं वाटत नाही मी रोज एखाद्या मूर्तीसमोर मंत्र म्हणले तर ती मूर्ती जिवंत होऊन माझ्या समस्यांचं निराकरण करेल. माणसाचे वर्गीकरण, भेदभाव ई ई गोष्टी मानव निर्मित आहेत, त्याला आक्षेप असावाच. पण त्या देवाच्या नावाखाली होतात म्हणून देव बदनाम पण करणारी माणसे नाही? बरं आता एखादा करत असेल त्याच्या घरात रोज पूजा अर्चा, तर त्यात कोणाला आक्षेप असायचा काय कारण आहे? सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली जो धिंगाणा चालतो त्याला विरोध करा पण म्हणून श्रद्धाच नको हा अट्टाहास का आणि कशासाठी? जी ठिकठीकाणी मंदिरे उगवली आहेत त्याला अर्थ नाही. पण जी खरच पुरातन मंदिरे आहेत ती मात्र वेगळी आहेत. कदाचित स्थान महात्म्य असावे जसे की असे म्हणतात शंकराचे मंदिर ज्या ठिकाणी असते तिथे जास्त प्रमाणात चुंबकीय आकर्षण असते. ते अर्थात पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आहे पण ही पुरातन मंदिरे अश्या ठिकाणी बांधली आहेत आणि काही काळ अश्या ठिकाणी गेल्यावर मानवाला काही मानसिक फायदा होत असावा. पण अश्या ठिकाणांचे पण जे बाजारीकरण झाले आहे ते चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा