Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

य
यनावाला
Sat, 12/12/2015 - 16:38
🗣 421 प्रतिसाद
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता. प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले, " तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?" " मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. " "कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?" " हो. कुठल्याच देवाला नाही." थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला. " मग मंदिरात कसे आला ?" " तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो." " तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?" "नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो. "नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?" मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे. "नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो." " देवाला नाही आणि माणसांना का बरे?" "कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे." "तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला. "जशी तुमची इच्छा" मी म्हणालो. थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच. तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती. "आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला. बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या, "तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?" " ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल." " आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला. "ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. " "आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले. "खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते." " ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला. " त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?" " सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. " " ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?" " अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या. " चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो. " आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या. " आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे." "पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्‍यांना ऐकू आले असावे. "तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही." " पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला. " ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. " "गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले. " ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा." गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे. .................................................................................
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
107591 वाचन

💬 प्रतिसाद (421)
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/24/2015 - 12:32 नवीन
असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो. ( अ‍ॅब्सेन्स ऑफ् इव्हिडन्स इज इव्हिडन्स ऑफ् अ‍ॅब्सेन्स) देव असल्याचा पुरावा नाही हाच देव नसल्याचा पुरावा आहे. साहेब, येथे अगोदरच बरेच लिहिल्याने अजून काही लिहू नये असे ठरवले होते. पण, तुमच्याकडून हे वाक्य अपेक्षित नसल्याने आश्चर्य / निराशा / दु:ख / इत्यादी सरमिसळ भावना वाटल्या... म्हणुनच हा प्रतिसाद लिहावा असे वाटले. यासारखे चलाख, एकांगी व दिशाभूल करणारे दुसरे वाक्य क्वचितच असेल. त्याला तुम्ही बळी पडाल असे वाटले नव्हते. ही अशास्त्रिय रणनिती साधारणपणे टोकाचे आस्तिक आणि टोकाचे नास्तिक, आपली सर्व सारासारविवेकी आयुधे संपल्यावर वापरतात. आधुनिक शास्त्राची प्रगती आधी माहित नसलेले पुरावे (एव्हिडन्स) शोधण्यावरच तर स्थापित आहे. "आज एव्हिडन्स नाही म्हणून एखादी गोष्ट आस्तित्वात नाही" असे म्हणणे म्हणजे "चला, आपले ज्ञान परिपूर्ण झाले, आता सर्व संशोधन बंद करा." असे म्हणण्याजोगे आहे. "एखाद्या गोष्टीच्या समर्थनार्थ/विरोधार्थ नविन पुरावे शोधण्याचा प्रयत्न न करता जुने (पुराणातले) दाखले शोधणे व ते आणि तितकेच ग्राह्य आहे हे म्हणणे" हे तर कट्टर आस्तिकांचे मुख्य लक्षण आहे, तुम्ही तर त्यांच्या पेटंटवरच हक्क सांगताय की ?! :) मुख्य म्हणजे, या एका वाक्याने तुम्ही सर्व अत्युच स्तराचे समजले जाणार्‍या "थिअ‍ॅरेटिकल सायन्स" ला कचर्‍यात फेकलेत की हो साहेब ! शास्त्रिय सिद्धांताना, "सिद्धांत" असे म्हणतात, कारण ते मांडले जातात तेव्हा त्यांना १००% टक्के सबळ पुराव्यांचे पाठबळ नसते. मुळात सिद्धांत / उद्द्येश / संशय आस्तित्वात असल्याशिवाय शास्त्रिय संशोधन करणे म्हणजे अंधारात दिशाहीन फिरत राहणे किंवा अंधारात दगड मारत राहणे होईल. किंबहुना, शास्त्रिय जगतात एखादा रिसर्च क्वश्चन (सिद्धांत / संशय / उद्येश / दावा) संशोधनसमितीला मान्य झाल्याशिवाय ते संशोधन सुरु करायला अथवा त्यासाठी संसाधनांची मदत मागायला परवानगी नसते. त्यामुळे, आधुनिक शास्त्रिय संशोधनाचा मुख्य हेतू अगोदर माहित नसलेले पुरावे शोधून काढून त्यांच्या बळावर आपण रिसर्च क्वश्चनमध्ये केलेला दावा बरोबर की चूक आहे हे सिद्ध करणे हाच असतो. शास्त्रिय संशोधनांत खूप वेळेस केवळ शास्त्रिय आणि / अथवा गणितिय तर्कांवर सिद्धांतांची मांडणी केलेली असते (थिअ‍ॅरेटिकल सायन्स) व नंतर प्रयोग करून पुरावे (एव्हिडन्स) जमा केले जावून तो सिद्धांत बरोबर की चूक हे ठरवले जाते. अत्युच्य स्तराच्या शास्त्रिय संशोधनांत काही वेळेस हे तर्क वेळेच्या इतके पुढे होते / असतात की त्यांना बरोबर / चूक सिद्ध करण्यासाठी लागणारी उपकरणे आस्तित्वात यायला अनेक वर्षे अथवा दशकेही लागलेली आहेत / लागतात. काही प्रसिद्ध उदाहरणे... १. आईनस्टाईनने थियरी (सिद्धांत) ऑफ रिलेटिव्हीटी मांडली (स्पेशल रिलेटिव्हीटी : १९०५ आणि जनरल रिलेटिव्हीटी १९१५-१६) तेव्हा ती केवळ तर्क व गणित यावरच मांडलेली होती; आईनस्टाईनने त्यासाठी प्रयोग केले नव्हते अथवा स्वतःचे प्रायोगिक पुरावे दिले नव्हते. ते पुरावे नंतर त्याने व इतर अनेक संशोधकांनी मिळवले. त्यातल्या काही मूळ दाव्यांशी न जुळणार्‍या काही पुराव्यांमुळे मूळ सिद्धांतात बदल करून तो अधिक विकसित केला गेला आहे. हे काम, ११० वर्षांनंतर, आजही संपलेले नाही... २. हिग्ज बोसान (गॉड पार्टीकल) थियरी १९६० च्या दशकात शस्त्रिय तर्क व गणितावर मांडली गेली. पण तो खरोखर आस्तित्वात असल्याचे प्राथमिक पुरावे जमा करण्यास आवश्यक असलेली संगणकीय प्रारूपे (मॉडेल्स) तयार करणे त्याच्या २० वर्षांनंतरच्या ३० वर्षांच्या कालावधितील (१९८० ते २०१०) प्रयत्नांनीच शक्य झाले... तरीही हाती केवळ संगणकीय प्रारूपेच आली होती... प्रत्यक्ष हिग्ज बोसान नाही ! हिग्ज बोसानचा पहिला प्रत्यक्ष पुरावा CERN (European Organization for Nuclear Research ) या स्वित्झर्लंड येथिल प्रयोगशाळेत मिळायला २०१३ साल उजाडले... आजच्या घडीला ५० पेक्षा जास्त वर्षांच्या प्रयत्नांनंतर अजूनही CERN ने मिळवलेल्या पुराव्यांची खात्री करणे व अधिक पुरावे शोधणे चालू आहेच. "आता प्रत्यक्ष पुरावे नाहीत म्हणून थियरी ऑफ रिलेटिव्हीटी चूक आहे आणि हिग्ज बोसान्स आस्तित्वात नाहीत" असे शास्त्रज्ञांनी भूतकालात म्हटले असते तर ते शास्त्रियदृष्ट्या बरोबर झाले असते का ? आणि ते बरोबर आहे असे समजून शास्त्रज्ञ चालले असते तर आजवरची शास्त्राची प्रगती झाली असती का ? अशी उदाहरणे सर्व आधुनिक शास्त्राच्या इतिहासात विखुरलेली आहेत. पण मुदा स्पष्ट होण्यासाठी ही दोन सुप्रसिद्ध (हिग्ज बोसान (गॉड पार्टीकल) संशोधन तर २०१३ साली सामान्य मेडियातही खूप गाजले होते) उदाहरणे पुरेशी ठरावीत. ==================== या मुद्द्यापासून थोडा वेगळा, पण लेखाशी संबंधीत एक विचार मनात आला, तो इथे मांडतो आहे... १. नास्तिकांनी वस्तुनिष्ठ, व्यावहारिक, वास्तववादी, धादान्तवादावर(कॉमनसेन्सवर) आधारित व तर्कसुसंगत असणे हे अत्युत्तम आहे. २. नास्तिक हे वरचे तत्व "जास्तित जास्त बोलभांडपणा याच सीमेपुरते मर्यादीत कृती करणार्‍या" आस्तिकांबरोबर शांतपणे पण आस्तिकांच्या आस्तिक भावनांची फारशी फिकीर न करता, अमलात आणतात. हे सुद्धा आपण नास्तिकाच्या विचारस्वातंत्र्याचा हक्क म्हणून योग्यच मानूया. ३. मात्र, यातले किती नास्तिक, हेच वरचे तत्व पाळून, (अ) आपल्या बॉसच्या भावनांची कदर न करता त्याच्या चूक कृतीसंबंधात, किंवा (आ) बोलभांडपणाच्या पुढच्या पायर्‍या सहज ओलांडतील अश्या लोकांच्या आस्तिक मतांबद्दल; त्यांच्या भावनेची फारशी फिकीर न करता असाच वस्तुनिष्ठ, व्यावहारिक, वास्तववादी, धादान्तवादावर(कॉमनसेन्सवर) आधारित व तर्कसुसंगत पवित्रा घेतील, याबद्दल कुतुहल आहे. ४. या दोन प्रसंगातले नास्तिकांचे पवित्रे, जर गोष्टीतील किंवा वरच्या दुसर्‍या मुद्द्यातील पवित्र्यापेक्षा वेगळे असले, तर त्याला काय म्हणावे बरे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
स
संदीप डांगे गुरुवार, 12/24/2015 - 16:25 नवीन
जबरदस्त प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गामा पैलवान Fri, 12/25/2015 - 12:41 नवीन
+ ∞ -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अजया Mon, 12/28/2015 - 08:25 नवीन
+१००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अर्धवटराव Mon, 12/28/2015 - 01:57 नवीन
नास्तिक्य आणि विवेकवाद हे समानार्थी शब्द आहेत हाच मोठा गैरसमज करुन घेतला असतो अनेकांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नगरीनिरंजन Mon, 12/28/2015 - 08:10 नवीन
एखाद्याला एड्स नाही हे कसे सिद्ध करतात हो डॉक्टर साहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/28/2015 - 08:13 नवीन
या प्रश्नाचा इथे संबंध कळला नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Mon, 12/28/2015 - 08:44 नवीन
अंगात विषाणू नाही हे सिद्ध कसे होते? माझ्या अल्पबुद्धी व अत्यल्पवाचनाप्रमाणे, रक्ताच्या नमुन्यात विशिष्ट अँटिबॉडीज असल्यास विषाणूचे अस्तित्व समजते. म्हणजे अँटीबॉडीज या एव्हीडन्स आहेत विषाणूच्या अस्तित्वाचा. या अँटीबॉडीज नसतील तर विषाणू नाही असे आपण म्हणतो. म्हणजे अ‍ॅबसेन्स ऑफ एव्हिडन्स हा एव्हिडन्स ऑफ अ‍ॅबसेन्स असे इथे गृहीत धरले जाते असे मला वाटते. खरे म्हणजे आस्तिक डॉक्टरने पेशंटला नेहमी असेच म्हटले पाहिजे की तुमच्या शरीरात एड्सचा विषाणू आहे पण तो अजून प्रगट झालेला नाही किंवा त्याने अजून कोणाला दर्शन दिलेले नाही किंवा आपले अस्तित्व दाखवून दिलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Tue, 12/29/2015 - 15:20 नवीन
न नि साहेब आपले उदाहरण जरा गंडलेले आहे. अंगात विषाणू आहेत हे समजण्याच्या अगोदर आपल्या अंगात प्रतिपिंडे(ANTI BODIES) तयार होतात. त्यामुळे खात्रीलायक रित्या "अगोदर" निदान होण्यासाठी त्या तपासणे हे जास्त सोयीचे आणी स्वस्त आहे. प्रत्यक्ष इलाज करताना त्या रुग्णाच्या शरीरात प्रत्यक्ष किती विषाणू आहेत याचा तपास करून इलाज केला जातो. केवळ वास्तव आणी थेट पुरावा हवा म्हणून रुग्णाला खर्चात पाडण्याची गरज नाही. एकदा तो HIV + झाला कि मग या खर्चिक चाचण्या कराव्या लागतात. अजून सविस्तर माहितीसाठी खालील दुवा पाहून घ्या. http://www.aidsmap.com/Viral-load/page/1327496/#item1327503 अ‍ॅबसेन्स ऑफ एव्हिडन्स हा एव्हिडन्स ऑफ अ‍ॅबसेन्स असे इथे गृहीत धरले जात नाहि. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/29/2015 - 18:04 नवीन
खरे म्हणजे आस्तिक डॉक्टरने पेशंटला नेहमी असेच म्हटले पाहिजे की तुमच्या शरीरात एड्सचा विषाणू आहे पण तो अजून प्रगट झालेला नाही किंवा त्याने अजून कोणाला दर्शन दिलेले नाही किंवा आपले अस्तित्व दाखवून दिलेले नाही. याबाबतीत शास्त्रिय सत्य असे असेल : आता केलेल्या तपासणीत (टेस्ट) तुमच्या शरिरात एड्सचा विषाणू असल्याचे पुरावे सापडले नाहीत. याचा अर्थ तुमच्या शरीरात तो विषाणू १००% नाहीच असा होऊ शकत नाही. पण, आता तुम्ही वैद्यकिय शास्त्राच्या खोलात शिरला आहात म्हणून काही महत्वाचे... सर्वात पहिले म्हणजे आधुनिक वैद्यकिय शास्त्राचा (अ‍ॅलोपॅथी) डॉक्टर आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी किंवा इतर कोणत्याही गटातला असला तरी शास्त्रिय सत्य वर लिहिले आहे तसेच असणार आहे. कारण, एड्सचा विषाणू मानवी शरीरात अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपर्यंत सुप्त (डॉर्मंट) राहू शकतो व त्याला योग्य तशी परिस्थिती निर्माण झाल्यावर रुग्णाच्या शरिरात गुप्त (केवळ प्रयोगशाळेच्या तपासण्यांत सापडण्याजोगे) किंवा उघड (रोगाची लक्षणे व / अथवा चिन्हे) फरक होतात. त्यामुळे केवळ एक निगेटिव्ह टेस्ट रिझल्ट म्हणजे शरिरात १००% व्हायरस नाही असे होत नाही. मात्र, रुग्णाला दिलेल्या व्यावहारीक महिती/सल्ल्यामध्ये थोडाबहुत फरक पडू शकतो. तो यामुळे... गंभीर आजारात आधुनिक वैद्यकिय शास्त्राच्या डॉक्टरचा सल्ला केवळ एका प्रयोगशाळेच्या चांचणीवर अवलंबून नसतो... नसावा. चांचणी अगोदर डॉक्टर रुग्णाला अनेक प्रश्न विचारतात (हिस्टरी टेकिंग), नंतर शारिरीक तपासणी करतात (फिजिकल एक्झामिनेशन) व त्यानंतर त्यांचा ताळमेळ लावून काही प्राथमिक अंदाज करतात (डिफरंशियल डायग्नोसिस). त्यानंतर त्या अंदाजाच्या यादीतील इतर सर्व पर्याय बाद करत करत एका शेवटच्या निदानापर्यंत (फायनल डायग्नोसिस) पोहोचण्यासाठी तपासण्या (प्रयोगशाळेच्या चांचण्या, एक्स रे, इ) करतात. डॉक्टरने पेशंटला दिलेला निर्णय व सल्ला, या वरच्या सर्व (हिस्टरी, फिजिकल एक्झामिनेशन व रेडीऑलॉजिक/लॅब टेस्ट्स) मिळालेले शास्त्रिय पुरावे आणि रुग्णाची मानसिक स्थिती यांचा ताळमेळ लावून दिलेला असतो. त्यामुळे, १. एड्सच्या विषाणूचा संसर्ग होईल अश्या प्रकारचा मुद्दा हिस्टरी टेकिंगमध्ये आढळल्यास, टेस्ट निगेटिव्ह असली तरी सर्वात वरचेच उत्तर असेल. त्याशिवाय, प्रतिबंधक उपायांबरोबरच अश्या व्यक्तीला ठराविक कालाने परत टेस्ट करण्याचा सल्ला दिला जाईल. २. एड्सच्या विषाणूचा संसर्ग होईल अश्या प्रकारचा मुद्दा हिस्टरी टेकिंगमध्ये आढळलेला नसूनही केवळ एखाद्या दुसर्‍या आजारात किंवा शल्यकर्माअगोदर एड्स एक्सक्ल्युड करण्यासाठी केलेली टेस्ट नकारात्मक आढळल्यास, रुग्णाला "तुम्हाला एड्स नाही" असे सांगता येईल. ३. वस्तूस्थिती जर या १ व २ मधे कोठेतरी असली तर तिच्याशी सुसंगत निदान / सल्ला द्यावा लागेल. म्हणजेच... १. एकाच रोगाच्या प्रत्येक रुग्णातही हिस्टरी, फिजिकल एक्झामिनेशन आणि टेस्ट रिझल्ट्स वेगळे असू शकतात... बहुदा असतातच; त्यामुळे प्रत्येक रुग्णाचा इलाज सर्व दृष्टींनी एकसारखाच असेल असे नाही. २. प्रत्येक रुग्णाची मानसिक ताकद वेगवेगळी असते. त्यामुळे एड्स सारखा रुग्णाचे लक्षणिय मानसिक खच्चीकरण करू शकणारे निदान, केवळ परखडपणाच्या तराजूत तोलून (मी फाडकन सत्य सांगणार, रुग्णाच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल तो होऊ दे, मला काय त्याचे, असा) सांगणे संयुक्तिक होणार नाही. कारण, चांगल्या डॉक्टरचे काम केवळ "रोगाचा इलाज" करणे नसून "रुग्णाचा (शरीर + मन) इलाज" करणे हा असतो. हे ध्यानात घेऊन डॉक्टरने त्याचे मत द्यायचे असते. हुश्श ! आता विष्लेशणाचे सार... १. आधुनिक वैद्यकिय शास्त्राच्या डॉक्टरच्या कोणत्याच कामात तो आस्तिक किंवा नास्तिक किंवा अज्ञेयवादी असण्याने काहीच फरक पडत नाही, पडू नये... फरक पडल्यास तो आधुनिक शास्त्राच्या डॉक्टर ठरणार नाही. २. वैद्यकिय टेस्ट आणि फिजिक्सची टेस्ट आणि त्यांचे विष्लेशण यामधे खूपच मूलभूत फरक आहेत. यामुळेच "मेडिकल प्रॅक्टिस इज अ‍ॅन आर्ट अँड अँड सायन्स" असे म्हणतात २. "आधुनिक वैद्यकिय शास्त्राची गुंतागुंतीची व्यावहारीक शास्त्रिय उदाहरणे" आणि "आस्तिकता / नास्तिकता / अज्ञेयवादाची भावनिक उदाहरणे" मूलतः खूपच वेगळी असल्याने त्यांची एकमेकाशीसंबंधी तुलना करणे तितकेसे योग्य होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/29/2015 - 18:06 नवीन
हेच बरेचसे अवांतर झाले असल्याने. पुढील चर्चा करायची असल्यास व्यनि अथवा खरडवहीत जास्त योग्य होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मितभाषी गुरुवार, 12/24/2015 - 17:16 नवीन
400
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 12/25/2015 - 08:45 नवीन
खूप चांगली चर्चा चालू आहे. आस्तिक आणि नास्तिक .. दोन्ही बाजूची मते अनेकांनी सुसंगतपणे मांडली आहेत ( काही अपवाद वगळता )
  • Log in or register to post comments
य
यनावाला Sun, 12/27/2015 - 17:37 नवीन
@डॉ.सुहास म्हात्रे ........... अ‍ॅबसेन्स ऑफ इव्हिडन्स इस् इव्हिडन्स ऑफ अ‍ॅब्सेन्स" असली चटकदार (witty) विधाने हेतुत:च अल्पशब्दांत लिहिलेली असतात. विज्ञानाचे काही नियमसुद्धा या पद्धतीचे असतात. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम "अ‍ॅक्शन अ‍ॅंड रीअ‍ॅक्शन आर इक्वल अ‍ॅंड अपोझिट." हे विधान परिपूर्ण नाही. न्यूटनचा नियम बलां(फोर्सेस) संबंधी आहे. "प्राचार्यांनी कडक अ‍ॅक्शन घेतली म्हणून विद्यार्थ्यांनी वर्गांवर बहिष्कार घातला. " अशा घटनांना हा नियम लागू नाही. त्या नियमाचे परिपूर्ण विधान ,"फॉर एव्हरी अ‍ॅक्टिंग फोर्स देअर इज अ‍ॅन इक्वल अ‍ॅंड अपोझिट रीअ‍ॅक्टिंग फोर्स " असे हवे. हे नियमाच्या स्पष्टीकरणात असते. इलॅस्टिसिटी संबंधी थॉमस यंग चे विधान "Tensions are proportional to extentions " हे Stress is directly proportional to strain up to elastic limit" असे आपण सुधारून घेतो. तद्वतच "अ‍ॅब्सेन्स् ऑफ एव्हिडन्स इज एव्हिडन्स ऑफ अ‍ॅब्सेन्स" या वाक्यातील पहिल्या भागाचा अर्थ "अनेक अंगांनी प्रदीर्घ काळ शोध घेऊनसुद्धा कोणताही न सापडणे." असा घेणे अपेक्षित आहे.त्यामुळे ज्या गणिती तसेच वैज्ञानिक संकल्पना संशोधकांना सुचतात त्यांच्या विषयी तयार (रेडिमेड) पुराव नसतोच. प्रयोग ,निरीक्षणे या आधारे पुरावे शोधायचे असतात हे सर्वमान्य आहे." त्यांना वरील चटपटीत विधान लागू नाहीच. देवाच्या अस्तित्वाच्यासंबंधी मात्र ते विधान लागू आहे. कारण अनेकांनी शतकांनुशतके शोध घेऊनसुद्धा देवाच्या अस्तित्वाचा पुरावा सापडलेलाच नाही. आम्ही सर्वसामान्य निरीश्वरवादी तर देव अस्तित्वात नाही असे मानून इथले सर्व व्यवहार करतो. त्यामुळे काही विषेश अडचण येते असे मुळीच नाही. तशा अडचणी सर्वांनाच (ईश्वरवाद्यांना-निरीश्वरवाद्यांना)येतात. पण देव न मानल्यामुळे विषेश अडचणी येतात असे नाही. "देव अस्तित्वात आहे." असे उद्या जर कोणी नि:संदिग्धपणे सिद्ध केले तर आम्ही देवाचे अस्तित्व आनंदाने मानणार. नवीन ज्ञान झाल्याचा आनंद असतोच.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/27/2015 - 22:02 नवीन
आम्ही सर्वसामान्य निरीश्वरवादी तर देव अस्तित्वात नाही असे मानून इथले सर्व व्यवहार करतो. त्यामुळे काही विषेश अडचण येते असे मुळीच नाही. तशा अडचणी सर्वांनाच (ईश्वरवाद्यांना-निरीश्वरवाद्यांना)येतात. पण देव न मानल्यामुळे विषेश अडचणी येतात असे नाही. * नास्तिकांला देव नसल्याने अडचण येत नाही हे तर गृहितकच आहे. * आस्तिकाला देव नाही हे मानणे मानसशास्त्रियदृष्ट्या गैरसोईचे असू शकते आणि आस्तिकांचे मनोपरिवर्तन अथवा विरोध करताना हा महत्वाचा मुद्दा असतो. तुमच्या हेतूबद्दल संशय नाही हे अगोदरच लिहीले होते. इथे माझे दोनच मुद्दे होते. ते असे : १. देव आहे की नाही हे अजून सिद्ध झालेले नाही. : मी अज्ञेयवादी असल्याचे या लेखावरच्या माझ्या अगोदरच्या प्रतिसादात खालीलप्रमणे लिहीले आहेच... प्रथम म्हणजे मी आस्तिक किंवा नास्तिक यांची कोणाचीच बाजू घेत नाही. कारण मी दोन्ही नाही तर "अज्ञेयवादी" आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे विचार ऐकण्यात मला रस असतो... कारण "देव आहे की नाही?" हा अनादी प्रश्न अजून अनुत्तरीत आहे आणि कोणाकडूनही काही ज्ञानवर्धन झाले तर ते मला हवेच आहे. मात्र एक गोष्ट नक्की की, देव म्हणजे कोणी "हिशेब ठेवून त्याप्रमाणे शासन अथवा प्रमोशन देणारी यंत्रणा किंवा लालूच दाखवून (नवस, इ) आपले काम करवून घेऊ शकतो अशी यंत्रणा" नाही. देवाच्या नावाखाली जे रुढी-प्रथांचे अवडंबर बनवले गेले आहे त्यात माझा अजिबात विश्वास नाही, ती मानवी स्वभावाचा फायदा घेऊन स्वतःचे हितसंबंध साधण्यासाठी केलेली मानवी व्यवस्था आहे असे मी मानतो. परंतू त्यामुळे इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही, किंबहुना अश्या प्रकारात नमस्कार करून प्रसाद खाण्यास व त्या माणसाचे समाधान वाढवण्यात माझी ना नसते. त्यामुळे, तुमच्या खालच्या वाक्याप्रमाणे... "देव अस्तित्वात आहे." असे उद्या जर कोणी नि:संदिग्धपणे सिद्ध केले तर आम्ही देवाचे अस्तित्व आनंदाने मानणार. नवीन ज्ञान झाल्याचा आनंद असतोच. ...तुम्ही आमच्या अज्ञेयवादी (अगदी विशिष्टपणे म्हणायचे झाले तर "नास्तिकतेकडे खूप झुकाव असलेल्या अज्ञेयवादी") गटांत आहात असेच दिसते. हे स्वागतार्हच आहे ! वेलकम टू द क्लब ! :) २. एखादी चांगली गोष्ट चांगल्या हेतूने करतानाही वापरायची साधनशुचिता, व ती न वापरल्यास आपल्याच हेतूवर होणारा दुष्परिणाम : या मुद्द्याच्या कक्षेत "लेखातल्या गोष्टीचे स्वरूप" व "आताचे चटकदार वाक्य" हे दोन्ही येतात असे मला वाटते. का ते अगोदर विस्ताराने लिहिल्याने त्याची इथे पुनरुक्ती करत नाही. पण आधुनिक शास्त्रिय पद्धतिंवर विश्वास ठेवून व्यवहार करणार्‍या नास्तिकांनी व अज्ञेयवाद्यांनी आधुनिक शास्त्रात साधनशुचितेचे किती महत्व आहे नेहमी ध्यानात ठेवायला हवे असे मला वाटते. याशिवाय मानवी विचारात बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेत मानसशास्त्राला (एक आधुनिक शास्त्र) डावलून केवळ परखड तर्काने यश मिळणार नाही, हे ही तेवढेच महत्वाचे आहे. असो. एकमेकाची मते नीट समजली आहेतच. यापुढचे निर्णय आपण दोघेही आपापल्या मताने व विचाराने घ्यायला मुखत्यार आहोतच. तेव्हा या सुसंवादावर इथेच थांबणे श्रेयस्कर होईल. तुमचे लेखन नेहमी वाचतो व पुढचे लेखन वाचायची इच्छा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ग
गामा पैलवान Mon, 12/28/2015 - 23:46 नवीन
यनावाला,
>> अनेकांनी शतकांनुशतके शोध घेऊनसुद्धा देवाच्या अस्तित्वाचा पुरावा सापडलेलाच नाही. आम्ही सर्वसामान्य >> निरीश्वरवादी तर देव अस्तित्वात नाही असे मानून इथले सर्व व्यवहार करतो.
ही विधाने इलेक्ट्रॉन संबंधीही करता येतात. अनेकांनी शतकानुशतके शोध घेऊनही इलेक्ट्रॉन नेमका कुठे असतो ते कळलेलं नाहीये. कधीकधी हा अणुकेंद्राच्या बाहेर असतो, तर धातूंच्या बाबतीत तो पूर्ण पदार्थात पसरलेला असतो. कधी कणाप्रमाणे वागतो तर कधी त्याचं वर्तन तरंगाप्रमाणे असतं. आण्विक प्रक्रियांत त्याचं अणुकेंद्राकडून उत्सर्जन वा अणुकेंद्रात शोषण होतं. पण तो अणुकेंद्रात अस्तित्वात राहू शकत नाही. तर मग कुठे जातो तेही माहीत नाही. इलेक्ट्रॉन अस्तित्वात नाही असं मानून सर्वसामान्य माणसाला आपापले व्यवहार पार पाडता येतात. मग आता सांगा की इलेक्ट्रॉन अस्तित्वात आहे की नाही? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
न
नगरीनिरंजन Tue, 12/29/2015 - 00:32 नवीन
हहपुवा. बटन दाबले की दिवा लागतो ते देवाच्या कृपेनेच वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 12/29/2015 - 11:54 नवीन
अगदी बरोबर बोललात. बटन दाबलं की देवकृपेने दिवा लागतो. इलेक्ट्रॉन माझा देव आहे. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
स
स्वप्नाचीदुनिया Sat, 01/02/2016 - 09:52 नवीन
प्रसाद खायला नकार दिल्याने, गाडी बंद पडली ह्यावर मत चाचणी घेउ हवेतर... १. हो बंद पडली. २. नाही असे होउ शकत नाही ३. माहित नाही.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 01/06/2016 - 12:25 नवीन
या धाग्यावरचे प्रतिसाद १००९ च्या पुढे जाऊन, धनावडेचे रेकॉर्ड तोडेल, असा विश्वास वाटतो.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 01/09/2016 - 08:17 नवीन
अतिशय सुंदर आणी मार्मिक लिखाण. आपले विचार तंतोतंत जुळतात यनावालाजी. पूर्णपणे नास्तिक असलेला (अभिजीत)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा